डिजिटल अर्काईव्ह (2014-2019)

चळवळीतील प्रत्येकासाठी पुस्तक : सामाजिक समतेचा प्रवाह

कुरआनचा अर्थ वेगवेगळ्या देशांतील वेगवेगळ्या विचारांच्या, पंथांच्या मुस्लिम धर्मपंडितांनी वेगवेगळ्या पद्धतीने कसा लावला आहे, हे त्यांच्याच ग्रंथांतील अनेक संदर्भ देऊन ते स्पष्ट करतात. त्यापुढे जाऊन असे वेगवेगळे अर्थ प्रत्येक धर्मातील आद्यग्रंथाचे लावण्यात आलेत, हे लक्षात आणून देतात. उदा.- श्रीमद्‌भगवद्‌गीतेची शंभरहून अधिक भाष्ये उपलब्ध आहेत.

आम्ही आंबेडकरांचा ‘ॲनिहिलेशन्‌ ऑफ कास्ट’ हा ग्रंथ समजून घेतला नाही ही ऐतिहासिक चूक आहे, असे मधु लिमये म्हणालेत. असेच काही भारतरत्न आंबेडकर आणि पंडित नेहरू या महामानवांबाबत झालंय का? त्यांनी विवेकानंद समजावून घ्यावयास हवे होते. विवेकानंदांनी सर्वधर्म परिषदेच्या एक वर्ष आधी म्हणजे 20 सप्टेंबर 1892 रोजी आणि सर्वधर्म परिषदेनंतर एक वर्षाने नोव्हेंबर 1894 अशी दोन पत्रे लिहिलीत. त्यांनी या पत्रांत या देशात समतेची लढाई लढणाऱ्यांना एक गोष्ट सांगितली आहे.

‘या देशातील धर्मांतरे मुसलमान आणि ख्रिश्चन यांनी केलेल्या अत्याचारामुळे नव्हेत, तर उच्चवर्णीयांनी केलेल्या अत्याचारामुळे झालीत. ते आपले वंचित, पददलित भाऊ आहेत. दलितांबद्दलची कणव आपल्या मनात आहे, त्यांच्याबद्दल जी जबाबदारी आपल्या मनात आहे; तीच या धर्मांतरित मुसलमान व ख्रिश्चन यांच्याबद्दल आहे. ते सारे अधिक नेमके आणि भेदत,’ असे त्यांनी 29 मार्च 1894 रोजी केरळचे धर्मगुरू सर रेव्हरंड आर ह्यूम यांना पत्र पाठवून कळवले त्यांनी लिहिले, ‘तू हिंदूंना कॅथॉलिक केले नाहीस, त्यांना आपापल्या जातीत कॅथॉलिक केलयंस.’ हे लक्षात घेतले असते, तर दलितांना दिलेले आरक्षण धर्मांतरित मुसलमान आणि ख्रिश्चन यांनाही देण्यात आले  असते.

मात्र नेहरूंना फाळणीनंतर या देशात राहिलेल्या मुसलमानांच्या मनातील असुरक्षिततेची भावना समजलेली होती. दि.7 ऑगस्ट 1947 रोजी राजेंद्रप्रसादांनी नेहरूंना पत्र पाठवून ‘गोहत्याबंदी करावयास हवी, बापूंचे मत असेच आहे’ असे कळवले. नेहरूंनी त्यांना लगेच पत्र पाठवून स्पष्टपणे सांगितले, ‘बापूंना गाईचे रक्षण व्हावे असे वाटते; त्यांना तसा कायदा नकोय. आज ही मागणी करणाऱ्या लोकांना हिंदू धर्माचे पुनरुज्जीवन करून पुढे हिंदू राष्ट्र निर्माण करायचंय. त्यांना भारताला पाकिस्तानच्या मार्गाने न्यायचे आहे.’ नेहरू याबाबत फार सजग होते. दि.2 एप्रिल 1955 रोजी शेठ गोविंददास यांनी गोहत्याबंदीचा कायदा व्हावा म्हणून लोकसभेत विधेयक आणले. अनेकांचा त्याला छुपा वा उघड पाठिंबा होता. नेहरूंनी त्याला फार प्रभावीपणे विरोध केला, पण नेहरू तिथेच थांबले नाहीत. भाषणाच्या शेवटी त्यांनी सांगितले, ‘असा काही कायदा या देशात होणार असेल, तर मी या देशाचा पंतप्रधान म्हणून पदभार सांभाळू शकणार नाही.’ पुढे सत्यसाईबाबांचे पाय जाहीरपणे धुणारे आणि त्यांनी विज्ञानाचे सारे नियम झुगारून, शून्यातून निर्माण केलेले क्रमांक असलेले स्विसमेड घड्याळ हातात घालणारे काँग्रेसचे शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री असताना  महाराष्ट्रात गोहत्याबंदीचा कायदा झाला!

