डिजिटल अर्काईव्ह (2014-2019)

'बनगरवाडी'तला 'दुष्काळ' तेवढे उरलाय!

एक तरुण त्या टपरीवर बसलेला आहे. त्याच्या पुढच्या मोकळ्या जागेत दोन-तीन माणसं उभी आहेत. त्याला विचारलं, ‘बनगरवाडी वाचलीय का?’ तो ‘हो’ असं उत्तर देतो. ‘त्या कादंबरीतलं आज काय शिल्लकंय?’ असे विचारल्यानंतर त्याचं नेमकं उत्तर असतं, ‘‘त्या कादंबरीतला दुष्काळ तेवढा उरलाय; बाकी शिल्लक नाही काही!’’ त्याच तरुणाला आणखी खोदून विचारलं. ‘काही तरी खाणाखुणा असतीलच ना?’ मग तो टपरी तशीच उघडी ठेवून सोबत येतो. गावातला एकच मुख्य रस्ता. या रस्त्यावरून चालताना समोर कडुलिंबाचं मोठं झाड दिसतं. तिथं आल्यावर तालमीची एक इमारत दिसते. दार उघडून पाहिल्यानंतर तालीम दिसते. वरचं छप्पर काही ठिकाणी निघालंय. त्यातून आभाळ दिसतं.
 

सोलापूर जिल्ह्यातील सांगोला या गावावरून काही किलोमीटर पुढे गेल्यानंतर बुद्धेहाळ तलाव लागतो. हा ब्रिटिशकालीन तलाव अजूनही सुस्थितीत आहे. तलावाच्या अलीकडं असलेल्या डोंगरावर इंग्रजांच्या काळात बांधलेले डाकबंगले आहेत. त्यांच्या चिरेबंदी भिंती अजूनही भक्कम वाटतात. या बंगल्यापासून साधारण एक-दीड किलोमीटर अंतरावर बुद्धेहाळचा तलाव आहे. तलावाच्या भिंतीवर जाण्यासाठी दगडी पायऱ्या आहेत. भिंतीच्या उंचवट्यावर उभं राहिलं, तर नजर भिडेल तिथपर्यंत लांबच लांब डोंगराच्या रांगा दिसतात. शुक्राचार्याच्या डोंगराच्या पूर्वेकडील भागात काही वस्त्यांच्या खाणाखुणा दुरून दिसतात. कोंबडवाडी, पाचेगाव अशी या डोंगरातली ही काही गावं. बानुरगड, भोपाळगडाचे डोंगरही इथून दिसतात. बहिर्जी नाईक यांची समाधी या डोंगरावर आहे. कोणत्याही दिशेला नजर फिरवा- डोंगराच्या रांगा रांगाच दिसू लागतात.

बुद्धेहाळच्या तलावात सोमेवाडी, गौडवाडी या गावच्या जमिनी गेल्या. पुनर्वसनाचे प्रश्न तसेच राहिले होते. मग या गावाच्या प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी जो लढा सातत्यानं द्यावा लागला, त्यातूनच गणपतराव देशमुख यांचे नेतृत्व पुढं आलं. किती तरी वर्षे गणपतराव या समस्या घेऊन झगडत राहिले. गणपतरावांच्या वतनाचं गावही इथलंच. आज विधानसभेत अकराव्यांदा निवडून गेलेले ते एकमेव नेते आहेत. बुद्धेहाळ तलावानं विस्थापित केलेल्या जनतेच्या लढ्यातून त्यांच्या संघर्षशील कारकिर्दीची सुरुवात झाली. सध्या या तलावात टेंभू प्रकल्पाचं पाणी सोडलंय. त्यामुळे उन्हाळ्यातही तलावाचा तळ उघडा पडलेला नाही. पाऊसकाळ पहिल्यासारखा राहिला नाही. या तलावाचा सांडवा नैसर्गिकरीत्या 1978 मध्ये वाहिला. पुन्हा तशी परिस्थिती आलीच नाही. पावसाचं प्रमाण घटत गेलं. मधल्या काळात सलग तीन वर्षांचा दुष्काळ आणि मधे एक वर्ष जरा बरं गेलं की, पुन्हा गेल्या वर्षी वार्षिक सरासरीच्या निम्मा पाऊस.

