डिजिटल अर्काईव्ह (2014-2019)

कुठल्याही विशिष्ट निर्मितीची समीक्षा करणं, त्यांच्या मेरिट-डीमेरिटवर, गुणावगुणांवर भाष्य करणं, त्याची प्रशंसा करणं किंवा त्यावर टीका करणं यासाठी मी हे निवेदन वाचत नाही. आज वादग्रस्त ठरलेल्या निर्मितींवर घेतलेले आक्षेप हे बहुतांशी सिनेमा या माध्यमाच्या अज्ञानापोटी घेतलेले आहेत. ‘बायोपिक म्हणजे काय?’ हे समजून घेतले तर हे आक्षेप बरेचसे दूर होतील असा माझा समज आहे. बायोपिक म्हणजे ऐतिहासिक व्यक्तीवरला माहितीपट नाही. माहितीपटात इतिहासाशी प्रामाणिक राहणं, ही पूर्वअट असते. ती कोण कितपत पाळतं, ही गोष्ट वेगळी, पण काल्पनिक घटना अंतर्भूत करणं हे माहितीपटात अनैतिक कृत्य ठरतं. चित्रपटनिर्मितीत दिग्दर्शकानं वास्तवाशी प्रामाणिक राहणं, अशी एखाद्याची अपेक्षा असू शकते; पण अपेक्षाच; तशी सक्ती करणं हे कलावंताच्या अभिव्यक्ति- स्वातंत्र्यावरचं आक्रमण ठरतं. चित्रपटनिर्मिती ही शेवटी एक सर्जनशील कृती आहे, याचा अर्थ या कृतीवर कोणी टीका करू नये, असा नाही.  

माणसाचं जगणं ही सिनेमाच्या पडद्याच्या चौकटीत मावणारी गोष्ट नाही. थोरामोठ्या व्यक्तींचं सोडा, पण लहानात लहान अशा सामान्य माणसाचं जगणं हीदेखील सिनेमाच्या चौकटीत मावणारी गोष्ट नाही. माणसाच्या जगण्याचा पसारा खूप मोठा असतो. माणसाचा नात्यांचा, वस्तूंचा, घटनांचा पसारा- बराचसा पसारा हा त्याचा खासगी ऐवज असतो. त्याचा तपशील त्याचा त्यालाच माहीत असतो. 

चरित्रकार जेव्हा एखाद्याचं चरित्र लिहायला बसतात, तेव्हा ते सार्वजनिक जीवनात चरित्रनायकानं केलेल्या हालचालींचे ठसे जमा करतात. त्याच्या परिवारातील, सहवासातील मित्रमंडळींच्या भेटी घेऊन चरित्रनायकाचे विविध पैलू जाणून घेतात; तत्कालीन सामाजिक वातावरणातलं त्याचं योगदान तपासतात, सामाजिक क्षेत्रात त्यानं घडवून आणलेलं परिवर्तन तपासतात. माणूस म्हणून चरित्रनायकाला समजून घ्यायचा महत्त्वाचा सोर्स म्हणजे त्याचा इतरांशी घडून आलेला पत्रव्यवहार. त्या व्यक्तीनं इतरांना लिहिलेली, इतरांकडून त्याला आलेली पत्रं चरित्रकार गोळा करतात. 

याखेरीज त्या व्यक्तीचा ज्या घटनांशी संबंध आहे, त्यांचे तपशील मिळवून त्याचा अभ्यास करतात. त्यावरून त्या व्यक्तीचा जीवनालेख तयार करायचा प्रयत्न करतात. जीगसॉ   पझलसारखे त्या व्यक्तीच्या जीवनाचे उपलब्ध तुकडे जमवून, त्याचं जीवनचित्र आपल्यासमोर सादर केलं जातं. त्यालाच आपण चरित्र म्हणतो. आता माणूस आणि त्याचं जीवन ही इतकी सोपी गोष्ट नसते की, त्याच्याविषयी इथं-तिथं मिळवलेली माहिती गोळा करून त्याचं व्यक्तिमत्त्व हाती लागेल आणि त्या माणसाचं पूर्ण चरित्र लोकांसमोर ठेवणं शक्य होईल. आणि म्हणता येईल की, बघा- हा माणूस हा असा होता.

