डिजिटल अर्काईव्ह (2014-2019)

पोलादी पडदा : हिजाब, नकाब, बुरखा यांवर प्रकाशझोत

भारतातील विविधतेमुळे वरील कृती अधिक समस्याग्रस्त बनतात. येथील बहुसांस्कृतिक वातावरणात फेटे, नकाब, लुंगी, साडी, कफ्तान अशी कपड्यांची अमाप विविधता एका दृष्टिक्षेपात पाहायला मिळते. अशा परिस्थितीत नम्रतेबाबतचे नीतिनियम कोण ठरवणार? कोणता पोषाख स्त्रीला असुरक्षित बनवतो? भारतीय आधुनिकतेची व्याख्या करणारे कपडे कोणत्या धर्मात आहेत? भारतीय संस्कृतीतले विशिष्ट घटक सर्वसाधारण बनले आहेत आणि पाश्चिमात्य देशांनी आपल्याकडून घेतलेल्या काही कल्पना त्यांनी पुरेशा प्रमाणात स्वीकारल्या आहेत. योग, आयुर्वेद, तंत्र. आणि तुम्ही काय घेतलेत? पडद्याबाबत तर तसे म्हणता येणार नाही. जोपर्यंत पोशाखाचे ‘भारतीयत्व’ या संकल्पनेपासून त्यांची सोडवणूक करण्याचे प्रयत्न सक्रिय पातळीवर होत नाहीत, तोपर्यंत तर नाहीच नाही.

‘मुस्लिम एज्युकेशन सोसायटी’तर्फे चालविल्या जाणाऱ्या शिक्षण संस्थांच्या परिसरात महिला शिक्षिका, विद्यार्थी यांनी नकाब वापरण्यावर येत्या एक जूनपासून बंदी घालण्यात आली आहे. एम.ई.एस. ही एक पुरोगामी शिक्षणसंस्था असून अगदी जाणीवपूर्वक तिची स्थापना करण्यात आली आहे. एम.ई.एस. ही शिक्षणसंस्था मुस्लिम धर्मातील आर्थिक दृष्ट्या मागासलेल्यांना शिक्षण देण्याच्या एकमेव हेतूने स्थापन करण्यात आलेली आहे. परंतु अशा प्रकारचे पाऊल उचलून त्यांनी त्यांच्या मूळ विचारधारेला बगल दिलेली आहे, असे काही नाही; मग अशा अतिसामान्य बाबींवर आपण तरी आपला वेळ का खर्च करायचा? परंतु ज्यांच्या दृष्टीने हे पहिल्यांदाच घडत आहे, त्यांच्यावर या निर्णयाचा प्रभाव नक्की पडणार आहे. 

केरळ व तमिळनाडू या राज्यांमध्ये एमईएसच्या 152 संस्था आहेत. संस्थाप्रमुख पा फजल गफूर यांच्या म्हणण्यानुसार इथे एकूण 85 हजारांवर विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. आता आपण त्यांच्या नव्या परिपत्रकाचा गोषवारा घेऊ या. बुरख्याबरोबर संस्थेने जीन्स, मिनी स्कर्ट्‌स इत्यादी प्रकारातले कपडे घालण्यावरही बंदी घातली आहे. यातले बहुतेक निर्बंध स्त्रियांसाठीच आहेत. एकाही विद्यार्थिनीला यातून सवलत मिळणार नाही. गफूर भले म्हणोत की, नवे निर्बंध नीटनेटक्या पोशाखांची शिफारस करतात. मुख्य धारेतील समाजाच्या नजरेत जे-जे अश्लाघ्य आहे, त्या प्रत्येक गोष्टीवर एमईएसने बंदी घातली आहे, असा त्यांचा युक्तिवाद आहे. आपल्या म्हणण्याच्या पुष्ट्यर्थ त्यांनी बऱ्याच उदाहरणांचा वापर केला आहे. ते पाहून तुमच्यापैकी अनेक जण कपाळाला हात लावतील; पण निदान करता येणार नाही एवढी ही समस्या अवघड नाही. 

