डिजिटल अर्काईव्ह (2014-2019)

सेवाग्राम आश्रमाला पहिली भेट

आम्ही तीन दिवस सकाळ-दुपार-संध्याकाळ जे आमच्या समोर आलं ते खाल्लं, पण त्यापेक्षा अधिक काळ ते सहन करणं शक्य नव्हतं. आम्ही आई-वडिलांकडं तक्रार केली, पण त्यांनाही वाटत होतं की आजोबांच्या सांगण्याप्रमाणंच हे घडत असणार आणि दक्षिण आफ्रिकेतून आल्या आल्या आपण कोणत्याही गोष्टीबद्दल तक्रारी करणं हे बरोबर नाही! आईबाबांची भूमिका बघून मी गप्प राहिलो, पण इला केवळ पाच वर्षांची होती आणि ती गप्प राहून सगळं ‘सहन’ करण्याची शक्यता नव्हती. चौथ्या दिवशी दुपारी इला थेट आजोबांच्या खोलीत घुसली आणि म्हणाली, ‘‘बापूजी तुम्ही तुच्या आश्रमाचं नाव बदलायला पाहिजे!’’

 ‘‘का?’’ आजोबांनी चकित होत विचारलं. ‘‘अहो आजोबा, आम्ही आल्यापासून सेवा पाहिलीच नाही, पण रोज सकाळ संध्याकाळ कोला खातोय...दुधीभोपळा मात्र खातोय. त्यामुळं तुम्ही सेवाग्राम ऐवजी कोलाग्राम असं आश्रमाचं नाव ठेवायला पाहिजे.’’

सूड घेण्याची भावना आणि त्यासाठी शारीरिक ताकद कमावण्याची माझी सुरु असणारी तारुण्यसुलभ धडपड या बाबींनी माझ्या पालकांना माझी चिंता वाटू लागणं हे स्वाभाविक होतं. त्यांनी मला सोबत घेऊन तातडीनं भारतात आजोबांकडं आणि इतर नातलगांकडं जाण्याचा निर्णय घेतला. माझ्या आजीचं म्हणजे कस्तूरचं १९४४ साली तुरुंगात असतानाच निधन झालेलं होतं आणि दुसरं महायुद्ध सुरू असल्यानं वडिलांना तिला श्रद्धांजली वाहण्यासाठीसुद्धा जाणं शक्य झालं नव्हतं, हेही आम्ही सगळ्यांनी भारतात जाण्यासाठी आणखी एक कारण होतं.

१९४५ साल सुरू झालेलं होतं. युद्ध जवळपास संपल्यानं दक्षिण आफ्रिका ते भारत समुद्रीमार्ग सर्वसामान्य नागरिकांसाठी खुला झालेला होता. प्रवासात आता काही अडथळा उरला नव्हता. दर्बनमध्ये मुख्य शहराच्या बाहेरच्या भागात ‘फिनिक्स फार्म’ मध्ये आम्ही राहायचो. आजोबांनी १९०४ साली लाकूड आणि लोखंडी पन्हाळी पत्रे यांचा वापर करून हे फार्म हाऊस उभारलं होतं. कमीत कमी फर्निचर असणाऱ्या या निवासस्थानात आम्ही अनेक वर्षे राहिलो. तिथल्या खुर्च्या, बिछाने या सगळ्यांची आम्हाला सवय होऊन गेली होती. १९४३ च्या सुमारास या घराची पडझड सुरू झाली. लोखंडी पन्हाळी पत्र्यांच्या भिंती गंजल्या.

जमिनीलगत या पत्र्यांना गंजल्यामुळं भोकं पडली. ही भोकं हळूहळू एवढी मोठी झाली की साप आणि उंदरांसारखे प्राणी या पत्र्यातून आरपार जाऊ-येऊ शकत होते. छप्पराची चाळणी झाली होती. त्यामुळं पावसाच्या दिवसात पाऊस घरात छान खेळू बागडू शकायचा. अगदी स्पष्ट सांगायचं तर त्या घरात राहाता येणं शक्य नाही अशी स्थिती झाली होती. घरामध्ये किड्या-मुंग्यांची व अनेक त्रासदायक प्राण्यांची रेलचेल जाणवायला लागली होती.