त्यानंतर चंद्रास्वामींचे शिष्य वा मित्र असलेले नरसिंह राव या देशाचे पंतप्रधान असताना बाबरी मशीद उद्‌ध्वस्त झाली, केंद्र सरकार अगदी शांत बसले. त्या उद्‌ध्वस्त मशिदीच्या परिसरात बसवलेल्या रामलल्लाची पूजा गृहमंत्री शंकरराव चव्हाण यांनी केली. अस्वस्थ करून, रस्त्यावर आणून दलित आणि ओबीसी मुसलमानांना चिरडण्यात आले, त्यानंतर मुंबईत अमानुष कत्तल झाली. काँग्रेसचे सरकार असताना श्रीकृष्ण कमिशनचा अहवालही बाहेर येऊ दिला नाही. या व अशा अनेक घटनांमधून तुम्ही असहाय आहात, अगतिक आहात; या देशातील दुय्यम नागरिक आहात, हे मुसलमानांच्या मनावर बिंबवण्यात आले. आजची ही भयावह परिस्थिती प्रा.बेन्नूर यांनी ‘इस्लामी तत्त्वज्ञान आणि मुस्लिम’ या ग्रंथात मांडली.

अत्यंत उद्विग्न होऊन त्यांनी या देशातील मुसलमानांची सद्य:स्थिती एका वाक्यात स्पष्ट केली आहे. ‘इतिहासाच्या या टप्प्यावर या देशात मुसलमान असणे हा गुन्हा होऊ पाहत आहे. या देशातील संवेदनशील मनाच्या मुसलमानांसमोर आता दोनच पर्याय आहेत. एक- त्यांनी इस्लामचा त्याग करणे किंवा दुसरा- इस्लामच्या मानवतावादी व उदारमतादी प्रेरणांचा पाठपुरावा करणे. माणुसकीची भूमिका घेऊन जगणाऱ्या मुसलमानांना एकाच वेळी दोन पातळ्यांवर लढावे लागेल. पहिली पातळी ही कट्टरवादी, अतिरेकी, मूलतत्त्ववादी मुस्लिमांची आहे. त्यांना उदारमतवादी सहिष्णु इस्लाम नको आहे. इस्लामची तशी व्याख्या करणे त्यांच्या दृष्टीने इस्लामशी विद्रोह करणे आहे-’ प्रा.बेन्नूर आणखी एक गोष्ट या ग्रंथातून मुसलमानांच्या लक्षात आणून देतात.

