डिजिटल अर्काईव्ह (2014-2019)

पुरोगामी ते विश्वगामी... सुखन

हा कार्यक्रम ठाशीव असला, बांधीव असला तरी त्याची उत्स्फूर्तता जबरदस्त असते. स्टेजवरच्या सगळ्यांची ऊर्जा एकत्र येते; तिचा गुणाकार होतो... एक ‘संऊर्जा ’ तयार होते. ते रसायन अक्षरशः वेगळ्या जगात घेऊन जाणारे असते. उर्दू भाषेच्या घडणीचा काळ सहावे ते तेरावे शतक असा मानला जातो. लष्करी छावणीवर बोलली जाणारी ही भाषा, लोकांमध्ये पसरलेली ‘खडीबोली’... आणि त्यावर झालेले संस्कृत, प्राकृत, पर्शियन, अरेबिक अशा अनेक भाषांचे संस्कार. धार्मिक भेदावर उर्दूची चिरफाड सुरू झाली, ती दोन पद्धतीने. उर्दू लिहायची ‘नस्तलिक’ ही लेखनपद्धती आहे आणि देवनागरी लिपीतही ती लिहिता येते. दुसरा भाग उर्दूला एक तर संस्कृतप्रचुर करण्याचा किंवा पर्शियनप्रचुर करण्याचा... भाषेचा हेतू आहे संवाद. माणसांना जोडणं... आणि भाषा वापरली जाते ती संकुचित अस्मितेचे प्रतीक म्हणून. 

आपल्या महाराष्ट्रातल्या, आपल्या पुण्यामधल्या तरुण-मंडळींच्या एखाद्या धमाल आयडियाची भरली- भारली वर्णने आपल्याला अमेरिका आणि दुबईमधल्या मैत्रिणींकडून ऐकायला मिळावीत, ही खूपच लाजिरवाणी गोष्ट... ‘सुखन म्हणजे काव्य, सुखन म्हणजे साहित्यातली अर्थपूर्ण भाषा... प्रतिभाशाली शब्द...’

अर्थात उर्दूचा गंध नसल्यामुळे मी अर्थ केला होता की, हे अर्थातच सुखद भावना आणि सुखद अनुभव असे काही असावे.... म्हणून तत्काळ गुगलमैय्याद्वारे चित्रफिती पाहिल्या. तेवढ्यात अमेरिकेतल्या मित्राने आगामी कार्यक्रमाचे पोस्टर पाठवलं... उर्दू भाषा, साहित्य, शायरी, गझल, कव्वाली यातील सौंदर्य आपल्यासमोर आस्वादक पद्धतीने मांडणारी मैफल.... तीन तास प्रेक्षक श्रोत्यांबरोबर केला एकत्र प्रवास- या साऱ्या कलाकारांनी केलेला.

दि.10 ऑगस्ट 2019 च्या रात्री दादरच्या शिवाजी मंदिरातल्या प्रयोगाच्या जागा त्याच क्षणी नक्की करून टाकल्या. जेमतेम पाऊस, पण पूर्ण कोलमडलेला ट्रॅफिक यातून नाट्यगृहाच्या दाराशी पोहोचलो; तर तरुणाईची तुफान गर्दी... त्यातून वाट काढत स्थानापन्न होतोय्‌ तर पडदा वर गेलाच... आणि नाट्यगृहातून टाळ्या, शिट्‌ट्या, आवाजाचा जोरदार धमाका. मी असे थिरकते वातावरण पाश्चात्त्य संगीताच्या मैफिलींमध्ये पाहिले आहे... पण शिवाजी मंदिरालाही अशी धमाल नवी असावी.

रंगमंचावर गायक, वादक आणि निवेदक असे सारे फनकार! फन म्हणजे उर्दूमध्ये फणा (नागाचा) आणि हुन्नर, कलाकौशल्य असा दुसरा अर्थ... हे ज्ञानही कार्यक्रमादरम्यानच मिळालेले. केस पुरेसे विस्कटलेला ओम (भुतकर) अस्खलित उर्दू जबानमध्ये कार्यक्रमाला सुरुवात करतो...