अशा घराच्या खोलीत काळ्याकुट्ट अंधारात किड्या- मुंग्यांच्या भीतीनं जागत रात्र काढणं हा एक भयंकर अनुभव होता. घरात वीज नव्हती. आपल्या बिछान्याजवळ साप तर आलेला नाही ना? बाथरूममध्ये असेल का? असे प्रश्न सतत मनाला छळत राहायचे. आम्ही भारतात येण्यास निघण्यापूर्वी फिनिक्सप्रमाणेच साध्या पद्धतीनं उभारलेल्या, पण सिमेंट ब्लॉक व फरशा असलेल्या घरामध्ये आमचा मुक्काम हलवला होता. फिनिक्सच्या तुलनेत हे नवं घर आम्हाला बरंच आरामदायक वाटत होतं, पण तरीही भारतात जाण्याचं ठरलं तेव्हा मला अतिशय आनंद झाला. १९४० साली आम्ही भारतात गेलो होतो तेव्हा माझं वय केवळ ६ वर्षांचं होतं.

आजोबांचा करिश्मा, त्यांचं तत्त्वज्ञान आणि त्यांच्या संघर्षामागील हेतू हे सगळंच समजण्याचं आणि त्यानं प्रभावित होण्याचं ते वय नव्हतंच! त्यापेक्षा आता १२ वर्षाच्या वयात मी या सगळ्या गोष्टी थोड्या थोड्या समजावून घेऊ शकत होतो. संघर्ष, त्यामागील तत्त्वज्ञान आणि संघर्षातून निर्माण होणारा करिश्मा यामागील परस्पर संबंध मला लक्षात येऊ लागला होता. दक्षिण आफ्रिकेतील वर्णद्वेषी आणि त्रासदायक वातावरणालाही मी कंटाळलो होतो. या वातावरणामुळं नैराश्याचं मळभ माझ्या मनावर आलं होतं. अशा मानसिक स्थितीत दक्षिण आफ्रिका सोडून बाहेर कुठंही जाणं हे माझ्यासाठी सुखदच ठरणार होतं.

भारतात आल्यानंतर साधारण दहा दिवसांनी आम्ही मध्यभारताच्या ‘सेवाग्राम’ आश्रमात पोहोचलो. मुंबईपासून वर्ध्यापर्यंत (‘सेवाग्राम’ आश्रमापासून जवळचं रेल्वेस्थानक) पोहोचण्यासाठी तब्बल अठरा तासांचा प्रवास करावा लागला, पण तो एक विलक्षण अनुभव होता. इतक्या लोकांसमवेत आणि इतका काळ रेल्वेनं प्रवास करण्याचा माझ्या आयुष्यातील तो पहिलाच प्रसंग! रेल्वेच्या प्रदीर्घ प्रवासाबरोबरच आजोबांना आणि गांधी कुटुंबातील इतरांना भेटण्याची व भारतासारखा देश जवळून पाहण्याची उत्सुकताही मला रोमांचित  करत होती.

कळत्या वयात मी भारतातला कोणताही प्रदेश पाहिलेला नव्हता. ‘सेवाग्राम’ आश्रमाला जे पहिल्यांदाच भेट देत असतील त्यांना देशातल्या खूप दूरवर आणि दुर्ग भागात असल्यासारखा वाटतं. मला नंतर कळलं की आजोबांनी आश्रमासाठी असं इतर गजबजलेल्या भागापासून दूरचं ठिकाण जाणीवपूर्वकच निवडलं होतं. गोंगाट करणारी गर्दी आजोबांना नकोशी वाटत असे. त्याऐवजी अभावानं आढळणारी शांतता आणि मानसिक स्वस्थता त्यांना अधिक प्रिय होती.

