डिजिटल अर्काईव्ह (2014-2019)

19 एप्रिल 1910 रोजी टॉल्स्टॉयनी आपल्या रोजनिशीत अशी नोंद केली आहे, ‘तीव्र भावनेनी प्रक्षुब्ध झालेली दोन जपानी माणसे सकाळी सकाळी माझ्याकडे आली, आणि युरोपियन संस्कृतीत असलेले दोष व अपूर्णत्व याचे वर्णन करणारे, एका हिंदूने लिहिलेले एक पत्र व पुस्तक आजच मला मिळाले.’ दुसऱ्या दिवशी डायरीत उल्लेख आहे; ‘संस्कृतीविषयी गांधींनी लिहिलेले अत्यंत सुंदर पत्र मी काल वाचले.’ परत त्याच्या दुसरे दिवशी असा उल्लेख आहे, ‘गांधींच्यावर लिहिलेले पुस्तक मिळाले. अत्यंत महत्वाचे. त्यांना उत्तर पाठवलेच पाहिजे!’ जे.जे. डोकेंनी लिहिलेले ‘गांधींचे चरित्र’ हे ते पुस्तक होते व गांधींनी ते टॉल्स्टॉयना पाठवले होते. त्यानंतर एके दिवशी आपला मित्र चेर्टकोव्ह याला लिहिलेल्या पत्रात गांधींच्याविषयी ‘आपला व माझा अत्यंत जवळचा माणूस’ असा उल्लेख टॉल्स्टॉयनी केला आहे

साधना प्रकाशनाकडून या आठवड्यात प्रसिद्ध झालेल्या ‘महात्मा गांधी : जीवन आणि कार्यकाळ’ या पुस्तकातील एक प्रकरण.

दक्षिण आफ्रिकेतील या हिंदू वकिलाप्रमाणेच, युरोपच्या मध्यपूर्वेस राहाणारा एक उच्चकुलीन गृहस्थ आध्यात्मिक विचारांच्या दृढ अलिंगनात अडकल्याप्रमाणे भारावून गेला होता. युरोपच्या पलीकडे काऊंट लिओ टॉल्स्टॉय यांच्या विचारदर्शनाने मोहनदास के. गांधी यांना त्यांच्या संघर्ष-प्रसंगी सुखद असा विरंगुळा मिळाला. गांधींच्या व्यावसायिक कार्यालयामध्ये टॉल्स्टॉय यांची धार्मिक विषयावरील बरीच पुस्तके होती; परंतु तुरुंगातील निवांत वेळीच त्यांना या रशियन लेखकाच्या विचारदर्शनाचा लाभ घेता आला.

केवळ आकारमानानेच नव्हे तर आपल्या शब्दरचनेुळे आदर्श निर्माण करणाऱ्या ‘वॉर अँड पीस’, ‘ॲना कॅरेनिना’ व ‘रिसरेक्शन’ या त्यांच्या तीन पुस्तकांनी टॉल्स्टॉयना प्रचंड यश व जगन्मान्यता मिळवून दिली होती. तरीदेखील त्यांचा अंतरात्मा त्यांना क्लेश देऊन सतावीत असे. येशू ख्रिस्तांची शिकवण व माणसाच्या प्रत्यक्ष जीवनातील तऱ्हा, यांतील तफावत पाहून त्यांना अत्यंत दु:ख होत असे. गर्भश्रीमंत परंपरेचा अधिकार असलेल्या कुळात 1828 साली त्यांचा जन्म झाला. वयाच्या सत्तावनाव्या वर्षी उच्चभ्रू स्तराचा त्यांनी त्याग केला, अत्यंत साधेपणाने ते राहू लागले, अनवाणी चालू लागले.