पुण्यातल्या वेगवेगळ्या पेठांमध्ये राहणारे हे सारे कलाकार सुमारे तीन वर्षांपूर्वी एकत्र आले. यंदाच्या 13 ऑक्टोबरला त्यांना भेटून तीन वर्षे होतील. साऱ्यांना जोडणारा धागा होता उर्दू भाषा... आपण सगळ्या भारतीय भाषांकडे जितक्या सहिष्णुतेने पाहतो, तितक्या उदार हृदयाने या भाषेकडे पाहत नाही. कारण आपण या भाषेवर ‘पाकिस्तानची भाषा’ असा शिक्का मारलेला असतो. सुखनमधल्या एका गाण्यात म्हटलेच आहे की पाकिस्तानमध्ये आणि भारतामध्ये काय पानगळ वेगळ्या प्रकारे होते, की डोळ्यांतलं पाणी वेगवेगळ्या प्रसंगांमध्ये येते...? पण नाही; आपण भाषेवर शिक्का मारून मोकळे होतो. पाकिस्तानचा शिक्का नसेल तर ‘मुसलमानांची’ भाषा असा शिक्का असतोच. कोकणातले किंवा देशावरचे मुसलमान चांगली मराठी सराईतपणे बोलतात. पण बहुसंख्य असे आपण उर्दू काय, हिंदीही जरा दूरच ठेवतो. महानगरांमध्ये आता सक्तीने वापरावी लागते म्हणून ‘हमको-तुमको’वाली भाषा वापरायची.

मुद्दा आहे भाषेच्या प्रेमाचा... सर्व भाषा सुंदर असतात. कारण माणसाच्या जगण्यातून, अनुभवातून आलेल्या ध्वनिचित्रप्रतीकांची अतिशय लयबद्ध रचना असते ती. उर्दूलाही अशी लय, असा डौल आहेच. माझी पत्नी सविता मला सांगते की, तिच्या लहानपणी टीव्हीवरच्या कार्यक्रमांच्या क्रेडिट्‌समधल्या उर्दू अक्षरांचं तिला आकर्षण वाटलं. कॉलेजमध्ये गेल्यावर तिला उर्दू माध्यमात शिकलेल्या मैत्रिणी भेटल्या. तिचे भाषा प्रेम वाढलं. मानसशास्त्रात एम.ए. करत असताना तिला कळलं की, मुंबई विद्यापीठाचा उर्दू विभाग सर्वांसाठी म्हणून प्रत्येक आठवडाअखेरीचे भाषा अभ्यासक्रम तयार करत आहे. तिने तीन वर्षे सलगपणे अभ्यास करून हा डिप्लोमा मिळवला. तेव्हा काही जवळच्यांनी तिची टिंगलही केली. हिला ‘त्या’ लोकांचं भारीच प्रेम- अशा नजरा आणि शब्द सहन केले. आम्हाला मुलगा झाला तर त्याचे नाव कबीर आणि मुलगी झाली तर समा ठेवायचं, असं आम्ही ठरवलं तेव्हासुद्धा... तुला कबीर नाव आवडणार, अशी तिची संभावना झाली. कबीरासारख्या महात्म्याला- जो कधीचाच गेला जाती-धर्मापल्याड- आमची दृष्टी त्याला कुठे आणून बसवते पाहा... सुदैवाने सविताच्या वडिलांनी (‘आपटे’ आडनाव त्यांचे) तिला पूर्ण पाठिंबा दिला, पण तिच्या आवडीमुळे आमच्या घरात उर्दू भाषेला प्रेमळ आश्रय मिळाला. घरात उर्दू पुस्तके यायला लागली. प्रेमचंद, मंटो, किशनचंदर, इस्मत चुगतई, गुलजार, राजेंद्रसिंग बेदी, जावेद अख्तर या मंडळींशी माझी ओळख झाली. त्यामुळे काही फॅक्ट्‌स माझ्या लक्षात आल्या.