ज्याला गफूर मुख्य प्रवाहातील समाज म्हणत आहेत, तो आहे तरी कोणता? आपण असेही म्हणू शकतो, जिथे लोक पारंपरिक पोशाखात नसतात (जीन्स, लेगिन्स वापरणारे)- तो मुख्य धारेतील समाज. पण या यादीत हिजाबचा शिरकाव का झाला? पुरोगामित्व हे एक सोईस्कर साधन आहे. नीटनेटकेपणाच्या नावाखाली विद्यार्थिवर्गाला पुरेपूर गोंधळवून टाकण्यासाठी ते वापरले जाते. स्क्रोलडॉट.इन या संकेतस्थळावरील मुलाखतीत पत्रकारांनी प्रामुख्याने बुरखाबंदीवरच प्रश्न विचारले. त्याला गफूर यांनी दिलेली उत्तरेही नमुनेदार आहेत. 

गफूर यांनी दिलेली उत्तरे एखाद्या बुरसटलेल्या विचाराच्या प्रवक्त्याने दिलेल्या उत्तरांसारखी वाटली. त्यांना टीकेचा सूर खपला नाही. एमईएसने घेतलेल्या निर्णयाचे समर्थन करताना कोणतेही तर्कशुद्ध स्पष्टीकरण ते देऊ शकले नाहीत. गफूर पुढे जाऊन असेही म्हणतात- भारतातील मुस्लिम संस्कृतीच्या पुरस्कर्त्यांना येथील इस्लामचा खरा अन्वयार्थ माहीत नाही. गफूर यांच्याकडून हा अन्वयार्थ मिळण्याची अपेक्षा केल्यास, त्यावर ते भाष्य करीत नाहीत किंवा रागावून टाळतात. इथं गफूर ही समस्या नाही. मुस्लिम पुरोगामित्वाचे भारतातील व एकूणच जगातील जे गोंधळाचे वातावरण आहे, तीच लक्षणे गफूर यांच्या तर्कशास्त्रात आढळतात. जगभरातील मुस्लिम महिलांसाठी सुचविलेल्या आणि प्रतिबंधित केलेल्या पोशाखांविषयीच्या नियमांमध्येही हाच गोंधळ जाणवतो.

दुर्दैवी घटनांची मालिका : नुकत्याच झालेल्या ईस्टरपाठोपाठ श्रीलंकेत बॉम्बहल्ले झाले. श्रीलंकेत आधीच दीर्घ काळापासून राजकीय- सामाजिक जखम भळभळते आहे. त्या जखमेवर नव्याने मीठ चोळले गेले. सरकारी व बिगरसरकारी दहशतवाद हे दोन्ही परकीय नसताना, या विशिष्ट हल्ल्याचे विभाजनवादी स्वरूप विशेष लक्ष वेधून घेते. मात्र सरकारी प्रतिक्रियेने ताळतंत्र  सोडले. देशातील कित्येक सुप्रसिद्ध बुद्धिवंत हे मूलतत्त्ववादी बनलेले असून ते ‘इस्लामिक स्टेट्‌स ऑफ इराक ॲन्ड लेव्हंट’ला (आयएसआयएल) सामील आहेत, असे बोलण्यापर्यंत पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांची मजल गेली. 

परिस्थिती कशी बिघडत गेली याचा मागोवा आपण घेऊ शकतो; परंतु प्रतिबंधात्मक उपाय योजणे व ते कार्यान्वित करणे ही श्रीलंका सरकारसमोरची मोठी समस्या आहे. तिकडे हल्ले होण्याचा अवकाश की, सरकारने बुरखा वापरण्यावर बंदी आणली. परिणामतः राष्ट्रीय भावनांचा भडका उडाला. देशातील अहमदी मुसलमानांना आधीपासूनच विभक्तपणा व नैतिक अन्यायाला तोंड द्यावे लागत होते. 

श्रीलंकेतील बुरखाबंदीचा निर्णय व्यावहारिक वाटत असला, तरी या बंदीचे समर्थन करण्याइतपत प्रत्येक जण मूर्ख नव्हता. एका व्यापक व बहुस्तरीय समस्येसाठी बुरखा हा सोईस्कर बळीचा बकरा होता. इतकेच काय, पण इकडे भारतातील शिवसेनेसारख्या मूलतत्त्ववादी संघटनांनी ताबडतोब न्यायालयात दावा दाखल केला की, देशाची सुरक्षितता कमालीची धोक्यात आली असून येथील सरकारने वरीलप्रमाणे पावले उचलण्याबाबत आदेश द्यावा. 