कुरआनचा अर्थ वेगवेगळ्या देशांतील वेगवेगळ्या विचारांच्या, पंथांच्या मुस्लिम धर्मपंडितांनी वेगवेगळ्या पद्धतीने कसा लावला आहे, हे त्यांच्याच ग्रंथांतील अनेक संदर्भ देऊन ते स्पष्ट करतात. त्यापुढे जाऊन असे वेगवेगळे अर्थ प्रत्येक धर्मातील आद्यग्रंथाचे लावण्यात आलेत, हे लक्षात आणून देतात. उदा.- श्रीमद्‌भगवद्‌गीतेची शंभरहून अधिक भाष्ये उपलब्ध आहेत. त्याचप्रमाणे वेदांचा अर्थ आर्यसमाजी, सनातनी आणि तुकाराम वेगळ्या पद्धतीने लावतात. त्यापैकी जो अर्थ वर्तमानातील समाजासाठी गरजेचा असतो, त्याचा प्रचार-प्रसार होणे गरजेचे असते. पण होते उलटेच. प्रा.बेन्नूरांनी विवकानंद अभ्यासले आहेत, असे त्यांचे साहित्य अभ्यासल्यावर वाटत नाही. पण त्यांची मांडणी बरीचशी विवेकानंदांसारखी आहे. विवेकानंदांनी दोन गोष्टी सांगितल्या.

पहिली अट- ‘धर्माचा आधार घेऊन धर्माच्या अपप्रवृत्तीवर आघात करावा लागेल, कारण माणसाच्या अशाश्वत जीवनात त्याच्या शाश्वत अस्तित्वाचा आधार म्हणून सर्व धर्म उभे असतात. बहुसंख्य माणसांना ते त्यामुळे हवे असतात. तुम्ही त्यावर आघात केलात, तर लोक तुमच्यापासून दूर जातील.’

दुसरी गोष्ट म्हणजे- ‘ग्रंथ हे धर्माचे आधार नाहीत, तर धर्म हे ग्रंथाचे आधार आहेत, हे समजावून द्यावे लागेल. काळाच्या एका विशिष्ट चौकटीत धर्मातील शाश्वत सत्य सांगण्यासाठी ग्रंथ निर्माण झाले. काळाची चौकट बदलल्यावर त्या चौकटीत ती शाश्वत सत्ये जनसामान्यांना समजावून सांगण्यासाठी धर्मग्रंथांनी बदलले पाहिजे.’ परिवर्तनवादी चळवळीने प्रा.फकरुद्दीन बेन्नूर यांना समजावून घेण्याचा प्रयत्न केला नाही, ही एक ऐतिहासिक चूक आहे, असे मला वाटते. हे जे आपण केले, त्याला एक कारण आहे.

हमीद दलवाईंच्या विचारांना आणि चळवळींना छेद देत बेन्नूर उभे आहेत. दलवाईंचा मुस्लिम धर्मसुधारणांचा विचार हा प्रामाणिक आहे, तळमळीतून आणि अंत:करणापासून आलेला आहे, हे प्रा.बेन्नूरांना पूर्णपणे मान्य होते. मात्र भारतासारख्या विविधतापूर्ण समाजव्यवस्थेत शोषणाचे विविध स्तर उपस्थित असताना असुरक्षित भावनेने ग्रासलेल्या धार्मिक अल्पसंख्य समुदायाशी संवाद साधताना वेगळी रणनीती शोधणे गरजेचे आहे. असुरक्षितेच्या परिस्थितीत तो परत धर्मात आपली सुरक्षितता शोधतो आणि धार्मिक कट्टरतेच्या जाळ्यात ओढला जातो. या वादावर मला कोणतेही भाष्य करावयाचे नाही. माझा तेवढा अभ्यास नाही. पण तरीही माझ्या मनात आज दोन-तीन प्रश्न येतात. अनेक परिवर्तनवादी व्यक्तींच्या मनातही ते असतील-

1. हिंदूंमधील धर्मसुधारणेची जी चळवळ लोकहितवादी, आगरकर- अगदी महात्मा फुले यांनीसुद्धा काही प्रमाणात- जी चालवली, ती उच्चवर्णीयांच्या कालबाह्य रूढी-परंपरांना आव्हान देत उभी होती. बहुजन समाजाच्या धार्मिक आधारांवर ते कालबाह्य असले तरी  आघात झाले नाहीत. जत्रेत हजारोंच्या संख्येने मारल्या जाणाऱ्या मेंढरांवर लोकहितवादी, आगरकर अजिबात काही बोलले नाहीत.

