डिजिटल अर्काईव्ह (2014-2019)

‘केवळ तर्कशास्त्राच्या आधारावर माणूस जगू शकत नाही, त्याला काव्यही पाहिजे असते’ असे गांधींनी एकदा लिहून ठेवले होते. श्रद्धा, सहज प्रवृत्ती, अंतर्ज्ञान व प्रेम हे विषय संवेदनाक्षम आकलनातून व तर्कशुद्ध मानसिक दृष्टिकोणातून  पहावेत असे त्यांना वाटे. त्यापासून ढळून, काल्पनिक अतर्क्य गूढ संदेश, चमत्कार, भ्रामक कल्पना व भाकिते करणाऱ्या मानसिक वा शारीरिक विचारसरणीत ते कधीच गढून जात नसत. ‘ज्ञानेंद्रियाला सुखकर वाटणाऱ्याच अस्सल गोष्टी ते मान्य करीत असले तरी, त्याचा सातत्याने जोरदार पाठपुरावा करण्यास ते तयार नसत,’ असे त्यांच्या अनुयायाने म्हटले. माणसांचे व घटनांचे मूल्यमापन ते स्पष्ट अशा निकषांवर ठरवीत. आपले मूल्यमापनदेखील त्यांनी बुद्धीला पटेल अशा निकषांवर केले होते. गूढ व चमत्काराने लोकांच्यावर प्रभाव पाडावा असे त्यांना वाटत नसे. स्वत:चे मूल्यमापनदेखील ते शिस्तबद्ध, शांत चित्ताने करीत. त्यांचे कामकाज वास्तववादी असे, त्यांचे ध्येयही वास्तवावरच आधारलेले असे.

मौन पाळण्याचे गांधींचे वर्षाकाठी 52 दिवस असत, त्या दिवशी ते बोलत नसत. मुलाखतीसाठी आलेल्यांचे ते केवळ ऐकून घेत, क्वचित प्रसंगी उत्तरादाखल कागदाच्या चिटोऱ्यावर पेन्सिलीने दोन-चार शब्द लिहीत. बोलणेच बंद असल्यामुळे आठवड्यातील किमान तो एक दिवस त्यांना एकांतवास लाभे. ‘मौन पाळण्यामागचा आपला काय उद्देश?’ असा प्रश्न मी (लुई फिशरनी) गांधींना 1942 साली केला होता.

त्यावेळी माझ्या शरीराच्या आणि मनाच्या अक्षरश: चिंध्या झाल्या होत्या. अव्याहतपणे मी काम करीत होतो. रेल्वेच्या डब्यातून उकाड्याचा प्रवास, अनेक ठिकाणची व्याख्याने, रेल्वेत वा अन्य ठिकाणी जमलेल्या हजारो लोकांनी विचारलेले प्रश्न व त्यांच्या विनवण्या, आणि माझ्या समवेतच प्रार्थना करण्याची त्यांची इच्छा यांमुळे मी अगदी थकून गेलो होतो. म्हणून आठवड्यातून एक दिवस मला विश्रांतीची आवश्यकता होती. मग मी तेवढा एक दिवस मौन पाळू लागलो. अर्थात्‌ त्यानंतर त्याला मी सर्व सद्‌गुणांचा आध्यात्मिक मुखवटा चढवला!

खरे तर मला आठवड्यातील एक दिवस सुट्टीची जरूरी होती. हे बोलताना ते स्वत:शीच हसले. ‘परंतु हे कशासाठी,’ असा प्रश्न वारंवार विचारला असता तरी, ‘अध्यात्माचे धडे घेण्यासाठी’ असे त्याला उत्तर आले असते. त्यांच्या मौनाचा सोमवार हा दिवस असला तरी वर्षभरात इतर दिवशी त्यांना विश्रांती थोडीच मिळणार होती? त्यांनी तेवढ्यापुरता प्रवास केला नाही, किंवा जनतेपुढे व्याख्याने दिली नाहीत तरी, इतर दिवशी मुलाखती-लिखाण-पाहुण्यांच्या भेटी आणि भारतातील व बाहेर देशांतील हजारो लोकांबरोबर पत्रव्यवहार इत्यादी गोष्टी चालूच होत्या.

1 एप्रिल 1926 रोजी लॉर्ड रीडिंग यांच्या जागी लॉर्ड आयर्विन भारताचे नवीन व्हॉइसरॉय म्हणून आले. (लॉर्ड आयर्विन पुढे लॉर्ड हॅलिफॅक्स म्हणून ब्रिटिश युनियनचे परराष्ट्र सचिव, व नंतर वॉशिंग्टनमधील ब्रिटनचे वकील झाले.) व्हॉइसरॉय बदलाच्या या महत्त्वाच्या घटनेचा उल्लेख ‘यंग इंडिया’मध्ये झाला नव्हता, किंवा गांधींनी त्याविषयी अन्यत्रही कोठे उल्लेख केला नव्हता. व्हॉइसरॉयशी चर्चा करण्याऐवजी आता त्यांनी भारतीय जनतेबरोबर असहकाराच्या चळवळीत भाग घ्यायला सुरुवात केली होती. अंतर्गत स्वातंत्र्य मिळवावे हेच त्यांचे त्यावेळी एकमेव ध्येय होते.

