डिजिटल अर्काईव्ह (2014-2019)

आपण अशा पुस्तकाची वाट पाहत होतो - चोखा चोखट निर्मळ

मध्ययुगातील आणि आजही बऱ्याच प्रमाणात खेड्यापाड्यांत असलेली मानसिकता समजावून घ्यायची असेल; तर चोखामेळा व त्यांचे कार्य, या परिस्थितीची कोंडी फोडण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न समजावून घ्यायला हवेत. पण चोखामेळांवर फारच थोडे लिखाण झालेय. आजवर फक्त पाच पुस्तके उपलब्ध होती. पण या पाचही पुस्तकांतून पुढे येतो तो एकमेव विचार म्हणजे- ‘संत चोखामेळा हे परिस्थितीशरण होते’. हा विचार पटत नव्हता; पण त्याचा प्रतिवाद कसा करता येईल, हे समजत नव्हते. आता एक नवे पुस्तक पुढे आलेय. सुभाष देशपांडे यांचे ‘चोखा चोखट निर्मळ’ हे ते पुस्तक.

भारतातील समतेचा लढा हा प्रामुख्याने वर्णलढा आहे. सत्यशोधक मार्क्सवादी शरद पाटील यांनी आपणाला हे सर्वप्रथम खणखणीत शब्दांत सांगितले. मधू लिमये पण म्हणालेत, ‘‘आम्ही डॉ.आंबेडकरांचे ‘ॲनिहिलेशन ऑफ कास्ट’ हे पुस्तक वाचले नव्हते, ही एक ऐतिहासिक चूक आहे.’’ त्यापूर्वी विवेकानंदांनी 17 ऑगस्ट 1889 रोजी पूज्यपादांना पत्र पाठवून कळविले आहे, ‘आपल्या देशातील प्राचीन मतानुसार जाती विभाग हा वंशगत मानलेला आहे, याबद्दल माझ्या मनात शंका नाही. तसेच स्पार्टा देशातील लोकांनी तेथील गुलामांवर आणि अमेरिकेतील लोकांनी तेथील निग्रोंवर जेवढे अत्याचार केले, त्यापेक्षा जास्त अत्याचार आपल्या देशातील शूद्रांवर केले गेले आहेत...एखाद्याला समाज बदलायचा असेल, तर त्याने सर्वप्रथम या जातिभेदांच्या पलीकडे गेले पाहिजे.’ 

दि.1 नोव्हेंबर 1896 रोजीच्या पत्रात ‘मी समाजवादी आहे’ म्हणून सांगणाऱ्या विवेकानंदांची त्यापूर्वीची ही पूर्वअट आहे. प्रश्नांची मांडणी करताना परिवर्तनवादी चळवळ कुठे कमी पडली का? मध्ययुगीन मराठी संतांनी समतेचा संदेश दिला, अशी ‘सांस्कृतिक अंधश्रद्धा’ ही चळवळ मनाशी बाळगून राहिली. त्यामुळे भयानक सामाजिक वास्तव त्यांना समजले नाही. वास्तवाचे नेमके भान नसेल, तर  रणनीती ठरवताना त्यात काही चुका संभवतात. त्यापुढे व्यवहारात फार हानिकारक ठरतात. मध्ययुगीन मराठी संतांचे मोठेपण कुणीच नाकारू शकणार नाही. त्यांनी केलेले कार्य फार मोठे आहे, हे अनेक उदाहरणे देऊन सांगता येते; पण हे सारे मध्ययुगीन संत काळाच्या एका चौकटीत बंदिस्त आहेत. वर्णाश्रमधर्माची घृणास्पद चौकट त्यांनी भयावह पद्धतीने बळकट केली आहे. या देशातील समतेचा लढा किती कठीण आहे हे समजावे, म्हणून ते संत काय म्हणालेत ते लक्षात घ्यायला हवे. 
आपले रामदास दासबोधात म्हणतात... 

