डिजिटल अर्काईव्ह (2014-2019)

लढ्याचा प्रारंभ : देवडुंगरी गावात

गावात स्थायिक होणं आमच्यासाठी सोपं नव्हतं. आमच्या प्रत्येक कृतीवर पाळत ठेवली जात होती, त्यातून रोज काही तरी नवं नाट्य व ताण उद्भवण्याची टांगती तलवार डोक्यावर असायची. माहितीविषयक अधिकाराच्या कहाणीत हा सगळा तपशील सांगण्याची काय गरज आहे, असं कोणी विचारू शकतं. पण खुल्या पुस्तकाप्रमाणे मोकळं जीवन जगणाऱ्या लोकांचा संदर्भ समजून घेणं इथे प्रस्तुत ठरेल. कारण, प्राथमिक माहिती अत्यावश्यक असते, या त्यांच्या दैनंदिन जीवनातील आकलनामधूनच माहितीच्या अधिकाराची मागणी पुढे आली. ग्रामीण भागांमधील सर्वसाधारण आकलन असं असतं की- शहरी व भारताच्या अधिक संपन्न भागांमधील लोक बहुतेकदा

देवडुंगरीमध्ये बांबूच्या झुडपांनी वेढलेल्या धुळकट वाटांलगत एका मातीच्या घरात 1987 मध्ये या सगळ्याची सुरुवात झाली. मजदूर किसान शक्ती संघटनेची स्थापना होण्याच्या तीन वर्षं आधीची ही गोष्ट आहे. माहिती अधिकारासंदर्भातील चर्चेला आकार देणाऱ्या घटना व संवादांना त्या खोपट्याने निवारा दिला आणि हे घरच पुढील घटनाक्रमासंबंधीचं एक ठोस विधान, एक प्रतीक व मूक साक्षीदार बनून गेलं. ब्यावरमध्ये 1996 मध्ये माहिती अधिकाराच्या मागणीसाठी निदर्शनं करणाऱ्या गटामध्ये सहभागी झालेले इंडियन एक्स्प्रेसचे माजी संपादक अजित भट्टाचारजी लिहितात-

राजस्थानच्या दुर्गम भागात असलेलं देवडुंगरी हे नमुनेदार गाव थंडगार व खडकाळ अरवली डोंगररांगांच्या उतारावर वसलेलं आहे. तिथल्या डोंगराच्या माथ्यावर एक लहानसं मंदिर आहे. इथली काळी माती अगदी रखरखीत आहे. पाण्याची मोठीच वानवा असल्यामुळे थोड्या-थोडक्या पाण्याला अमूल्य मानलं जातं. इथे खोल विहिरींमधून पाणी   काढतात नि खडकाळ मातीमध्ये खणलेल्या खळग्यांमध्ये ते साठवलं जातं. हा परिसर अगदी रखरखीत असला, तरी त्यात विलक्षण चैतन्यशीलताही आहे. धान्याची पिवळसर शेतं आणि प्रत्येक शेताला घातलेलं दगडी कुंपण, यांमुळे या तपकिरी भूप्रदेशाला भौमितिक आकृतिबंधाचं रूप आलं आहे. खडकाळ जमिनीवर उपजीविका करण्यासाठी इथले लोक पाठ मोडेपर्यंत कष्ट करत आले आहेत, असं दीर्घ इतिहासाचं प्रातिनिधिक चित्र या आकृतिबंधाद्वारे दृश्यमान होतं.

गावातलं जगणं साधं असतं. घर आणि कामाचं ठिकाण यातल्या सीमा अस्पष्ट असतात. लाकूड कापताना, स्वयंपाक करताना, झाडू मारताना आणि जेवताना महत्त्वाचे संवाद व वादविवाद होतात. कधी मधेच कोणी शेजारी आला तर त्यामुळे बोलणं अर्धवट राहातं, कधी जेवण वाढायच्या गोंधळातच संभाव्य पर्यायांविषयी मनात आलेलं थेट व्यक्त केलं जातं, कधी भांडी घासताना असहमतीचे मुद्दे मांडले जातात; त्यावर आणखी चर्चेची व तोडगा काढण्याची गरज असते. या सतत सुरू असलेल्या चर्चेमध्ये चिकित्सक मर्मदृष्टींची बीजं सामावलेली असतात.

राजस्थान सुंदर आहे. इथे शुष्क तपकिरी व धुळकट धुक्याच्या वातावरणामध्ये नेत्रदीपक सौंदर्य लपलेलं पाहायला मिळतं. राजस्थानच्या मध्य भागात राहणाऱ्या लोकांचा भवताल अरवली पर्वतरांगांनी व्यापला असून भारतातील सर्वांत जुनी पर्वतरांग अशी अरवलीची ओळख आहे. प्राचीन अवशेष शोधण्यात रुची असलेल्यांना इथे आजही अतिशय जुन्या स्मृतिखुणा वागवणारे जीवाश्म सापडू शकतात. आता हे सगळे अवशेष खणून काढले जात आहेत, इमारती व इतर बांधकामांसाठी सगळ्या टेकड्या खोदण्याचं काम सुरू आहे. जयपूर-दिल्ली महामार्गावरही हे दृष्टीस पडतं.

आम्ही (निखिल डे, शंकर सिंग, त्यांची पत्नी अंशी व मी) 1987 मध्ये देवडुंगरीत आमच्या कामाची सुरुवात केली. चौकडिया खेड्यातील हग्गू व जैत सिंग यांनी आम्हाला त्यांच्या घरामध्ये जागा दिली.

या प्रदेशामध्ये सरंजामशाहीच्या खुणा अजूनही दिसतात. इथलं जगणं कष्टप्रद आहे, सुपीक जमीन अभावानेच आढळते आणि अधून-मधून दुष्काळ पडत राहिल्यामुळे परिस्थिती आणखीच बिकट होते. या जमिनीत उगवणाऱ्या पिकावर अवलंबून असलेले बहुतांश लोक रात्री भुकेल्या पोटीच झोपी जातात. सरंजामशाहीचं युग इतिहासजमा झालं असलं, तरी सामाजिक विषमता व प्रशासकीय अन्याय इथे अजूनही टिकून आहे. या सगळ्या वातावरणातही इथल्या लोकांची सचोटीची वागणूक, रंगीबेरंगी कपडे, मोहक गाणी, विलक्षण मिथ्यककथा, बोलीभाषा व हसत-खेळत संवाद साधण्याची वृत्ती, यांमुळे या प्रदेशातील पारंपरिक संस्कृती जिवंत आहे. सतत वाहणारा चैतन्याचा प्रवाह त्यांच्या हसण्यात पाहायला मिळतो. बदल घडवण्याची इच्छा व सामर्थ्य इथे टिकून आहे.

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 40 वर्षांनी- 1987 मध्ये अतिशय भिन्न पार्श्वभूमी असलेल्या तीन व्यक्ती देवडुंगरीमध्ये राहण्यासाठी व काम करण्यासाठी आल्या. यांपैकी अरुणा रॉय यांनी भारतीय प्रशासकीय सेवेचा राजीनामा दिला होता. दूरदृष्टी व अनन्यसाधारण संवादकौशल्य लाभलेले शंकर सिंग हे राजस्थानचेच रहिवासी होते. तर, अमेरिकेतील महाविद्यालयात शिक्षण घेणारे निखिल डे तिथल्या चंगळवादी जीवनशैलीचा उबग येऊन नुकतेच भारतात परतले होते- निखिल यांचे वडील भारतीय हवाई दलामध्ये एअरमार्शल पदावर कार्यरत होते. या तिघांनी गावातील दगड-मातीची एक झोपडी भाड्याने घेतली. अजमेर-भीम महामार्गाला लागून एक कच्चा रस्ता या गावापर्यंत येतो. अजूनही तिथं हे खोपटं उभं आहे. त्यांनी गावातील इतर शेजाऱ्यांसारखंच राहायला सुरुवात केली. ते जमिनीवरच झोपायचे, विहिरीतून पाणी काढून आणायचे, बादल्या डोक्यावरून वाहून न्यायचे, चुलीवर चपात्या नि डाळ शिजवायचे, स्वतःचे कपडे नि भांडी स्वतःच धुवायचे. खोपट्याशेजारची शेळ्यांची जागा त्यांनी स्वयंपाकघर आणि मोरी म्हणून वापरायला सुरुवात केली. संडास बाहेरच्या बाजूला होता.

