डिजिटल अर्काईव्ह (2014-2019)

गुहा त्यांच्या लेखात नमूद करतात, त्या डिसेंबर 1947 मधील पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातील ध्येये आणि उद्दिष्टे खरोखरच खुल्या मनाने राबवण्यात आली काय, हा अतिशय कटू वस्तुस्थितीचा प्रश्न आहे. ती ध्येये आणि उद्दिष्टे खरोखरच राबविण्यात आली असती तर कट्टरवादी, मूलतत्त्ववादी, ताठर मुल्ला-मौलवींपेक्षा हमीद दलवाईसारख्या सच्च्या विचारवंत सुधारकांना महत्त्व देण्याचे धोरण आणि सोबतच समान नागरी कायदा करण्याचे राज्यघटनेने दिलेले आश्वासन सत्यात उतरवण्यात नेहरूंना अपयश आलेच नसते.

गुहांचे ‘ते’ भयसूचक विधान खरे ठरू शकते... 
दि.25 मे 2019 च्या साधना अंकातील रामचंद्र गुहा यांच्या ‘हिंदू पाकिस्तानच्या मार्गावर काही पावले’ या लेखाच्या वाचनानंतर, त्यासंदर्भात माझ्या आकलनाचेही विवेचन करावे वाटल्याने हा पत्रप्रपंच. वस्तुतः रामचंद्र गुहा यांच्या लेखावर माझ्यासारख्याने काही टिप्पणी करावी हे जरा धाडसाचेच असले तरी, लिहितो. माझ्या आकलनानुसार 15 ऑगस्ट 1947 च्या मध्यरात्री जे सत्तांतर (Transfer of Power) घडले, त्या घटनेला वास्तविक आणि खऱ्याखुऱ्या भारतीय संकल्पनेच्या स्वातंत्र्यात तबदील करण्यात तत्कालीन सत्ता-राबवणूकदार पूर्णपणे सफल झाले नाहीत. 

गुहा त्यांच्या लेखात नमूद करतात, त्या डिसेंबर 1947 मधील पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रातील ध्येये आणि उद्दिष्टे खरोखरच खुल्या मनाने राबवण्यात आली काय, हा अतिशय कटू वस्तुस्थितीचा प्रश्न आहे. ती ध्येये आणि उद्दिष्टे खरोखरच राबविण्यात आली असती तर कट्टरवादी, मूलतत्त्ववादी, ताठर मुल्ला-मौलवींपेक्षा हमीद दलवाईसारख्या सच्च्या विचारवंत सुधारकांना महत्त्व देण्याचे धोरण आणि सोबतच समान नागरी कायदा करण्याचे राज्यघटनेने दिलेले आश्वासन सत्यात उतरवण्यात नेहरूंना अपयश आलेच नसते. पण मतांच्या स्वार्थी राजकारणापायी व एकगठ्ठा मतांच्या लोभापायी धर्मनिरपेक्षता या मुळातच वद्‌तोव्याघात अशा संकल्पनेला छद्मी, ढोंगी आणि अल्पसंख्याकांचे लांगूलचालनजनक रूप देण्याचेच धोरण राबविण्यात आले. 

रामचंद्र गुहा यांनी त्यांच्याच ‘देशभक्त आणि अंधभक्त’ या ग्रंथात, काँग्रेसमधील चमचेगिरीचा संक्षिप्त इतिहास या निबंधात यासंदर्भात काही पूरक विधाने केली आहेत. धर्मनिरपेक्षता या मुळातच वदतोव्याघात व फसव्या/भ्रामक संकल्पनेच्या अज्ञानमूलक व स्वार्थी ‘राबवणुकी’मुळे त्यावेळी मूठभर असलेल्या हिंदू कट्टरवादाला खतपाणीच मिळाले. पाश्चिमात्य संस्कृती व विचारसरणी भारतासारख्या बहुविध संस्कृतीने संपृक्त देशाच्या सामाजिक, सांस्कृतिक व धार्मिक क्षेत्रातसुद्धा प्रगती आणि विकासाला पूरक ठरू शकणार नसल्याचे विचार गांधी-दर्शनात पदोपदी आढळून येत असले तरी, ते विचार भारतीय धोरणाचे अविभाज्य अंग होऊ शकले नाहीत ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. गांधींच्या अकाली जाण्याने ‘भारतीयता’ या संकल्पनेला फुलवण्याची प्रकियाच जणू अवरूद्ध झाली. 

