डिजिटल अर्काईव्ह (2014-2019)

क्रूरकर्म्याचे प्रेरणास्रोत आणि त्याची आवाहनं

ब्रेविकने तयार केलेल्या पंधराशे पानांतल्या शंभरहून अधिक पानांत हिंदूंविषयी आणि भारताविषयी संदर्भ आहेत. त्याने याविषयीच्या प्रकरणाखाली जे संदर्भ दिले आहेत, त्यांत बहुतांशी हिंदुत्ववादी लेखकांचे संदर्भ आहेत. त्याने मिळवलेलं ज्ञान एकतर्फी आहे. त्यात संशोधनाची शिस्त, पुरावे चोहोबाजूंनी आणि परखडपणे तपासणं- अशा भानगडी नाहीत. सावरकरांच्या ‘सहा सोनेरी पानां’च्या इंग्रजी भाषांतराचा उल्लेख ब्रेविकाच्या ग्रंथसूचीमध्ये आहे. ब्रेविक म्हणतो : भारतातल्या काँग्रेस आघाडीच्या शासनाने मुस्लिमांचा अनुनय केला; तसंच इथल्या गोरगरीब आणि दलित जनतेला फसवून, भीती घालून धर्मांतर करवणाऱ्या ख्रिश्चन मिशनऱ्यांचाही अनुनय केला. इथल्या कम्युनिस्टांना तर हिंदूंच्या श्रद्धा आणि संस्कृती यांचा पूर्ण नायनाट करायचा आहे. हिंदूंवर जो अन्याय होतो आहे, तो इथले हिंदुत्ववादी सहन करत नाहीत. जेव्हा परिस्थिती हाताबाहेर जाते, तेव्हा हे हिंदू दंगली घडवून आणतात आणि मुस्लिमांवर हल्ले करतात.

दि.15 मार्च 2019 रोजी एका बंदूकधारी माणसाने न्यूझीलंडमधल्या ख्राइस्ट चर्च शहरातल्या दोन मशिदींसमोर जाऊन बेछूट गोळीबार केला. त्यात पन्नास जण मारले गेले आणि काही जखमी झाले. ब्रेंटन हॅरिसन टारंट हा 28 वर्षांचा ऑस्ट्रेलियन तरुण संशयित हल्लेखोर म्हणून पोलिसांसमोर आला आहे. हे हल्ले करण्यामागे त्याचे काय हेतू होते, असा प्रश्न स्वाभाविकपणे निर्माण होतो. गोळीबार करण्यापूर्वी आपण 74 पानांचं एक निवेदन केल्याचं टारंट म्हणतो. काही काळ हे निवेदन आंतरजालावर होतं; पण नंतर ते तिथे दिसेनासं झालं. 

टारंटच्या मनात काय चाललं होतं याचा अंदाज त्या निवेदनावरून करता येतो. युरोपमधल्या अनेक देशांप्रमाणे इथेही निर्वासितांचे लोंढे येतील, ते इथल्या भूमीवर ठाण मांडून बसतील; आपापल्या देशात परत जाणार नाहीत, स्थानिक लोकांच्या जागा ते पटकावून बसतील- असं भय टारंटच्या मनात आहे. या स्थलांतरितांना टारंट ‘आक्रमक’ म्हणतो. जोवर गोरा माणूस इथे आहे तोवर त्याची जागा दुसरा कोणी पटकावू शकणार नाही, हे दाखवून देण्यासाठी हा हल्ला करण्याचा मानस त्याच्या तथाकथित जाहीरनाम्यातून दिसतो. अर्थातच, त्यात पुन्हा त्याचा रोख मुस्लिमांवर आहे. युरोपमधल्या अनेक देशांत उजव्या राजकीय शक्तींचा जोर वाढताना दिसतो आहे, त्यामागे मूलतः ही भीती आहे. डोनाल्ड ट्रंप गोऱ्या माणसांची अस्मिता पुन्हा एकदा प्रस्थापित करू पाहत आहेत, त्यामुळे आपला त्यांना पाठिंबा आहे; पण त्यांचं धोरण आणि नेतृत्व आपल्याला पसंत नाही, असं टारंटने लिहिलं आहे. 