रशियन शेतकऱ्यासारखा ढगळा शर्ट-पॅन्ट असा  पोशाख करून, अन्य शेतकऱ्यांसमवेत नांगरणी, कोळपणी, पेरणी असली कामे करू लागले. त्यांनी धूम्रपान, मांसाहार व शिकार हे सारे सोडून दिले. शेतातून लांबवर अनवाणी फिरत जाण्याचा वा सायकलवरून दूरवर प्रवास करण्याचा त्यांना छंद लागला. असह्य झालेल्या ऐषआरामाचा त्याग करून आपली प्रचंड मालमत्ता त्यांनी पत्नी व मुलांच्या स्वाधीन केली आणि ग्रामशिक्षण, दुष्काळ निवारण, शाकाहार, विवाहप्रणाली, ब्रह्मज्ञान अशा विषयांवर त्यांनी लेखन चालू केले. चर्च-संस्थेवर त्यांनी तीव्र दोषारोप सुरू केले. पुरुष व स्त्रियांच्यासाठी खऱ्याखुऱ्या श्रद्धेचा शोध घेण्याची त्यांना ओढ लागली.

यात्स्नाया पोल्याना येथील त्यांचे घर हे त्यांचे तीर्थक्षेत्रच ठरून गेले. ऐहिक सुखाचा पुरेपूर उपभोग घेतल्यानंतर वयाच्या सत्तरीत ईश्वराचा शोध घेण्यासाठी निघालेल्या, प्रसिद्ध व तेजस्वी अशा या सरदाराच्या पायाशी जगाच्या कानाकोपऱ्यांतून आलेले ख्रिश्चन, ज्यू, मुस्लीम व बौद्धधर्मी लोक लीन होऊन बसले होते. परदेशांतून आलेल्या या पाहुण्यांध्ये शिकागोच्या हिल्‌ हाऊसच्या जेन ॲडम्स; पुढे अमेरिकेच्या गृहखात्याचे सचिव झालेले विल्यम जेनिंग्ज ब्रायन; फिलाडेल्फियाचे यहुदी धर्मगुरू जोसेफ क्राऊसकॉफ; झारच्या अधिकाऱ्यांकडून परवानगी घेऊन सैबेरियाला भेट देऊन परतल्यानंतर, तेथील अधिकारी आपल्या कैद्यांना क्रूरपणे कसे वागवतात याचा जाहीर निषेध करणारा अमेरिकन पत्रकार जॉर्ज केन्नन; जर्मन कवयित्री रैनर-मारिया रिल्के व पुढे झेकोस्लावाकियाचा राष्ट्रपती झालेला थॉस जी. मसोरिक इत्यादींचा समावेश होता. त्या सर्व यात्रेकरूंमध्ये उभे ठाकले होते खंदे वीर टॉल्स्टॉय!

आपली जीवनतत्वे आणि वागणूक यांचा समन्वय साधण्याचा त्यांचा प्रयत्न, सर्वांच्या उत्सुकतेचा विषय होता. शारीरिक श्रम, कमीतकमी गरजा, मालमत्तेपासून मुक्ती आणि प्राणीहत्येला विराम हे आता त्यांच्या जीवनाचे आधारस्तंभ बनले. जमीनदारी हे मोठे पाप आहे असे ते म्हणू लागले. सरकारला केवळ एकच कर देण्याच्या, हेन्री जॉर्जच्या प्रतिपादनाचे त्यांनी स्वागत केले. सक्तीच्या सैन्यभरतीचा त्यांनी निषेध केला. सद्‌सद्‌विवेकबुद्धीशी प्रामाणिक राहणाऱ्यांचे ते समर्थन करीत असत. युद्ध व हिंसाचारी वृत्ती ही नैतिक दृष्ट्या असमर्थनीय असून, शांततामय मार्गाने त्यांचे निराकरण करावे अशा मताचा आग्रह धरणाऱ्या ड्युखोबोरला, कॅनडात स्थलांतर करण्यासाठी त्यांनी मदत केली. रशियातील ज्यूंची कत्तल करण्याचे समर्थन करणाऱ्या किशेनेव्हचा त्यांनी निषेध केला. विल्यम लॉईड गॅरिसनच्या शांततामय प्रतिकार- तत्वाचे त्यांनी स्वागत केले. खेड्यांतील प्राथमिक शाळांत शिकवण्याचे काम त्यांनी स्वीकारले. पैशाचा स्वीकार न करण्याच्या आपल्या तत्वाला अनुसरून त्यांनी नोबेल पुरस्कारही स्वीकारला नाही!