एक तर ही भाषा आपल्या देशात जन्मलेली आहे. ती पाकिस्तानची राष्ट्रभाषा आहे, हे खरं; पण ती भारताचीही राजभाषा आहे. काश्मीरसोबतच उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, तेलंगणा, पश्चिम बंगाल, दिल्ली या राज्यांमध्येही ही अधिकृत राज्यभाषा आहे. उर्दू प्रथमभाषा असणाऱ्यांची संख्या सात कोटींच्या घरामध्ये फक्त भारतातच आहे, तर हिंदीसह उर्दू बोलणाऱ्यांची देशातली संख्याच तीस कोटींवर जाईल. चारशेहून जास्त वृत्तपत्रे या भाषेत प्रसिद्ध होतात. आणि गद्य व पद्य साहित्याची मोठी परंपरा आहेच या भाषेला. रंगमंचावरून ओम सांगत होता- तुम्हाला कदाचित आमच्या कार्यक्रमातले काही शब्द कळणार नाहीत... पण प्रत्येक भाषेचा स्वतःचा ‘आवाज’ असतो... तो तुमच्यापर्यंत पोहोचला, तर भाषा नाही कळली तरी समस्या नाही... भाषा ‘कळल्यासारखी वाटणं’ हे जास्त महत्त्वाचं असतं.

उर्दू जरी हिंदी भाषेला जवळची असली, तरी तिचे ‘अल्फाज’ पेश करण्याचा ढंग वेगळा आहे. शब्दांवरचं वजन, शब्दांचे उच्चार- सारं कसं ‘अदबसे ’ व्हायला हवं. सुखनमधले कलाकार अशा सफाईने हे उच्चार आपल्यापर्यंत पोहोचवतात की देवस्थळी, जोशी, वैद्य, बगाडे, पवार, भुतकर ही यांची आडनावे खरीच आहेत ना, असे वाटायला लागते... आता पाहा, हासुद्धा माझा पूर्वग्रहच नाही का...? यातले सगळे अस्खलित इंग्रजी बोलणारे असते, तर मी त्यांच्या आडनावांची ही यादी आड आणली असती का? असो.  

संपूर्ण कार्यक्रमामध्ये ‘फुटकळ’ पद्धतीने वेळ घालवला जात नाही. गद्य आणि पद्य भाग आलटूनपालटून घेतले जातात. पद्यामध्ये विविधता आणण्याचा प्रयत्न असतो. शब्द, अर्थ तर वेगळे असतातच, पण स्वरमेळ म्हणजे Music Arrangement सुद्धा वेगवेगळी असते. सारंगीसारखे वाद्य वेगळेच वातावरण निर्माण करते. तोच कलाकार ढोलकही धमाल वाजवतो. हार्मोनियमवरचा कलाकार वेगवेगळी वाद्ये वाजवतो आणि तबलानवाझ गातोही खड्या सुरात.

ओम आणि नचिकेत सहज बोलतात. ओम हा उत्तम अभिनेता आहे. (‘मुळशी पॅटर्न’फेम). त्यामुळे तो स्वतःला उत्तम प्रोजेक्ट करतो. तो सहजपणे विनोद करतो... उर्दूमधून... खळखळून हसतो आपण... मातृभाषा म्हणजे जिच्यावर आपण आईसारखे प्रेम करतो ती... सुखन अनुभवताना मिळालेलं हे आणखी एक शहाणपण.