‘ब्रिटिश युनियन ऑफ फॅसिस्ट’ या नावाचा पक्ष 1930 च्या दशकात चालवणाऱ्या ओस्वाल्ड मोस्ले नावाच्या एका नेत्याला टारंट ‘प्रेरणादायी व्यक्ती’ मानतो. डायलान रूफ नावाचा मारेकरी ही टारंटची आणखी एक ‘प्रेरणादायी व्यक्ती’. या 21 वर्षांच्या तरुणाने 2015 मध्ये अमेरिकेतल्या दक्षिण कॅरोलिना राज्यातल्या एका चर्चवर हल्ला करून तिथल्या नऊ काळ्या व्यक्तींची गोळ्या झाडून हत्या केली होती. न्यायालयाने याबद्दल पुढे त्याला मृत्युदंडाची शिक्षा दिली. रूफ हा गोऱ्यांच्या वर्चस्वाचा पुरस्कर्ता होता. या गोऱ्या कातडीच्या हिंसाचारी पुरस्कर्त्यांमध्ये एक सिद्धांत प्रिय आहे. तो म्हणजे- हळूहळू मध्यपूर्वेतली व आफ्रिका खंडातली जनता मोठ्या प्रमाणावर युरोपमध्ये स्थलांतर करील आणि त्यामुळे युरोपमधला लोकसंख्येचा समतोल बिघडेल. गोऱ्या ख्रिश्चनांची तिथल्या एकूण समाजजीवनावर असलेली पकड ढिली होऊन त्यांच्याऐवजी गोरेतर माणसं (आणि त्यातही मुस्लिम) तिथल्या समाजजीवनाचा कब्जा करतील; त्यामुळे त्यांच्यापासून गोऱ्यांना धोका आहे. जणू काही हा व्यापक आंतरराष्ट्रीय कट असल्याची भावना अशा वर्णवर्चस्ववादी व्यक्ती आणि संघटना सगळीकडे पसरवत असतात. 

युद्धं झाल्याने, दुष्काळाने किंवा रोजगार न मिळाल्याने जे काही स्थलांतरितांचे लोंढे युरोपमध्ये येताना दिसतात, त्यामुळे असले विचार जनतेत लोकप्रिय होतात. इथेही सर्वांचा मुख्य रोख इस्लामी व्यक्तींवर असतो. आपल्याला सर्वांत महत्त्वाची प्रेरणा नॉर्वेतल्या अँडर्स ब्रेविक या माणसाकडून मिळाली, असं टारंटचं म्हणणं आहे. नॉर्वेमध्ये 2011 मध्ये अँडर्स ब्रेविकने बेछूट गोळीबार करून 77 जणांचे जीव घेतले होते. आपण अगदी थोडा काळ ब्रेविकच्या संपर्कात होतो, असं टारंटने म्हटलं आहे. नॉर्वेत 2011 मध्ये बाँबस्फोट आणि गोळीबार केल्यानंतर तिथल्या तुरुंगात ब्रेविक 21 वर्षांची शिक्षा भोगत पडला आहे. त्याचा इतर कैद्यांशी संपर्क होऊ दिला जात नाही. त्यामुळे तो सांगतो ते खरं आहे की नाही; तो ब्रेविकच्या संपर्कात खरंच आला होता की नाही, हे स्पष्ट होत नाही. 