आत्मचरित्रातूनही माणूस पूर्णांशानं व्यक्त होत नाही. एक तर माणूस हा चतूर प्राणी आहे. तो स्वत:च्या मनातले विचार व्यक्त करण्याऐवजी लपवण्यासाठी शब्दांचा वापर अधिक करतो. ‘आत्मचरित्रं ही उत्तम फिक्शन असतात’ असं म्हटलं जातं, ते उगाच नाही. बरीचशी आत्मचरित्रं काल्पनिक आणि वास्तव याची बेमालूम मिश्रणं असतात.

डेव्हिड लीन हा दिग्दर्शक ‘लॉरेन्स ऑफ अरेबिया’ सिनेमा काढायला बसला आणि लॉरेन्सबद्दलचा तपशील जमवायला लागला, तेव्हा त्याची मोठी पंचाईत झाली. तीसेक लोकांनी लॉरेन्सची चरित्रं लिहिली असल्याचं त्याला आढळून आलं. प्रत्येक चरित्रात लॉरेन्सचं व्यक्तिमत्त्व आणि कार्य वेगळ्या प्रकारे मांडलं होतं. काही चरित्रात लॉरेन्सला खलनायक म्हणून पेश केलं होतं, तर काही चरित्रांत त्याला हीरो म्हणून पेश केलं होतं. काहींनी तर लॉरेन्सविषयीच्या दंतकथा वास्तवातील घटना म्हणून चरित्रात घुसडल्या होत्या. ‘रॉशमॉन’ या जपानी चित्रपटात एक घटना चार व्यक्ती चार प्रकारे मांडताना दाखवलं आहे. घटना एकच, पण प्रत्येक माणसाच्या मनात उमटलेल्या प्रतिमा वेगळ्या. माणसाचं आयुष्य ही विविध घटनांची मालिकाच असते. एवढ्यावरून चरित्र- ‘मग ते पडद्यावरलं असो, नाही तर कागदावरलं-’ किती गुंतागुंतीचा मामला आहे, हे लक्षात येईल. 

आता बायोपिककडे वळू या. या सगळ्याचा बायोपिकशी संबंध काय? बायोपिकला आपण मराठीत चरित्रपट म्हणतो. इथं ‘पट’ या शब्दाचा अर्थ ‘सिनेमाचा पडदा’ असा घ्यायचा. वास्तवात कोठल्याही बायोपिकनं आजतागायत कोणाचंही समग्र चरित्र मांडलेलं नाही आणि त्याच्या निर्मात्यांनीदेखील तसा दावा कधी केलेला नाही. सिनेमाच्या पडद्यावर कोणाचंच चरित्र समग्रपणे मांडता येत नाही, हे स्पष्ट आहे. प्रत्येक माध्यमाची शक्तिस्थळं असतात, तशा मर्यादाही असतात. मग बायोपिकवाले करतात काय, तर त्या व्यक्तीच्या आयुष्यातल्या महत्त्वाच्या घटना निवडतात आणि पडद्यावर मांडतात. आता महत्त्वाच्या म्हणजे, त्यांना महत्त्वाच्या वाटलेल्या घटना. नायकाच्या आयुष्यातील निवडक घटना मांडून, त्याचं व्यक्तिचित्र आपल्यासमोर उभं करायचा हा प्रयत्न असतो. आपण त्याला बायोपिक म्हणतो. ‘प्रयत्न’ हा शब्द इथं महत्त्वाचा, कारण शेवटी हे प्रयत्नच असतात. 