परंतु गांधींच्या भूमिकेत अत्यंत महत्वाचा बदल आता झाला होता. हिंदू-मुस्लिम मैत्रीत बाधा आणण्याचा ब्रिटिशांचा उद्देश आहे, असा त्यांना संशय येऊ लागला. ही भूमिका अविश्वासावर आधारलेली आहे असे त्यांनी 12 ऑगस्ट 1923 रोजी लिहिले होते. ‘अविश्वासातून पक्षपातीपणा आणि पक्षपातीपणातून विभाजन, या गोष्टींचे उगमस्थान संशयात दडलेले आहे’ असे त्यांचे म्हणणे होते. हिंदू-मुस्लिम ऐक्यातूनच भारताला स्वातंत्र्य मिळेल अशी गांधींची धारणा होती. तथापि ब्रिटन हा तिसरा पक्ष अस्तित्वात असेपर्यंत हे ऐक्य अशक्यच आहे हे त्यांच्या लक्षात आले. सरकार तर मुस्लिमधार्जिणे दिसत होते. स्वातंत्र्य मिळविण्यासाठी भारताला धार्मिक शांततेची निकड होती. हा पेचप्रसंग असला तरी गांधी आशावादी होते. ‘तरीही आपल्यात ऐक्य निर्माण होईल. माणसाचे प्रयत्न जेथे निष्फळ ठरतात तिथे ईश्वर यशस्वी होतो; ब्रिटिशांचे राज्य तोडा-फोडा आणि राज्य करा’ असल्या विचारसरणीवर आधारलेले असते.’ परंतु अद्यापि भारतातील कित्येक ठिकाणी या दोन धर्मीयांच्यात रक्तरंजित झगडे चालूच होते. बहुसंख्य हिंदूंनी अल्पसंख्य मुस्लिम लोकांना योग्य वागणूक द्यावी आणि दोहोंनीही अहिंसेचे पालन करावे हाच हिंदू-मुस्लिम ऐक्यासाठी उपाय होता.

गांधी मुस्लिमधार्जिणे आहेत असे हिंदू त्यांच्यावर गंभीर आरोप करीत असत. परंतु त्यावर्षी तर कुत्रे हा एक तीव्र वादविवादाचा विषय होऊन बसला. कित्येक महिने हे वादळ त्या महात्म्याच्या मस्तकावर घोंघावत होते. अहमदाबादमधील कापड गिरण्यांचा बडा मालक अंबालाल साराभाई याच्या कारखान्याच्या विशाल परिसरात नेहमी भटकी कुत्री हिंडत असत. एके दिवशी त्यांच्या लोकांनी साठ भटकी कुत्री पकडून नष्ट केली. या घटनेने साराभाई उद्विग्न झाले. आपल्या वेदना त्यांनी महात्म्याच्या कानावर घातल्या. ‘मग दुसरे काय करणार?...’ असे गांधींनी उद्गार काढले. ‘असे असेल तुमचे म्हणणे, तर त्याचा काय अर्थ होतो?’ साराभार्इंनी विचारले.

दोघांधील हे संभाषण अहमदाबादमधील मानवतावादी संस्थेच्या कानावर आले. हा विषय त्यांनी गांधींच्यावर उलटवला. ‘-मग दुसरे काय करणार, असे तुम्ही म्हणाला असाल तर त्याचा काय अर्थ होतो?’ अशाच मजकुराचे पत्र त्यांनी आश्रमाकडे पाठवून गांधींच्याकडे खुलाशाची मागणी केली. ‘कोणत्याही प्राणिमात्राला ठार मारण्याला हिंदू धर्माने प्रतिबंध केला असून, ते पाप आहे असे सांगितले आहे, पिसाळलेली कुत्री माणसांना आणि इतर कुत्र्यांना चावून त्यांनाही पिसाळून सोडतील, या संभाव्य कारणासाठी त्यांची हत्या करणे योग्य आहे असे म्हणण्यास तुम्ही कसे काय धजावता?’ असा जळजळीत सवाल त्यांनी पत्रात केला होता.

हे पत्र गांधींनी जसेच्या तसे ‘यंग इंडिया’च्या अंकात ‘हीच का मानवता?’ या शीर्षकाखाली प्रसिद्ध केले. तसेच गांधींनी दिलेले उत्तर दीड पानात छापले होते. ‘मग दुसरे काय करणार? -हे माझे बोलणे खरे आहे.... आणि त्याला या अंकात मी दिलेले उत्तर योग्यच आहे... चुकणे हे मर्त्य माणसातील वैगुण्य आहे’, उत्तरादाखल ते पुढे म्हणतात की, ‘एखाद्या माणसाने अन्य माणसांची हत्या करायला सुरुवात केली तर त्या माणसालाही ठार मारणे हे कर्तव्यच ठरते.’

‘यंग इंडिया’च्या पुढील अंकाच्या मुखपृष्ठावर, ‘हीच का मानवता?’ या मथळ्याखाली त्यांनी लिहिले होते, ‘पहिला लेख वाचल्यानंतर त्याचा तीव्र निषेध करणाऱ्या पत्रांचा लोंढाच आला. माझा अपमान करण्यासाठी लोक जमले. त्यावर कळस म्हणजे दिवसाच्या कामातून थकून भागून मी रात्रीच्या वेळी झोपायच्या तयारीत असताना, तीन मित्रांनी माझी झोपमोड केली आणि मानवधर्म झुगारून त्यांनी माझ्याशी चर्चा सुरू केली.’ इथे गांधींनी मित्र असाच उल्लेख केला होता, कारण दुसऱ्या कुणालाही ते मित्र मानीत असत. त्यांपैकी एक जैन होता. त्याने राग, कडवटपणा आणि उद्धटपणाचा अतिरेक केला होता.’ जैन धर्मातील पवित्र अशा अहिंसेच्या प्रभावाखाली गांधी लहानाचे मोठे झाले होते. ‘म्हणून मी जैन आहे असाच लोकांचा समज होता. महावीर हे जैन धर्माचे संस्थापक, अहिंसेचे आणि अनुकंपेचे तर अवतारच होते! त्यांचे निस्सीम भक्त हे जर खरोखरीच अहिंसेचे भक्त झाले, तर ते किती सुंदर होईल!’ असे गांधींनी लिहिले होते. 