या तिघांचीही पार्श्वभूमी आणि अनुभवविश्व परस्परांहून अतिशय भिन्न होतं. तिघांमध्ये अरुणा वयाने सर्वांत मोठ्या होत्या, तर निखिल सर्वांत तरुण. अरुणा यांनी सात वर्षं भारतीय प्रशासकीय सेवेत काम केलं होतं. त्यापूर्वी दिल्लीतील इंद्रप्रस्थ महिला महाविद्यालयात काही काळ त्यांनी इंग्रजी वाङ्‌मयाचं अध्यापन केलं. त्या स्वतः याच महाविद्यालयाच्या विद्यार्थिनी. कालांतराने, 1975 मध्ये त्यांनी भारतीय प्रशासकीय सेवेचा राजीनामा दिला आणि राजस्थानातील अजमेर जिल्ह्यात ग्रामीण भागांमधील गरिबांसोबत करणाऱ्या ‘सोशल वर्क अँड रिसर्च सेंटर’  (एसडब्ल्यूआरसी) या ग्रामीण स्वयंसेवी संस्थेमध्ये त्या दाखल झाल्या. एसडब्ल्यूआरसीमधील नऊ वर्षांच्या कामानंतर 1983 मध्ये अरुणा यांनी दुर्गम गावात जाऊन काम करण्याचा निर्णय घेतला. मूलभूत राजकीय व लोकशाही अधिकार वापरण्यासाठी लोकांना सक्षम करण्याच्या उद्देशाने त्यांनी ही दिशा निवडली.

याच दरम्यान, अरुणा व शंकर यांची पहिल्यांदा भेट झाली. गावांमधील शोषण, गरिबी व विषमता याबद्दल दोघांनाही आस्था वाटत असल्याने त्यांची लगेचच मैत्री जुळली. शंकर यांनी प्रौढ साक्षरतेसंबंधी काम सुरू केलं होतं. अनेक आस्थेवाईक ग्रामीण तरुणांप्रमाणे त्यांनाही ग्रामीण राजकारणाची अंगभूत जाण होती. प्रत्येक वैयक्तिक समस्या व्यापक राजकीय संदर्भात पाहण्याची प्रगल्भता त्यांच्यामध्ये होती. शिवाय, स्वतःच्या दृष्टिकोनाची विविध मार्गांनी अभिव्यक्ती करणं शंकर यांना सहज शक्य व्हायचं. त्यांच्या या अतुलनीय संवादकौशल्याची भुरळ अरुणा यांना पडली.

शंकर उपस्थित असतील तिथे औदासीन्य आसपासही कधीच फिरकत नसे. अगदी टीका करत असतानाही ते हसत-खेळत स्वतःचं म्हणणं मांडत. त्यांच्या असण्यानेच वातावरणात चैतन्य निर्माण होत असल्यामुळे त्यांची लोकप्रियताही वाढली. अरुणा व शंकर यांच्यात अनेक प्रश्नांवर सातत्याने वादविवाद होत असत. लिंगभावाच्या प्रश्नावर तर दोघांच्या दृष्टिकोनांमध्ये प्रचंड तफावत होती. शिवाय, भारतासारख्या प्रचंड श्रेणीबद्ध समाजातील जात व धर्माशी निगडित सूक्ष्म विषमतांकडे पाहण्याची दोघांची दृष्टीही भिन्न होती. शब्दार्थ, नाट्य तंत्रज्ञान, नाटकांसाठीची विषयसूत्रं- या विषयांवर त्यांचा शब्दच्छल सुरू असायचा. लोकप्रियता हा चांगल्या नाटकाचा एकमेव निकष असू शकत नाही, समता व न्याय ही मूल्यं नाकारल्याची भरपाई वा त्याचं समर्थन टाळ्या कमावण्यातून होत नाही- असे युक्तिवाद केले जात. अशा वादसंवादांमुळे दोघांनाही काम करण्यात उत्साह वाटायचा.

अजमेर जिल्ह्यातील हरमाडा पंचायत क्षेत्रात अरुणा यांची मैत्रीण नौरती यांनी 1981 मध्ये किमान वेतनाच्या मुद्यावर पहिला संप पुकारला, त्यामध्येही शंकर व अरुणा एकत्र सहभागी झाले होते. कठपुतळ्या आणि विनोदबुद्धी ही त्यांची नेहमीची अस्त्रं सोबत घेऊन शंकर तिथे आले, त्यामुळे संपातील वैरभाव सौम्य होण्याला मदत झाली. यादरम्यान, अरुणा व शंकर यांच्या मैत्रीप्रवासाला आणखी एक खास वळण मिळालं. राजस्थानातच 1983 मध्ये या दोघांची निखिलशी गाठ पडली. तेव्हा ते वीस वर्षांचे होते. उत्कृष्ट शैक्षणिक कारकीर्द सुरू असताना अखेरच्या क्षणी त्यांनी अमेरिकेतील पदवी अभ्यासक्रमाला सोडचिठ्ठी दिली. एका बुद्धिमान, सरळ-साध्या व ‘चांगल्या’ विद्यार्थ्याने महाविद्यालयीन शिक्षण असं का सोडावं, हे न कळल्यामुळे त्यांचे आई-वडील गोंधळून गेले. अमेरिकेतील आजूबाजूचं वातावरण आणि आपल्या लोकांना मदत करण्याची उत्कट इच्छा, यातील वाढता तुटलेपणा असह्य झाल्याने निखिल यांनी अमेरिका सोडून परत यायचा निर्णय घेतला. त्यांना लोकांच्या राजकारणाचा भाग व्हायचं होतं.

शंकर यांच्या मिश्कीलपणाकडे व असाधारण निसर्गदत्त कौशल्यांकडे  निखिल आकर्षित झाले. शंकर व अरुणा यांच्याकडून आणखी शिकायची इच्छा त्यांच्या मनात निर्माण झाली. दरम्यान, अरुणा व निखिल यांची मैत्री झाली होती. अखेरीस, जगण्याविषयी आणि कामाविषयी आपली स्वप्नं सारखीच असल्याचा साक्षात्कार तिघांना झाला.

ग्रामीण भारतातील कामाची सुरुवात करण्यासाठी एखादी संघटना व संदर्भबिंदू शोधण्याच्या प्रयत्नात ते मध्य प्रदेशातील झबुआ इथे गेले. विविध कारणांमुळे त्यांच्या प्रयत्नांना यश आलं नाही, पण त्यांनी शोध सुरू ठेवला. राजकीय विचारसरण्या, तत्त्वं व जीवनशैलीशी जोडलेली विशिष्ट मूल्यं यांमध्ये सामाइकता असलेला अनुरूप मित्रपरिवार ही त्यांची पहिली गरज तर पूर्ण झाली होती. लोकशाही संस्थांची भूमिका आणि नागरिक म्हणून आपल्याला असलेले अधिकार लोकांनी समजून घेण्याची गरज आहे, या मुद्यावर तिघांचंही एकमत झालं. आपण काम करत असलेल्या संघटनेचं स्वरूप व रचना लोकांच्या साथीने विकसित व्हायला हव्यात, असं त्यांचं ठाम मत होतं.

भारतामध्ये असं राजकीय कार्य पक्षीय व्यवस्थेच्या बाहेर राहून करता येणं शक्य आहे. महात्मा गांधी, जयप्रकाश नारायण व इतर अनेकांनी अशा कामाची परंपरा पाडलेली आहे. केवळ सत्ताधाऱ्यांचा रंग बदलल्याने स्वातंत्र्य मिळत नाही. भूक, अस्पृश्यता, गरिबी व हिंसा यांपासून स्वातंत्र्य मिळवायचं असेल, तर पारंपरिक सामाजिक भेदभावाच्या प्रथांविरोधात टिकाऊ लोकचळवळ आवश्यक आहे. डॉ.भीमराव रामजी आंबेडकर यांनी आकार दिलेल्या राज्यघटनेतील अधिकार कृतीत आणण्यासाठी लोकांमध्ये चेतनाजागृती गरजेची आहे, अशी तिघांचीही धारणा होती. शेवटी, शंकर यांच्या लोटियाना गावापासून जवळच असलेल्या देवडुंगरीमध्ये कामाला सुरुवात करण्याचं त्यांनी ठरवलं. देवडुंगरी 35 किलोमीटर दूर असलं, तरी शंकर यांचे अनेक नातलग व त्यांच्या समुदायातील लोक तिथे राहत होते. शंकर यांची पत्नी अंशी यांच्यासाठी ते गरजेचं होतं- त्यांना स्वतःच्या परिसरात व सहजपणे जगता येईल अशा सामाजिक वातावरणात राहायचं होतं.

किमान प्रतिष्ठा असलेलं जीवन, समान वेतन, शालेय शिक्षण, आरोग्यसुविधा आणि काही लोकांना स्वाभाविक सहजतेने मिळणाऱ्या इतर गोष्टी मिळवायच्या असतील, तर गरिबांना कामाची गरज असते. कायद्यानुसार ते समान असतात. पण गरिबांना तुच्छतेने विषम वागणूक सर्वत्र मिळते. सरकार, राजकीय व्यवस्था आणि जातिव्यवस्थेने विभागलेला समाज या सर्व स्तरांवर ते विषमता भोगतात. न्याय व समता असलेलं जग त्यांच्यासाठी स्वप्नापुरतंच उरतं. या पार्श्वभूमीवर, प्रायोगिक स्तरावर सुरू झालेला शंकर, अंशी, निखिल व अरुणा यांचा प्रवास अजूनही सुरू आहे.

