डिजिटल अर्काईव्ह (2014-2019)

‘अलीज्‌ वेडिंग’ हा चित्रपट ऑस्ट्रेलियातील मुस्लिम पार्श्वभूमीवरचा रोमँटिक कॉमेडी असणारा पहिलाच चित्रपट. स्टिरिओटाईप पद्धतीने मुस्लिम जगाचं- छे: मुस्लिम माणसांचं चित्र बऱ्याच आंतरराष्ट्रीय चित्रपटांतून दाखवलं गेलं आहे. ऑस्ट्रेलियातदेखील निव्वळ मुस्लिम रोम-कॉम चित्रपट बनायला 2017 यावा लागतो, यातच सारं काही आलं. या चित्रपटात मुस्लिम माणसांच्या आयुष्यातील साधंसुधं जगणं मांडलं आहे. या चित्रपटात अलीचे पात्र निभावणारा अभिनेता ओसामा सामी याच्या आयुष्यातील घटनांवर हा चित्रपट बेतला आहे. चित्रपटात दाखवल्याप्रमाणे ओसामाचे खरेखुरे वडीलदेखील इमाम होते. मुख्य म्हणजे, ओसामाने ॲन्ड्र्यू नाइट यांच्यासोबत चित्रपटाचे सहलेखनही केले आहे.