गांधी आपल्या मुद्यावर ठाम होते. ‘भटक्या कुत्र्यांची झुंड तयार होणे चुकीचे आहे. कोणी मालक नसलेल्या भटक्या कुत्र्यांची झुंड तयार झाली, तर माणसांच्या अस्तित्वावरच संकट कोसळेल. लोक खरोखरीच धर्माचे पालन करणारे असतील तर कुत्र्याला पालक असला पाहिजे. कुत्रे पाळणे हे एक शास्त्र आहे आणि पश्चिमात्यांकडून ते आपण शिकून घेतले पाहिजे.’

‘कुत्रा’ या विषयावर पत्रे येतच राहिली, काही विरोधक टीकाकारांनी तर सभ्यतेच्या मर्यादेचा भंग केला होता. पुढच्या ‘यंग इंडिया’च्या अंकात या विषयाचा त्यांनी तीन पाने खर्च करून ऊहापोह केला होता. ‘एका गृहस्थाने माझी मुलाखत मागितली होती; आणि माझ्या संमंतीशिवाय छापील हस्तपत्रिकेत त्या मुलाखतीचा सारांश देऊन तो रस्त्यावर पत्रके वाटत होता. या प्रकारे तो मला धडा शिकवणार होता का? जो गुन्हेगार स्वत: रागाने भडकलेला असतो, तो दुसऱ्याला अहिंसा कसा काय शिकवणार?

‘असे असूनही विरोध करणाऱ्या या टीकाकाराने माझी एक प्रकारे सेवाच केली. त्याने मला आत्मचिंतन करायला शिकवले. त्याचा मी रागानेच प्रतिवाद तर केला नाही ना, हे तपासून घ्यायची त्याने मला ही एक संधीच दिली होती. आणि त्याच्या मुळाशी गेल्यानंतर माझ्या लक्षात आले की, त्याच्या पाठीमागे दुसरे काही नसून प्रे दडले आहे.’ या विचित्र निर्णयाप्रत गांधी कसे पोचले होते? ‘त्याला अभिप्रेत असलेल्या अहिंसेप्रमाणे मी नव्हतो, तर त्याच्या विरोधी मी वागतो आहे असे समजून त्याने माझ्यावर राग धरला आहे. ‘त्याच्या रागाचा उद्रेक मी समजू शकतो. त्यामागचा त्याचा हेतू मी जाणतो. म्हणून अत्यंत सहनशीलतेने त्याला पटवून दिले पाहिजे...’

पुढे त्या उपायाच्या रास्तपणाविषयी ते लिहितात की, ‘भटक्या कुत्र्याला खायला घालणे हे पाप आहे. ही खोटी अनुकंपा आहे. एखाद्या भुकेल्या कुत्र्यापुढे तुकडा टाकणे हा त्याचा अपमान आहे. भटकी कुत्री हे समाजाच्या संस्कृतीला व अनुकंपेला शोभत नाही. उलट ते माणसाच्या अज्ञानाचे व सुस्तीचे द्योतक ठरते. खालच्या प्रतीचे प्राणीदेखील आपले भाईबंदच आहेत. वाघ, सिंहाचाही त्यात समावेश होतो. या मांसाहारी प्राण्यांविषयी, विषारी सापाविषयी आपण अज्ञानी असल्यामुळे त्या प्राण्यांना कसे सांभाळून घ्यावे हे आपल्याला समजत नाही. ते समजले तर त्यांच्याबरोबर आपण समन्वयाने नांदू शकू. एवढेच कशाला, दुसऱ्या धर्मातील किंवा अन्य राष्ट्रातील लोकांशी मैत्री कशी करावी हे देखील आपल्याला माहीत नाही.’

कुत्र्यांना ठार मारल्यानंतर त्या कुत्र्यांच्या प्रेमिकांनी आक्रोश केला, परंतु साठ मुस्लिम किंवा इंग्लिश माणसे मारली गेल्यानंतर ते प्रेमिक तसे करणार नाहीत, असे गांधींना वाटू लागले.

भटक्या कुत्र्यांचा सांभाळ करणाऱ्या संस्थेला कोणी एखादा द्रव्यसाहाय्य करेल किंवा तो स्वत: त्यांचे पालन करेल, आणि त्याच्या पाठीशी जर सरकार उभे राहणार नसेल तर भटक्या कुत्र्यांचा नाश करण्याशिवाय कोणता पर्यायी उपाय असू शकतो? ‘लुळी पांगळी झालेली जनावरे काय किंवा माणसे काय, त्यांची आपल्या भारतात कुत्र्याप्रमाणे जी वाईट अवस्था झाली आहे ते पाहून मला अतोनात दु:ख होते’ असे गांधी म्हणत. -मग लुळ्या पांगळ्या गायींची हत्या का करू नये? असाही प्रश्न उपस्थित होईल. ‘एखाद्या डोके फिरलेल्या माणसाने तलवार हाती घेऊन जर समोर येईल त्या माणसाला ठार मारायला सुरुवात केली, आणि कोणी त्या माथेफिरूला जिवंतपणी पकडू शकणार नसेल तर, आणि जर कोणी त्याची हत्या  करणे हे कर्तव्य समजून त्याचा नाश करेल तर सगळा समाज त्याला धन्यवाद देईल...’ असे गांधींनी पुढे लिहिले.