ग्रामसमुदायामध्ये भाड्याने किंवा अगदी विकत घेण्यासाठी जागा मिळवणं सोपं नसतं. शंकर यांनी राहण्यासाठी घर शोधण्याचा प्रयत्न सुरू केला. त्यांची चुलत बहीण हग्गूने तिच्या मालकीच्या वापरात नसलेल्या एका झोपडीत राहायची परवानगी या चौघांना दिली. लग्नाआधी हग्गू तिथे राहत होती. घट्ट नात्यांनी बांधलेल्या समुदायात प्रवेश करणं सर्वसाधारणतः अतिशय अवघड जातं, पण शंकर ‘भाऊ’ असल्यामुळे हा प्रवेश तुलनेने सहज झाला. या नात्यामुळेच अरुणा व निखिल यांना सुरुवातीच्या काळात लोकांशी ओळखी करून घेणं सोपं झालं.

देवडुंगरी गाव राजसमंद जिल्ह्यात आहे. दिल्लीहून मुंबईला जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग आठवरील भीम या लहानशा शहरापासून देवडुंगरी आठ किलोमीटरवर आहे. त्या झोपडीरूपी घराला वैयक्तिक व राजकीय स्तरावर विलक्षण मूल्य प्राप्त झालं आहे. बाहेरून परत आल्यावर आम्हाला आश्वस्त करणारी ती जागा. साधेपणा व सामुदायिकता ही मूल्यं जपत जगण्याच्या प्रयत्नाला आश्रय देणारी जागा. आमचे दलित समुदायातील शेजारी व अल्पभूधारक शेतकरी मोहनजी यांनी केलेल्या प्रवाही मांडणीतून माहिती अधिकाराच्या संघर्षाने आकार घेतला, तोही याच जागेत. हक्काचं वेतन मागितल्यावर गरिबांवर अधिकारी संस्थांकडून खोटेपणाचा आरोप केला जातो, यासंबंधीची मांडणी मोहनजींनी केली. ते म्हणाले, ‘‘त्यांच्याकडच्या नोंदी आमच्या हातात येत नाहीत, तोपर्यंत आम्ही खोटारडेच ठरत राहू.’’ माहिती अधिकारासाठीच्या संघर्षाला महत्त्वाचं वळण देणारे हे उद्‌गार होते. भ्रष्टाचार व सत्तेचा मनमानी वापर यांच्या विरोधातील साधन म्हणून पारदर्शकतेची भूमिका किती तर्कशुद्ध व कळीची असते, हे मोहनजींच्या साध्या विधानातून स्पष्ट झालं.

माहिती अधिकारासाठी मजदूर किसान शक्ती संघटनेने सुरू केलेल्या संघर्षाला या घरातील चर्चा व युक्तिवादांनी  ठोस रूप दिलं.

00

लोकांसोबत राहणं अनेक कारणांसाठी महत्त्वाचं होतं आणि आहे. आपल्या जगण्याच्या मर्यादांमध्ये लोकांचे प्रश्न समजून घेण्याचा तोच एकमेव मार्ग आहे. कोणत्याही संघटनेच्या कामाचं मूल्यमापन लोकांच्या नजरेतून करणं आवश्यक असतं. काम व मूल्यं वाटून घेण्याचा हा एक चांगला व्यवहार्य मार्ग होता. देवडुंगरीमध्ये येण्यापूर्वी राजस्थानच्या ग्रामीण भागात नऊ वर्षं काम करताना अरुणा यांनी हा धडा घेतला होता. शंकर तर या समजुतीसोबतच लहानाचे मोठे झाले.

देवडुंगरीला भेट देणाऱ्या अगदी सुरुवातीच्या लोकांपैकी एक होत्या रजनी बक्षी. मुक्त पत्रकार व मजदूर किसान शक्ती संघटनेची अगदी जवळची मैत्रीण असलेल्या रजनी अनेकदा इथल्या घराला भेट देत आणि कुटुंबातल्या एक होऊन तिथे राहत. या चळवळीच्या प्रारंभिक वर्षांची नोंद करणारं लेखन त्यांनी केलं. देवडुंगरीला अनेकदा भेट दिल्यामुळे त्यांच्या या लेखनाला सेंद्रिय स्वरूप प्राप्त झालं.

देवडुंगरी : डांबरी रस्त्याकडेचं जीवन

अरवली पर्वतरांगांच्या उत्तरेकडील टोकाला, थोडं अंतर राखल्यासारखी एक बुटकी टेकडी आहे, त्यावर दगड- मातीचं एक लहानसं मंदिर उभं आहे. इथून जाणारा मार्ग बहुधा प्राचीन काळापासून वर्दळीचाच असावा आणि तेव्हापासून या मंदिरातील ग्रामदेवता त्या वाटेच्या राखणदाराप्रमाणे पहारा देत उभी आहे...

माथ्यावर लहानं मंदिर असलेल्या या बुटक्या टेकडीच्या- देवडोंगराच्या- सावलीत देवडुंगरी हे गाव आहे. या उजाड टेकडीच्या उतारावरच, गावाच्या पूर्व टोकावर एक असाधारण कुटुंब राहतं. त्यांचं दगड-मातीचं घर विविध प्रकारच्या पाहुण्यांचं स्वागत करत असतं. शेजारी राहणारा एखादा इसम इथल्या स्वयंपाकघरात सारवलेल्या जमिनीवर बसून राज्याच्या राजधानीतून आलेल्या वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत जेवताना दिसतो. कधी मुंबईहून आलेला एखादा पत्रकार किंवा शेजारच्या जिल्ह्यातला सीमान्त शेतकरीही त्यांच्यासोबत जेवत असतो. या घरातील कष्ट आणि हास्यकल्लोळात मीही अनेकदा सहभागी झाले आहे. या घरात केर काढणं किंवा शेळीला चारा घालणं, यांसारखी रुक्ष घरगुती कामं करत असताना मला अनेकदा बापू कुटीची आठवण झाली. पण हे साधर्म्य नोंदवणं अवघड आहे. बापू कुटी आणि इतिहास घडवणाऱ्या तिथल्या व्यक्तिमत्त्वाशी तुलना केली, तर देवडुंगरीतल्या माझ्या यजमानांना शरमल्यासारखं होईल. ते केवळ नैसर्गिकरीत्या साध्या पद्धतीने जगण्याचा व काम करण्याचा प्रयत्न करत होते.

या संदर्भात भट्टाचारजी लिहितात ते घर आणि तिथल्या वातावरणामुळे लोक देवडुंगरीकडे आकर्षित होऊ लागले. साधी जीवनशैली राखत असतानाच जगभरातील बदलाच्या संकल्पनांना सामावून घेणाऱ्या या घरामधील व्यक्तींशी आपल्या समस्यांबाबत चर्चा करण्याकरिता शेजारच्या गावांमधले लोकही इथे येत असत. भारतातील नागरी अभिजनवर्गातून आलेल्या आपल्या दोन साथीदारांची स्वप्नं ग्रामीण वास्तवाशी जोडण्याचं काम शंकर सिंग यांनी केलं. त्यांचा जन्म इथल्याच जवळच्या एका गावातील होता. नवनवीन संकल्पना गावाच्या भाषेत गाण्यांमध्ये, नाटकांमध्ये व कठपुतळ्यांच्या अरुणा रॉय, तरुण वयातच समाजकार्याला प्रारंभ  सादरीकरणामध्ये गुंफण्याची क्षमता शंकर यांच्याकडे होती. त्यामुळे भाषेची मर्यादा सहज ओलांडली जात असे. वंशपरंपरागत सामाजिक अन्यायाचा प्रतिकार कसा करायचा, यावर संध्याकाळच्या चर्चांमध्ये अधिकाधिक लक्ष केंद्रित केलं जात होतं.

देवडुंगरीतील हा परिवार वरकरणी मुख्य प्रवाही जगण्यापासून वेगळा पडला आहे, या धारणेमुळे त्यांच्या मित्र-मैत्रिणींना व सामाजिक-राजकीय कार्यकर्त्यांना कुतूहल तरी वाटायचं किंवा चिंता तरी वाटायची. गरिबी आणि विषमता यांचा अनुभव घेत जगत असताना त्याबद्दल खुल्या स्वरूपाची चर्चा केल्यामुळे बाहेरच्या जगाशी दुवे टिकून राहिले. देवडुंगरीमध्ये जाणं अवघड होतं. कोणताही लोहमार्ग तिथून जात नव्हता किंवा जवळ काही विमानतळही नव्हता. उदयपूर ते अजमेर यांना जोडणाऱ्या मुख्य महामार्गाला लागून असलेल्या या गावात फक्त रस्त्यानेच पोचणं शक्य होतं. राष्ट्रीय महामार्ग-8 हा उर्वरित भारताचं एक प्रातिनिधिक चित्रच होता. अनेक भपकेदार बस, कार, क्रेन, मालवाहू गाड्या व विविध आकारांतील ट्रक देवडुंगरीवरून पुढे जात आणि या विचित्र तंत्रज्ञानाकडे गावकरी अचंबित नजरेने पाहत. विख्यात पत्रकार व माजी संपादक अजित भट्टाचारजी व प्रभाष जोशी आमचे मित्र होते. देवडुंगरीच्या पहिल्या भेटीचा अनुभव प्रभाष जोशी यांनी त्यांच्या खास मोकळ्याढाकळ्या शैलीत नोंदवला आहे:

खूप पूर्वी सेवाग्राममधील बापू कुटीमध्ये जाताना माझ्या मनात जशा भावना उमटल्या होत्या, तसाच अनुभव देवडुंगरीमध्ये पहिल्यांदा जाताना मला आला!

