डिजिटल अर्काईव्ह (2014-2019)

जंगलातील गावात राहून वाढत्या वयाच्या मुलांना एकच गोष्ट आकर्षित करते, ती म्हणजे- नक्षल लोकांकडे असणारी शस्त्रे. नक्षल्यांचा धाक, त्यांना मिळणारी इज्जत पाहत मोठी होणारी मुले त्या इज्जतीच्या आंधळ्या आकर्षणापायी तो रस्ता धरतात. शरण आलेल्या नक्षलींना पोलीस कारण विचारतात, तेव्हा बहुतांशी उत्तर हेच असते- ‘‘गाव में नक्षली लोग बंदूक लेके आते थे, तो सब उनके सामने झुकते थे, इज्जत देते थे!’’ आपल्यासाठी जशी आर्मी आहे, तसे त्यांच्यासाठी ‘बडा नक्षली’ बनणे हे ध्येय होते. ज्या व्यवसायाचा बोलबाला असतो, त्यानेच आपण प्रभावित होऊन जातो. जर या मुलांना त्यापासून वाचवायचे असेल, तर तो मार्ग सोडून बाहेर इतके मोठे जग पसरले आहे, बाहेर किती व काय काय करता येऊ शकते, हे आपणच त्यांना दाखवले पाहिजे- असे डॉ.दिव्यांगसर यांना मनापासून वाटते.

बिजापूरमध्ये नोव्हेंबर महिना अतिशय धामधुमीत गेला; कारण- निवडणुका. छत्तीसगडमध्ये विधानसभेच्या निवडणुका दोन टप्प्यांत पार पडल्या. पहिला टप्पा दक्षिण भागात म्हणजेच नक्षलग्रस्त प्रदेशात झाला. यात 18 मतदारसंघ येतात- ज्यातील सहा राजनांदगांव जिल्ह्यात येतात, तर उरलेले जास्त जोखमीच्या भागात. त्यात बिजापूर, दंतेवाडा, सुकमा, चित्रकोट, बस्तर, नारायणपूर, कोंडागाव, कोन्ता इत्यादी नक्षलप्रवण जिल्हे येतात. पहिल्या टप्प्यात 12 नोव्हेंबर या दिवशी 18 जागांसाठी मतदान झाले, तर दुसऱ्या टप्प्यातील मतदान 20 नोव्हेंबरला उर्वरित 72 जागांसाठी झाले. या दुसऱ्या टप्प्यात उर्वरित प्रदेश उत्तर छत्तीसगड येतो. गेली 15 वर्षे असणारी भाजपची सत्ता गेली आणि काँग्रेसची सत्ता आली, हा या निवडणुकीचा मोठा विशेष ठरला.

बस्तर, दंतेवाडा, नारायणपूर, सुकमा आणि बिजापूर या चारही जिल्ह्यांत निवडणुकीपूर्वी अगदी आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली होती. पोलीस आणि प्रशासन युद्धपातळीवर कामाला लागले होते. जगदलपूरला अय्याजसरांच्या ऑफिसमध्ये आम्ही भेटायला गेलो असताना, रात्री उशिरापर्यंत अय्याजसरांचे प्रत्यक्ष व फोनवर कामाचे नियोजन चालूच होते. ज्या ठिकाणी  गेल्या 10 वर्षांत मतदान होऊ शकले नव्हते, अशा काही ठिकाणी या वर्षी विशेष सुरक्षा पुरवून मतदान होणार होते. तेथील सुरक्षेचा प्रश्न गांभीर्याने हाताळणे महत्त्वाचे होते.