तुम्ही आमच्या पत्रांना वैयक्तिकरित्या उत्तरे पाठवली नाहीत तर आम्ही तुमच्यावर हल्ला करू, अशी अनेक पत्रे त्यांच्याकडे आली. ‘या विषयावर आलेल्या पर्वतप्राय पत्रांना मी उत्तरे देऊ शकणार नाही, पण त्यांचे उत्तर माझ्या मुखपत्रात देईन’ असे गांधी म्हणाले.

‘कुत्रा’ या विषयावर त्यांनी मुखपत्राच्या पुढच्या चार अंकांत उतारेच्या उतारे लिहून त्याला उत्तरे दिली. त्यात त्यांनी उल्लेख केला की, अहमदाबादच्या एका हॉस्पिटलमध्ये 1925 साली पिसाळलेली कुत्री चावण्याच्या 1117, व 1926 साली 990 घटना झाल्याची नोंद होती. यासाठी तुम्ही पाश्चात्यांकडून धडा घ्यावा असे ते म्हणत. ‘पाश्चात्यांना मानवता हा विषय अगम्य आहे असे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही चुकत आहात असे दुर्दैवाने म्हणावे लागेल.’ परंतु मनाला वेदना देणारी वस्तुस्थिती तर पुढेच होती. ‘मानवतेचे ध्येय पश्चिमात्य लोकांच्या दृष्टिकोणात कमी प्रमाणात असले तरी, प्रत्यक्ष कृतीने ते ध्येय आपल्यापेक्षा उच्च पातळीवर नेऊन ठेवतात. आपण उच्च ध्येयाच्या नुसत्या गप्पा मारतो पण त्या मानाने आपली कृती अगदी नगण्य स्वरूपाची असते. आपल्याकडील निकृष्ट दर्जाच्या जनावरांच्या आणि इतर प्राण्यांच्या संख्येवरून ते दिसून येते. आपल्या धर्माला ही गोष्ट शोभणारी नाही, हा अधर्म आहे, हेच त्याचे द्योतक ठरते!’

तुमच्यावर पाश्चात्यांचा प्रभाव आहे हेच त्यावरून सिद्ध होते, असे आरोप टीकाकार त्यांच्यावर करीत. तरीही, बेफाम झालेल्या लोकांना ते शांतपणे तोंड देत. पाश्चात्यांतील काही वाईट चालीरीतींवर गांधी हल्ला करीत आणि काही चालीरीतींचे ते स्वागत करीत. ‘त्याचा उगम कोठून झाला याचा शोध घेत बसण्यापेक्षा, आपण त्याचा मथितार्थ लक्षात घेतला पाहिजे.’ ‘या विषयावर माझ्याकडे पत्रे येतच होती, पण ती विखारी मजकूरांनी भरलेली असल्यामुळे मी त्यांच्याकडे  दुर्लक्ष केले’ असे त्यांनी तिसऱ्या महिन्यात जाहीर केले.

मौनाचे हे वर्ष कुत्र्यांविषयी वादंगाच्या गोंगाटाने निनादून गेले होते, अशा वेळी गायीच्या एका वासराने आणखी एक वादळ निर्माण केले. आश्रमातील एक पाडी आजारी पडली. तिच्यावर उपचार केले तरी तिच्या वेदना वाढत गेल्या, म्हणून तिला संपवावे असा गांधींनी निर्णय घेतला. कस्तुरबार्इंनी त्याला हरकत घेतली. ‘मग तू तिच्यावर औषधोपचार कर आणि तिची सेवाशुश्रुषा कर’ असे त्यांनी कस्तुरबांना सुचवले. त्या प्राण्याच्या वेदना कस्तुरबांना पाहावेनात. मग गांधींच्या उपस्थितीत डॉक्टरांनी त्या वासराला इंजेक्शन दिले, व वासरू गतप्राण झाले. या घटनेचा निषेध करणाऱ्या बेफाम आरोपांची पत्रेही त्यांच्याकडे येऊ लागली. मी केले ते योग्यच केले असे गांधींनी म्हटले.

लैंगिक विषयावर चर्चा करणारी तरुण-तरुणींची कित्येक पत्रे त्यांच्याकडे येऊ लागली, गांधींच्याकडून त्यांना सल्ला पाहिजे होता. या मौनाच्या काळात लाभलेल्या थोड्याबहुत शांततेचा उपयोग करून, कुटुंब व लैंगिक विषयावर हॅवेलॉक एलिस, पॉल ब्यूरोचे ‘मोरल बँकरप्सी (नैतिक दिवाळे)’ आणि युरोपातील अन्य तज्ज्ञांनी केलेले लिखाण गांधींनी वाचले. भारतातील लैंगिक संबंध हा विषय त्यांच्या दृष्टीने महत्वाचा होता. तरुणपणी वरचेवर स्त्री-पुरुषांच्यात समागम होण्याने भारतीयांच्यात शक्तिपात होतो, शिवाय भारताची लोकसंख्याही झपाट्याने वाढते आहे हे गांधींच्या लक्षात आले. 1940 सालापासून दरवर्षी पन्नास लक्ष या वेगाने ती वाढत होती. हा विषय त्यांनी आध्यात्मिक पातळीवर नेऊन ठेवला. भारतातील धार्मिक वाङ्‌मयाचा दाखला देऊन, आर्थिक कारणासाठी लैंगिक पावित्र्य सांभाळले पाहिजे याचे त्यांनी समर्थन केले. त्यातील नैतिक व आर्थिक पैलू लक्षात घेण्यास ते विसरले नाहीत.

