डिजिटल अर्काईव्ह (2014-2019)

गेल्या सहा-सात वर्षांपासून एका ध्यासाने काम करणाऱ्या आकाशशी बोलताना एक गोष्ट जाणवते की- त्याच्या संकल्पना खूप स्पष्ट आहेत, निवडलेल्या कार्यपद्धतीवर अढळ विेशास आहे आणि उद्दिष्टे पूर्ण करण्याचा निश्चय आहे. दंतेवाड्यातील कामाच्या या वाटचालीमध्ये त्याला कोणता आनंद मिळाला, काय शिकायला मिळाले. याचे उत्तरही त्याच्या स्वभावाला साजेसे मिळाले, ‘कमीत कमी साधनांमध्ये, पर्यावरणाला हानी न पोहोचवता, पर्यावरणपूरक जीवनशैलीने जगता आले. ज्या कल्पना होत्या, त्या सर्व येथे प्रत्यक्ष राबवून पाहता आल्या.’ विकासाचे असे मॉडेल बनवणे की, जिथे लोकांचे प्रश्न आहेत, तिथेच उपलब्ध असलेली साधने वापरून पर्यावरणपूरक पद्धतीने विकास कसा साध्य करता येईल, हा प्रबळ विचार त्याच्या कामाच्या पाठीमागे आहे.

नव्यानेच सुरू झालेले ‘जैविक कॅफे’ हे दंतेवाड्याचे नवे आकर्षण ठरते आहे. आम्ही पहिल्यांदाच आमच्या ‘बचपन बनाओ’च्या ग्रुपसोबत इथे गेलो आणि येथील मेनू पाहून आश्चर्यचकित झालो तसेच कॅफेची बांधणी, रचनासुद्धा पर्यावरणपूरक आहे. या अशा नावीन्यपूर्ण कल्पनेमागे, आमचा मित्र आकाश बडवे याची गेल्या काही वर्षांतील जैविक शेतीमधील मेहनत आहे.

मूळचा नाशिकचा असलेला आकाश बडवे ‘बिट्‌स पिलानी’ या संस्थेतून शिक्षण घेऊन इंजिनिअर झाला. २०१२ मध्ये PMRDF फेलो म्हणून छत्तीसगडमध्ये आला. ‘काम कुठे करायचे?’, या प्रश्नाचे ‘जिथे गरज आहे तिथे’ असे सहज सोपे उत्तर. त्यानुसार प्रदेशाचा अभ्यास करून त्याने दंतेवाडा निवडले. आकाशने २०१२ मध्ये दंतेवाड्यात कामाला सुरुवात केली, तेव्हा दंतेवाडा जिल्ह्यात ओ.पी.चौधरी हे जिल्हाधिकारी होते. धडाडीने काम करणारे म्हणून त्यांचा बोलबाला होता. शिक्षण, रोजगार, पोषण आहार, शेती अशा सर्वच क्षेत्रांत पहिल्या वर्षी आकाशला कामाचा अनुभव मिळाला. त्याचे पहिले वर्ष तर नवा प्रदेश, येथील लोक आणि त्यांच्या समस्या, कामाची वेगवेगळी क्षेत्रे समजून घेण्यात गेले.

सुरुवातीला अंगणवाडीच्या पोषक आहार योजनेवर, जलसंधारणावर काम करणाऱ्या  आकाशला हळूहळू जैविक शेतीमध्ये रस निर्माण झाला. पुढे देवसेनापती हे दंतेवाड्याचे नवे जिल्हाधिकारी रुजू झाले. त्यांचे सूर प्रणीत सिन्हा, आकाश बडवे, आशिष या दंतेवाडा जिल्ह्यात काम करणाऱ्या तरुणाईसोबत चांगले जुळले आणि या तरुणांना त्यांनी पूर्ण सहकार्य देऊ केले. आकाशला त्यांनी जैविक शेतीमध्ये लक्ष केंद्रित करण्याची पूर्ण मुभा दिली. साडेतीन वर्षे आकाशने फेलो म्हणून काम केले. यामध्ये त्याची कामाची दिशा ठरत गेली, जडण-घडण होत गेली.