आणि हे आपल्याकडे म्हणजे आपल्या देशातच होतं असं नाही. परदेशात चर्चिल, थॅचर, जॉन केनेडी यांच्यासारख्या विख्यात राजकीय नेत्यांवर जे बायोपिक तयार केले गेले, तेही चरित्रपट नव्हते. या नेत्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या कालखंडावर फोकस करून चित्रित केलेले, नेत्याचे गुण-दोष सांगणारे व कर्तृत्वाची ओळख थोडक्यात करून देणारे ते सिनेमे होते. संपूर्ण चर्चिल किंवा थॅचर मांडण्याचा अट्टहास या चित्रपटांच्या निर्मात्यांचा नव्हता. ज्याला आपण नावं ठेवतो, ती वास्तवाची मोडतोडही त्यात होती. सर्जनशील कलाप्रकार म्हटल्यावर हे आलेच. 

थोरामोठ्यांच्या जीवनावर कादंबऱ्या लिहिल्या जातात. त्यातही ऐतिहासिक वास्तवाची चांगलीच मोडतोड असते आणि ती क्षम्य मानली जाते. इथं ‘ऐतिहासिक वास्तव’ असा शब्द मी थोडा सैलपणेच वापरतो आहे. कारण प्रत्यक्ष इतिहासलेखनातही वास्तवाचं प्रमाण किती, हा प्रश्न आहेच. पण तो वेगळा विषय आहे. कादंबरीचा उल्लेख करावासा वाटला, कारण ‘बायोपिक’ या प्रकाराला पडद्यावरली कादंबरी म्हणणं अधिक रास्त होईल. बायोपिकवर चर्चा करणं त्यामुळे सोपं जाईल.

कादंबरीलेखनातील क्रिएटिव्ह फ्रीडम जे समजू शकतात, त्यांना बायोपिकमधला फ्रीडम समजायला खरं तर हरकत नाही. पण तसं होत नाही. आपल्याकडे या प्रकारचा फ्रीडम समजणारं वर्तुळ मुळात लहान आहे. क्रिएटिव्ह फ्रीडम सोडा, मुळात फ्रीडम ही संकल्पना न समजणारा आणि म्हणून कलावंताच्या फ्रीडमबद्दल कायम तक्रार करणारा एक वर्ग आहे व तो संख्येनं मोठा आहे. शालेय पुस्तकातल्या धड्यातून, व्यक्तीच्या लेखनातून, कलेच्या आविष्कारातून, मुलाखतीतून त्या व्यक्तीचं दर्शन म्हणजेच तो माणूस, अशा समजुतीत आपण वावरतो. काही बायोपिकवर आज जे आक्षेपांचं-तक्रारींचं जोरदार वादळ उठलेलं आपण  पाहत आहोत, त्या वादळामागे हा गोंधळ- म्हणा की, असमंजसपणा म्हणा- असण्याची शक्यता आहे. कुठल्याही विशिष्ट निर्मितीची समीक्षा करणं, त्यांच्या मेरिट-डी-मेरिटवर, गुणावगुणांवर भाष्य करणं, त्याची प्रशंसा करणं किंवा त्यावर टीका करणं यासाठी मी हे निवेदन वाचत नाही. आज वादग्रस्त ठरलेल्या निर्मितींवर घेतलेले आक्षेप हे बहुतांशी माध्यमाच्या अज्ञानापोटी घेतलेले आहेत.

‘बायोपिक म्हणजे काय?’ हे समजून घेतले तर हे आक्षेप बरेचसे दूर होतील, असा माझा समज आहे. बायोपिक म्हणजे ऐतिहासिक व्यक्तीवरला माहितीपट नाही. माहितीपटात इतिहासाशी प्रामाणिक राहणं, ही पूर्वअट असते. ती कोण कितपत पाळतं, ही गोष्ट वेगळी, पण काल्पनिक घटना अंतर्भूत करणं, हे माहितीपटात अनैतिक कृत्य ठरतं. चित्रपटनिर्मितीत दिग्दर्शकानं वास्तवाशी प्रामाणिक राहावं अशी एखाद्याची अपेक्षा असू शकते. पण अपेक्षाच; तशी सक्ती करणं हे कलावंताच्या अभिव्यक्तिस्वातंत्र्यावरचं आक्रमण ठरतं. 