खूप लोकसंख्या असलेल्या भारतातल्या अन्य ठिकाणांपासून ‘सेवाग्राम’ तसं अलग होतं. यात भरीला भर अशी की आजोबांनी वर्ध्यापासून ‘सेवाग्राम’ला यायला सार्वजनिक वाहतूक व्यवस्था केली जाऊ नये असं स्थानिक अधिकाऱ्यांना बजावलं होतं. ज्यांना खरोखरच गंभीर कारणासाठी आजोबांची भेट हवी असेल आणि महत्त्वाच्या प्रश्नांवरच चर्चा करायची असेल तितक्याच व्यक्ती आश्रमात याव्यात हा यामागील हेतू होता. ज्यांना आजोबांपर्यंत पोचायचं असेल, त्यांना एकतर वर्धा रेल्वे स्थानकापासून सहा मैल अंतर चालत आश्रमाकडं यावं लागे किंवा जास्ती पैसे खर्च करून टांगा किंवा टॅक्सी ठरवावी लागे.

आम्ही वर्धा रेल्वे स्थानकावर जेव्हा उतरलो, तेव्हा वडिलांनी माझ्या छोट्या बहिणीसाठी म्हणजे इलासाठी आणि सामानही घेऊन जाता यावं म्हणून एक टांगा ठरवला. माझे आई आणि वडील मात्र सहा मैलांचं अंतर चालतच सेवाग्रामपर्यंत आले. ‘‘तुम्ही जर चालतच येणार असाल, तर मीही तुच्याबरोबर चालेन!’’ मी काहीशा फुशारकीनं म्हटलं. प्रत्येक गोष्टीत वडिलांचं अनुकरण करण्याचंच माझं ते वय होतं. मनोमन कदाचित मला आजोबांनाही हे दाखवण्याची इच्छा होती की, ‘बघा, मी इतका मोठा झालोय की एवढं चालत आलो!’

मध्य भारतातल्या कातडी भाजून काढणाऱ्या उन्हात कच्च्या रस्त्यावरून सहा मैल चालणं म्हणजे काय असतं याचा मला अनुभव नव्हता आणि म्हणूनच मी फुशारकीत बोललो होतो. थोडं अंतर पार केल्यावर मात्र धूळ, ऊन आणि तहान-भूक यांनी माझ्या सहनशक्तीची परीक्षाच पाहिली. अनेकदा उन्हानं घायाळ झालेल्या मला उडी मारून टांग्यात बसण्याची इच्छा व्हायची, पण मी सहजासहजी हार मानायला तयार नव्हतो.

माझे आजोबा सेवाग्राममध्ये असल्यानं आमच्या कुटुंबातील प्रत्येकाच्या मनात सेवाग्रामविषयी एक वेगळी आस्था होती किंवा काय हे मला माहिती नाही, पण एक गोष्ट खरी की, आम्ही आश्रमाजवळ पोचलो आणि आम्हाला एका वेगळ्याच शांतीचा आणि प्रसन्नतेचा अनुभव आला. एका पवित्र जागेध्ये आपण प्रवेश करत आहोत अशी काहीशी ती भावना होती. आश्रमात दिमाखदार किंवा मोह पडावं असं काही नव्हतं. आश्रम म्हणजे अत्यंत साधेपणाचा आदर्श होता. एका विस्तीर्ण परिसरात चिखलाच्या भिंती आणि शाकारलेली छपरं यांच्या वेगवेगळ्या आकारांच्या झोपड्या होत्या. अधूनमधून काही झुडपं आणि वृक्ष होते, पण कुठंही लॉन वगैरे नव्हतं. या सगळ्यातून आजोबांच्या साधेपणाचं तत्त्वज्ञानच प्रतिबिंबित होत होतं.

आजोबांचा परिसर सुंदर बनविण्याला विरोध होता असं नव्हे, पण दरिद्री अवस्थेत जगणाऱ्या भारतीय माणसांत व आपल्यामध्ये मानसिक अंतर निर्माण होईल अशी कोणतीही गोष्ट आजोबांना आपल्या राहण्या-जगण्यात नको होती. आश्रमापासून जवळ असणारं खेडं हे साधारण अर्धा मैल अंतरावर होतं आणि या खेड्यातील माणसं खरंच खूप खूप गरिबीत जगणारी होती. आश्रमात जर लॉन आणि फुलबाग या सगळ्या गोष्टी केल्या गेल्या असत्या, तर या खेड्यातील सर्वसामान्य माणसाला आश्रम आपला वाटला नसता. ज्या लोकांची आपण सेवा करायची त्यांच्यामध्ये आणि आपल्यामध्ये दुरावा तयार करणारं असलं सुंदरतेचं कुंपण हवंच कशाला असं आजोबांना वाटलं यात नवल नाही!

