डिजिटल अर्काईव्ह (2014-2019)

पुढे काही किलोमीटरवर सोमनपल्ली हे गाव लागले. येथे वनभैसा दिसू शकतो, ही माहिती मिळाली होती, म्हणून थोडी चौकशी करायचे ठरवले. मॉडर्न वेशभूषा केलेली दोन-तीन माणसे दारूच्या बाटल्या शर्टात लपवून घेऊन निघाली होती. त्यांना विचारले तर त्यांनी ‘हम यहाँ के नहीं है, शहरसे है’, म्हणून आम्हाला उडवून लावले. मग आम्ही गाई राखणाऱ्या आदिवासी वयस्कर माणसाला विचारले, ‘‘जंगलमे कभी कोई जानवर देखा है क्या?’’ तर त्याचे निर्विकार चेहऱ्याने उत्तर, ‘‘मै कभी नहीं जाता जंगलमें!’’ आणखी एका आदिवासी तरुणाचे तेच उत्तर, ‘‘नहीं जाता जंगल मे, नहीं देखा कभी कोई जानवर.’’ आम्हाला आश्चर्य वाटले. सर्वच जण जंगलात जातात, हे माहिती होते. ही माणसे साफ खोटे बोलत होती. आमच्या ड्रायव्हरनेच सांगितले की, येथील लोक दोन्ही बाजूंना घाबरतात- नक्षली व पोलीस, दोन्हींना. चौकशीही होते आणि त्रासही. त्यात आपण असे कारमध्ये फिरत आलेलो, अनोळखी लोक. ते का विश्वास ठेवतील आपल्यावर?  

रविवारी सकाळी नाश्ता करूनच आम्ही बिजापूर सोडले होते आणि कुटरूला निघालो होतो. दोन दिवसांपूर्वीच माझा मित्र धीरज आग्ऱ्याहून बिजापूर पाहण्यासाठी आला होता. गेली दोन-तीन वर्षे धीरजने छत्तीसगडच्या महासमुद्र जिल्ह्यात कुष्ठरोग्यांसाठी काम केले होते. त्यानिमित्ताने त्याचे छत्तीसगडच्या अनेक भागात फिरणे झाले होते. परंतु मुळातच कोणी दक्षिण छत्तीसगड भागात- म्हणजे बिजापूर, सुकमा, दंतेवाडा या जिल्ह्यांमध्ये- फारसे फिरकत नाही. खुद्द छत्तीसगडमधील लोकसुद्धा या भागात फारसे येत नाहीत. धीरजला पक्षी आणि वन्य प्राणी फोटोग्राफीमध्ये रस असल्याने, आल्यापासून तो या भागात वनभैसा कुठे पाहायला मिळेल म्हणून मागे लागला होता. वनभैसा हा छत्तीसगडचा राजप्राणी आहे. मी कधी याबाबत विचारच केला नव्हता, ना मला या विषयाची काही माहिती होती. 

बिजापूरच्या डीएफओना फोन करून विचारले, ‘‘सर, वनभैसा कहाँ देखने को मिलेगा?’’ आधी तर त्यांनी सुरक्षिततेच्या दृष्टीने, कुठेही जंगलात जायचे नाही म्हणून सांगितले. त्यांनी स्वतःच गेल्या दोन-तीन वर्षांत वनभैसा पाहिल्याचे ऐकले नव्हते. भोपालपट्टणमपासून आतील भागात सांड्रापासून पुढे जंगलात दिसतो, असे कळले; परंतु तिथे नक्षलप्रभाव असल्याने जाता येत नाही. दुसरे ठिकाण म्हणजे कुटरूपासून पुढे 25 किलोमीटरवर असलेले फरसेगड भागातील जंगल. धीरजने आदिवासी भागातील त्याच्या  ओळखीच्या एका माणसाला फोन लावला, तर त्याची वेगळीच नाराजी. ‘‘वनविभाग तो कुछ नहीं कर रहा जंगल और जानवर बचाने के लिए. आप लोग भी क्या करोगे उसे देख के? पुरे छत्तीसगडमें सिर्फ गिनेचुने पाँच-छे वनभैसा बचे है.’’ शेवटी त्याने एक ठिकाण सांगितले की, कुटरू फरसेगड रस्त्यावर सोमनपल्ली भागात दिसेल वनभैसा म्हणून. 

