डिजिटल अर्काईव्ह (2014-2019)

अमेरिकेतल्या शोधयात्रेत मला आनंदीशी संबंधित वास्तू आणि माणसंही शोधायची होती. हे शोध पूर्णत्वाला नेण्यासाठी मी दोन वर्षांनी परत अमेरिकेत येणार आहे; आनंदीला आधार देणाऱ्या कार्पेंटरमावशींची पणती नॅन्सी कॉब स्टोन सापडणार आहे; हे मला तेव्हा ठाऊक नव्हतं. 1991 मध्ये सर्वांत महत्त्वाचा होता आनंदीच्या समाधीचा शोध. आनंदीच्या इच्छेनुसार तिचा रक्षाकलश अमेरिकेत पुरला जाईल, असं विधान कॅरोलिनच्या पुस्तकात होतं. त्या काळी एका हिंदू मुलीचा रक्षाकलश ख्रिश्चन दफनभूमीत पुरला गेला असेल? शंभराहून अधिक पावसाळे, हिमवर्षाव सोसून ती समाधी अजून उभी असेल? अमेरिकेहून परतण्याचे दिवस जवळ येत चालले होते. मन आनंदीचं स्मृतिस्थान पाहायला अधीर झालं होतं. 

तिची माझी ओळख 1965 सालापासूनची. ते तिच्या जन्मशताब्दीचं वर्ष होतं. मी शाळकरी मुलगी होते. सत्यकथा मासिकाच्या मुखपृष्ठावर तिचं छायाचित्र होतं. गोलगोबरा पण गंभीर चेहरा. डोळे विचारात हरवलेले. 

‘‘कोण या आनंदीबाई जोशी?’’ 
आई म्हणाली, ‘‘पूर्वी मुलींना शिकवत नसत, पण या अमेरिकेत जाऊन डॉक्टर झाल्या!’’ तेव्हा ठावूक नव्हतं, की काही दशकानंतर ही आनंदी माझं जीवन व्यापून उरणार आहे. 

सन 1989ची गोष्ट. अमेरिकेतील अशोक गोरे यांनी मला एक पुस्तक दिलं. कॅरोलीन डॉल या अमेरिकन लेखिकेनं लिहिलेलं ते आनंदीचं चरित्र होतं. मी वाचायला सुरुवात केली. पूर्ण झालं तेव्हाच ठेवलं. यापूर्वी मी आनंदी गोपाळ कादंबरी वाचली होती. पण कांदंबरीतल्या आनंदीपेक्षा ही आनंदी वेगळी होती. अनेक नव्या गोष्टी या पुस्तकामुळे मला कळल्या. मात्र कॅरोलीननं आनंदीच्या कॉलेजजीवनाची माहिती फार त्रोटक दिली होती. स्त्रीलढ्याला तर स्पर्शही केलेला नव्हता. पण या चरित्रामुळे आनंदीचं आत्मकथन जिवंत राहिलं होतं. आनंदी गोपाळ कादंबरी वाचताना वाटे की होती आनंदी हुषार; पण गोपाळरावांनी तिला मारून- मुटकून शिकवलं म्हणून ती डॉक्टर झाली. ते चित्रण चुकीचं होतं. डॉक्टर व्हायचं स्वप्न तिचं होतं. तिचं 10 दिवसांचं बाळ मरण पावलं, तेव्हा तिला वाटलं की आपल्या देशाला स्त्री-डॉक्टरांची गरज आहे. मग मीच का डॉक्टर का होऊ नये? दु:खाचा उंबरठा ओलांडून 12 वर्षांच्या मुलीनं भव्य स्वप्न पाहिलं. कादंबरीकारानं आनंदीवर अन्याय केला होता. तो आपण दूर करायचा, असं मी ठरवलं.

नाशिकचे लेखक श्यामसुंदर आढाव यांनी मला काशीबाई कानिटकरलिखित आनंदीच्या चरित्राची प्रथमावृत्ती भेट दिली. ते म्हणाले, ‘‘हे काम जरूर करा.’’ काशीबाई आनंदीच्या समकालीन. एका स्त्रीनं लेखणीला सखी मानून, सत्यनिष्ठेनं दुसऱ्या स्त्रीचं चरित्र लिहिणं, ही गोष्ट त्या काळी अपूर्वाईची होती. कॅरोलीन आणि काशीबाई म्हणजे आनंदीच्या जीवनाकडे पाहणारे दोन डोळे होते. या दोन्ही चरित्रांनी माझ्या मनात अनेक प्रश्न उभे केले. आनंदीचं कॉलेजजीवन, शिक्षक, मैत्रिणी, अभ्यासक्रम, तिचा प्रबंध यांविषयी फारशी माहिती त्यांत नव्हती. आनंदीच्या मनोविकासाच्या दृष्टीनं सर्वांत महत्त्वाचं पर्वच अंधारात राहिलं होतं. 
या चरित्रांचा अभ्यास केल्यावर काही वादग्रस्त जागा जाणवल्या. आनंदीला नक्की भावंडं किती? तिच्या वडिलांचे किती विवाह झाले? आनंदीनं ख्रिश्चन धर्म स्वीकारावा म्हणून डीन बॉडले यांनी खरंच तिला छळलं का? वैद्य मेहेंदळे यांनी तिला औषध देण्याचं नाकारलं ही दंतकथा की सत्य? अशा प्रश्नांचा गुंता सोडवण्यासाठी तिचं नव्यानं चरित्र लिहायलाच हवं होतं. माझा मन:प्रवास विसाव्या शतकातून एकोणिसाव्या शतकाकडे सुरू झाला. प्रत्येक माणूस त्याच्या काळाशी बांधलेला असतो. त्यामुळे आनंदीला, तिच्या स्वप्नांना, संघर्षांना समजून घ्यायचं, तर तिच्या काळातील समाजकल्पना, रूढी, सामाजिक, वैचारिक संघर्ष, राजकीय परिस्थिती, ब्रिटिश सुधारणावाद हे सारं जाणायला हवं होतं. 

