डिजिटल अर्काईव्ह (2014-2019)

मजदूर किसान शक्ती संघटन : संकल्पना व स्थापना

चळवळींमधील सर्व परिणामकारक गाणी विविध समाजघटकांना आकर्षित करणारी ठरली आहेत. माहिती अधिकार आंदोलनाच्या लोकप्रियतेत अनेक आकर्षक गाण्यांमधील लकेरींचं व शब्दांचं योगदान आहे. ही गाणी बहुतेकदा उत्स्फूर्तपणे तयार केली जात आणि काही वेळा जाणीवपूर्वक संदेश देण्यासाठी त्यांची निर्मिती होत असे. प्रत्येक नाटकात किमान एक गाणं तरी असायचंच आणि मुख्य नाटकाहून अधिक मूलगामी पद्धतीने संदेश पोचवण्याचं काम गाण्यातून व्हायचं. संघटनेची स्थापना झाली त्या वर्षीच्या नाटकामध्ये स्थलांतरित मजुरांच्या दुःखावरचं एक गाणं होतं. मोठ्या अपेक्षेने हा मजूर स्वतःचं घर सोडून जातो, पण आशा धुळीस मिळाल्यावर माघारी येतो. उत्तरं नसलेल्या प्रश्नांची भेंडोळी त्याच्यासमोर साचत जातात. आशा लावून बसलेलं कुटुंब, दुष्काळ व भूक अशा सगळ्या समस्यांना पुन्हा तोंड द्यायची वेळ त्याच्यावर येते.

चळवळींमधील सर्व परिणामकारक गाणी विविध समाजघटकांना आकर्षित करणारी ठरली आहेत. माहिती अधिकार आंदोलनाच्या लोकप्रियतेत अनेक आकर्षक गाण्यांमधील लकेरींचं व शब्दांचं योगदान आहे. ही गाणी बहुतेकदा उत्स्फूर्तपणे तयार केली जात आणि काही वेळा जाणीवपूर्वक संदेश देण्यासाठी त्यांची निर्मिती होत असे. प्रत्येक नाटकात किमान एक गाणं तरी असायचंच आणि मुख्य नाटकाहून अधिक मूलगामी पद्धतीने संदेश पोचवण्याचं काम गाण्यातून व्हायचं. संघटनेची स्थापना झाली त्या वर्षीच्या नाटकामध्ये स्थलांतरित मजुरांच्या दुःखावरचं एक गाणं होतं. मोठ्या अपेक्षेने हा मजूर स्वतःचं घर सोडून जातो, पण आशा धुळीस मिळाल्यावर माघारी येतो. उत्तरं नसलेल्या प्रश्नांची भेंडोळी त्याच्यासमोर साचत जातात. आशा लावून बसलेलं कुटुंब, दुष्काळ व भूक अशा सगळ्या समस्यांना पुन्हा तोंड द्यायची वेळ त्याच्यावर येते.

सोहनगढमधील भूमिसंघर्षाला मिळालेलं असाधारण व अनपेक्षित यश सामूहिक कृतीचं सामर्थ्य अधोरेखित करणारं ठरलं. त्यातून लोकांना आशेचा किरण दिसला आणि संघटना उभारणीच्या दिशेने पाऊल टाकण्याचं बळ मिळालं. ‘काहीच बदलणार नाही!’ यासारख्या असहाय भविष्यवाणीने लोक नकारात्मक गर्तेत गेले होते, पण सोहनगढमधील यशस्वी संघर्षामुळे त्यांना सकारात्मक दिशा मिळाली- ‘हम अपना अधिकार जानते, नहीं किसी से भीख माँगते’, अशा आत्मविेशासपूर्ण घोषणा जन्म घेऊ लागल्या. जमीनवाटपाच्या संघर्षामुळे लोकांना नवनवीन शक्यतांचा शोध घ्यावासा वाटू लागला. संघटना उभारण्याची वेळ आली होती. संघटनेचं स्वरूप, व्याप्ती व उद्दिष्टं, यांविषयी चर्चा करण्यासाठी देवडुंगरीत अनेक बैठका झाल्या. प्रत्येक मुद्यावर चर्चा झाली. अगदी संघटनेच्या नावाबद्दलही बराच खल झाला. शेवटी ‘मजदूर किसान शक्ती संघटन’ हे नाव सगळ्यांना पसंत पडलं.