जगदलपूरहून मी बिजापूरला निघाले; तेव्हा रस्त्यात ठिकठिकाणी वाहने थांबवून तपासणी होत होती, रजिस्टरमध्ये माहिती नोंदवली जात होती. एके ठिकाणी तर कॅमेरामन प्रत्येक वाहनाचा फोटो घेत होता. पूर्ण प्रवासात रस्त्यावर ठरावीक अंतराने गस्तीवर असणारे जवान नजरेस पडत होते. अशातच आम्ही भैरमगडजवळ पोहोचलो. तिथेही पोलीस ठाण्याच्या बाहेर नोंद करून मी पुन्हा कार सुरू केली, तर एका माणसाने लिफ्ट मागितली. गडबडीत असल्याने, काहीही न विचारता मी त्याला गाडीत बसवले. प्रवास सुरू होताच विचारपूस केली तर कळले की, तो क्राईम ब्रँचचा विशेष पोलीस आहे. आज त्याचे वाहन पुढे गेल्याने त्याने मला लिफ्ट मागितली होती. तो युनिफॉर्ममध्ये नसल्याने मला थोडीही शंका आली नव्हती की, हा पोलीस असेल. त्याने ते सांगितल्यावर मात्र मला प्रचंड भीती वाटू लागली. निवडणुकांच्या काळात पोलीस ठाण्यासमोरच मी एका पोलिसाला कारमध्ये घेतले आहे; याच्यामुळे आमच्या जिवालाही धोका होण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. कारण या भागात प्रवास करताना आम्ही सर्व जण एक नियम पाळतो की, पोलिसांसोबत कधीही प्रवास करायचा नाही. मग त्या तणावातच गप्पा करत आम्ही बिजापूरला पोहोचलो. त्याला खाली उतरवले, तेव्हा कुठे माझ्या जिवात जीव आला. त्या दिवशी मला प्रथमच जाणवले की, एक पोलीस माझ्या गाडीत बसल्याने मला इतका घाम फुटला; मग या पोलिसांना नक्षलग्रस्त भागात कामाचा किती ताण येत असेल!

टोकाच्या डाव्या विचारसरणीच्या साहित्यातून पोलिसांबद्दल नकारात्मक माहिती पसरवली जाते, परंतु प्रत्यक्ष या भागात काम करताना मात्र सर्वच बाजू अनुभवायला मिळतात. पोलीस यंत्रणेबद्दल कुतूहल होते. त्यासाठी बिजापूरचे एसीपी- सहायक पोलीस अधीक्षक, आयपीएस अधिकारी डॉ.दिव्यांग पटेल यांच्याशी निवांत गप्पा करण्याची आणि सर्व प्रश्न विचारून कुतूहल शमवून घेण्याची संधी मला मिळाली. दिव्यांगसरांची पत्नी डॉ.उर्चिता पटेल ही डॉक्टर असून, जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून काम करते. कोणताही अहंभाव न ठेवता, शिस्तीने काम करणारी डॉ.उर्चिता तिच्या मैत्रीपूर्ण वागण्याने मन जिंकून घेते.

डॉ. दिव्यांगसर आणि डॉ. उर्चिता या दोघांनी मिळून नवरात्रीमध्ये आम्हा मित्र मंडळींसाठी दांडिया आयोजित केला होता. पूजा झाल्यानंतर बंगल्यासमोर लॉनवर दांडिया छान रंगला. दोघांनी मिळून उत्साहाने आम्हा सर्वांना गुजराती स्टेप्स शिकवल्या. दांडियानंतर गुजराती पद्धतीच्या चविष्ट जेवणाचा आम्ही आस्वाद घेतला. डॉ.दिव्यांग पटेल यांचे गुजरातमधील बडोद्याच्या मेडिकल कॉलेजमधून 2013 मध्ये एमबीबीएस पूर्ण झाले. ते 2014 मध्ये आयपीएस होऊन छत्तीसगडमध्ये रुजू झाले. दोन वर्षांच्या प्रशिक्षण कालावधीमध्ये ग्रामीण भागातील प्रशिक्षणासाठी त्यांना छत्तीसगडमध्ये कोरबा, कोन्ता, बिलासपूर अशा विविध भागांत पोस्टिंग मिळाल्या, तर शहरी भागासाठी रायपूरमध्ये पोस्टिंग मिळाले.

फेब्रुवारी 2018 पासून डॉ.दिव्यांग पटेल बिजापूरमध्ये सहायक पोलीस अधीक्षक म्हणून रुजू झाले. रायपूरमध्ये मुख्यत्वे करून ऑफिसचे काम, राजकारणी लोक आल्यावर कार्यक्रमाची सुरक्षाव्यवस्था पाहणे, सणासुदीच्या दिवसांत शहरात बंदोबस्त सांभाळणे- अशा प्रकारच्या कामांचा वीट आलेले दिव्यांगसर, बिजापूरमध्ये वेगळे काम करायला मिळाल्याने समाधानी वाटतात. ‘‘बिजापूर जिल्ह्यात मुख्यत्वे पोलीस प्रशासनाचे नियोजन करणे आणि नक्षलसंबंधित कामकाज हाताळणे, या मुख्य जबाबदाऱ्या येतात. अशा ठिकाणी काम करताना असणाऱ्या धोक्याच्या ताणासोबतच एक उत्साहही येतो की- इस प्रकार का काम दूसरे किसीभी जगह करने नहीं मिलेगा!’ असे दिव्यांगसर उत्साहात सांगतात. त्यामुळे रायपूरपेक्षा त्यांना येथे काम करायला जास्त आवडते.