2. मुस्लिम धर्मातील कालबाह्य अघोरी प्रथांवर आपण आघात करतो, तो दलित-ओबीसी मुसलमानांच्या भावनिक आधारावर करतो. ते कट्टरपंथीयांच्या जवळ जातात, त्यांच्या जाळ्यात अडकतात- असे काही असेल का?

3. दलवार्इंनी प्रश्नाची मांडणी केली, त्यानंतरची परिस्थिती फार बदलली आहे. शंकरराव चव्हाणांचा गोहत्याबंदीचा कायदा, बाबरी मशिदीचा विध्वंस, त्यानंतर उत्तर प्रदेश, मुंबई, गुजरात येथे झालेल्या अमानुष अशा दंगली, दडपला जाणारा श्रीकृष्ण आयोगाचा अहवाल... यामुळे असहाय, अगतिक, भयग्रस्त असा मुसलमान समाज भारतात आहे. आज हमीद दलवार्इंना आपली मांडणी नव्याने करावी, असे वाटले असते का? हे व अशा स्वरूपाचे प्रश्न आपणा सर्वांच्याच मनात आहेत. अंधारात चाचपडत आपण रचना शोधतोय. अशा वेळी आपणाला फार थोडे पटणारे किंवा थोडेफार न पटणारे, अस्वस्थ करणारे विचारही अभ्यासले पाहिजेत. प्रा.फकरुद्दीन बेन्नूर स्मृतिग्रंथ हा असा ऐवज आहे.

दि.17 ऑगस्ट 2018 रोजी त्यांचे निधन झाले. तसे ते थोडेफार माहीत होते ते त्यांना कोल्हापूरचा छत्रपती शाहू महाराज पुरस्कार मिळाला म्हणून. महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेने 2010 मध्ये पुरस्कार देऊन गौरवलेला ‘हिंदुत्व, मुस्लिम आणि वास्तव’ हा ग्रंथही आपण वाचलेला असतो. पण मला वाटते, आपण त्याच्या पलीकडे गेलो नाही. महाराष्ट्रातील परिवर्तनवादी चळवळी दुभंगलेल्या अवस्थेत आहेत का? बेन्नूरसरांचे बहुतेक सर्व लिखाण ‘परिवर्तनाचा वाटसरू’मध्ये प्रसिद्ध झाले. हे दोन्ही अंक वाचणारे परिवर्तनवादी कमीच! थोडा वेगळा असलेला परिवर्तनवादी उपहासाने नव्हे, पण उपेक्षेने संपवण्याचा प्रकार असे काही होतंय का?

असो. पुस्तक 332 पानी आहे. प्रत्येक पान वाचनीय आणि अस्वस्थ होऊन नवा विचार करावयास भाग पाडणारे आहे. एकूण 29 लेखांचे हे पुस्तक तीन विभागांत विभागण्यात आले आहे.

पहिल्या विभागात महाराष्ट्रातील मुसलमान जीवनाचा, येथील सूफी परंपरेचा शोध घेतलेला आहे. दुसऱ्या विभागात वैचारिक परिघ आणखी मोठा करून भारताच्या संदर्भात मुस्लिम जीवनाचा वेध घेतला आहे. तिसरा विभाग प्रा.बेन्नूर यांच्या जीवनाचा सर्वांगाने आढावा घेतो. यात त्यांच्यावरील निवडक लेख आणि त्यांचेही निवडक साहित्य आहे. पहिल्या विभागात राम पुनियानी, राणा सफबी, रणसुंभे, अब्दुल कादर मुकादम, फिरोज अश्रफ, असगरअली इंजिनिअर यांचे अभ्यासपूर्ण, अस्वस्थ करणारे लेख आहेत. दुसऱ्या विभागातील लेख मला अधिक माहितीपूर्ण व विचारांना चालना देणारे वाटले. त्यातील सर्वांत महत्त्वाचा आहे स्मृतिशेष यशवंत सुमंत यांचा लेख. त्यातील काही महत्त्वाचे मुद्दे असे आहेत-

1. अस्मितेच्या राजकारणात अडकून पडायला नको असल्यास त्याची बौद्धिक बाजूही अधोरेखित होणे आवश्यक आहे. तशी ती न झाल्यास फुले-आंबेडकरांचे विचारसंचित नवब्राह्मणवादात बंदिस्त होण्याचा धोका आहे. तो धोका टाळण्यासाठी बहुजनलक्ष्यी राष्ट्रवादाची सूत्ररूपाने मांडणी करणे आवश्यक आहे.