1926 च्या मौनाच्या वर्षात आणि नंतरही, त्यांनी शाईने किंवा पेन्सिलीने कित्येक लेख लिहिले. संततीनियमनाच्या साधनांचा उपयोग करण्यास त्यांचा विरोध होता. पाश्चात्यांचा तो दुर्गुण आहे असे ते म्हणत; पण संतती नियमनाला मात्र त्यांचा विरोध नव्हता, उलट त्याचे ते समर्थन करीत. शारीरिक विकारांवर मानसिक नियंत्रण ठेवून आत्मसंयमन केले पाहिजे याला ते महत्व देत.

‘संततीची वृद्धी टाळण्यासाठी आत्मसंयमन करणे हाच एकमेव पवित्र मार्ग आहे’ असे त्यांनी लिहून ठेवले. हा नियम पाळला नाही तर तो पशूपेक्षाही कनिष्ठ दर्जाचा ठरेल. कायमचे किंवा दीर्घकाळ लैंगिक संबंध टाळले तरीदेखील शारीरिक किंवा मानसिक दृष्टीने ते हानीकारक होत नाही.

गांधी व आश्रमातील त्यांचे अत्यंत जवळचे सहकारी ब्रह्मचर्येचे किंवा संयमनाचे पालन करीत असत. काही वेळा विषयवासना भागवण्यासाठी नव्हे, तर केवळ संतती प्राप्त व्हावी यासाठी काही लोक लैंगिक विषयाचा अवलंब करतात. ‘माणसाला विषयवासना आवश्यकच असते’ हे गांधींना मान्य नव्हते.

एकाने त्यांना पत्र लिहिले की, ‘जास्तीत जास्त तीन आठवड्यापर्यंत लैंगिक नियमन मला उपयुक्त वाटे, परंतु त्यानंतर मात्र माझ्या शरीराला जडपणा येतो, शारीरिक व मानसिक अस्वस्थता निर्माण होते व मी संतापी व चिडखोर होतो. एक तर समागम केल्यामुळे, किंवा नैसर्गिक वीर्यस्खलन झाल्यामुळे मला आराम मिळतो; मी शांत होतो आणि काहीतरी नवीन करण्याच्या उमेदीने कामाला लागतो.’ अशी कित्येक उदाहरणे गांधींना ऐकायला मिळाली.

आपल्या अनुभवांतून सखोल विचार करून उत्तरादाखल ते लिहितात, ‘वीर्य जतन करून त्याचा संचय करणे ही गोष्ट प्रयत्नपूर्वक साध्य करावी लागते. ते एकदा जमले की शरीर व मन कसे बलवान होते. ज्याच्यात आश्चर्यकारक अशी मनुष्यप्राण्याला जन्म देण्याची ताकद असते अशा मौल्यवान वीर्याचे आपण व्यवस्थितपणे जतन केले तर अपूर्व अशा ऊर्जेत व शक्तीत त्याचे रूपांतर होते.’

14 सप्टेंबर 1935 च्या ‘हरिजन’च्या अंकात बुद्धिप्रामाण्यावर गांधींनी लिहिले होते की, ‘समजा कृत्रिम साधनांनी संततीनियमन करणे काही विशिष्ट परिस्थितीत आवश्यक असले तरी, भारतातील लक्षावधी लोकांसाठी ते उपयुक्त ठरणार नाही.’ भारत अत्यंत गरीब आणि अज्ञानी देश आहे आणि संतती नियमनाची साधने वापरण्याच्या कामी तो अधिकच अज्ञानी आहे. म्हणून लोकसंख्या नियंत्रित ठेवण्यासाठी गांधी अन्य उपाय सुचवतात. संततीप्रतिबंधक साधने वापरल्यामुळे तो अधिकाधिक विषयवासनेला बळी पडेल आणि अन्य कित्येक कारणांमुळे शक्तिहीन झालेला आपला समाज अधिकच शक्तिहीन होईल.  

आपल्या मुलांची लग्ने लांबवावीत, म्हणून गांधी प्रयत्नशील होते. लहानपणी लग्न करण्याच्या प्रथेला आपला विरोध असल्याचे त्यांनी अनेक वेळा बोलून दाखवले होते. अशा लग्नांमुळे भरपूर फलप्राप्ती होते व लोकसंख्येत फार वाढ होते. अर्थात जन्मलेल्यांच्या भरण-पोषणासाठी भूातेपासून सर्व काही निर्माण करणे हा माणसाचा धर्मच आहे. गांधी धार्मिक वृत्तीचे असले तरी व्यवहाराची त्यांना चांगली जाण होती. म्हणून लोकसंख्या मर्यादित असावी असे त्यांचे मत होते.

