डिजिटल अर्काईव्ह (2014-2019)

माझ्या माहितीतील क्वचितच एखाद्या व्यक्तीच्या बाह्य वर्तणुकीत आणि अंतरंगात भारतीय संस्कृती व भारतीय सभ्यता इतक्या सहजतेने आणि निःस्वार्थीपणे भिनलेली होती. आपल्या जीवनात आणि आपल्या कार्यात त्यांनी उत्तर व दक्षिणेतील सभ्यतांचा, पारंपारिक लोककलांचा व अभिजात कलांचा, तसेच लोकप्रिय आणि विद्वत्तापूर्ण कृतींचा उत्कृष्ट मिलाफ घडवून आणला. केसरबाई केरकर यांच्या संगीताविषयी ज्या सहजतेने ते बोलत, त्याच सहजतेने ते मोहम्मद रफींच्या संगीताविषयी बोलू शकत होते. अशाचप्रकारे, बालसरस्वतींच्या नृत्याविषयी ज्या सहजतेने ते बोलत, त्याच सहजतेने ते फराह खान यांच्या नृत्याविषयी बोलू शकत होते. ज्या सहजतेने ते बसवेश्वरांच्या नैतिकतेच्या तत्त्वज्ञानाविषयी बोलू शकत होते, अगदी त्याच सहजतेने ते डॉ.बाबासाहेब आंबेडकरांविषयी बोलू शकत होते. शेक्सपियरविषयी जितक्या खोलात जाऊन ते बोलत, अगदी त्याचप्रकारे ते फिलिप लार्किन यांच्याविषयीदेखील बोलू शकत.

मागील आठवड्यात बेंगळुरूमधील आपल्या राहत्या घरी निद्रावस्थेतच गिरीश कार्नाड यांचे निधन झाले. कार्नाड म्हणजे एक असामान्य व्यक्तिमत्त्व होते. त्यांच्या कारकिर्दीकडे पाहिल्यास त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे मुखत्वे चार प्रमुख आयाम नमूद करता येतील. या चारही क्षेत्रांत त्यांनी उत्कृष्ट कामगिरी केली. कदाचित स्वातंत्र्योत्तर भारतातील ते सर्वाधिक प्रभावशाली नाटककार होते. विषय आणि कालसापेक्षतेच्या दृष्टीने त्यांच्या नाट्यसंहितांची व्याप्ती अतिशय व्यापक होती. त्यांनी अतिउत्कृष्ट अशी जवळपास अर्धा डझन नाटके लिहिली. यामध्ये राजकीय भाष्य करणाऱ्या ‘तुघलक’, सामाजिक सुधारणांवर भाष्य करणाऱ्या ‘तलेदंड’ आणि उपरोधिकपणे गडद विडंबन करणाऱ्या ‘वडकलू बिंब’ या नाटकांचा समावेश करता येईल. (ही सर्व नाटके अगोदर कन्नड भाषेमध्ये लिहिली गेली होती, नंतर भारतीय राज्यघटनेच्या आठव्या अनुसूचीमध्ये नमूद केलेल्या जवळपास सर्वच भाषांमध्ये सादर केली गेली.)

ते उत्तम नाटककार असण्याबरोबरच एक उत्कृष्ट अभिनेता होते. त्यांच्या अभिनयाची झलक श्याम बेनेगल यांनी केलेल्या सुरुवातीच्या हिंदी चित्रपटांबरोवरच पट्टाभीरामा रेड्डी यांच्या ‘संस्कार’ या अभिजात कन्नड चित्रपटामधून दिसली होती. त्याचबरोबर ते उत्कृष्ट दिग्दर्शकदेखील होते. के.व्ही. पुटप्पा आणि एस.एल. भैरप्पा यांच्या प्रमुख कादंबऱ्याचे त्यांनी चित्रपटांत रूपांतरण केले. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा चौथा प्रमुख आयाम म्हणजे ते उत्तम प्रशासक होते. पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे (एफ.टी.आय.आय.) प्रमुख असताना त्यांनी नसिरुद्दीन शाह, ओम पुरी आणि टॉम अल्टर या कलाकारांची कारकीर्द घडवण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्याचबरोबर, नवी दिल्लीतील संगीत नाटक अकादमी आणि लंडनमधील नेहरू सांस्कृतिक केंद्राचे प्रशासक म्हणूनदेखील त्यांनी उत्तम कामगिरी बजावली.

एकदा मी बेंगळुरू ते मुंबई असा विमान प्रवास करत असताना, कार्नाड त्याच विमानात माझ्यापुढे काही रांगा सोडून बसले होते. त्यांच्या आसनाच्या बाजूने जात असताना सहजच माझे लक्ष गेले, तर त्यांच्या पुढ्यात कागदांचा एक संच मला दिसला. त्याविषयी विचारणा केल्यावर त्यांनी मला सांगितले की, त्यांच्या नवीन नाटकाच्या मराठी अनुवादाची प्रत ते तपासत आहेत. हे ऐकल्यावर कार्नाडांविषयी मला असलेला आदर अधिक द्विगणित झाला. कारण माझ्यासमोर एक अशी व्यक्ती होती ज्याची मातृभाषा कोकणी होती, जो आपले लेखन कन्नड भाषेत करत होता, त्याचबरोबर उत्कृष्ट इंग्रजी बोलू शकत होता आणि मराठीदेखील उत्तमपणे जाणत होता!