या सर्व माहितीनुसार आम्ही कुटरूचा रस्ता पकडला होता. शिक्षार्थ या सामाजिक संस्थेसोबत, बिजापूर जिल्ह्यातील शाळांसोबत काम करणारा अभिजीतही आमच्यासोबत आला होता. कुटरूला प्राथमिक स्वास्थ्य केंद्रात आम्ही थांबलो. तेथील डॉ.मोरला लहानपणापासून त्याच भागात वाढले असल्याने कदाचित त्यांना माहिती असावी, या अंदाजाने त्यांना विचारले. परंतु त्यांना ना माहिती होती, ना काही रस होता. ‘‘बहोत सालों से हमने यहा सुना भी नहीं है वनभैसा के बारे में.’’ धीरज माझ्यावर नाराज होत होता, कारण आम्ही ही गोष्ट हसण्यावारी नेत होतो. पण त्याच्यासाठी मात्र ती गोष्ट खूप मोलाची होती. जंगलतोड, शिकार, वन विभागाचे दुर्लक्ष या सर्व गोष्टींमुळे वन्य प्राण्यांची संख्या खुद्द इंद्रावती टायगर रिझर्व्हमध्येच रोडावत चालली आहे. कुटरूच्या पंचशील आश्रमात पोहोचलो तेव्हा एक सुखद धक्का बसला. एका हॉलमध्ये मुलींचा संगीत शिकवणीचा वर्ग भरला होता. आम्हाला पाहून पोरी पळत येऊन वाकून नमस्कार करू लागल्या. मधुकररावांनी आम्हाला अगत्याने जेवू घातले. जेवताना आम्ही त्यांच्याकडे वनभैसाची चौकशी केली. तेव्हा त्यांनी फरसेगडहून 20-22 किलोमीटरवर असणाऱ्या साडमित्टा आणि नेलीमुडगू या गावांच्या आजूबाजूच्या जंगलात वनभैसा दिसू शकतो, असे सांगितले. कोणी तरी आम्हाला पहिल्यांदाच खात्रीशीर माहिती दिली होती. परंतु फरसेगडच्या पुढे नक्षली लोकांचे राज्य चालते आणि त्यापुढील सर्व प्रदेश, गावे त्यांच्या प्रभावाखाली येत असल्याने त्यांच्या परवानगीशिवाय कोणीही तिथे जाऊ शकत नाही, ही माहिती मी ऐकली होती. 

तेथील वन विभागाच्या एका माणसाने सांगितले की, ते अनेकदा नक्षलींच्या भीतीने जंगलात जाऊ शकत नाहीत, त्यामुळे वन्य प्राण्यांची व्यवस्थितरीत्या गणना होऊ शकत नाही. संगीताच्या क्लासकडे आम्ही गेलो, तेव्हा समजले की, फरसेगडचे आरएमए डॉ.त्रिपाठी हे संगीतातील पदवीधारक तज्ज्ञ आहेत. फरसेगडसारख्या भागात एकटे राहून काम करताना संगीताची आवड जोपासण्यासाठी म्हणून ते आजूबाजूच्या शाळांमध्ये मुलांना संगीत शिकवतात, योगाचे क्लासेस घेतात; परंतु तेथील शिक्षकांकडून त्यांना हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे दर रविवारी दोन तास ते कुटरूला या आश्रमात येऊन मुलींना मोफत संगीत प्रशिक्षण देतात. त्यामध्ये तबलावादन, हार्मोनियम, गिटार ही सर्व वाद्ये शिकवतात. येथील मुली संगीताचा गृहपाठही शिस्तीने करतात, शिक्षिका जातीने लक्ष घालतात. त्यामुळे डॉ.त्रिपाठी यांना शिकवण्यात रस येतो. त्यांच्याशी गप्पांमध्ये कळले की, ते आजूबाजूच्या सर्व गावांत रुग्णतपासणीसाठी नियमित जातात. आम्ही त्यांना विचारले की, ते आम्हाला साडमित्टा आणि नेलीमुडगू या गावात नेऊ शकतात का? त्यांना वनभैसाबद्दल फारसे देणे-घेणे नव्हते, परंतु त्या दोन गावात न्यायचे त्यांनी आनंदाने कबूल केले. कारण स्वतः ते त्या गावामध्ये फिरून आरोग्यविषयक सुविधा पुरवत असल्याने गावकऱ्यांचा त्यांच्यावर विश्वास  होता. मात्र, त्यासाठी सकाळी लवकर 9 वाजताच यावे लागणार होते. आज तर दुपारचे 3 वाजले होते.