बुरख्याचा धिक्कार करण्याची ही लाट भारत व श्रीलंकेपुरती मर्यादित नाही, त्या बाबतीत फ्रान्स पहिल्या क्रमांकावर आहे. अंगभर बुरख्यावर देशव्यापी बंदी घालणारा पहिला देश फ्रान्स. वर फ्रान्स सरकारने अशीही मखलाशी केली की, स्त्रियांवर त्याची सक्ती होत असून त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी ही बंदी आणली आहे. त्यानंतरच्या वर्षांमध्ये बेल्जियम, लॅटव्हिया, बल्गेरिया, ऑस्ट्रिया, डेन्मार्क, नॉर्वे, जर्मनी आणि स्वित्झर्लंडच्या काही भागांमध्ये हाच आदेश अमलात आला. चीनमधील मूळ रहिवासी मुसलमान युघर (Uighar) यांच्याशी चीनचे हाडवैर असल्याने त्यांना लांब दाढी ठेवणे व स्त्रियांनी बाहेर चेहऱ्यावरील पडदा वापरणे यावर बंदी घालण्यात आली.

प्रबुद्ध मनोवृत्ती : इस्लामोफोबियाची (इस्लामविषयी भीती, तिरस्कार) ही लाट संबंध पश्चिमेवर एखाद्या साथीच्या रोगाप्रमाणे पसरली आहे. त्यामागे अनेक कारणे आहेत. अहिंसक स्वरूपातल्या घटनांची वाढ होत आहे. इस्लाम धर्म वाचविण्यासाठी अस्तित्वात आलेल्या अतिरेकी संघटनांच्या वाढलेल्या कारवाया, आयएसआयएलचा उगम, स्थलांतरितांचे युरोपला भेडसावणारे संकट- ज्यात मुस्लिम स्थलांतरितांना बहिष्कृत केले जाते आणि स्वतःच्याच देशात मानवी हक्कांची पायमल्ली होते- उजव्या राष्ट्रवादी सरकारांचा उदय. जे अस्मितेच्या राजकारणाच्या लाटेवर आरूढ होतात, त्या-त्या देशांचा इतिहास व संदर्भ लक्षात घेता वरीलपैकी एक किंवा अधिक बाबी कारणीभूत आहेत. 

अमेरिकेत परधर्मद्वेष पराकोटीचा आहे हे खरे, पण अन्य पाश्चिमात्य राष्ट्रेही काही कमी नाहीत. फरक इतकाच की, आपापल्या देशातील ही भेदनीती व तणाव त्यांनी सर्वधर्मसमभाव आणि प्रबोधनाच्या नीटनेटक्या रुमालात गुंडाळून ठेवला आहे. या देशांमध्ये बुरखा, नकाब, हिजाब किंवा अन्य कुठलीही सांस्कृतिक प्रथा मावळताना दिसत असताना धार्मिक तत्त्वे, सर्वसामान्य सांस्कृतिक वारसा यांच्यामधील नेमका फरकही हरवत चालला आहे. रूढीवादी धार्मिक पुरुषसत्ताक समाजात किंवा ‘उदार’ प्रबुद्ध सरकारांच्या सत्तेतही बळी जातो तो स्त्रियांचाच! 

काही देशांमध्ये (सौदी अरेबिया, इराण, इंडोनेशिया) उजव्या विचारसरणीच्या व अधिकारशाहीच्या राजवटी निर्माण होतात. त्यांचा हल्ला थेट पोशाखावरच असतो. म्हणजे विशिष्ट पोषाख सक्तीचा केला जातो. याउलट, त्याच देशात आधुनिकतेची पालखी उचलणारे त्या पोशाखांवर बंदी घालतात. पश्चिमेकडे वाटेल ती किंमत मोजून इतक्या सहजासहजी ही बंधने कशी लादली जातात, या प्रश्नावर भर देऊन असंख्य लेख लिहिले गेले आहेत. स्थलांतरितांमध्येही असा पोषाख करणाऱ्या स्त्रियांची संख्याही अगणित आहे. 

