डिजिटल अर्काईव्ह (2014-2019)

प्राचीन भारत : स्त्रियांची कामे

एकूण मौर्य काळात आपल्याला स्त्रियांच्या कामामधे विविधता आढळते. कष्टकरी कुटुंबातील स्त्री कुटुंबाच्या शेती, दूध, मासेमारी यात सहभाग घेते. ती त्यासाठी घराबाहेर पडते. भटक्या जमातीतील स्त्रियादेखील पोटापाण्याच्या हुनरामध्ये, गाणे, नाचणे, सोंगे काढणे, डोंबारखेळ यात सहभाग घेतात. अतिगरीब व भूमिहीनातून दासी, देवदासी, वेश्या, गणिका इत्यादी व्यवसाय निर्माण होतात. उच्चवर्णीयातील निराधार स्त्रियांना घरच्या घरी सूतकताईचे काम मिळू शकते. काहींना विद्यार्जनाची संधी मिळते. तर काही स्त्रिया परिस्थितिवश सर्वसंगपरित्याग करून साध्वी, संन्यासिनीही बनतात. या सर्वांमधून कौटिल्य दोन गोष्टींकडे अधिक लक्ष देतो. एक म्हणजे यातून राज्याच्या तिजोरीत कशी भर पडेल. त्यासाठी बंधकी वेश्यांना बाळगणाऱ्यांनाही तो सोडत नाही. दुसरे म्हणजे राज्याची सुरक्षा, त्यासाठी आवश्यक हेरगिरी. या हेरगिरीसाठी पार साध्वींपासून ते रूपजीवा वेश्यांपर्यंत सर्वांचा तो वापर करून घेऊ शकतो.  

प्राचीन म्हटले की भारताच्या इतिहासात सुमारे पाच हजार वर्षे मागे जावे लागते. लिखित साहित्य मात्र तीन हजार वर्षांपूर्वीचे उपलब्ध होते. वर्तमान कालगणनेपूर्वीचा सुमारे हजार वर्षे व नंतरची पाच शतके असा दीड हजार वर्षांचा कालखंड आजच्या विषयासाठी प्राचीन धरला आहे. या कालखंडात भारताचा भौगोलिक विस्तार सध्याचे पाकिस्तान, अफगाणिस्तान, नेपाळ, म्यानमार व श्रीलंका यांना सामावून घेत होता. या कालखंडात ज्या स्त्रियांचा गौरवाने उल्लेख होतो, त्यात लोपामुद्रा, गार्गी, सुलभा या विदुषी वा तत्त्ववेत्त्या म्हणून पुढे येतात. 

लोपामुद्रा ही राजकन्या व अगस्त्य ऋषींची पत्नी ऋग्वेदातील पहिल्या मंडळातल्या 179 व्या सूक्तात उल्लेखिली आहे. पहिल्या मंडळातील 27 सूक्ते अगस्त्यांच्या नावे आहेत. त्यातली पहिली चौदा इंद्र व मरुद्गण यांच्या स्तुतिपर आहेत. त्यानंतर रतिदेवतेला अर्पण केलेले हे सूक्त आहे. त्यातला लोपामुद्रा- अगस्त्य यांचा संवाद असा आहे. 