मग आम्ही आज फरसेगडला चक्कर मारायची ठरवले. मी स्वतःही आत्तापर्यंत कधी फरसेगड पाहिले नव्हते. धीरज, अभिजित, मी आणि आमच्यासोबत कुटरूच्या प्राथमिक स्वास्थ्य केंद्राचे ड्रायव्हरकाका, पंचशील आश्रमातील एक शिक्षक अशी आमची मोठी टीम निघाली. हा भाग धोकादायक मानला जातो. रात्री तर या रोडवर नक्षलींच्या भीतीने कोणीही फिरकत नाही. अजूनही हा मातीचा कच्चा रस्ता आहे आणि दिवसातून फक्त एकदाच बस या रोडवर ये-जा करते. पक्ष्यांचा आवाज ऐकत-ऐकत धीरज हळूहळू कार चालवत होता. मधेच एखाद्या वेगळ्या पक्ष्याचा आवाज ऐकला की, कार थांबवून पक्षी शोधण्यासाठी आजूबाजूला फिरत होता. तेव्हा मला पहिल्यांदाच जाणवले की, बिजापूरच्या अशा अतिसंवेदनशील भागात मी जेव्हा गेले आहे, तेव्हा फक्त नक्षली लोकांचा धोका आणि पोलीस अशाच गप्पा होतात. आज पहिल्यांदाच कोणी पक्षी, वन्य प्राणी संवर्धन अशा गोष्टीबद्दल बोलत होते. आदिवासींचे जीवन जंगलावर अवलंबून आहे. त्यामुळे भुकेसाठी जे कुठले जनावर-पक्षी मिळेल, त्याची शिकार करून खाणे आले. त्यामुळेही जंगलातील पक्ष्यांच्या अनेक सुंदर जाती आता दुर्मिळ होत चालल्या आहेत. लांडगा, कोल्हा, हरीण, चितळ, ससे, वानरे; तर पहाडी भागात अस्वल, शेकरू हे वन्य प्राणी मात्र रात्रीच्या सुमारास दिसतात. काही किलोमीटरवर राणी बोदली या गावाची पाटी दिसली, ती पाहून मनावर दु:खाचे सावट आले. 2007 मध्ये या गावात अंदाजे 300 नक्षलींनी सीआरपीएफच्या कॅम्पवर हल्ला केला होता. पेट्रोलबॉम्ब फेकले गेले. आगीपासून जीव वाचवण्यासाठी सीआरपीएफ जवान जसे उघड्यावर आले, तसा त्यांच्यावर गोळीबार केला गेला. त्यात 55 जवान ठार झाले, तर 11 जखमी झाले. अनेक रायफली लुटल्या.

छत्तीसगड हे 2000 मध्ये स्वतंत्र राज्य बनल्यापासून झालेला हा सर्वांत मोठा नक्षली हल्ला होता. या हल्ल्यामुळे राणी बोदली हे गाव कायमचे स्मरणात राहिले. पुढे काही किलोमीटरवर सोमनपल्ली हे गाव लागले. येथे वनभैसा दिसू शकतो, ही माहिती मिळाली होती, म्हणून थोडी चौकशी करायचे ठरवले. मॉडर्न वेशभूषा केलेली दोन-तीन माणसे दारूच्या बाटल्या शर्टात लपवून घेऊन निघाली होती. 