आपल्याला प्रत्यक्ष जाण्याची संधी मिळत नाही तोपर्यंत बहुतेक स्थळं आपल्यासाठी केवळ नावापुरती अस्तित्वात असतात. भीम व देवडुंगरी यांच्याबाबतीत माझी हीच स्थिती होती. पण एकदा उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये- 1 मे रोजी सूर्य आकाशात तळपत असताना मी जीपने तिथे गेलो. सूर्य अरवली डोंगरांवर आग ओकत होता आणि खाणकामामुळे जमीन विद्रूप झाली होती. जीपच्या काचांवरून सूर्यकिरणं प्रतिबिंबित होत असल्यामुळे डोळे चरचरायला लागले. पण बाहेर लोक भर उन्हात काम करतच होते- घरबांधणी, खाणकाम आणि माती व दगड काढणं, अशी कामं सुरू होती.

त्या रात्री आम्ही भीमहून देवडुंगरीला आलो. पोळी- भाजी खाल्ली. अरुणाने चुलीवर पोळ्या केल्या. बाहेर सारवलेल्या ओटीवर आम्ही झोपलो. दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो, तेव्हा गुलमोहर आणि बोगनवेल झाडांच्या मधून सूर्य उगवताना दिसला... देवडुंगरी- गुर्जरांचं दैवत असलेले देवनारायणजी यांच्या मंदिरामुळे या ठिकाणाच्या नावात ‘देव’ शब्द आला आणि डोंगरांच्या अस्तित्वामुळे ‘डुंगरी’ ही जोड मिळाली. घरांप्रमाणे मंदिराचं बांधकामही मातीचं होतं आणि जमीन व भिंती नीट सारवलेल्या होत्या. या घराशेजारीच खोपट्यात अंघोळीची सोय होती आणि सांडपाणी बांबूच्या वनात सोडलं जात होतं... परसदारात संडास होता- तीही मातीची झोपडीच होती... स्वच्छ, नेटकी व दुर्गंधी नसलेली... फाइव्ह स्टार हॉटेलांपेक्षाही इथल्या सोई चांगल्या होत्या!

आमचा मित्रपरिवार या सगळ्याबद्दल साशंक होता. त्यांना हा खटाटोप स्वप्नाळू वृत्तीचा भासत होता. शेळीला घराच्याच आवारात ठेवून भरपूर खाऊ-पिऊ घातल्यावर ती देशी प्रजातीच्या शेळ्यांहून अधिक दूध देत होती, हा घटकही त्या स्वप्नवत चित्रामध्ये भर टाकत होता! साधं राहणीमान, शेळी- हे सगळं आदर्श ग्रामजीवनाचा भ्रम अनुभवण्यासाठी सुरू आहे, अशी त्यांची धारणा झाली होती. त्यांच्या सुरुवातीच्या प्रतिक्रियांमधून हा शंकासूर डोकावतही होता- ‘तुम्ही पुन्हा आपल्या सभ्य संस्कृतीमध्ये माघारी आलात, तर त्याचं काही आम्हाला आश्चर्य वाटणार नाही!’

या सगळ्या प्रयोगातून काही निष्पन्न होईल की नाही, याबद्दल सुरुवातीला काही कल्पनाही नव्हती. त्या दिवसांची आठवण शंकर सांगतात :

देवडुंगरी हे लहानसं खेडं आहे, जेमतेम 15 ते 20 उंबऱ्यांची तिथली वस्ती. त्यातच स्वयंपाकघर असलेलं एक लहानसं मातीचं घर आम्हाला राहाण्यासाठी मिळालं... या घरामध्ये काही दुरुस्ती करण्यात व अदलाबदल करण्यात आमचे पहिले काही दिवस गेले. अरुणा, निखिल, अंशी आणि मी 1987 पासून तिथे राहायला लागलो. कामाची सुरुवात कशी करायची याची काहीच कल्पना आम्हाला नव्हती. पण काय करायचं नाही, हे मात्र आम्हाला माहीत होतं. निधीपुरवठा लागेल असे प्रकल्प उभारायचा किंवा संस्था चालवायचा प्रयत्न आम्ही करणार नव्हतो.

जयपूरस्थित विकास अध्ययन संस्थेच्या देखरेखीखाली आम्ही किमान वेतनाविषयी अभ्यास करत होतो. आणि  त्यातून आम्हाला स्वतःच्या उपजीविकेसाठी गरजेइतकं किमान वेतन मिळत होतं. हा अभ्यास करत असतानाच आम्ही जवळपासच्या गावांमध्ये जाऊन छोट्या-छोट्या बैठका घ्यायला सुरुवात केली. आम्ही व्यक्तिगत पातळीवरही लोकांशी संवाद साधला. लोकांसोबत एका समुदायात राहणं आणि त्यांच्या दैनंदिन जगण्यामध्ये सहभागी होणं महत्त्वाचं होतं. त्यामुळे साध्या, नेहमीच्या कृतीतून सातत्याने प्रश्न उपस्थित करण्याची संधी आम्हाला मिळाली.

या सततच्या संवादातून प्रचलित मूल्यांना आव्हान दिलं गेलं आणि त्यांमध्ये बदलही घडत गेला. सुरुवातीला त्यांनी लिंगभावावर आधारित भूमिकांसंबंधी वाद उपस्थित केले, चर्चा घडवल्या. पुरुषांनी डोक्यावरून पाणी वाहून आणणं, सार्वजनिक ठिकाणी भांडी धुणं, अस्पृश्यता, एकाच भांड्यातून पाणी पिणं, एकाच विहिरीतून पाणी घेणं, स्वच्छता व आरोग्याचे मुद्दे, सामाजिक संवादप्रक्रियांचे नियम, आदर दाखवणं व समारंभातील विधी यांमधील भेद- हे सगळे विषय वादचर्चेसाठी घेतले गेले आणि काही वेळा त्यासंबंधी असहमतीही दिसून आली. एकाच पातळीवर बसणं, किंवा पाहुणे म्हणून आलेल्या सर्व वर्गांतील लोकांना सारखंच अन्न वाढणं- यांसारख्या मुद्यांवर काही जण चिडले, काहींनी टीका केली, तर काहींना याचा अचंबा वाटला. नव्याने गावात दाखल झालेल्या या मंडळींनी हे नियम धुडकावले आणि समता व मानवता यांना अग्रक्रम दिला. त्यामुळे त्यांना क्वचित प्रसंगी संभाव्य हिंसक परिस्थितीला तोंड द्यावं लागलं आणि त्यावर तोडगा काढावा लागला.

रोजच्या जगण्यातील संघर्ष हाताळत असताना लोकांना विचार व कृती यांमधील तफावत भरून काढायला मदत होते. आपण काय केलं किंवा काय केलं नाही, याची दैनंदिन पातळीवर चिकित्सा करणं महत्त्वाचं ठरतं.

लोकांना जाणून घेताना...

वरकरणी सुस्थितीतील भारतीय व्यक्ती अशा विपरीत परिस्थितीमध्ये राहण्याची जोखीम पत्करत असतील, तर त्यांचा हेतू शोषण करण्याचाच असतो; याशिवाय वेगळा काही उद्देश त्यांच्या कृतीमागे असू शकेल, याची कल्पनाही ग्रामीण भारतामध्ये करता येत नाही. शहरातील भौतिक सुख सोडून कष्टप्रद (संडास, कायमचा पाणीपुरवठा वा वीज यांचा अभाव असलेल्या) परिस्थितीत राहायला जाण्याचा निर्णय सहज-सोपा नव्हता. आम्ही देवडुंगरीला आल्यावर वर्षभरानंतर संडास बांधला गेला. आमचे मित्र अनिल बोर्डिया यांनी दिलेल्या देणगीतून हे बांधकाम झालं. लोकांना जे समोर दिसत होतं, त्यावरून त्यांनी सुरुवातीला प्रश्न विचारले : ‘हे लोक खाणकाम सुरू करायला आलेत, की मजूर जमवायला आलेले कंत्राटदार आहेत?’ प्रतिष्ठितपणाचा शिक्का घेऊन न आलेल्या लोकांवर कोणी विश्वास का ठेवावा? त्यामुळे प्रत्येकाने आपापलं डोकं लढवलं.