कार्यक्रमाच्या संपूर्ण कालावधीमध्ये पूर्ण संच पूर्ण वेळ रंगमंचावर असतो आणि मुख्य म्हणजे, सादरीकरणाच्या अवकाशामध्ये पूर्ण वेळ एकरूप झालेला असतो. वाद्यवृंदांचे कार्यक्रम असतात ना- ज्यामध्ये नकलाकार स्टेजवर आला की वादक चहा प्यायला जातात- तसे इथे होत नाही. त्यामुळे बांधणी कशी एकसंध आणि सुबक असते. ध्वनीची व्यवस्था कणीदार आणि दाणेदार केलेली आहे. प्रकाशयोजनेमध्ये योग्य वेळी जे बदल होतात, त्यामध्ये श्रोते-प्रेक्षकांना ‘फोकस’ देण्याची दृष्टी असते. रंगमंचाच्या बाहेरून येणारे दोन फोको लाईट्‌स छताकडे पसरणारे होते.... त्या Reflected Light चा वापर करून प्रेक्षागृहातील प्रकाश कमी-अधिक केला जात होता. ओम आणि नचिकेतना जेव्हा सर्व प्रेक्षकांना रंगमंचाच्या स्पेसमध्ये ‘शरीक’ करून घ्यायचं असायचं, तेव्हा त्या दिव्यांची प्रभा तीव्र व्हायची... ओम त्याच्या सर्व सहकाऱ्यांशी, त्याची नावे घेऊन संवाद साधत असतो. बहुधा मध्यंतरामध्ये त्याने पहिल्या रांगेत बसलेल्या ‘मान्यवरां’ची यादी बनवली असावी. कारण तो मलाही मधूनच- ‘तो अर्ज है, डॉक्टरसाब’ अशासारखी साद घालत होता.

हा कार्यक्रम ठाशीव असला, बांधीव असला तरी त्याची उत्स्फूर्तता जबरदस्त असते. स्टेजवरच्या सगळ्यांची ऊर्जा एकत्र येते; तिचा गुणाकार होतो... एक ‘संऊर्जा ’ तयार होते. ते रसायन अक्षरशः वेगळ्या जगात घेऊन जाणारे असते. उर्दू भाषेच्या घडणीचा काळ सहावे ते तेरावे शतक असा मानला जातो. लष्करी छावणीवर बोलली जाणारी ही भाषा, लोकांमध्ये पसरलेली ‘खडीबोली’... आणि त्यावर झालेले संस्कृत, प्राकृत, पर्शियन, अरेबिक अशा अनेक भाषांचे संस्कार. धार्मिक भेदावर उर्दूची चिरफाड सुरू झाली, ती दोन पद्धतीने. उर्दू लिहायची ‘नस्तलिक’ ही लेखनपद्धती आहे आणि देवनागरी लिपीतही ती लिहिता येते. दुसरा भाग उर्दूला एक तर संस्कृतप्रचुर करण्याचा किंवा पर्शियनप्रचुर करण्याचा... भाषेचा हेतू आहे संवाद. माणसांना जोडणं... आणि भाषा वापरली जाते ती संकुचित अस्मितेचे प्रतीक म्हणून.