एक माणूस अत्यंत व्याकुळतेनं एका मस्जिदीतील इमामाकडे आपली समस्या सांगायला आलेला आहे. ही समस्या असते रागाच्या भरात पत्नीला दिलेल्या तिहेरी तलाकची. इमाम आपल्या घरातल्या बैठकीत त्याचा प्रश्न समजून घेण्यासाठी शांतपणे बसलेले आहेत. तिथंच त्याचा तरुण मुलगा अली आहे. हा इमाम पंचक्रोशीत आपल्या लाघवी स्वभावाने आणि न्यायबुद्धीमुळे अत्यंत प्रसिद्ध. तो समस्या घेऊन आलेला दु:खी माणूस इमामाला सांगत आहे, ‘‘रमजानच्या आदल्या दिवशी मी पूर्ण दिवस विद्यार्थ्यांना सॉकर खेळाचं प्रशिक्षण देण्यात गुंतलो होतो. बाहेर इतकं तापलेलं वातावरण. पोटात अन्न-पाणी नव्हते. मी घरी आलो, तर माझ्या बायकोने मटण करपवून ठेवलं होतं. माझी आवडती ‘बकलवा’ नावाची मिठाई दगडासारखी टणक बनवून ठेवली होती. मला या सगळ्याने एकूणच राग आला आणि त्या रागातच मी माझ्या पत्नीला तीनदा तलाक म्हटले.’’ 
आता समोर बसलेले इमाम शांतपणे त्याला विचारत आहेत, ‘‘तू तलाकचा नक्की तीनदा उच्चार केलास?’’ उत्तरात तो मनुष्य म्हणत आहे, ‘‘होय नक्कीच. तीनापेक्षाही जास्त वेळा. रागाच्या भरात मी सलगपणे तलाक म्हणत राहिलो. ’’ 
अर्थात इथं इमाम इस्लामनुसारची प्रथा सांगत आहेत,   ‘‘अस्सं! तुला तर ठाऊक आहेच की, ‘आपल्या हनाफी पंथात माझ्या पत्नीला तलाक दिला’ असे तीनदा म्हटले तर मग यातून मागे फिरायला जागा नाही. पुन्हा समेट घडवण्याचा मार्ग संपुष्टात येतो.’’ त्यावर तो मनुष्य पुन्हा बेचैन होऊन म्हणत आहे, ‘‘मला माहीत आहे. रागात मी माझ्या अत्यंत सुंदर, देखण्या बायकोला गमावले आहे- बरं, तेही मिठाईच्या छोट्या तुकड्यासाठी. ’’ इमाम त्याला प्रतिप्रश्न करत आहेत, ‘‘बरं, मला सांग तू तिला एकदा तलाक म्हटल्यानंतर अंघोळीला गेलास, मग परतून दुसरा तलाकचा उच्चार केलास? किंवा त्यानंतर मग घराबाहेर जाऊन एक चक्कर मारून आलास आणि तिसऱ्यांदा तलाक म्हटलंस का?’’ 
तो मनुष्य जरा वैतागून, उद्वेगानेच म्हणत आहे, ‘‘नाही हो, असं काही घडलं नाही. एका भयंकर क्षणात तलाकचा प्रसंग घडला. एका क्षणाने माझ्या संपूर्ण आयुष्याचं नुकसान झालं.’’ 
‘‘अरे, मग हा तर एकच तलाक झाला.’’ इमाम त्याला शांतचित्ताने सांगत आहेत. ‘‘तुझा हा पहिलाच तलाक. एकाच विचाराचे तीन भाग आहेत. ‘कन्टिन्यू... अ सिंग्युलॅरिटी- एकच वचन आहे.’’ 
इमामचा विचार न आकळून मनुष्य पुन्हा विचारत आहे, ‘‘म्हणजे काय?’’ हाच प्रश्न आपल्याही मनात डोकावतो. आपलीही उत्सुकता आता ताणलेली आहे. मग इमाम त्याला उलगडून सांगतात, ‘‘सॉकर खेळताना अली जेव्हा एक गोल करतो आणि उपस्थित लोक ‘गोलऽ गोलऽ गोलऽ’ असा जल्लोष करतात, तेव्हा अलीने खरं तर किती गोल केलेले असतात??''
 ‘‘एकच.’’ मनुष्य उत्तरतो. 
‘‘तसंच आहे. रागाच्या भरात तू एकापाठोपाठ तीनदा तलाक म्हटलंस, तरी तुझा तलाकचा विचार एकच होता. म्हणजे तू एकदाच तलाक म्हटलंस. त्यामुळे तू आता निश्चिंतपणे घरी जा आणि आपल्या पत्नीशी चांगला वाग, भरभरून प्रेम कर. मनापासून तिला समर्पित हो.’’ 
इमामाचे हे उत्तर, तर्क ऐकून तो खुशीत येतो. तो इमामाचे लाखभर आभार मानत घराबाहेर पडला आहे. तरुण मुलाला मात्र बहुधा वडिलांच्या या तर्काचं आश्चर्य वाटलेलं आहे. तो म्हणतोही, ‘‘तुम्ही काय आता स्वत:चे नियम तयार करताय?’’ वडील उत्तरतात, ‘‘विश्वास ठेव माझ्या बाळा, पैगंबरसाहेबांनाही असे तलाक ही अप्रिय गोष्ट होती. तलाक व्हावेत, असं त्यांना कधीच वाटलं नाही.’’
हा संवाद, हे दृश्य आहे ‘अलीज्‌ वेडिंग’ या ऑस्ट्रेलियन चित्रपटातील. तीन तलाकवरचा हा असा सुरेख तर्क ऐकून किती तरी वेळ मी विचारातच पडले. आपल्याकडे एकदा दिला काय, तीनदा तलाक दिला काय- तलाक झालेलाच असतो. फारकत आवश्यक आहे आणि समेट घडवायचा तर ‘हलाला’ करावे, असे म्हणणारे मुल्ला-मौलवी एकीकडे आणि दुसरीकडे हा असा महत्त्वाचा विचार. 