पण विविध भाषांवरील प्रभुत्व ही एकच बाब गिरीश कार्नाडांना इतर लेखक आणि कलाकारांच्यापेक्षा वेगळी ठरवत नव्हती. माझ्या माहितीतील क्वचितच एखाद्या व्यक्तीच्या बाह्य वर्तणुकीत आणि अंतरंगात भारतीय संस्कृती व भारतीय सभ्यता इतक्या सहजतेने आणि निःस्वार्थीपणे भिनलेली होती. आपल्या जीवनात आणि आपल्या कार्यात त्यांनी उत्तर व दक्षिणेतील सभ्यतांचा, पारंपारिक लोककलांचा व अभिजात कलांचा, तसेच लोकप्रिय आणि विद्वत्तापूर्ण कृतींचा उत्कृष्ट मिलाफ घडवून आणला. केसरबाई केरकर यांच्या संगीताविषयी ज्या सहजतेने ते बोलत, त्याच सहजतेने ते मोहम्मद रफींच्या संगीताविषयी बोलू शकत होते. अशाचप्रकारे, बालसरस्वतींच्या नृत्याविषयी ज्या सहजतेने ते बोलत, त्याच सहजतेने ते फराह खान यांच्या नृत्याविषयी बोलू शकत होते. ज्या सहजतेने ते बसवेश्वरांच्या नैतिकतेच्या तत्त्वज्ञानाविषयी बोलू शकत होते, अगदी त्याच सहजतेने ते डॉ.बाबासाहेब आंबेडकरांविषयी बोलू शकत होते. शेक्सपियरविषयी जितक्या खोलात जाऊन ते बोलत, अगदी त्याचप्रकारे ते फिलिप लार्किन यांच्याविषयीदेखील बोलू शकत.

गौरी लंकेश यांची सप्टेंबर 2017 मध्ये हत्या झाल्यानंतर अशा अफवा पसरल्या गेल्या की, यानंतर आता गिरीश कार्नाडांचे नाव हिटलिस्टवर आहे. मी राहतो ते ठिकाण कार्नाडांच्या निवासस्थानापासून तासाभराच्या अंतरावर आहे. एरवी त्यांची व्यस्तता मला ठाऊक असल्यामुळे, त्यांच्या भेटीसाठी काही दिवस अगोदरच मी  त्यांना ई-मेलवर विचारणा केली असती. परंतु या सर्व घडामोडींमुळे मी त्या दिवशी सकाळी त्यांना फोन केला आणि त्याच दुपारी मी त्यांना भेटू शकतो का असे विचारले. मी भावनेच्या भरात केलेल्या फोनचे कार्नाडांनी स्वागतच केले आणि मला त्यांच्या निवासस्थानी भेटीसाठी बोलावले. दुपारच्या वेळी निर्जन भासणाऱ्या शहराच्या भागातून प्रवास करून जेपी नगरमधील कार्नाडांच्या निवासस्थानी पोहोचलो. तिथे त्यांच्या ‘सुरक्षेसाठी’ नेमलेला रक्षक खुर्चीवर बसून वामकुक्षी घेत होता. माझी कार दारात येऊन थांबताच तो ताडकन्‌ उठला आणि मला आत घेऊन गेला.

मी कार्नाडांबरोबर अर्धा तास गप्पा मारण्याच्या उद्देशाने आलो होतो. पण तेथे जवळपास चार तास थांबलो. आम्ही गौरी लंकेशसंबंधी चर्चा तर केलीच, शिवाय इतरही अनेक मुद्यांवर चर्चा केली. त्यात आमच्या दोघांच्या जीवनाने घेतलेल्या विविध वळणांच्याविषयी संभाषण झाले. मी त्यांना धारवाडमधील बालपणीच्या आठवणींविषयी बोलते केले, तर त्यांनी मला माझ्या डेहराडूनच्या बालपणीच्या आठवणींविषयी बोलते केले. आम्ही दोघांनी लहान शहरांमधून मोठ्या महानगरात स्थलांतर केले होते. त्यांनी मुंबईत तर मी दिल्लीमध्ये. त्यानंतर आम्ही दोघे बेंगळुरूमध्ये येऊन स्थायिक झालो. त्या बैठकीत आम्ही आमच्या भावंडांविषयीही चर्चा केली. त्यांचा भाऊ संगीतकार होता; तर माझी बहीण डॉक्टर होती. थोडक्यात आम्ही त्या सर्व गोष्टींविषयी गप्पा मारल्या, ज्या एरवी आमच्या साहित्यिक आणि बौद्धिक संभाषणांच्या दरम्यान सहसा येत नसत.

