डिजिटल अर्काईव्ह (2014-2019)

लेखिका म्हणून महत्त्वाच्या वाटणाऱ्या तीन गोष्टी

इथपर्यंत आपण कसे आलो हेच समजत नाही. या आपल्या प्रदेशात किती बुद्धिवादी, किती विवेकशील, किती पुरोगामी माणसे- स्त्रिया आणि पुरुष होऊन गेले, त्यांनी आपल्याला किती शिकवले, पुढे आणले आणि आज हे काय होतेय? त्यांचा वारसा सांगणारी माणसे जरूर आहेत आजूबाजूला, पण त्यांच्या आवाजालाही अधिक जोर लावायला लागतो आहे. आणि सगळ्यात कष्ट देणारी बाब म्हणजे आपल्या परिघातलेच, संधी मिळालेले, सुदैवी असे, भलेभले समजणारेही, आपल्याच मित्रमंडळीतले लोक अचानक बधीर झालेत आणि डोळे बांधून, विवेकाला नाकारून, या वाटेवरून चालताहेत हे पाहून धक्का बसतो आहे. अशा वेळी आपल्या एकटेपणाची जाणीव होते आहे आणि आपल्या विचारांचे सगेसोयरे कुठे आहेत हे पाहायला प्रयत्न करावे लागताहेत. ही बाब अस्वस्थ करते आहे.