गावात फारसं काही लपवता येत नाही. भारतीय गावं एका खुल्या चौकटीमध्ये राहतात. रात्र सोडता बाकीचा वेळ घराची दारं उघडीच ठेवली जातात आणि कोणाला आत प्रवेश नाकारला, तर संशय घेतला जातो. घरातली मंडळी काही तरी लपवू पाहतायत, असाही अर्थ त्यातून काढला जाण्याची शक्यता असते. त्यातून कुतूहलाची पातळी वाढत जाते आणि शेवटी फाजील चौकसपणा दाखवला जातो. त्यामुळे आम्ही थोडं सामान घरात नेलं तेव्हा त्याकडे शेजार-पाजारच्यांचं काटेकोर लक्ष होतं. बरेच अंदाज बांधले गेले. श्रीमंत वर्गाशी संबंध दाखवणारं कोणतंही खास फर्निचर आमच्या सामानात नव्हतं. दोन लोखंडी पलंग आणले होते, त्यांचे पाय अतिशय छोटे होते. हे विचित्र पलंग बघायला अनेक लोक येऊन गेले. गावात नव्यानं आलेली मंडळी कशी राहातायंत, हे बघायला काही जण घरी फेरफटका मारून गेले. लोकांनी विविध गोष्टी गृहित धरलेल्या होत्या. पण बहुतेकसे लोक कुतूहल म्हणून आले. अनेक लोक कामाची संधी शोधण्यासाठीही भेटून गेले. आपण सैन्यातील जवान आहोत, अशी घोषणा करत दुर्ग सिंग आले. या गरीब-बिचाऱ्या, भरकटलेल्या मानवांकडे त्यांनी तुच्छ कटाक्षही टाकला.

निखिल, अरुणा, शंकर व अंशी यांनी सगळी कामं स्वतः केली. विहिरीतून पाणी आणण्यापासून ते जेवण शिजवणं आणि घर झाडणं... सगळंच काम त्यांनी आपापसात वाटून घेतलं. दुधाची वानवा होती, त्यामुळे एक शेळी आणली. पण प्राण्यांचं लहान मुलांसारखंच असतं. आई होऊन त्यांचा सांभाळ करावा लागतो, त्यामुळे एक व्यक्ती कायम घरात असणं गरजेचं बनलं. नागोदाजी यांच्या विहिरीतून पाणी आणलं जात असे. सर्व जण याच विहिरीतून पाणी घेऊन जात, पण दलितांनी आपल्या मडक्याला हात लावलेला  मात्र कोणाला चालत नसे. हा पारंपरिक ढोंगीपणा तिथे प्रचलित होता. शंकर यांच्या मुलीने स्वतःचं पाण्याने भरलेलं मडकं उचलण्यासाठी नागोदाजीकडे मदत मागितली, तेव्हा सगळ्यांनी विरोधाचा जोरदार आवाज उठवला. सगळं गाव आमच्या घरापाशी जमलं आणि घरातल्यांना जोरदार शिव्या घातल्या. शेवटी अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली कायदेशीर कारवाई करू, असा इशारा दिल्यावर गर्दी पांगली.

पण सगळेच विरोध करत होते, असंही नाही. अनेक जण मोकळेपणाने भेटायला आले. अनेकांनी आमच्याशी चांगली मैत्रीही केली. समता व भेदभाव या तत्त्वांच्या बाबतीत कोणतीही तडजोड शक्य नव्हती, पण त्या व्यतिरिक्त मात्र कोणत्याही मुद्यावर मतभेद मांडून वादविवाद करण्याला पूर्ण मोकळीक होती. सावकाराकडून पैसे उधार घेण्याची पद्धत, अंत्यसंस्काराशी निगडित विधींमुळे गरिबांना करावा लागणारा अवाजवी खर्च व अखेरीस त्यांच्यावर वाढणारा कर्जाचा बोजा, जातीशी निगडित निषिद्ध गोष्टी व अर्थातच लिंगभावात्मक पूर्वग्रह, खाली-वर बसण्याशी संबंधित श्रेणीव्यवस्था, स्त्रियांसाठीची घुंगट प्रथा आणि इतर अनेक सामाजिक व राजकीय प्रश्नांवर चर्चा होऊ लागल्या. बदलाची कक्षा हळूहळू निश्चित होऊ लागली.

या सर्व अनुमानबांधणीच्या काळात लाल सिंग यांचं आगमन झालं. निखिल व अरुणा त्यासंबंधी सांगतात :

साधारण 12 किलोमीटरवर असलेल्या सोहनगढमध्ये लाल सिंग राहत होते. एकदा देवडुंगरीमध्ये नातेवाइकांना भेटायला आले असताना त्यांनी जैत सिंगच्या घरात बस्तान बसवलेल्या विचित्र लोकांबद्दलची बातमी ऐकली. या लोकांविषयी अधिक जाणून घेण्यासाठी ते घरात आले. पूर्वी ते पोलीस हवालदार होते. वरिष्ठ पोलीस अधिकारी कनिष्ठ पदांवरील सहकाऱ्यांना हरकाम्यासारखं वागवतात, याविरोधात कनिष्ठ पोलीस कर्मचाऱ्यांनी ठिय्या आंदोलन केलं होतं; त्यात लाल सिंगही सहभागी झाले. निदर्शनं करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आलं. इतर सहकारी न्यायालयात दाद मागण्यासाठी गेले, पण लाल सिंग त्यांच्या गावी परत आले. विविध कारणांमुळे त्यांनी न्यायालयात न जाण्याचा निर्णय घेतला. आधीच पोलीस दलामधील भ्रष्टाचाराला ते कंटाळले होते, त्यामुळे ‘तिथे काम करायचंच नाही’, असं त्यांनी ठरवून टाकलं.

आमच्या घराला लागून शेळ्यांसाठीच्या दोन पडव्या होत्या, त्यांची पुनर्बांधणी करून ती खोली आम्हाला स्वयंपाकघर म्हणून वापरायची होती. या कामाला गवंडी माणूस लागणार होता. लाल सिंग अगदी सचोटीने हे काम करतील, अशी शिफारस करण्यात आली. शिवाय, आमच्याप्रमाणे त्यांनाही प्रामाणिकपणाचा ‘वेडगळ’ सोस आहे, त्यामुळे त्यांचं नि आमचं (अरुणा, शंकर व निखिल) चांगलं जमेल, असंही शिफारसकर्त्याने हसत-हसत सांगितलं. लाल सिंग माणूस म्हणून असामान्य होते, पण गवंडीकामातलं त्यांचं कौशल्य अगदीच सामान्य असल्याचं नंतर उघड झालं. नव्याने बांधलेलं स्वयंपाकघर पहिल्याच पावसात जलमय झालं. अंशी व अरुणा यांनी अख्खी संध्याकाळ राबून स्वयंपाघरात घुसलेलं पाणी बाहेर लोटलं. राजस्थानात आधीच खूप कमी पाऊस पडतो, त्यातही ही अवस्था झाल्यावर नवं बांधकामच खराब असल्याचं स्पष्ट झालं. पण लाल सिंग यांच्यासोबतच्या घट्ट मैत्रीचा पाया या काळात रचला गेला आणि पुढे संघटनाबांधणीची पायाभरणीही यात झाली.

लाल सिंग कायम न्याय्यच भूमिका घेतील, असा त्यांच्या समुदायाचा ठाम विश्वास होता, त्यामुळे त्यांच्या गावातील वादांमध्ये मध्यस्थी करायला त्यांना निमंत्रित केलं जात असे. वास्तविक, ही नेतृत्वाची धुरा त्यांनी अनिच्छेनेच स्वीकारली होती. साधेपणाने राहणारे लाल सिंग बुद्धिमान, कनवाळू व निर्भीड होते.

मोट सिंग हेसुद्धा अनेकदा घरी येत असत. आजारपणामुळे त्यांना बाहेरगावी जाऊन काम शोधणं शक्य नव्हतं, त्यामुळे ते देवडुंगरीमध्येच राहत. गवंडीकामाची सरकारी नोकरी मिळालेल्या मोजक्या लोकांमध्ये गावातील राम सिंग यांचा समावेश होता आणि मोट सिंग हे त्यांचेच भाऊ असूनही त्यांना कायम गरिबीला सामोरं जावं लागत होतं. मोट सिंग हे बुद्धिमान व मिश्किल व्यक्तिमत्त्व होतं. प्रत्येक गावात कथाकथनाचं विलक्षण कौशल्य असलेली मोट सिंग यांच्यासारखी मोजकी मंडळी असतात, त्यांना विसरणं कधीच शक्य होत नाही. अशी माणसं एखाद्या दंतकथेतून अवतरल्यासारखी वाटतात.

