डिजिटल अर्काईव्ह (2014-2019)

इंग्रजीमध्ये माझा आदर्श नाटककार विल्यम टेनिसी तर मराठीमध्ये विजय तेंडुलकर होते. आता त्याच्या जोडीला आणखी एक नाव आलं ते गिरीश कार्नाडांचं. नाटक ही निर्मिती तर आहेच, पण अतिशय बंदिस्तपणे करण्याची कारागिरीही आहे. कलात्मक निर्मितीबरोबर ही बंदिस्त कारागिरी ज्याला जमते तोच थोर नाटककार होऊ शकतो. अशी माझी थोर नाटककारांबद्दल जी व्याख्या तयार झाली आहे, ती या तीन श्रेष्ठ नाटककारांमुळे. त्यानंतर कार्नांडांचे ‘ययाती’ नाटक वाचनात आलं. त्याआधी वि.स. खांडेकरांच्या ययाती कादंबरीमुळे एक भारावलेपण होतं. पण या नाटकाच्या वाचनाने हे भारावलेपण ओसरलं आणि कलाकृती ही केवळ जीवनाचे मर्म नाही तर व्यवस्थारचनेचा अर्थही सांगत असते. त्या अर्थाने प्रत्येक कलाकृती ही व्यवस्था बदलणारी राजकीय कृती असते. याचं भान कार्नाडांच्या या नाटकानं मला दिलं.

माझ्यापुरता मी मूळचा मराठीच आहे. जन्माने, भाषेने आणि जगण्यानेही. परंतु माझे आई वडील आणि त्यांचे पूर्वज कानडी भाषिक. कन्नड प्रांतातून आलेले. त्यामुळे घरात उंबऱ्याआड का होईना कानडी भाषेचा वावर आणि मराठी संस्कृतीबरोबर कानडी संस्कृतीची लुडबूडदेखील. पण त्यामुळे कधी मी प्रभावित झालो असं मला जाणवत नाही. पण पुढे वाचनाची आवड लागल्यावर मराठी भाषेच्या पल्याडचं साहित्य वाचू लागलो. अर्थात मराठी भाषेचे भिंग वापरूनच. त्यातून द.रा. बेंद्रे. शिवराम कारंथ, कुवेंपू, महादेव देवनूर, यु.आर. अनंतमूर्ती अशांसारखी कन्नड रत्ने वाचनात येऊ लागली आणि कानडीबद्दल आपलेपणा कधी वाटू लागला हे कळलेच नाही. कदाचित याला घरातले कानडी वातावरण आणि लिंगायत परंपराही पोषक ठरली असावी.

कारंथांनी झपाटून टाकलंच होतं. पण अनंतमूर्तींनी थरकापून सोडलं होतं. शब्द आणि साहित्य यांची स्फोटकता काय असू शकते हे मला मराठी तुकोबानंतर कानडी साहित्यानेच प्रकर्षाने जाणवून दिलं. ‘घटश्राद्ध’ आणि ‘संस्कारम्‌’ या माझ्या अतीव आवडीच्या आणि नित्य चिंतनाच्या कादंबऱ्या ठरल्या. यातच कधी तरी ‘संस्कारम्‌’ ही फिल्म बघायला मिळाली. कादंबरीची उंची नक्कीच तिला नसणार अशी मनाशी पक्की खात्री होती. पण चित्रपट हे माध्यम नीट वापरले तर ते कोणत्या उंचीला नेऊ शकते याचे भान याच सिनेमानं दिलं. या चित्रपटाच्या नायकाची भूमिका केलेल्या नटाने माझे लक्ष विशेष खेचून घेतलं. त्या नटाचं नाव होतं गिरीश कार्नाड. पुढे असंही कळलं की चित्रपटाचे पटकथा आणि संवाद हे गिरीश कार्नांडांनीच लिहिले आहेत.

‘मृच्छकटिक’ आणि ‘चारूदत्त वसंतसेना’ या अनुक्रमे शुद्रक व भास या संस्कृत नाटकांवर आधारित त्यांनी ‘उत्सव’ हा हिंदी सिनेमा केला, त्यातून आताच्या वर्तमानाला त्यांनी सातव्या शतकातील संदर्भ वापरून क्रांतीची मूळ राजकीय-सामाजिक पण सार्वकालिक वैश्विक तत्त्वे विलक्षण कलात्मकरित्या मांडली आणि मग कार्नाड हे माझ्यासाठी आणखीच आकर्षणाचं कारण ठरलं.

