डिजिटल अर्काईव्ह (2013-2020)

गाडी कंपाऊंडच्या बाजूला पार्क केली व गंजलेले लोखंडी कंपाऊंडचे दार किलकिले करून आत शिरलो. उंचवट्याचा सुरुवातीचा भाग सोडताच आतमध्ये विस्तीर्ण अशी सपाट, खोल जागा होती. ताडाच्या मोठाल्या वृक्षांनी सभोवतालचा परिसर कवेत घेतला होता. एका ऐतिहासिक गुपिताचे जणू ते पहारेकरीच होते. वाऱ्याच्या झुळकीमुळे झाडांच्या पानांची होणारी ती सळसळ परिसराचे गूढपण अधिकच गहिरे करत होती. मी आणखी थोडे आत गेलो. मध्यभागी खोदकाम केलेल्या मातीचा गोल आकारामध्ये साचा केलेला दिसला आणि त्याच्याभोवती छोटी बुद्धाची मूर्ती व इतर काही वस्तू मांडून ठेवलेल्या दिसल्या. बाजूलाच असलेल्या पुरातत्त्व विभागाच्या मोठ्या बोर्डाने माझे लक्ष वेधून घेतले आणि जे काही मी वाचले, त्यावर माझा क्षणभर विेशासच बसला नाही. या परिसरात साक्षात गौतम बुद्ध आलेले होते! 2500 वर्षांपूर्वी ‘शूरपारक’ किंवा ‘सोपारा’ या नावाने ती नगरी ओळखली जात होती.

माझ्या घरापासून अवघ्या 10 मिनिटांवर सोपाऱ्याला जाताना रस्त्याच्या उजव्या बाजूला एक जागा आहे. आम्ही तिला ‘कोटा’ असे म्हणतो. सभोवतालच्या प्रदेशातील जमीन सपाट असूनसुद्धा या परिसरात मात्र छोटे-छोटे अनैसर्गिक वाटावेत असे उंचवटे आहेत. आजूबाजूच्या जमिनीशी असंबद्ध वाटावा असा हा निर्जन परिसर आहे. नाही म्हणायला, तेथीलच एका उंचवट्यावर कोपऱ्यात एक झोपडी आहे. एक आदिवासी कुटुंब तिथे राहते. या परिसराविषयी बऱ्याच दंतकथा इथे रूढ आहेत. कोणी म्हणायचे की, येथील मातीला चंदनाचा वास येतो; तर कोणी म्हणायचे, येथील मातीत सोन्याचे कण मिसळलेले आहेत. आजूबाजूला असलेली वृक्षांची गच्च दाटी, त्यामुळे भर दुपारीही इथल्या रस्त्यावर काळोख असतो. हा परिसर आमच्यासाठी लहानपणी काहीसा रहस्यमय, गूढ असा होता. रात्री-अपरात्री कोट्याहून येण्यास मोठी माणसेही घाबरायची. 

सन 50 च्या दशकात भारतीय पुरातत्त्व विभागाने इथे काही खोदकाम केले होते आणि बौद्ध धर्मीयांशी निगडित काही शिलालेख त्यांनी इथून नेले होते. कदाचित आजूबाजूच्या परिसरात बौद्ध धर्माची वस्ती खूपच विरळ असल्यामुळेही असेल या गोष्टीची जास्त वाच्यता परिसरातील हिंदू, ख्रिस्ती, मुस्लिम लोकांत इतकी नव्हती. किंबहुना, नेहमीप्रमाणे भुताटकी-चेटकीण अशीच मंतरलेली विशेषणे या परिसराला चिकटलेली होती. विवेकमंचात आल्यावर विविध धर्मांत व त्यांच्या धर्मग्रंथांना कशा मर्यादा आहेत, याविषयी बरीच माहिती मिळालेली होती. हिंदू धर्मात कसा जातीयवाद, मुस्लिम धर्मात कट्टरवाद, ख्रिश्चनांतील जुन्या व नव्या करारातील कालबाह्य बाबी- सर्व धर्मांची चिकित्सा मंचात झाली होती पण याला अपवाद असायचा तो बुद्धिझमचा. 