 बिजापूर जिल्ह्यात एकूण पोलीस बल 3000 एवढे आहे. तीन प्रकारची दले काम करतात- ज्यात जिल्हा पोलीस, CRPF (Central Reserve Police Force ) आणि  CAF (Chattisgad Armed Forces) येतात. तिन्ही दलांची आणखी विशेष दलेही येतात. जिल्हा पोलिसांचे DRG (District Reserved Guards). ज्यात लोकल लोकांचा आणि शरणग्रस्त नक्षलींचा सहभाग असतो, CRPF चे CoBRA व CAF चे Special task force या तिन्हींमध्ये तरुण लोकांचा भरणा असतो आणि ज्यांच्याकडे फक्त विशेष ऑपरेशनचे काम असते, त्यांना इतर कामे दिली जात नाहीत. त्यामुळे त्यांचा फोकस कारवाईकेंद्रित राहतो. निवडणुकांच्या वेळी, सुरक्षा व्यवस्था मोठ्या प्रमाणात वाढवण्यात येते. त्यासाठी बाहेरून जास्तीची कुमक मागवली जाते. जसे की- बीएसएफचे जवान. तसेच झारखंड, मणिपूर, मेघालय, नागालँड या विविध राज्यांतून छत्तीसगडच्या या नक्षलग्रस्त भागात सैन्यदल तैनात करण्यात आले होते.

निवडणुकांसाठी बिजापूर जिल्ह्यात एकूण 245 मतदान बूथ बनवले होते. अतिसंवेदनशील आठ गावांमध्ये टीमला हेलिकॉप्टरद्वारे पोहोचवून तिथून पुढे इतर 80 बूथसाठी टीम पोहोचवल्या गेल्या. या आठ गावांतील पोलीस ठाण्यांमध्ये हेलिकॉप्टरद्वारे लोक पोहोचून तिथून पुढे जवानांच्या तुकडीच्या सुरक्षेमध्ये जंगलातून काही किलोमीटर चालत टीम आपापल्या बूथवर पोहोचल्या. जोपर्यंत या टीम व्यवस्थित पोहोचून, मतदान होऊन सुरक्षितरीत्या परतत नाहीत तोपर्यंत पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी प्रचंड तणावाखाली राहतात.

निवडणुकांच्या काळात बिजापूरवर हेलिकॉप्टर सतत घिरट्या घालत होते. काही वर्षांपूर्वी नक्षली लोकांनी हेलिकॉप्टरवरही हल्ला चढवला होता. त्यात मुख्य वैमानिक जागीच ठार झाला होता. सोबतच्या दुसऱ्या वैमानिकाने हेलिकॉप्टर सुरक्षित जागी नेले होते. 2008 मध्ये निवडणुकांच्या काळात कुटरू- नेमेड रस्त्यावर जवानांची गाडी उडवली होती, त्यातील काही शिक्षक ठार झाले होते. या वर्षी मतदान टीममध्ये ड्युटी लागलेले तीन-चार शिक्षक घाबरून पळून गेले. निवडणुकांच्या एक महिना आधीपासूनच नक्षलांच्या हल्ल्याच्या अनेक घटना वर्तमानपत्रात वाचायला मिळू लागल्या. विशेष करून कोन्ता, सुकमा, दंतेवाडा, बिजापूर येथील नक्षली हल्ल्यांनी वर्तमानपत्रे भरभरून वाहिली. निवडणुकांवर बहिष्कार घालण्याचे आवाहन करणारी पत्रके वाटली गेली, अंतर्गत गावातील भिंती मतदानविरोधी घोषणांनी रंगवल्या गेल्या.