त्यांना विचारले तर त्यांनी ‘हम यहाँ के नहीं है, शहरसे है’, म्हणून आम्हाला उडवून लावले. 
मग आम्ही गाई राखणाऱ्या आदिवासी वयस्कर माणसाला विचारले, ‘‘जंगलमे कभी कोई जानवर देखा है क्या?’’ 
तर त्याचे निर्विकार चेहऱ्याने उत्तर, ‘‘मै कभी नहीं जाता जंगलमें!’’ 
आणखी एका आदिवासी तरुणाचे तेच उत्तर, ‘‘नहीं जाता जंगल मे, नहीं देखा कभी कोई जानवर.’’ 
आम्हाला आश्चर्य वाटले. सर्वच जण जंगलात जातात, हे माहिती होते. ही माणसे साफ खोटे बोलत होती. 

मग आमच्या ड्रायव्हरनेच सांगितले की, येथील लोक दोन्ही बाजूंना घाबरतात- नक्षली आणि पोलीस, दोन्हींना. चौकशीही दोन्हीकडून होते आणि त्रासही. त्यात आपण असे कारमध्ये फिरत आलेलो, अनोळखी लोक. ते का विश्वास ठेवतील आपल्यावर? त्यांचे बरोबरच होते. 

सोमनपल्ली गाव रस्त्यालगतच असून, विरळ जंगल दिसत होते. येथे कुठलाही वन्य प्राणी दिसण्याची शक्यता कमीच वाटत होती. तसेच आम्ही पुढे फरसेगडला निघालो. फरसेगड कधी सुरू झाले आणि कधी संपले, कळलेही नाही- इतके छोटे. आश्रमशाळा, पोर्टाकेबिनच्या इमारती आणि शेवटच्या टोकाला आमची रुग्णालयाची इमारत.  तिथे फिरताना एका पोलीस गार्डशी भेट झाली आणि त्याने स्वतः वनभैसा पाहिल्याचे सांगितले. 

वनभैसा स्वतः पाहिला म्हणणारी ही पहिलीच व्यक्ती भेटली होती. पोलिसांना सर्च ऑपरेशनसाठी जंगलात आतल्या भागात फिरावे लागते. तेव्हा त्यांनी साडमित्टापासून आणखी 15-20 किलोमीटरपुढील जंगलात तीन-चार वनभैसा पाहिल्याचे सांगितले. धीरजची त्यांना विचारण्याची घाई इतकी की- त्यात नर आणि मादी किती होते? त्याचे उत्तर, ‘‘वो नहीं हमे मालूम.’’ जंगलात जाणाऱ्या त्या बिचाऱ्या पोलिसाला जिवाची भीतीच इतकी असणार की, त्याने कधी इतके बारकाईने प्राण्याला पाहावे? ‘‘यहाँ का तालाब बहोत सुंदर है, आपको दिखाते है,’’ आमचे ड्रायव्हरकाका रस्ता सांगू लागले. त्यांच्या सुचनेनुसार जात आम्ही थेट सीआरपीएफच्या कॅम्पसमोर पोहोचलो. समोर गेटजवळ सीआरपीएफ जवान बंदुकीचा निशाणा साधून उभा होता. ‘गलतीसे हम यहाँ आये’ म्हणत आम्ही परतलो. संध्याकाळ झाली होती. उन्हे कमी झाल्याने पक्ष्यांचा चिवचिवाट वाढला होता. पुन्हा पक्षी पाहत, कार थांबवत-थांबवत आमचा कंपू कुटरूकडे परतला. 