कालाभ्यासासाठी मी शंभरेक पुस्तकांची यादी तयार केली. जगन्नाथ शंकरशेठ, दादाभाई नौरोजी, आगरकर, टिळक, ज्योतिबा फुले यांसारख्या अनेक समाजधुरिणांची चरित्रं मी वाचली. आनंदीशी संबंधित बापूसाहेब केतकर, आवडाबाई भिडे, पंडिता रमाबाई, वैद्य बापूसाहेब मेहेंदळे यांच्या जीवनाचा अभ्यास केला. दोनेक वर्षं मी खास वाचनाचा आनंद उपभोगला. दादरच्या मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयात जाऊन बसले आणि पुस्तकांचे दरवाजे उघडले की धोतरपागोटी ल्यालेली, कोणत्या ना कोणत्या विचारानं पेटून उठलेली माणसं अनुनासिक स्वरांत माझ्याशी बोलू लागायची. ‘बांधवहो तुम्ही विचारकलहास इतके का भिता’ असं विरोधकांना निर्मळपणे विचारणारे आगरकर भेटले, तेव्हा त्यांची उंची पाहून थक्क झाले. दादोबा तर्खडकरांनी मला त्या वेळच्या पंतोजींच्या शाळा दाखवल्या. पंडिता रमाबार्इंनी हंटर कमिशनपुढे दिलेली साक्ष ऐकताना आनंदीच्या आकांक्षेची समाजाभिमुखता स्पष्ट झाली. 

याच वेळी कल्याणच्या पारनाक्यावरचं आनंदीचं माहेरघर सापडलं. ऐतिहासिक वास्तूला भेट देताना विधानात्मक इतिहासाचं रूपांतर चित्रमय प्रत्ययात होतं. तसंच आता झालं. गल्लीबोळ ओलंडत मी आनंदीच्या घरापाशी गेले आणि दारातच थबकले. हाच उंबरठा ओलांडून आनंदी तत्कालीन स्त्री-जीवनाच्या कुचंबलेल्या परिसरातून बाहेर पडली. तिनं स्वत:ची जीवनमूल्यं व ज्ञानलालसा जोपासली. हा उंबरठा किती रूढींचं प्रतीक ठरला असेल! तो ओलांडून आत जाताना मन थरारलं. समोर होतं एक ढासळलेलं, उजाड घर. दालनात दगडगोटे. भुरभुरणारं गवत. या वास्तूच्या जित्याजागत्या दिवसांत आनंदी इथे वावरली होती. कसा असेल तो वाडा? मनात प्रश्न आला आणि पाठीमागून उत्तरही मिळालं. चांगल्या अवस्थेतलं घर मला आठवतं.’’ पुढच्या माडीत राहणाऱ्या सुशिलाबाई जोशी म्हणाल्या. हा तिखांबी वाडा म्हणून ओळखला जायचा. घराचे दोन भाग. मध्ये माडीवर जाणारा जिना. खालचं माजघर एवढं मोठं की 75 माणसं जेवायला बसू शकत. ते तगरीचं झाड दिसतंय ना, तिथं कारंज होतं. पारिजाताजवळ विहीर होती. ‘‘इथं मोर यायचे. आज माझा मुलगा विश्वास राहतो ती नगाऱ्याची माडी होती.’’ सुशिलाबार्इंच्या शब्दांतून पडकी वास्तू स्वत:च्या पायावर उभी राहिली. कारंज थुईथुई नाचू लागलं. पारिजात दरवळला. नगारखान्यात सनई-चौघडा वाजू लागला... 

आता पुढचं पाऊल उचलायचं. आनंदीला शोधत अमेरिकेत जायचं. त्या दूरस्थ किनाऱ्यावरून आनंदी हाकारत होती. अशोक आणि मनिषा गोरे यांच्या सहकार्यानं मी 1991 च्या सप्टेंबरमध्ये फिलाडेल्फियातील आनंदीच्या कॉलेजमध्ये जाऊन पोहोचले. कॉलेजच्या तळघरात पुरातत्त्व विभाग होता. तिथे मला काळजीपूर्वक जतन केलेले दुर्मीळ दस्तावेज सापडले. आनंदी, तिच्या शिक्षिका, सहाध्यायिनी  यांच्या नावांच्या फाईल्स होत्या. त्यात माहिती-पत्रकं, कात्रणं, पत्रव्यवहार, होता. आनंदीनं निळ्या रंगाच्या मोठ्या वहीत, कोरीव हस्ताक्षरात लिहिलेला प्रबंध मला वाचायला मिळाला. याव्यतिरिक्त स्मरणिका, अभ्यासक्रमाच्या वार्षिक पुस्तिका, स्त्री-डॉक्टर्सची चरित्रं, त्यांच्या चळवळींवरील पुस्तकं असा घसघशीत खजिना प्राप्त झाला. 