चार्ल्स फ्रीअर अँड्र्यूजला लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात की, ‘काही सभ्य आणि आत्मखुशीच्या मार्गाने अपत्यप्राप्ती मर्यादित करता आली तर भारताच्या आजच्या हलाखीच्या परिस्थितीत मी त्याचे स्वागत करेन.’ मानसिक शिस्त पाळूनच ते शक्य आहे, असे त्यांना वाटे. जनतेने आयुष्यभर ब्रह्मचर्येचे पालन करावे, उशीरा लग्न करावे -म्हणजे शक्यतो पंचवीस वयाच्या आसपास लग्न करावे, आणि त्यानंतर देखील आत्मसंयमन करावे असे या आग्रही संन्याशाला वाटे. आश्रमातील मुलींच्यावर मात्र एकवीस वर्षांनंतर लग्न करण्याचे बंधन होते. त्यांना माणसातील नैतिक दौर्बल्याची जाण होती. म्हणून खाण्यातील मसालेदार पदार्थ टाळणे, योग्य कपड्यांचा वापर, योग्य पद्धतीचे श्रम, फिरायला जाणे, व्यायाम करणे, चटकदार वाङ्‌मय टाळणे, नित्य प्रार्थना करणे, सात्विक फिल्म पाहणे(तोपर्यंत चित्रपटात चुंबनाला मज्जाव होता) आणि ईश्वरावर श्रद्धा बाळगल्यामुळे आधुनिक जीवनातील ताणतणावांतून माणूस मुक्त होईल. त्यामुळे बहुसंख्य माणसांना अशक्यप्राय आणि अनैसर्गिक वाटणारे विषय-वासनेवरील संयमन त्यांना सहजपणे साध्य करता येईल.

हे सगळे लिखाण ‘यंग इंडिया’ व ‘नवजीवन’ या छोट्याशा गुजराथी अंकांतून प्रकाशित होत होते, तरीही जवळजवळ सर्व भाषांतून देशभर त्यातील शब्दन्‌ शब्दाचे भाषांतर होऊन ते प्रसारित होत असे. मौनाच्या वर्षाच्या काळात आणखी एका अत्यंत महत्वाच्या विषयाकडे त्यांचे लक्ष वेधले होते, तो विषय होता -‘बालविधवा’. ‘ब्रिटिशांच्या 1921च्या अधिकृत गणनेनुसार 11,892 विधवा पाच ते दहा वर्षाच्या वयोगटातील; 2,32,147 दहा ते पंधरा वयोगटातील;  आणि सोळा वर्षांच्या वयोगटाखाली सगळ्या मिळून 3,29,056 एवढ्या होत्या’ असा गांधींनी संदर्भ दिला. ‘बालविधवा’ हा हिंदू धर्मावरचा डाग आहे असे गांधी म्हणत. मुलगी बाल्यावस्थेत असतानाच तिचे पालक दुसऱ्या बाल्यावस्थेतील मुलाशी किंवा म्हाताऱ्याशी- देखील विवाह ठरवीत असत. तिच्या बाल किंवा म्हाताऱ्या नवऱ्याचा मृत्यू झाला तर विधवा झालेली ती मुलगी हिंदू कायद्याप्रमाणे दुसरा विवाह करू शकत नसे.

 ‘अशा कुमारी विधवेने पुनर्विवाह करणे योग्यच आहे, एवढेच नव्हे तर कुमारी विधवेचे लग्न करणे हे तिच्या पालकांचे कर्तव्यच आहे’ असे गांधी ठासून म्हणत असत. काही विधवा मुली पुढे वेश्या बनत. ‘त्यावर एकच उपाय म्हणजे लहान वयात मुलींचे लग्न करू नये.’ धर्मनिष्ठा असलेल्या काही हटवादींनी अनीतीच्या अनेक प्रघातांना बळ दिले. बाल विधवेने पुनर्विवाह करण्यास बंदी घातली होती. ‘त्यामुळे त्यांचा कधीच विवाह झालेला नसतो.’

मुलीचे लग्न हे धर्मपतन नसून तो एक पवित्र संस्कार विधी आहे. बालविधवेच्या संदर्भातील तीव्र भावना ते एकाच वाक्यात उच्चारीत, ‘त्यांना प्रेम म्हणजे काय हे माहीतच नसते.’ परिपक्व माणसाने आपखुशीने व हेतुपुरस्पर पावित्र्य राखले पाहिजे, पालकाने त्याचे पालन निष्ठुरपणाने मुलांच्यावर लादून चालणार नाही. प्रत्येक माणसाने प्रेकरायला शिकले पाहिजे, असे गांधी म्हणत. परंतु वयात आल्यानंतर लग्न करून नंतर विधवा किंवा विधुर झालेल्याने पुनर्विवाह करू नये, कारण त्यांनी एकदा प्रेमाचा अनुभव घेतलेला असतो, असे गांधी म्हणत. ही एक प्रकारची बंदी असते व संततीनियमनाचे ते एक साधनच ठरते.

या विश्रांतीच्या वर्षात गोरक्षण, वर्णद्वेषाच्या थैानात सापडलेल्या दक्षिण आफ्रिकेतील भारतीयांची सुरक्षितता, दारूबंदी व जागतिक शांतता या विषयांवरील त्यांचा उत्साह अपूर्वच होता. एखाद्या वेळी सहजरित्या त्यांच्या लेखणीतून अवचित अशी म्हण, एखादा वाक्‌प्रचार लिहिला जाई, ‘लोकशाहीतील चैतन्याला गुप्ततेमुळे अडथळा येतो. धर्म, राजकारण व अर्थकारण यातून ‘मी’ व ‘माझे’ या शब्दांचे उच्चाटन होऊन आपण त्यापासून मुक्त झालो तर पृथ्वीवर आपण स्वर्ग सहजपणे आणू शकू.’ ही काही उदाहरणे.