स्वाभाविकच सनातनी मताच्या चर्चनी त्यांना ख्रिस्ती धर्मातून बहिष्कृत केले! तुरुंगात असलेल्या आपल्या मित्राला उद्देशून लिहिताना- ‘दुर्दैवाने मी तुरुंगात नाही...’ असा त्यांनी उल्लेख केला होता. नैतिक विषयावरील त्यांच्या लहान लहान पुस्तिकांच्या शीर्षकांतून त्यांच्या मनाचा ठाव घेता येतो. ‘तू कोणाचीही हत्या करणार नाहीस;’ ‘एकमेकांशी प्रेानेच वागा,’ ‘सर्वसामान्य ख्रिश्चन माणूस, विशेषत: रशियन माणूस विपन्नावस्थेत का आहे?’, ‘येशू ख्रिस्ताची मुलांसाठी शिकवण,’ ‘देहांताची शिक्षा व येशू ख्रिस्त,’ ‘धार्मिक सहिष्णूता,’ ‘स्वत:तील निर्दोषत्व’.... इत्यादी शीर्षकेच त्याचे निदर्शक आहेत. आपल्या पत्नीचा व मुलांचाही त्याग करून मन:शांती मिळवण्यासाठी ते निघून गेले. टॉल्स्टॉय वसाहतीतील एका मठात राहायला गेलेल्या लिओ टॉल्स्टॉय यांचा 20 नोव्हेंबर 1910 रोजी मृत्यू झाला. आपल्याच विचारांचे प्रतिपादन वाटावे अशा, ‘ईश्वराचे सिंहासन तुमच्या हृदयात वसलेले असते’ या टॉल्स्टॉय यांच्या पुस्तकातून गांधींना त्यांची ओळख झाली. ‘चर्चचा इतिहास हा क्रौर्य व अत्यंत किळसवाण्या भीतीने भरला आहे...’ असे ते उघडपणे प्रतिपादन करतात. ‘पापापासून मुक्त होण्याचे, पापविमोचन करण्यासंबंधीचे प्रत्येक चर्चचे तत्वज्ञान, आणि सर्वांत कळस म्हणजे सनातनी विचारांतील व्यक्तिपूजा, -हे सगळे येशू ख्रिस्ताच्या तत्वज्ञानाला सोडून चालले आहे’ असे त्यांचे प्रतिपादन होते.

अत्यंत नि:पक्षपातीपणे व थंडपणे केलेल्या युक्तिवादातून, असंख्य उतारे उद्‌धृत करून स्वत:चे पूर्ण समाधान झाल्यावर, ‘सगळी ख्रिश्चन चर्चेस येशू ख्रिस्ताचा खराखुरा अर्थ दडवून ठेवतात’ असे ते म्हणत असत. त्याच मापाने टॉल्स्टॉय हे शासनावर टीका करीत असत. धूसर अशा पुरातन कालखंडाविषयी ते लिहितात  की, ‘माणसे एकमेकांशी बोलताना एकमेकांचं भलं होवो’ असं चिंतीत असत. परंतु आता युरोपातील ख्रिश्चन राष्ट्रे अठ्ठावीस दशलक्ष लोकांना शस्त्रास्त्रांच्या धाकाखाली ठेवून, काहींची हत्या करून त्यांचे प्रश्न सोडवू पाहतात. त्याच्या समर्थनार्थ ‘गाय दि मोपासां’ या फ्रेंच लेखकाचे विचार ते उद्‌धृत करतात. ‘युद्ध’ या शब्दाचा नुसता उच्चार कानी पडताच सर्व समाज एकदिलानं त्याच्या विरोधात आवाज का उठवीत नाही; याचे त्यांना महदाश्चर्य वाटत असे.

