डिजिटल अर्काईव्ह (2014-2019)

सांप्रतचे राज्यकर्ते याकडे लक्ष देतील?

1962 मध्ये कोयनेच्या पॉवर हाऊसमधील टर्बाईन जनरेटरच्या फाउंडेशनचे डिझाईन तयार करण्यासाठी जिनिव्हा येथे माझे वास्तव्य होते. त्यावेळी समजले की, स्वित्झर्लंडमधील गरीब व श्रीमंत यांच्यातील मिळकतीचे मोजमाप केवळ चारपट इतके बेताचे होते. आजकाल भारतात ती दरी कोट्यवधींच्या पटीत मोजावी लागेल! भारतीय माणूस सांप्रतच्या परिस्थितीत भुकेमुळे मरण्याची शक्यता मुळीच नाही. परंतु येथील राज्यकर्त्यांना राजकारण करण्याशिवाय दुसरे काही सुचत नाही. शाश्वत विकासाचा कार्यक्रम हाती घेऊन गरीब व श्रीमंत यांच्यामधील दरी कमी करण्यासाठी हे राज्यकर्ते कंबर कसतील तो सुदीन ठरेल! महात्मा गांधींनी 1933 ते 1938-39 या कालखंडात सांगितलेला, भारतातील सर्वसामान्य नागरिकांनीदेखील भारताचा शाश्वत विकास साधण्यासाठी जो कार्यक्रम हाती घ्यायला पाहिजे होता, तो सविस्तरपणे लुई फिशर यांनी त्यांच्या या पुस्तकातील ‘विदाऊट पॉलिटिक्स’ या प्रकरणामध्ये मांडला आहे. 

प्रसिद्ध अमेरिकन पत्रकार लुई फिशर यांनी 1951 मध्ये लिहिलेल्या ‘महात्मा गांधी हिज लाईफ अँड टाइम्स’ या इंग्रजी पुस्तकाचे पुनश्च प्रकाशन मुंबईच्या भारतीय विद्या भवनने 1953 मध्ये केले होते. त्याच्या लक्षावधी प्रती जगभर वितरित केल्या होत्या. कोयना जलविद्युत्त्‌ निर्मितीप्रकल्पात काम करीत असताना, 1953 सालापासून ते पुस्तक माझ्या संग्रही होते. त्यावेळी नित्यनेमाने चरख्यावर सूत कातीत असताना चातीच्या गुंजनाच्या ध्वनीलहरींबरोबर या पुस्तकातील विचारांचे गुंजन माझ्या मनी रूंजी घालीत असे. शालेय जीवनात, भारताच्या स्वातंत्र्याच्या चळवळीत मी हिरीरीने भाग घेतला. त्याचे फलित म्हणून या इंग्रजी पुस्तकातील विचार मराठी भाषिकांसमोर मांडावेत असे विचार माझ्या मनात नेहमी तरळत असत.

माजी न्यायमूर्ती व विचारवंत चंद्रशेखर धर्माधिकारी यांच्या प्रेरणेने त्या इंग्रजी पुस्तकाचे मी मराठीत भाषांतर केले. आणि आज 1 सप्टेंबर 2019 रोजी लोकसत्ताचे माजी सव्यासाची चतुरस्र संपादक, आदरणीय कुमार केतकर यांच्या शुभहस्ते या पुस्तकाचे प्रकाशन होत आहे, हा माझ्या आयुष्यातील आनंदाचा दुसरा प्रसंग आहे असे मी मानतो.

पहिला प्रसंग कोणता होता? कोयना प्रकल्पात काम  करीत असताना 1962 मध्ये टर्बाईन-जनरेटरच्या चाचण्या घ्यायचे निश्चित झाले होते. त्यासाठी साडेबारा हजार फूट लांबीच्या हेडरेस टनेलमधून कोयनेच्या धरणातील पाणी पोकळीच्या पॉवर हाऊसमधील टर्बाईनच्या ब्लेडस्‌वर सहा जेटमधून सोडावयाचे होते. त्यासाठी हेडरेस टनेलमध्ये अनवधानाने मागे राहिलेले काँक्रीटचे खडे, वेल्डिंग रॉडचे तुकडे साफ करणे जरूरीचे होते. अन्यथा, पाण्याबरोबर या मालाचा, टर्बाईनच्या ब्लेडस्‌वर तडाखा बसला असता व टर्बाईन ब्लेडस्‌ बोथट होऊन टर्बाईनची कार्यक्षमता कमी झाली असती. म्हणून हेडरेस टनेल साफ करणे जरूरीचे होते.

पृथ्वीच्या पोटात, पंचवीस किलोमीटर परिसरात पसरलेल्या या अद्‌भुतरम्य कोयना प्रकल्पात त्यावेळी सुमारे दीडशे इंजिनियर्स काम करीत होते. त्यामध्ये सफाईचे काम करण्यासाठी माझी निवड झाली. तो माझ्या आयुष्यातील अशा आनंदाचा पहिला प्रसंग! त्या कामासाठी पाच-सहा कामगार, घमेली, फावडी, खराटे व लोखंडी पंजे घेऊन, पायात गमबूट, रेनकोट, हेल्मेट व हेडलाईट्‌स असा जामानिमा करून, पोफळीच्या बाजूने हेडरेस टनेलमध्ये शिरून व नवजाच्या-कोयनेच्या जलाशयाच्या बाजूने, उलट दिशेने खरडपट्टी करत, आम्ही ते काम सोळा तासांत पूर्ण केले! भुकेची वा कशाचीच आम्हाला त्या सोळा तासांत आठवण झाली नाही.