आम्ही आश्रमात प्रवेश केला, पण याचा काही गाजावाजा झाला नाही. खरं तर आम्ही येत आहोत याची पूर्वकल्पना आश्रमातील लोकांना होती, पण कोणाचंही स्वागत आणि कोणालाही निरोप या गोष्टी शांतपणानं करायच्या असा आश्रमातला नियम होता. आम्ही किशोरलाल मश्रुवाला व त्यांची पत्नी गोती राहात असलेल्या झोपडीकडे गेलो. हे दोघेही आजोबांचे निकटचे अनुयायी हे तर खरंच, पण किशोरलाल हे नात्यानं माझ्या आईचे चुलतेही होते. मला खूप नंतर कळलं की माझ्या आई-वडिलांचा विवाह लावून देण्यात किशोरलाल यांचा मोठा वाटा होता.

सर्वांचं विनम्रभावानं स्वागत करणारी किशोरलाल यांची झोपडी आश्रमाच्या अगदी प्रवेशद्वारालगत होती. आम्ही आंघोळ केली आणि अल्पोपहार घेऊन आजोबांच्या राहण्याच्या जागेकडे वळलो. आजोबांची झोपडी अवघी दहा बाय दहा फुटांचीच होती. या झोपडीची जमीनदेखील शेणानं सारवलेली होती आणि कौलारू छप्पर शाकारलेलं होतं. दरवाजाजवळच एका कोपऱ्यात आजोबा एक पांढरं कापड आच्छादलेल्या सुती बसकरावर बसलेले असत. भेटीला येणाऱ्यांसाठी चटई अंथरलेली असे. दिवा, पंखे किंवा अन्य फर्निचर असं आजोबांच्या झोपडीत काहीच नव्हतं.

मला वाटलं होतं, आजोबांचं घर अनेक वस्तूंनी भरलेलं असेल आणि त्यांच्या आजूबाजूला सतत त्यांचे सेक्रेटरी आणि त्यांना हवं-नको पाहणारे लोक असतील, पण प्रत्यक्षात तसं काही नव्हतं. मी आजोबांविषयी ज्या ज्या कल्पना केल्या होत्या, त्यापेक्षा सगळं विपरित होतं. ते खूप प्रेमळ आणि कोणीही सहजपणे त्यांच्यापर्यंत पोहोचू शकेल असे होते. येणाऱ्या लोकांना आपलंसं करण्याची हातोटी त्यांच्याकडं होती. अगदी कोणी वादासाठी आलं तरी त्याला स्वत:च्या घरी आल्यासारखं वाटावं अशी आजोबांची वागणूक असे. ज्या क्षणी मी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अंदाज घेण्यासाठी त्यांच्या डोळ्याला डोळे भिडवले त्याचक्षणी मी त्यांच्याकडं आकर्षित झालो. हे माझे आजोबा आहेत अशी एक अभिमानाची आणि तितकीच आत्मियतेची भावना मनामध्ये निर्माण झाली.

आमच्या पहिल्या भेटीच्यावेळी मला वाटलं होतं, आजोबा काहीच मिनिटं आम्हाला देतील आणि लगेच आम्हाला निरोप देऊन इतर महत्त्वाच्या कामांमध्ये गुंतून जातील. प्रत्यक्षात तसं घडलं नाही. आजोबांनी अतिशय प्रेमानं आणि आपलेपणानं आम्हाला जवळ घेतलं, विचारपूस केली. खोलीत आणखी काही लोक होते, पण त्यांना जाणीव झाली, की आजोबांसाठी कुटुंबाबरोबरचे हे काही खाजगी क्षण खूप महत्त्वाचे आहेत. ते लोक समंजसपणानं स्वत:हूनच खोलीबाहेर निघून गेले. आई-वडिलांपाठोपाठ आदर व्यक्त करण्याच्या भारतीय पद्धतीनुसार इला आणि मी चरणस्पर्श करण्यासाठी म्हणून आजोबांच्या पायावर झुकलो. आजोबांनी मात्र चरणस्पर्श करू देण्याऐवजी आम्हा दोघांना छातीशी कवटाळलं आणि आमचे प्रेमभरानं पापे घेतले.