महान रशियन साहित्य समीक्षक अलेक्झांडर हरझेन म्हणतो की, ‘तारायंत्राची सुविधा हाती असलेली आक्रमक लष्करशाही म्हणजे चेंगिजखानच आहे.’ टॉल्स्टॉय दडपशाहीच्या संदर्भात त्यांच्याशी सहमती दर्शवीत म्हणत, ‘ख्रिश्चन राष्ट्रे काफिरापेक्षाही अधिक दुष्ट आहेत!’ आशियाचा गाढा व्यासंग असलेला मॅक्स मुल्लर वर्णन करतो की, ‘एका भारतीय गृहस्थाने ख्रिश्चन धर्माच्या तत्वज्ञानाचा अभ्यास केल्यानंतर त्याने आश्चर्यकारकरित्या ख्रिश्चन धर्मामध्ये प्रवेश केला व नंतर तो युरोपमध्ये येऊन राहिला आणि ख्रिश्चन लोकांच्या विचाराप्रमाणे त्याने आपले आयुष्य व्यतीत केले.’ तत्वज्ञान आणि आचरण यांमध्ये असलेल्या दरीविषयी थोरोप्रमाणेच टॉल्स्टॉयही त्या मताचे होते व त्यासंबंधी मॅक्स मुल्लर यांच्या विचारांचा ते वारंवार उल्लेख करीत असत.

‘महाभारतातील भगवद्‌गीता व बायबलमधील पर्वत शिखरावरचे प्रवचन या दोहोंच्या विचारांत साम्य आहे,’ असा गांधींनी निष्कर्ष काढला होता. ‘जुलमी सरकारचे आदेश शांततेच्या मार्गाने व स्वत:ला क्लेश घेऊन झुगारावेत’ अशी टॉल्स्टॉयची शिकवण होती. त्या संबंधात ते म्हणत की, ‘सरकारशी निष्ठा बाळगणे, कोर्टात शपथ घेणे अशा वागण्याला ख्रिश्चन तत्वज्ञानाने मनाई केली आहे. पोलिसाचे काम, सैन्यातील नोकरी व कर देणे या सगळ्या गोष्टी धर्म-निषिद्ध आहेत. त्या गोष्टींच्या विरोधी वागणूक असणाऱ्यांवर काय कारवाई करावी,’ असा प्रश्न टॉल्स्टॉय विचारतात. स्मट्‌सपुढे नेमका हाच तर प्रश्न होता. भारतीयांचे काय करावे हे त्यांस समजेनासे झाले. ‘ख्रिश्चन ज्यावेळी धर्माचा प्रसार करतात त्यावेळी सरकारने काय पवित्रा घ्यावा;’ असा प्रश्न टॉल्स्टॉय विचारतात, आणि असे सरकार उलथून टाकण्यासारखी गंभीर परिस्थिती आपोआपच निर्माण होते हे त्यांचे त्यावर उत्तर होते.’ थोरोही असेच म्हणत असे.

गांधींनी स्वत:लाच मुक्त करून घेण्यास सुरुवात केली. ही प्रक्रिया हळूहळू चालू होती. कित्येक श्रृंखलांनी माणूस जखडलेला असतो, आंतरिक बंधनात तो अडकलेला असतो. चर्च वा सरकारमुळे असेच घडते. ‘ईश्वराचे सिंहासन तर तुमच्याच हृदयात स्थापन झालेले असते. आपण जसे करू तसा परमेश्वर होत असतो. तुम्ही मुक्त नसता; कारण तुम्हीच स्वत:ला जखडून ठेवलेले असते. ‘सत्याप्रत पोहोचण्यासाठी बाह्य बंधनाचा त्याग केला, तरच तुम्ही ईश्वरी सत्तेपर्यंत पोहोचू शकाल’ असे टॉल्स्टॉय म्हणत असत. आपल्याच हृदयात स्थानापन्न असलेल्या त्या दैवी राज्यापर्यंत पोचण्यासाठी मार्गात पसरलेली मालमत्ता व सुखभोगाचे अडथळे गांधींनी झुगारून दिले. 1 ऑक्टोबर 1909 रोजी वेस्टमिन्स्टर पॅलेस हॉटेल, 4 व्हिक्टोरिया स्ट्रीट, एस.डब्ल्यू, लंडन येथून टॉल्स्टॉयना इंग्लिशमध्ये एक पत्र लिहून, गांधींनी त्यांच्याशी पहिला व्यक्तिगत संपर्क प्रस्थापित केला. त्यावेळी टॉल्स्टॉय यांचे वास्तव्य मध्य रशियातील यात्स्नाया पोल्याना येथे होते. त्या पत्रात गांधींनी ट्रान्सवालमध्ये आपण करीत असलेल्या ‘सविनय कायदेभंगा’चा तपशील दिला होता.