मजदूर असलेलेच लोक सीमान्त शेतकरी- किसान होते, आणि ही संघटना त्यांना शक्ती पुरवण्यासाठीच कार्यरत राहणार होती. संघटनेच्या चिन्हावरही अनेकांनी काम केलं, सर्वांनी मिळून त्याचं डिझाइन ठरवलं. चिन्हामध्ये लिंगभावात्मक समतोलही साधण्यात आला. संघर्षाचं प्रतीक म्हणून काळ्या रंगात पुरुषाची वळलेली मूठ होती, तर बदल व क्रांतीचं प्रतीक म्हणून लाल रंगात स्त्रीची मूठ दाखवली होती. बदलाची मागणी करण्यात स्त्री पुढाकार घेते, याचा निर्देश करण्यासाठी तिचा हात पृष्ठभूमीला घेण्यात आला. अशा प्रकारे संघटनेने आकार घेतला. आपली बिकट अवस्था बदलायची असेल तर सामूहिक संघर्ष करण्याविना दुसरा काही मार्ग नाही, हे गरीब लोकांच्या लक्षात आलं. कुशलपूरमधील मजुरीसाठीचा संघर्ष आणि सोहनगढमधील भूमिसंघर्ष हे त्या अर्थाने लोकजागृतीचे कार्यक्रमच ठरले. ‘कृतीतून शिक्षण’ झालं. ‘एक बोट मोडता येतं, पण मूठ मोडता येत नाही’ असे वाक्प्रचार त्यांच्या सांस्कृतिक अभिव्यक्तीचा भाग झाले होते. सामूहिक सामर्थ्याविषयीचं पारंपरिक आकलन  वास्तवामध्ये आचरणात आलं होतं. लोकांनी स्वतःच्या भाषेत प्रश्नांची चर्चा करणं गरजेचं आहे, हे देवडुंगरीतील कार्यकर्त्यांना कळून चुकलं होतं.

या संघटनेची स्थापना विचारसरणीय वा सैद्धान्तिक चर्चांमधून झाली नव्हती, तर परस्परांना मान्य असलेली तत्त्वं आणि लोकशाही नीतिनियमांची अलिखित संहिता यांना पायाभूत मानून लोकांनी ही संघटना उभी केली होती. गरीब लोकांनी त्यांची वंचित अवस्था व त्यांच्यावर होणारा अन्याय यांच्याच आधारे धारदार राजकीय विश्लेषण सुरू केलं. ग्रामसमुदाय व्यवहार्य असतो. त्यांची स्वतःची अशी माहितीव्यवस्था असते- दैनंदिन जीवनामध्ये रूजलेलं ज्ञान व आकलन त्यांना स्वाभाविकपणे प्राप्त झालेलं असतं. मजदूर किसान शक्ती संघटनेमुळे व्यक्तिगत अनुभवांना एकत्र येण्यासाठी मंच मिळाला आणि त्यातून विवेकाचा बुलंद आवाज निर्माण झाला. या आवाजाकडे दुर्लक्ष करणं किंवा त्याला क्षुल्लक लेखणं शक्य नव्हतं. कोणत्याही लोकसंघटनेची वाढ लोकांच्या विचारप्रक्रियांमधून व्हावी लागते आणि नवीन संकल्पना व प्रतिक्रिया सामावून घेण्यासाठी त्यांना वेळ द्यावा लागतो. या संघटनेची वाढ नैसर्गिकरित्या झाली. प्रत्येक क्रिया व प्रतिक्रिया विचारपूर्वक केली जात होती. ही संघटना चर्चात्मक व विश्लेषषणात्मक बदलाची वाहक बनली. संघटना- बांधणीच्या प्रक्रियेच्या दरम्यान हरिसिंगला अटक झाली. त्यातून न्यायाबद्दलचा व संघटित परिवर्तनाविषयीचा आशावाद वाढला.

पथनाट्याचा वापर

संघटना स्थापन होण्याच्या आधी व नंतरही शंकरसिंग यांनी स्वतःकडची अंगभूत संवादकौशल्यं सर्व राजकीय कृतींमध्ये रूजवली. त्यांच्यामधील ऊर्जा, सामर्थ्य व अभिनवता यांमुळे लोकभाषेतील नाटकांच्या रूपात राजकीय प्रश्नांचं सादरीकरण होऊ लागलं. औपचारिक मंच असो की पथनाट्य असो, शंकर यांच्यातील अभिनेता व मार्गदर्शक सहजपणेच वावरायचा. संघटनेचे राजकीय संदेश पथनाट्यं, गीतं व घोषणा यांद्वारे लोकांपर्यंत पोचवण्यात आले. नाटक केवळ मनोरंजनापुरतं असतं, ही लोकांची धारणा बदलण्यासाठीसुद्धा हे उपक्रम थेट प्रभावशाली ठरले. तातडीने व परिणामकारकरित्या संवाद साधण्यासाठी शंकर सिंग यांचे प्रयोग संघटनेच्या मदतीला आले. लोकांच्या अनुभवांच्या आधारे या नाटकांची तोंडी संहिता तयार केली जात असे आणि सामूहिकरित्या तिची रचना ठरवली जायची. खूप दिवसांनंतर नाटक प्रत्यक्षात लिहिलं जात असे- त्यातही साहित्यकृती म्हणून नव्हे, तर निव्वळ नोंद म्हणून हे लेखन व्हायचं.