2. म.फुले यांनी हिंदुत्वप्रधान राष्ट्रवादाप्रमाणेच काँग्रेसप्रणित राष्ट्रवादाच्या मर्यादा स्पष्ट केल्या. या दोन्हींमधील वर्मावर बोट ठेवून त्यांनी ‘स्त्री-शूद्रातिशूद्र’ घटकांच्या एकजुटीवर आधारित व ‘एकमय राष्ट्रा’ची संकल्पना पुढे मांडली.

3. म.फुलेंच्या पश्चात त्यांच्या बहुजनलक्ष्यी राष्ट्रवादाचे मर्म महर्षी वि.रा.शिंदे यांनी जाणले आणि राष्ट्रीय चळवळीच्या ब्राह्मणी व उच्चवर्गीय नेतृत्वाची परखड समीक्षा करत असतानाच तिच्याशी बहुजन समाजाने फटकून राहू नये, उलट त्याचे धुरिणत्व आपल्याकडे घ्यावे आणि वसाहतवाद व ब्राह्मणशाहीचा मुकाबला करावा, ही भूमिका मांडली. पण शिंदेंनाच ‘ब्राह्मणी’ ठरवून त्यांच्या बहुजनवादाची वासलात लावली आणि प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे आपल्या आर्यत्वाचा, क्षत्रियत्वाचा, उच्चकुलीनत्वाचा दावा आग्रहाने मांडत प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षपणे आपले हिंदुत्वभान जपले.

4. काँग्रेस आणि हिंदू राष्ट्रवाद्यांना सारख्याच अंतरावर ठेवून फुलेप्रणीत व्यापक बहुजनलक्ष्यी राष्ट्रवादाची दलित-मुक्तीच्या संदर्भात आंबेडकरांनी केलेली पुनर्मांडणी आपण समजावून घेतली नाही, ही फार मोठी चूक आहे.

5. वास्तवात राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय किंवा हिंदू  महासभा काय- या संघटना सर्वसामान्य हिंदूंचे प्रतिनिधित्व करतच नव्हत्या, पण त्यांनी त्यांना गृहीत धरले होते. अगदी हीच गोष्ट मुस्लिम लीगच्या बाबतीतही खरी आहे. हे दोन्ही जमातवाद परस्परसापेक्ष असल्याने परस्परांना संपवण्याची भाषा बोलत असताना परस्परांना पूरकही होते. त्यामुळे भारताची फाळणी झाली आणि स्वातंत्र्यप्राप्तीनंतर पाकिस्तानच्या निर्मितीमुळे हिंदुत्वाचे राजकीय प्रयोजन भारतात अप्रस्तुत ठरले.

6. हिंदुत्ववादाच्या विरोधात पिछड्या जातींना उभे करून- म्हणजेच जमातवादाच्या विरोधात जातवाद उभा करून हिंदुत्वाचा राजकीय सामना करता येईल, अशी आशा बरीच पुरोगामी बुद्धिजीवी मंडळी बाळगून होती. या गृहीतातील चुका मी यापुढे सांगणार आहे.