मी वर्धा रेल्वे स्थानकापासून सेवाग्रामपर्यंत चालत आलो हे ऐकल्यानंतर आजोबांच्या डोळ्यात एक वेगळीच चमक पाहायला मिळाली आणि तोंडात दात नसलेल्या त्यांच्या चेहऱ्यावर एक मनमोकळं हसू आलं. त्या हसण्याचा आवाज आजही माझ्या कानामध्ये रुंजी घालतो आहे. पाठीवर शाब्बासकीची थाप देत आजोबांनी माझं कौतुक केलं. माझ्यासाठी त्यांची शाबासकीची थाप हा सर्वांत मोठा आशीर्वादच होता. आई-वडिलांनी त्याच दिवशी थोड्या उशीरा भारतातील आपल्या इतर नातेवाईकांना आणि मित्रांना भेटण्यासाठी म्हणून प्रवासाला निघायचं ठरवलं.

मला मात्र सेवाग्राम आश्रमामध्येच ठेवण्यात येणार होतं. अर्थात त्यामुळं मी खट्टू झालो नाही. आश्रमात आणि तेही आजोबांच्या सहवासात राहायचं म्हणून मी खूश होतो. सामान्यत: आजोबांसोबत राहण्यासाठी माझ्या वयाचं फार कोणी उत्सुक नसे, कारण आजोबांबरोबर राहायचं म्हणजे आश्रमातील सगळे नियम आणि शिस्त काटेकोरपणानं पाळावी लागेल. जेवण-खाणं चमचमीत नसे. पहाटे साडेचार वाजता उठून पाच वाजता होणाऱ्या आश्रमातील प्रार्थना सभेला सर्वांना हजर राहावं लागे. बारा वर्षातल्या कोणाला असं जगायला आणि वागायला आवडणार?

मला मात्र आजोबांसोबत असणं म्हणजे झगमगत्या प्रकाशझोताच्या केंद्रस्थानी असण्याचा आनंद उपभोगण्यासारखं वाटत होतं. अनेक माणसं आजोबांची खुशामत करण्याचा प्रयत्न करत. अनेक महत्त्वाचे नेते त्यांच्याशी सल्लामसलत करण्यासाठी येत. हे सगळं पाहून मला अशा आजोबांचा नातू असणं ही गोष्ट स्वत:च्या सन्मानाची वाटत होती.

सेवाग्राममध्ये गेल्यापासून पहिले काही दिवस आत्मसंयमनाची कठोर परीक्षा पाहणारे होते. त्याचा त्रास होणं हेही साहजिक होतं. भारतातील संस्कृती आणि सामान्य गरीब माणसाची जीवनशैली लक्षात घेऊन आजोबांनी आपली अतिशय साधी जीवनशैली बेतली होती. या सगळ्या कमीत कमी खर्चाच्या जीवनशैलीनं काय होणार हे कळण्याचं माझं ते वय नव्हतं. ‘इतक्या काटकसरीनं का राहायचं?’ यासारखे प्रश्न माझ्या मनात येरझाऱ्या घालायचे, पण मी त्याबद्दल तक्रार केल्याचं मला आठवत नाही. इतर माणसं राहात होती तसंच राहण्यात मी समाधानी होतो. खरं तर मध्य भारतात अत्यंत  विषारी कोब्रासारखे साप खूप आढळत असत असं मला नंतर कुणीतरी सांगितलं, पण मी आश्रमात असताना तिथं असले साप माझ्या वाट्याला आले नाहीत याबद्दल मी सापांचा कृतज्ञच आहे. सेवाग्राम आश्रमातील जमीन वेगवेगळ्या आकाराच्या आणि ठिपक्यांच्या फरशांच्या तुकड्यांनी बनलेली होती.