प्रत्येक प्रश्नावर वेगवेगळं नाटक होतं. सामूहिक हिताच्या प्रश्नांबाबत जागरूकता निर्माण करत गावोगाव जाणाऱ्या प्रत्येक पदयात्रेमध्ये पथनाट्यांचा अंतर्भाव केला जात होता. यात कोणीही व्यावसायिक अभिनय करणारं नव्हतं वा स्थानिक नाट्यगटही नव्हता. संशोधक व स्थानिक लोकच या नाटकांमध्ये अभिनय करायचे. सादरीकरणानंतर होणाऱ्या चर्चा व युक्तिवादांमध्ये ही सर्व मंडळी स्वेच्छेने व सहजपणे सहभागी होत. संघटनेचा मित्रपरिवार व इतर लोक आनंदाने या प्रक्रियेत सामील झाले. हरीसिंगविरोधातील संघर्षामध्ये तणाव टोकाला गेलेला असताना या नाटकांची पहिली चाचणी पार पडली. नाटक हे संदेशनाचं शक्तिशाली साधन आहेच, शिवाय ते सहजासहजी थांबवता येत नाही, विशेषतः लोकप्रिय नाटक असेल तर त्याला पायबंद घालणं अवघड जातं. संघटनेच्या पथनाट्यांमध्ये विनोद व विडंबन यांचं उत्कृष्ट मिश्रण होतं. त्यामुळे या नाटकांना प्रचंड लोकप्रियता मिळाली.

1990च्या दशकारंभी बंगलोरहून आलेल्या उमाशंकर यांनी कार्यकर्त्यांची पहिली नाट्य कार्यशाळा घेतली. वेळोवेळी कार्यशाळेमधून नवीन नाटक विकसित करण्याची परंपरा रुजवायला त्यांनी मदत केली. त्या पाठोपाठ दर वर्षी एप्रिल महिन्यात जथा/पदयात्रा काढण्याचा आणि नंतर 1 मे हा कामगार दिन साजरा करण्याचा पायंडाही संघटनेने पाडला. आजही ही परंपरा कायम आहे. नाटकामुळे येऊ घातलेल्या वर्षातील संघटनेच्या कार्यक्रमाची ढोबळ रूपरेषा स्पष्ट होते आणि लोकांना त्यात सहभागी होण्याचं आवाहन केलं जातं. राजकीय पथनाट्य कोणत्याही प्रासंगिक प्रश्नाशी जोडलेलं असायला हवं. स्थानिक बोलीचा वापर त्यात व्हायला हवा. शिवाय, समकालीन व लोकप्रिय संदर्भांद्वारे स्थानिक अनुभवजन्य इतिहासाशी या नाटकाने स्वतःला जोडून घ्यायला हवं.

यातून मग नाटकातील सूचित राजकीय संदेश स्पष्ट होतो. आपले अनुभव आणि सतत कानावर पडणाऱ्या राजकीय चर्चा यांच्यातील संबंधांविषयी लोक विचार करू लागत. मजदूर किसान शक्ती संघटनेच्या पुढील सर्व नाटकांमध्ये या परंपरेला अनुसरून कार्यवाही होत  राहिली आहे. तर, कार्यशाळा राजकीय व आर्थिक विश्लेषणाचा सराव घडवणारी होतीच, पण लोकांसमोरील संभ्रमाचं नाट्यरूपांतर कसं करावं याचाही सराव त्यात होत होता. कार्यशाळेला येताना सहभागी सदस्य आपापला शिधा घेऊन आले. नाटक बसवण्यासाठी व त्याचे गावोगाव प्रयोग करण्यासाठी या लोकांनी उपजीविकेच्या कामातून जवळपास महिनाभर रजा घेतली होती. पाली, भिलवारा, अजमेर व उदयपूर (जुन्या उदयपूर जिल्ह्यातून राजसमंद हा वेगळा जिल्हा करण्यात आला होता), या शेजारच्या जिल्ह्यांमधील 27 गावं निश्चित करण्यात आली.

हा अनुभव सर्वांसाठीच नवीन होता. पथनाट्याच्या या प्रक्रियेमध्ये मजदूर किसान शक्ती संघटनेला उमाशंकर यांच्यासोबतच ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’मधील (एनएसडी) त्रिपुरारी शर्मा आणि उमाशंकर यांचे सहकारी- शिवसिंग निहाल, रामनिवास, रामलाल, हमीद व बोधू यांचंही पाठबळ व मार्गदर्शन लाभलं. बहुगुणसंपन्न असलेल्या त्रिपुरारी या उमाशंकर यांच्या नाट्यगुरू होत्या. लक्ष्मी कृष्णमूर्ती व त्रिपुरारी या दोघींनी उमाशंकर यांना औपचारिक नाट्यकलेच्या दिशेने जाण्यासाठी प्रोत्साहन दिलं. अन्याय व गरिबी यांच्याशी लढा देण्याची बांधिलकी शंकर मानत असत. त्यांची संवादकौशल्यं, अभिनय, कठपुतळ्यांचे खेळ आणि मार्मिक विनोद व कोट्या, हे सगळंच त्या बांधिलकीशी घट्ट जोडलेलं होतं. त्यांच्या उपस्थितीमुळे संघटनेतील इतर अनेकांमधील कलागुण बाहेर येऊ लागले. उमाशंकर यांचा उत्साह व ऊर्जा इतरांनाही ताजं करत असे. कामगारांनी व शेतकऱ्यांनी संघटना स्थापन करूनच आपलं उद्दिष्ट जाहीर केलं. सातत्याने विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांवरचं हे एक सडेतोड उत्तर होतं.