हाताशी जेमेतेमे महिना होता. अभ्यास करावा तितका थोडा होता. पण विभागप्रमुख जेनेट मिलर यांनी माझी अडचण ओळखून सर्वतोपरी सहकार्य केलं. काही पुस्तकं मला घरी नेऊ दिली. या अभ्यासामुळे मला सर्व प्रश्नांची उत्तरं मिळाली. जेनेटबार्इंना आनंदीविषयी खूप उत्सुकता होती. तेव्हाची सामाजिक परिस्थिती, स्त्री-जीवनातील अडचणी यांविषयी वैचारिक देवाणघेवाण व्हायची. माझं काम संपलं. निरोपाचा दिवस येऊन ठेपला. जेनेटबार्इंनी मला प्रशस्तिपत्र दिलं. त्यात त्या म्हणतात, ‘Our experience with Dr. Kirtane was warm and genuine. Her personal courtesy, research skills, methodology and diligence made her an excellent visiting scholar and contributed much to our information about Dr. Joshi. मला एवढंच वाटलं की आनंदीच्या कॉलेजात माझी चांगली आठवण  मागे राहिली.

अमेरिकेतल्या शोधयात्रेत मला आनंदीशी संबंधित वास्तू आणि माणसंही शोधायची होती. हे शोध पूर्णत्वाला नेण्यासाठी मी दोन वर्षांनी परत अमेरिकेत येणार आहे; आनंदीला आधार देणाऱ्या कार्पेंटरमावशींची पणती नॅन्सी कॉब स्टोन सापडणार आहे; हे मला तेव्हा ठाऊक नव्हतं. 1991 मध्ये सर्वांत महत्त्वाचा होता आनंदीच्या समाधीचा शोध. आनंदीच्या इच्छेनुसार तिचा रक्षाकलश अमेरिकेत पुरला जाईल, असं विधान कॅरोलिनच्या पुस्तकात होतं. त्या काळी एका हिंदू मुलीचा रक्षाकलश ख्रिश्चन दफनभूमीत पुरला गेला असेल? 

शंभराहून अधिक पावसाळे, हिमवर्षाव सोसून ती समाधी अजून उभी असेल? अमेरिकेहून परतण्याचे दिवस जवळ येत चालले होते. मन आनंदीचं स्मृतिस्थान पाहायला अधीर झालं होतं. आता इतकं संशोधन तेव्हा सहजसुलभ नव्हतं. इमेल, इंटरनेट, मोबाईल यांच्यावाचूनचा तो काळ होता. त्यामुळे माणसंच मार्गदर्शक ठरत. शेवटी अशोक गोरे यांचे स्नेही विराज सरदेसाई यांच्या मदतीनं समाधीचा थांगपत्ता लागला. माझ्या रोजनिशीतील नोंद अशी-- 28 सप्टेंबर 1991 ‘पोकीप्सी रूरल सिमेट्री’च्या कार्यालयातून बाहेर पडून आम्ही मृतांच्या निस्तब्ध गावात प्रवेश केला. हवेत सुखद गारवा. हिरवीगार शांतता. टेकाडांतून धावणारे नागमोडी रस्ते. चवऱ्या ढाळणारे वृक्ष. आम्ही ए 216 एमी लॉट या विभागात पोहोचलो. ही कार्पेंटरमावशींची माहेरची दफनभूमी. अकाली मृत्यू पावलेल्या कार्पेंटरमावशींच्या बाळांची छोटी थडगी दिसली. तिथेच त्यांची मानसकन्या आनंदी विसावली होती. 

मी अलगद तिच्या पाषाणदेहाला स्पर्श केला. खडबडीत दगडी त्वचेचा गार स्पर्श. थडग्यावरची अक्षरं फिकट झाली होती. ब्रेललिपी वाचावी,तसं अक्षरांच्या खाचांतून बोट फिरवून मी ती स्पर्शानं वाचली. बोटांनी आनंदीचं नाव गिरवताना वाटलं, मी आनंदीलाच स्पर्श केला आहे. त्या समाधीवर आम्ही आनंदीला आवडणारी गुलाबाची फुलं वाहिली. आनंदीचा रक्षाकलश इथे पुरला गेला त्या दिवशी सारे स्नेहीजन जमले असतील. अंगावर दुखवट्याचे काळे पोशाख. हातात फुलं. ओठांत प्रार्थना. डोळ्यांत आसवं. मनात स्मृतींच्या अस्वस्थ येरझारा! आनंदीच्या समाधीपाशी माझे पाय खिळले. शंभरेक वर्षांपूर्वीचं दु:ख मी विसाव्या शतकात मूकपणे अनुभवलं. 

संध्याकाळ झाली. घरी परतायचं होतं. मी मागे वळून समाधी डोळ्यांत साठवून घेत होते. त्याच क्षणी मनात वीज चमकली, आपण आनंदीवर लघुपट केला तर? ’ ‘लघुपट? छे, काही तरीच! अमेरिकेला येतायेता पैसे संपले आणि म्हणे लघुपट काढणार!’ 
‘प्रयत्न करायला काय हरकत आहे?’ मनात द्वंद्व. 