चित्रपटनिर्मिती ही शेवटी एक सर्जनशील कृती आहे, याचा अर्थ या कृतीवर कोणी टीका करू नये, असा नाही. दिग्दर्शकाचं कलात्मक स्वातंत्र्य चरित्रनायकाच्या मूळ व्यक्तिमत्त्वाला हानिकारक किंवा अवमानकारक आहे असं कुणाला वाटलं, तर त्यावर टीका करण्याचं स्वातंत्र्य त्याला आहेच. मात्र टीका आणि ओरड यात फरक आहे, तो लक्षात घेतला पाहिजे. बऱ्याचदा सिनेमा पाहण्यापूर्वीच आपले प्रेक्षक सिनेमाच्या रचनेविषयी विशिष्ट आडाखे बांधून मोकळे  झालेले असतात. ते समोर ठेवून प्रेक्षक थिएटरात प्रवेश करतात. एका परीनं त्यांनी स्वत: मनातल्या मनात तो चित्रपट बनवलेला असतो. हे म्हणजे, हातात ट्रेसिंग पेपर घेऊन सिनेमा पाहणं झालं. ट्रेसिंग पेपरवरल्या डिझाईनशी पडद्यावरल्या हालचाली जुळल्या नाहीत की, हा प्रेक्षक अस्वस्थ होतो. आपण मनात योजलेल्या चित्रपटाशी सुसंगत असं काहीच पडद्यावर दिसत नाही, हे लक्षात आल्यावर तो चित्रपट त्याच्या मनातून उतरतो. दिग्दर्शकाचं स्वातंत्र्य विरुद्ध प्रेक्षकाचं स्वातंत्र्य, असा संघर्ष यातून आकाराला येतो. 

नाथमाधवांनी शिवाजी आणि संभाजीच्या जीवनावर ऐतिहासिक कादंबऱ्या लिहिल्या आहेत. आपल्यापैकी अनेकांनी त्या वाचल्या असतील. भरपूर क्रिएटिव्ह फ्रीडम घेऊन केलेलं हे लिखाण आहे. सर्वसामान्यांनी या कादंबऱ्या विनातक्रार स्वीकारल्या; उचलून धरल्या. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे कादंबरीकारानं क्रिएटिव्ह फ्रीडम घेऊन कादंबरीत जी काल्पनिक पात्रं घुसडली, ती आणि तिच्या भोवती निर्माण केलेल्या घटना खऱ्याच आहेत, असं लोकांनी मानलं. रणजित देसार्इंनी ‘स्वामी’मध्ये इतिहासाशी घेतलेली फारकत- मोजके इतिहासप्रेमी वगळता- कोणालाच खटकली नाही. आणि खटकली तरी स्वामी हे इतिहासाचं पुस्तक नाही, फिक्शन आहे, हे समजण्याचं शहाणपण त्यांच्यापाशी होतं. त्यामुळे या लेखनाच्या विरोधात फार ओरडा झाला नाही. 

आज फोफावलेला अस्मिता नावाचा प्रकार आणि भावना दुखावण्याचा साथीचा रोग तेव्हा समाजात पसरला नव्हता. त्या कादंबरीकारांच्या सुदैवानं तो काळ बराच सहिष्णू होता. आज परिस्थिती अशी आहे की, आजच्या असहिष्णू वातावरणात बायोपिक निर्मात्यांनी सावधगिरी बाळगणं आवश्यक बनून गेलं आहे; खास करून त्यांनी निवडलेला नायक अतिपरिचित आणि अतिलोकप्रिय असेल, तर थोडी जादाच सावधगिरी बाळगली पाहिजे. अपरिचित किंवा अल्पपरिचित व्यक्तीबद्दल थोडंफार वेगळं लिहिलं, तर ते खपून जातं. म्हणजे मंजूर नसलं तरी सामाजिक अज्ञानापोटी खपून जातं. 