पत्रकं व भित्तिचित्रं यांद्वारे संदेशन

लोकांशी संवाद साधण्यासाठी चळवळी पुस्तिका व पत्रकं यांचा वापर करतात. मजदूर किसान शक्ती संघटनेनेही माहितीचा प्रसार करण्यासाठी पत्रकांचा उपयोग केला. संघटनेच्या स्थापनेची घोषणा करणारं पहिलं पत्रक काढण्यात आलं. नागरी भागांमध्ये अशी पत्रकं लगेच कचऱ्यात तरी जातात किंवा काही खाद्यपदार्थ बांधण्यासाठी वापरली जातात. पण ग्रामीण भारतामध्ये लोक पत्रकं वाचतात. भित्तिचित्रांची पारंपरिक पद्धतही वापरण्यात आली. लाल माती व पाणी यांचं मिश्रण केलेला डबा घेऊन तरुण स्वयंसेवक उत्साहाने ठिकठिकाणी जात. या लाल रंगाने भिंतींवर मजकूर लिहिण्यासाठी जुन्या फडक्यांचा वापर ब्रश म्हणून केला जात असे. आजही यातील काही भित्तिचित्रं पाहायला मिळतात. सद्यकाळात नागरी भागांमध्ये समाजमाध्यमांचा जसा वापर होतो तसाच वापर ग्रामीण संदेशन व्यवहारात भित्तिचित्रांचा झाला. ‘भीम चलो भाई, भीम चलो, 1 मई को भीम चलो’, ही घोषणा गावांमधील अनेक भिंतींवर लिहिलेली अजूनही सापडते, यावरून कामगार दिनाचा मेळावा किती लोकप्रिय होता याचा अंदाज यावा.

1990 साली कामगार दिनापूर्वी वाटण्यात आलेल्या पत्रकामध्ये जगण्याशी संबंधित विविध ज्वलंत प्रश्न उपस्थित करण्यात आले होते, आणि या प्रश्नांवर तोडगा काढण्याची प्रतिज्ञाही करण्यात आली होती : ही जमीन आपली आहे, त्यासंबंधीचा तोडगाही आपल्याच हातात आहे, आपल्याकडे संख्याबळ आहे आणि यासंबंधी प्रश्न विचारण्यासाठी आपण एकत्र यायला हवं. आपले अधिकार आपल्याला कसे मिळतील? इथे आपल्याला काम का मिळत नाही? स्वतःची दुर्दशा आपण कशी सुधारायची? न्याय्य वेतन मिळण्यासाठी आपण काय करायला हवं? आपल्या जलस्त्रोतांचं रक्षण कसं करायचं? ही लाल माती हिरवी कशी करता येईल? सर्व प्रश्न लोकांनी एकत्र येऊन हाताळायला हवेत आणि त्यातूनच यावरचे उपाय सापडतील, असा निर्धार दाखवायला हवा. दोन मुठी आपल्याला एकत्र आणतात. या सगळ्या प्रश्नांवर उत्तरं शोधण्यासाठी सर्व मजुरांनी व शेतकऱ्यांनी एक मे रोजी भीम इथे ‘पाटिया का चौडा’मध्ये यावं. मजदूर किसान शक्ती संघटनेच्या (एमकेएसएस) स्थापनेची घोषणा त्या वेळी केली जाईल!

घोषणा

संघटनेचं घोषवाक्य अतिशय लक्षवेधक होतं. समता, न्याय व प्रतिष्ठा यांबद्दलची इच्छा त्यातून व्यक्त होत होती: न्याय समानता हो आधार ऐसा रचेंगे हम संसार घोषवाक्यं प्रभावशाली ठरतात. जाहिरातींमधील जिंगल हे त्याचं उत्तम उदाहरण मानता येईल. परंतु जिंगल व घोषवाक्य यांच्या उद्देशांमध्ये फरक असतो. घोषवाक्यात  मोठा विचार मोजक्या व सोप्या शब्दांमध्ये मांडलेला असतो. घोषवाक्यांचा सातत्याने उच्चार होतो आणि ती वेगाने दूरच्या प्रदेशांपर्यंत प्रवास करतात. लोकांच्या मनांना स्पर्श करून त्यांना विचारप्रवृत्त करण्याचं काम घोषणांच्या माध्यमातून होतं. मजदूर किसान शक्ती संघटन- जिंदाबाद जिंदाबाद; जब तक भूखा इन्सान रहेगा, धरती पर तूफान रहेगा; भ्रष्टाचार- हाय, हाय! आणि संघटनेचं प्रमुख घोषवाक्य- न्याय समानता हो आधार, ऐसा रचेंगे हम संसार. अशा अनेक घोषणा संघटनेने वापरल्या.