देवडुंगरीतील नव्या कार्यकर्त्यांविषयी मोट सिंग यांना कुतूहल होतं आणि संवाद साधण्यासाठी ते उत्सुक होते. आपल्याकडच्या कहाण्या या नवख्या मंडळींना भुरळ घालतील, हेही त्यांना माहीत होतं. गावातले लोक तसेही या कहाण्यांशी परिचित होते, त्यामुळे मोट सिंग यांनी कुशल संवादकाचा चाणाक्षपणा दाखवत आपले श्रोते हेरले. आमचा गट खाणकामासाठी आलेला  नाही, हे त्यांना लवकरच कळलं. कामगारांविषयी आमची आस्था पाहून अंदाज बांधण्याइतकं चातुर्य मोट सिंग यांच्यात होतंच. आम्ही काही व्यावसायिक कामासाठी आलेलो नाही, हेही स्पष्ट होतं. शिवाय, अस्पृश्यतेला असलेला आमचा विरोध गावात अस्वस्थता निर्माण करणारा ठरला होता. या पार्श्वभूमीवर, मोट सिंग यांनी आम्हाला सांगण्यासाठी गोष्टीची काळजीपूर्वक निवड केली. त्या कहाणीचा अमीट ठसा चळवळीतील सुरुवातीच्या सहकाऱ्यांवर उमटलेला आहे. दुष्काळ, प्रतिष्ठा, गरिबी, भूक व हताशा यांच्यासंदर्भातील ती वस्तुस्थितीदर्शक रूपककथा होती :

कोनवाश्यावरचं मडकं

खूप पूर्वी राजस्थानात महाभयंकर दुष्काळ पडला होता. तेव्हा, एका गावातलं सात जणांचं कुटुंब प्रचंड संकटात सापडलं होतं. या कुटुंबात आई-वडील आणि पाच मुलं होती. त्यांच्या विहिरी सुकून गेल्या. त्यांच्या शेतांमध्ये काहीच उगवत नव्हतं. अगदी लहानसहान फळं नि पानंही खाऊन संपली. गाई-गुरं एक तर मरून तरी गेली, नाही तर त्यांना दैवाच्या भरवशावर सोडून देण्यात आलं. रोजगाराचं काहीही साधनं नव्हतं, त्यामुळे आई-वडिलांनी कामाच्या शोधात निघायचं ठरवलं. काम मिळालं, तर पैसा मिळेल आणि पैसा असेल, तर अन्न विकत तरी घेता येईल.

घर सोडण्यापूर्वी त्यांनी आपल्या मातीच्या घरामध्ये कोनवाश्याला एक लहानसं मडकं टांगून ठेवलं. ‘या मडक्यात धान्य आहे. आम्ही घरी परतल्यावर ते शिजवू, मग सगळे मिळून जेवू,’ असं त्यांनी मुलांना सांगितलं. मुलं वाट बघत राहिली. कित्येक महिने झाले. मुलं थकून गेली, पण त्या छोट्या ‘मडक्या’मुळे त्यांची आशा टिकून राहिली होती.  

बऱ्याच दिवसांनी आई-वडील परत आले, पण त्यांना काहीच काम मिळालं नाही. मुलांप्रमाणेच त्यांचीही हाडं वर आली होती. ‘आता मडकं खाली काढू या’, मुलांनी आक्रोश केला. आईने मडकं खाली काढलं. ते रिकामं होतं. भयानक धक्का बसून मुलं मरण पावली. आशा संपल्यावर हताशा विळखा घालते आणि जगणं हातातून निसटत जातं. आशा संपणं म्हणजेच अंत...

मोट सिंग म्हणाले, सरकार स्वतःच्या इमारतीच्या कोनवाश्यावर आपल्यासाठी मडकं टांगून ठेवतं. पण ते रिकामं आहे, हे शहाण्यासुरत्यांना समजत असतं. अस्तित्वात राहण्यासाठी झगडणारे लोक मात्र ते मडकं भरलं असेल यावर विश्वास ठेवून राहतात. असंच जगणं सुरू राहतं. सरकारी आश्वासनं अशीच असतात. यावर तुम्ही काय उपाय कराल? त्यांचा हा प्रश्न निश्चितपणे गंभीर आव्हान देणारा होता!

क्षयरोगाच्या रूपात गरिबीने मोट सिंग यांच्यावर आणखी एक आघात केला होता. भारतभरातील इतर लाखो लोकांप्रमाणे त्यांनाही या आजारामुळे संथपणे अकाली मृत्यू आला.

अनेक लोक मरण पावतात, कित्येक जण अगदी लहान वयातच मृत्युमुखी पडतात. स्थलांतर आत्मपीडेसारखं असतं. शहरांमधलं जगणं अतिशय कठोर असतं. त्यात भर म्हणून तिथे आजार आणि तुटलेपण पाचवीला पुजलेलं असतं. सामाजिक आधार मिळत नाही. लोक अगदी निर्दयपणे वागले नाहीत, तरी अलिप्तपणे राहतात. पोलीस दलात किंवा सैन्यात रुजू झालेले अनेक तरुणही परत येताना कोणता ना कोणता आजार सोबत घेऊनच येतात. त्यामुळे अखेरीस औषधोपचारांसाठी कराव्या लागणाऱ्या खर्चाचा बोजा वाढतो, त्यासाठी कर्ज काढलं जातं नि त्याच अवस्थेत ते प्राण सोडतात.

एखाद्या समुदायात कामासाठी आल्यावर स्थिरस्थावर होण्यासाठी कितीही कालावधी घालवावा लागू शकतो. आधी समपातळीवरून मैत्री जोडावी लागते, तसं केल्यावर लोकांना विश्वास वाटू लागतो; पण एवढं करूनही सुरुवातीचे दिवस तापदायक होण्याची शक्यता असते. कोणताही मुद्दा संभाव्य वादाला कारण ठरू शकतो. अशा वेळी मतैक्य साधायचं असेल तर, समोरच्याचं म्हणणं संयमाने ऐकून घेणं, हे पहिलं पाऊल असायला हवं. देवडुंगरीतील नवागतांना हा टप्पा तुलनेने वेगाने पार करता आला. शंकर व अंशी यांचं गावातल्या काहींशी असलेलं नातं आणि बोलीभाषा व संस्कृती यांतून आलेला सहजपणा, या गोष्टी आम्हाला पूरक ठरल्या. आमची भेट घ्यायला आलेल्या अनेक स्थानिक लोकांनाही सर्वांसाठी सामाइक असलेल्या मडक्यातूनच पाणी घ्यावं लागलं आणि सगळ्यांना एकाच पातळीवर बसावं लागलं. सामाजिक संवादप्रक्रियेबाबत परंपरेने आखून दिलेल्या व कठोरपणे टिकवलेल्या त्यांच्या नियमांना आव्हान देणारी ही परिस्थिती होती. त्यामुळे सातत्याने घर्षण होत राहायचं, काही वेळा त्यातून मोठमोठ्या आवाजात वादविवादही झडायचे. देवडुंगरीतील आमचं कुटुंब मात्र ठाम होतं. या सगळ्याचा सर्वाधिक फटका अंशी यांना बसला. परंपरा मोडल्याबद्दल संतप्त झालेल्या बायका सांस्कृतिक दृष्ट्या अंशीच्या सर्वांत जवळच्या होत्या.

आमची भेट घ्यायला केवळ वयस्क लोकच आले असं नाही, अनेक तरुण व कुमारवयीन मुलंही आम्हाला भेटत होते; त्यातील नारायण व देविलाल अनेकदा येऊ लागले. ही अगदी असाधारण जोडगोळी होती. जातीने सर्वत्र भेदभावाच्या सीमा आखलेल्या समाजात त्यांची जोडी लक्षणीय होती. गावातील नवख्या कार्यकर्त्यांची भेट घ्यायला ते आले. एनएच-8 वरून होणारी वाहतूक ज्या संस्कृतीचे नुसते धावते संकेत द्यायची, त्या संस्कृतीतून ही मंडळी गावात आलेली दिसत होती. या घरातले लोक काहीशी अकादमिक भाषाही बोलताना दिसतात. अनेकदा पेचप्रसंगात ही मंडळी इंग्रजीतही बोलून जातात. आपला तर इंग्रजीशी छत्तीसचा आकडा!... असा विचार करत नारायण व देविलाल आमच्या घरी येऊ लागले.

जयपूरस्थित विकास अध्ययन संस्थेसाठी अरुणा, निखिल व शंकर यांनी 1990 मध्ये एक अहवाल तयार केला होता, त्यात या संदर्भात पुढील वर्णन येतं :

कालू एका कारखान्यात कामाला होता, पण तिथल्या ढिसाळ व्यवस्थापनामुळे यंत्र हाताळताना अपघात झाला नि त्यात कालूला एक हात गमवावा लागला. मग तो गावी परत आला. नावापुरती नुकसानभरपाई देऊन त्याला घरी पाठवण्यात आलं. देविलाल कालूपेक्षा दोन वर्षांनी मोठा. आमच्यापेक्षाही लहान झोपडीत ते राहायचे. दोघेही दलित आणि गरीब होते. एकदा कर्जासाठी त्यांनी जमीन गहाण ठेवली नि कर्जाची परतफेड शक्य न झाल्याने त्यांना जमिनीवर पाणी सोडावं लागलं. त्यांच्या घरावर भुकेचं  सावट सतत असायचं.

देविदास अभ्यासात हुशार होता. सगळे अडथळे पार करून तो शाळेत जायचा. तिथली त्याची कामगिरीही चांगली होती. आठवीत असताना त्याला जिल्ह्यातील सर्वोत्तम विद्यार्थी म्हणून दोन हजार रुपयांची शिष्यवृत्ती मिळाली. त्यामुळे त्याला शिक्षण सुरू ठेवता आलं. पण एवढी असामान्य शैक्षणिक कामगिरी करत असतानाही उपजीविकेसाठी त्याला भिलवाडामधील एका कारखान्यात नोकरी करावी लागत होती. शिष्यवृत्ती जाहीर झाल्यावर तो मुख्याध्यापकांकडे गेला. पण आपल्याला शिष्यवृत्तीबद्दल काहीच माहिती नसल्याचं ते म्हणाले. तरी, देविलालने आपली बाजू लावून धरली, तेव्हा मुख्याध्यापक त्याची बोळवण करताना म्हणाले, ‘हां, थोडे पैसे माझ्यापर्यंत आलेले; पण तू इथे नव्हतास, म्हणून मी ते परत केले.’