आनंदीनं मला एक विलक्षण स्वप्न दिलं. लघुपटाचं स्वप्न जोजवत मी भारतात परतले. आनंदीची संघर्षकथा सारांशरूपानं मांडणारा लघुपट करायचाच असा मी निश्चय केला. हा माझा पहिलाच लघुपट. संशोधन, पटकथा व संवादलेखन, निर्मिती आणि दिग्दर्शन या सर्व आव्हानात्मक जबाबदाऱ्या मी शिरावर घेतल्या. अनुभवाच्या मांडवाखालून गेल्याशिवाय प्रशिक्षण मिळत नाही. डॉक्युड्रामा पद्धतीनं मी लघुपट केला. गोपाळरावांची भूमिका दिलीप प्रभावळकरांसारख्या कसलेल्या अभिनेत्यानं केली. आनंदी साकारली अनुजा बिनीवाले आणि क्षमा खांडेकर या गुणी मुलींनी. 

लघुपटनिर्मितीच्या काळात मी जणू सर्कशीतला ट्रॅपीझचा जीवघेणा खेळ खेळत होते. उंचावरच्या एका झोपाळ्यावरून दुसऱ्या झोपाळ्यावर झेपावताना अंदाज चुकला तर खोल गर्तेत पडायचं भय होतं. पण अचूक झेप घेता आली,तर अपूर्वसा आनंद वाट्याला आला असता. या दिवसांत मी प्रचंड आर्थिक ताणतणाव अनुभवले. खिशात चार आणे आणि मनात स्वप्नाची चंद्रकोर! एकीकडे निर्मितीचा आनंद. दुसरीकडे दिवाळखोरीचं भय. पण सुखाप्रमाणे दु:खाचाही अनुभव प्रेरक असतो. प्रतिकारशक्तीच्या पांढऱ्या पेशींत वाढ होते. लघुपटनिर्मिती हा अत्यंत ताणतणावाचा, सर्व शारीरिक, मानसिक शक्तींची मागणी करणारा, दाहक तरीही नितांतसुंदर आणि चैतन्यानं मोहरलेला अनुभव असतो. एकदा घेतला की पुन:पुन्हा घ्यावासा वाटतो. 

लघुपटासाठी मी आणि माझा नवरा सतीश चिकाटीनं झुंजलो. होते नव्हते तेवढे पैसे पणाला लावले. कर्ज काढलं. बाळासाहेब इनामदार, नवलमलजी फिरोदिया यांसारखी या स्वप्नाचं मोल  ओळखणारी माणसंही भेटली. सर्वोत्कृष्ट लघुपटाचं पारितोषिक मिळालं. आनंदीमुळे माझी माझ्याशी नव्यानं ओळख झाली. आजवर न वापरलेली मन:सामर्थ्यं या प्रवासात वापरली गेली. किंबहुना ती सामर्थ्यं माझ्यापाशी आहेत, याची मला जाणीव झाली. व्यक्त व्हायला नवं माध्यम मिळालं. त्यानंतर मी अनेक संशोधनपर लघुपट केले. ग्रंथ लिहिले. 

लघुपटनिर्मितीपेक्षाही त्याचा प्रसार अवघड आहे. त्याच्या प्रदर्शनाचे सर्वसामान्य मार्ग उपलब्ध नाहीत, हे कळलं. ते मार्ग निर्माण करावे लागतात. तरीही गेली 25 वर्षं आम्ही माझे लघुपट गावोगावी, देशविदेशात दाखवले. त्याच्या जोडीला रसिकांच्या प्रश्नोत्तरांना वेळ दिला. शैक्षणिक संस्थांतून प्रयोग करून भावी पिढीला आनंदीची प्रेरक कथा सांगितली. मुंबईतील के.ई.एम. हॉस्पिटलच्या नव्वदीच्या समारंभात आनंदीबार्इंचा लघुपट दाखविण्यात आला. तरुण डॉक्टर्स, त्यांचे प्राध्यापक यांनी गच्च भरलेल्या भव्य सभागृहानं उत्फूर्तपणे आनंदीला मानवंदना दिली, तेव्हा मला भरून पावलं. आनंदीचं आणि माझं नातं झाडासारखं वाढत गेलं. 

बाल्टिमोरच्या मराठी अधिवेशनात कार्पेंटराच्या वारसदार नॅन्सी कॉबस्टोन भेटल्या. त्यांनी लघुपट पाहिला. त्यांच्या घरी मला आमंत्रित केलं. मुलाखत दिली. जुनी पत्रं दिली. त्यांनी जपून ठेवलेल्या आनंदीच्या बशीत मला जेवण वाढलं, तेव्हा तर घशांत आवंढा आला. तिच्या शतकोत्तर सुवर्णमहोत्सवी जन्मदिनी मी लिहिलेल्या चरित्राची तिसरी आवृत्ती प्रसिद्ध झाली. मुंबईत आणि लंडनला. पाठोपाठ चौथीही आवृत्ती निघाली. लघुपटानंतर लघुपटाची रोजनिशी प्रसिद्ध झाली. काशीबाई कानिटकरलिखित आनंदीच्या चरित्राची श्रेयस आवृत्ती संपादनासाठी माझ्याकडे आली. 