न्यूझीलंडमध्ये गोळीबार करण्यापूर्वी टारंटने तयार केलेल्या 74 पानी निवेदनात (जे काही काळ नेटवर उपलब्ध होतं) ब्रेविकचे अनेक संदर्भ आहेत. टारंट आणि ब्रेविक दोघंही गोऱ्या कातडीचे आणि गोऱ्या माणसांचं वर्चस्व मानणारे. दोघे पक्के इस्लामद्वेष्टे. पण दोघांची लक्ष्यं वेगळी आहेत. टारंटने गोळीबार केला तो ख्राइस्टचर्च शहरातल्या दोन मशिदींवर. त्याला बळी पडलेले मुस्लिम होते. त्याउलट ब्रेविकने 2011 मध्ये जो गोळीबार केला, तो नॉर्वेमधल्या लेबर पक्षाच्या एका तरुणांच्या कॅम्पवर. आणि (डाव्या) लेबर पक्षावर त्याचा एवढा रोष का? ब्रेविकचा रोष मुस्लिमांपेक्षा ‘सांस्कृतिक मार्क्सवाद्यां’वर आणि एकूणच सांस्कृतिक बहुविधता मानणाऱ्या मंडळींवर अधिक होता. ही रेंज मोठी आहे. स्थूलमानाने आपण ज्यांचं वर्णन ‘पुरोगामी’ या शब्दात करतो, ते सगळे यात मोडतात. 

ब्रेविकने 2011 मध्ये नॉर्वेमध्ये जे भीषण हत्याकांड केलं, त्यापूर्वी नऊ वर्षं तो आपली भूमिका तयार करत होता. त्यातून सुमारे 1500 पानांचा एक जाहीरनामा आंतरजालावर त्याने प्रसिद्ध केला. जगातल्या अनेक विचारसरणी, त्या त्या विचारसरणी मानणारे विद्वान आणि राजकारणी यांचे विपुल उल्लेख त्यात आहेत. एखाद्या कसलेल्या राजकारण्याप्रमाणे ब्रेविकने आपले शत्रू कोण आणि मित्र कोण, याचा ऊहापोह त्यात केला आहे. या विवेचनाचा भारताशी संबंध काय, असा प्रश्न कोणी विचारू शकेल. ब्रेविकने आपल्या संघटनेला जस्टिसिअर नाईट्‌स (Justiciar Knights) असं नाव दिलं असून, ही मंडळी स्वतःला युरोपच्या भूमिपुत्रांचे रक्षणकर्ते समजतात. तिथल्या भूमिपुत्रांना- म्हणजे गोऱ्या कातडीच्या युरोपियनांना न्याय मिळवून दिला पाहिजे, असं ते मानतात. 

त्यांच्या या तथाकथित न्यायाचा अर्थ इतकाच की- युरोपमध्ये त्यांच्या मते जे ‘सांस्कृतिक हत्याकांड’ सुरू आहे, त्याचा शेवट होईपर्यंत त्याला जबाबदार जे कोणी असतील त्यांच्याबरोबर लढा द्यायचा. हा लढा अर्थातच सशस्त्र असेल, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. या जबाबदार घटकांमध्ये त्यांनी इस्लाम आणि पुरोगामी या दोन्ही शत्रूंचा प्रामुख्याने अंतर्भाव केला आहे.  भारतातल्या राष्ट्रवाद्यांच्या आणि त्यातही पुन्हा ‘सनातन धर्मा’च्या ज्या चळवळी सुरू आहेत, त्यांना ब्रेविकने आपला पाठिंबा दर्शवला आहे. भारतातल्या राष्ट्रवाद्यांना आपला लष्करी पाठिंबा असेल, असं ब्रेविकचा जाहीरनामा म्हणतो. भारतात अंतर्गत संघर्ष व्हावा आणि भारतातून मुस्लिमांना हाकलून दिलं जावं, अशी ब्रेविकची इच्छा आहे. पण तो इथेच थांबत नाही. भारतातल्या पुरोगाम्यांना आपला विरोध असून युरोपप्रमाणे भारतातही त्यांनी राष्ट्रवाद्यांचा छळ केला आहे, अशी हाकाटी तो पिटतो. बहुसांस्कृतिकता मानणारी युरोपमधली सर्व शासनं उलथून पडली पाहिजेत, अशी ब्रेविकची इच्छा आहे. 