क्वचित प्रसंगी धर्म या विषयात त्यांची सफर चाले; परंतु ईश्वर, सत्य व ज्ञान यासंबंधी त्यांनी क्वचितच लिखाण केले होते. त्यातल्या एखाद्या विषयावर विचार करायला, ते आपल्या वाचकाला उद्युक्त करीत. प्रार्थनेच्या सामर्थ्याविषयी त्यांनी एक लेख लिहिला होता. ‘ज्यावेळी बुद्धिप्रामाण्यवादी लोक आपण सर्वशक्तिमान असल्याचा दावा करतात, त्यावेळी त्यांचे हिडिस राक्षसांत रूपांतर होते. ज्यावेळी हे सर्वशक्तीवाले तर्कशक्तीला देखील मानत नाहीत त्यावेळी दगडाला किंवा लाकडी ओंडक्याला ईश्वर मानून त्याची पूजा करण्याइतकेच ते वाईट आहे... बुद्धीला प्रमाण मानणाऱ्या कोणीही, सामान्य श्रद्धेवरही विश्वास ठेवल्याचे आढळणार नाही... लहान मुलासारखी निष्पाप श्रद्धा असलेले सहस्त्रावधी लोक जगनिर्मिती करणाऱ्या ‘त्या’वर विश्वास ठेवून आपले सर्वसाधारण आयुष्य जगत असतात हे आपल्याला माहीतच असते.... ही कारणमीमांसा टाकून द्यावी असे मला वाटत नाही, पण त्या कारणमीमांसेवर सुज्ञांनी विचार केला पाहिजे...’

‘केवळ तर्कशास्त्राच्या आधारावर माणूस जगू शकत नाही, त्याला काव्यही पाहिजे असते’ असे गांधींनी एकदा लिहून ठेवले होते. श्रद्धा, सहज प्रवृत्ती, अंतर्ज्ञान व प्रेम हे विषय संवेदनाक्षम आकलनातून व तर्कशुद्ध मानसिक दृष्टिकोणातून पाहावेत असे त्यांना वाटे. त्यापासून ढळून, काल्पनिक अतर्क्य गूढ संदेश, चमत्कार, भ्रामक कल्पना व भाकिते करणाऱ्या मानसिक वा शारीरिक विचारसरणीत ते कधीच गढून जात नसत. ‘ज्ञानेंद्रियाला सुखकर वाटणाऱ्याच अस्सल गोष्टी ते मान्य करीत असले तरी, त्याचा सातत्याने जोरदार पाठपुरावा करण्यास ते तयार नसत,’ असे त्यांच्या अत्यंत जवळच्या अनुयायाने म्हटले.

माणसांचे व घटनांचे मूल्यमापन ते स्पष्ट अशा निकषांवर ठरवीत असत. आपले मूल्यमापनदेखील त्यांनी बुद्धीला पटेल अशा निकषांवर केले होते. गूढ व चमत्काराने लोकांच्यावर प्रभाव पाडावा असे त्यांना कधीच वाटत नसे. स्वत:चे मूल्यमापन देखील ते शिस्तबद्ध, शांत चित्ताने करीत. त्यांचे कामकाज वास्तववादी असे, त्यांचे ध्येयही वास्तवावरच आधारलेले असे. मुरिअल लेस्टर या इंग्लिश माणसाला, ‘मी कधी अदृष्य असा आवाज ऐकलेला नाही किंवा मला प्रत्यक्ष ईश्वराचे दर्शन घडलेले नाही’ असे गांधींनी सांगितले होते. कोणताही गूढसदृश अनुभव त्यांच्यावर  प्रभाव टाकीत नसे. त्यांच्या श्रद्धेला केवळ तर्कशास्त्राचे पंख लाभत असत. गांधींची कीर्ती जगभर पसरू लागली होती.

रोमा रोलाँ या फ्रेंच लेखकाने त्यांच्यावर एक पुस्तक लिहिले होते. ‘आमच्या भेटीसाठी या’ अशा प्रकारची आमंत्रणे कित्येकांकडून -विशेषत: अमेरिकेतून त्यांच्याकडे आली. परंतु त्यांनी त्यांचा स्वीकार केला नाही. ‘त्याचे कारण अगदी साधे आहे. अमेरिकेला जाण्याइतका पुरेसा आत्मविश्वास माझ्यात नाही. अहिंसेच्या चळवळीने इथे मूळ धरले आहे आणि ती टिकून राहाणार हे निश्चित. तिला अंतिम यश मिळेल याविषयी मला मुळीच शंका वाटत नाही. अहिंसेच्या क्षमतेविषयी दृश्य काही प्रदर्शन मी करू शकणार नाही; परंतु ते साध्य होईपर्यंत मी माझ्या भारताच्या कर्मभूीवरच प्रचार करीत राहीन.’ असे ते म्हणत. ‘श्रद्धेचा साथी’, ‘शेजारधर्म पाळणाऱ्यांचा संघ’, ‘पौर्वात्य व पश्चिमात्यांची एकजूट’ अशा संघटनांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मिसेस केली व मिसेस लँगेलॉथ या दोघीजणी, या महात्म्याला अमेरिका भेटीचे निमंत्रण देण्यासाठी साबरमती आश्रमात आल्या. ‘रेल्वे, स्टीमशिप इत्यादी वेगवान वाहनांना तुम्ही हरकत घेता, हे खरे आहे का?’ अशी त्यांनी गांधींची उलट-तपासणी करायला सुरुवात केली. ‘ते खरे आहे आणि नाहीही’ असे त्यांनी दोघींना हसत हसत उत्तर दिले. ‘हजार वेळा ते सत्य आहे’ असे ते बोलले, पण ते समजण्यासाठी तुम्ही प्रथम माझे ‘हिंद स्वराज’ हे पुस्तक वाचा, असा मी सल्ला देईन,’ असे गंभीरपणे गांधींनी त्यांना सुचवले. परंतु शेवटी यंत्र आणि वेग यासंबंधी आपल्या विचारांचे आकलन त्यांना होणार नाही हे गांधींच्या लक्षात आले. पुढची ट्रेन पकडण्याची घाई असल्याचे सांगून त्या त्वरेने निघून गेल्या.