ते लेखक आहेत, नाटककार आहेत, दिग्दर्शक व नटही आहेत हे सारंच माझ्यासाठी अद्‌भुत होतं. कारण असा बहुआयामी कलाकार मला फक्त चार्ली चाप्लीन या नावानेच माहिती होता. कार्नाडांच्या रूपाने माझ्या मर्यादित आकलनाला एक विस्तारित आकाश लाभू लागलं. नंतर मग या लेखकाची नाटके मराठीमध्ये उपलब्ध आहेत आणि रंगमंचितही केली जात आहेत असंही कळलं. त्यांचं पहिलं नाटक मी पाहिलं ते म्हणजे, ‘तुघलक’. मराठीचे आमच्या काळातले (सुपरस्टार अरुण सरनाईक त्या नाटकात मुख्य म्हणजे तुघलकाचा) रोल करत होते. सरनाईकांचा उत्कृष्ट नैसर्गिक अभिनय आणि भाषांतरित का होईना, पण टोकदार संदर्भ आणि विचारांनी संपृक्त असे संवाद. वर्तमान राजकारणावरती इतिहासातील व्यक्तिरेखा वापरून केलेले सूक्ष्म भाष्य.

या साऱ्यानेच कार्नाडांबद्दल माझ्या मनात एक विशेष आदराचं स्थान निर्माण झालं. इंग्रजीमध्ये माझा आदर्श नाटककार विल्यम टेनिसी तर मराठीमध्ये विजय तेंडुलकर होते. आता त्याच्या जोडीला आणखी एक नाव आलं ते गिरीश कार्नाडांचं. नाटक ही निर्मिती तर आहेच, पण अतिशय बंदिस्तपणे करण्याचे कारागिरीही आहे. कलात्मक निर्मितीबरोबर ही बंदिस्त कारागिरी ज्याला जमते तोच थोर नाटककार होऊ शकतो. अशी माझी थोर नाटककारांबद्दल जी व्याख्या तयार झाली आहे, ती या तीन श्रेष्ठ नाटककारांमुळे. त्यानंतर कार्नांडांचे ‘ययाती’ नाटक वाचनात आलं. त्याआधी वि.स. खांडेकरांच्या ययाती कादंबरीमुळे एक भारावलेपण होतं. पण या नाटकाच्या वाचनाने हे भारावलेपण ओसरलं आणि कलाकृती ही केवळ जीवनाचे मर्म नाही तर व्यवस्थारचनेचा अर्थही सांगत असते. त्या अर्थाने प्रत्येक कलाकृती ही व्यवस्था बदलणारी राजकीय कृती असते. याचं भान कार्नाडांच्या या नाटकानं मला दिलं.

विजया मेहतांनी बसवलेलं ‘हयवदन’ पाहिलं आणि ज्या ऐतिहासिक आणि पौराणिक किंवा लोककथात्मक मिथकांचा अफलातून वापर करून सामाजिक, राजकीय  नाटक लिहिणारा एक कानडी नव्हे तर आंतरराष्ट्रीय नाटककार अशी त्यांची प्रतिमा माझ्या मनात दृढ झाली. मग आपल्या जवळच राहणाऱ्या या थोर नाटककाराला भेटण्याची इच्छाही तयार झाली. तो योग आला सांगली जिल्ह्यातील वाळवा येथे क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांच्या पुढाकाराने भरलेल्या दलित आदिवासी ग्रामीण साहित्य संमेलनात. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात कविवर्य नारायण सुर्वे योग्यता असतानाही अध्यक्षपदाच्या निवडणुकीत पराभूत झाले. म्हणून आण्णांनी पुढाकार घेऊन, अखिल भारतीयला समांतर हे साहित्य संमेलन भरवले होते. या संमेलनाचे अध्यक्षपद नारायण सुर्वेंना बहाल केले हेाते.

गिरीश कार्नाड या संमेलनाचे उद्‌घाटक होते. आदल्या दिवशीच कार्नाड वाळव्यात मुक्कामाला होते. अनेक कार्यकर्त्यांशी जाजमावर बसून मराठीत छान गप्पा चालल्या होत्या. कार्यकर्त्यांच्या व्यक्तिगत आयुष्यापासून ते शेतकऱ्यांच्या शेतीप्रश्नापर्यंत सारे काही समजून घेण्याचा कार्नांडांचा उत्साह बघण्यासारखा होता. नागनाथ-अण्णांच्या कारखान्याबद्दल आणि त्यांच्या इतिहासाबद्दल ते बरेच काही ऐकून होते. त्याचीही ते खातरजमा करून घेत होते. एकूणच त्यांच्या बोलण्यातून त्यांच्यातल्या लेखकामध्ये दडून असलेल्या कुतूहलाची स्पष्ट जाणीव होत होती. बोलता-बोलता ते कोपरखळ्याही मारत वातावरणात हलकेपणा आणत होते. एकूणच आपण एका आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या कलाकाराशी बोलतो आहोत, याचं दडपण कार्यकर्त्यांच्या मनावरून केव्हाच उडून गेलं होतं. दुसऱ्या दिवशी उद्‌घाटन समारंभात अस्सखलित मराठीत गिरीश कार्नाडांनी पाऊण तास भाषण केलं. तेही विद्वत्‌जड नव्हे, तर आपल्यासमोर बसलेला सगळा श्रोतावर्ग हा बहुतांश ग्रामीण भागातून आलेला आहे, याचं भान ठेवून! तेवढ्याच सहज साध्या शब्दांत ते साहित्य निर्मितीदेखील शेती करण्यासारखीच एक प्रक्रिया आहे हे समजावून सांगत होते.

