डिजिटल अर्काईव्ह (2014-2019)

‘सामाजिक चळवळी आणि वर्तमान आव्हाने’ हा डॉ.प्रकाश दुकळे यांनी संपादित केलेला ग्रंथ आहे. आजच्या आपल्या समग्रतेचे भान सुटत चाललेल्या वर्तमान वास्तवात महत्त्वाचा ठरेल असाच हा ग्रंथ आहे. सामाजिक चळवळीच्या क्षेत्रात महत्त्वाचे योगदान दिलेले प्रा.विजयकुमार जोखे यांच्या अमृतमहोत्सवानिमित्त हा ग्रंथ सिद्ध करण्यात आला आहे. समाजाच्या असुरक्षित आणि भयग्रस्त दिशाहीन वास्तवात सामाजिक चळवळींचे स्वरूप कशा प्रकारचे आहे? या चळवळींसमोर कोणत्या प्रकारची आव्हाने आहेत? चळवळींची भविष्यकाळातील वाटचाल कोणत्या दिशेने असू शकेल? या अनुषंगाने अत्यंत तपशीलवार चर्चा या ग्रंथात अनेक मान्यवर लेखक, विचारवंत, कलावंत, अभ्यासक आणि चळवळीत प्रत्यक्ष काम करणारे कार्यकर्ते यांनी केलेली आहे.

वर्तमान सामाजिक-सांस्कृतिक वातावरणाचा विचार करता, सर्वसामान्य माणसाचे अवघे आयुष्यच कमालीचे असुरक्षित आणि भयग्रस्त झाल्याचे चित्र आहे. 1990 नंतर जगाच्या- विषेशत: भांडवलशाही देशांच्या- बरोबरीने स्पर्धा करण्याच्या हेतूने इतर अनेक देशांप्रमाणे आपल्या देशानेही खासगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण स्वीकारले. अर्थातच या साऱ्या गोष्टींचा परिणाम आपल्या एकूणच जगण्या-भोगण्यावर कमालीचा झाला आहे. एकसंध समाज आपल्या इतिहासात कधीच नव्हता, हे वास्तव आहे. तथापि सामाजिक, राजकीय इत्यादी क्षेत्रांध्ये प्रबोधनाचा विचार आणि कृतींमुळे एकसंध समाजाचे चित्र अपेक्षित प्रमाणात नसले, तरी काही प्रमाणात दिसू लागलेले होते. आपल्याकडेही आधुनिक कालखंडात- विशेषत: म.फुल्यांच्या विचारांनंतर हा समाज निश्चितच बदलू लागलेला होता. 

फुल्यांचे परिवर्तनवादी विचार नंतरच्या कालखंडात डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी अधिक जोरकसपणे मांडले आणि त्यानुसार त्यांनी कृतीही केली. म.फुले, डॉ.आंबेडकर, शाहू महाराज आदी समाजधुरिणांनी समाजातील विरोधाभासाचा, अन्याय- अत्याचाराचा, समता आणि स्वातंत्र्याचा विचार कोणत्याही एका विशिष्ट जाती-जमातीच्या संदर्भात  नक्कीच केलेला नव्हता. शोषित समाजाचा समग्रपणे विचार या विचारवंतांनी केला आणि आवश्यक ती कृतीही केली. दुदैव हे की, हे समाजाच्या समग्रतेचे भान उत्तरोत्तर- विशेषत: 1990 नंतर परिवर्तनवादी चळवळींमधून सुटू लागले. आपला प्रबोधनाचा इतिहास, साहित्य, संस्कृती, कला, भाषा यांचे भान वर्तमान वास्तवात नष्ट होत चालले. अशा काळात या संपादित ग्रंथाचे मोल अधिकच वाढते. 

समाजातील आजच्या बहुतेक कळीच्या प्रश्नांची नेमकी मांडणी करून प्राप्त परिस्थितीवर काही उत्तरे शोधण्याचा प्रयत्नही प्रस्तुत ग्रंथात करण्यात आला आहे. या ग्रंथात परिवर्तनवादी चळवळींशी संबंधित तेवीस लेख संग्रहित करण्यात आले असून, समाजातील अनेक घटकांना कवेत घेणारा मजकूर यात आला आहे. ‘सामाजिक चळवळींमध्ये संघटनात्मक कार्याचा सहभाग अपेक्षित असतो. अनेक व्यक्तींच्या इच्छा- आकांक्षांना एकत्रितपणे व्यक्त करण्याचे कार्य म्हणजे सामाजिक चळवळ’ अशी भूमिका विशद करून डॉ.आनंद पाटील यांनी सामाजिक चळवळींसंदर्भातील अनेक संदर्भ देत रोजच्या जगण्यातील असंख्य बाबी समजून घेण्यासाठी जैविक बुद्धिमंत बंडखोर चळवळ्यांची गरज असल्याचे नमूद केले आहे. 