टॉल्स्टॉयनी लिहिलेल्या डायरीत 24 सप्टेंबर 1909 रोजी त्या पत्राचा उल्लेख आहे. पश्चिमात्य दिनदर्शिकेपेक्षा रशियन दिनदर्शिका तेरा दिवसांनी मागे होती, त्यामुळे त्या तारखांत फरक दिसतो. त्यात त्यांनी म्हटले आहे की, ‘ट्रान्सवालमधील एका हिंदूकडून आलेले मनोरंजक पत्र मिळाले!’ चार दिवसांनंतर आपला परममित्र असलेल्या व्लादिमिर जी.चेर्टकोव्हला लिहिलेल्या पत्रात ते लिहितात की, ‘ट्रान्सवालमधील एका हिंदूने लिहिलेल्या पत्राने माझ्या हृदयाचा ठाव घेतला आहे!’ टॉल्स्टॉयच्या लिखाणाचे संपादकत्व करणाऱ्या चेर्टकोव्हच्या नोंदीत तसा उल्लेख आहे.

रशियन दिनांक 7 ऑक्टोबर 1909 रोजी म्हणजे इंग्रजी 20 तारखेला यात्स्नाया पोल्याना येथून टॉल्स्टॉयनी रशियन भाषेत गांधींना उत्तर पाठविले. टॉल्स्टॉयची मुलगी तातियाना हिने त्याचे इंग्रजीत भाषांतरही केले होते; ते लिहितात, ‘तुमचे अत्यंत चित्तवेधक पत्र नुकतेच मिळाले,  ते वाचून मला अत्यानंद झाला. ट्रान्सवालमधील आपल्या सहकाऱ्यांना व बांधवांना ईश्वर नक्कीच साहाय्य करेल. इथे देखील दुर्बल विरुद्ध बलदंड, सहनशील -प्रेमळ विरुद्ध अहंकार व दांडगाई असे प्रसंग वर्षानुवर्षे दृष्टोत्पत्तीस येतात. तुमच्या बंधुत्वाच्या भावनेचे मी आनंदाने स्वागत करतो. तुमच्या संपर्कात राहण्यात मला आनंदच वाटेल. तुमचा टॉल्स्टॉय.’

गांधींनी आपले दुसरे पत्र जोहानास्बर्ग येथून 4 एप्रिल 1910 रोजी टॉल्स्टॉयना लिहिले. त्या पत्रासोबत त्यांनी लिहिलेली ‘हिंद स्वराज्य’ व ‘इंडियन होरूल’ ही दोन छोटेखानी पुस्तके पाठवली होती. पत्रात त्यांनी लिहिले, ‘मी तुमचा एक नम्र सेवक असून, मूळ गुजराथीत मी लिहिलेल्या या पुस्तकाचे इंग्रजी भाषांतर पाठवले आहे. आपल्याला त्रास द्यायची मला बिलकूल इच्छा नाही, तथापि आपल्या तब्येतीने साथ दिली व आपल्याला वेळ मिळाला तर माझ्या पुस्तकावरील आपला अभिप्राय पाठवलात तर तो मला मोलाचा वाटेल.’ 19 एप्रिल 1910 रोजी टॉल्स्टॉयनी आपल्या रोजनिशीत अशी नोंद केली आहे, ‘तीव्र भावनेनी प्रक्षुब्ध झालेली दोन जपानी माणसे सकाळी सकाळी माझ्याकडे आली, आणि युरोपियन संस्कृतीत असलेले दोष व अपूर्णत्व याचे वर्णन करणारे, एका हिंदूने लिहिलेले एक पत्र व पुस्तक आजच मला मिळाले.’ दुसऱ्या दिवशी डायरीत उल्लेख आहे; ‘संस्कृतीविषयी गांधींनी लिहिलेले अत्यंत सुंदर पत्र मी काल वाचले.’ परत त्याच्या दुसरे दिवशी असा उल्लेख आहे, ‘गांधींच्यावर लिहिलेले पुस्तक मिळाले. अत्यंत महत्वाचे. त्यांना उत्तर पाठवलेच पाहिजे!’ जे.जे. डोकेंनी लिहिलेले ‘गांधींचे चरित्र’ हे ते पुस्तक होते व गांधींनी ते टॉल्स्टॉयना पाठवले होते. त्यानंतर एके दिवशी आपला मित्र चेर्टकोव्ह याला लिहिलेल्या पत्रात गांधींच्याविषयी ‘आपला व माझा अत्यंत जवळचा माणूस’ असा उल्लेख टॉल्स्टॉयनी केला आहे.