थोडक्यात- ज्या प्रेक्षकांसमोर आपण चित्रपट ठेवतो आहोत, त्या प्रेक्षकांच्या मानसिकतेचा थोडाफार अंदाज निर्मात्याला असणं हे सक्तीचं बनून गेलं आहे. ही प्रेक्षकशरण भूमिका आणि प्रेक्षकजाणिवांची तमा न बाळगता चरित्रपट निर्माण करणं, या दोनपैकी कोणत्या वृत्तीच्या बाजूला उभं राहावं? यात सुवर्णमध्य काढता येईल का? याची उत्तरं माझ्यापाशी नाहीत. 

आमच्या काळी, म्हणजे पन्नास वर्षांपूर्वी ‘मला उमजलेले गंधर्व’ या नावाचा एक कार्यक्रम सादर व्हायचा. कार्यक्रमाचं शीर्षक मला आवडलं. ‘हे आम्हाला उमजलेले गंधर्व आहेत. तुमचं ठाऊक नाही’ असं प्रेक्षकांना विश्वासात घेऊन सांगूनच टाकणं किती चांगलं! बायोपिकचा आस्वाद घेताना, ज्याची-त्याची उमज वेगळी, ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे, मान्य केली पाहिजे. एखाद्याची निंदानालस्ती करण्यासाठी कुणी कुणावर बायोपिक काढत नाही. हिटलर, इदी अमीन यांसारख्या खलपुरुषांवर काढलेले बायोपिक हे अपवाद वगळले, तर सर्वसाधारणपणे व्यक्तीच्या गौरवासाठीच बायोपिक काढले जातात. चित्रपटाचा नायक प्रेक्षकांइतकाच दिग्दर्शकालाही भावलेला असतो. नायकाच्या कर्तृत्वाबद्दल आणि कलागुणांबद्दल प्रेक्षक व दिग्दर्शक दोघांची समज-उमज भिन्न स्वरूपाची असू शकेल, तिला ज्याच्या त्याच्या आकलनाची मर्यादा असेल; पण दिग्दर्शक त्याला उमजलेला कलावंत पडद्यावर मांडू पाहतोय, ही शहाणी समज आपण अंगी बाळगायला काय हरकत आहे? ती बाळगली तर अमुक दाखवलं नाही आणि अमुक चुकीचं दाखवलं, यांसारख्या तक्रारी कमी होतील. एक स्वतंत्र कलाकृती म्हणून आपण या सिनेमाकडे पाहायची आणि एक सिनेमा म्हणून त्याचं मूल्यमापन करायची सवय लावून घेतली पाहिजे. हे जमलं तर चर्चेचा आणि टीकेचा फोकस बदलून तो सिनेमाच्या सिनेमापणावर केंद्रित होईल.

बायोपिकांचं पीक आलेलं आहे, हे खरं आहे. पिकाबरोबर तणही वाढते आहेत. बायोपिकांच्या आजच्या लाटेबाबत फार कौतुकानं बोलावं असं काही नसेलही; तरीपण हेटाळणीच्या सुरात गैर मुद्यावरून या चित्रपट-प्रकाराची हेटाळणी करावी, असंही काही घडलेलं नाही. दुसरं म्हणजे- सिनेमा फक्त त्यातल्या कथेबद्दल, नायकाबद्दल बोलत नाही. कथा आणि कथानायकाला पडद्यावर पेश करणाऱ्या निर्मात्या- दिग्दर्शकाच्या गुणा-अवगुणांबद्दल, साधारण व असाधारण वकुबाबद्दलही सिनेमा बरंच काही बोलतो. 