इथे जमलेल्या सगळ्यांना नमस्कार... महाराष्ट्र फाउंडेशनचा कथालेखनासाठी हा सन्मान मिळाला याचा आनंद वाटतो आहे. कुणी दखल घेतली, कौतुक केले की आनंद होतोच. यामुळे लिहिण्यावर काही परिणाम होत नाही हे माहिती असते. तरीही ती सुखकर भावना आधी व्यक्त करते. शिवाय हा सन्मान जाणकार लोकांकडून होतो आहे, यामुळे आनंद द्विगुणीत होतो आहे. 
लेखिका म्हणून अनेक वर्षे स्त्रिया आणि पुरुष, त्यांचे नात्यातले ताण, वर्तमानातले जगणे, त्यांच्या भोवतालची माणसे आणि गुंतागुंती हे मांडत आले. त्याचा एक परीघ जरूर होता, पण म्हणजे कुठलीही लेखिका सजगपणे समग्र विचार करत नाही असे नाही. आपण या समूहात या वर्तमानातच राहत असतो, विचार करतो. प्रतिक्रिया उमटतात. दरवेळी त्या लिहिल्या जातात, त्यांची कथाच होते असे अजिबात नाही. निमित्त असते तेव्हा त्या विचारांना जागा मिळते. आपल्या परीने आपण काही निर्णय घेतो. अनेकदा कशात सामील व्हायचे नाही, त्याचा निर्णय घेतो. पुष्कळदा शांत, बाजूला राहून आपले काम करत राहतो. जी प्रत्यक्षात उतरून प्रतिकूल परिस्थितीशी लढा देताहेत त्यांना मनोमन पाठिंबा देतो. आजचे हे असे निमित्त आहे थोड्या इतर गोष्टी बोलण्याचे. 
लेखिका म्हणून काय-कसे लिहिले ते आता पुस्तकातून समोर आलेच आहे. लेखिका एक सजग माणूस म्हणून काय विचार करते आहे, हे मांडण्याची ही संधी आहे. गेली काही वर्षे भोवतीची परिस्थिती हळूहळू बदलत गेल्याचे जाणवते आहे. तशी ती जगभर बदलते आहे आणि ते साहजिक, अपरिहार्यच आहे. पण आपल्या भोवतीच्या गोष्टी आपल्यावर अधिक परिणाम करतात. त्यांचे थेट पडसादही आपल्यावर उमटतात. त्यामुळे तर मनात भावना जाग्या होतात. काही म्हणावेसे वाटते. बदल तर सतत घडतच असतात. काही सकारात्मक असतात, ज्यामुळे आपले जगणे अधिक सुखकर होते. विज्ञान-तंत्रज्ञानाची घोडदौड असते. त्याचे अनेक फायदे मिळत राहतात. पण काही नकारात्मक असतात ज्यांची अपेक्षा नसते आणि तेही मनुष्यनिर्मित, राजकीय, सामाजिक असे असतात. आपण ज्यावर विश्वास ठेवून होतो, त्या पायाभूत अशा मूल्यांवरच घाला पडतो आहे असे दिसते. त्यामुळे हताश वाटते, प्रसंगी उद्विग्नता येते. कशामुळे हे बदल होताहेत याचा शोध घ्यावासा वाटतो. काय केले म्हणजे हे सकारात्मक होऊ शकतील ते सुचायला लागते. तर अशा वेळी एक माणूस आणि लेखिका म्हणून मला कोणत्या गोष्टी महत्त्वाच्या वाटतात? कुठल्या गोष्टींचे चिंतन मनात सतत सुरू असते? 
आजच्या निमित्ताने मी त्या गोष्टी इथे मांडणार आहे. पहिली महत्त्वाची ‘आपला अवकाश’ - एक व्यक्ती म्हणून आपण आपले निर्णय घ्यायला स्वतंत्र आहोत, अशी आपली धारणा असते. मग आपली इतर ओळख लिंग-जात-प्रदेश-धर्म-लैंगिक प्रेरणा-काम- आवड अशी काहीही असो. त्यामुळे आपल्या स्वातंत्र्याला बाधा येता कामा नये. एक नागरिक म्हणून जन्मत:च आपल्याला तो हक्क आहे असे आपण मानतो. हा आपला अवकाश असतो. म्हणजे प्रत्येक व्यक्तीने आपल्याला जमेल तसे, हवे तसे आनंदात जगावे-राहावे-व्यक्त व्हावे अशी अपेक्षा. यात फक्त आपलेच स्वातंत्र्य गृहीत धरलेले नसते. दुसऱ्या व्यक्तीच्या स्वातंत्र्याची जाण असणे हे अधिक महत्त्वाचे आहे. म्हणजे परस्पर मान्य असे हे स्वतंत्र व्यक्ती म्हणून जगणे आहे. तसा अवकाश निर्माण करणे आहे, जिथे सर्वांना एकोप्याने-सुखा- आनंदात-समाधानात राहता येईल. हे कसे साधता येते? आपल्या लहान परिघापासून सुरुवात केली तर, कुटुंबात ते कसे साधतो आपण? तर एकमेकांच्या निर्णयात ढवळाढवळ न करता, एकमेकांवर हुकूमत न गाजवता, तरीही सलोख्याने एकत्र राहून. हे साधता येते का? तर जाणतेपणाने, प्रयत्नपूर्वक ते करता येते. यासाठी