हे प्रमाण फ्रान्समध्ये 2011 मध्ये एकूण लोकसंख्येच्या 0.003 टक्के, 2017 मध्ये ऑस्ट्रियन लोकसंख्येच्या 0.002 टक्के इतके- म्हणजे वरवर पाहतादेखील हे आकडे प्रचंड आहेत. (संख्यासूचीतील हे आकडे आहेत.) मुळात असे कायदे करून ते कठोरपणे अमलात आणणे हा मूर्खपणा आहे. सर्वधर्मसमभाव आणि औदार्याच्या नावावर हा सरकारी यंत्रणांचा दुरुपयोग आहे. 

परिणामतः अशा देशांमधील जनतेच्या मनाचा गोंधळ  उडालेला आहे. मुस्लिम स्त्रियांच्या सांस्कृतिक अभिव्यक्तीच्या हक्कांना पाठिंबा देण्यासाठी मुस्लिम व मुस्लिमेतर स्त्रिया रस्त्यावर उतरल्या. ज्या स्त्रिया प्रत्यक्षात धार्मिक तत्त्व पाळत नाहीत, त्यांनीसुद्धा या बंदीला जाब विचारण्यासाठी हिजाब, नकाब, बुरखा घालून रस्त्यावर विरोध प्रदर्शित केला. हे कपडे वापरावेत अथवा वापरू नये याच्याशी आध्यात्मिकता, सांस्कृतिक सोय, सांस्कृतिक ओळख, वारसा या कशाकशाचाही काडीमात्र संबंध नाही. ती एक व्यक्तिगत निवड असू शकते. म्हणूनच त्या विरोधात मोर्चे निघतात. 

थोडक्यात काय- सरकारी आदेश व्यक्तिस्वातंत्र्यावर चक्क हल्ला करणारे आहेत. पुरुषप्रधानता व जुनाट धार्मिक तत्त्वांना होणाऱ्या विरोधापेक्षा स्त्रियांच्या हक्कांवरील आक्रमण म्हणून त्याकडे पाहणे जास्त महत्त्वाचे आहे. अखेर इथे विजय कोणाचा झाला? समाजमाध्यमं, यंत्र आणि भांडवलशाही! 

जागतिक इन्स्टाग्रामवर प्रभुत्व असणाऱ्यांनी अगदी ठरवून फॅशनविषयी उदारपणे प्रचाराला सुरुवात केली. त्यांच्या अगदी अलीकडच्या पोषाखाच्या पद्धतीत बुरख्याचा स्वीकार केला गेला आणि ‘नायके’सारख्या ब्रँड्‌सनी नियमांना बगल देता यावी म्हणून बाजारात ‘बुरकिनी’ आणल्या. बुरखा- बंदीनंतर फ्रान्सच्या किनाऱ्यांवर फिरताना किती जणी बुरखा घालतात, ह्यावर नजर ठेवण्यास सुरुवात झाल्यानंतर उद्योजकांनी फॅशनच्या नावाखाली या बुरकिनी आणल्या. त्याला ‘मर्यादित (मॉडरेट) फॅशन’ असेही म्हणण्यात येऊ लागले. एका बाजूला व्यक्तिगत निवड आणि आत्म- अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य या दोन्हींसाठी ही धाडसी कल्पना आहे, तर दुसरीकडून ह्यावर टीकाही होते आणि ते योग्यही आहे. हिजाब म्हणजे दुसरे-तिसरे काही नसून जेथे शरीराचा वस्तूसारखा वापर केला जातो, अशा माध्यमाच्या सर्व प्रकारांमध्ये पुरुषांच्या नजरेला सुखावह वाटेल अशा रीतीने हिजाबची पुनर्रचना केली आहे. भले त्याला सद्‌भिरुचीचा पोशाख म्हणा किंवा अन्य काहीही. 