माणूस सलगपणे काही तरी बडबडत राहतो, भांडतो; तेव्हा तो विचार ‘एकच एक’ असतो, एकाच कॉन्शन्समधली/ एकाच शुद्धीतली ती गोष्ट असते. थांबून, वेळ घेऊन, त्याला दुसरा विचार दिलेला नसतो. आपलंच मन पुन्हा चाचपडून पाहिलेलं नसतं. पहिल्याच विचाराची पुनरावृत्ती आपण करत असतो, इतकंच. हा तर्क किती बरोबर आहे- पटण्याजोगा आणि साधा-सरळ! 
एका क्षणात त्या इमामाने त्या मनुष्याचं आयुष्य वाचवलं, तो पुन्हा त्याच्या कुटुंबात परतला. जगणं सहज-सोपं करणाऱ्या अशा माणसांची नितांत गरज आहे, आपल्या आसपास. ‘अलीज्‌ वेडिंग’ हा चित्रपट त्यातील अशा इतरही काही प्रसंगांनी मनात घर करून राहतो. त्याआधी हे सांगायला हवं की, ‘अलीज्‌ वेडिंग’ हा चित्रपट  ऑस्ट्रेलियातील मुस्लिम पार्श्वभूमीवरचा रोमँटिक कॉमेडी असणारा पहिलाच चित्रपट. स्टिरिओटाईप पद्धतीने मुस्लिम जगाचं- छे: मुस्लिम माणसांचं चित्र बऱ्याच आंतरराष्ट्रीय चित्रपटांतून दाखवलं गेलं आहे. ऑस्ट्रेलियातदेखील निव्वळ मुस्लिम रोम-कॉम चित्रपट बनायला 2017 यावा लागतो, यातच सारं काही आलं. 
या चित्रपटात मुस्लिम माणसांच्या आयुष्यातील साधंसुधं जगणं मांडलं आहे. या चित्रपटात अलीचे पात्र निभावणारा अभिनेता ओसामा सामी याच्या आयुष्यातील घटनांवर हा चित्रपट बेतला आहे. चित्रपटात दाखवल्याप्रमाणे ओसामाचे खरेखुरे वडीलदेखील इमाम होते. मुख्य म्हणजे, ओसामाने ॲन्ड्र्यू नाइट यांच्यासोबत चित्रपटाचे सहलेखनही केले आहे. अभिनेता-दिग्दर्शक असणारे जेफरी वॉकर यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. यात ओसामासह हेलेना सवायर्स, डॉन हेनी आणि रियान कॉर यांच्या मुख्य भूमिका आहेत. जगभर पसरत चाललेल्या इस्लामफोबियामुळे मुस्लिम समाजाविषयी पूर्वग्रह तयार आहेत. स्टिरिओटाईप किंवा इस्लामफोबियामुळे प्रत्यक्ष सर्वसामान्य मुस्लिमांनाही काही नाहक प्रसंगांना सामोरं जावं लागतं, असंही एक दृश्य या चित्रपटात आहेच. 
पण हा चित्रपट मुस्लिमांविषयीचे ग्रह-दुराग्रह यांवर बेतलेला नाही, तर निव्वळ ‘माणूस’ या केंद्राभोवती फिरतो. ऑस्ट्रेलियन मुस्लिम समाजजीवनावर सकारात्मक प्रकाश टाकण्याचे काम या चित्रपटाने केलेले दिसते. ऑस्ट्रेलियात स्थलांतरित मुस्लिमांसाठी असणाऱ्या परिसरात अलीचे कुटुंब राहत असते. तेही स्थलांतरितच आहेत. इराणमध्ये सद्दाम हुसेनला विरोध केल्याने अलीचे वडील इराणमध्ये तुरुंगवासात असतात. तिथून पळ काढून ते आपल्या कुटुंबासह ऑस्ट्रेलियात आलेले असतात. अलीचे वडील एका स्थानिक मस्जिदीत इमाम आहेत, मात्र ते त्यांच्यासोबतच्या इतर इमामांप्रमाणे दुराग्रही नाहीत. त्यांनी चित्रपटात दर वेळी कालसुसंगत भूमिका घेतलेली आढळते. अलीची प्रेयसी डायन ही मेडिकल एन्ट्रन्स पास होते, तेही 99 टक्के गुणांनी. मात्र तिच्या वडिलांना तिने मेडिकल विद्यापीठात जाऊन पाश्चात्त्य  लोकांसोबत शिक्षण घेणं पटत नसतं. मशिदीत प्रवेशपरीक्षा पास झालेल्या इतर विद्यार्थ्यांबरोबरच डायनचेही अभिनंदन केले जाते, तेव्हा अलीचे वडील अत्यंत सहजपणे म्हणतात, ‘‘ती जर माझी मुलगी असती, तर मला तिचा फारच अभिमान वाटला असता!’’ 
जगभर एकाच धर्मातल्या माणसांच्यातही प्रांत, भाषांनुसार, वर्णांवरून सहज भेद होतात. अली हा इराणमध्ये जन्मलेला आणि ऑस्ट्रेलियात वाढलेला तरुण आहे, तर त्याची प्रेयसी डायन ही ऑस्ट्रेलियातच जन्मलेली लेबनीन मुस्लिम आहे. अलीच्या आईला तिचं लेबनीन असणं खटकत असतं. तिचं इंग्रजी नावही खटकत असतं. शिवाय तिचा जन्म ऑस्ट्रेलियातच झाला हेही; जेव्हा की, तिच्या स्वत:च्या लहान मुलीचा जन्म ऑस्ट्रेलियातच झालेला असतो. ही दोन्ही कुटुंबं कैक वर्षांपासून ऑस्ट्रेलियात राहत आहेत, तरीही त्यांना एकाच धर्मातील असून हा भेद वाटतच असतो. हे फारच सटलपणे येतं. मनात आलं- भारतीयांना तर धर्मच काय, जाती- जातीतलाच नव्हे तर एकाच जातीतल्या उपजातींविषयीही आकस बाळगणे माहिती आहे; तिथं हे फार काही नाही. 