कालूला कारखान्याच्या मालकाकडून अशाच तुसड्या सुरात उत्तर मिळालं होतं. तर, शिष्यवृत्ती मिळूनही पैसे हातात आले नाहीत, पण देविलालने अभ्यास सुरू ठेवला. शाळेबाहेरून अभ्यास करून त्याने दहावीची परीक्षा दिली. या सगळ्या काळात त्याने कारखान्यात कामगार म्हणून आणि शेतमजूर म्हणून काम सुरूच ठेवलं होतं.

नारायणचं आणि त्याचे वडील राम सिंग यांचं पटायचं नाही. शंकर नि त्याच्या मित्रपरिवारातल्या मंडळींची आस्थेवाईक वृत्ती राम सिंग यांना कौतुकास्पद वाटत होती. पण आपल्या मुलामध्ये आपण इतकी गुंतवणूक केलेली असताना त्याने अशा कार्यकर्तेगिरीत पडू नये, असं त्यांचं मत होतं. तरीही, नारायण आमच्या घरी येतच राहिला आणि शेवटी आमचा मित्र व साथीदार बनला. आमच्या झोपडीत तरुणांची ये-जा सारखी सुरू असायची. त्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये बाहेरून देवडुंगरीला भेट द्यायला आलेले लोक तरुणांची ही वर्दळ पाहून भारावून जात. स्वतःची परिस्थिती बदलण्यासाठी गावातले तरुण-तरुणी  इतक्या निर्धाराने काम करतायत, हे पाहून त्यांच्या आशा पल्लवित व्हायच्या. त्या काळात देवडुंगरीला भेट देऊन गेलेल्या रजनी बक्षी यांनी बापू कुटीमध्ये अशीच भावना व्यक्त केली आहे :

 नारायणला कार्यकर्त्यांचा हा दृष्टिकोन मान्य होता. पण संघटनाबांधणीपासून अंतर राखणारी त्याच्या काकांची वृत्ती त्याला पटत नव्हती. आता सर्वपरिचित झालेल्या नव्या शेजाऱ्यांसोबत वावरण्यात नारायणला आनंद वाटायचा. त्याचा मित्र देविलालप्रमाणेच नारायणलाही स्वतःच्या स्वप्नांचं प्रतिबिंब त्या गुलमोहराजवळच्या घरात पडलेलं दिसलं. त्या घरात मांडले जाणारे विचार व तिथल्या कृती त्याच्या स्वप्नाशी मिळत्या-जुळत्या होत्या. त्यामुळे त्याचा चुलतभाऊ- म्हणजे मोट सिंग यांचा मुलगा- गाव सोडून गेला, तसा मार्ग न पत्करण्याचा निर्णय नारायणने घेतला. त्याने शालेय शिक्षण पूर्ण केलं, त्यासाठी वेळप्रसंगी अभ्यासात निखिलची मदत घेतली...

थोड्याच काळात देविलाल व नारायण अनेक लहान- मोठी कामं एकत्र करू लागले. पण देविलालसोबतची आपली वाढती मैत्री आई-वडिलांना पटत नसल्याचं नारायणच्या लक्षात आलं. आई-वडिलांच्या मते, त्या दोघांची मैत्री एका मर्यादेपर्यंत ठीक होती, पण देविलालसोबत खाणं-पिणं मात्र त्यांच्या लेखी अस्वीकारार्ह होतं. नारायणचे वडील राम सिंग यांच्या हातात बऱ्यापैकी सत्ता होती आणि देवडुंगरीमध्ये त्यांचा प्रभाव होता. आपल्या मुलाने मूलभूत नियम मोडणं त्यांना अमान्य होतं. त्यामुळे त्यांनी नारायणला हे सगळं काम सोडून देण्याची विनंती केली. वडिलांचं सगळं बोलणं संयमाने ऐकून घेणं नारायणला भाग होतं. काही वेळा तो वडिलांना समजावण्याचा प्रयत्नही करायचा. बदलत्या काळानुसार बदलणं का आवश्यक आहे, ते सांगायचा. शेवटी, नारायणने त्याला योग्य वाटत होतं तेच काम सुरू ठेवलं.

राष्ट्रीय महामार्गाला लागून काही घरं दिसत राहतात. भीम हे देवडुंगरीपासून सर्वांत जवळचं शहर आहे, तिथून येताना महामार्गापासून नैर्ऋत्येला वळलं की, देविलालचं घर लागतं. आमच्या झोपडीमधूनही घरांचा तो लहानसा समूह दिसायचा. परंपरेने दलितांची घरं गावाच्या परिघावर असतात. जातीनुसार घरं बांधली जातात आणि त्या-त्या जातीच्या वाड्या ठरलेल्या असतात. अगदी आजही बहुतांश ठिकाणी ही पद्धत रूढ आहे. काही बदल निश्चितपणे झालेत. उदाहरणार्थ- दलित मुलं आता शाळेत जातात, परंतु शाळेतही जातीच्या चिरफळ्या ठळकपणे टिकून आहेत. ही जातीय विभागणीची पद्धत उचित गतीने बदलली नाही. भारतभरात ग्रामीण भागांतील अनेक शाळांमध्ये दलितांसाठी पाण्याची वेगळी मडकी असतात आणि त्यांना वर्गातही वेगळं बसवलं जातं.

दरम्यान, 1987 मध्ये राजस्थानने अलीकडच्या काळातील सर्वांत भीषण दुष्काळ अनुभवला. देवडुंगरीमध्ये आम्ही राहायला आलो, तेच वर्ष या दुष्काळाचं ठरलं. मजदूर किसान शक्ती संघटनेच्या रोजनिशीतील एक नोंद अशी आहे :

राजस्थानातील देवडुंगरी गावामध्ये 1987 मध्ये आमच्या कामाला सुरुवात झाली. त्या वर्षी या प्रदेशामध्ये तीव्र दुष्काळ पडला होता आणि स्थानिक लोकांना काम मिळण्याची व वेतनाची गंभीर चिंता भेडसावत होती. मग आम्ही याच मुद्यांवर लक्ष केंद्रित केलं. जवळच्या प्रश्नाला हाताळणं महत्त्वाचं ठरतं. शेतमजूर व कामगारांच्या तातडीच्या व्यथांसंदर्भातही असं काम उपयोगी होतं. विकासातील आपला वाटा मागून घेण्यासाठी कामगारांना संघटित करायचं असेल, तर दीर्घकालीन परिप्रेक्ष्यातूनही अशा स्वरूपाचं काम उपयुक्त ठरतं...

भुकेचे गंभीर पडसाद आसपास उमटू लागले. दुष्काळी कामांसाठी कामगार म्हणून नाव नोंदवण्यासाठी लोकांमध्ये मारामारी घडल्याचे प्रसंगही आले. प्रत्येकाला काम हवं होतं, भिक्षा नको होती किंवा अगदी मोफत शिधाही नको होता. अनेकदा विशिष्ट जातीतल्या लोकांना जमिनीचा व कामाचा हक्क नाकारला जातो. मग त्यांना भीक मागण्याव्यतिरिक्त दुसरा काही मार्गच उरत नाही. अनुसूचित जातींच्या यादीत येणाऱ्या कंजरांवर हीच परिस्थिती ओढवली. अशा जातींमधील लोकांना साधारण दोन दशकांननंतर ‘महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी अधिनियमा’च्या माध्यमातून आत्मसन्मान परत मिळवता आला, हेही इथे नमूद करायला हवं. तर, 1987च्या दुष्काळासंबंधी मजदूर किसान शक्ती संघटनेच्या रोजनिशीत पुढील नोंद आढळते :

दुष्काळादरम्यान लोकांची अवस्था कशी आहे, हे तपासण्यासाठी नियोजन आयोगाने 1987 मध्ये राजस्थानात एक प्रतिनिधी गट पाठवला. हा गट उदयपूरला  आलाय आणि आमच्या गावावरून पुढे अजमेरला जाणार आहे, अशी माहिती आम्हाला मिळाली. आम्ही त्या गटाला आमच्या गावात थांबण्याची विनंती केली. नियोजन आयोगाचे सदस्य डॉ. सी. एच. हनुमंत राव हे त्या गटाचे अध्यक्ष होते. नियोजन आयोगाचे सल्लागार बंकर संजित रॉय हेसुद्धा त्या गटाचे सदस्य होते. त्यांनी या भागात थांबा घेऊन लोकांना भेटण्याचं मान्य केलं. आम्ही पंचक्रोशीतील्या अनेक गावांमध्ये चालत गेलो आणि लोकांना या महत्त्वाच्या संधीची माहिती दिली. त्यांनी देवडुंगरीत यावं आणि या नियोजन आयोगाच्या प्रतिनिधींना भेटावं, असं सांगितलं. त्या दिवशी आमच्या झोपडीबाहेर सुमारे पाचशे लोक जमले होते. नियोजन आयोगाचे प्रतिनिधी आले, तेव्हा या लोकांनी काम देण्याची मागणी केली आणि दुष्काळी कामं मिळण्यासाठी हजेरीपटावर नावं नोंदवून घ्यावीत, अशीही विनंती केली. या वेळी प्रतिनिधींना आणि आम्हालाही धक्का बसेल अशी एक घटना घडली. अन्नासंबंधीच्या प्रश्नांना उत्तर देताना एका बाईने तिच्याकडची सूळकाट्यापासून तयार केलेली चपाती काढून दाखवली. दुष्काळाच्या अगदी टोकाच्या परिस्थितीत पोट भरण्यासाठी असं अन्न शिजवलं जातं. लोकेतिहासाच्या दस्तावेजांमध्ये अशा पदार्थाची नोंद झालेली आहे. त्या बाईच्या या कृतीनंतर सगळेच हादरले. नियोजन आयोगाचे प्रतिनिधीसुद्धा अस्वस्थ झाले. त्यांच्यासमोर जिल्हाधिकाऱ्यांनी अनेक आश्वासनं दिली. दुष्काळी कामांसंबंधीचा मोबदला लवकरात लवकर दिला जाईल, असं आश्वासनही त्यांनी दिलं.