वेगवेगळ्या वाटांनी आनंदी माझ्या जीवनात परत परत येत राहिली. आनंदीला अवघं 22 वर्षांचं आयुष्य लाभलं. पण एकोणिसाव्या शतकातील आनंदी एकविसाव्या शतकातही जिवंत आहे. तिच्यावर कादंबरी, नाटक, लघुपट, दूरदर्शनमालिका, एकपात्री कार्यक्रम झाले. कोणी चरित्राचं अभिवाचन केलं. वादळात फडफडणाऱ्या एका ज्योतीनं किती तरी मनं प्रज्वलित केली. नुकताच आनंदीवर ‘आनंदी गोपाळ’ हा चित्रपट आला आहे. मी चित्रपट पाहिला. आनंदीनं परत माझ्या मनाचं दार ठोठावलं. तिच्यावरील चित्रपटाविषयी लिहायलाच हवं असं मला वाटलं. 

चित्रपट हे सर्वदूर पसरणारं, लोकप्रिय व प्रभावी माध्यम आहे. निरक्षरांपर्यंतही ते पोहोचतं. त्यामुळे इतिहासात स्थान असलेल्या व्यक्तीवर चरित्रात्मक चित्रपट करणं ही एक गंभीर जबाबदारी असते. ते जोखमीचं काम असतं. मनाला येईल तसं भरकटून चालत नाही. कारण ती काल्पनिक गोष्ट नसते. चित्रपटाच्या प्रारंभी दिसणाऱ्या आणि ऐकू येणाऱ्या निवेदनात म्हटलं आहे की, ‘आनंदीबार्इंच्या जीवनातील काही घटनांवर हा चित्रपट आधारित आहे; त्यात काल्पनिकतेचा भाग आहे. तो सत्यतेचा दावा करत नाही.’ पण चरित्रपट करताना अशी पळवाट शोधून भागण्यासारखं नसतं. सत्याशी प्रतारणा न करता, घटनाप्रसंग पुनरुज्जीवित केले जाणं अपेक्षित असतं. चित्रपटात कल्पनेच्या वापरावर बंदी नाही. मात्र पात्राच्या चरित्राचं, चारित्र्याचं आणि काळाचं भान राखून चरित्रपटात घटना, प्रसंग, संवाद कल्पावे लागतात. या मर्यादेत कल्पनाशक्तीचा वापर अपेक्षित असतो. आनंदी गोपाळ यांचं जीवन मुळातच प्रासंगिक, सामाजिक, वैचारिक, भावनिक नाट्यानं आणि समरप्रसंगांनी ओतप्रोत आहे. त्यांच्याविषयी चरित्रात्मक माहितीही उपलब्ध आहे. सत्याशी, वास्तवाशी इमान राखून चित्रपटनिर्मिती करणं अशक्य नव्हतं. पण तसं घडलं नाही. 

कलात्मक स्वातंत्र्याच्या नावाखाली, मन मानेल तसे बदल केल्यानं आणि मूळ चरित्र बासनात गुंडाळून टाकल्यानं चित्रपटात विविध उणीवा निर्माण झाल्या आहेत. आपल्या मुलीतील बौद्धिक चमक प्रथम ओळखली ती आनंदीबार्इंचे वडील गणपतराव यांनी. त्यांनी तिला शिक्षण दिलं. ही मुलगी मोठेपणी कर्तृत्ववान होणार आहे, याचं भान त्यांना आलं. त्यांच्या घरी येणाऱ्या गोपाळरावांशी जर तिचं लग्न झालं तर ते तिला शिकवतील असा त्यांचा कयास होता. लग्नापूर्वीही गोपाळरावांनी तिला शिकवलं होतं. ही माहिती आनंदीनंच कॅरोलीन डॉलला दिली होती. परंतु चित्रपटात  गणपतरावांना स्त्रीशिक्षणाचे विरोधक ठरवलं आहे. ते म्हणतात, ‘कुलवंतांच्या घरात मुलींना शिकवणं शोभेल का? स्त्रीचा महत्त्वाचा गुण म्हणजे संसारदक्षता.’’ 

आनंदीबाई आणि तिचे वडील यांतील नातं अतिशय मधुर आणि मनमोकळं होतं. गणपतराव काळाच्या पुढे गेलेले होते. मग त्यांना परंपरावादी ठरवून त्यांच्यावर अन्याय करण्याचं कारणच काय? तीच गोष्ट आनंदीच्या व्यक्तिरेखाटनाची. ‘मी अमेरिकेला एकटी जाईन,’ असा एकदा शब्द दिल्यावर आनंदी त्यावर ठाम राहिली. चित्रपटातील आनंदी मात्र बोटीवर चढेस्तोवर गोपाळरावांना विरोध करते, ‘‘का तुमचा मला अमेरिकेला पाठवायचा हट्ट?’’, ‘‘माझी अमेरिकावारी काही चुकत नाही.’’ ‘‘तुम्ही येणार नसाल तर मी जाणार नाही.’’ अशी विधानं करून अमेरिकेला एकटीनं जायची आपली अनिच्छा दर्शविते. तिच्या मनाविरुद्ध बळेबळे गोपाळराव तिला अमेरिकेला पाठवतात, असा समज चित्रपटातून निर्माण होतो. हे चित्रण ध्येयनिष्ठ आनंदीवर अन्याय करणारं आणि तद्दन खोटं आहे. 