यात्स्नाया पोल्याना येथून टॉल्स्टॉयनी 25 एप्रिल(8 मे) 1910 रोजी गांधींना उत्तर पाठवले. त्यात ते लिहितात, ‘प्रिय मित्र, आपले पत्र व त्यासोबत पाठवलेले ‘इंडियन होरूल’ हे पुस्तक मिळाले. त्या पुस्तकात तुम्ही ज्या विषयांचा ऊहापोह केला आहे व जे प्रश्न उभे केले आहेत ते सगळे मी अगदी उत्सुकतेने वाचले. केवळ भारताच्या दृष्टीने नव्हे तर सर्व मानवतेच्या दृष्टीनेही त्यांपैकी ‘सविनय कायदेभंग’ हा विषय अत्यंत महत्वाचा आहे. ‘आपली पूर्वीची काही पत्रे माझ्या हाती आली नाहीत, पण मि.जे. टोक्कनी (टॉल्स्टॉयनी मि.डोकेंचा चुकून असा उल्लेख केला आहे) लिहिलेले आपले चरित्र वाचायला मिळाले. ते वाचल्यानंतर त्या न मिळालेल्या पत्रांत आपण काय लिहिले असावे, याचा मला अंदाज आला. माझी तब्येत आता ठीक नसल्यामुळे इतकेच म्हणेन की, आपल्या पुस्तकातील अत्यंत महत्वाचा विषय मी जाणतो. आपण हाती घेतलेल्या कामाविषयी मला जे वाटते ते लिहिणे अवघड आहे. माझी प्रकृती ठीक झाल्यावर मी त्यावर सविस्तर लिहीन. आपला परममित्र व बंधू लिओ टॉल्स्टॉय.’

टॉल्स्टॉयनी शुद्ध रशियन भाषेत हे पत्र लिहिलेले आहे. गांधींनी 21-24 कोर्ट चेंबर्स, रिस्सिक अँड अँडरसन रोड कॉर्नर, जोहानास्बर्ग येथून 15 ऑगस्ट 1910 रोजी टॉल्स्टॉयना तिसरे पत्र लिहिले. 8 मे रोजी टॉल्स्टॉयनी लिहिलेल्या पत्राची त्यात साभार पोच दिली व पुढे लिहिले की, ‘आपण पत्रात लिहिल्याप्रमाणे मी आपल्या सविस्तर अभिप्रायाची उत्सुकतेने वाट पाहात आहे.’ शिवाय त्यांनी व कॅलेनबॅकने ‘टॉल्स्टॉय फार्म’ची स्थापना केल्याचे या पत्रात कळवून ‘टॉल्स्टॉय फार्म’विषयी लवकरच आपल्याला कॅलेनबॅक सविस्तर पत्र लिहीलं.’ असे म्हटले. गांधींनी व कॅनेलबॅकनी लिहिलेली पत्रे, व त्यासोबत गांधींच्या ‘इंडियन ओपिनियन’ या साप्ताहिकाचे अंक वाचून टॉल्स्टॉयना गांधींच्याबद्दल मोठेच औत्सुक्य वाटू लागले. 6(19) सप्टेंबर 1910 रोजी टॉल्स्टॉय आपल्या रोजनिशीत लिहितात, ‘ट्रान्सवाल वसाहतीमधील ‘सविनय कायदेभंगाविषयी’ अत्यंत आनंदाची वार्ता समजली.’ त्यासमयी आत्यंतिक आध्यात्मिक खिन्नतेमुळे व आजारीपणामुळे टॉल्स्टॉय विव्हल झाले होते, तरीदेखील गांधींचे पत्र त्यांना ज्या दिवशी मिळाले त्याच दिवशी त्यांनी पत्रोत्तर पाठवले.