या कलाप्रकाराकडे पाहण्याच्या निर्मात्याच्या दृष्टिकोनाबद्दलही तो बरंच काही सांगतो, हे लक्षात घेतलं पाहिजे. आता शेवटचा मुद्दा- संपूर्ण विवेचनात मी आपल्याकडील कोणत्याही बायोपिकचा नामनिर्देश केलेला नाही. बायोपिक या बहुचर्चित प्रकाराकडे मी कसं पाहतो, याबद्दल ही मांडणी मर्यदित ठेवली आहे. ते करताना अलीकडील काही बायोपिकचे नावानिशी संदर्भ देणं हेतुत: टाळलं आहे. कारण मला या कलाकृतींची समीक्षा करायची नव्हती. तरीही हे लिखाण करताना महाराष्ट्राच्या लाडक्या व्यक्तिमत्त्वावर नुकताच जो चित्रपट निघाला तो डोळ्यांसमोर होता, हे खरं आहे. तर, थोडं त्याबद्दल बोलतो. 

दर्जेदार विनोदी लेखन करण्याची हातोटी, एकपात्री प्रयोगावरलं-अभिनयकलेवरलं प्रभुत्व, संगीताची उत्तम जाण, हजरजबाबीपणामुळे खासगी गप्पांत निकटवर्ती मित्रांवर प्रभाव पाडण्याची हातोटी आणि इतकं सगळं ज्या व्यक्तीपाशी आहे अशी सज्जन व अजातशत्रू व्यक्ती समाजाचं आदरणीय आणि लाडकं व्यक्तिमत्त्व बनून जावं, यात आश्चर्य नाही. त्या व्यक्तीवर बायोपिक काढावा, अशी इच्छा एखाद्याला होणं यातही आश्चर्य नाही. प्रश्न असा की, सिनेमा मटेरियलचं काय? सिनेमा म्हणून उभा राहण्यासाठी ज्यावर सिनेमा काढायचा आहे त्या व्यक्तीत, तिच्या जीवनप्रवासात काही विशिष्ट एलेमेन्ट्‌स, घटक असावे लागतात... 

लाडकं गुणी व्यक्तिमत्त्व वगैरे सगळं ठीक आहे. आपला सिनेमा काय किंवा जागतिक सिनेमा काय; सिनेमा हा नेहमी नाट्यपूर्ण घटनांच्या आणि संघर्षाच्या शोधात असतो. आयुष्याच्या वाटचालीत अंगावर आलेल्या संकटांच्या मालिकेवर मात करून, दु:खाचे डोंगर ओलांडून, दारिद्य्राचे तडाखे सहन करून, नैराश्यात बुडून न जाता त्यातून शिकस्तीनं बाहेर पडून यश संपादन करणाऱ्या व्यक्तिमत्त्वांचा वेध सिनेमा नेहमी घेत आला आहे. प्रतिभेचं उच्च शिखर गाठणं हे कौतुकास्पद निश्चित आहे. पण प्रत्येक क्षेत्रात निर्विघ्न यश मिळालेलं, जीवनप्रवासात फारसा विरोध वाट्याला न आलेलं, आर्थिक आणि भावनिक उंच-सखलतेचा अभाव असलेलं सपाट, सरळमार्गी, संघर्षहीन असं आयुष्य हे सिनेमा-मटेरिअल होऊ शकतं का? मला शंका आहे. 

बायोपिक आवडलेल्या, न आवडलेल्या आणि बायोपिकच्या निर्मितीत प्रत्यक्ष सहभाग असलेल्या माझ्या मित्रांपुढं हा प्रश्न ठेवून मी थांबतो. 
(हा निबंध अलिबाग येथे झालेल्या एका शिबिरात वाचला होता.)              
 

Tags: P.L.Deshpande bhai-film awdhoot paralakar biopic पु.ल. देशपांडे चरित्रपट भाई- चित्रपट अवधूत परळकर बायोपिक weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

अवधूत परळकर,  मुंबई, महाराष्ट्र
awdhooot@gmail.com


प्रतिक्रिया द्या