बिजापूर जिल्ह्यात एकूण 21 पोलीस ठाणी आहेत. मुख्य TIA (थाना इनचार्ज) असून, त्याखालोखाल मग सबइन्स्पेक्टर, सहायक सबइन्स्पेक्टर, हवालदार, प्रधान आरक्षक, आरक्षक, सहायक आरक्षक अशी पदे येतात. सबइन्स्पेक्टर पासून सर्व पदांमध्ये स्त्री-पुरुष दोन्ही येतात. TIA च्या वरती SDOP आणि DSP, मग ASP आणि सर्वांत वर पोलीस अधीक्षक-SP येतात. सध्या बिजापूरचे SP मोहित गर्ग हे आहेत. SP व ASP हे IPS अधिकारी असतात, तर DSP राज्य पोलीस दलातून येतात. बिजापूर जिल्ह्यात SP, ASP यांच्यावर पोलिसांचे प्रशासकीय कामकाज,  ऑपरेशन निर्णय आणि  CRPF  चे ऑपरेशनचे निर्णय अशी जबाबदारी असते.

पोलीस प्रशासकीय कामासोबतच संसाधनांचा वापर, लोकांची नेमणूक किंवा बदली, पोलीस-जवानांची वाहतूकव्यवस्था हे सर्व पाहावे लागते. दोन वर्षांपूर्वीपर्यंत जिल्ह्यातील अतिदुर्गम भागातील तारलागुडा, भद्रकाली, बासागुडा येथे पोलीस ठाण्यांमध्ये हेलिकॉप्टरमार्फत लोकांची ने-आण, साधने पुरवणे हे सर्व करावे लागायचे. सध्या येथे रस्ते बनल्याने रस्त्याद्वारे वाहतूक होते.

परंतु पामेड येथे अजूनही रस्ता बनलेला नसल्याने हेलिकॉप्टरमार्फत दर 15 दिवसांनी चकरा केल्या जायच्या. हेलिकॉप्टरची 20 जणांची क्षमता आहे. त्यातून मग सुट्टीसाठी तिथून बाहेर पडणारे जवान, तिकडे जाणारे जवान तसेच डाळ-तांदूळ, बटाटे, कांदे असे खाण्याचे सामान पाठवले जाते. हिरव्या भाज्या तिथे कॅम्पसमध्येच उगवल्या जातात. येथील पोस्टिंग सर्वांत वाईट मानले जाते. 12 किमी फक्त बाईक जाऊ शकेल असा रस्ता होता. गेल्या वर्षात या 12 किमी अंतरावर 1200 जवानांची सुरक्षा पुरवून रस्ता बनवला गेला. अजूनही रस्ता कच्चा आहे, पण चारचाकी वाहन जाईल असा रस्ता शेवटी यशस्वीरीत्या बनवला गेला.

दिव्यांगसरांनी येथील आठवण सांगितली की, हा रस्ता बनवल्यावर आम्ही प्रथमच पोलीस वाहनाने गावात गेलो, तेव्हा गावकरी आनंदित झाले. इतक्या वर्षांनी गावात चारचाकी गाडी पहिल्यांदा आल्याचे लोकांनी सांगितले. जिथे काहीच नव्हते, तिथे तीन-चार दुकाने सुरू झाली आहेत. अजूनही तिथे इलेक्ट्रिसिटी पोहोचली नाही, पण पोहोचेल. कामातील समाधान त्यांच्यासाठी हेच आहे की- गावासाठी छोटी-छोटी मदत करणे. रस्ता बनला की गाव मुख्य प्रवाहाशी जोडले जाते. गावात साधी इलेक्ट्रिसिटी पोहोचणेही इतके अवघड आहे की, तेवढे केले तरी कामाचे समाधान मिळते. गुजरातहून छत्तीसगडमध्ये आलेले दिव्यांगसर सांगत होते, ‘‘गुजरातमें रहके मै कभी सोच भी नहीं सकता कि बिजापूर जैसीभी जगह कहाँ होगी. यहा आकेही ये सब समझ सकते है.’’