लोपामुद्रा असे म्हणते आहे- कित्येक वर्षांपासून रात्री अशाच सरतात आणि मग सकाळ होते. माझी गात्रे आता शिणू लागली आहेत. उभयता धडधाकट असताना पुरुषाने पत्नीजवळ समागमास्तव जावे हे उचित नव्हे काय? पूर्वी जे सत्यनिष्ठ व व्रतस्थ मुनी होऊन गेले, त्यांनीदेखील पत्नीशी समागम केला होताच ना! अगस्त्य ऋषींना तपस्येशिवाय आपली पती व पुरुष म्हणून काही सांसारिक कर्तव्ये आहेत, याची जाणीव होते. एवढेच नव्हे तर ते लोपामुद्रेला कबुली देऊन टाकतात की, तिच्या बोलण्याचा परिणाम तात्काळ आणि तीव्र स्वरूपाचा झाला आहे. या संवादातून तिचे आत्मनिष्ठ व्यक्तित्व प्रकट होते आणि पूर्वीच्या ऋषिमुनींचा तिने केलेला उल्लेख हे आत्मिक साधना व शरीरधर्म यांच्यात विरोध नाही, असे तिचे मत सूचित करतात. पण एवढ्यावरून तिला तत्त्ववेत्ती म्हणण्यास मी तयार नाही. ती स्वयंप्रज्ञ आहे, आत्मनिष्ठ आहे आणि त्यामुळेच या संवादाला ऋग्वेदात स्थान मिळाले आहे, हे मात्र तितकेच स्पष्ट आहे. 

वेदकाळानंतरच्या तीन-चारशे वर्षांत म्हणजे वर्तमान गणनापूर्व सातव्या शतकात उपनिषदांची रचना झाली असावी असे समजतात. त्यातले एक महत्त्वाचे उपनिषद हे बृहदारण्यक होय. त्याचे कर्ते याज्ञवल्क्य ऋषी होत. त्यांचे तीन गंभीर संवाद यामध्ये शब्दबद्ध झालेले आहेत. त्यातला पहिला त्यांची पत्नी मैत्रेयी हिजबरोबर आहे. संवादाची सुरुवात अशी होते- याज्ञवल्क्य मैत्रेयीला बोलावून सांगतात की, ‘मी आता सर्वसंगपरित्याग करणार आहे. तेव्हा कात्यायनी आणि तुझ्यामध्ये वाटणी करणार आहे.’ मैत्रेयी म्हणते की- ‘पतिदेव, तुम्ही जर मला सगळ्या जगातली संपत्ती बहाल केली तर तिने मी अमर होईन काय? जर नसेन होणार तर तिचा मला काही उपयोग नाही. मला असे काही द्या की, त्याने मी अमरत्वाकडे जाईन.’ त्यावर ऋषिदेव उत्तरतात- तुझ्यावर माझे किती प्रेम आहे, तुला ठावूकच आहे आणि आता तर तू माझ्या अंतरीचे गुजच जाणू इच्छितेस. बैस जवळ अन्‌ लक्ष देऊन ऐक. मग ते मैत्रेयीला जगात प्रेम करतो ते आपण स्वत:साठी करत असतो, म्हणून हा ‘स्व’ कोण आहे ते जाणले पाहिजे असे समजावून सांगतात. सगळे चराचर जग हे आत्मस्वरूप आहे, हा सिद्धांत तिला विवेचन करून सांगतात. 

याच उपनिषदात पुढे राजा जनकाने भरविलेल्या विद्वत्सभेत याज्ञवल्क्याचा वाचक्नुची मुलगी गार्गी हिजबरोबर संवाद आलेला आहे. त्यात दोन भाग आहेत. पहिल्यात गार्गी ऋषिदेवांना विचारते- जग जर पाण्याने भरले आहे तर मग पाणी कशाने? याला उत्तर मिळते, ‘हवा’. ही प्रश्नमालिका पुढे चालू राहते आणि ब्रह्मलोकाशी येऊन ठेपते. शेवटी ऋषिदेव गार्गीला सांगतात की, अशा प्रकारे परमोच्च देवतेबद्दल विचार करणे योग्य नव्हे, तेव्हा ती थांबते. पण पुन्हा ती दोनच प्रश्न विचारते. स्वर्गाच्या वरती पृथ्वीच्या खालती त्यांच्या मधल्या भागात काय आहे, होते अन्‌ असेल? 