गांधींच्या तोडीचे नैतिक-समृद्ध नेतृत्वसुद्धा नसल्याने सत्ता-राबवणूकदारांवर अंकुश ठेवू शकण्याची शक्यताही मावळली. पर्यायाने काँग्रेसला मत देण्यासाठी इमामांना इंदिरा गांधींनी वेळोवेळी केलेले आवाहन आणि शाहबानो प्रकरणात राजीव गांधींनी मुल्ला-मौलवींसमोर पत्करलेली शरणागती, तसेच ‘देशाच्या संसाधनांवर गरीब नव्हे तर धार्मिक अल्पसंख्याकांचा पहिला हक्क आहे,’ या स्वरूपाचे मनमोहनसिंग यांचे विधान अशा घटना घडू शकल्या. वस्तुतः नेहरूंनी नमूद केलेली ध्येये आणि उद्दिष्टे ठामपणे, निष्पक्षपणे व राजकीय कौशल्याने राबविण्यात आली असती तर अशा घटना घडल्याच नसत्या. त्यामुळेच विविधतेशी/बहुत्ववादाशी राज्यघटनेची बांधिलकी अजूनही शाबित असली, तरी जमिनीवर आणि रोजच्या जीवनात बहुसंख्यांकवादाचेच राज्य आहे. ‘भारत अजून तरी हिंदू पाकिस्तान झालेला नाही; मात्र आपल्या निर्मितीपासून तो कधी नव्हे इतका या संकल्पनेजवळ पोहोचला आहे,’ हे गुहा यांचे भयसूचक(!) विधान लवकरच खरे ठरू शकते, असे माझ्यासारख्याला वाटू लागले आहे. 
लखनसिंह कटरे, गोंदिया 

राजन यांचा ‘तो’ शब्द बरोबर आणि ‘ते’ म्हणणे पटते 
साधनाच्या 18 मे च्या अंकात पन्नालाल सुराणा यांनी रघुराम राजन यांच्या ‘द थर्ड पिलर’ या ग्रंथाची ओळख करून दिली आहे, त्यातील दोन मुद्यांविषयी लिहू इच्छितो. 
1. ‘भांडवलशाही’ या शब्दाऐवजी ‘बाजारपेठ’ हा शब्द राजन वापरतात हे मला बरोबर वाटते. कार्ल मार्क्सने भांडवलशाहीत असा दोष दाखवला आहे की, ‘श्रमिकांच्या हातात पुरेशी क्रयशक्ती न गेल्याने (मागणी न वाढून) बाजारात मंदीचे संकट वारंवार कोसळते.’ मार्क्सचे हे विवेचन भारतासारख्या विकसनशील अर्थव्यवस्थेला लागू होत नाही. येथील समस्या उलट आहे. ती ही की, विकास म्हणजे उपभोग्य वस्तूंचे वाढते उत्पादन. ते साधण्यासाठी उत्पादनाची साधने प्रथम निर्माण करावी लागतात. ते करताना लोकांच्या हातात पैसा जातो, त्यांची क्रयशक्ती वाढते व त्यामुळे महागाई वाढते. महागाईला लगाम कसा घालायचा ही रिझर्व्ह बँकेची चिंता असते. 
2. राजन यांचे हे म्हणणे मला पटते की ‘स्थानिक जनसमूहांनी आपापल्या प्रदेशात सर्वांसाठी सार्वजनिक सोयी चांगल्याप्रकारे चालवणे, त्यातून नवे सर्वसंग्राहक नेतृत्व उभे करणे हा मार्ग चोखाळला पाहिजे.’ याकरता छॠजी चे जाळे भरपूर पसरले तर विकास व्हायलाही मदत होईल आणि सत्तेचे विकेंद्रीकरण होऊन खरी लोकशाही रुजेल. 
भ.पां. पाटणकर, नागपूर 