दंतेवाड्याचे जिल्हाधिकारी देवसेनापती यांना इतर अधिकाऱ्यांच्या तुलनेत जैविक शेतीची जास्त आवड व समजही होती. त्यांच्या पुढाकारामुळे दंतेवाड्याच्या जैविक शेतीला मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन व मदत मिळाली. त्यासाठी त्यांनी वेगवेगळ्या योजना राबवल्या. शेतकऱ्यांना कंपोस्ट खड्डे, जनावरांसाठी गोठे बनवून देणे, शेतीकौशल्याचे प्रशिक्षण आयोजित करणे, इतर राज्यांत अभ्यासदौऱ्यासाठी पाठवणे, कृषी खात्याला जैविक शेतीबद्दल संवेदनशील करणे, सरकारी धोरणांत बदल घडवून आणण्यास स्वतःहून प्रयत्न करणे, त्याद्वारे शेतीत रासायनिक खतांचा वापर बंद करणे- अशा किती तरी गोष्टी त्यांच्या कार्यकाळात यशस्वीरीत्या राबवल्या गेल्या.

राज्यपातळीवर प्रयत्न करून देवसेनापती यांनी कृषी राज्यमंत्र्यांना जैविक शेतीचे महत्त्व पटवून दिले आणि दंतेवाडा हा जिल्हा छत्तीसगडमधील असा एकमेव जिल्हा ठरला, जिथे शासनातर्फे रासायनिक कीटकनाशके-खते यांचा प्रसार-प्रचार व वाटप केले जात नाही. बिट्‌स पिलानीच्या इंजिनिअरचा येथपर्यंत प्रवास कसा घडला असेल, ही माझी उत्सुकता. घरातूनच पर्यावरणसंवर्धनाचे संस्कार लाभलेला आकाश अहमदाबादचे डॉ.प्रो.अनिल गुज यांच्यासोबत शोधयात्रेमध्ये सामील झाला होता. तेव्हा गावागावात काम करणाऱ्या, नवे काही शोधू पाहणाऱ्या लोकांना त्याला जवळून पाहता आले. त्यामुळे गावातील लोकांकडून आपल्याला शिकण्यासारखे पुष्कळ आहे; त्यांची संस्कृती, विविधता, त्यांची शक्तिस्थाने, परंपरागत चालत आलेले ज्ञान आणि आपले विज्ञान यांचा समन्वय साधून प्रगती साधता आली पाहिजे, असा विचार त्याच्या मनात रुजला.

PMRDF फेलो म्हणून काम करताना सामजिक उन्नती आणि पर्यावरण संवर्धन या दोन गोष्टी वेगळ्या नसून, एकमेकांत गुंतलेल्या आहेत, असे त्याच्या लक्षात आले आणि शोषणरहित विकासप्रक्रियेकडे त्याचा कल झाला- मग ते शोषण समाज आणि पर्यावरण दोन्हींचेही नको. जैविक शेतीतील कामाची सुरुवात झाली; तेव्हा आकाशने जव्हारचे संजय पाटील यांच्याशी चर्चा करून, SRI (System Of Rice Incentification) म्हणजेच ‘श्रीविधी’ या तांदळाचे उत्पादन वाढवणाऱ्या तंत्रज्ञानाचे शेतकऱ्यांना प्रशिक्षण द्यायला सुरुवात केली.

तेव्हा त्याच्या लक्षात आले की, तांदळासोबत इतरही पिकांना, विविध भाज्या लागवडीला प्रोत्साहन दिले गेले पाहिजे. लोकांना पाण्याच्या सुविधा, जैविक शेतीसाठी पाठबळ मिळाले पाहिजे. यातूनच परंपरागत घेतल्या जाणाऱ्या पिकांचे महत्त्व, त्यांची पोषक मूल्ये, अन्न-धान्यातील विविधता यांचे महत्त्व जाणवू लागले. लोक शेतीतून ज्या पिकांचे उत्पादन घेत आहेत, त्या धान्याला विक्रीसाठी बाजारपेठ उपलब्ध करून देणे, बाजारभाव मिळवून देणे हेही जरुरीचे होते. त्यातूनच दंतेवाड्यामध्ये तांदूळ महोत्सव आयोजित केला गेला, ज्याद्वारे लोकांना तांदळाच्या विविध प्रकारांचे महत्त्व आणि पोषणमूल्ये यांची माहिती दिली गेली.