एकंदरीतच बहुसांस्कृतिकतेला ब्रेविकचा विरोध आहे. इस्लाम-पेक्षाही पुरोगाम्यांना त्याने पहिलं लक्ष्य केलं आहे. ब्रेविकने तयार केलेल्या पंधराशे पानांतल्या शंभरहून अधिक पानांत हिंदूंविषयी आणि भारताविषयी संदर्भ आहेत. त्याने याविषयीच्या प्रकरणाखाली जे संदर्भ दिले आहेत, त्यांत बहुतांशी हिंदुत्ववादी लेखकांचे संदर्भ आहेत. त्याने मिळवलेलं ज्ञान एकतर्फी आहे. त्यात संशोधनाची शिस्त, पुरावे चोहोबाजूंनी आणि परखडपणे तपासणं- अशा भानगडी नाहीत. सावरकरांच्या ‘सहा सोनेरी पानां’च्या इंग्रजी भाषांतराचा उल्लेख ब्रेविकाच्या ग्रंथसूचीमध्ये आहे. 

ब्रेविक म्हणतो : भारतातल्या काँग्रेस आघाडीच्या शासनाने मुस्लिमांचा अनुनय केला; तसंच इथल्या गोरगरीब आणि दलित जनतेला फसवून, भीती घालून धर्मांतर करवणाऱ्या ख्रिश्चन मिशनऱ्यांचाही अनुनय केला. इथल्या कम्युनिस्टांना तर हिंदूंच्या श्रद्धा आणि संस्कृती यांचा पूर्ण नायनाट करायचा आहे. हिंदूंवर जो अन्याय होतो आहे, तो इथले हिंदुत्ववादी सहन करत नाहीत. जेव्हा परिस्थिती हाताबाहेर जाते, तेव्हा हे हिंदू दंगली घडवून आणतात आणि मुस्लिमांवर हल्ले करतात. पण ब्रेविकच्या मते, अशा तऱ्हेने मुस्लिमांना लक्ष्य करणं चुकीचं आहे; कारण अशा कृती कालांतराने आपल्यावरच उलटू लागतात. त्याऐवजी इथल्या राष्ट्रवाद्यांनी अधिक प्रखर राष्ट्रद्रोही अशा पुरोगाम्यांशी  भिडलं पाहिजे आणि त्यांची सत्ता उलथून टाकली पाहिजे. (यातला ‘राष्ट्रद्रोही’ हा शब्द आता आपल्या चांगलाच परिचयाचा झाला आहे. जेएनयू, अर्बन नक्षल अशी प्रकरणं समोर आणली, तर आपल्या विद्यमान शासनाने या दिशेने ब्रेविकला हवी तशी प्रगती केली आहे. आताच्या निवडणुकीच्या प्रचारात मोदी विरोधकांचा संबंध पाकिस्तानशी सतत जोडू पाहत आहेत, हेसुद्धा ब्रेविकच्या विचारांना समांतर जाणारं आहे.) 

युरोप व भारत यांच्यामधल्या अशा ‘प्रतिकाराच्या चळवळीं’नी याबाबतीत एकमेकांपासून शिकण्यासारखं बरंच काही आहे. आपल्याला जी लक्ष्यं अंतिमत: गाठायची आहेत, ती जवळजवळ सारखीच आहेत, असं ब्रेविक म्हणतो. माहिती मिळवण्यासाठी ब्रेविकने भारतीय जनता पक्ष, रा.स्व.संघ, अभाविप या संघटनांच्या विविध
वेबसाइट्‌सचा विपुल वापर आपल्या 1500 पानांच्या लेखनात केला आहे. इस्रायलमधले ज्यू, भारतातले राष्ट्रवादी हिंदू, चीनमधले बौद्ध गट या सर्वांची एकत्र मोट बांधून इस्लामला विरोध हे ब्रेविकच्या विवेचनामधलं एक महत्त्वाचं सूत्र आहे.