असो ब्राह्मण सुरवर बंदिती, तेथे मानव बापुडा किती 
झाला ब्राह्मण मूढमती, तरी तो जगद्‌वंद्य 
अंत्यज शब्द ज्ञाता बरवा, परि तो नेऊन काय करावा 
ब्राह्मणासन्निध पुजावा, हे तो न घडे की 
ऐसे साकडे चोहीकडे, म्हणोनि प्रस्तावा पडे 
नीच यातीस गुरुत्व न घडे, याकारणे! 
आपले ज्ञानेश्वरमहाराज ज्ञानेश्वरीत सांगतात
जे वर्णामाजी छत्रचामर, स्वर्ग जयांचे अग्रहार 
मंत्रविद्येसी माहेर, ब्राह्मण जे। 
जे पृथ्वीतळीचे देव, जे तपोवतार सावयव 
सकळ तीर्थासी दैव, प्रकटले जे। 
सांगे शूद्राघरी आघवी, पक्वान्ने आहातीबरवी                                            
ती द्विजे केवी सेवावी, दुर्बळु जरी जाहला। 
आपले एकनाथमहाराज म्हणतात-
जोडिली संपदा ब्राह्मणास द्यावी, अखंड करावी चरणसेवा 
ब्रह्मणाचे तीर्थ जे नर प्राशिती, सायुज्जता मुक्ती लागे पाया 
एका जनार्दनी मुक्ती हे तो भाव, भजा हे भूदेव, जन्मोजन्मी 
तुकाराममहाराज इतर संतांच्याहून अनेक योजने पुढे आहेत. मात्र भालचंद्र नेमाडे यांनी संपादित केलेल्या आणि शासनाने प्रसिद्ध केलेल्या गाथ्यातील एक अभंग असा आहे 
वैष्णव तो नव्हे ऐसी ज्याची मती 
पहा श्रुतीमाजी विचारोनी 
सत्य त्याचेवेळी घडला व्यभिचार 
मातेसी वेव्हार अंत्यजाचा 
या घृणास्पद सामाजिक परिस्थितीत होणारी आपली घुसमट सांगत आणि अगदी नकळत नवा मार्ग सांगत चोखा उभा आहे. आपली परिस्थिती सांगताना ते म्हणतात- 
मी हीनयाती महार, पूर्वी निळाचा अवतार 
कृष्णनिंदा घडली होती, म्हणून महार जन्मजाती 
चोखा म्हणे विटाळ, आम्हा पूर्वीचे हे फल 
मज दूर दूर म्हणती, तुझी भेटी कवण्या रीती 
माझा लागताची कर, शिंतोडा घेताती करार 
माझ्या गोविंदा गोपाळा, करुणा भाकी चोखामेळा 

मध्ययुगातील आणि आजही बऱ्याच प्रमाणात खेड्यापाड्यांत असलेली मानसिकता समजावून घ्यायची असेल; तर चोखामेळा व त्यांचे कार्य, या परिस्थितीची कोंडी फोडण्यासाठी त्यांनी केलेले प्रयत्न समजावून घ्यायला हवेत. पण चोखामेळांवर फारच थोडे लिखाण झालेय. आजवर फक्त पाच पुस्तके उपलब्ध होती.
1. श्री संत चोखामेळा चरित्र व अभंग (स.भा.कदम), 
2. श्री संत चोखामेळा- समग्र अभंगगाथा व चरित्र (प्रा.डॉ.आप्पासाहेब पुजारी), 
3. श्री संत चोखामेळा महाराज, आदर्श कुटुंबाचे अक्षरदर्शन (डॉ.अनंत अडावदकर) 
4. संत चोखोबांचे अभंग- समीक्षा आणि संहिता (डॉ.रमेश मोदी); ही चारही पुस्तके महत्त्वाची आहेत, अभ्यासपूर्ण आहेत; पण त्रोटक वाटतात. 
5. सर्वांत महत्त्वाचे आहे ते प्रा.निर्मलकुमार फडकुलेंचे ‘संत चोखामेळा आणि समकालीन संतांच्या रचना’ हे पुस्तक. 

पण या पाचही पुस्तकांतून पुढे येतो तो एकमेव विचार म्हणजे- ‘संत चोखामेळा हे परिस्थितीशरण होते’. हा विचार पटत नव्हता; पण त्याचा प्रतिवाद कसा करता येईल, हे समजत नव्हते. आता एक नवे पुस्तक पुढे आलेय. सुभाष देशपांडे यांचे ‘चोखा चोखट निर्मळ’ हे ते पुस्तक. एम.ए.च्या परीक्षेत प्रथम श्रेणीत येऊन सुवर्णपदक मिळवलेले देशपांडे यांनी आजन्म नोकरी केली, ती कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत. मात्र संतवाङ्‌मयाचा त्यांचा गाढा अभ्यास आहे. 
1. महामनस्क संत समर्थ रामदास, 
2. म.बसवेश्वर- कार्य आणि कर्तृत्व, 
3.चिरंतनाचा ज्ञानदीप- संत नामदेव, 
4. कबीराची साखी ही त्यांची प्रमुख पुस्तके. 
‘चोखा चोखट निर्मळ’ हे त्यांचे पुस्तक प्रसिद्ध होऊन आता सहा महिने उलटलेत. या पुस्तकाचे प्रकाशन 7 ऑक्टोबर 2018 रोजी पुण्यात पत्रकार भवनात झाले. अभय टिळक, अरुणा ढेरे, सदानंद मोरे, अरुण जाखडे असे अनेक मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित होते. मात्र पुस्तकावर चर्चासत्रे झाली नाहीत, परीक्षणेही आली नाहीत. चोखामेळांना समजावून घ्यायचे नाही, अनुल्लेखाने मारायचे- असेच आपण ठरवलेय का? 