7. आधुनिकता ही एक मूल्यदृष्टी आहे. ती एक निव्वळ भौतिक अवस्था नाही; पण नकळत तशी ती बनते, तेव्हा ती विविक्षित हितसंबंधांची प्रवृत्ती व पुरस्कर्ती बनते. तशी ती बनताच तिचे ‘आधुनिकतावादा’त रूपांतर होते. हा ‘आधुनिकतावादी धर्मनिरपेक्षवाद’ माणसाला आधुनिक दृष्टी देण्यापेक्षा त्याला आधुनिक दृष्टीच्या विरोधात उभा करतो. म्हणूनच अशा धर्मनिरपेक्षवादाचा प्रतिवाद म्हणून धर्मवाद व धर्मांधता उभी राहते... म्हणून रूढ धर्मनिरपेक्ष आधुनिक दृष्टिकोन इस्लामी धर्मवाद वा हिंदुत्ववादी धर्मवाद व राष्ट्रवाद रोखण्याऐवजी वाढवतो, बळकट करतो; असे काही आहे का?

8. महात्मा गांधींच्या हत्येमुळे हिंदू राष्ट्राची, हिंदू राष्ट्रवादाची अधिमान्यता रसातळाला गेली. स्वतंत्र भारताने धर्मनिरपेक्ष राज्याचा पुरस्कार केला. नेहरूंनी फार कल्पकतेने व कणखरपणे या धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादाचे संगोपन केले. या नेहरूयुगीन धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादाला पहिला छेद गेला तो 1967 ते 1977 या दशकात. या दशकात बिगरकाँग्रेसवादाचे नवे पर्व सुरू झाले. डॉ.लोहियांनी सांगितलेली बिगरकाँग्रेसवादाची निर्वाचन नीती संसदीय गणिताचा भाग म्हणून बरोबर होती, पण त्याचे सामाजिक परिणाम भयंकर आहेत. (यशवंत सुमंत यांचा हा मुद्दा मला पटतो आणि पूर्णपणे बरोबर वाटतो. मी संघ-जनसंघाचे चाणक्य असलेले आदरणीय नानाजी देशमुखांच्या विस्तृत मुलाखती घेतल्या होत्या. त्यात नानाजींनी अगदी स्पष्टपणे सांगितलंय, ‘‘जनसंघाला भारतीय जनमानस ‘गांधींचा हत्यारा’ समजत होते आणि गांधीजींच्या हत्याराला ते जवळ उभे करणार नाहीत, हे माझ्या लक्षात आले होते. फार कल्पकतेने मी लोहिया आणि जयप्रकाश यांच्या जवळ गेलो. त्यांनी जनसंघाला स्वीकारले आणि मग ‘भारतीय जनमानसानेपण-’’ म्हणजे संघ, जनसंघ, भाजप यांना सत्तेत केंद्रस्थानी आणले ते लोहिया, जयप्रकाश, शंकरराव चव्हाण, नरसिंह राव आणि शरद पवार यांनी- असे काही आहे का? जनसंघ ही संघाची एक शाखा आहे, हे जनसंघाचे अध्यक्ष बलराज मधोकांनी सांगितलं. संघाचा फक्त एकलक्ष्यी कार्यक्रम आहे- ‘हिंदूंचाच हिंदुस्थान’ हे सरसंघचालक देवरसांनी सांगितलंय. भारतातील मुसलमानांच्या आजच्या अगतिक अवस्थेला आपण परिवर्तनवादी जबाबदार आहोत का?) असो.

विषयांतर बाजूला ठेवू या. सारेच लेख वेगवेगळ्या कारणाने महत्त्वाचे आहेत. त्यापैकी काही लेखांमधील काही महत्त्वाचे मुद्दे असे आहेत-

1. महाराष्ट्रातील मुसलमान हा महाराष्ट्राच्या सामाजिक आणि सांस्कृतिक जीवनाचा अविभाज्य घटक आहे; पण हे वास्तव अजूनही मोकळेपणाने मान्य झालेले नाही आणि याला हिंदू व मुसलमान दोघेही जबाबदार आहेत.

2. दूरदर्शनवरून 1986 मध्ये ‘महाराष्ट्राची लोकधारा’ ही मालिका प्रसारित झाली. त्या मालिकेत मराठी मुसलमानांचे जीवनदर्शन घडविणारा एकही भाग नव्हता. आजही ‘होम मिनिस्टर’मध्ये मुसलमान कुटुंब दिसत नाही.