चळवळींमधील सर्व परिणामकारक गाणी विविध समाजघटकांना आकर्षित करणारी ठरली आहेत. माहिती अधिकार आंदोलनाच्या लोकप्रियतेत अनेक आकर्षक गाण्यांमधील लकेरींचं व शब्दांचं योगदान आहे. ही गाणी बहुतेकदा उत्स्फूर्तपणे तयार केली जात आणि काही वेळा जाणीवपूर्वक संदेश देण्यासाठी त्यांची निर्मिती होत असे. प्रत्येक नाटकात किमान एक गाणं तरी असायचंच आणि मुख्य नाटकाहून अधिक मूलगामी पद्धतीने संदेश पोचवण्याचं काम गाण्यातून व्हायचं. संघटनेची स्थापना झाली त्या वर्षीच्या नाटकामध्ये स्थलांतरित मजुरांच्या दुःखावरचं एक गाणं होतं. मोठ्या अपेक्षेने हा मजूर स्वतःचं घर सोडून जातो, पण आशा धुळीस मिळाल्यावर माघारी येतो. उत्तरं नसलेल्या प्रश्नांची भेंडोळी त्याच्यासमोर साचत जातात. आशा लावून बसलेलं कुटुंब, दुष्काळ व भूक अशा सगळ्या समस्यांना पुन्हा तोंड द्यायची वेळ त्याच्यावर येते.

या संदर्भात संघटनेने एक संभाव्य उत्तर सुचवलं. त्या दिशेने दीर्घ मार्गक्रमणा केल्यावर अखेरीस 2005 साली ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने’द्वारे लोकांना रोजगाराची कायदेशीर हमी मिळाली. संघर्षांची व लोकचळवळींची अभिव्यक्ती अनेक ताकदीच्या गाण्यांद्वारे होत आलेली आहे. सामूहिकरित्या म्हटली जाणारी व संवादी स्वरूपाची अशी अनेक गाणी आहेत. मजदूर किसान शक्ती संघटनाही याला अपवाद नव्हती. या भागातील कामगार व शेतकऱ्यांच्या समुदायाने 1987 सालापासून गाणी गायला व घोषणा द्यायला सुरुवात केली. 1990 साली एक गाणं सगळ्यांच्याच ओठांवर होतं, ते असं : परदेशां सू आयो भाया, राम शाम लीजियो रे घनदनिआन आया ठांका हाल सुनाओ रे, मारनो हधारिओ स्थलांतर आणि त्याच्या निष्फळतेविषयीचं हे गाणं आहे. खऱ्या समस्यांना सामोरं जाण्यासाठी गावात का थांबला नाहीत, असा प्रश्न यात कामगारांना व शेतकऱ्यांना विचारण्यात आला आहे.

चैतन्यशील व सर्वपरिचित लोकगीतांच्या सुरावटींवरच बसवण्यात आलेली ही गाणी व घोषणा अगदी आजही लोकप्रिय आहेत. त्याचा गद्य तर्जुमा असा : जाओ जाओ देश, परदेशाओं देश बारमाही दुष्काळ व गरिबी यातून स्थलांतर आपल्यावर लादलं जातं, पण हे आपण कुठवर सहन करत राहणार? भूक भागवण्यासाठी आपल्याकडे पुरेशी जमीन नाही आणि हाताला काम नाही. म्हणून मग कामगार ‘बिजोलिआ’तील खाणींमध्ये अमानवी स्थितीत आपल्याला वेठबिगाराप्रमाणे राबवून घेणारं हे ठिकाण आहे, काठिआवाडमधील विहिरींमध्ये, वीटभट्‌ट्यांमध्ये, पाली व अहमदाबादमधील कारखान्यांमध्ये जातात. या ठिकाणांवरचे धाबे व हॉटेलं आपल्या मुलांचं रक्त शोषून घेतात. तिथून परतल्यावर त्यांची तब्येत ढासळलेली असते, त्यांच्यासोबत काही आजारही आपल्या घरात येतात, पण पैसा काही येत नाही. शेवटची ओळख ठाम निर्धार व्यक्त करणारी आहे. आम्ही अर्धी रोटी खाऊन दिवस काढू, पण इथेच राहून आपले प्रश्न सोडवू. आपला परिसर हिरवागार करून गावांचं कल्याण साधण्यासाठी सर्वांना सोबत बोलावणारं दुसरं एक गाणं होतं.