 सुरक्षिततेच्या दृष्टीने येथे रचना अशी केली आहे की, दर पाच ते सात किलोमीटरच्या अंतरावर पोलीस ठाणे किंवा CRPF किंवा CAF यापैकी एकाचा कॅम्प लागतोच. असे विविध CRPF कंपन्यांचे 35, तर CAF चे 25 तळ पूर्ण बिजापूर जिल्ह्यात पसरलेले आहेत. बिजापूर जिल्ह्यात काम करताना महत्त्वाचे म्हणजे नक्षल हालचाली, हल्ले अशा अतिसंवेदनशील घटना हाताळण्याची जबाबदारी येते. त्यानंतर खुनासारख्या  गंभीर गुन्ह्यांचा तपास करणे, अपघात घटनांचा तपास करणे या गोष्टी जास्त पाहाव्या लागतात. दिव्यांगसरांनी हसतच सांगितले की, नक्षली हल्ल्यात मरणाऱ्या लोकांपेक्षा जास्त लोक येथे वाहनांच्या अपघातात मरतात. डोंगराळ, अतिदुर्गम भागातील वळणांचे नागमोडी रस्ते घाई- गडबडीने चुकीच्या पद्धतीने बांधले जातात. दारू पिऊन वाहने चालवण्याचे मोठे प्रमाण आहे. या कारणांमुळे येथे अपघातांचे प्रमाण खूप जास्त आहे. पोलिसांना येथे थेट जिवाचाच धोका असल्याने, गप्पांमध्ये डॉ.उर्चिता काळजीने बोलत होती की- फिल्डवर कधी मुक्काम असला की, अगदी मलाही माहिती नसते दिव्यांगसर नेमके कुठे आहेत, कधी परत येणार. कारण माहिती गोपनीय ठेवण्यासाठी फोनवर जास्त बोलू शकत नाही. दिव्यांगसरांचे यावर म्हणणे- ‘‘रिस्क तो लेनीही पडती है. ये तो प्रोफेशनल रिस्क रहेगीही.’’

ज्या रस्त्यांवर नक्षली जास्त सक्रिय आहेत तिथे कमी रिस्क घेणे, रात्रीच्या वेळी अशा भागात जाणे टाळणे, कधी फिल्डवर गेल्यावर परतीच्या मार्गात हालचाल जाणवल्यास फिल्डवरच CRPF कॅम्पमध्ये मुक्काम करणे- असे अनेक उपाय करावे लागतात. एखाद्या खेड्यात कार्यक्रम ठरतो किंवा कोणा नेत्याची सभा वगैरे असते; तेव्हा प्रत्येक कॅम्प आपापल्या भागात रोड सर्च ऑपरेशन करतो, जेणेकरून धोका टळावा. निवडणुकीच्या वेळी बरेच हल्ले झाले, बॉम्बस्फोट झाले.

त्यातील एक आठवण दिव्यांगसरांनी विशद केली की, मतदान संपल्यानंतर बाहेरून आलेले जवान परत निघाले होते. भोपालपट्टणमहून बिजापूरला पोहोचणाऱ्या तुकडीच्या वाहनाचा स्फोट होऊन सहा जवान मेले. केवळ निवडणूक करवण्यासाठी बाहेरून आलेले CRPF कॉन्स्टेबल परतीच्या वेळी मारले गेले. त्याचे दिव्यांगसरांना वाईट वाटले.

दोनेक महिन्यांपूर्वी पोलिसांतर्फे नागरिकांसाठी मॅरेथॉन आयोजित केली गेली होती. SP मोहित गर्ग आणि SP डॉ.दिव्यांग पटेल या दोघांनी वैयक्तिक लक्ष घालून ही कल्पना प्रत्यक्षात साकार केली होती. नक्षलग्रस्त जिल्ह्यात घडणारी अशा प्रकारची ही पहिलीच मॅरेथॉन असल्याने यामागचे कारण विचारले, तेव्हा दिव्यांगसर म्हणाले, ‘‘कितने टाइम तक हम नक्षल नक्षल करते रहेंगे? दुसरी भी कुछ बातें करते है!’’ पोलीस आणि नागरिक यांच्यात विश्वास निर्माण व्हावा, हा या कल्पनेमागचा मूळ उद्देश. यात मोठी पारितोषिके ठेवण्यात आली होती, चांगली जाहिरात केली गेली आणि 1500 नागरिकांनी यात सहभाग घेतला. मुख्यत्वे ही स्पर्धा अतिदुर्गम भागातील आदिवासी लोकांसाठी होती. पण नकळतपणे याचा आणखी एक फायदा झाला की, उत्तर छत्तीसगड भागात राहणारे लोकही यात सहभाग घ्यायला आले- ज्यांनी कधीच बस्तर पाहिलेही नव्हते. नक्षली जिल्हा म्हणून कुप्रसिद्ध असलेल्या बिजापूरचे एक वेगळे आणि सुरक्षित रूप या निमित्ताने बाहेरच्या जिल्ह्यांतून आलेल्या लोकांना अनुभवायला मिळाले.