3. उभ्या भारताला अभिमान वाटावा असा एक मराठी मुसलमान होऊन गेला. आपल्याला त्याची काहीही माहिती नाही. त्याचे नाव गुलाम अहमद कुरेशी. त्याची आई जपानी, वडील कोकणी मुसलमान. जपानच्या लष्करी ॲकॅडमीत त्याचे लष्करी शिक्षण झाले. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जपानच्या लष्करातील मोठ्या हुद्याची व पगाराची नोकरी नाकारून ते आझाद हिंद फौजेत दाखल झाले. ते नेताजींचे निकटचे सहकारी होते. महायुद्ध संपल्यावर त्यांना फाशीची शिक्षा झाली होती, पण ती अमलात आली नाही.

4. हिंदू-मुस्लिम या दोन धर्मीयांत समन्वय घडवून आणण्याचा यशस्वी प्रयत्न दोन्हीकडील सर्वभाषिक संतांनी केले. कबीर, जायसी, मलिक महंमद, मलूकदास, तुकोबा, एकनाथ अशी ही परंपरा आहे. दरबनीचे संपूर्ण  काव्य मुळी हिंदू-मुसलमान एकतेसंबंधी आहे. संतसाहित्याचे अभ्यासक हे मांडत नाहीत. सूफी संतांच्या हिंदू-मुस्लिम सहिष्णु वृत्तीबद्दलही काही लिहिले गेलेले नाही.

5. नरहर कुरुंदकर, वसंत पळशीकर हे समाजवादी आणि स.ह.देशपांडे, श्रीपाद जोशी व शेषराव मोरे हे हिंदुत्ववादी यांच्या लेखांमधील मुद्दे परस्परपूरक आहेत. आपल्या विषयात या व्यक्तींनी फार मोठे काम केले आहे, त्यांचा अनादर करावयाचा नाही. मात्र महाराष्ट्रातील मुसलमानांची मानसिकता व जगणे केंद्रस्थानी ठेवण्याऐवजी त्यांनी इस्लाम केंद्रस्थानी ठेवला. कुरआनचे जे भाष्य कट्टर मुल्ला-मौलवींनी व वसाहत चालविणाऱ्या इंग्रजांनी केले तेवढेच लक्षात घेतले- कुरआनची जी प्रगतिशील भाष्ये आहेत, त्याकडे दुर्लक्ष केले.

6. मुसलमान प्रश्नाबाबत आणखी काही मुद्दे घेतले पाहिजेत. भारतातील फक्त 35 टक्के मुसलमान उर्दूभाषक आहेत. बाकी सर्व मुसलमानांची मातृभाषा ही त्या-त्या प्रांतातील प्रादेशिक भाषा आहे. केरळमध्ये 25 टक्के मुसलमान आहेत. ते मल्याळम बोलतात. त्यांच्यापैकी फारसे कोणी फाळणीनंतर पाकिस्तानात गेले नाहीत. महत्त्वाचे म्हणजे विवेकानंदांनी सांगितल्याप्रमाणे त्यांची जात सुटलेली नाही. तांबोळी-बागवान लग्नानंतर तांबोळी जातीने कुटुंबावर बहिष्कार टाकण्याची घटना पुण्यात 35-40 वर्षांपूर्वी घडली आहे. पुण्यात तांबोळी, बागवान यांच्या वेगळ्या मशिदी आहेत. खाटिकांच्या दोन मशिदी आहेत. नमाजासाठी तुम्ही कोणत्याही मशिदीत जाऊ शकता, मात्र मंगलप्रसंगी व मयतीच्या प्रसंगी आपापल्या मशिदीत जाण्याची प्रथा आहे. मोदी 2014 मध्ये पंतप्रधान झाले, त्या वेळी त्यांच्या अभिनंदनाचे फ्लेक्स अहमदाबाद, बडोदा येथे लावण्यात आले. आमच्या जातीचा माणूस पंतप्रधान झाला याचा आनंद त्यात होता. खाली सही करणारे सर्व मुसलमान होते. ते तेली समाजाचे होते- धर्मांतरित तेली; पण त्यांचा जातवाला पंतप्रधान झाला याचा आनंद!