विवेकी कृत्याचे इमले बांधणे सोपे?
दि.25 मे च्या साधना अंकात डॅनिअल फ्रान्सिस मस्करणीस यांचा ‘बुध्द आणि साक्षात्कार’ हा वाचनीय थायलंड प्रवासलेख आहे. टूरच्या अखेरच्या दिवशी शेवटचे तीन तास, किलोमीटर लांबीच्या भल्या मोठ्या मॉलमध्ये शॉपींग स्लॉटची वेळ संपत आल्यावर ग्रुपमधील सर्व सभासद जमतात तेव्हा लेखकाच्या लक्षात येते की, आपल्या खांद्यावरील बॅगमध्ये स्वत:चा, तसेच पत्नी आणि मुलगा यांचे पासपोर्ट होते आणि आता ती बॅगच नाही. तेव्हा धाबे दणाणणे सहाजिक आहे. बॅग खांद्यावरून कोठे काढली होती, याचे उत्तर येते, ‘जेथे तीन टीशर्ट घालून पाहिले पण विकत घेतले नाहीत, अशा शॉपमध्ये.’ मग ते शॉप शोधणे चालू होते. मॉलमधील वेळ संपत आल्याने दुकाने बंद होत होती. अनेक वेळा खालीवर करत अखेरीस ते दुकान सापडते व बॅगबाबत विचारल्यावर तो इराणी दुकानदार म्हणतो ‘ओह येस, इट इज देअर. माय वाईफ फाऊंड इट.’
 

लेखक जेव्हा ग्रुपमध्ये यशस्वीपणे येतो, तेव्हा बाकीचे सभासद बॅग सापडण्याचे श्रेय त्यांनी केलेल्या परमेेशर प्रार्थनेला देतात. लेखक मात्र एवढ्या संकटात आपण ठेवलेल्या विवेकी कृत्याला व बुद्धाचे चार आर्य सत्य यास भले मोठे श्रेय देतो. मग सर्वजण विमान तळाकडे कृतकृत्य होत निघतात. या मोठ्या श्रेयवादाच्या लेखनात लेखक, ज्या इराण्याच्या दुकानात तीन टीशर्ट घालून पाहिले पण घेतले नाहीत, तरीही त्या इराणी दुकानदाराने व त्याच्या पत्नीने त्याची बॅग जपून ठेवली व अगत्याने परत केली (शिवाय, लेखक देत असलेले 2000 बाथही घेतले नाहीत), त्या इराणी पती-पत्नीस कवडीचेही श्रेय देत नाही. त्यामुळे स्वतःच्या विवेकी कृत्याचे इमले बांधणे जास्तच सोपे झाले आहे असे दिसते. खोलात विचार केला तर वेळ आणीबाणीची असताना, बॅग इराणी दुकानदाराकडून क्षणात मिळणे या इव्हेंटमध्ये इराणी पती-पत्नीस श्रेय देणे आवश्यकच होते. 
भाऊसाहेब नेवरेकर, पुणे. 

‘त्या’ कादंबरीवर लेख हवा होता... 
दि. 4 मेचा साधनाचा ‘आनंदी गोपाळ’ अंक आवडला. श्री. ज. जोशी यांच्या कादंबरीमुळे याची सुरुवात झाली- कादंबरी आजही लक्षवेधी आहे, त्याविषयी विशेष लेख अंकात हवा होता. कारण त्यावेळी कादंबरीवर खूप उलट-सुलट लिहून आलेले आहे. असेच काहीसे त्यांच्या ‘रघुनाथाची बखर’ या (र.धो.कर्वे यांच्या जीवनावरील) गाजलेल्या कादंबरीनंतरही घडलेले आहे व आजही तो विषय ताजा आहे आणि सर्व माध्यमातून हाताळला गेला आहे. योग्य प्रयोजन पाहून या दोन पुस्तकांविषयी उपलब्ध लिखाण टीका व समीक्षण इत्यादी प्रसिद्ध करावे. 
सुरेश चांदवणकर, मुंबई   
 

Tags: प्रतिसाद pratisad weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

वाचक

साधना साप्ताहिकाचे वाचक 


प्रतिक्रिया द्या