शेतकऱ्यांना सोबत घेऊन, दुसऱ्या राज्यांत चालणाऱ्या जैविक शेतीचे तंत्रज्ञान पाहायला अभ्यासदौरे केले. सुरुवातीला कृषी विभागातील लोकांना प्रशिक्षण दिले आणि त्यातील प्रत्येकाला गावात जाऊन, प्रत्येकी दहा-दहा शेतकऱ्यांना प्रशिक्षण द्यायला लावले. शेतकऱ्यांचे समूहगट बनवले गेले- ज्याद्वारे चर्चा घडेल, ते एकमेकांना मदत करू शकतील असा त्यामागे उद्देश होता. तसेच शेतमालाला organic certification साठीही शेतकरी गटांचा फायदा होतो.

हळूहळू गावात उत्साही तरुणांतून कार्यकर्ते बनत गेले. या सर्व अथक परिश्रमांतून २०१६ मध्ये ‘भूमगादी’ ही स्वायत्त संस्था आकारास आली. ‘भूमगादी’ हा येथील आदिवासी लोकांचा एक सण. वर्षातून एकदा या दिवशी शेतीची पूजा केली जाते. त्याचेच नाव शेतकऱ्यांच्या या संस्थेला देण्यात आले. अवघ्या १० शेतकऱ्यांसह सुरू झालेल्या या संस्थेत आज १२०० शेतकऱ्यांचा सहभाग आहे. ४० गावांत काम करणाऱ्या या संस्थेचा विस्तार जून २०१८ पासून १२०-१३० गावांत झालेला आहे.

तमिळनाडूचे व्ही.एस.अरुणाचलम चार-सहा महिन्यांतून एकदा शेतकऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी नियमितपणे येतात. कधी जंगलात पाठवून प्रत्येक झाडाचा अभ्यास करायला लावतात, वेगवेगळी जैविक खते बनवायला शिकवतात. तसेच छत्तीसगडमधील दुर्ग येथून जेकब नेल्लीथला हेसुद्धा प्रशिक्षण देण्यासाठी येतात. ‘भूमगादी’तर्फे प्रत्येक गावात १००-१२० शेतकऱ्यांमध्ये एक कार्यकर्ता असतो. आठ-दहा कार्यकर्त्यांसाठी एक मास्टर ट्रेनर व क्लस्टर को-ऑर्डिनेटर अशी जोडगोळी असते. एकूण सर्व १३० गावांत असे १०० कार्यकर्ते, १२-१२ मास्टर ट्रेनर व क्लस्टर को-ऑर्डिनेटर आहेत.

आकाशला भेटायचे म्हणजे एक तर त्याचे राहण्याचे ठिकाण म्हणजे ‘बचपन बनाओ’चा कॅम्पस किंवा मग त्याच्या ‘भूमगादी’ संस्थेचे ऑफिस. तिथे सदैव कामात गढलेला तो सापडतो. ‘सापडतो’, कारण त्याला शोधत शोधत जावे लागते. मी जनपद भवनच्या इमारतीतील त्याच्या ऑफिसमध्ये गेले, तेव्हा एक नवीन विेशच पाहायला मिळाले. तांदळाचा सुगंध सर्वत्र पसरला होता. माहिती घेताना कळले की, बस्तरमधील तांदळाचे ६०- ७० विविध प्रकार पुन्हा शोधून, त्यांची बियाणे संवर्धित केली गेली आहेत. त्यातील अधिकाधिक पोषणमूल्य असलेले १५ प्रकार विक्रीसाठी उपलब्ध केले गेले होते. तेथील कार्यकर्त्यांनी उत्साहाने पूर्ण भाग फिरून दाखवला. तेथील पोहे बनवण्याचे मशीन, राईस मिल, मिलेट प्रोसेसिंग मिल या सर्वांचे काम कसे चालते ते समजावून सांगितले.