7. भारतीय राज्यघटनेने सर्व नागरिकांना समान अधिकार दिले आहेत, समान जबाबदाऱ्याही दिल्या आहेत; त्यात मुस्लिमही येतात. त्याप्रमाणे सत्तर वर्षे भारत घडला आहे. त्यामुळे सरकारने आमच्यासाठी काय केले, ही तक्रार मुसलमानांची थांबवली पाहिजे. मुस्लिमांना संधी लाथाडणे ही दोन्ही गटांची राजकीय गरज आहे. मुस्लिमच काय तर सर्व शोषित आणि पीडित गटांना समान संधीपासून वंचित ठेवणे, ही सर्व राजकीय पक्षांची गरज आहे. घटनेच्या कक्षेत शांततामय मार्गांनी आपण मार्ग शोधू शकतो. असो. असे अस्वस्थ करणारे विचार या ग्रंथातील सर्व लेखांत जागोजागी पसरलेले आहेत. हे असे लेख वाचताना, वेगळी आल्हाददायक माहिती देणारे तीन लेख या ग्रंथात आहेत.

1. मोगलकालीन दिवाणी (राणा सफवी),

2. अशोक, अकबर व नेहरू आणि त्यांची सौहार्दविषयक धारणा (डॉ.अक्रम पठाण)

3. अजिंठ्याचा सांस्कृतिक वारसा जपणारे निजाम (सय्यद दाऊद अशरफ).

आज असहाय, अगतिक, भयग्रस्त परिस्थितीत या देशातील मुस्लिम समाज उभा आहे. फाळणीच्या वेळी तो भांबावलेला-घाबरलेला होता, पण त्यांना आधार देत गांधीजी आणि नेहरू उभे होते. आज त्यांना अगतिक, भयग्रस्त स्थितीत आणणारे केंद्रस्थानी आहेत. आपली पुढची खेळी त्यांनी ठरवलेली आहे. आजवर आपण प्रा.बेन्नूर आणि त्यांचे विचार दूर ठेवले. मात्र सामाजिक सद्‌भाव हवा, समता हवी, धर्मातील कालबाह्य रूढीपरंपरा संपवल्या पाहिजेत यासाठी तळमळीने काम करणारा हा गट आहे. आज थोडा वेगळा मार्ग घेण्याची गरज आहे, असे त्यांना प्रामाणिकपणे वाटते. टिळक- आगरकरवादापेक्षा हा वाद थोडा वेगळा आणि तरल आहे का? यांच्यात समन्वय शक्य आहे का? मग त्यासाठी आपण हे पुस्तक अभ्यासले पाहिजे. त्यावर चर्चासत्रे झाली पाहिजेत. प्रश्न सोडविण्याचा एक मार्ग असा आहेपरस्परि वरोधी वाटणाऱ्या दोन प्रामाणिक बाजू समजावून घेतल्या, तर या दोन विचारधारांच्या समन्वयाचा तिसरा मार्ग आपल्या समोर येतो.

प्रा. फकरुद्दीन बेन्नूर स्मृतिग्रंथ
द युनिक ॲकॅडमी पब्लिकेशन, पुणे.
पृष्ठे : 332, मूल्य 300 रुपये 
फोन : 020-25511330   

Tags: book review pustak parichay Dattprasad Dabholkar Pro. Fakruddin Bennur SAMAJIK SAMATECHA PRAVAH दत्तप्रसाद दाभोळकर प्रा. फकरुद्दीन बेन्नूर स्मृतिग्रंथ ​​​​​​​प्रा. फकरुद्दीन बेन्नूर सामाजिक समतेचा प्रवाह weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

दत्तप्रसाद दाभोळकर,  सातारा, महाराष्ट्र

वैज्ञानिक आणि लेखक


प्रतिक्रिया द्या