याज्ञवल्क्य म्हणतात- अव्यक्त आकाश भरून राहिले आहे, होते अन्‌ असेल. मग ते कशात भरून आहे? ते आहे अविनाशी, अक्षर तत्त्व, असे उत्तर मिळते. इथे आपल्याला गार्गी ही तत्त्ववेत्ती असल्याचा प्रत्यय येतो. याच उपनिषदाच्या शेवटच्या भागात गर्भधारणेचे विधी दिले आहेत. त्यात बराच मनोरंजक भाग आहे, तो सोडला तरी एक उल्लेखनीय गोष्ट आहे ती ही की, ज्यांना कन्या संतती हवी असेल आणि तीसुद्धा पंडिता हवी असेल, त्यांनी तिळासह भात शिजवून तुपासह ग्रहण करावा अर्थात आधी सांगितलेल्या मंत्रयुक्त समागमानंतर! म्हणजे त्या काळात काहींना आपली मुलगी शिकून पंडिता व्हावी असे वाटत असावे. वेदउपनिषद काळाच्या आढाव्यानंतर आपण हे म्हणू शकतो की, तत्कालीन समाजातील ज्या समूहांना शिक्षणाची, ज्ञानार्जनाची संधी उपलब्ध होती, त्यांच्यात तुरळक प्रमाणात स्त्रियांनादेखील तो लाभ घेता येत होता. ज्या आपल्या पतीबरोबर वादसंवाद करीत होत्या, त्या स्वतंत्र विचाराच्या होत्या, पण विदुषी होत्या असे मात्र नव्हते. गार्गीसारख्या अपवादस्वरूप या ब्रह्मवादिनी म्हणून गणल्या गेल्या. त्यावेळच्या विद्वत्सभा या राजाश्रयाने होत आणि विजयी होणाऱ्या विद्वानास पशुधनाच्या रूपात पारितोषिक मिळत असे. 

ज्ञान हे अर्थार्जनाचे साधन असताना त्यात स्त्रियांचा सहभाग नगण्य होता. त्यानंतर आणखी तीन-चार शतके ओलांडून आपण मौर्य साम्राज्याकडे येऊ. या काळात राज्यव्यवस्था आकाराला आली होती. कायदा, न्यायप्रणाली, करांमधून मिळणारे उत्पन्न व आंतरराष्ट्रीय व्यापार आणि संरक्षणासाठी सैन्य व हेरयंत्रणा अशी राज्याची वेगवेगळी अंगे विकसित झाली होती. या सर्वांचा एकत्रित विचार करण्याची गरज वाटल्याने कौटिल्याने अर्थशास्त्र या ग्रंथाची रचना केली. त्यात पूर्वसूरींच्या मतांचा परामर्श घेतला गेला आहे. हा ग्रंथ आदर्श व्यवस्थेचे चित्र रंगवतो का त्यात तत्कालीन समाजाचे प्रतिबिंब उमटले आहे,  असा प्रश्न उपस्थित केला जातो. 

त्या काळच्या इतिहासाच्या अभ्यासाची इतर साधने उपलब्ध असल्याने तत्कालीन समाजाची व स्त्रियांच्या सामाजिक सहभागाची काही निश्चित माहिती आपल्याला कौटिल्याकडून मिळू शकते. उच्चवर्णीय स्त्रिया घरी बसून सूतकताईचे काम करू शकत. सवर्ण जातीतील विधवा, प्रौढ कुमारिका, अपंग, परित्यक्ता स्त्रियांसाठी हा उदरनिर्वाहाचा मार्ग होता. त्यांना माल पुरवणे व सूत नेणे या कामासाठी दासींची योजना केली जाई. गुलाम म्हणून स्त्रियांची खरेदी विक्री त्या काळात रूढ होती. त्या विविध ठिकाणी दासी म्हणून काम करीत. दासींमधल्या वृद्धादेखील सूत कातत असत. त्यात राजदासी, देवदासी तसेच मातृका म्हणजे वेश्यांच्या आया यांचा समावेश होई. गुन्हेगार महिलांना दंड भरण्यासाठी सूतकताईचे काम दिले जाई. स्त्रिया कूळ म्हणून शेतीतील उत्पन्नाच्या अर्ध्या वाट्याने शेती करीत, असा उल्लेख अर्थशास्त्रात सापडतो. त्यांना अर्धसीतिका असे म्हटले आहे. 