हा चित्रपट जर आनंदीऐवजी एखाद्या काल्पनिक मुलीवर असता तर पटकथाकार व दिग्दर्शक हवं ते रंगवायला मोकळे होते. पण हे चारित्र्यहनन आहे. आनंदीच्या जीवनातील मौलिक प्रसंग गाळून गोपाळराव कसे पुढारलेले होते, हे प्रस्थापित करण्यासाठी अनेक काल्पनिक आणि बटबटीत प्रसंग चित्रपटात निर्माण केले आहेत. गोपाळरावांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारण्याचं नाटक केलं आणि नंतर परत हिंदू धर्मात प्रवेश केला, ही घटना आनंदीच्या मृत्यूनंतरची आहे. त्यामागे जी कारणं होती त्याचा आनंदीच्या अमेरिकेला जाण्याशी काहीही संबंध नव्हता. त्यांनी आनंदीला चर्चमध्ये नेणं; तिला बांगड्या, नथ उतरवायला लावणं; आणि मंगळसूत्र काढण्याची मागणी होताच तिनं निघून जाणं या चित्रपटातील गोष्टी असत्य आणि कालविपर्यास करणाऱ्या आहेत. कालमानपरिस्थितीचं भान न राखता, ज्या गोष्टी त्या काळात घडल्याच नाहीत, त्या गोष्टी कथावस्तूत घुसडणं म्हणजे कालविपर्यास. 

आनंदीच्या पदवीदानसमारंभात गोपाळरावांनी उल्लू तरुणाप्रमाणे शिट्टी वाजविणं आणि आनंदीगोपाळांनी मिठी मारणं या गोष्टी लेखक-दिग्दर्शक यांना काळाचं आणि पात्रांच्या मनोभूमिकांचं भान नसल्याचं दर्शवितात. त्यातून चरित्राची हानी झाली आहे. ही कल्पकता नसून कल्पनादारिद्य्र आहे. आनंदीबार्इंच्या पदवीदानसमारंभासाठी लंडनहून पंडिता रमाबाई आवर्जून आल्या होत्या. त्या चित्रपटात कोठेच दिसत नाहीत. या दोघींतला स्नेहबंधही दुर्लक्षित आहे. त्यांना आणि आनंदीबार्इंना सन्मानानं व्यासपीठावर बसवलं होतं. चित्रपटात मात्र आनंदीला दोन स्त्रिया हात धरून व्यासपीठावर नेतात. आनंदीच्या जीवनातील आणि हिंदुस्तानच्या इतिहासातील तो सुवर्णक्षण होता, पण या तेजस्विनीच्या स्वप्नपूर्तीचा आनंद या प्रसंगातून फुललेला नाही. त्या ठिकाणी तिला सतत खोकायला लावून, तिचं आजारपणच जास्त गडद केलं आहे. 

गोपाळराव या प्रसंगी ओरडून सांगतात, She is the first... She is the first. पण first काय? गोपाळरावांचा गहिंवर दाखविण्यासाठी She is the first Indian woman doctor  हे वाक्य त्यांना पूर्ण करू दिलेलं नाही. गहिंवराचा इतका अतिरेक केला नसता, तर आनंदीबाई या पहिल्या भारतीय स्त्री डॉक्टर होत्या, ही वस्तुस्थिती बापड्या प्रेक्षकांच्या मनावर ठसली असती. 

गोपाळराव आनंदीला तपासणीसाठी एका इंग्रज डॉक्टरकडे नेतात हा असाच एक खटकणारा प्रसंग चित्रपटात आहे. यातून आनंदीच्या डॉक्टर होण्यामागील मूळ प्रेरणेवरच घाला घातला आहे. या देशाला स्त्रीवैद्यांची जरुरी आहे, कारण स्त्रिया पुरुषांकडून तपासून घेत नाहीत, हे आनंदीला अनुभवातून जाणवतं. मग तीच आनंदी पुरुष डॉक्टरकडून तपासून घेते हे आवर्जून दाखवायचं कारणच काय? हा चित्रपट नक्की कोणाचा आहे? आनंदीचा, गोपाळरावांचा की दोघांच्या सहजीवनाचा? या प्रश्नाचं उत्तर शोधताना पटकथाकाराचा कल गोपाळरावांकडे जास्त झुकला आहे. त्यातून चरित्राचा तोल ढळला आहे. 

ज्या कार्पेंटरबार्इंनी आनंदीबार्इंना अमेरिकेत ममत्वानं माहेरघर दिलं, ज्या कुटुंबाशी आनंदीबार्इंचं प्रेमाचं नातं जुळलं, जिथे आनंदीला आपलं हरवलेलं बालपण गवसलं, ते घर आणि ती माणसं चित्रपटात कुठेच दिसत  नाहीत. कार्पेंटरबाई फक्त एकदा दाताच्या डॉक्टरांकडे दिसतात तेवढ्याच. डीन बॉडले व आनंदीच्या इतर शिक्षिका, मैत्रीण कॅरोलीन डॉल यांसारख्या व्यक्तींशीदेखील आनंदीचे उत्कट भावसंबंध होते. त्यांचा मागमूसही चित्रपटात लागत नाही. आनंदीबार्इंच्या कॉलेजजीवनाचं चित्रणही अतिशय चुटपुटतं आणि वरवरचं झालं आहे. आनंदीचा तेथला वावर, तिनं लिहिलेला प्रबंध, वातावरण, वैद्यकीय शिक्षणासाठी तिथं आलेल्या जगभरच्या स्त्रिया यांना वाव दिला असता, तर सुंदर कालचित्रण झालं असतं. आनंदी अमेरिकेत शिकायला का गेली ते प्रेक्षकांच्या मनावर बिंबलं असतं. 