या चारशेपानी पुस्तकात भरपूर संदर्भ आणि भरपूर अभंग आहेत. ग्रंथात एकूण पंधरा प्रकरणे आहेत. त्यातील लावण्याचा गाथा त्रैलोक्याची शोभा, सोवळा तो जगामाजी कोण?, साक्षात्कारी गूढ अनुभव, चोखोबारायांचे साक्षात्कारी भान ही प्रकरणे महत्त्वाची आहेत. पुस्तक अभ्यासताना तत्कालीन सामाजिक वास्तव आणि चोखामेळांचे अलौकिक मोठेपण नकळत आपणासमोर उलगडत जाते. चोखोबाराय हे निरक्षर होते. मग त्यांचे अभंग काळाच्या प्रवाहात कसे काय तरले? संप्रदायात त्याबाबत खालील अभंग प्रसिद्ध आहेत. 

ज्ञानेश्वरांची शब्दरत्ने। हे सच्चिदानंद लिहिले ब्राह्मण 
अनंत भट ब्राह्मण। तो चोखामेळ्याचे करी लेखन।। 

म्हणजे, महात्मा फुलेंना शाळा काढण्यासाठी निर्भयपणे आपला वाडा देणाऱ्या भिडेंची एक ब्राह्मणी परंपरा आहे. या पुस्तकाच्या वाचनातून नकळत अशा अनेक गोष्टी आपल्यासमोर येतात. चोखामेळा यांचा एक अभंग आहे- 

धाव घाली विठू आता, चालू नको मंद 
बडवे मज मारिती, काही नाही अपराध 
शिव्या देताती महारा, म्हणती देव बाटवला 

पण यापुढील गोष्टी, चमत्कार उलगडून कसे समजावून घ्यावेत, हे लेखक आपणास सांगतो. बडवे चोखोबांना हत्तीच्या पायी देऊ शकत नव्हते. त्यांच्याकडे हत्ती नव्हता,  पण बैल होते. त्यांनी काय केले आणि काय झाले, हे सांगणारे अभंग आहेत. चोखामेळा बैलांच्या पायी चिरडले जाण्यासाठी निर्भयपणे फळीवर झोपले. दुष्टांना आनंद झाला. बैलाच्या पाठीवर आसूड ओढण्यात आले. पण आसूडाचा मार खाऊनही बैल एका जागी शांत उभे राहिले. मारणाऱ्याचे हात दुखायला लागले. पण एवढ्यात एक चमत्कार घडला. आसमंत तेजाने उजळून निघाले. चारी दिशा दिव्य प्रकाशाने उजळून निघाल्या. सर्वसाक्षी, सर्वव्यापी, सर्वज्ञ असा प्रत्यक्ष पांडुरंग बैलाच्या शिवळास धरून उभा होता. 
या चमत्कारामध्ये पांडुरंगांच्या दर्शनाचे वर्णन आहे. प्रत्यक्षात काय घडले असावे, याचा विचार करताना असे जाणवते की, हा प्रसंग घडल्यावर काही विचारी अधिकारी आणि प्रमुख व्यक्ती तिथे आल्या असाव्यात. त्या चोखोबारायांना ओळखत असाव्यात, त्यांचे बहुजन समाजात असलेले स्थान ओळखत असाव्यात किंवा तिथे सामान्य माणसांनीच उग्र स्वरूप धारण करून बडव्यांना सळो की पळो करून सोडले असावे. काहीही घडलेले असले, तरी या चमत्कारातून चोखोबारायांचे धैर्य आणि महानता याचा प्रत्यय येतो. 