बुद्ध धर्माचा विषय आला की, डिसोझासर व ॲड.अनुप भरभरून बोलत असत. विज्ञानाच्या सर्वांत जवळ जाणारा जर कोणता धर्म असेल, तर तो म्हणजे ‘बुद्धिझम’- असे दोघेही कोरसमध्ये म्हणत असत. ईश्वर, स्वर्ग, नरक, पुनर्जन्म अशा कोणत्याच गोष्टी बुद्धाला मान्य नव्हत्या. विविध प्रामाण्ये न मानणारा अतिशय व्यवहारी व मानवतावादी असा हा धर्म आहे. ‘जीवन दुःखमय आहे आणि त्या दु:खाचे कारण हे अज्ञान व लालसा यात आहे’, ‘भूतकाळात अडकून पडू नका, भविष्याच्या स्वप्नातही मग्न होऊ नका, वर्तमानावर लक्ष द्या. हाच आनंदी राहण्याचा मार्ग आहे.’ आजही पुरोगामी वाटावेत असे साधे-सोपे विचार बुद्धाने 2500 वर्षांपूर्वी मांडले. ‘तटस्थरित्या स्वत:कडे बघून आत्मनिरीक्षण करणे’, ‘सत्य जाणणे’, ‘याच जन्मी स्वतः सुखी होणे’ व ‘दुसऱ्यांनाही सुखी करणे’ अशी चतुःसूत्री सातत्याने अवलंबिणाऱ्या मानवाला याच जन्मी सुखी होणे शक्य आहे, असं प्रॅक्टिकल मॉडेल बुद्धाने मांडलं होतं. 

बुद्धाच्या विविध विचारांवर कित्येक चर्चा विवेकमंचात घडल्या आहेत. प्रामाणिकपणे सांगायचे तर, मंचात यायच्या अगोदर बुद्ध म्हणजे एका रात्रीत सर्व ऐश्वर्य झुगारून सत्याच्या शोधात निघालेला इतिहासातील एक महान व्यक्ती आणि अहिंसेच्या विषयावर येशूच्या बरोबरीने हमखास घेतले जाणारे एक नाव एवढीच जुजबी माहिती बुद्धाविषयी होती. तसेच बुद्ध म्हणजे ‘जय भीम’वाल्यांचा, अशी सर्वसामान्यांत रूढ असलेली जातीयवाचक समजूतही होती. विवेकमंचातील चर्चेमुळे मात्र मला बुद्धाविषयी खूप आकर्षण निर्माण झाले. 

अशातच एकदा मुंबईला गेलेलो असताना तेथील एका प्रसिद्ध म्युझियमला भेट देण्याचा योग आला. तेथील कला, इतिहासाच्या विविध दालनांतून फेरफटका मारत मी तेथील विविध कलेक्शन न्याहाळत होतो. म्युझियमच्या विविध दालनांना भेट देताना, एका कोपऱ्यात ‘सोपारा’ या माझ्या शेजारच्या गावाचे नाव मी पाहिले आणि मी तिथेच थबकलो. त्या दालनाशेजारी इंग्रजी, हिंदी व मराठी अशा तिन्ही भाषांत माहिती दिली होती. ती मी मोठ्या अभिमानाने वाचून काढली आणि काचेच्या मोठ्या कपाटात अगदी शाही स्वरूपात विराजमान झालेला तो मोठा शिलालेख पाहिला आणि अंगावर रोमांच उभे राहिले. हा शिलालेख माझ्या घरापासून अवघ्या दहा मिनिटांवर असलेल्या जागेवरून इथे आणलेला आहे, ही भावनाच मुळी रोमहर्षक होती. 