डॉ.राजेखान शानेदिवाण यांनी डॉ.नरेंद्र दाभोलकरांचे विचार आणि त्यानुसार त्यांनी केलेली कृती याचा तपशीलवारपणे परिचय ‘अंनिस, डॉ.दाभोलकर आणि नंतर...’ या लेखाद्वारे करून दिला आहे. डॉ.दाभोलकरांनी आपल्या चळवळीची दिशा ठरविताना भारतीय घटनेला कसे सर्वाधिक प्राधान्य दिले, या अनुषंगाने डॉ.शानेदिवाण यांनी केलेली मांडणी अभ्यासकांना आणि चळवळीतील नवोदित कार्यकर्त्यांना उपकारक ठरणारी आहे. शिवाय ‘गेल्या चार वर्षांच्या काळात डॉ.नरेंद्र दाभोलकर, गोविंद पानसरे आणि डॉ.कलबुर्गी यांच्यासारखी लढाई लढणारा एकही योद्धा पुढे आलेला नाही. व्यक्ती तितक्या प्रकृती हे जरी मान्य केले, तरी सर्वस्व झोकून देऊन काम करण्याची उर्मी अनुभवायला मिळाली नाही,’ असा खेदही या लेखात डॉ.शानेदिवाण यांनी व्यक्त केला आहे.

किशोर बेडकिहाळ यांनी लिहिलेल्या ‘पुरोगामी चळवळ आणि जमातवाद’ या लेखात ‘जमातवादी शक्ती, त्यांची कारस्थाने आपणाला नवी नाहीत.’ अशी समर्पक सुरुवात करून, जमातवादाचे स्वरूप विशद केले आहे. जमातवादी कारस्थाने समाजजीवनात कशा प्रकारचा परिणाम घडवून आणण्याचा प्रयत्न करतात, याची सूत्रबद्ध मांडणी केलेली आहे. ‘लोकशाही, संघराज्य, सेक्युलॅरिझम या तिन्हींचे समाजजीवनातून उच्चाटन करणे हेच जमातवाद्यांचे जीवितकार्य असते. भारतातील हिंदू-मुस्लिम-शीख-ख्रिचन या जमातवादी शक्ती वरील सूत्रांना अपवाद नाहीत,’ अशी ठाम भूमिका मांडली आहे. शिवाय या लेखात जमातवादाच्या निर्मितीची कारणमीमांसा, त्यामागील राजकारण, सेक्युलॅरिझमच्या अर्थाचा प्रश्न, परिवर्तनवाद्यांच्या मर्यादा, बिगरकाँग्रेसवादाचा जन्म, बदलती सामाजिक परिस्थिती, जमातवादविरोधी लढ्याची दिशा आणि या लढ्यासाठी चळवळींच्या माध्यमातून संघटितपणे लढण्याकरिता करावे लागणारे प्रयत्न या मुद्याचे साधार व विस्तृत विवेचन केले आहे. 

आजच्या आपल्या समाजातील जमातवादाचे स्वरूप पाहता, भारताचे एकसंधत्व टिकण्यासाठी त्याच्या राष्ट्रीयत्वाचा पाया धर्मनिरपेक्षच राहायला हवा. म्हणूनच भारत एकसंध राहण्यासाठी सेक्युलॅरिझमशिवाय दुसरा आधार नाही- अशी सर्वसमावेशक भूमिका या लेखाच्या अनुषंगाने किशोर बेडकिहाळ यांनी घेतलेली आहे. जमातवाद आणि जाती-अंत या भिन्न संकल्पना असल्या तरी या दोहोंमध्ये असणारा परस्परसंबंध अमान्य करता येत नाही. या अनुषंगाने कॉ.धनाजी गुरव यांनी लिहिलेला ‘जाती-अंत आणि शरण चळवळ’ हा लेखही महत्त्वपूर्ण ठरावा असा आहे. शरणांच्या चळवळींची पार्श्वभूमी, शरणांच्या लिंगायत चळवळीचे वेगळेपण, जातीवरून कामाच्या विभागणीला विरोध, जातवार वस्तीला विरोध, बुद्ध-बसवण्णा-मार्क्स-बाबासाहेब या मुद्यांच्या अनुषंगाने या लेखात अनेक संदर्भ दिले आहेत. शिवाय ‘खासगी मालकी हा आताच्या जाती-अंताच्या चळवळीचा सर्वांत मोठा अडथळा’ असल्याचा निष्कर्ष लेखाच्या अखेरीस कॉ.धनाजी गुरव यांनी काढला आहे. 