वैयक्तिक व राष्ट्रीय दृष्टिकोणातून त्यांना तशी कोणतीच निकड नव्हती, म्हणून गांधी एक वर्षभर स्वस्थ राहिले. 1926 हे वर्षभर त्यांच्यासाठी सारे राजकारण पुढे ढकलण्याचे सर्वसंतीने मान्य झाल्यामुळे, त्यांनी त्या कालावधीचा पुरेपूर आनंद लुटला. त्यामुळे त्यांना शारीरिक स्वास्थ्य मिळाले व त्यांच्या आत्म्याला स्वैर चिंतनात विहार करण्याची संधी मिळाली. मुख्यत: ते मुलांच्यात रममाण झाले. आश्रमातल्या सूतकताई चढाओढीत त्यांच्या तरुण नातवंडांकडून गांधी व कस्तुरबा या सर्वांत मोठ्या वयाच्या स्पर्धकांचा पराभव होई.

हा निकाल जाहीर झाला की हसत-खिदळत सर्वजण निकालाचे स्वागत करीत. ज्यांची बुद्धिमत्ता पात्यासारखी धारदार आहे असे मद्रासचे प्रसिद्ध वकील राजगोपालाचारी, महादेव देसाई हा गांधींचा सचिव व मुख्य प्रचारक, आणि गांधींपेक्षा दोन वर्षांनी लहान असलेला व ज्याला ते ‘परोपयोगी’ म्हणत, तो चार्ली अँड्र्यूज यांच्याशी याच कालावधीत त्यांची घनिष्ठ मैत्री जमली. ‘तो माझ्या सख्ख्या भावापेक्षाही अधिक जवळचा आहे; त्याच्यापेक्षा अन्य कोणाशी माझे घनिष्ट संबंध आहेत हे सांगणे अशक्य आहे -इतका मि.अँड्र्यूज माझा परममित्र आहे.’

या हिंदू संन्याशाला अँड्र्यूजपेक्षा अधिक चांगला संन्याशी मिळू शकला नाही; या ख्रिश्चन मिशनऱ्याला गांधींसारखा अधिक चांगला ख्रिश्चन सापडला नाही. बहुधा दोघेही धार्मिक प्रवृत्तीचे असल्यामुळे या भारतीय व इंग्रजी माणसांत बंधुभाव निर्माण झाला हेच त्याचे प्रमुख कारण असावे. धार्मिक प्रवृत्तीने ते एकमेकाच्या समीप आले, त्यामुळेच भिन्न राष्ट्रीयत्व हे त्यांच्यात दुरावा निर्माण करू शकले नाही. ‘इंग्लंड व भारत मला सारखेच प्रिय आहेत’ असे अँड्र्यूज म्हणे. 27 डिसेंबर 1928 रोजी गांधींनी कलकत्त्याहून अँड्र्यूजला एक पत्र लिहिले होते. त्यात त्यांनी लिहिले होते की, ‘मी भारताचीच सेवा करतो म्हणून इंग्लंड व जर्मनी दुखावले जाणार नाहीत अशी मला आशा आहे. अत्यंत पुरोगामी असणारा भारतीय राष्ट्रवादी, पश्चिम देश किंवा इंग्लंड यांचा द्वेष करण्याइतका संकुचित नाही... राष्ट्रवादाच्या वेशातली ती दोन राष्ट्रे आंतरराष्ट्रवादी झाली आहेत....’ राष्ट्रवाद जर मानवसमुदायाचे विभाजन करू शकला नाही, तर धर्मच माणसांत बंधुभाव निर्माण करेल.

(अनुवाद : वि. रा. जोगळेकर)

साधना प्रकाशनाकडून मागील महिन्यात प्रसिद्ध झालेल्या ‘महात्मा गांधी : जीवन आणि कार्यकाळ’ या पुस्तकातील एक प्रकरण.     

Tags: वि. रा. जोगळेकर महात्मा गांधी लुई फिशर V. R. Jogalekar Mahatma Gandhi Louis Fischer weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

लुई फिशर

(29 फेब्रुवारी 1896–15 जानेवारी 1970)  अमेरिकन पत्रकार, लेखक, व महात्मा गांधी व व्लादिमिर लेनिन यांचा चरित्रकार .


प्रतिक्रिया द्या