‘आजारपण, लग्न, जन्म, प्रवास याप्रसंगी माणूस खूपच कर्मकांडे करतो,’ असे अतिशय अचूक timeless वर्णन ख्रिस्तपूर्व तिसऱ्या शतकात सम्राट अशोकाने सोपारा इथे पाठविलेल्या या शिलालेखात होते. हा शिलालेख पाहिल्यावर मला कधी एकदा माझ्या घराजवळील ‘कोटा’ या ठिकाणाला भेट देतो, असे झाले. ज्याला आपण गूढ, रहस्यमय जागा समजत होतो, त्यामागे खरेच एक ऐतिहासिक महत्त्व लपलेले होते, ते जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली होती. लगेचच दुसऱ्या दिवशी मी बाईक घेऊन ‘कोटा’ या ठिकाणी गेलो. लहानपणी मी मित्रांबरोबर एक-दोनदा सायकलवर या ठिकाणी आलो होतो. कंपाउंडमधून आत शिरताच आमच्या गावातील काही लोकांनी आम्हाला पाहिले होते आणि जोरात ओरडून ‘तिथून निघा’ असे दटावले होते. त्यामुळे आत पोहोचूनही आम्हाला विशेष असा वेळ काही व्यतीत करता आला नव्हता. 

आज मात्र निवांतपणे एक कुतूहल घेऊन मी या परिसरात शिरलो होतो. लहानपणापासून ज्याच्याविषयी एक गूढ वाटत आले आहे, एक अनामिक भीती मनामध्ये होती; त्या भीतीवर मात करण्याची ही जणू एक संधी होती. गाडी कंपाऊंडच्या बाजूला पार्क केली व गंजलेले लोखंडी कंपाऊंडचे दार किलकिले करून आत शिरलो. उंचवट्याचा सुरुवातीचा भाग सोडताच आतमध्ये विस्तीर्ण अशी सपाट, खोल जागा होती. ताडाच्या मोठाल्या वृक्षांनी सभोवतालचा परिसर कवेत घेतला होता. एका ऐतिहासिक गुपिताचे जणू ते पहारेकरीच होते. वाऱ्याच्या झुळकीमुळे झाडांच्या पानांची होणारी ती सळसळ परिसराचे गूढपण अधिकच गहिरे करत होती. मी आणखी थोडे आत गेलो. मध्यभागी खोदकाम केलेल्या  मातीचा गोल आकारामध्ये साचा केलेला दिसला आणि त्याच्याभोवती छोटी बुद्धाची मूर्ती व इतर काही वस्तू मांडून ठेवलेल्या दिसल्या. बाजूलाच असलेल्या पुरातत्त्व विभागाच्या मोठ्या बोर्डाने माझे लक्ष वेधून घेतले आणि जे काही मी वाचले, त्यावर माझा क्षणभर विश्वासच बसला नाही. या परिसरात साक्षात गौतम बुद्ध आलेले होते! 

2500 वर्षांपूर्वी ‘शूरपारक’ किंवा ‘सोपारा’ या नावाने ती नगरी ओळखली जात होती. सोपारा या नगरीतून ‘पूर्णा’ नावाचा एक प्रसिद्ध व्यापारी उत्तर प्रदेश इथे व्यापारासाठी गेला. तिकडे त्याने गौतम बुद्धाचे प्रवचन बुद्धविहारात ऐकले, तो प्रभावित झाला व त्याने गौतम बुद्धाकडे दीक्षा घेतली. पूर्णा हा भगवान बुद्धाचा शिष्य झाला. तो भिक्षू झाल्यावर काही वर्षे तिकडे राहिला. भगवंताच्या सहवासात त्याने धम्माचा परिपूर्ण अभ्यास केला आणि धम्माचा प्रसार करण्यासाठी तो गौतम बुद्धाची परवानगी घेऊन त्याच्या मूळ गावी ‘सोपारा’ इथे परत आला. भावाच्या मदतीने आणि सहकार्याने त्याने सोपारा गावात चंदनाचा विशाल असा बुद्ध विहार बांधला. बुद्ध विहाराच्या उद्‌घाटनासाठी पूर्णाच्या विनंतीला मान देऊन भगवान बुद्ध व त्यांच्यासमवेत 500 भिक्षुक सोपारा इथे आले होते. भगवान बुद्ध यांची आठवण या सोपारा येथील विहारात चिरंतन राहावी यासाठी पूर्णा याने बुद्धाकडे त्यांचे भिक्षापात्र मागितले (ते भिक्षापात्र सद्य:स्थितीत लंडन इथल्या म्युझियममध्ये आहे). 