माझ्यासाठी हे अगदीच वेगळे विेश्व होते. तिथेच माहिती कळाली की, येथे तांदळाची इतकी विविधता आहे की, १९७० मध्ये प्रसिद्ध तांदूळ शास्त्रज्ञ रीछार्या यांनी मध्य प्रदेश व छत्तीसगडमधील तांदळाचे १९००० प्रकार शोधून, ते छत्तीसगडमधील रायपूर येथील इंदिरा गांधी कृषी विद्यालयामध्ये जतन करून ठेवले. आकाशशी बोलताना पहिल्यांदा मला जैविक शेती म्हणजे नक्की काय आणि तिचे महत्त्व समजले. पुण्यामध्ये ऑरगॅनिकच्या नावाखाली मिळणारा महागडा माल पाहिलेली मी, या संकल्पनेबद्दल खूप गैरसमज बाळगून होते. आकाशशी बोलताना ही संकल्पना उलगडत गेली. सुरुवातीपासूनच नेहमी पर्यावरणहितकारी विचार करणारा आकाश जैविक शेतीकडे वळला नसता, तरच नवल.

जर जैविक शेतीला शासनानेही पाठिंबा दिला, शेतकऱ्यांना योग्य प्रशिक्षण दिले, मालासाठी योग्य भाव मिळवून दिला; तर जैविक शेतीचा विकास होऊन उत्पन्न नक्कीच वाढेल, हे त्याचे ठाम मत आहे. शासन सध्या रासायनिक खते व रासायनिक कीटकनाशके मोफत किंवा कमी दरात पुरवीत आहे, हे धोरण मुळातच चुकीचे आहे. बस्तरच्या या प्रदेशात रसायने न वापरता अजूनही मोठ्या प्रमाणात शेती केली जाते, पण शासनाच्या पुरवठ्यामुळे इथेही रासायनिक खतांचा वापर सुरू झाला आहे व वाढत चालला आहे.

जैविक शेती म्हणजे नक्की काय, हे पाहण्यासाठी आकाशने मला ‘चरणदास’ या मास्टरट्रेनरसोबत कुपेर या गावी पाठवले. रस्त्यात दंतेवाड्याचा आठवडी बाजार लागला. नेहमीचेच दृश्य दिसले. मुख्य बाजार आणि एका टोकाला सल्फी पिण्यात रंगलेले लोक. आम्ही त्याच्या घरी गेलो; तेव्हा त्यांनी गोमूत्र, शेण, गूळ, बेसन, वारुळाची माती यापासून बनवलेले जीवामृत, काडेप कंपोस्ट, एरंडाच्या बियांपासूनची खते, ताडीचा, महुआचा वापर केलेली अशी विविध जैविक खते दाखवली. माशाचे आतडे, गूळ यापासून बनवलेले मछली टॉनिक, जे पिकाच्या वाढीसाठी वापरले जाते. ते बनवण्याच्या अनेक पद्धती सांगत होते. मला थोडेफार समजत होते, बरेचसे समजत नव्हते. कीड नियंत्रणासाठी वापरण्यात येणारे वेगवेगळ्या पानांचे अर्क, अद्रक- लसूण-मिरची-मिश्रण अशी विविध माहिती ते देत होते.

श्रीविधीने लावलेली शेती त्यांनी दाखवली. सर्वच लोक बुधवारच्या बाजाराला गेल्याने गावात कोणीच दिसत नव्हते. ताडीच्या झाडाची फळे घेऊन आम्ही परतलो. छोट्या नारळासारखी कठीण असलेली ती फळे तोडून, आतला पांढरा गर आम्ही सर्वांनी मिळून खाल्ला. आकाशशी बोलण्यातून ‘जैविक शेती’ची संकल्पना सुंदरपणे उलगडत गेली.

‘‘जैविक शेती ही पूर्वापार चालत आलेली आहे; परंतु केवळ तात्पुरता फायदा वाढवण्याकडे कल झाल्याने, दूरदृष्टीने विचार न करता शेतीत रसायनांचा वापर अंदाधुंदपणे वाढत गेला. आजच्या काळात शेतीकडे जणू कारखान्यासारखे पाहिले जाते. त्यात रसायने घाला आणि नफा कमवा, जे मुळातच चुकीचे आहे. लोकांना वाटते की, जैविक शेती म्हणजे फक्त रासायनिक खते न वापरणे; परंतु त्या अर्धवट माहितीतून आलेल्या संकल्पना आहेत.