त्या संपूर्ण व्याख्यानातील त्यांचं एक वाक्य आज इतक्या वर्षांनंतरही मला लख्खपणे आठवतंय. ‘‘लोककथा ही जेव्हा स्वयंपाक घरात असते तेव्हा ती केवळ कथा असते. तिला भूतकाळ आणि भविष्यकाळ नसतो. एखादी राणी आवडती का किंवा नावडती का? याला विशेष असं उत्तर नसतं. पण जेव्हा ही कथा समाजात येते, तेव्हा मात्र तिला सर्व कार्यकारणभाव आणि तर्कशास्त्र जोडलं जातं, त्या कथेला महाकाव्याचा दर्जा देण्याचा प्रयत्न केला जातो.’’ भारतीय महाकाव्यांचं इतकं साधं सरळ सोपं आणि तरीही अर्थगर्भ विश्लेषण क्वचितच माझ्या वाचण्यात व ऐकण्यात आहे. गिरीश कार्नाडांचं बोलणं जितकं साधं तरीही विचारांनी संपृक्त, तसंच त्यांचं वागणंही साधं पण भारदस्त आणि प्रभाव टाकणारं होतं.  

उद्‌घाटनाचं भाषण संपल्यानंतर मंचावरून ते खाली उतरले आणि खुर्चीवर नव्हे तर खाली बसलेल्या प्रेक्षकांच्या मांडीला मांडी लावून बसले. त्या संध्याकाळी जेवताना गप्पा मारताना मी कार्नाडांना विचारलं, ‘‘सर, तुमच्या ‘हयवदन’ या नाटकात तुम्ही शरीरश्रम आणि बौद्धिक श्रम हे भारतीय पारंपरिक ब्राह्मणी संकल्पनेतून मांडले आहेत, असं तुम्हाला वाटत नाही का?’’ किंचित हसत ते म्हणाले, ‘‘नाही. उलट आपल्याकडे शरीरश्रम आणि बौद्धिक श्रम यांना वेगळे मानून त्यांची परंपरेने जी फारकत केली गेली आहे, त्यामुळे आपल्या समाजाला दुभंगलेपण आले आहे. त्याचा परिणाम म्हणून आपले जगणे केविलवाणे झाले आहे.’’ गिरीशजींचं हे उत्तर मला त्यावेळी कितपत कळलं हे नाही आठवत, पण मी पुढे मात्र यावर काही प्रतिवाद करू शकलो नव्हतो. आणि आता त्यांचं म्हणणं किती अचूक आहे हे पावलोपावली जाणवत आहे.

पुढे गिरीशजी कानडीबरोबरच हिंदी नाट्य आणि चित्रपट सृष्टीमध्ये गुंतून गेले. कानडीमधेच अभिनयाबरोबर त्यांनी दिग्दर्शित केलेले ‘कोणे एके काळी’, ‘जंगल’, ‘वंशवृक्ष’ या चित्रपटांनी आंतरराष्ट्रीय मान्यता मिळवली. हिंदीमधील ‘स्वामी’तल्या अभिनयाने त्यांनी व्यावसायिक सिनेमातही आपले स्थान निश्चित केले. मराठीमध्ये ‘सूत्रधार’ आणि ‘उंबरठा’मधल्याही त्यांच्या भूमिका गाजल्या. हे चालू असतानाच त्यांचे नाट्यप्रेमही अजिबात ओसरले नव्हते. उलट अधिकाधिक विचक्षक आणि राजकीयदृष्ट्या प्रगल्भ होत चालले होते. मध्ये त्यांना भारतातला अत्यंत सन्मानाचा मानला जाणारा ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला. त्यांना मी अभिनंदनाचा फोन केला. तेव्हा त्यांनी अत्यंत नम्रपणे सांगितले, ‘‘या पुरस्काराचे खरे मानकरी माझे मित्र तुमच्या मराठीत लिहिणारे महान नाटककार विजय तेंडुलकर आहेत, पण ज्ञानपीठ समितीने माझी निवड का केली, हे मला खरेच अजून कळलेले नाही.’’ वाळव्यात भेटलेले कार्नाड आणि त्यानंतर पंधरावीस वर्षांनी भेटलेले कार्नाड यांच्यातला तो अतीव उंचीचा थोर कलावंत भूमीवरच विनम्र होता.

