डिजिटल अर्काईव्ह (2014-2019)

महाराष्ट्राच्या काही भागात पावसाने हजेरी लावलीय. ‘असा उशिरा आलेला पाऊस तळहातावर झेलून घ्यावा’, ही कविकल्पना म्हणून ठीक असली तरी, एवढा उशिरा येणारा पाऊस कित्येक जीवांचा अंत पाहणारा असतो. गतवर्षी वार्षिक सरासरीच्या निम्माच पाऊस पडला. महाराष्ट्रातल्या दीडशे तालुक्यांमध्ये सरकारने अधिकृतपणे दुष्काळ जाहीर केला. तसा दुष्काळ हा काही अचानक टोळधाडीसारखा येत नाही. त्याची चाहूल आधीच लागलेली असते, अंदाज आलेला असतो. दुष्काळात होरपळणाऱ्यांची जी दुर्दशा होते, त्याला केवळ निसर्गच जबाबदार असतो असेही नाही. शिवाय दुष्काळ हा काही फक्त अन्नधान्याचा, पाण्याचाच नसतो- तो नियोजनाचा, धोरणांचा, राजकीयइच्छाशक्तीचा व मुलभूत उपायांचाही असतो.

‘दुष्काळ झळा : निवडणुकीच्या रंगीबेरंगी सतरंजीखाली दडवलेला कचरा’ हा माझा लेख एप्रिलमध्ये लोकसत्तेत प्रसिद्ध झाला. तेव्हा दुष्काळाच्या आणखीही वेगवेगळ्यापैलूंवर लिहावे असे डोक्यात होते. हा लेख वाचूनच ‘साधना’चे संपादक विनोद शिरसाठ यांनी साधनाचा एक पूर्ण अंकच दुष्काळावर करण्याची कल्पना बोलून दाखवली. चर्चेतून या अंकाला आकार येत गेला. मग तो अंक संपूर्ण एकहातीच करावा, असे त्यांनी सुचवले. अंकातील सर्व मजकूर एकट्यानेच लिहून काढण्याचे आव्हान होते. प्रत्यक्ष कामाचे स्वरूप ठरल्यानंतर महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांना भेटी दिल्या. जिथून मध्य प्रदेशाची हद्द दिसते, अशा वरूड तालुक्यातल्या सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या गावांपासून ते नेहमीच दुष्काळ सोसणाऱ्या माणदेशातल्या अनेक गावांपर्यंत या निमित्ताने फिरता आले.

45-46 अंशापर्यंत तडकलेल्या चढत्या भाजणीच्या उन्हात जगण्याचा संघर्ष करणाऱ्या रयतेच्या कहाण्यांचा दाह शरीर-मनाला चटके देणाराच होता. दुष्काळ सोसणाऱ्या आणि दुष्काळाशी दोन हात करणाऱ्यांशी यानिमित्ताने संवाद साधता आला. मराठवाड्यातल्या मंठा, केज, धारूर, भूम, परांडा; विदर्भातल्या लोणार, बुलढाणा, रिसोड, वाशिम, यवतमाळ, अमरावती; माणदेशातल्या सांगोला, आटपाडी, माण, खटाव, जत आणि खानदेशातल्या पारवा, एरंडोल, धरणगाव, अमळनेर, चाळीसगाव अशा परिसरातल्या अनेक गावांना, तांडे-वाडी-वस्त्यांना भेटी देऊन दुष्काळाची दाहकता समजून घेतली.

किती तरी गोष्टी नव्याने कळत गेल्या. यातूनच जाणिवा विस्तारतात, आकलनाच्या कक्षा रूंदावतात. समाज मन समजून घेण्याचा पैस वाढतो. असे अनुभव आपल्यालाही खूप काही नव्याने शिकवणारे असतात. आता पावसाने सुरुवात केलीय. अर्थात पाऊस पडला म्हणजे अचानक परिस्थिती बदलते असे होत नाही. आपण मात्र लगेच वेगळ्या परिवेषात जातो. झाडा-पानांवरून निथळणारा पाऊस आणि थंडगार वाऱ्याचा स्पर्श यामुळे आधीच्या चटक्यांचा विसर पडू लागतो. एवढेच नाही तर पडत्या पावसात दुष्काळ हा शब्द उच्चारणेही अस्थानी वाटू लागते. पुढची भयाण चाहूल लागेपर्यंत तरी आपल्याला कशाचीच आच लागत नाही. तसे होऊ नये. पर्जन्याआधीची पिडा समजून घ्यावी एवढेच म्हणणे आहे.

Tags: दुष्काळ आसाराम लोमटे Drought Asaram Lomate weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

आसाराम लोमटे
aasaramlomte@gmail.com

पत्रकार व लेखक.  आसाराम लोमटे यांचे आलोक (कथासंग्रह), इडा पिडा टळो (कथासंग्रह),धूळपेर (लेखसंग्रह) ही पुस्तके प्रसिद्ध आहेत. आलोक या कथासंग्रहाला साहित्य अकादमी पुरस्कार (२०१६) मिळाला आहे. 


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके

कर्तव्य

सर्व पहा