तलावाच्या भिंतीवर उभं राहिल्यानंतर उजव्या हाताला खूप दूरवर मंदिरांचे पांढुरके दोन ठिपके दिसतात. तिथं आहे लेंगरेवाडी. व्यंकटेश माडगूळकरांनी साकारलेल्या बनगरवाडीचं आजचं रूप. शेटफळेवरून आटपाडीकडं जाताना उजव्या हाताला वळावं लागतं. काही किलोमीटरचं अंतर पार करून गेल्यानंतर लेंगरेवाडी दिसू लागते. गावात प्रवेश करण्याच्या आधीही काही घरं लागतात. गावाच्या सुरुवातीलाच लेंगरेवाडीच्या प्राथमिक शाळेची इमारत आहे. 1939 हे या शाळेचे स्थापना वर्ष. सूर्य पूर्णपणे मावळतीकडं झुकलेला आहे. गुरा-माणसांची गावाकडं परतण्याची लगबग. गावात इथं-तिथं विखुरलेली माणसं दिसतात. त्यांच्या हालचालींनी थेट ‘बनगरवाडी’ नजरेसमोर तरळते.

बनगरवाडीतला कारभारी, आयबु, दादू बालट्या अशी किती तरी पात्रं आठवतात. या पात्रातली किती खरी, किती कल्पित... जी खरी असतील त्यांचे कोणते वारस आता या गावात असतील, जे वारस आहेत त्यांना आपल्या आधीच्या या पूर्वजांचे चेहरे आजही टक्कपणे दिसत असतील काय... असे असंख्य प्रश्न मनात तरळतात. ‘बनगरवाडी’तही भीषण दुष्काळ पडतो आणि माणसं जगण्यासाठी बाहेर पडतात...

या वर्षी लेंगरेवाडीतलीही तीस ते चाळीस टक्के माणसं रोजगारासाठी बाहेर पडलीत. गावाच्या शाळेला लागूनच एक टपरी आहे, तिथं घरगुती वापराच्या काही वस्तू मिळतात. एक तरुण त्या टपरीवर बसलेला आहे. त्याच्या पुढच्या मोकळ्या जागेत दोन-तीन माणसं उभी आहेत.

त्याला विचारलं, ‘बनगरवाडी वाचलीय का?’

तो ‘हो’ असं उत्तर देतो.

‘त्या कादंबरीतलं आज काय शिल्लकंय?’ असे विचारल्यानंतर त्याचं नेमकं उत्तर असतं, ‘‘त्या कादंबरीतला दुष्काळ तेवढा उरलाय; बाकी शिल्लक नाही काही!’’ त्याच तरुणाला आणखी खोदून विचारलं. ‘काही तरी  खाणाखुणा असतीलच ना?’ मग तो टपरी तशीच उघडी ठेवून सोबत येतो. 

गावातला एकच मुख्य रस्ता. या रस्त्यावरून चालताना समोर कडुलिंबाचं मोठं झाड दिसतं. तिथं आल्यावर तालमीची एक इमारत दिसते. दार उघडून पाहिल्यानंतर तालीम दिसते. वरचं छप्पर काही ठिकाणी निघालंय. त्यातून आभाळ दिसतं. तो तरुण म्हणतो, ‘‘ही ती तालीम. एवढंच जुनं शिल्लकंय्‌. बाकी खूप बदल झालाय गावात. काहीच पहिल्यासारखं राहिलं नाही. हा जो लिंब दिसतोय, त्याचा पार आधी गोल होता; आता तो चौकोनी केलाय. ‘‘गावात जगणं मुश्कील झालंय. यंदाचा दुष्काळ मोठाय. आधीच ह्या भागात पाऊस पडत नाही. जनावरांना चारा नाही. छावणीही उघडली नाही. इथं गावातली बरीच माणसं बाहेर कामधंद्यासाठी गेलीत.’’ तो तरुणच ही माहिती सांगत असतो.