काही वर्षांनी पूर्णा याचे निर्वाण झाले. भगवान बुद्धाच्या महापरिनिर्वाणाच्या 200 वर्षांनंतर, कलिंगा देशाच्या युद्धानंतर सम्राट अशोकच्या मनाचा कायापालट झाला आणि त्याने युद्धमार्ग सोडून बुद्धमार्ग स्वीकारला. त्यामुळे सम्राट अशोकाने धम्मप्रचार व प्रसार करण्यासाठी वेगवेगळ्या स्तुपांची, लेण्या, विहार, गुफा याची निर्मिती केली आणि त्यांनी वेगवेगळ्या भिक्षूंना धम्मप्रसारासाठी विविध ठिकाणी पाठविले. त्यापैकीच त्याचे काही भिक्षू सहकारी येथील सोपारा विहारातही आले होते. त्यांनी त्यांच्यासमावेत काही शिलालेखही आणले होते आणि हेच शिलालेख 50 च्या दशकात भारतीय पुरातत्त्व विभागास सापडले होते आणि पुढे आणखी उत्खनन होऊन बुद्ध स्तूप- जो चंदनाच्या लाकडात बनविलेला होता तो- मिळाला. हा स्तूप पूर्णपणे गाडला गेला होता. आत्ता तो अगदी भग्न अवस्थेत काळाची साक्ष देत उभा आहे. या परिसराचे हे माहात्म्य कळले आणि क्षणभर मी तिथेच थबकलो. किंबहुना, त्या परिसरातील अनैसर्गिक उंचवटे हे 50 च्या दशकात भारतीय पुरातत्त्व विभागाने केलेल्या खोदकामामुळे होते, हेही समजले. 

काय इतिहास आहे माझ्या गावाचा! 2500 वर्षांपूर्वी साक्षात गौतम बुद्ध इथे येऊन गेले होते. बुद्धांच्या प्रवचनाने प्रभावित होऊन इथल्या काही लोकांनी दीक्षाही घेतलेली असेल किंवा काहींनी आपल्यातीलच एक साधू म्हणून नाकेही मुरडली असतील. तो स्तूप इथे 200 वर्षं कार्यरत होता, पण त्यानंतर मात्र तो काळाच्या ओघात गुडुप झाला. तब्बल 1800 वर्षांनी पंधराव्या शतकात याच परिसरात अंगाने उंचपुरे व वर्णाने तांबूस-गोरे असलेले पोर्तुगीज हातात क्रूस घेऊन आले. उभ्या आयुष्यात कधीही न पाहिलेले असे हे परकीय लोक पाहून इथले लोक घाबरून गेले असतील, त्यांच्यासमोर दडपून वागले असतील. भाषा, रंग व ढंग सगळेच काही वेगळे. कालांतराने या पोर्तुगीजांनी इथे सत्ता काबीज करून मग इथले लोक ख्रिस्ती धर्म स्वीकारतील, अशी अनुकूल परिस्थिती निर्माण केली असेल. इथल्या गावातील लोकांनी मग हतबल, अगतिक होऊन ख्रिस्ती हा नवा धर्म हळूहळू स्वीकारला असेल. ज्या पिढीने प्रथम धर्मांतर केले, त्यांना आपला मूळ धर्म सोडताना खूप यातना झाल्या असतील. 'Time is the best healer'  या उक्तीप्रमाणे त्यांच्या नंतरच्या दोन-तीन पिढ्यांनंतर मग हे घाव सुकून गेलेले असतील व या धर्माची त्यांना सवय झाली असेल. 

धार्मिकता हा येथील भारतीय समाजाचा स्थायी स्वभाव असल्याने, ख्रिस्ती धर्माचे ते हळूहळू कट्टर अभिमानी बनले असतील. 500 वर्षांपूर्वीचा भारतीय समाज कर्मठ जातीयवादी होता. वसईत धर्मांतर कसे झाले, याविषयी बरीच मतांतरे आहेत. पण गोव्यामध्ये स्थानिकांवर पोर्तुगीजांकडून बळजबरीने कसे धर्मांतर झाले हे सर्वश्रुत असताना, वसईत काही जास्त वेगळे घडले असण्याची शक्यता कमी आहे. नव्याने धर्मांतर झालेल्या कुटुंबांना, धर्मांतरापासून वाचलेल्या त्यांच्याच हिंदू बांधवांकडून त्यांना वाळीत टाकण्यात आले असेल. त्यांच्या शेतजमिनीचा वाटाही त्यांना पुरेसा मिळाला नसेल. वसईत, प्रत्येक गावात ख्रिस्ती लोकांबरोबर ब्राह्मण लोकांचीही वस्ती आहे. काही गावांत ब्राह्मण जास्त आहेत तर काही गावात ख्रिस्ती जास्त. त्यावरून त्या-त्या गावात धर्मांतर किती तीव्र वा त्याला किती प्रतिकार झालेला असेल, हे कळते. 