*एका माथेफिरू माणसाचे विचार असं म्हणून ब्रेविक किंवा समविचारी व्यक्तींकडे दुर्लक्ष करणं सहज शक्य आहे. आणि त्याच्या स्वतःच्या कारणांसाठी संघपरिवार या सर्वांकडे दुर्लक्ष करताना आपल्याला दिसतो. याला अपवाद दोन. तो म्हणजे भाजपचे खासदार बी.पी. सिंघल. त्यांच्या मते ब्रेविकच्या कल्पना चुकीच्या नाहीत; पण त्यासाठी त्याने अनुसरलेले मार्ग चुकीचे आहेत. ब्रेविकच्या कोणत्या कल्पना बरोबर आहेत याचा खुलासा सिंघल महाशयांनी केलेला नाही. दुसरी प्रतिक्रिया रा.स्व.संघाचे राम माधव यांची. या विषयावर त्यांनी एक ब्लॉग लिहिला आहे. त्यात ते म्हणतात : अटलांटिक सागराच्या दोन्ही बाजूंच्या पारंपरिक लेखकांची अवतरणं ब्रेविकने त्याच्या तथाकथित ‘जाहीरनाम्या’त दिली आहेत. त्या सर्वातली समान सूत्रं एकत्र करून त्यांचा भारतातल्या राष्ट्रवाद्यांशी किंवा हिंदुत्ववाद्यांशी संबंध लगोलग जोडणं, हा हेतुतः केलेला प्रचार आहे. ब्रेविकचे विचार आणि कृती यांचा निषेध करताना त्याच्या हेतुतः ‘प्रचार करण्या’वर राम माधव राग धरतात, ब्रेविकच्या अमानुष कृत्यांची निंदा करतात; पण आपल्या ब्लॉगमध्ये याविषयी मतं मांडताना सगळीकडे ते पुरोगाम्यांवर घसरतात आणि ब्रेविकसारख्या दहशतवाद्याने मांडलेल्या विचारांना अभिप्रेत पुरोगाम्यांच्या दिशेने ते शरसंधान करतात, यात काहीच आश्चर्य नाही. खरा प्रश्न असा की- ब्रेविकसारखा दहशतवादी इतर सगळे ‘परिवार’ सोडून संघ परिवारावर कशामुळे फिदा झाला आहे? आणि खाणाखुणा करून तो हिंदू राष्ट्रवाद्यांना आपल्या बाजूला यायला आवाहन का करतो आहे? दोघांच्या आचार-विचारांत काही साम्य असल्याशिवाय हे शक्य नाही. (आणि साध्वी प्रज्ञाला भोपाळमधून निवडणुकीसाठी उभं करून जो उद्योग आरंभला आहे, त्यात आपण काही शांततावादी नाही याचा पुन्हा एकदा स्पष्ट संकेत दिला आहे.) 

जगात चाललेल्या घडामोडींकडे जर आपण बारीक लक्ष दिलं तर लक्षात येतं की, असं करणारा ब्रेविक हा एकटा नाही. श्रीलंकेमधली बीबीएस (बोदू बल सेना) ही सिंहली बौद्धांची राष्ट्रवादी संघटना. या संघटनेचा जन्म 2012 मध्ये झाला. ग्नानसार हा तिचा नेता. विशेषतः मुस्लिमांचा द्वेष करण्याबद्दल ही संघटना प्रसिद्ध आहे. श्रीलंकेला कडव्या इस्लामचा धोका आहे, असं तिचं म्हणणं आहे. अतिरेकी बौद्धांकडून ख्रिश्चन आणि मुस्लिमांवर 2013 पासून तिथे वाढत्या प्रमाणात हल्ले होत आहेत आणि त्यांमागे बीबीएसचा हात आहे, असं म्हटलं जातं. अर्थातच बीबीएसने याचा इन्कार केला आहे. आता आपण आंतरराष्ट्रीय स्तरावर मोर्चेबांधणी केली पाहिजे, असं ग्नानसारने कोलंबोमध्ये 2014 मध्ये एका परिषदेत म्हटलं होतं. भारतातल्या रा.स्व.संघाशी उच्च पातळीवर आपली बोलणी सुरू आहेत आणि त्यामधून हिंदू व बौद्ध यांच्यात काही युती निर्माण होईल, असंही ग्नानसार यांनी 2014 मध्ये सांगितलं होतं. बौद्ध आणि हिंदू मिळून या प्रदेशात शांतताक्षेत्र निर्माण करतील, असं त्यांनी पुढे म्हटलं होतं. हे ‘शांतता क्षेत्र’ म्हणजे काय असेल याचा अंदाज आपल्याला त्यांच्या आचार- विचारांवरून येऊ शकतो. जेव्हा 2013 मध्ये श्रीलंकेत मुस्लिमांवर हल्ले सुरू होते तेव्हा- बीबीएसने समोर आणलेल्या मुद्यांचा आपण सहानुभूतीपूर्वक विचार केला  पाहिजे, असं राम माधवनी- जे तेव्हा रा.स्व. संघाचे त्या वेळचे प्रवक्ते होते- त्यांच्या ‘संवाद’ नावाच्या पत्रिकेत लिहिलं होतं. अशी काही आंतरराष्ट्रीय आघाडी होते की नाही, हे समजायला मार्ग नाही; पण अशा विचारांशी सुसंगत मांडणी संघपरिवारात सुरू आहे.