आम्ही दिलेली साधी भात-आमटी डॉ.हनुमंत राव यांनी खाल्ली आणि स्वतःचं ताट धुऊन ठेवलं. गाव भयचकित झालं. देवडुंगरीतल्या आमच्या घरी प्रत्येक जण स्वतःचं उष्टं ताट स्वतःच धूत असे.

जैत सिंग व हग्गू यांचं ते मातीचं खोपटं मजदूर किसान शक्ती संघटनेच्या लोककथनाचा भाग झालं आहे. मागे वळून पाहताना या घरातील परिवाराचे सदस्य म्हणतात :

हग्गू व जैत सिंग यांनी ते घर आम्हाला आमचं म्हणून राजस्थानमधील लढाऊ कार्यकर्त्यांसोबत अरुणा रॉय  वापरायची मुभा दिली, हे मोठेच उपकार होते. पण आम्ही आमच्या पद्धतीने, समतेचं तत्त्व मानून, जातीय भेदभाव न करता तिथे राहायला लागलो; तेव्हा आम्हाला लोकांचा रोष पत्करावा लागला. सर्व जातींतील लोक एकाच मडक्यातलं पाणी पितायत, यावर अनेकांनी आक्षेप घेतला. नारायण व देविलाल हे आमचे चांगले मित्र होते. ते आमच्यासोबत जेवा-खायलाही एकत्र असत. हे बघून गावकरी अस्वस्थ झाले आणि प्रचंड संतापले. मोहनजी, चुन्नीबाई व खीमू ही दलित मंडळी आमच्या स्वयंपाकघरातही येत. त्यामुळे निषेधाचे सूर तीव्र होत गेले. देविलालची एका रावत व्यक्तीकडे गहाण ठेवलेली जमीन सोडवल्यावर तर लोकांच्या संतापाचा भडका उडाला. आम्हाला घरात राहायला दिल्याबद्दल जैत सिंग यांना लोकांनी जातीतून बहिष्कृत केलं. परंतु, जैत सिंग या दबावाला बळी पडले नाहीत आणि काही काळाने त्यांनी घर आम्हाला विकलं. आता या घटना इतिहासाचा भाग आहेत आणि आता आम्ही अधिक सौहार्दाने राहतो. पूर्वीप्रमाणे आमच्या जगण्याच्या पद्धतीवर लोकांच्या संतप्त प्रतिक्रिया येत नाहीत. अनेक सामाजिक निर्बंधांमध्येही बदल घडले आहेत.

घराच्या आवाराची जमीन असू दे किंवा शेतजमीन; तिथे राहणाऱ्यांची वा कसणाऱ्यांची सातत्यपूर्ण उपस्थिती हळूहळू बळकट होत जाते आणि जमिनीवरचे अनुल्लंघनीय दावे तयार होतात. खरं तर, देवडुंगरीसारख्या नापीक प्रदेशात शेतीमधून फारसा काही लाभ होत नाही, परंतु ग्रामीण भारतामध्ये जातीय व वर्गीय भेदांचा निर्देश करणारा एक महत्त्वाचा घटक जमीनमालकी हा आहे. गरीब शेतकऱ्यांसाठी जमीन अमूल्य असते आणि त्यांना त्यातून आवश्यक सुरक्षितताही लाभते. कितीही कमी आकारमानाची जमीन असो- त्यातून संबंधित व्यक्तीला त्या समुदायाचा वैध सदस्य असल्याचा अधिकार प्राप्त होतो, शिवाय वारसाहक्क प्रस्थापित होतात आणि सांस्कृतिक महत्त्वाचे इतरही अनेक लाभ त्यातून होतात.

या संदर्भात रूप सिंग यांचं उदाहरण इथे नोंदवता येईल. त्यांना मोसमी स्थलांतर करावं लागायचं. ते म्हणतात, ‘भूमिहीन असलेल्यांपेक्षा माझं चांगलं चाललं होतं. त्यांची अवस्था अगदीच बिकट होते. अल्पभूधारणा स्थैर्याची भावना मिळवून देते. पैसे हवे असतील तर ती जमीन गहाण ठेवता येते. शिवाय, छोटं पीक घेतलं तर एकंदरीत किमान तीन महिन्यांसाठी तरी भुकेपासून संरक्षण लाभतं.’ तुलनेने चांगल्या परिस्थितीत असणाऱ्यांना (पण या ‘सुस्थिती’ची तुलना इतर ठिकाणच्या मोठ्या जमीनदारांशी अजिबातच करता येणार नाही) गहाणखत व खंडणी एवढेच गुंतवणुकीचे मर्यादित पर्याय उपलब्ध असतात. त्यांच्या कल्पकतेला या पर्यायांचा विळखाच बसलेला असतो. सत्ता राबवण्याचं व स्वतःचं स्थान सुरक्षित ठेवण्याचं ते एक साधन बनतं. सावकारीचा पूरक व्यवसाय सुरू ठेवल्यामुळे या सुस्थितीतल्या मंडळींना स्वतःकडची सत्ता टिकवता येते.

या पार्श्वभूमीवर, गावात स्थायिक होणं आमच्यासाठी सोपं नव्हतं. आमच्या प्रत्येक कृतीवर पाळत ठेवली जात होती, त्यातून रोज काही तरी नवं नाट्य व ताण उद्भवण्याची टांगती तलवार डोक्यावर असायची. माहितीविषयक अधिकाराच्या कहाणीत हा सगळा तपशील सांगण्याची काय गरज आहे, असं कोणी विचारू शकतं. पण खुल्या पुस्तकाप्रमाणे मोकळं जीवन जगणाऱ्या लोकांचा संदर्भ समजून घेणं इथे प्रस्तुत ठरेल. कारण, प्राथमिक माहिती अत्यावश्यक असते, या त्यांच्या दैनंदिन जीवनातील आकलनामधूनच माहितीच्या अधिकाराची मागणी पुढे आली. ग्रामीण भागांमधील सर्वसाधारण आकलन असं असतं की- शहरी व भारताच्या अधिक संपन्न भागांमधील लोक बहुतेकदा ‘शोषण’ करण्यासाठीच गावांकडे येतात आणि भौतिक व मानवी संसाधनं हिरावून नेतात. त्यानंतर मागे केवळ आर्थिक, भौतिक व भावनिक भग्नावशेष उरतात आणि हे सगळं निस्तारण्यात पुढची अनेक वर्षं जातात. बाहेरच्या लोकांमध्ये कंत्राटदार असतात, खाणकामासाठी आलेले असतात किंवा स्वस्तात कामगारांचा वापर करणारे, जमीन ताब्यात घ्यायला आलेले आणि अनेकांना आजारी, कंगाल व कर्जबाजारी अवस्थेत ठेवून परत जाणारे लोक असतात.

अनुवाद : अवधूत डोंगरे

Tags: Sadhana Publication Marathi book The RTI story Right to information act Ajit Bhattacharji Anshi Shankar Singh Nikhil Day Devdungari Rajsthan Translation Avdhoot Dongare Aruna Roy Ladhyacha Prarambh: Devdungari bhagat Sadhana Diwali issue 2019 weekly Sadhana साधना प्रकाशन मराठी पुस्तक द आरटीआय स्टोरी माहिती अधिकार कायदा अजित भट्टाचारजी अंशी शंकर सिंग निखिल डे देवडुंगरी राजस्थान अनुवाद अवधूत डोंगरे अरूणा रॉय लढ्याचा प्रारंभ : देवडुंगरी गावात साधना दिवाळी अंक 2019 साप्ताहिक साधना weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

अरुणा रॉय

'द आरटीआय स्टोरी' च्या लेखिका. भारतातील सामाजिक कार्यकर्त्या.अरुणा रॉय,शंकर सिंग,निखिल डे आणि इतर अनेकांसह मजदूर किसान शक्ती संघटनेनी "मजदूर किसान शक्ती संघ" याची स्थापना केली..तसेच त्या एनएसीचा सदस्य देखील होत्या. 


प्रतिक्रिया द्या