‘जैविक शेती’ ही  संकल्पना समजून घ्यायला होलिस्टिक विचार करायला हवा. बीज रुजण्याची, अंकुरित होण्याची, रोप बनण्याची, रोपाची वाढ होण्याची पूर्ण प्रक्रिया ही आजूबाजूच्या पोषक वातावरणात होत असते. हे वातावरण अनेक गोष्टींचे मिळून बनलेले असते. माती, हवा, वारे, पाणी, किडे, जीवजंतू, बेडूक, कोळी, पक्षी, जनावरे या सर्वांची मिळून जणू एक पर्यावरणीय व्यवस्था बनत असते, जी रोपासाठी पोषक असते. यामध्ये जमिनीतील ओलावा टिकवणे, पाने कुजून हुमस मातीत मिसळणे. मित्रकीटक कसे वाढतील, शत्रुकीटक कसे कमी होतील, पक्षी कसे येतील, मातीतील बॅक्टेरिया कसे वाढतील- जे पाने कुजण्याच्या प्रक्रियेत मदत करतील... या सगळ्यांचा विचार करून केलेली शेती म्हणजे जैविक शेती. त्यात पिकांमध्ये विविधता असणे खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे जमिनीचा कस टिकून राहतो. पूर्वी भारतात अशी संपन्न केली जायची; परंतु ब्रिटिशांच्या हस्तक्षेपामुळे भारतीय शेती विस्कळीत झाली, कारण त्यांनी आपल्या परंपरागत पिके बंद करून शेतकऱ्यांवर उद्योग-धंद्यासाठी, कच्च्या मालासाठी लागणारी, निर्यात करण्यासाठी लागणारी पिके घेण्याची सक्ती केली. मोठ्या प्रमाणात जंगलतोड केली.

नंतर स्वतंत्र भारतात झालेल्या हरितक्रांतीमुळे पुन्हा एकदा पारंपरिक शेतीला फटका बसला. हरित क्रांतीने शेतीतील रसायनांचा वापर प्रचंड प्रमाणात वाढवला. फक्त गहू आणि तांदूळ याच पिकांना प्रचंड उत्तेजन देऊ केल्याने पिकांमधील पूर्वापार चालत आलेली विविधता संपुष्टात आणली. लोक आपसूकच जैविक शेती विसरून जाऊन रासायनिक वापराच्या आणि फायदा देणाऱ्या पिकांच्या उत्पादनाकडे वळले. त्यात पुन्हा आपल्या सरकारची रेशन तांदळाची योजना, ज्यामुळे आधीच गरीब असलेल्या लोकांच्या अन्नाचे पोषणमूल्य आणखी घसरले. बस्तरमधेही मी पाहते- विविध कडधान्ये, भाज्या पिकवणारा शेतकरी ते विकून स्वतः मात्र रेशनचा स्वस्त आणि निकृष्ट दर्जाचा तांदूळ खातो. पूर्वी आहारात मिलेट होते, जे लोह-विटामिन्सने परिपूर्ण आहेत; परंतु ते सरकारी योजनांमुळे शेतीतून कमी झाले.

आजकाल फक्त गहू, तांदूळ असेच धान्य खाल्ले जाते. परंपरागत शेतीमध्ये अन्नधान्याची भरपूर विविधता होती. अजूनही उत्तराखंडमध्ये १२ पिके एकत्र घेतली जातात. ओडिशामध्ये multilayer farming केले जाते. लॅटीन अमेरिकेत बीन्स, मका, स्क्वाश ही पिके एकत्र घेतली जातात. परंतु हरित क्रांतीने मात्र फक्त ठरावीक पिके आणि त्यातही जास्त उत्पन्न देणारी १०-१२ बियाणेच प्रसारित करून विविधतेवर घाला घातला. प्रत्येक भागातील जमिनीचे गुणधर्म, भौगोलिक विविधता, पाण्याची उपलब्धता, लोकांना लागणारी पोषणमूल्ये, हवामान हे सर्व वेगवेगळे असल्याने पिके, बियाणेही वेगवेगळी हवीत. एकाच प्रकारची १०-१२ बियाणे ही कशी काय सर्वांना पुरू शकतील, गरजा भागवू शकतील? सारे गुणधर्म फक्त १०-१२ पिकांतच कसे काय येऊ शकतील? आकाश प्रत्येक मुद्दा शांतपणे आणि एकाग्रतेने समजावून सांगत होता.