या ग्रंथात डॉ.हमीद दाभोलकर यांनी लिहिलेला ‘राज्यघटना आणि विवेकवाद’ हा अत्यंत महत्त्वपूर्ण असा लेखही समाविष्ट करण्यात आलेला आहे. या विषयाच्या अनुषंगाने आपले साहित्य व विचारविेशात विस्ताराने मांडणी केली नसल्याचे चित्र दिसते. डॉ.नरेंद्र दाभोलकर  यांनी ‘तिमिरातुनी तेजाकडे’ या ग्रंथात  विवेकाची व्याख्या करताना, ‘विवेक म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोनाचा मूल्यात्मक आशय’ असे म्हटले आहे. भारतीय राज्यघटनेतील स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय इत्यादी अत्यंत महत्त्वाची असलेली मूल्ये आणि विवेकवाद या बाबी सामाजिक विकासात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत असतात. डॉ.नरेंद्र दाभोलकर यांनी विवेकवादाच्या अनुषंगाने काहीएक मांडणी केलेली आहे. पण भारतीय राज्यघटना आणि विवेकवाद यांची एकत्रित मांडणी करण्यासाठी डॉ.दाभोलकरांना पुरेसा अवकाश मिळाला नाही.

तथापि, आजच्या काळात राज्यघटनेची जपणूक आणि त्याबरहुकूम आवश्यक असणारा आपला राजकीय वर्तनव्यवहार या गोष्टींसाठी अत्यंत आव्हानात्मक परिस्थिती उद्‌भवल्याची जाणीव या लेखाच्या अनुषंगाने डॉ.हमीद यांनी करून दिली आहे. शिवाय विवेकवादाच्या संकल्पनेच्या अनुषंगाने या लेखाच्या माध्यमातून अभ्यासपूर्ण आणि विस्ताराने लेखन करण्यात आलेले आहे. सारासार विचार, कार्यकारणभावाचे गणित याबाबत आपला समाज पूर्वापार गाफिल आहे. या गाफिपणामुळेच समाज अज्ञानात खितपत असून विवेकनिष्ठतेचे महत्त्व चार्वाक-बुद्धापासून सातत्याने प्रतिपादण्यात आलेले आहे. तथापि, आजही आपणास विवेकनिष्ठतेचे महत्त्व समजले नसल्याची खंत या लेखात आलेली आहे. शिवाय विवेकवादाला अनुरूप असा कोणता कृतिकार्यक्रम असू शकतो, याचीही सविस्तर रूपरेषा अत्यंत सूत्रबद्धपणाने डॉ.हमीद यांनी या लेखात मांडली आहे.

 या ग्रंथात डॉ.श्यामसुंदर मिरजकर यांनी ‘फुले-शाहू- आंबेडकरी चळवळ आणि वर्तमान आव्हाने’ या अनुषंगाने मांडणी केली आहे. ‘आजच्या सामाजिक आणि राजकीय वास्तवावर प्रशिक्षित कार्यकर्त्यांच्या संघटना हाच महत्त्वाचा पर्याय असल्याचे मिरजकर यांनी या लेखात म्हटले आहे. माणसाचा माणूस म्हणून विचार करावयास आपल्या शिक्षणाने आपणास शिकवले. आपण शिकलो, समाजालाही तशा प्रकारचे वर्तन करावयास आपण शिकविले; पण समाजाच्या उत्थानाचा विचार आपण कृतीत आणला नाही. जात-धर्म-वर्ग- वंश-पंथ यांच्या सीमारेषा आपणास अजूनही ओलांडता आलेल्या नाहीत, हे सत्य मान्यच करावयास हवे. डॉ.मिरजकर यांच्या लिखाणातून याचा प्रत्यय येतो. डॉ.अरुण शिंदे यांनी ‘सत्यशोधक चळवळ व या चळवळीची प्रस्तुतता’ या अनुषंगाने विवेचन केले आहे. या चळवळीच्या संदर्भातील खूप सारे लेखन झालेले आहे. या लेखाच्या अनुषंगाने एकत्रित अशी चांगली मांडणी डॉ.शिंदे यांनी विस्ताराने केलेली आहे. शिवाय सामान्य माणसाच्या जीवनाचा लढा लढविण्यास सत्यशोधक समाजाचे विचार कोणत्याही काळात मार्गदर्शक ठरू शकतील, असा विश्वासही व्यक्त केला आहे. 