टॉल्स्टॉयनी 5 व 6 सप्टेंबरच्या रात्री (18 व 19) ते उत्तर सांगितले व दुसऱ्याकडून लिहून घेतले. दुसऱ्या दिवशी त्या पत्राच्या मसुद्यात थोडी दुरुस्ती करून व त्यावर सही करून, इंग्लिशमध्ये भाषांतर करण्यासाठी त्यांनी ते चेर्टकोव्हकडे पाठवले.  चेर्टकोव्हने टॉल्स्टॉय यांचे हे पत्र, आणि त्यात स्वत:चे एक पत्रही त्यासोबत गांधींच्याकडे पाठवले. त्यात तो लिहितो, ‘माझे मित्र टॉल्स्टॉय यांना आपले 15 ऑगस्टचे पत्र पोहोचले आहे. त्याची पोहोच देण्याविषयी मला त्यांनी सांगितले आहे. तसेच त्यांनी आपल्यासाठी 7 सप्टेंबर(20) रोजी रशियन भाषेत लिहिलेले पत्र इंग्लिशमध्ये भाषांतर करून आपल्याकडे पाठविण्यास मला सांगितले आहे. ‘मि.कॅलेनबॅकने लिहिलेले पत्र वाचून टॉल्स्टॉयना खूप आनंद झाला असून त्यांनी सांगितल्यावरून कॅलेनबॅक यांच्या पत्राची पोचही मी देत आहे. तुम्ही व तुमच्या सहकाऱ्यांनी जे काम हाती घेतले आहे त्याला टॉल्स्टॉयनी शुभेच्छा देऊन यशस्वी होण्यासाठी मन:पूर्वक सदिच्छा प्रदर्शित केल्या आहेत. रशियन भाषेतील त्यांच्या पत्राचे इंग्लिशमध्ये हे भाषांतर आहे, त्यावरून आपल्या कामाचे त्यांनी जे गुणवर्णन केले आहे त्याची प्रचिती येईल. इंग्लिश भाषांतर करताना त्यात काही चुका आढळल्या तर त्यासाठी मी दिलगीर आहे; परंतु मी इथे राहात असल्यामुळे, त्या दुरुस्तीसाठी इंग्रजी जाणणारा माणूस मिळणे शक्य नाही!

‘टॉल्स्टॉयनी लिहिलेले हे पत्र त्यांच्या परवानगीने लंडनमधील वृत्तपत्रात आमच्या मित्रातर्फे प्रसिद्ध करण्यात येईल. त्या वृत्तपत्राची एक प्रत, व ‘दि फ्री राज प्रेस’ या इंग्रजी वृत्तपत्रात टॉल्स्टॉय यांचे प्रसिद्ध झालेले लिखाण याची प्रतही आपणाकडे पाठविण्यात येईल. आपण चळवळ उभी केली आहे ती अधिकाधिक इंग्लिश लोकांना समजावी या हेतूने, टॉल्स्टॉय व माझ्या ग्लॅसगो येथील मिसेस मेयो या सहकारीला तुमच्याबरोबर पत्रव्यवहार करण्याविषयी पत्राने सुचवले आहे.’

चेर्टकोव्हने मि.कॅलेनबॅक यांनाही स्वतंत्र पत्र लिहिले. गांधींचा व टॉल्स्टॅाय यांचा जो पत्रव्यवहार झाला होता, त्यातील सर्वांत प्रदीर्घ असलेल्या, टॉल्स्टॉय यांच्या 7 सप्टेंबर(20) 1910च्या पत्राचे भाषांतर करून, ते गांधींकडे लंडनहून रवाना करण्याविषयी एका मध्यस्थाला सांगितले होते; परंतु तो मध्यंतरी आजारी पडला. नंतर त्याने ते पत्र 1 नोव्हेंबर रोजी गांधींच्याकडे पोस्टाने पाठवले. दुर्दैवाने काऊंट लिओ टॉल्स्टॉय यांच्या निधनानंतर कित्येक दिवसांनी ते गांधींना मिळाले.