एका अभ्यासात हे पुढे आले आहे की, १९८० च्या काळातील आहाराच्या तुलनेत आजच्या काळातील आहार निकृष्ट झाला आहे.’’ ‘‘रसायनांना इतका विरोध का?’’ माझा त्याला बाळबोध प्रश्न. ‘‘एक तर रसायने ही पिकासाठी असणाऱ्या पोषक द्रव्यांवरही हल्ला चढवतात, शत्रुकीटकासोबत मित्र- कीटकही मारून टाकतात, त्यातील विषारी द्रव्ये आपल्याही पोटात जातात. त्याने मला ‘ग्लायफोसाईट’ तणनाशकाचे उदाहरण दिले, ज्याचा सुरुवातीला खूप बोलबाला होता. तणांची प्रतिकारशक्ती हळूहळू वाढून, ते या रसायनाला दाद देईनासे झाले. यावर उपाय म्हणून, या रसायनाच्या फवारणीची मात्रा मोठ्या प्रमाणात वाढवली गेली. पूर्वी ते सुरक्षित मानले जायचे, परंतु आता मात्र त्याचे घातक परिणाम दिसू लागले आहेत. थकज या आरोग्य संघटनेने, या रसायनामुळे कर्करोगाची शक्यता आहे, असे सांगितले आहे. ‘टोनी मित्रा’ हा अन्नधान्य सुरक्षेबद्दल चळवळ करणारा भारतीय, कॅनडामध्ये ग्लायफोसाईटच्या वापराविरोधात कायदेशीर लढाई लढतो आहे.

 ‘‘भूमगादीची नेमकी उद्दिष्टे कोणती आहेत?’’

 ‘‘मुख्यत्वे चार- भूक से मुक्ती, गरिबी से मुक्ती, कुपोषण से मुक्ती, शोषण से मुक्ती.’’

गावातील अनेक कुटुंबे स्वतःची शेतजमीन असूनही स्वतःच्या गरजेपुरतेही अन्नधान्य पिकवू शकत नाहीत आणि शासकीय रेशनच्या तांदळावरच गुजारा करतात. आत्ताशी कुठे इथे नांगराचा वापर सुरू झाला आहे, बाकी नव्या पद्धतीची अवजारे तर इथे माहीतसुद्धा नाहीत. बाकीचा समाज शेतीमध्ये आदिवासींच्या कित्येक वर्षे पुढे आहे. त्यामुळे येथील आदिवासींना शेतीकौशल्ये शिकवणे आणि जमिनीच्या छोट्याशा तुकड्यातही जास्त उत्पन्न कसे घेता येईल, पिकांची विविधता कशी जपता येईल हे तंत्र शिकवणे- हे संस्थेचे एक महत्त्वाचे उद्दिष्ट आहे.

‘कुपोषण से मुक्ती’ म्हणजेच उत्पन्न वाढवून, विविधता जपून, तांदूळ, गव्हासोबतच डाळी, मिलेट, भाज्या, फळे, याचे उत्पादन वाढून लोकांना पोषक आहार मिळू लागला; तर कुपोषणाचा प्रश्न सोडवण्यात हातभार लागेल. मी स्वतःही दवाखान्यात रुग्ण तपासत असताना हाच विचार करत असते की- आजारासाठी तात्पुरती औषधे देता येतील, परंतु रुग्ण घरी गेल्यानंतर तो निरोगी राहावा यासाठी पोषक आहार गरजेचा आहे. रक्तक्षय असणाऱ्या महिलेला मी काय खावे हे समजावून सांगते, परंतु तो आहार तिला उपलब्ध आहे का, परवडण्याजोगा आहे का, हे प्रश्न मला व्यथित करतात. शेतकऱ्यांनी कौशल्ये शिकून उत्पन्न वाढवले तर आपोआपच आर्थिक सुरक्षा वाढेल, गरिबीपासून लोकांना मुक्ती मिळेल. चौथे म्हणजे, शोषण से मुक्ती. बाजारपेठेच्या माध्यमातून व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांचे होणारे शोषण थांबवणे. येथे अजूनही पारंपरिक पद्धतीने बाजार केला जातो. आपल्याकडे असणारी वस्तू देऊन गरजेची वस्तू समोरच्याकडून घेणे, यामध्ये शेतकऱ्यांची लुबाडणूक केली जाते.