चंद्रगुप्ताच्या साम्राज्याचा विस्तार उत्तर व वायव्य भारतात असल्याने ही प्रणाली अन्यत्र होती असे संभवत नाही. या व गोपालन करणाऱ्या कुटुंबांतील स्त्रियांना दिवंगत पतीने घेतलेले कर्ज फेडणे भाग असे. इतर स्त्रियांना पतीच्या कर्जातून सूट मिळे. याचा अर्थ शेती व गोपालन हे बऱ्यापैकी कमाई देणारे व्यवसाय स्त्रिया सांभाळू शकत. शेती, दूध, मासे इत्यादी बाजाराला घेऊन जाण्याची स्त्रियांना मुभा होती. चारण-तालवाचार म्हणजे गाणारे व नाचणारे यांच्या भटक्या जमाती होत्या. त्यांच्या स्त्रिया कोणत्या पुरुषासोबत जातात यावर निर्बंध नव्हते. सवर्ण स्त्रियांवर मात्र ते होते. सामान्यपणे त्या अनिष्कासिनी (म्हणजे घराबाहेर न पडणाऱ्या) असत. 

गाणारे, नाचे, वाजंत्रीवाले, शाहीर, सोंगाडे, डोंबारी या व्यवसायातल्या स्त्रियांना वेश्यांसाठी असलेले नियम लागू होते. त्या काळच्या श्रेणीबद्ध समाजामध्ये वेश्याव्यवसायही त्या धर्तीवर बेतलेला होता. त्यांच्यासाठी वेगळ्या अमलदाराची नेमणूक होती. त्याला गणिकाध्यक्ष म्हणत. सर्वोच्च पदी असलेली व दरबारी मासिक वेतनावर नेमलेली म्हणजे गणिका. तारुण्य, सौंदर्य नि कलागुण यांनी संपन्न असलेलीच या पदाला पात्र ठरे. ती कायम राजासोबत त्याच्या आज्ञेत राही व त्याच्या पाहुण्यांचे आदरातिथ्य व मनोरंजन करी. अशी गणिका ही राजसंपत्ती असल्याने तिच्या वाटेस जाणाऱ्याला कठोर शिक्षा असे. तिची आई, मुलगी व दासी यांच्या सुरक्षेचीदेखील योग्य तजवीज असे. इतर वेश्यांमधे रूपजीवा म्हणजे आपल्या रूपसंपदेवर निर्वाह करणारी, स्वतंत्रपणे गिऱ्हाइके घेणारी असे. 

नगराच्या दक्षिण भागात राजाचे इतर कर्मचारी, दुकानदार यांच्या शेजारात राहण्याची त्यांना परवानगी होती. लष्कराच्या तळात त्यांच्यासाठी जागा ठेवलेली असे. शिवाय हेरगिरीसाठी त्यांचा वापर केला जाई. काही रूपजीवा या राणीच्या सेवेत तैनात असत. बंधकी या वस्तीतील वेश्या ठराविक मालक वा मालकिणीच्या हुकमाप्रमाणे काम करीत. त्यांना मोकळीक कमी पण जीवित व निर्वाहाची हमी जास्त असे. बंधकींचे पोषक हे रूपजीवांपेक्षा अधिक दराने कर भरणा करीत. देवदासींची प्रथा तेव्हा रूढ होती, त्यांच्यापैकी काही श्रीमंत असून त्यांनी आराध्य देवीच्या देवळांना देणग्या दिल्याचे उल्लेख आहेत. पण कौटिल्याच्या राजकारणात त्यांचा फार सहभाग दिसत नाही, त्यामुळे अर्थशास्त्रात त्यांचा ऊहापोह नाही. तत्कालीन ग्रीक राजदूत मेगॅस्थेनिसच्या नोंदीवरून असे दिसते की, राजाच्या अंगरक्षणासाठी धनुर्धारी स्त्रीसैनिक असत व त्या शिकारीसाठीदेखील राजासोबत असत. राजस्थानातील काही समकालीन शिल्पांमधे घोड्यावर स्वार झालेल्या स्त्रीचे शिल्प आढळून येते.