या ग्रंथात डॉ.शमशुद्दीन तांबोळी यांनी मुस्लिम सत्यशोधक चळवळीच्या अनुषंगाने विस्तृत मांडणी केली आहे. डॉ. तांबोळी यांनी मुस्लिम सत्यशोधक चळवळ आणि हमीद दलवाई यांचे विचार व कार्य यामधील सुसंगती अधोरेखित करून तत्कालीन समाजजीवनात ते कसे महत्त्वपूर्ण होते, याचे नेमके विवेचन केले आहे. मुस्लिम सत्यशोधक चळवळ ही इतर अनेक सामाजिक चळवळींप्रमाणेच ऱ्हासाच्या मार्गावर वाटचाल करीत असताना, या लेखात डॉ.तांबोळी यांनी केलेले विवेचन अत्यंत महत्त्वाचे वाटते. ‘सामाजिक चळवळी आणि माध्यमांची भूमिका’ हा प्रसाद माधव कुलकर्णी यांचा वर्तमानकाळाशी सुसंगत असा महत्त्वपूर्ण लेख या ग्रंथात समाविष्ट करण्यात आला आहे. सामाजिक चळवळींमधील प्रबोधन आणि माध्यमे यांच्यात परस्परपूरकता असेल, तर अपेक्षित असे सामाजिक बदल घडून येण्यास हातभारच लागत असतो. तथापि, अपवाद वगळता आजच्या वर्तमान वास्तवातील वर्तमानपत्रे, दूरदर्शनच्या असंख्य वाहिन्या, मोबाईलसारखी इलेक्ट्रॉनिक माध्यमे प्रतिगामी विचारसरणीच्या राज्यकर्त्यांपुढे मान तुकवून उभी असल्याचे चित्र सार्वत्रिक आहे. अशा केवळ पोटार्थी बनलेल्या, अभिव्यक्ति स्वातंत्र्याचा लगाम दुसऱ्याच्या हातात दिलेल्या माध्यमांबाबतची चिंता प्रसाद कुलकर्णी यांनी या लेखातून व्यक्त केली आहे. 

विज्ञान-तंत्रज्ञानाच्या विकासास चक्रावणारी गती प्राप्त झाली असून साध्य आणि साधन यांच्यातील विवेकही अभावानेच दिसतो आहे. प्रबोधनाच्या कामाकरिता राजसत्ता आणि धर्मसत्ता यांच्या अवाजवी हस्तक्षेपामुळे विज्ञान व तंत्रज्ञान थिटे पडत चालल्याचे निरीक्षण नोंदवून ‘सामाजिक चळवळींनी  आणि माध्यमांनी आपले हातात हात असलेले नाते अधिक बळकट व विश्वासार्ह करण्याची गरज आहे,’ असे प्रतिपादन केले आहे. डॉ.शिवकुमार सोनाळकर यांनी या ग्रंथात ‘विज्ञान चळवळ आणि वैज्ञानिक दृष्टिकोन’ या विषयाच्या अनुषंगाने लिखाण केले आहे. विज्ञानाचा विस्फोट जगभर होत असून, समाजाच्या दैनंदिन व्यवहारात विज्ञान महत्त्वाची भूमिका बजावत आहे. तथापि, समाजात वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अभाव असल्याचे निरीक्षण नोंदवून यासंदर्भातील योग्य त्या चळवळींची गरज असल्याचे प्रतिपादन लेखात डॉ.सोनाळकर यांनी केले आहे. 

इतर अनेक प्रश्नांसोबत सीमाप्रश्नाची चळवळही आपल्या समाजासमोर कायमचेच दुखणे होऊन बसली आहे. सीमाप्रश्नाचा उगम, कानडी दडपशाही, कन्नड भाषेची सक्ती, राजकीय अनास्था, चळवळीतील नेते आणि कार्यकर्ते, या चळवळीचे भवितव्य आणि वर्तमान वास्तव या मुद्यांच्या अनुषंगाने डॉ.जी.पी.माळी यांनी सविस्तर मांडणी या ग्रंथात केली असून; काळाच्या कसोटीवर ही चळवळ कितपत टिकेल, अशी शंका व्यक्त केली आहे. मात्र, असा लढा देणाऱ्यांविषयी कृतज्ञताही व्यक्त केली आहे.