मुस्लिम आक्रमक या देशात येण्याअगोदरच बौद्ध धर्माच्या ऱ्हासास सुरुवात झाली, हे खरे; परंतु या धर्माचे अस्तित्वच भारतातून नाहीसे झाले ते मुख्यत्वे मुस्लिम आक्रमकांच्या हिंसेमुळे. याचे दाखले लोकसत्तेमध्ये नोव्हेंबर 2017 मध्ये परिवारातल्या एका अधिकारी व्यक्तीने लिहिलेल्या लेखात दिले होते. लेखात सर्वत्र पंडित नेहरू आणि त्यांचे ‘मतलबी विचारवंत’ यांच्यावर टीका आहे. एकूणात ब्रेविक नावाच्या नॉर्वेजियन मारेकऱ्याने सांस्कृतिक मार्क्सवाद/ सांस्कृतिक बहुविधता/ ‘आंतरराष्ट्रवाद’ अशी शब्दरचना वापरून वस्तुतः पुरोगाम्यांविरुद्ध जो गहजब केला आहे, त्याच्याशी समांतर जाणारी विचारसरणी संघपरिवारात कशी काम करते याचं हे उत्कृष्ट उदाहरण आहे. दुसरीकडे बौद्ध आणि मुस्लिम यांच्यात दरी निर्माण करून बौद्धांना आपल्या बाजूला घेण्याचा हा उपद्‌व्याप आहे. ‘बोदू बल सेने’सारख्या हिंसाचारी संघटनेला आवडेल अशीच ही विचारसरणी आहे. गोविंद पानसरे, दाभोलकर, कलबुर्गी, गौरी लंकेश या सर्वांच्या हत्या करण्यात आजवर पकडले गेलेले सर्व संशयित या ना त्या प्रकारे जहाल हिंदुत्ववादी संघटनांशी संबंधित आहेत, हा योगायोग नाही. त्या संघटनांवर अधिकृतरीत्या परिवाराचा शिक्का नसला तरी त्यांचे विचार हिंदुत्ववाद्यांपेक्षा वेगळे नाहीत. अशा संघटनांच्या विचारात आणि वंशवादी-वर्णवादी विचारांत एक कुलसाम्य असतं. त्यांच्या विचारांच्या रेषा बऱ्याच प्रमाणात एक दिशा दाखवत असतात. विद्वेषाचे जे धोकादायक सुरुंग ब्रेविकसारख्या मारेकऱ्यांच्या मनामध्ये पेरलेले असतात तसलेच- पण देशी ब्रँडचे सुरुंग अशा हिंसक संघटनांच्या विचारांत सापडतात. 