पुस्तकात असे अनेक प्रसंग, चोखोबारायांचे समकालीन संत, त्यांचे आपापसातील अनुबंध, त्याचे नक्की अर्थ अशा अनेक गोष्टी सहजपणे पुढे येतात. चोखोबारायांची अखेर क्लेशदायक आहे. तसे पाहिले तर आजसुद्धा वंचित समाजाचे प्राक्तन हेच आहे. पण चोखोबारायांच्या मृत्यूनंतर जे घडले, त्यातील चमत्कार बाजूला ठेवून वास्तव समजावून घेतले; तर चोखोबारायांनी आयुष्यात काय कमावले, हे आपणाला समजते. इतिहास सांगतो: ‘मंगळवेढ्यात गावकुसाबाहेरचे काम करायचे होते. त्यासाठी महार लोकांना नेण्यासाठी दूत म्हणजे शिपाई आले. त्या महारांसोबत चोखोबारायांनाही नेले. हे काम करत असताना ते सतत नामस्मरण करत असत. अशा प्रकारे काम होत असताना चार महिन्यांचा कालावधी लोटला. अकस्मात गावकूस कोसळले आणि त्याखाली काम करणारे जे महार होते, ते सर्व गाडले गेले. त्यामध्ये चोखोबारायही होते. दुर्दैवाने त्यातच त्यांचा अंत झाला.’ यानंतर आपणासमोर चमत्कार येतो. 

'पांडुरंग नामदेवरायांना म्हणाले की, तुम्ही मंगळवेढ्याला जावे आणि चोखोबारायांच्या अस्थी घेऊन याव्यात. तेव्हा नामदेवरायांना साहजिकच असा प्रश्न पडला की, त्या अस्थी कशा ओळखाव्यात? पांडुरंगाने त्यांना सांगितले की- ज्या अस्थींमधून विठ्ठलनामाचा गजर होत असेल, त्या अस्थी चोखोबारायांच्या आहेत असे समजावे.’ 

त्यानंतर नामदेवराय मंगळवेढ्याला गेले. तिथे असलेल्या हाडांच्या ढिगाऱ्यापाशी विषण्णतेने बसले. त्यांना अंत:प्रेरणा झाली. त्यांनी आपले उपरणे पसरले. ते एकेक अस्थी कानाला लावून पाहू लागले. ज्या अस्थींमधून ‘विठ्ठल विठ्ठल’ असा आवाज येत होता, तो फक्त नामदेवरायांना ऐकू येत होता. इतरांना तो आवाज ऐकू येत नव्हता. चोखोबारायांच्या अस्थी उपरण्यात गोळा करून नामदेवरायांनी पंढरपूरला प्रयाण केले. 

हा चमत्कार बाजूला ठेवून आपण इतिहासाकडे वळलो, तर अभंगात नामदेवराय सांगतात की- ‘शालिवाहन शके बाराशेसाठ, प्रमाथी नाव असलेल्या संवत्सरात, वैशाख वद्य पंचमीस, गुरुवारी चोखोबारायांनी आपला देह ठेवला.’ नामदेवरायांनी पंढरपूरला प्रयाण केले तो दिवस वैशाख वद्य दशमी, शुक्रवार असा आहे. नामाचा गजर करत बहुजन समाज महाद्वारापाशी उभा होता- आज पंढरपूरला मंदिराजवळ (किंवा मंदिराच्या आवारात?) नामदेवांच्या पायरीपासून 10-12 फुटांवर चोखोबारायांची समाधी आहे. 

देशपांडे यांनी आपल्या अभ्यासपूर्ण ग्रंथात फारसे भाष्य केलेले नाही; मात्र त्यांनी चमत्कारामागचे वास्तव समजावून घ्या, हे अतिशय तरलपणे आपणाला सांगितले आहे. आपल्या यातना, सामाजिक अत्याचार समंजसपणे भोगून आणि समजावून घेऊन, त्याचे नेमके भेदक-दाहक चित्रण करणारे चोखोबा हे मराठीतील पहिले दलित साहित्यिक आहेत. त्याहूनही महत्त्वाची दुसरी गोष्ट म्हणजे, सविनय कायदेभंग करणारे ते पहिले गांधी आहेत. यातना भोगत, क्लेश सहन करत, ते पचवत, त्यातून शांततामय, सनदशीर मार्गाने त्यांनी जनसामान्यांची संघटित ऊर्जा प्रस्थापितांना दाखवून दिली.
 दत्तप्रसाद दाभोळकर, सातारा

चोखा चोखट निर्मळ 
लेखक : सुभाष कि. देशपांडे
विघ्नेश प्रकाशन, कणकवली. 
पृष्ठे : 385, किंमत : 575 रुपये 
मोबाईल 9422379320   
 

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

दत्तप्रसाद दाभोळकर,  सातारा, महाराष्ट्र

वैज्ञानिक आणि लेखक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके

कर्तव्य

सर्व पहा