डॉ.नंदकुमार मोरे यांनी ‘साहित्य, सांस्कृतिक चळवळी आणि मराठी साहित्य’ या विषयाच्या अनुषंगाने सविस्तर मांडणी केली आहे. सांस्कृतिक पर्यावरण साहित्यव्यवहारावर परिणाम करत असते, असे एक सूत्र घेऊन महानुभाव संप्रदाय ते आजच्या ग्रामीण, दलित, आदिवासी, स्त्रीवादी इत्यादी साहित्याशी सामाजिक चळवळी आणि प्रबोधन कसे परस्परपूरक होते याचा विस्तृत पट उलगडून दाखविला आहे. त्याचबरोबर आजचे साहित्य आणि साहित्य संमेलने पुन्हा एकदा जातीपातींच्या, वृथा धर्माभिमान्यांच्या संकुचितपणामुळे गर्तेत सापडले असून; आजच्या काळात निखळ वाङ्‌मयीन चळवळी दिसत नाहीत, अशी खंतही डॉ.मोरे यांनी व्यक्त केली आहे. शिवाय प्रा.विजयकुमार जोखे यांची डॉ.प्रकाश दुकळे आणि प्रा.युवराज पाटील यांनी घेतलेली मुलाखतही या ग्रंथात समाविष्ट करण्यात आली आहे. 

विस्तार भयास्तव या ग्रंथातील सर्वच लेखांचा तपशीलवार परिचय करून देणे शक्य नाही. तथापि, या ग्रंथातील सर्वच लेखक सामाजिक चळवळींशी जिव्हाळ्याचे नाते प्रस्थापित करणारे आहेत. सामाजिक चळवळी त्यांनी जवळून पाहिल्या- अनुभवल्या आहेत. काहींनी सामाजिक परिवर्तनाच्या कामात कृतिशील सहभागही दाखविलेला आहे. या ग्रंथातील लेखकांच्या लिखाणातून सामाजिक परिवर्तनाची आस दिसून येते. पर्यावरणाचे प्रश्न, सहकारक्षेत्राची उपयुक्तता, जातजाणीव व प्रबोधन, आदिवासी चळवळ, लिंगायत चळवळ, सडक नाट्य आणि प्रबोधन, सत्यशोधकीय स्त्रीवाद, तीर्थंकर महावीर यांचा स्त्रीविषयक दृष्टिकोन, शेतकरी चळवळ, वाचनसंस्कृती आणि वाचन चळवळ अशा अनुषंगाने उदय गायकवाड, डॉ.विजय ककडे, कृष्णा चांदगुडे, डॉ.दीपककुमार वळवी, रमेश साळुंखे, सिद्धमल्लय्या हिरेमठ, योगेश कुदळे, डॉ.मांतेश हिरेमठ, डॉ.नीता जोखे, प्रा.डी.आर. पाटील, डॉ.प्रकाश दुकळे यांचेही या ग्रंथात लेखन केले आहेत. 
आजच्या आपल्या भवतालाच्या वास्तवाला शरण जाऊन या ग्रंथातील कोणत्याही लेखकाने निराशेचा सूर लावलेला नाही, तर चळवळीच्या कार्यकर्त्यांसाठी परिवर्तनवादी विचाराला शोभेल असा आशावाद सातत्याने प्रतिबिंबित केला आहे. म्हणूनच अशा आपल्या विक्राळ रूप धारण केलेल्या भवतालात अभावानेच दिसणारा समाजधार्जिणा आशावादी विचार या ग्रंथात असून, एकूणच समाज-स्वास्थ्याचा विचार मनात बाळगणाऱ्या प्रत्येकालाच हा ग्रंथ मार्गदर्शक व प्रेरणा देणारा आहे. 

सामाजिक चळचळी आणि वर्तमान आव्हाने 
संपादन : डॉ. प्रकाश दुकळे 
प्रकाशक : नागनालंदा प्रकाशन, इस्लामपूर 
पृष्ठे : 304, किंमत : 250 रुपये 
मो. 8421931873                 
 

Tags: रमेश साळुंखे Ramesh Salunkhe सामाजिक चळचळी आणि वर्तमान आव्हाने weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

रमेश साळुंखे,  कोल्हापूर, महाराष्ट्र


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके

कर्तव्य

सर्व पहा