सांजवेळ होताच मी निघायला तयार झालो तेव्हा गिरीश मला निरोप देण्यासाठी माझ्याबरोबर कारपर्यंत आले. त्यावेळी त्यांच्या सुरक्षेसाठी नेमलेला रक्षक कुठेच दिसत नव्हता. माझ्या अनपेक्षित भेटीसाठी त्यांनी माझे आभार मानले आणि हेदेखील नमूद केले की, भेट घेण्याविषयीची विचारणा करणारा माझा फोन येताच फक्त त्यांनीच नाही तर, त्यांच्या डॉक्टर पत्नी- सरस यांनीदेखील माझ्या भेटीचे स्वागतच केले होते. यावर मी उत्तरलो की, ‘मला वाटतंय की, एकाच शहरात राहणाऱ्या दोन लेखकांना एकमेकांना भेटण्याची गरज त्यांच्या सहकारी लेखकाच्या हत्येनंतरच वाटू लागली आहे की काय!’

या भेटीदरम्यानच कार्नाड श्वसनाच्या विकाराने ग्रस्त असल्याकारणाने खूप आजारी भासत होते. त्यानंतरच्या जानेवारीमध्ये त्यांनी आपल्या मूळ शहराला म्हणजेच धारवाडला भेट देण्याचा निर्णय घेतला. ज्या शहरात ते लहानाचे मोठे झाले, शिक्षण घेतले आणि सुरुवातीची नाटके लिहिली, त्या शहराला त्यांची ही शेवटची भेट असणार आहे, याची कदाचित त्यांना कल्पना होती. त्यांनी मला कळवले की, ‘या भेटीदरम्यान तुम्ही माझ्यासोबत यायलाच हवे.’ मी माझा होकार कळवला आणि त्यामुळेच त्यांच्यासोबत मूळ शहराला अंतिम भेट देण्याची दुर्मिळ परंतु तितकीच दुःखद संधी अनुभवण्याचे भाग्य मला लाभले.

धारवाडच्या सुभाष रोडवरील लक्ष्मी इमारतीच्या पायऱ्या कार्नाडांसोबत चढून फार सुरुवातीपासून त्यांचे प्रकाशक राहिलेल्या ‘मनोहरा ग्रंथमाला’च्या ऑफिसमध्ये अंतिम वेळी डोकावण्याचा हृदयद्रावक क्षणदेखील मी अनुभवला. कार्नाडांची सामाजिक जाणीव अतिशय प्रगल्भ होती, आपल्या देशावर त्यांचे नितांत प्रेम होते. तरीसुद्धा त्यांनी कधीच सामाजिक चळवळीतील आपली सक्रियता किंवा देशावरील आपले प्रेम मिरवणे पसंत केले नाही. किंबहुना असे करणे त्यांच्या तत्त्वात आणि सभ्यतेत बसत नव्हते. ‘मृत्यूनंतर माझ्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येऊ नयेत’, असे त्यांनी आपल्या मृत्यूपत्रात नमूद केले होते.

एक महान कानडी लेखकच नाही तर त्यांच्या काळातील सर्वांत महान कानडी व्यक्ती असलेल्या कार्नाडांना हेच टाळायचे असावे की, कोणीही फुटकळ राजकारणी त्यांच्या पार्थिवाशेजारी छायाचित्र काढून त्यांच्या स्मृतीबरोबर स्वतःला जोडून आपल्या कृष्णकृत्यांवर पांघरुन टाकू इच्छील. आणि त्यामुळेच कार्नाडांना संधिसाधू व कट्टरतावादी शक्तींना धैर्याने तोंड देणारा सामाजिक चळवळीतील कार्यकर्ता किंवा सामाजिक विचारवंत म्हणून पाहणे मोठे धाडसाचे अथवा त्यांच्या कर्तृत्वाला खुजे करणारे ठरेल. याउलट आपण त्यांना एक महान नाटककार आणि उत्तम अभिनेता तसेच एक अतिशय सभ्य गृहस्थ (ज्यास आजघडीला भारतीय संस्कृतीचे रक्षक म्हणवणाऱ्यांपेक्षा कैकपट अधिक माहिती भारतीय संस्कृती विषयी होती) म्हणून पाहणे जास्त योग्य ठरेल.

 (अनुवाद : साजिद इनामदार)

Tags: kalparwa ramchandra guha kanadi writer gauri lankesh murder obituary article girish karnad dharwad धारवाड रामचंद्र गुहा कालपरवा कानडी लेखक गौरी लंकेश हत्या मृत्युपर लेख गिरीश कार्नाड weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

रामचंद्र गुहा,  बंगळुरू, कर्नाटक

भारतीय इतिहासकार व लेखक. त्यांनी पर्यावरणावर, सामाजिक, राजकीय व समकालीन विषयांवर आणि क्रिकेटच्या इतिहासावर लेखन केले आहे 


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके

कर्तव्य

सर्व पहा