दिव्यांगसरांनी पोलीस डिपार्टमेंटतर्फे राबवलेली आणखी एक अनोखी कल्पना म्हणजे गावागावातील मुलांना घडवलेली सहल. अतिसंवेदनशील भागातील पोर्टाकेबिनमधील मुले, तसेच ज्या गावात जायला रस्तेही नाहीत अशा अतिदुर्गम गावातील मुले- ज्यांनी कधी आत्तापर्यंत बिजापूरसुद्धा पाहिले नाही- अशा मुला- मुलींना आठ बसेसमधून जगदलपूर, दंतेवाडा, बिजापूरची सहल घडवली. त्यात मग जगदलपूरचे मेडिकल कॉलेज, महाराणी हॉस्पिटल, चित्रकोट धबधबा, दंतेवाड्याचे प्रसिद्ध दंतेश्वरी मंदिर, प्रसिद्ध एजुकेशन सिटी, शाळा, बिजापूरचे जिल्हा रुग्णालय, सपोर्ट ॲकॅडेमी, भैरमगडचे एकलव्य विद्यालय इत्यादी गोष्टी दाखवल्या गेल्या. मुले खूप खूश होती, उत्साहाने सर्व अनुभवत होती.

परतीच्या प्रवासावेळी जोराचा पाऊस आला. काही गावांत जाणारे रस्ते तीन दिवस बंद झाले होते. हे तीन दिवस मुले एकाच कपड्यात, पोलीस ठाण्यात राहिली. तीन दिवसांनी मुले आई-वडिलांना भेटली. कोणी कसली तक्रार केली नाही, की नाराजी दाखवली नाही. दिव्यांगसर म्हणाले, ‘‘हेच असे शहरात घडले असते, तर पालकांनी किती तक्रारी केल्या असत्या! पण आदिवासी खूप कमी गोष्टीत आनंदी राहतात.’’ या सहलीचे मुख्य उद्दिष्ट होते की, आदिवासी मुलांना त्यांच्या छोट्याशा अतिदुर्गम गावाबाहेरचे जग दाखवणे, नव्या विश्वाची ओळख करून देणे.

जंगलातील गावात राहून वाढत्या वयाच्या पोरांना एकच गोष्ट आकर्षित करते, ती म्हणजे- नक्षल लोकांकडे असणारी शस्त्रे. त्यांचा धाक, त्यांना मिळणारी इज्जत. ते पाहत मोठी होणारी मुले इज्जतीच्या आंधळ्या आकर्षणापायी तोच रस्ता धरतात. शरण आलेल्या नक्षलींना पोलीस कारण विचारतात, तेव्हा बहुतांशी उत्तर हेच असते- ‘‘गाव में नक्षली लोग बंदूक लेके आते थे, तो सब उनके सामने झुकते थे, इज्जत देते थे!’’ आपल्यासाठी जशी आर्मी आहे, तसे त्यांच्यासाठी ‘बडा नक्षली’ बनणे हे ध्येय होऊन जाते. ज्या व्यवसायाचा बोलबाला असतो, त्यानेच आपण प्रभावित होऊन जातो. जर या मुलांना त्यापासून वाचवायचे असेल, तर तो मार्ग सोडून बाहेर इतके मोठे जग पसरले आहे, बाहेर किती व काय काय करता येऊ शकते, हे आपणच त्यांना दाखवले पाहिजे- असे दिव्यांगसरांना मनापासून वाटते. त्यातूनच या कल्पनेने आकार घेतला. ‘‘यहाँ के बच्चों के पास बहोत टॅलेंट है, लेकिन नक्षलियोंके डरके कारण वो बाहर ही नहीं आ पाते है.’’