अलीकडे मी त्यांचे ‘अग्निवर्षा’ नाटक पाहिले होते. एका विशिष्ट शैलीतील कार्नाडांची नाटके पाहून थेट सामाजिक अंगाने लिहिलेले हे त्यांचे नाटक मला अजिबात भावले नाही. मी तसे त्यांना फोनवर म्हणालो, ‘‘सर, तुम्ही पौराणिक, ऐतिहासिक आणि लोककथेची मिथके ज्या प्रभावीपणे वापरता, तसे तुम्हाला थेट सामाजिक कथानक हाताळणे नाही जमत. ती ताकद आमच्या विजय तेंडुलकरांची होती.’’ कार्नाड फोनवरसुद्धा गालातल्या गालात हसले असणार. कारण ती त्यांची शैली होती. ते म्हणाले, ‘‘मला नाही वाटत. बऱ्याच वेळा होतं काय? तुम्ही वाचक किंवा प्रेक्षक लेखकाच्या आशयापेक्षा त्याच्या शैलीच्या प्रेमात जास्त पडता. त्याच्या शैलीला, त्याचा लेखकपणा मानला जातो. जरी तो त्याचा व्यक्तिगत गुण असला तरी, साहित्य आशयामुळे श्रेष्ठ ठरते, याचे भान वाचक आणि प्रेक्षकांनी सोडता कामा नये. नाही तर तुम्ही मंडळीच लेखकाला साचेबंद करून टाकता.’’

काही दिवसांपूर्वी शहरी नक्षलवादी म्हणून काही विचारवंत कार्यकर्त्या लेखकांना अटका झाल्या. संपूर्ण देशभर याविरुद्ध निषेधाचा सूर निघाला. तब्येत खूप खालावली असतानाही गिरीशजी बेंगलोरच्या एका कार्यकर्मात गळ्यात ‘होय, मी शहरी नक्षलवादी आहे’ अशी पाटी अडकवून हजर राहिले. आपल्या भाषणांमधून, नाटकामधून व प्रत्येक सार्वजनिक कृतीतून गिरीशजींनी नेहमी अशी कुठल्याही परिणामाची पर्वा न करता क्रांतिकारी भूमिका निभावली आहे. मी गिरीशजींना फोन केला, ‘‘सर, आता तुम्हांला विश्रांतीची गरज असताना तुम्ही हा ताण कशाला घेताय?’’ गिरीशजींनी एकाच वाक्यात उत्तर दिले, ‘‘मी जर गप्प राहिलो तर माझ्या लेखक असण्याला अर्थ नाही.’’ गिरीशजींच्या या एका उत्तराने लेखकाचे उत्तरदायित्व अधोरेखित झाले.

आणि आज पहाटे एकदम त्यांच्या मृत्यूचीच बातमी फेसबुकवर वाचायला मिळाली. क्षणभर त्यांच्याबरोबर काढलेला काही काळ, वेळोवेळी फोनवर केलेल्या गप्पा सारे आठवून गेले. न राहवून चंपांना (चंद्रशेखर पाटील कन्नडमधले आणखी एक थोर विद्रोही लेखक) फोन केला. ‘‘गिरीशजींना अलीकडे शेवटी कधी भेटलात?’’ चंपांचा आवाज थोडा रूद्ध झालेला. उत्तरले, ‘‘गिरीश कार्नाड कधी मरत नाही राजाभाऊ. ही व्यवस्था त्याला सारखं मारायचा प्रयत्न करते. आणि तो पुन्हा पुन्हा जिवंत होत राहतो.’’ चंपा म्हणाले ते खरंच आहे. मानवी देह नाशवंत आहे. गिरीश कार्नाड हा एक न मरणारा चिरंजीव विचार आहे.

Tags: राजा शिरगुप्पे मृत्युपर लेख गिरीश कार्नाड urban naxal raja shirguppe obituary article girish karnad weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

राजा शिरगुप्पे,  आजरा, जि.कोल्हापूर, महाराष्ट्र

लेखक 


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके

कर्तव्य

सर्व पहा