अस्तित्त्वात असलेल्या पात्रांना अडगळीत टाकलं आहे आणि कल्पित पात्रांचं चित्रपटात स्तोम माजवलं आहे. आनंदीच्या विवाहानंतर प्रत्यक्षात तिची विधवा आजी लाडक्या नातीच्या मदतीसाठी आनंदी गोपाळांबरोबर राहते. गोपाळरावांचा धाकटा भाऊही तिथे असतो. या आजीऐवजी गोपाळरावांच्या पहिल्या बायकोची आई विमलाबाई आणि भावाऐवजी गोपाळरावांचा मुलगा कृष्णा यांना आणलं आहे. पात्रांची ही पार्श्वभूमी चित्रपटात बदलण्याचं कारण काय? त्यानं कोणता परिणाम साधला? चित्रपटात विमलाबार्इंना अतोनात महत्त्व दिलं आहे. आनंदाबाईना अमेरिकेला जाता यावं म्हणून त्या आपले दागिने गोपाळरावांच्या हवाली करतात, असा एक प्रसंग रंगवला आहे. खरं तर आनंदी पैशासाठी स्वत:चे दागिने विकते. 

आनंदीच्या श्रीरामपूर येथील भाषणानं प्रभावित झालेले बंगालच्या पोस्टखात्याचे डायरेक्टर जनरल जेम्स वृत्तपत्रातून आवाहन करून एक फंड उभारतात. अन्य पाश्चात्य मंडळीही फंडाला मदत करतात. पण या औदार्याचा उल्लेख चित्रपटात एखाद्या साध्या संवादातूनही केला जात नाही. हा पक्षपातीपणा वाटतो. ख्रिश्चनांचा धर्मांतराचा प्रयत्न, ख्रिश्चन शाळेतील मुलींनी आनंदीला त्रास देणं या गोष्टी रंगवून सांगितल्या जातात. खरं तर आनंदी कोल्हापूरला ख्रिश्चन शाळेत जात नव्हती. संस्थानाच्या सरकारी विद्यालयात जात होती. मुंबईला असताना ती ख्रिश्चन शाळेत होती. परंतु तिथे तिला शाळेतील मुलींनी त्रास दिला नव्हता, तर आजूबाजूच्या माणसांनी छळलं होतं. आनंदीला अनेक ख्रिश्चन स्नेह्यांनी मदत केली असताना, ती दुर्लक्षून ख्रिश्चनविरोधी प्रसंगच अतोनात गडद केले आहेत. 

आनंदी गोपाळांना झालेला विरोध चित्रित करण्यासाठी काही बनावट प्रसंग चित्रपटात रंगविले आहेत. गावकऱ्यांनी गोपाळरावांच्या मुलाला पळवून नेणं; त्याची विटंबना करून त्याला बांधून ठेवणं; गोपाळरावांनी व त्यांच्या फौजफाट्यानं, हातात मशाली घेऊन गावभर भटकणं; हा प्रसंग म्हणजे अतिरंजिततेचा कळस आहे. मशालीच्या प्रकाशात सुंदर दिसणाऱ्या शॉटचा मोह दिग्दर्शकाला आवरला नाही. गोपाळरावांनी आनंदीच्या डोक्यात गजरा माळणं आणि आपल्या या कृतीनं चकित झालेल्यांशी वादावादी करणं, हा प्रसंगही नाटकी वाटतो. त्या काळच्या बायका केसात हौसेनं फुलं माळत, हे खरं. पण गजरा विकत घेऊन माळणं हे गरती स्त्रियांचं लक्षण मानत नसत. तेव्हा अलिबागसारख्या खेड्यात, मालाला उठाव नसताना, कोणता वेडा गजरे विकत बसेल? 

या असामान्य जोडप्याला झालेला समाजविरोध लहान, सुबक पण वास्तवपूर्ण प्रसंगातून टोकदारपणे उभा करता आला असता. तथाकथित सिनेमॅटिक फापटपसाऱ्याची गरज नव्हती. त्यावर जे फूटेज वाया गेलं ते वाचलं असतं आणि आनंदीच्या जीवनातल्या अस्सल नाट्याला जागा मिळाली असती. अकारण चुकीचे तपशील वापरून त्यावर घटनांचे इमले रचणं हेदेखील सत्याची बूज नसल्याचंच लक्षण आहे. उदाहरणार्थ, प्रत्यक्षात बंगालमधलं वातावरण महाराष्ट्रापेक्षाही सनातनी होतं. आनंदी अमेरिकेला जाणार कळताच तिच्या घराभोवती जमून लोकं दिवसभर कसा आरडाओरडा करत याचं वर्णन खुद्द आनंदीनंच केलेलं आहे. चित्रपटात मात्र आनंदी म्हणे बंगाल मेडिकल कॉलेजात जाते. कोठून आलं हे स्त्रियांना प्रवेश देणारं बंगालचं कॉलेज? हिंदुस्तानात शिक्षणाची सोय झाली असेल तर मग ते अर्धवट सोडून आनंदी का अमेरिकेला गेली? इथलं कॉलेज बदलून अमेरिकावारी करायला गोपाळरावांकडे पैशांची खाण होती? 