भारतीय पडदा : भारतही काही वेगळा नाही. पाकिस्तान, बांगलादेशसारख्या पांगळ्या देशांशी असलेल्या तणावपूर्ण संबंधांचा विचार करता त्यात मोठे तथ्य आहे. मोगल आक्रमक होते, हा प्रचलित समज असून तो निरपवाद आहे. भारतातील मुस्लिम राजकारण सातत्याने विभाजन आणि ओळख (आयडेन्टिटी) याभोवती फिरत असते. मुसलमान समाजाच्या ज्या गटात निर्विवाद मतपेढी तयार करण्याची क्षमता असते, त्यांच्याशी संबंध ठेवण्यास राजकीय पक्षांना रस असतो. देशादेशातील प्रतिबंधांचे स्वरूप बव्हंशी वेगवेगळे असू शकते. प्रबळ भावना अशी आहे की, बुरखा हा दडपणुकीचे प्रतीक असल्यामुळे तो असता कामा नये. इतकेच नव्हे, तर तो बहिष्कार व धिक्काराचेही प्रतीक आहे. बुरख्याआड सुरक्षिततेवरील संकटही दडलेले आहे. लोकांच्या हे फारसे लक्षात येत नाही. 

भारतीय प्रदेशात तत्त्वज्ञानाचे ध्रुवीकरण झालेले असले तरी त्याची सरमिसळही झालेली आहे. एकीकडे सर्वधर्मसम- भावाच्या व लिंगसमभावाच्या नावाखाली बंदी घालणारे तथाकथित शिक्षित, तर दुसरीकडे ‘नकाब’मुळे देशाची सुरक्षितता धोक्यात येते हे म्हणणारे परंपरावादी- अशी ही कोंडी आहे. भारतात ‘नम्रता’ नेहमीच ऐरणीवर असते. देशातील सर्व मुख्य धर्मांमध्ये हा एक अवघड विषय बनून राहिला आहे. बलात्कार, जातिबाह्य विवाहाबद्दलचा तिरस्कार, विशिष्ट धार्मिक प्रथा पाळण्याचा हक्क इत्यादी अतिसंवेदनशील विषयांबाबत स्त्रियांची नम्रता हा नेहमीच वादाचा विषय बनून राहिलेला आहे. केरळमधील नकाब-बंदी हेच सांगते. सांस्कृतिक अभिव्यक्ती नष्ट होईल असे विशिष्ट नियम जर विद्यार्थ्यांनी अंगीकारले, तर वर्तनातील सभ्यता सिद्ध करणारा एखादा पुरावा आढळतो? बहुतेक नाहीच. 

अगदी अंगभर पोषाख ल्यायलेली स्त्रीसुद्धा नारीद्वेष, छळ, बलात्काराचा बळी ठरणारच नाही असे छातीठोकपणे म्हणता येईल? पुराव्यादाखल आकडेवारी दाखविता येईल? अद्याप तरी तसे घडले नाही. दुसरे असे की, नकाब अंगावर सुंदर दिसत नाही का? शरीर उघडे पाडण्यापेक्षा तो ते पूर्ण झाकून टाकतो. गफूर म्हणतात, नकाबबंदी मुख्य प्रवाहाला अनुसरून आणि सरकारी आदेशानुसार आहे. ‘खरं तर बरे-वाईट यातली सीमारेषा अंधुक आहे.’ गफूर यांच्याच शब्दांत सांगायचे तर- ‘उत्तेजित’ करील अशा रीतीने साडीसुद्धा नेसली जाते.  भारतातील विविधतेमुळे वरील कृती अधिक समस्याग्रस्त बनतात. येथील बहुसांस्कृतिक वातावरणात फेटे, नकाब, लुंगी, साडी, कफ्तान अशी कपड्यांची अमाप विविधता एका दृष्टिक्षेपात पाहायला मिळते. अशा परिस्थितीत नम्रतेबाबतचे नीतिनियम कोण ठरवणार? कोणता पोषाख स्त्रीला असुरक्षित बनवतो? भारतीय आधुनिकतेची व्याख्या करणारे कपडे कोणत्या धर्मात आहेत? 