साधारण दोनशे लोक त्यावेळी आश्रमात राहायला होते. काहीजण अविवाहित असणारे, तर काहीजण सहकुटुंब राहायला असणारे. सर्वांचं जेवण सामुदायिक स्वयंपाक खोलीतच बनवलं जायचं. जेवायला सगळ्यांना एका ठिकाणी जमावं लागायचं. आपली आपली ताट-वाटी आणि इतर साहित्य जेवायला येताना प्रत्येकाला आणायला लागायचं आणि जेवणानंतर ते धुवूनही ठेवायला लागायचं. जेवण-खाणं असो, अभ्यास असो किंवा वैचारिक चर्चा असो सगळं काही जमिनीवर बसूनच चालायचं. आश्रमाच्या परिसराची सफाई करणं, भाजीपाल्याच्या वाफ्यांची देखभाल करणं इतकंच काय तर सार्वजनिक संडास साफ करणं-लोकांनी केलेल्या मूत्रविसर्जनाच्या बादल्या आणि मैला वाहून नेऊन शेतात टाकणं आणि बादल्या, मैल्याच्या बुट्ट्या साफ करणं हे प्रत्येकालाच करायला लागायचं.

ठराविक लोकांच्या गटांना दर आठवड्याला आलटून पालटून हे काम करावं लागायचं. यात स्त्री-पुरुष असा भेद नव्हता. स्त्री असो की पुरुष आश्रमात कामांबाबत समानता होती. हे काम पुरुषांचं, हे स्त्रीचं असं कोणी म्हणू शकायचं नाही. सेवाग्राममधला पहिला आठवडा विशेषत: माझी बहीण इला आणि माझ्यासाठी खूपच त्रासदायक होता. आम्हाला आधीच इशारा मिळाला होता की आश्रमातलं जेवण अतिशय सपक म्हणजे अळणी चवीचं व साधं असेल. दिवसातून तीन वेळा असलं अन्न खाणं हे आमच्या सवयीचं नव्हतं. साध्या राहणीचं तत्त्वज्ञान आजोबांनी इतक्या टोकापर्यंत का ताणावं याचं मला आश्चर्य वाटायचं.

दर्बनमध्ये ‘फिनिक्स फार्म’ला आम्ही साधा, संतुलित आणि सकस असा आहार घ्यायचो. त्याची आम्हाला सवय होती, पण इथलं प्रकरण वेगळंच! ‘फिनिक्स’मध्ये राहणारे लोक कमी होते हे खरं, पण तिथल्या आणि सेवाग्राममधल्या जेवणात एवढा फरक का असावा? सेवाग्राममध्ये आम्ही पोचल्यापासून आम्हाला दररोज सकाळ-संध्याकाळ केवळ भाकरी आणि तिखट- मीठ किंवा मसाले वगैरे न घालता उकडलेले दुधी भोपळ्याचे तुकडे खायला दिले जात होते.

आजोबांची तब्येत लक्षात घेता त्यांच्यासाठी जो आहार ठरवलेला होता, तो इतरांपेक्षा वेगळा असल्यानं आश्रमात ते सर्वांबरोबर जेवायला नसत. साहजिकच आम्हाला काय खायला दिलं जातंय हे त्यांना माहीत नव्हतं. आश्रमात जे काही शिजवलं जातं ते आजोबांच्या सूचनांनुसारच शिजवलं जातं अशी सर्वांची समजूत असल्यानं कोणी त्याबद्दल तक्रारही करत नव्हतं. अशक्तपणा येणं कोणालाही परवडणारं नव्हतं त्यामुळं जे समोर येईल ते माणसं खात होती. निमूटपणे यातना सहन करणं हे अहिंसक कृतीचा भाग म्हणून सेवाग्राममध्ये काटेकोरपणे पाळलं जात होतं.