आपल्या जगण्याची सूत्रं आपल्याच हातात ठेवावीत आणि स्वराज्याच्या प्रक्रियेचा भाग व्हावं, यासाठीचं आवाहन त्यात करण्यात आलं आहे. ‘बोल साथीदा’ हे ते गाणं. अतिशय आकर्षक लोकसुरावटीवर बसवण्यात आलेल्या या गाण्यातील शब्दांमध्ये मजदूर किसान शक्ती संघटनेच्या कार्यक्रमाची रूपरेषाच व्यक्त झालेली आहे. त्याचं गद्यातील रूपांतर असं: अरे नेत्यांनो आणि बाबूंनो, कान देऊन ऐका. श्रीमंताच्या हितासाठी तुम्ही आमची दुर्दशा करून ठेवलीत. पण आता आम्ही स्थलांतर करणार नाही, आम्ही कामाला इथे स्थलांतरित होऊन यायला लावू, लक्षात ठेवा! आम्ही झाडं लावू आणि ही भूमी हिरवी करू...

पथनाट्याची कार्यशाळा

उमाशंकर बंगलोरहून आले तेव्हा नाटकाच्या तालमीसाठी कार्यकर्त्यांनी एक शांत व निर्जन जागा  शोधली. गावापासून दूर एका वनाशेजारी अतिशय शांत ठिकाणी असलेलं रावली गेस्ट हाऊस त्यांनी निवडलं. बिबट्या व तरस यांसारखे प्राणी या सरकारी इमारतीच्या आसपास अनेकदा दिसत. पैसे कमावून कुटुंबातल्या लोकांची पोटं भरण्याची जबाबदारी असतानाही पंधरा तरुण मंडळींचा गट एकत्र आला आणि त्यांनी नाटक बसवलं. बावीस दिवस विविध गावांमध्ये त्यांनी पथनाट्याचे प्रयोग केले. या नाटकाने लोकांना सामायिक आस्थाविषयांवर विचार करायला चालना दिली आणि संघटना उभारणीसाठी आमच्या परिवारात सहभागी होण्यासाठी प्रोत्साहित केलं. संघटना उभारणीच्या आधी यात्रा काढण्याची ही परंपरा गेली पंचवीस वर्षं सुरू आहे.

1990 सालच्या एप्रिल महिन्यात प्रत्येकी दहा ते बारा लोकांचे गट करून अभिनेते मंडळी साठहून अधिक गावांमध्ये पायी गेली आणि त्यांनी कामगार दिनाच्या कार्यक्रमासाठी सर्वांना निमंत्रित केलं. रोजची पायपीट करून नाटकाचं पथक एखाद्या गावात जायचं आणि तिथल्या पारावर ते नाटक सादर करायचे. अभिनेते- कार्यकर्ते त्या गावातच लोकांच्या घरात जेवत व झोपी जात. या पहिल्या नाटकाचं नाव ‘दुविधा’ असं होतं. एकीकडे स्थलांतरित झालेला कामगार आणि दुसरीकडे गावात बिकट वातावरणाशी झटापट करणारा गरीब शेतकरी यांच्या जगण्याची तुलना या नाटकात केली होती. पुन्हा कधीही स्थलांतर करायचं नाही, असा निर्णय घेऊन कामगार या द्विधा परिस्थितीमधून वाट काढतो, आणि गावातच राहून प्रश्नांशी झगडतो. तरीही शेवटचा प्रश्न कायम राहतो: ‘आपल्या प्रश्नांवरचा तोडगा आपल्याला का सापडत नाही?’ या संदर्भात मजदूर किसान शक्ती संघटनेच्या रोजनिशीत पुढील नोंद आहे : ही प्रक्रिया तीन आठवडे चालली आणि त्यातूनच 1 मे 1990 रोजी मजदूर किसान शक्ती संघटनेची स्थापना झाली.

स्थापना दिवसाच्या बैठकीला जवळपास एक हजार लोक आले होते. त्यातील सुमारे पंचवीस स्त्री-पुरुष या वेळी बोलले आणि मग प्रतिज्ञा करून संघटनेची स्थापना झाली. मग हातात फलक घेतलेल्या आबालवृद्धांची एक मिरवणूक निघाली. ही रंगीबेरंगी मिरवणूक छायाचित्रांमधून जतन करण्यात आली आहे. संघटनेने मंजूर केलेल्या पहिल्या ठरावांची अंमलबजावणी लगेच पुढच्या तीन महिन्यांमध्ये होणार होती. किमान वेतन हा प्रत्येक कामगाराचा मूलभूत अधिकार आहे; या प्रदेशातील कोणत्याही कामगाराला किमान वेतनाहून कमी रक्कम मजुरी म्हणून स्वीकारावी लागू नये, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील, असं ठरावामध्ये एकमताने नमूद केलं होतं. संघटनेचे सदस्य भ्रष्टाचार व अप्रामाणिकपणा यांच्या विरोधात लढा देतील आणि इथून पुढे स्वतः कोणालाही लाच देणार नाहीत, असं दुसऱ्या ठरावात नमूद केलं होतं.