भारतीय संस्कृतीतले विशिष्ट घटक सर्वसाधारण बनले आहेत आणि पाश्चिमात्य देशांनी आपल्याकडून घेतलेल्या काही कल्पना त्यांनी पुरेशा प्रमाणात स्वीकारल्या आहेत. योग, आयुर्वेद, तंत्र. आणि तुम्ही काय घेतलेत? पडद्याबाबत तर तसे म्हणता येणार नाही. जोपर्यंत पोशाखाचे ‘भारतीयत्व’ या संकल्पनेपासून त्यांची सोडवणूक करण्याचे प्रयत्न सक्रिय पातळीवर होत नाहीत, तोपर्यंत तर नाहीच नाही. मुस्लिमांचे सर्वसाधारण स्थलांतर आणि भारतीय मुस्लिम यात गफूर एक मजेशीर वेगळेपण दाखवतात. 

गफूर म्हणतात की, आपल्याकडच्या पोशाखात अधिक आधुनिकता आहे. तसेच अरबी आक्रमणामुळे हे पोषाख आपल्याला येथे दिसत आहेत. म्हणून आपण त्याला विरोध केलाच पाहिजे. हिंदुत्वाचे पाठीराखे आणि आक्रमकांच्या आरोळ्यांमध्ये भयावह साम्य आहे. मूलनिवासी मुस्लिम आणि आक्रमक यांत काय फरक आहे? भारतीय मुस्लिम कोणते नियम पाळतात? या फरकाचा विचार करता, एकूणच विभाजकरेखा अतिशय धूसर झालेल्या नाहीत काय? भारतीय मुस्लिम स्त्रीची अवस्था अतिशय भयावह आहे. त्यांच्या परदेशी भगिनी प्रतिकारासाठी निदान पुढे तरी येतात. रस्त्यावर एकमेकींना भक्कम पाठिंबा देतात. मुस्लिमेतर स्त्रियांकडूनही त्यांना पाठिंबा मिळतो. 

भारतीय मुस्लिम स्त्रीच्या समस्या अधिक गुंतागुंतीच्या आहेत. ती व्यक्तिगत पातळीवर बंदिवान आहे; इतकेच नव्हे, तर तिला जातीय कर्तव्यबंधही आहेत. तिची स्वतःची ओळख पुसून टाकणाऱ्या पुरुषप्रधानतेने लादलेल्या नियमांचे ओझे ती शतकांपासून वाहते आहे. अशा स्थितीत अन्य समाजातील लोकही जेव्हा तिच्याकडे चक्क संशयाने पाहतात, तेव्हा ती आपले दुःख कोणाला सांगणार? भारतातील मुस्लिम समाजातील समस्यांच्या प्रचंड पसाऱ्यात तिचे दुःख किरकोळच नाही का वाटणार? स्वतःला प्रगतिशील म्हणणारे मुसलमान तिचे हे सांस्कृतिक संचित खच्ची करत असताना ती नियमांमध्ये अधिकच जखडली जात आहे. दुर्दैवाने मुस्लिम महिलेच्या संदर्भातील मुद्दा मागे पडलेला आहे. हे सर्व कायदे अगदी जगभरात आणि इथेही त्यांच्याच इस्लामविषयीच्या धर्मश्रेष्ठत्वाच्या सामूहिक वेडाच्या आधाराने मूळ भाव आणि प्रतिनिधित्वावर केवळ हल्ला करीत आहेत. या पोशाखांचा अर्थ बदलला आहे आणि काळानुसार तो बदलतच राहील. अन्य कुठलाही सांस्कृतिक वारशाच्या बाबतीत हे घडतच असते. 

प्रतीकांमागे दडलेल्या दुष्टपणाऐवजी प्रतीकांवर घाव घातल्याने काहीही भरीव हाती न लागता शत्रुत्व वाढतच राहील. त्या दुष्टचक्रात आपण मात्र भरकटत राहू. म्हणूनच आपण जे उपाय योजतो ते मुस्लिम राजकारण, ओळख (आयडेन्टिटी) आणि व्यापक प्रश्नांच्या दृष्टीने उपयुक्त आहेत का, याचा विचार करण्याची हीच वेळ आहे. 

अनुवाद - हिरा जनार्दन, मुलुंड 

Tags: Hijab Burakha manav kambali weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

मानव काबंळी,  वसई, महाराष्ट्र
manav306@gmail.com

लेखक, अनुवादक 


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके

कर्तव्य

सर्व पहा