मुन्नालालजी यांच्याकडे आश्रमात जेवणाचा मेनू ठरवणं आणि त्यासाठी आवश्यक साहित्य पुरवणं ही जबाबदारी होती. सतत भाकरी आणि उकडलेला दुधी भोपळा खाताना आमचे चेहरे पाहून कदाचित मुन्नालालजींना मजा येत असेल. आम्ही तीन दिवस सकाळ-दुपार-संध्याकाळ जे आमच्या समोर आलं ते खाल्लं, पण त्यापेक्षा अधिक काळ ते सहन करणं शक्य नव्हतं. आम्ही आई-वडिलांकडं तक्रार केली, पण त्यांनाही वाटत होतं की आजोबांच्या सांगण्याप्रमाणंच हे घडत असणार आणि दक्षिण आफ्रिकेतून आल्या आल्या आपण कोणत्याही गोष्टीबद्दल तक्रारी करणं हे बरोबर नाही!

आईबाबांची भूमिका बघून मी गप्प राहिलो, पण इला केवळ पाच वर्षांची होती आणि ती गप्प राहून सगळं ‘सहन’ करण्याची शक्यता नव्हती. चौथ्या दिवशी दुपारी इला थेट आजोबांच्या खोलीत घुसली आणि म्हणाली, ‘‘बापूजी तुम्ही तुच्या आश्रमाचं नाव बदलायला पाहिजे!’’

‘‘का?’’ आजोबांनी चकित होत विचारलं.

‘‘अहो आजोबा, आम्ही आल्यापासून सेवा पाहिलीच नाही, पण रोज सकाळ संध्याकाळ कोला खातोय...दुधीभोपळा मात्र खातोय. त्यामुळं तुम्ही सेवाग्राम ऐवजी कोलाग्राम असं आश्रमाचं नाव ठेवायला पाहिजे.’’

आजोबांनी आपल्या हातातलं काम बाजूला ठेवलं आणि उत्सुकतेनं विचारलं, ‘‘इकडं ये इला. तुला काय म्हणायचं आहे ते मला नीट समजावून सांग बरं!''

 

आजोबांकडं हा एक वेगळाच गुण होता. ते प्रत्येक व्यक्तीचं म्हणणं आणि प्रत्येक विषय तितक्याच गांभीर्यानं समजावून घ्यायचे. त्यांच्यादृष्टीनं दुर्लक्ष करण्याजोगं किंवा बिनमहत्त्वाचं काहीच नसायचं. इलाची तक्रारसुद्धा आजोबांनी गांभीर्यानं घेतली. स्वातंत्र्य लढ्यासंदर्भातील एखाद्या प्रश्नाबाबत राजकारण्यानं केलेली चर्चा आजोबांनी जितक्या गांभीर्यानं घेतली असती तितकंच त्यांना इलाच्या तक्रारीचंही गांभीर्य वाटत होतं.

‘‘मला मीठही न घातलेला उकडलेला दुधी भोपळा व भाकरी खाऊन वीट आलाय. आता मला बदल म्हणून काहीतरी वेगळं खायला मिळायला हवं!’’ इलानं बालसुलभ निरागसपणानं सांगितलं.

‘‘तू म्हणतेस ते बरोबर आहे. मला यात लक्ष घालायला हवं!’’ आजोबा म्हणाले.

आजोबांनी या प्रश्नाच्या मूळापर्यंत शक्य तितक्या लवकर आपण जाऊ अशी हमी इलाला दिली. त्याच दिवशी संध्याकाळी सायंप्रार्थनेनंतर आजोबांनी सर्वांसमोर इलाच्या तक्रारीचा विषय काढला आणि मुन्नालालजींना बोलावून स्पष्टीकरण द्यायला सांगितलं.

‘‘मी तर सूचनांचं पालन करतोय बापूजी! तुम्हीच मला सांगितलं नव्हतं का की सर्वांनी उकडलेलं आणि साधं अन्न खायला हवं म्हणून?’’ मुन्नालालजी म्हणाले.

‘‘हो. मी साध्या आहाराची नेहमी वकिली करतो हे खरंच आहे, पण त्याचा अर्थ सकाळ-दुपार-संध्याकाळ तेच तेच अन्न खावं असा होत नाही!’’