सुमारे पंधरा वर्षांपूर्वी संपतराव पवार, मी व कोटेचा अशा आम्ही तिघांनी ‘बदलते विश्व’ या विषयावर सकाळ व दुपारच्या प्रत्येकी अडीच तासाच्या दोन सेशनमध्ये, कुमार केतकरांची भाषणे ठेवली होती. त्यांच्या द्रष्टेपणाची आज पंधरा वर्षानंतर प्रचिती येते आहे. माननीय कुमार केतकरांच्या हस्ते, मी भाषांतरित केलेल्या ‘महात्मा गांधी, त्याचे जीवन व कार्यकाळ’ या पुस्तकाचे प्रकाशन आज होत आहे हे माझे भाग्यच आहे. लोकमान्य टिळक, न.चिं.केळकर, ह.रा.महाजनी, गोविंद तळवलकर, प्रभाकर पाध्ये, अनंत भालेराव, माधव गडकरी, कुमार केतकर व गिरीश कुबेर यांनी अनुक्रमे केसरी, महाराष्ट्र टाइम्स, राष्ट्रशक्ती, लोकसत्ता व मराठवाडा या वृत्तपत्रांच्या संपादकांनी साहित्य क्षेत्रावर जसा प्रभाव पाडला होता, तसाच प्रभाव त्यांच्या लिखाणाचा सामाजिक व राजकीय धुरिणांच्यावर होत असे. त्याची प्रकर्षाने आठवण गोविंद तळवलकर व टाइम्स ऑफ इंडियाचे त्यावेळचे संपादक शामलाल यांच्या लिखाणातून होत असे.

आजकाल साखळी वृत्तपत्रांच्या आवृत्त्या निघण्याच्या कालखंडात, व्यवस्थापकांचे नियंत्रण, जाहिरातदारांचे दडपण आणि त्याच्या जोडीला प्रशासकीय हस्तक्षेप याखाली संपादकांना तारेवरची कसरत कशी करावी लागते हे आपण पहातच आहोत. लुई फिशर यांच्यावर तशा प्रकारचे दडपण मुळीच नव्हते. त्यांनी गांधींच्या आश्रमात, त्यांच्या सान्निध्यात मे 1942 मध्ये वास्तव्य केले होते. त्यांनी 1946 मध्ये भारताला पुनश्च भेट दिली. त्यावेळचे त्यांचे विचार लक्षात घेण्याजोगे आहेत. त्यांच्याच शब्दांत ‘हा देश किती दुर्दैवी आहे! मे 1942 मध्ये माझ्या मनावर भारताचा ठसा उमटला होता तो माझ्या आताच्या दोन महिन्यांच्या वास्तव्यात अधिकच गडद झाला. श्रीमंत असूनदेखील श्रीमंत लोक दु:खी होते, गरीब माणसे दु:खी होती आणि ब्रिटिश राज्यकर्तेदेखील दु:खी होते.’

तीच परिस्थिती सत्याहत्तर वर्षानंतर आजही भारताची आहे. फरक एवढाच की, ‘ब्रिटिश राज्यकर्ते’ याऐवजी त्यांच्या जागी आता ‘भारतीय राज्यकर्ते’ आले आहेत. 1962 मध्ये कोयनेच्या पॉवर हाऊसमधील टर्बाईन जनरेटरच्या फाउंडेशनचे डिझाईन तयार करण्यासाठी जिनिव्हा येथे माझे वास्तव्य होते. त्यावेळी समजले की, स्वित्झर्लंडमधील गरीब व श्रीमंत यांच्यातील मिळकतीचे मोजमाप केवळ चारपट इतके बेताचे होते. आणि आजकाल भारतात? ती कोट्यवधींच्या पटीत मोजावी लागेल! भारतीय माणूस सांप्रतच्या परिस्थितीत भुकेमुळे मरण्याची शक्यता मुळीच नाही. परंतु येथील राज्यकर्त्यांना राजकारण करण्याशिवाय दुसरे काही सुचत नाही. शाश्वत विकासाचा कार्यक्रम हाती घेऊन गरीब व श्रीमंत यांच्यामधील दरी कमी करण्यासाठी हे राज्यकर्ते कंबर कसतील तो सुदीन ठरेल!

महात्मा गांधींनी 1933 ते 1938-39 या कालखंडात सांगितलेला, भारतातील सर्वसामान्य नागरिकांनीदेखील भारताचा शाश्वत विकास साधण्यासाठी जो कार्यक्रम हाती घ्यायला पाहिजे होता, तो सविस्तरपणे लुई फिशर यांनी त्यांच्या या पुस्तकातील ‘विदाऊट पॉलिटिक्स’ या प्रकरणामध्ये मांडला आहे. सांप्रतचे राज्यकर्ते याकडे लक्ष देतील का?

Tags: वि. रा. जोगळेकर V.R.Jogalekar Louis Fischer Mahatma Gandhi महात्मा गांधी : काळ आणि कर्तृत्व अनुवाद महात्मा गांधी हिज लाईफ अँड टाइम्स लुई फिशर महात्मा गांधी weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

वि. रा. जोगळेकर,  तासगाव, सांगली

अनुवादक 


प्रतिक्रिया द्या