खरंच, बौद्ध धर्मप्रसारकांनी जर इथल्या परिसरात पोर्तुगीज येण्याच्या 1800 वर्षांअगोदर आक्रमकपणे प्रचार केला असता तर... इथे बुद्ध धर्म रुजला असता का? आज जशी इथे गावोगावी चर्चेस, मंदिरे आहेत त्याऐवजी बौद्ध स्तूप दिसले असते का? कदाचित कर्मकांडे नसणे हेच बौद्ध धर्माचे इथे जास्त न फोफावण्यास कारणीभूत ठरले असेल. मूळ शिकवणूक अंगीकारून स्वत:च्या आचरणात बदल करण्यापेक्षा रोज पूजा-अर्चा करणे कधीही सोपे आणि लोकांना आकर्षित करणारे असते. कदाचित कर्मकांड या एका सामाईक धाग्यामुळे जी जनता अगोदर कट्टर हिंदू होती, तीच आता कट्टर ख्रिस्ती झाली असेल का? सभोवताली ताडाची मोठमोठी झाडे स्तुपाभोवती गोलाकार उभे राहून पहारा देत होती. 

मी समोर त्या भग्नावस्थेत उभ्या असलेल्या स्तुपाकडे व विखुरलेल्या लेण्यांकडे पाहून विचार केला की, मानवाचा इतिहासही काहीसा असाच तर आहे. इथे जे आज भूमिपुत्र म्हणून राहत आहेत, तेही कधी काळी या प्रदेशात परप्रांतीय म्हणूनच आले असतील. नसबंदीप्रमाणे आज प्रत्येक देशाने, राज्याने व शहराने आपापली जणू बॉर्डरबंदीच केली आहे. ज्या गोष्टी तेव्हाच्या राज्यकर्त्यांनी लादल्या- मग ते ख्रिस्ती, मुस्लिम धर्म असो व एका प्रदेशात राहतो म्हणून भारतीय म्हणणे असो- आज आम्ही त्याच परंपरा, राष्ट्रवाद किंवा धर्म म्हणून मिरवतो, हे किती हास्यास्पद आहे! 

हे हिंदूराष्ट्र होते, मान्य. इथल्या हिंदूंवर अत्याचार झाले, हेही एक ऐतिहासिक सत्य. पण हे अत्याचार जास्त कोणत्या लोकांवर झाले- तर ज्यांना बळजबरीने मुस्लिम वा ख्रिस्ती व्हावे लागले, असे लोक खरे बळी आहेत. आज जे हिंदू आहेत, त्यांच्यावर इतर अन्याय झाले असतील; पण धर्मप्रिय भारताच्या भूमीत आपला धर्म सुखासुखी का कोणाला सोडावा वाटेल? बाजूच्या उंच ताडाच्या झाडांपेक्षाही उंच असे प्रश्न मनात येत होते. एका ऐतिहासिक जागेवर केवळ ते ख्रिस्ती वा हिंदू धर्माशी निगडित नाही म्हणून स्थानिकांकडून कसे दुर्लक्ष केले गेले आहे, हे पाहून वाईट वाटले. कोटा या परिसराचे नाव ऐकून मला लहानपणी भीती वाटायची. आज मात्र त्या परिसरात भेट दिल्याने एक वेगळीच अनुभूती मिळाली होती. वेगवेगळ्या विचारांचे बंधारे आज फुटले होते. काहीसे दूरचे वाटणारे गौतम बुद्ध हे नाव आता खूप जवळचे वाटू लागले होते... 

वाचा: या लेखाचा उत्तरार्ध 
 

Tags: Daniel Mascarenhas vivekmanch weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके

कर्तव्य

सर्व पहा