ब्रेविकने ज्या पुरोगाम्यांना शत्रुस्थानी मानलंय त्यात पानसरे, दाभोलकर, कलबुर्गी आणि गौरी लंकेश हे सगळे विचारवंत सहजपणे बसतात. (यांतली एकही व्यक्ती मुस्लिम नाही.) संघ परिवारातली प्रत्येक व्यक्ती हिंसाचारी आहे, असं सांगण्याचा इथे हेतू नाही. पण जगात इतरत्र द्वेषावर आधारित हिंसक कृत्यं करणाऱ्यांमागे जे धोकादायक विचार असतात; त्यातले काही मुख्य पॅटर्न आपल्याला हिंदुत्वाच्या आचार-विचारांत दिसतात. वंश, धर्म, काळी-गोरी कातडी यांच्या साह्याने सतत फूट पाडत युद्धं खेळत राहायची, की स्थलांतरितांसकट सर्वांना सामावून घेणाऱ्या सहजीवनाचा आपण अंगीकार करायचा- हा आज अब्ज मोलाचा प्रश्न आहे. तो जागतिक आहे. मुद्दा निव्वळ अमुक पक्ष विरुद्ध तमुक पक्ष असा नाही. 

ब्रेविकसारख्या क्रूरकर्म्याच्या विषारी आणि वंशवादी जागतिक प्लॅनिंगमध्ये कल्पनेच्या भराऱ्या भरपूर आहेत. पण तो प्लॅन आखताना आपल्या मायदेशातला कोणी पक्ष किंवा त्याच्या आजूबाजूचा परिवार त्याला भावी भागीदार म्हणून आठवावा, ही गोष्ट चिंताजनक आहे. संघ परिवाराने अशा मारेकऱ्याकडे पाठ फिरवून ‘इदं न मम’ म्हटलं तरी, असले मारेकरी आणि संघ परिवार यांच्यातली साम्यस्थळं दिसल्यावाचून राहत नाहीत. न्यूझीलंडच्या पंतप्रधान जेसिंडा अर्डनेर यांनी या हल्ल्याचा कठोर शब्दांत निषेध केला. इतकंच नव्हे तर, ‘‘या हल्ल्यात जे मरण पावले आणि जखमी झाले, तेही ‘आम्हीच’ आहोत. ते आपल्या स्थलांतरित समुदायाचे भाग आहेत’’ असं म्हणून जो संयम व परिपक्वता दाखवली, त्याने त्या अधिक उंचीवर गेल्या आणि दहशतगर्दी करणारे त्यांच्यापुढे अगदीच पिग्मी दिसायला लागले. हा विचार आम्ही आणि ‘ते’ (ते म्हणजे स्वधर्मीय सोडून बाकीचे सगळे) असा भेद करणाऱ्या विचारापेक्षा पूर्णतः वेगळा आणि विरोधी आहे. सांस्कृतिक बहुविधता मानणाऱ्यांचा आणि सर्वांना सामावून घेणाऱ्यांचा आहे. अस्मितांचे पोकळ लढे लढणाऱ्या आणि दहशतगर्दी करणाऱ्यांना तो पटणारा नाही. 

आज जग झपाट्याने बदलतंय. हा बदल आक्रमक हिंदुत्ववादीच नव्हे तर अल कायदा, तालिबान, जैशे महंमद, इस्लामी दहशतवादी, ज्यू झायनवादी, ब्रेविक आणि टारंट यांसारख्या अमानुष व्यक्ती, डोनाल्ड ट्रंप, हिंसक बौद्ध मूलतत्त्ववादी अशा मंडळींच्या एकूण आवाक्याच्या पलीकडचा आहे. विविध संस्कृतींची सरमिसळ सुरू आहे. पुढेही होत राहणार आहे. मात्र कुबट अंधारात बसून डोळ्यांवर कातडं ओढून घेतलं, तर यातलं काहीच दिसणार नाही. 
 

Tags: anders breivik अशोक राजवाडे हिंदुत्ववाद अँडर्स ब्रेविक weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

अशोक राजवाडे,  मुंबई, महाराष्ट्र
ashokrajwade@gmail.com


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके

कर्तव्य

सर्व पहा