याच प्रांतातील श्रीरामपूर गावी आनंदीनं ‘‘मी अमेरिकेस का जात आहे,’’ या विषयावर जाहीर भाषण दिलं. स्वतंत्र बाण्याच्या आनंदीला आपल्या वतीनं दुसऱ्या कोणी, अगदी गोपाळरावांनीही बोलावं हे मान्य नव्हतं. अस्खलित इंग्रजीत ती उत्स्फूर्तपणे बोलली. आपल्या विरोधकांना तिनं ठामपणे उत्तर दिलं. व्यक्तिचित्रणाच्या दृष्टीनं अनिवार्य असलेला हा प्रसंग चित्रपटात गाळला आहे. आनंदीच्या त्या भाषणातील काही अंश जरी चित्रित केले असते तरी तिचं व्यक्तिमत्त्व झळाळून उठलं असतं.

चित्रपट प्रतिमा-प्रतीकांच्या आणि चित्रांच्या भाषेत बोलतो. शब्दांचा मोजका वापर करूनही खूप काही व्यक्त करतो. या चित्रपटातील काही प्रसंग अशा अबोल बोलीत चांगले रंगविले आहेत. छोटी आनंदी बावऱ्या, घाबरलेल्या अवस्थेत गोपाळरावांच्या शयनगृहात जाते. घरच्या बायकांनी पढवल्याप्रमाणे म्हणते, ‘‘तुम्हाला काय करायचं ते करा.’’ या बालवधूची अवस्था गोपाळरावांच्या लक्षात येते. ते वात्सल्यानं तिचे अश्रू पुसतात आणि म्हणतात, ‘‘मला एवढंच करायचं होतं.’’ त्यांचा समंजसपणा, भावनाशीलता, या एका वाक्यात प्रकटते. आनंदी जेव्हा प्रथमच मिशनरी शाळेत पाय ठेवते तेव्हा तिच्या समोर एक लांबलचक व्हरांडा दिसतो. आपल्याच तंद्रीत चालणाऱ्या आनंदीसमोर उलगडलेल्या ज्ञानवाटेचं ते प्रतीक वाटतं. त्या वाटेवर आनंदीचा एकटीचा प्रवास सुरू होतो. गोपाळराव दुरून पाहत असतात. शब्दांवाचून चित्रपट बोलू शकतो, याचं हे उदाहरण आहे. मात्र असे अबोल सुंदर क्षण अपवादात्मकच आहेत. 

आनंदी गोपाळांचं काम करणाऱ्या कलावंतांनी भूमिकेवर परिश्रम घेतले आहेत. परंतु मूळ चित्रणच सदोष असल्याने त्यांचे श्रम कारणी लागत नाहीत. हा चित्रपट खरोखरच कसदार झाला असता, तर मला अत्यानंद झाला असता. मात्र काल्पनिकतेचा अतिरेक, सत्यनिष्ठा व जबाबदारीच्या जाणिवेचा अभाव आणि हानिकारक बदल यांचा दुष्परिणाम चित्रपटावर झाला आहे. या संदर्भातील माहिती उपलब्ध नव्हती असा दावा करता येणार नाही. कारण मी लिहिलेल्या ‘डॉ. आनंदीबाई जोशी : काळ आणि कर्तृत्व’ या चरित्रात इत्थंभूत माहिती उपलब्ध आहे. ज्या अर्थी विशेष आभारात माझं नाव आवर्जून घातलं आहे, त्याअर्थी माझं पुस्तक निर्माता-दिग्दर्शकांना ठावूक होतं. आनंदीवरील अन्याय दूर करण्यासाठी मी चरित्र लिहिलं; मात्र या चित्रपटातून परत आनंदीवर अन्यायच झाला. 

हे आनंदी गोपाळ कादंबरीचं चित्रण आहे, असा निर्मात्यांचा दावा असेल, तर मग मला न विचारता; माझी परवानगी न घेता माझ्या नावाचा वापर केला तो कशासाठी? तेही चुकीचंच आहे. या चित्रपटातील चुकांना मी जबाबदार नाही, हे मी जाहीरपणे सांगू इच्छिते. प्रत्यक्षात होऊन गेलेल्या व्यक्तीवर चित्रपट तयार करताना वा ग्रंथ लिहिताना त्या चरित्रातील कोणत्याही माणसाचं असत्य, अप्रामाणिक चित्रण करणं गैर आहे. आनंदीच्या चरित्राची अभ्यासक म्हणून या चित्रपटावर प्रतिक्रिया देणं हे मला माझं कर्तव्य वाटलं. मात्र या चित्रपटाच्या निमित्तानं माझी आणि आनंदीची पुनर्भेट झाली. तिनं मला विचारप्रवृत्त केलं. लिहायला उद्युक्त केलं. भविष्यात आणखी कोणत्या वळणावर, कोणत्या प्रयोजनानं आनंदी मला अवचितपणे परत भेटणार आहे, कुणास ठावूक! 

Tags: अंजली कीर्तने आनंदी गोपाळ anjali kirtane anandi gopal weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

अंजली कीर्तने
anjalikirtane@gmail.com

संशोधक-लेखक 


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके

कर्तव्य

सर्व पहा