मुळात एक महत्त्वाचा पाया लागतो. तो म्हणजे समान भूमिकेचा. समान म्हणजे हुबेहूब सारखेपणा नव्हे. तर आपण कुणाहून वरचढ नाही, सत्तेच्या उतरंडीवर नाही हे स्वीकारणे. आपण प्रत्येकजण वेगळे असू, असतोच, वयाने, अनुभवाने, स्वभावाने, शिवाय रंग-रूप-लिंग-प्रेरणा-आवडीनिवडी अशा अनेक बाबी वेगवेगळ्या असतात. त्या तशा असणेच हितकर असते. तो वेगळेपणा संपूर्ण स्वीकारून घेऊन, पण त्यामुळे सत्तेच्या पायऱ्यांवर कुणी श्रेष्ठ -कनिष्ठ असे नाही, असा विश्वास बाळगून जगलो तर जमते. हेच मग एक समूह म्हणून राहताना सामाजिक परिमाण बनून येते. 
कायद्याने आपण सर्व समान आहोत असे आपण समजतो. एक नागरिक म्हणून तो आपला मूलभूत हक्क आहे असे आपण समजतो, त्याचा अर्थ हाच. अशी ही साधी-सोपी समानता जी आपल्याला आधी आपला अवकाश मिळवून देते आणि मग स्वातंत्र्याकडे घेऊन जाते, ती आपल्या अनुभवाला येते का? तर नाही. अनेकदा कुटुंबातही येत नाही आणि समाजात तर नाहीच येत. आपला समाज किती तऱ्हेच्या कृत्रिम कप्प्यात विभागला गेला आहे. आणि तीच जणू आपली ओळख बनते आहे. त्यामुळे सत्ता आणि अधिकार गाजवू पाहणारे इतरांना, त्यांच्यापेक्षा वेगळे असणाऱ्यांना स्वातंत्र्यात जगू देत नाहीत. अनेक तऱ्हेची बंधने घालू पाहतात, असंख्यांना तर जगणे कठीण होऊन जाते. आपण लेखनाचे स्वातंत्र्यही गृहित धरलेले असते. आपल्याला आतून वाटते तसा आविष्कार करायचा अशी कुठल्याही कलावंताची ऊर्मी असते. पण विभागलेल्या समाजात कलावंतांची परिस्थिती बिकट होते. निर्मिती करता येते या गुणांसाठी जणू शिक्षाच वाट्याला येते. म्हणजे कला जे दाखवतेय ते सत्ताधाऱ्यांना मान्य नाही. आवडत नाही. ते अधिकाराच्या बळावर दडपणे आणू पाहतात, बंदी घालतात, नाही ऐकले तर कुणाकरवी जीवही घेऊ शकतात. या अशा वातावरणात आपण राहतो आणि अविष्कार करू पाहतो. लेखिका म्हणून हे भोवताल फार अस्वस्थ करते. म्हणून आपल्या परीने आपण काय करतो? तर सत्ताधारी वर्गाला मिंधे बनून राहण्याचे नाकारतो. जिथे आपले स्वतंत्र असणे धोक्यात येऊ शकते असे वाटते अशापासून दूर राहतो. प्रसंगी निषेध नोंदवतो आणि वेळोवेळी आपले विचार निर्भयपणे मांडतो.   
दुसरी गोष्ट उद्विग्नता आणणारी आहे. ती म्हणजे सध्या आजूबाजूला, विवेकवादाला होणारा विरोध. शास्त्रीय विचारांना आणि पुराव्याने साबित होणाऱ्या शोधसंशोधनांचा दिलेला नकार. विवेकाची वाट खडतर असते. सतत विचार करावा लागतो, अधिकाअधिक ज्ञान मिळवावे लागते, नुसती तयार माहिती नव्हे, शोधाच्या वाटेवर कष्ट असतात. त्यापेक्षा नुसते बसून मागे वळून, रचलेल्या खोट्या मिथक कथांना गोंजारणे सोपे असते. भ्रामक समजुतींना खरे ठरवले की आयत्या, खोट्या गोष्टींना इतिहास ठरवून नवीन शिकणाऱ्या पिढीच्या मेंदूत भरता येतो. हे किती भयावह आहे याची कल्पना केली तरी थरकाप उडतो. इथपर्यंत आपण कसे आलो हेच समजत नाही. या आपल्या प्रदेशात किती बुद्धिवादी, किती विवेकशील, किती पुरोगामी माणसे- स्त्रिया आणि पुरुष होऊन गेले, त्यांनी आपल्याला किती शिकवले, पुढे आणले आणि आज हे काय होतेय? त्यांचा वारसा सांगणारी माणसे जरूर आहेत आजूबाजूला, पण त्यांच्या आवाजालाही अधिक जोर लावायला लागतो आहे. 
आणि सगळ्यात कष्ट देणारी बाब म्हणजे आपल्या परिघातलेच, साऱ्या संधी मिळालेले, सुदैवी असे, भलेभले समजणारेही, आपल्याच मित्रमंडळीतले लोक अचानक बधीर झालेत आणि डोळे बांधून, विवेकाला नाकारून, या वाटेवरून चालताहेत हे पाहून धक्का बसतो आहे. अशा वेळी आपल्या एकटेपणाची जाणीव होते आहे आणि आपल्या विचारांचे सगेसोयरे कुठे आहेत हे पाहायला प्रयत्न करावे लागताहेत. ही बाब अस्वस्थ करते आहे. 