1 मे 1990 रोजी बैठक झाल्यावर भीमच्या रस्त्यांवरून एक मोर्चा काढण्यात आला आणि त्याचा शेवट भीम बाजारात एका सार्वजनिक सभेच्या रूपात झाला. कोणत्याही पक्षाशी संलग्न नसलेले कामगार व गरीब शेतकरी यांची अशी एकत्र सभा भीमवासियांनी कधीही पाहिली नव्हती. आपण न्याय व समतेसाठी लढा द्यायला संघटित झालो आहोत, असं भीममधील तुलनेने उच्चभ्रू असलेल्या वर्गाला निर्भीडपणे सांगणारी गरीबांची ही पहिलीच सभा होती. या प्रयत्नाला पाठिंबा द्यावा, असं आवाहन या सभेत भीमवासियांना करण्यात आलं, आणि संघटनेचा उद्देशही जाहीर करण्यात आला. एक हजारांहून अधिक लोकांच्या उपस्थितीत 1 मे 1990 रोजी मजदूर किसान शक्ती संघटनेच्या स्थापनेची घोषणा झाली. सर्वांनी टाळ्या वाजवून या घटनेचं स्वागत केलं आणि मुठी उंचावल्या. त्या वर्षापासून आजतागायत ‘पाटिया का चौडा’ इथे दर वर्षी 1 मे रोजी कामगार मेळावा भरतो. दादी रापट व सोहनगढ इथल्या लढ्यांना पाठिंबा देणारा आमचा सर्व मित्रपरिवार नवीन संघटनेला समर्थन देण्यासाठी भीममध्ये आला होता.

हा पहिला मेळावा समाप्त होत असताना लोकांनी किमान वेतनासाठी संघर्ष करण्याचा निर्धार व्यक्त केला. त्याचप्रमाणे, विषमता व खोटेपणा यांच्याविरोधातील संघर्षाचाही निश्चय कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. लोकांची सेवा करणं हे सरकारचं कर्तव्य आहे आणि कायद्याचं पालन करणं ही इतरांइतकीच सरकारचीही जबाबदारी आहे. लढ्याचा दृढनिश्चय मनात घेऊन लोक आपापल्या घरी गेले, पण या वेळी ते सगळे ‘मजदूर किसान शक्ती संघटन’ या एका दुव्याने जोडलेले होते- त्यांच्यात एकीचं बळ निर्माण झालं होतं. गरिबी निर्मूलनाविषयी मजदूर किसान शक्ती संघटनेने तयार केलेल्या एका अहवालात आर. एन. मिश्रा यांच्या संस्मरणीय भाषणाचा  उल्लेख आहे. मूळचे बिहारमधील मधुबनी इथले मिश्रा भीममध्ये उच्च-माध्यमिक शाळेत इंग्रजीचे ज्येष्ठ शिक्षक म्हणून कार्यरत होते.

संघटनेला पाठिंबा देताना त्यांनी विषमता व शोषण यांच्या राजकारणाविषयीचं स्वतःचं मार्मिक आकलन मांडलं होतं: मिश्राजी सभेला संबोधित करण्यासाठी उठले, तेव्हा त्यांच्या बहुतांश परिचितांना वाटलं की आता क्रांतीचा ‘साम्यवादी’ पाढा वाचला जाईल. पण मिश्राजी सर्वसामान्य लोकांच्या संघर्षाविषयीच बोलले. चांगल्या माणसांना भ्रष्ट बनवणाऱ्या रचनेविरोधात लोक कसा लढा देतात, याविषयीची मांडणी त्यांनी केली. ‘आपल्या भवतालातील रोजच्या भ्रष्टाचाराविरोधात सर्वांनी उभं ठाकायला हवं,’ असं कळकळीचं आवाहन त्यांनी केलं. रजनी बक्षी बापू कुटीमध्ये लिहितात : ‘आपण हाती घेतलेलं काम केवळ कोणा व्यक्तीपुरतं मर्यादित नाहीये, तर या संपूर्ण जगातील लोकांशी संबंधित असं हे कार्य आहे’, धापडा गावाहून आलेले देवराम संघटनेच्या स्थापना-सभेमध्ये बोलत होते. अशा प्रकारच्या संघटनेची गरज खरोखरच होती, असं इतर उपस्थित म्हणाले. जातपंचायत, राजकीय पक्ष, धार्मिक संघटना, सरकारी कार्यालयं, ग्रामपंचायत यांपैकी कोणतीही प्रस्थापित संस्था लोकांना न्यायासाठीच्या लढ्यामध्ये साथ देत नव्हती. सर्वसामान्य गावकरी काहीच बदल घडवू शकत नाहीत, अशी धारणा या समुदायांमध्ये दृढमूल झाली होती. पण ही धारणा झुगारून देत तिथे जमलेल्या हजारभर लोकांनी नवीन संघटनेची स्थापना केली.