नक्षली लोकांना बऱ्याच वेळा गाववाल्यांचा पाठिंबा का मिळतो, यावर दिव्यांगसरांचे म्हणणे असे की- 10 टक्के लोक मनापासून त्यांना मदत करतात, बाकी 90 टक्के मात्र केवळ जिवाच्या भीतीने त्यांना मदत करतात. गावकरी बिचारे मजबुरीमुळे यात अडकतात. त्यांच्या गरजा फार कमी आहेत, खूप कमी साधनांत आदिवासी खूश राहतात. अपने हिसाब से खुश रहना, उनको पसंद है. त्यांच्या मागण्या काहीच नाहीत. त्यामुळे केवळ भीतीपोटी ते नक्षली लोकांना मदत करतात. कारण एखाद्या माणसाला जीवे मारून टाकायला नक्षली लोकांना कुठलेही कारण पुरते. ‘अगर आप को सच मे जानना है, तो किसी भी गाववालों सें बात करना, वो सच बतायेंगे.’

गंगालूर या अतिसंवेदनशील गावापासून तीन-चार किलोमीटरवर एक नदी आहे. नदीच्या अलीकडे पोलीस आणि पलीकडे नक्षली लोक- अशी ती अघोषित बोर्डर आहे. अलीकडे वीज, पलीकडे नाही. त्यात पलीकडे राहणाऱ्या एका माणसाने विजेचा खांब बसवून त्याच्या घरी वीज घेतली. त्या कारणावरून नक्षली लोकांनी त्याला मारून टाकले. रात्रीच्या वेळी गावात जाऊन, पोलिसांना खबर दिल्याच्या संशयावरून नक्षली लोकांनी एखाद्याला मारून टाकणे, ही तर नित्याची घटना आहे.

फेक एन्काऊन्टर, स्त्रियांवरील अत्याचार अशा प्रकारचे आरोप पोलिसांवर नेहमीच केले जातात.  त्याबद्दल दिव्यांगसरांना विचारले असता, ‘अशा घटना फार दुर्मिळ आहेत,’ असे त्यांचे म्हणणे पडले. जेव्हा एन्काऊन्टर होते किंवा पोलिसांच्या कस्टडीमध्ये आरोपीचा मृत्यू होतो, तेव्हा 24 तासांच्या आत national human rights commisionला कळवावे लागते. कलेक्टर आणि डेप्युटी कलेक्टरसमोर प्रकरणाची चौकशी होते- ज्यात दोन्ही बाजूचे लोक, गावातील सरपंच उपस्थित असतात. पेपर कटिंग, सर्व पुरावे गोळा केले जातात. यात संबंधित पोलिसांवर चौकशीचा ताण येतो, कोर्टाच्या सतत चकरा होतात. राज्य प्रशासनाची चूक सिद्ध झाली, तर सुप्रीम कोर्टाकडून शिक्षेचे आदेश येतात. स्त्रियांवरील अत्याचाराच्या केसमध्येही त्या पोलिसाची इज्जत जाते. घरी कौटुंबिक समस्या उभ्या राहतात, नोकरी जाऊ शकते. त्यामुळे कोणीही नोकरदार पोलीस माणूस अशा घटना जाणून-बुजून करत नाही.

एका पुस्तकात मी वाचले होते की, प्रमोशनसाठी पोलीस खोटे एन्काउन्टर करतात. त्यावर दिव्यांगसरांनी बळेच हसत उत्तर दिले की- कोर्टाचा इतका सारा व्याप करून, सिद्ध होऊन प्रमोशन मिळायला चार-पाच वर्षे लागतात. असेही रेग्युलर काम करत राहिल्याने सात-आठ वर्षांत प्रमोशन होतेच. मग मुद्दामहून कशाला कोणी इतका खोटा उपद्‌व्याप करत बसेल? CRPF व पोलिसांवर असाही आरोप होतो की, नक्षली भागाचा त्यांना फायदाच होतो. म्हणून पोलीस आणि प्रशासनालाही नक्षली समस्या संपू नयेत असे वाटते. दिव्यांगसर स्वतःचेच उदाहरण देत सांगत होते की, मी ASP असूनही रायपूरच्या तुलनेत इथे काम केल्याने मला आर्थिक फायदा होत नाही. नक्षली भाग म्हणून फक्त 10000 रुपये जास्तीचे मिळतात. त्यामुळे त्या आरोपात तथ्य नाही.