चित्रपटातील अलीच्या लग्नाचं दृश्य तर विशेष आहे. अलीच्या लग्नात त्याच्या नववधूचा पेहराव हा ख्रिस्ती वधूप्रमाणे पांढराशुभ्र वेडिंग गाऊन आहे. चेहऱ्यावर जाळी आहे. चित्रपटात रजिस्टरपद्धतीचं एक लग्नही आहे. ज्यात मुस्लिम वधू-वराला लग्न कुबूल आहे म्हटल्यानंतर ‘किस’ करायला सांगितलं गेलं. ते पाहताना लक्षात आलं की, ऑस्ट्रेलियातील मुस्लिम साहजिकच स्थानिक चालीरीतींशी एकरूप झालेला असणार. ऑस्ट्रेलियन मुस्लिम समाजात हे घडत असणार. जसं- भारतात लग्नाआधी मुस्लिम कुटुंबातही बांगड्या भरण्यासाठी बायकांना बोलावलं जातं. सुहागन म्हणजेच सवाष्णींना जेवू घातलं जातं. मुस्लिम समाजातील मेहेंदीचा रिवाज हा मुस्लिम लग्नापुरता न उरता तो केव्हाचाच इथल्या एकूण-एक व्यक्तीच्या लग्नाचा भाग झाला आहे. भारतातील हिंदू समाजातही टिळा अगर साखरपुड्यात पूर्वी अंगठी घालण्याचा प्रकार नव्हता, तो बहुतांश वेळा आता पाळला जातो. आता बहुतांश साखरपुडे हे ‘रिंग एक्सचेंज’ने होतात. 
हे असं आपल्या मातीशी एकरूप होणं, एकजीव होऊन सर्व धर्मांतील भावतं ते सोबत घेऊन पुढं जाणं फारच विलोभनीय आहे. हा चित्रपट आंतरराष्ट्रीय पातळीवर मुस्लिम समाजाचं सकारात्मक चित्र तर सहजपणे मांडतोच, त्याचबरोबरीने मुस्लिम समाजांतर्गत विचारधाराही सहजपणे मांडतो. 
एका प्रसंगात अलीला पोलीस अटक करतात. काही वेळाने वडील तिथून त्याची सोडवणूक करतात. मात्र त्यानं तोवर खोटं बोलून स्वत:चं, वडिलांचं नाव घालवलेलं असतं. समाजात त्यांच्या कुटुंबाची चांगलीच नाचक्की केलेली असते. त्यामुळे वडील त्याच्यावर फार नाराज होतात. अली ओशाळतो. त्याला त्याची चूक कळत आहे, हे लक्षात आल्यावर वडील त्याची समजूत काढण्यासाठी म्हणतात, ‘‘असो. हे सारं होणं नियतीनं आधीच ठरवलेलं होतं. हे सारं अल्लाहने तुझ्यासाठी आधीच मुकरर केलं, म्हणून असं घडत गेलं.’’ 
यावर अली अत्यंत मार्मिक हसतो आणि वडिलांना म्हणतो, ‘‘माझ्या चुकांचं तरी खापर अल्लाहवर नका फोडू. माझ्या चुकांसाठी त्याला का जबाबदार ठरवायचं.’’ अलीचा हा विचार आजच्या काळात अत्यंत महत्त्वाचा आहे. ‘सारं काही वर बसलेला तो करत आहे.’ असं म्हणून आपण आपल्या जबाबदाऱ्यांतून पळवाटा काढत असतो. ‘उपरवाले की मर्जी के बगैर एक पत्ता भी नहीं हिलता’ म्हणत त्याच उक्तीला चिकटून राहतो. नियती, देव, अल्लाह, गॉड- अशांच्या नावाने माणसं चुका, विध्वंस करत राहतात. त्यांच्या नावाने किंवा त्यांच्या नावासाठी हा खेळ सुरूच ठेवतात. पण वस्तुस्थिती ही आहे की, माणसं आपल्या कर्माने चुकतात. माणसाने आपल्याकडून घडणाऱ्या चुका आणि पापांची जबाबदारी कुणावर तरी ढकलता यावी म्हणून ही उपरवाल्याची/ वर बसलेल्याची सोय करून ठेवली आहे. किमान आपल्या वाट्याच्या चुकांची जबाबदारी तरी आपण घेऊ- हे जे अली सांगू पाहत आहे, ते फक्त त्याच्या वडिलांसाठी नव्हेच; हा महत्त्वाचा विचार तो आपल्या सर्वांनाच सांगत आहे आणि त्या सांगण्यात कसलाही अभिनिवेश नाही, उपदेश नाही. सहजता आहे. मार्मिक विनोदबुद्धी आहे आणि म्हणून ते मनात रेंगाळत राहतं. अशा छोट्या-छोट्या जागा चित्रपटात फारच खुलून आल्या आहेत आणि म्हणूनच तो लक्षात राहण्याजोगा झाला आहे. 

 

Tags: तिहेरी तलाक तीन तलाक ट्रिपल तलाक डॉन हानी हिनाकौसर खान ओसामा सामी अलिज वेडिंग सिनेमा चित्रपट film cinema triple talak don hany heenakausar khan osamah sami ali's wedding weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

हिनाकौसर खान-पिंजार,  पुणे, महाराष्ट्र
greenheena@gmail.com

पत्रकार, लेखक 


प्रतिक्रिया द्या