आम्ही बोलत असताना चाळिशीतला तानाजी भीमराव लेंगरे जवळ येतो. त्याची माहिती कळते. 1996 ला बारावी झालाय. मुंबई उच्च न्यायालयात सहा वर्षं ‘स्टेनो’ म्हणून काम केलंय त्यानं. सांगलीत ‘आयटीआय’मध्ये शिक्षण झालं होतं. घरी कोरडवाहूची दहा एकर जमीन. समोरच तानाजी लेंगरे यांचं घर दिसतं. जुन्या पद्धतीचं धाब्याचं घर असतं तसं. मुंबईतली नोकरी सोडून मग गावाकडं कसे काय आलात?’ असं विचारल्यानंतर तानाजीकडून कोणतंच उत्तर मिळत नाही. चेहऱ्यावरचे भावही एकदम निर्विकार.

बाजूच्या दुसऱ्या घरातून विष्णू भीमराव लेंगरे हे पन्नाशीतले गृहस्थ बाहेर येतात. ते तानाजीचे मोठे भाऊ. ते आल्यानंतर तानाजी निघून जातो. तिथून हलल्यानंतर गावाच्या शेवटापर्यंत विष्णू लेंगरे सोबत येतात. त्यांनी स्वतःची आणखी वेगळी ओळख करून दिली. ते म्हणाले, ‘‘आमच्या आज्याचं नाव दादू यमाजी लेंगरे. त्यो पुस्तकातला दादू बालट्या न्हवं का- तेच बघा आडनावाचं पडनाव झालं.’’ मग सोबतचा तरुण बनगरवाडीतील आणखीही काही पात्रांच्या दोन-चार वारसदारांची घरं खुणेनं दाखवतो. पण चालताना त्या घरांकडं बोट दाखवण्याचं टाळतो. दादू बालट्याचे नातू असलेले विष्णू सांगतात, ‘‘चार-पाच सालापासून मनाजोगा पाऊसच न्हाई. गावात शेततलाव न्हाई. कामाचं म्हणशीला, तर एक दिवस काम करायचं आन्‌ चार दिवस बसून राह्याचं. गावात काम नाही. मग पार दहा-दहा किलोमीटरपर्यंत लांब जावं लागतं कामासाठी. पोरी हायती दोन. त्याबी बारावी, दहावीपस्तोर शिकल्याती. आम्ही आपलं कोरडवाहूच्या जमिनीत जेवारी आन्‌ बाजारीच घेतो. पर्यायच नाही ना काही! बरं पाऊसपाणी झालं तर भुईमूग, हरबरं घेतो. आता कुठं बाजरी, जेवारीच्या दाण्यावर तगायसारखी परिस्थिती राह्यलीय का? अहो, लयी बदललाय जमाना. अन्‌ आम्ही आपलं जिथल्या तिथंच...’’ विष्णू लेंगरेच्या बोलण्यातून जाणवतं, त्यांना बदलत्या काळाचा वेग कळालाय. आपण जिथल्या तिथंच आहोत, हेही त्यांना उमगलंय.

बनगरवाडीतली खोपटासारखी बारकी-बारकी घरं गेली. त्या ठिकाणी आता अनेक पक्की घरं दिसू लागलीत. त्या खोपटासारख्या घरापुढची शेरडं-करडं आज पक्क्या घरांपुढं आहेत. आम्ही निघालो तेव्हा विष्णूची बायको दोन-चार शेळ्यांना दावं बांधत होती... गावाच्या खाणाखुणा बदलल्यात, खूप-खूप बदललीय बनगरवाडी. फक्त बदलली नाही इथली रखरख. तो तरुण म्हणतोय तसं- ‘आता कादंबरीतला दुष्काळ तेवढा शिल्लक उरलाय.’

Tags: Drought Asaram Lomate दुष्काळ आसाराम लोमटे weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

आसाराम लोमटे
aasaramlomte@gmail.com

पत्रकार व लेखक.  आसाराम लोमटे यांचे आलोक (कथासंग्रह), इडा पिडा टळो (कथासंग्रह),धूळपेर (लेखसंग्रह) ही पुस्तके प्रसिद्ध आहेत. आलोक या कथासंग्रहाला साहित्य अकादमी पुरस्कार (२०१६) मिळाला आहे. 


प्रतिक्रिया द्या