जीवितहानी झाल्यावर सरकार पैसे देते; पण पोलीस आणि CRPF जवानांसाठीही शेवटी पैसा महत्त्वाचा की जीव महत्त्वाचा? कितीही पैसे मिळाले म्हणून कुणाला स्वतःहून गोळीबारात जखमी, अधू व्हायला किंवा जीव गमवायला आवडेल का? कोणी हौसेने इथे यायला तयार होत नाही. रस्त्याचे मोठे कंत्राटदार, मोठे व्यापारी या भागात कोणीही येत नाहीत. सरकारी लोकांना या भागात पोस्टिंग म्हणजे शिक्षा वाटते. उठझऋ जवान पोलिसांच्या तुलनेत उच्चशिक्षित असतात. त्यांना तीन वर्षे असे अवघड पोस्टिंग असते. कुटुंबापासून दूर राहून, वर्षातून फक्त दोनदाच घरी जायला मिळते. कशी तरी ही तीन वर्षे संपवून, जिवंत राहून घरी जाणे- इतकेच डोक्यात असते. त्यात कोणी नोकरी जाईल या भीतीने स्वतःहून खोटे एन्काऊन्टर किंवा स्त्रियांवर अत्याचार अशा घटना करायला धजत नाही. त्यातून काहीही निष्पन्न होत नसल्याने कशाला कोणी इतका ताप मागे लावून घेईल? ते सारे प्रकार सलवा जुडूमच्या वेळेस DRG च्या टीमकडून जास्त घडले होते, हेही ते नमूद करतात.

डॉ. उर्चिता आजारी असल्याने तिला रुग्णालयात जाऊन इंजेक्शन घ्यायचे होते. दिव्यांगसर तिच्यासोबत निघाले. दोघांच्या गप्पांतून, एकमेकांना समजून घेऊन, साथ देण्याच्या वृत्तीतून त्यांचे नाते किती सहज-सुंदर आहे, हे जाणवत होते. उमद्या मनाचा हा अधिकारी इतर पोलीस अधिकाऱ्यांपेक्षा वेगळा विचार करू पाहतो. ‘पोलीस बल कमी पडते का?’ या प्रश्नावर त्यांनी खूप सुरेख उत्तर दिले, ‘‘यहाँ कोई भी युद्ध या लडाई नहीं लडनी है. अगर ऐसेही नक्षलीयोंको मारते रहे, तो पोलीस का मतलबही नहीं है. ये एथिकली भी गलत है और ये समस्या का समाधान नही है. इस प्रदेश का विकास करना, यही असली समाधान है.’’

जर या भागातील जंगलतोड थांबावी वाटत असेल; खाणकामाला विरोध असेल, तर शहरातील लोकांनी गरजा कमी ठेवायला हव्यात. शेवटी या खाणीतील माल कुठे जातो आहे? शहरातील अनियंत्रित गरजा, चंगळ भागवायला. त्यामुळे फक्त खाणकामाच्या विरोधात नारे लावून हा प्रश्न सुटणारा नाही; तर ज्यासाठी हे सर्व होते आहे, त्याच्या विरोधात पाऊल टाकायला हवे. पोलिसांच्या विरोधात आंदोलन करणारे मानवाधिकारवाले लोक अंबानीच्या लग्नातील उधळपट्टीबद्दल का बोलत नाहीत? आदिवासींचे शोषण या प्रश्नाला व्यापक व्यासपीठ आहे आणि हा प्रश्न व्यापक पद्धतीने, सामोपचारानेच सोडवायला हवा. दिव्यांगसरांचे हे बोलणे पटत होते. आदिवासी मुलांची सहल नेणारा, मॅरेथॉन आयोजित करणारा हा अधिकारी बिजापूर जिल्ह्यात पोलीस विभागाला एक नवा मानवी चेहरा देऊ पाहत आहे आणि येथील तरुणाईला विकासाची नवी स्वप्ने देऊ पाहत आहे.

Tags: election in naxalite area bastar dr.urchita patel dr. divyang patel dr. ayeshwarya rewadakar नक्षल भागातील निवडणूक बस्तर उर्चिता पटेल डॉ डॉ. दिव्यांग पटेल बिजापूर छत्तीसगड डॉ. ऐश्वर्या रेवडकर weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

डॉ. ऐश्वर्या रेवडकर,  बिजापूर (छत्तीसगड)
zerogravity8686@gmail.com


प्रतिक्रिया द्या