आपल्या समाजामध्ये एका बाजूने जगव्यापकता येते आहे, तर दुसरीकडे आपण प्रादेशिक, धार्मिक, जातीय अस्मितांना नको तेवढे टोकदार करायला लागलो आहोत. खुद्द पाकिस्तानमध्येसुद्धा पंजाबी-सिंधी भाषेचे प्राबल्य असलेल्या मोठ्या भूभागामध्ये उर्दूला ‘मुजाहिरा’ची भाषा म्हणून हिणवले जाते. फाळणीच्या काळामध्ये भारतातून आलेल्या निर्वासितांची भाषा. म्हणजे तिथेही उर्दूचा संपूर्णपणे स्वीकार नाहीच. माणुसकीच्या व्यापक अस्मितेच्या आतमध्ये जेव्हा संकुचित अस्मिता नांदतात तेव्हा देवाण-घेवाण होते, अभिसरण होते आणि विकास होतो. सुखन्‌सारखे उपक्रम घडतात. कोणत्याही भाषेमध्ये माणसे वैश्विक भावनाच अनुभवतात. त्यांचे प्रेम, द्वेष, राग, लोभ सारं एकाच माणूस म्हणूनच्या पातळीवर असते... हे एकदा मान्य केलं की, तुम्ही प्रत्येक शेर जास्त enjoy करायला लागता. सुखन्‌चे वैशिष्ट्य हे आहे की, हा अनुभव आपल्याला सगळ्या कोंदट व्याख्यांमधून दूर काढतो. Nothing Really matters... तुमचं वय, भाषा, जात, स्तर... आस्वाद घ्या... आपलेपणाने आस्वाद घ्या... भाषेबरोबर येणारी संस्कृतीची समृद्धी अनुभवा... कव्वाली किंवा गझल गाताना प्राचीन भारतीय संगीतातली सरगम कशी पर्शियन घाटाच्या काठाशी लागतेय पाहा... सूफी संतांची आळवणी नामा-तुक्याच्या आर्ततेबरोबर कशी जुळतेय ते अनुभवा... गझलमधला विरह आणि विराणीमधली वेदना कशी एकाच नाळेची आहे पाहा.

तीन तासांच्या शेवटी आपल्या लक्षात येतं की- अरे, सगळेच आपले दोस्त आहेत... ज्यांना दुश्मन म्हणत होतो, त्यांना हमसफर करण्याची जादू मिळाली तर कळेल की- दोस्ती हा मुळातला स्वभाव आणि दुश्मनी म्हणजे त्यावर लटकणारं बांडगूळ... शब्द-सूर-ताल-लयीच्या एका चरमसीमेला ही मैफल जेव्हा पोहोचते, तेव्हा सारे नाट्यगृह एक झालेले असते... रंगमंच आणि प्रेक्षक एकत्वाच्या आनंदात डुंबत असतात... हात ताल धरत असतात, शरीर थिरकत असतं, विस्फारलेले डोळे अनुभव साठवत असतात... हळूहळू सारे शब्द मागे पडतात... उरते फक्त भावना... त्यानंतर उरते फक्त लय... त्यात एकरूप होणारे सर्व... आणि हे सारं जेव्हा अचानक शांत होतं तेव्हा जाणवतो... शांततेतला अनाहत नाद... प्रत्येक मनाला व्यापकतेचा विेश्वरूप अनुभव देणारा!

 कार्यक्रमाचा सुगंध साठवत परतत होतो तर विचार आला- ‘पुरोगामी’ हा शब्द आता पुरेसा कलुषित झालाय आणि त्या शब्दाला ‘प्रतिगामी’ नावाचा विरोधी शब्द आहेच... त्यामुळे दोन्ही शब्द होतात Judgemental... सुखनसारख्या अनुभवांना आणि उपक्रमांना ‘विेश्वगामी’ का म्हणू नये? आपणच उभारलेल्या तट-बुरुजांच्या भिंती सपाट केल्याशिवाय व्यापक आकाश दिसणार कसं? वैचारिक विचारमंथनांमधून कधी काय परिवर्तन होईल तो वेगळा विषय... पण साहित्य, संगीत, कला यातला अनुभव मनस्वी, भावनिक आणि तरीही बुद्धीला तेज देणारा असेल तर कल्लोळातून जाणाऱ्या समाजासाठी किती ओशासक! घाईगर्दीने जगून घेण्याच्या नादामध्ये आपण अनुभवांच्या क्षणांना अंगावर घेतो, पण आतमध्ये भिजत नाही. ना त्या क्षणांचा आपलेपणाने स्वीकार करतो, ना त्यातलं सौंदर्य शोधतो.

अर्ज किया है.

जल्दबाजीमें अब बस्‌, साँस ही ली जाती है
जिंदगी कहाँ अब, फुरसतसे जी जाती है
शुक्रिया, सुखन!... मनात उतरून शहाणं केलंत!

Tags: Sukhan anand nadkarni आनंद नाडकर्णी सुखन weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या