यानंतर सत्य काय हे सर्वांसमोर उघड झालं. मुन्नालालजींनी कबूली दिली. ते म्हणाले, ‘‘झालंय असं की, आम्ही सगळ्या शेतात दुधी भोपळ्याचीच लागवड केलीय आणि त्यामुळं दुधी भोपळ्याचं अमाप पीक आलंय. इतक्या दुधी भोपळ्याचं काय करायचं हे आम्हालाच समजत नाही. त्यामुळं आम्ही सकाळ- दुपार-संध्याकाळ दुधी भोपळाच शिजवतोय!’’

‘‘अतिशय वाईट नियोजन आहे हे!’’ आजोबांनी कानउघाडणी केली.

ते म्हणाले, ‘‘वेगवेगळ्या प्रकारच्या भाज्या लावण्याऐवजी केवळ दुधी भोपळ्याची लागवड कुणी करतं का?’’

मुन्नालालजींना आजोबांनी सांगितलं, ‘‘असा प्रश्न तयार झाला असेल, तर कोणतीही गोष्ट वाया घालवायची नाही आणि तिचं व्यापारीकरण करायचं नाही हे आश्रमाचे नियम सांभाळून तुम्ही प्रश्नावर तोडगा काढा.’’

दुसऱ्या दिवशी सकाळी मुन्नालालजींनी आश्रमाच्या बैलगाड्या जुंपल्या. त्यामध्ये सगळे भोपळे भरले. शेजारच्या खेड्यातील बाजारात जाऊन इतरांकडून भोपळ्यांच्या बदली दुसरी भाजी घेतली. आश्रमाच्या जेवणात केवळ भोपळा दिसणं बंद झालं. सगळ्यांनीच सुटकेचा नि:श्वास टाकला आणि इलाला मनापासून आशीर्वाद दिले. इलानं आततायीपणानं तक्रार केली नसती तर आणखी किती दिवस आम्हाला सकाळ-दुपारस संध्याकाळ उकडलेला भोपळा खायची पाळी आली असती कुणास ठाऊक!

आजोबांचे अनुयायी काही वेळेला त्यांची शिकवण किती कर्मठ आणि हटवादीपणानं अमलात आणत याचंच हे भोपळा प्रकरण म्हणजे उदाहरण!

कोणतीही शिकवण जर टोकाच्या हटवादीपणानं आचरणात आणायचा प्रयत्न केला, तर ती टवाळीचा विषयही होऊ शकते. आजोबांचे सगळेच अनुयायी त्यांचं जगण्याच तत्त्वज्ञान अमलात आणण्याची क्षमता असणारे होते अशातला भाग नाही. आजोबांनाही त्याची जाणीव होती. आजोबांचं सत्यापर्यंत जाण्यासाठी जगण्याचं तत्त्वज्ञान त्यांच्या रोजच्या जगण्यात वारंवार तपासलं जात असे आणि त्यात योग्य वाटेल त्याप्रमाणे दुरुस्त्या केल्या जात. कदाचित यामुळेच काही वेळेला आजोबांवर आपल्या तत्त्वज्ञानाशी विसंगत वागण्याचा आरोप केला जात असे.

यावर आजोबा म्हणत, ‘‘प्रत्येक दिवशी आणि प्रत्येक घटनेतून मला माझ्या श्रद्धेविषयी आणि विश्वासाविषयी नवे पैलू उलगडतात. सत्याबद्दलची आपली समजसुद्धा कायम एकसारखी राहात नाही. - म्हणूनच जो परिश्रमपूर्वक आपली सत्याची समज वाढवण्यासाठी पिच्छा पुरवण्यास तयार असतो अशा माणसाला आपली मतं पुन्हा-पुन्हा सातत्याने तपासावी लागतात.’’

(अनुवाद : सोनाली नवांगुळ, कोल्हापूर )

महात्मा गांधी यांचे नातू (मणिलाल यांचे चिरंजीव) अरुण गांधी यांनी लिहिलेले Legacy of Love हे इंग्रजी पुस्तक ‘वारसा प्रेमाचा’ या नावाने ५ जानेवारी २०१९ रोजी, साधना प्रकाशनाकडून मराठीत येत आहे. त्यातील हे एक प्रकरण आहे.

Tags: weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या