भूमगादीद्वारे शेतकऱ्यांचे संघटन करून त्यांच्या उत्पन्नाला योग्य किंमत मिळवून देणे, शेतकऱ्यांना बाजारपेठेशी जोडणे- जे एकटा-दुकटा शेतकरी करू शकत नाही ते संस्थेच्या माध्यमातून करणे सहज शक्य होते. भूमगादीद्वारे दंतेवाड्यातील उत्पादन देशातील दिल्ली, पुणे, चेन्नई, बेंगळुरु, रायपूर, भोपाळ, विशाखापट्टणम अशा विविध २५ शहरांत पोहोचते. गेल्या सहा-सात वर्षांपासून एका ध्यासाने काम करणाऱ्या आकाशशी बोलताना एक गोष्ट जाणवते की त्याच्या संकल्पना खूप स्पष्ट आहेत, निवडलेल्या कार्यपद्धतीवर अढळ विेशास आहे आणि उद्दिष्टे पूर्ण करण्याचा निश्चय आहे. ‘

दंतेवाड्यातील कामाच्या या वाटचालीमध्ये त्याला कोणता आनंद मिळाला, काय शिकायला मिळाले?’ याचे उत्तरही त्याच्या स्वभावाला साजेसे मिळाले, ‘कमीत कमी साधनांमध्ये, पर्यावरणाला हानी न पोहोचवता, पर्यावरणपूरक जीवनशैलीने जगता आले. ज्या कल्पना होत्या, त्या सर्व येथे प्रत्यक्ष राबवून पाहता आल्या.’ विकासाचे असे मॉडेल बनवणे की, जिथे लोकांचे प्रश्न आहेत, तिथेच उपलब्ध असलेली साधने वापरून पर्यावरणपूरक पद्धतीने विकास कसा साध्य करता येईल, हा प्रबळ विचार त्याच्या कामाच्या पाठीमागे आहे. गावात बाहेरून माल येतो आणि गावातील पैसा बाहेर जातो. गावात फक्त शेतीच केली जाते. शहरात मोठाले कारखाने बनतात, रोजगारासाठी लोक गावे सोडून शहरात स्थलांतरित होतात.

हा सर्व उलट्या दिशेने होणारा प्रवास आहे. त्याऐवजी खरे तर गावातच उत्पादनाची केंद्रे कशी प्रस्थापित होतील, याकडे प्रवास व्हायला हवा; आपल्या गरजा अनियंत्रितपणे वाढू न देता जीवनशैली पर्यावरणपूरक राहायला हवी, अशा अनेक गोष्टीवर आम्ही बोलत होतो. मधेच कोणी तरी जैविक कॅफेतून सँडविच, डोसा, अप्पम खायला घेऊन आले. समोर सुकलेल्या लाकडांनी शेकोटी बनवून भारती, जस्सी हे वांगे भाजून भरीत बनवायच्या तयारीला लागले होते. या कॅम्पसमध्ये आले की, माझा सर्व ताण-तणाव निघून जातो. मन शांत होऊन जाते. टोनी मित्रा यांचे एक वाक्य वाचायला मिळाले, ’ Mankind on a runway dash to the cliff, dragging a screeching and screaming planet with it- all in the name of development

‘भूमगादी’ ही प्रेरणा आहे, आपणा सर्वांसाठीच.

 

Tags: बस्तर जैविक शेती बिजापूर छत्तीसगड डॉ. ऐश्वर्या रेवडकर पर्यावरण environment organic farm akash badwe chhatisgad bijapur ayeshwarya revadkar danttewada bastar weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

डॉ. ऐश्वर्या रेवडकर,  बिजापूर (छत्तीसगड)
zerogravity8686@gmail.com


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके

कर्तव्य

सर्व पहा