एक तर्क असा आहे की, या स्त्रिया जंगलनिवासी भिल्ल आदी जमातींपैकी असाव्यात. या जमाती शूर व निर्भीड असल्याचा कौटिल्याचा अभिप्राय अर्थशास्त्रात मिळतो. त्या काळात स्त्रिया संन्यास घेत होत्या का? बौद्ध व जैन धर्मांमध्ये आपल्याला भिक्षुणी व साध्वी आढळतात. वेद व धर्मशास्त्रामधे तशी तरतूद नाही. परंतु मौर्यकाळात तशा सर्वसंगपरित्याग केलेल्या महिला होत्या असे उल्लेख सापडतात. अर्थशास्त्रामध्ये ब्राह्मणातील परिव्राजिका व अवैदिकातील भिक्षुकींचा उल्लेख येतो. पैकी परिव्राजिकांचा उपयोग उच्चपदस्थ अधिकाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी करावा व त्यासाठी यांना अधिकाऱ्यांच्या घरी त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्याच्या निमित्ताने पाठवावे. मुंडा व वृषालींचा अशाच तऱ्हेने हेरगिरीसाठी वापर करावा असे कौटिल्य सांगतो. 

गावोगाव फिरणाऱ्या स्त्रियांचा व्यापक प्रमाणावर हेरगिरीसाठी उपयोग करणारा कौटिल्य हा प्रमुख राजनीतिज्ञ म्हटला पाहिजे. पीडित स्त्रियांना अशा स्त्री संन्यासिनींचा आधार वाटत होता. एकूण मौर्य काळात आपल्याला स्त्रियांच्या कामामधे विविधता आढळते. कष्टकरी कुटुंबातील स्त्री कुटुंबाच्या शेती, दूध, मासेमारी यात सहभाग घेते. ती त्यासाठी घराबाहेर पडते. भटक्या जमातीतील स्त्रियादेखील पोटापाण्याच्या हुनरामध्ये, गाणे, नाचणे, सोंगे काढणे, डोंबारखेळ यात सहभाग घेतात. अतिगरीब व भूमिहीनातून दासी, देवदासी, वेश्या, गणिका इत्यादी व्यवसाय निर्माण होतात. उच्चवर्णीयातील निराधार स्त्रियांना घरच्या घरी सूतकताईचे काम मिळू शकते. काहींना विद्यार्जनाची संधी मिळते. तर काही स्त्रिया परिस्थितिवश सर्वसंगपरित्याग करून साध्वी, संन्यासिनीही बनतात. 

जंगलनिवासी स्त्रिया आपल्या पारंपरिक तीरकमठा कौशल्याचा वापर करून राजाच्या अंगरक्षक दलात सामील होतात. या सर्वांमधून कौटिल्य दोन गोष्टींकडे अधिक लक्ष देतो. एक म्हणजे यातून राज्याच्या तिजोरीत कशी भर पडेल. त्यासाठी बंधकी वेश्यांना बाळगणाऱ्यांनाही तो सोडत नाही. दुसरे म्हणजे राज्याची सुरक्षा, त्यासाठी आवश्यक हेरगिरी. या हेरगिरीसाठी पार साध्वींपासून ते रूपजीवा वेश्यांपर्यंत सर्वांचा तो वापर करून घेऊ शकतो. जैन ग्रंथात कौसंबीचा राजा शतानिक याच्या मृत्यूनंतर त्याची राणी मृगावती ही राज्याची सूत्रे हाती घेते व राजपुत्र उदयन मोठा होईपर्यंत कारभार सांभाळते अशी माहिती मिळते. तिचा कालखंड वर्तमान गणनेपूर्वी सहासात शतके मानला जातो. वर्तमानगणनापूर्व दुसऱ्या शतकात दक्षिणेकडील सातवाहन राज्यात नयनिका ही राणीच होती असे नाही तर ती सैन्याचे नेतृत्वही करीत असे. 