लालसिंग यांचे ज्येष्ठ मित्र व मार्गदर्शक तेजसिंग यांनी काही वर्षांपूर्वी ठाकूर हरीसिंग याच्याशी एकहाती संघर्ष केला होता. उभं राहायला काठीचा आधार घ्यावा लागत असूनही तेज सिंग त्याच कळकळीने बोलत होते, ‘मला चालता येत नसलं, तरी मी तुमच्या सोबत आहे.’ त्यांच्या तोंडाचं बोळकं झालं होतं, थकवा चेहऱ्यावर दिसत होता, पण त्यांचं स्मित कायम होतं. ते म्हणाले: ‘स्वतःसाठी लढू नका, पण शेजाऱ्यासाठी तरी लढा. शेजारी भुकेला असताना निवांत झोपी जाणं, हे काही माणूसपणाचं लक्षण नाही.’ सुरिंदर म्हणाले- ‘आम्हाला हा प्रदेश सोडून बाहेर जायचं नाही. आम्हाला इथेच काम मिळायला हवं. बिजोलिआतल्या खाणींमध्ये काम करत जीव गमावण्याची वेळ आमच्यावर येऊ नये.’ ‘पूर्वी दरोडेखोर जंगलांमध्ये राहात, आता ते बंगल्यांमध्ये राहातात,’ आणखी एक वक्ता म्हणाला.

दुसऱ्या एका व्यक्तीने इतिहासाचा दाखला देत गांधीजींची प्रेरणादायी आठवण जागवली. ब्रिटिश सत्तेविरोधात एकत्र येऊन लढा देण्याचं गांधींनी केलेलं आवाहन आपल्यालाही दिशादर्शक असल्याचं ते म्हणाले. चुन्नीबाई माइकजवळ गेल्या आणि आयुष्यातलं पहिलं भाषण त्यांनी तिथे दिलं. बोलताना त्यांचा घुंगट जवळपास कमरेपर्यंत खाली आला होता आणि वळलेली मूठ हवेत होती. ही कोणीतरी व्यावसायिक कार्यकर्ती असावी, असं एखाद्या नवख्या निरीक्षकाला वाटलं असतं. उपस्थितांमधील आर.के. मिश्रा हे स्थानिक शाळेत इंग्रजी शिकवायचे. ते नियमितपणे शाळेत जाऊन अभ्यासक्रम पूर्ण शिकवत असत, त्यामुळे त्यांच्याबद्दल लोकांमध्ये भयमिश्रित आदराची भावना होती. या नवीन ‘क्रांतिकारकां’च्या गटाविषयी ते साशंक होते. शांततावादी असलेला व गरीबांप्रमाणे राहणारा हा कार्यकर्त्यांचा गट खरोखरच काही बदल घडवू शकेल का, याविषयी त्यांना खात्री नव्हती. पण तरीही मिश्राजी या कार्यकर्त्यांकडे आकर्षित झाले आणि नंतर त्यांच्यात चांगली मैत्रीही झाली. एकमेकांसोबत वाद घालणं व चर्चा करणं, हा सर्वांनाच जोडणारा दुवा होता.

सोहनगढमधील आंदोलनापासून मिश्राजींनी देवडुंगरीतील कार्यकर्त्यांना पाठिंबा दिला आणि कार्यकर्त्यांना स्वतःच्या विचारांची पडताळणी करण्यासाठी मिश्राजींच्या रूपात एक हक्काचा मार्गदर्शक लाभला. भीम हे लहानखुरं शहर आहे. मजदूर किसान शक्ती संघटनेची स्थापना झाली, त्यावेळी शहरवासीयांमध्ये मिश्र भावना उमटल्या. कामगार संघटित झाल्याने बाजारपेठेत चिंतेचं वातावरण होतं. इतर लोकांना कुतूहल वाटत होतं. पण आपण संघटनेच्या कामावर लक्ष केंद्रित करायचं असा दृढनिश्चय मनात बाळगून कामगार व शेतकरी आपापल्या घरी गेले तेव्हा प्रत्येकाच्या मनात आशेचा दिवा तेवत होता.

(अनुवाद : अवधूत डोंगरे)

(आरटीआय स्टोरी या पुस्तकात 30 प्रकरणे आहेत, त्यातील पाच प्रकरणे साधनात प्रसिद्ध केली जात आहे. - संपादक

Tags: अवधूत डोंगरे चळवळ संघटना गाणी घोषणा भित्तिचित्रं पत्रकं नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा कार्यशाळा नाटक पथनाट्य कुशलपूर सोहनगढ देवडुंगरी मजदूर किसान शक्ती संघटन अरुणा रॉय आरटीआय स्टोरी Avdhut Dongare songs Jingles Posters NSD Workshops Drama Street Play Kushalpur Sohangadh Devdungri Majdoor Kisaan Shakti Sanghtan Aruna Roy RTI Story weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

अरुणा रॉय

'द आरटीआय स्टोरी' च्या लेखिका. भारतातील सामाजिक कार्यकर्त्या.अरुणा रॉय,शंकर सिंग,निखिल डे आणि इतर अनेकांसह मजदूर किसान शक्ती संघटनेनी "मजदूर किसान शक्ती संघ" याची स्थापना केली..तसेच त्या एनएसीचा सदस्य देखील होत्या. 


प्रतिक्रिया द्या