टॉल्स्टॉयनी त्यात लिहिले होते; ‘जसजसे माझे वय वाढते आहे, आणि विशेषत: मी मृत्यूच्या अगदी समीप पोचल्याचे स्पष्टपणे जाणवते आहे, अशा वेळी माझ्या मनात अत्यंत महत्वाचा विचार तरळतो आहे. ज्याला ‘सविनय कायदेभंग’ म्हणतात तो विषय दुसरा तिसरा काही नसून, नीतिमत्तेचा दांभिक ऊहापोह न करता केवळ प्रेमाच्या शिकवणीचा आदर बाळगून वाटचाल करावी असे मला तीव्रतेने जाणवते आहे. सर्वांना ते सांगावे अशी माझी मनोकामना मला सांगते आहे.

‘ते प्रेम...म्हणजेच माणसाच्या जीवनात सर्वोच्च असलेला कायदा आहे; निरागस बालकात आपल्याला जो प्रकर्षाने जाणवतो, तोच प्रत्येक माणसाच्या आत्म्यात खोलवर रुजलेला आहे याची त्याला जाण येते किंवा ज्ञान होते. विश्वासाच्या खोट्या शिकवणीच्या जाळ्यातून तो बाहेर पडतो. त्यावेळी अंतर्यामीच्या कायद्याचा जाहीररित्या पुरस्कार केला जातो; -मग तो मनुष्य चिनी, हिब्रू, ग्रीक वा रोन -कुणीही असो!’ ‘ज्यावेळी प्रेमाचे बळजबरीत रूपांतर होते त्यावेळी जीवनात प्रत्यक्ष प्रेमाचा कायदाच शिल्लक राहात नाही. त्यावेळी कोणताच कायदा शिल्लक राहात नाही! जे काही शिल्लक राहते ती जबरदस्ती -जुलमी राजवट!! असले जीवन ख्रिश्चन नागरिक साऱ्या एकोणीसाव्या शतकात व्यतीत करीत आहेत.’

मृत्यूच्या उंबरठ्यावर ठाकलेला हा वृद्ध, एका तरुणाला हे आशयगर्भ पत्र लिहीत होता. गांधी तरुण होतेच, परंतु शारीरिक वयापेक्षा ते मनाने पंचवीस वर्षे तरुण होते. टॉल्स्टॉय मनस्वी दु:खी होते. ‘वॉर अँड पीस’च्या अंतरंगाची जाणीव असून देखील जो माणूस आपल्या सदसद्‌विवेक बुद्धीला नाकारतो, किंवा येशू ख्रिस्ताच्या शिकवणीतूनही ज्याला आनंदाची गुरुकिल्ली सापडत नाही, तो दु:खीच राहणार! गांधींची मात्र अशी ठाम समजूत होती की आपल्याप्रमाणेच इतरांचेही परिवर्तन आपण घडवून आणू शकू. त्या विचाराप्रमाणे ते कृती करत होते, त्याचा त्यांना आनंद होत असे!(अनुवाद : वि. रा. जोगळेकर) 

Tags: Sadhana Prakashan Mahatma Gandhi Tolstoy Louis Fischer Mahtma Gandhi: jivan ani karykal साधना प्रकाशन वि.रा.जोगळेकर टॉलस्टॉय टॉलस्टॉय आणि गांधी लुई फिशर महात्मा गांधी : जीवन आणि कार्यकाळ weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

लुई फिशर

(29 फेब्रुवारी 1896–15 जानेवारी 1970)  अमेरिकन पत्रकार, लेखक, व महात्मा गांधी व व्लादिमिर लेनिन यांचा चरित्रकार .


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके

कर्तव्य

सर्व पहा