प्राचीन आणि मध्ययुगाच्या सीमारेषेवर उभा असलेला कालिदास हा महाकवी मेघदूत या काव्यातून तत्कालीन मध्य भारतातल्या स्त्रियांबद्दल काही संकेत देतो. हे काव्य आपण ज्याच्या तोंडून ऐकतो तो यक्ष उत्तरेतल्या राज्यातला एक महत्त्वाचा कर्मचारी आहे. कामात कसूर केल्यामुळे त्याला दूरवर पाठवण्यात आले आहे. पत्नीशी ताटातूट झाल्याने तो कळवळत आहे. मेघाकडे निरोप देताना तो मधल्या प्रदेशाचे वर्णन करतो, त्यात ज्या नगरी येतात, त्यात मेघाला दिसणाऱ्या स्त्रियांमधे उल्लेख होतात, नर्तकींचे व गणिकांचे. कालिदासाचा वाचक हा अभिजन वर्गातला असल्यामुळे की काय शेतात राबणारी स्त्री ही या काव्यात डोकावत नसावी.
 
प्राचीन भारतातील स्त्रियांच्या कामाच्या इतिहासाचे काही तुकडे तेवढे आपण पाहिले. त्यावरून ठळकपणे लक्षात येते ते त्यांच्या कामातले वैविध्य. समाजव्यवस्थेने निराधार केले असताना पुढे होऊन पडेल ती जबाबदारी स्वीकारण्याची त्यांची तयारीसुद्धा दिसून येते. सूतकताईपासून नवऱ्याने घेतलेले कर्ज असेल किंवा राज्यकारभार असेल, त्या त्या गोष्टी पेलताना त्या दिसतात. उच्चवर्णीयातल्या स्त्रिया पुरुषांच्या बरोबरीने ज्ञानसंपादन, राज्यशासन व सैन्यनेतृत्व या कामात सहभागी झाल्या होत्या अशी तुरळक का होईना उदाहरणे सापडतात. 

अर्थात याचबरोबर स्त्रियांची गुलामी, पुरुषी लैंगिक गरजा भागविण्याचे साधन बनून जगणे, उच्चवर्गाचे मनोरंजन करण्यासाठी नृत्यगायनादी कला अवगत करून त्या सादर करीत राहणे, तसेच स्त्री म्हणून असलेल्या रूपगुणकला इत्यादींचा हेरगिरीसाठी वापर करू देणे, या गोष्टीदेखील इतिहासात आपल्याला दिसतात. त्या पुरुषसत्ताक प्रणालीच्या निदर्शक आहेत. पण या सर्वावर कडी करणारी गोष्ट म्हणजे वेश्या व्यवसायातून मिळणाऱ्या उत्पन्नावर कौटिल्य आकारत असलेला कर. तुमचे शरीर ही पुरुषसत्तेची मालमत्ता आहे, सबब त्यातून मिळणारे उत्पन्न त्यातला वाटा आमचा आहे, असाच संदेश त्यातून दिला गेला. 

(12 व 13 जानेवारी 2019 रोजी पुणे येथे झालेल्या ‘विचारवेध संमेलना’तील हे भाषण आहे. ‘शिक्षण व रोजगार’ ही या संमेलनाची थीम होती.)                   
 

Tags: vicharvedh विचारवेध आशुतोष जावडेकर Ashutosh bhupatkar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

आशुतोष भुपटकर
vicharvedhindia@gmail.com

लेखक, संशोधक 


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके

कर्तव्य

सर्व पहा