तिसरी गोष्ट आहे- एका संकल्पनेची. जी फार महत्त्वाची आहे. तिचा पुरेशा गांभीर्याने विचार व्हायला हवा. ती म्हणजे सह-अनुभूती- ही शिकायची आणि जोपासायची महत्त्वाची बाब असते. जेव्हा लहानपणापासून सुरक्षित, प्रेमाचे, विश्वासाचे वातावरण भोवती असेल तर माणसांच्या मनात ती आपोआप रूजण्याच्या शक्यता असतात. जेव्हा ती बहु-संख्यांच्या मनात पूर्णपणे रूजते तेव्हाच समता आणि न्याय या संकल्पनांची प्रत्यक्षात प्रचिती येऊ शकते. आपल्यासारखेच इतर आणि आपल्यापेक्षा वेगळे असणारे इतर यांच्याबाबत आपण कसा विचार करतो? कुठल्या दृष्टिकोनातून इतरांकडे पाहतो? दुसऱ्या कुणाच्या मनात काय चालले आहे ते समजण्याची क्षमता असणे, हे केवळ मानवप्राण्याला मिळालेले वरदान आहे. आपल्या मेंदूच्या विकासाने ते शक्य झाले आहे. यामुळेच आपण इतरांच्या आयुष्याची कल्पना करू शकतो. त्यांचा आनंद समजू शकतो आणि त्यांना वेदना झाल्या, त्यांच्यावर दु:खे कोसळली, त्यांच्यावर अन्याय झाला, त्यांना इजा झाली तर कशा प्रकारचे शारीरिक किंवा मानसिक कष्ट त्यांना होऊ शकतात याची कल्पना करू शकतो. ती आहे सह-अनुभूती. पण ही संकल्पना जेव्हा रूजत नाही, नष्ट होते, हळूहळू अस्तित्वातच नसते तेव्हा काय होते? आपण दुसऱ्याचा विचार करत नाही, ती क्षमताच नसते, केवळ ‘स्व’ महत्त्वाचा उरतो, आपणच श्रेष्ठ, आपण सत्ताधारी, आपल्याला सारे माहितच आहे, आपल्याकडे सगळे शहाणपण युगानुयुगे आहे, अधिक काही शिकण्याची गरजच नाही, असल्या विचारातून हळूहळू नव्याला नकार आणि जुन्याला कवटाळून बसण्याची सवय लागते. कारण ती सोपी आहे. असे होऊ नये म्हणून ‘सह-अनुभूती’चा आपण अधिक गांभीर्याने विचार करायला हवा, ती अनेक मनात रूजावी असा प्रयत्न करायला हवा. हा एक समग्र शिक्षणाचा भाग आहे. 
आपला अवकाश आणि स्वातंत्र्य, विवेकवाद आणि सह-अनुभूती या साऱ्या एकमेकांत गुंतलेल्या संकल्पना आहेत. सुखकर, आनंददायी, समानता आणि न्याय यावर उभारलेल्या आयुष्याचा हा पाया आहे. या संकल्पना आज जेव्हा भोवती नाकारलेल्या दिसतात तेव्हा अस्वस्थता येते. तरीही ही भावना मांडण्याची ही संधी उपलब्ध होते आहे हेदेखील आशादायक वाटते. कारण इथे उपस्थित असलेल्या, हे ऐकणाऱ्या आणि नंतर वाचणाऱ्या अनेक मनाशी कुठेतरी मैत्रीचा संवाद होईल अशी शक्यता जाणवते आहे. शेवटी लेखिकेचे काम काय आहे? तर आपले विचार, आपल्या संकल्पना, आपले आकलन, नव्या जाणीवा हे मांडत राहणे. इतरांना जाणवून देणे की, आम्ही कथा- कादंबऱ्या-पुस्तके लिहून हेच मांडले आहे. शक्य झाले तेव्हा संधी घेऊन व्यक्त केले आहे. ते आज इथे करता आले याचा आनंद होतो. 

(महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका) यांचा वाङ्‌मयप्रकार- कथा- पुरस्कार स्वीकारताना 27 जानेवारी 2019 रोजी, पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिरात केलेले हे भाषण आहे.)                                                                                                                                                                                                                                                            
 

Tags: literature sahitya साहित्य भाषण महाराष्ट्र फाउंडेशन (अमेरिका) वाङ्‌मयप्रकार- कथा- पुरस्कार सानिया vagmayprakar purskar Saniya speech Maharashtra foundation weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

सानिया,  बंगळुरु, कर्नाटक
saniya1011@gmail.com

कथाकार 


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके

कर्तव्य

सर्व पहा