कुटरू पंचशील आश्रमामध्ये अभिजीत आणि धीरजने मुलींशी छान गप्पा केल्या, गोष्टी सांगितल्या, पक्षी-प्राण्यांची माहिती दिली. काही महिन्यांपूर्वी मी आश्रमातील मुलींसाठी ‘मासिक पाळी’ विषयावर निबंध स्पर्धा आयोजित केल्या होत्या. त्याचे बक्षीसवाटप केले. रात्री आम्ही बिजापूरला परतलो. बिजापूरमध्ये साडमित्टा या गावातील एक महिला भेटली. तिला आम्ही गावात जाण्याबद्दल विचारले. सुरुवातीला भीतीपोटी काही न बोलणाऱ्या तिने मात्र नंतर आम्हाला गावात न जाण्याबद्दल विनवले. आतल्या लोकांचा होणारा त्रास, संशयावरून मारहाण करणे, गावात गेल्यावर त्यांना चिकन-दारू देणे, या सर्व गोष्टी तिथे सर्रास चालतात. गावातील अनेक तरुण-तरुणींना ते चळवळीत घेतात. आपली मुले त्यात जाऊ नयेत, म्हणून ही महिला बिजापूरमधेच राहते. 

आणखी कोणाकडून माहिती कळाली की, अशा भागात जायला आतल्या लोकांची आधी परवानगी घ्यावी लागते. इतकी सगळी नाटकं पाहून शेवटी आम्ही तिथे जायचा प्लॅन तूर्तास रद्द केला. यामध्ये जिवाची भीती किंवा नक्षल्यांची भीती हा भाग मुळीच नव्हता. कारण मी स्वतः डॉक्टर आहे आणि आरोग्य विभागातील कोणाही व्यक्तीला अतिसंवेदनशील गावातही कधीच कुठला त्रास होत नाही. नक्षली कधीच आरोग्य विभागातील माणसांना त्रास देत नाहीत, हे माहिती होते. परंतु स्वतःहून विनाकारण काही धाडस करायच्या हेतूने जंगलात जायचे आणि आपली काळजी करणाऱ्या माणसांना त्रास द्यायचा, हे मला नको वाटले. तसेच जंगलाच्या वाटेमध्ये अनेकदा IED पेरलेले असतात. परक्या माणसाला त्याची माहिती नसते. त्यामुळे प्लॅन रद्द करून टाकला. 

दोन दिवसांनी आमचा हेमलकसाला जायचा प्लॅन ठरला. भामरागड तालुक्यातील नेलगुंडा या अतिदुर्गम गावातील शाळेची जबाबदारी समर्थपणे पार पाडणारी, डॉ.प्रकाश आमटेंची सून समीक्षा आमटे मला दंतेवाड्याला भेटली आणि आम्ही एका भेटीत चांगल्या मैत्रिणी झालो. समीक्षाताईने हेमलकसाला यायचे आमंत्रण प्रेमाने दिलेच होते आणि मलाही तिथे जायची ओढ होतीच. धीरजसोबत जगदलपूरवरून माझे मित्र जीतसिंह आर्य आणि अन्झार नबी हे दोघे आले. नाश्ता करून आम्ही चौघे कुटरूला पोहोचलो. बिजापूरहून हेमलकसाला जायला दोन मार्ग आहेत. एक दूरचा मार्ग- बिजापूर-भोपालपट्टणम-अहेरी-भामरागड हा 300- 350 किलोमीटर पडतो. तर दुसरा कुटरूहून, इंद्रावती नदी डोंग्याने ओलांडून जाण्याचा मार्ग जवळ पडतो. परंतु हा रस्ता फक्त गावातील लोकांनाच व्यवस्थित ठावूक आहे आणि यावरून जास्त वर्दळ नसल्याने नवीन लोकांसाठी जायला अवघड आहे. 

कुटरूहून पुढे 20-22 किलोमीटरवर बेदरे हे गाव लागते. रस्ता प्रचंड खराब. त्यामुळे कारचा वेग कमी. त्यात जीत, अन्झार आणि धीरज यांची फोटोग्राफी चालू. त्यामुळे बेदरेला पोहोचायला उशीर झाला. आणखी पुढे जंगल रस्त्याने बाईकवरून जायचे होते, मदत मिळाली. कोणत्याही खेड्याबद्दल मला ही गोष्ट आवडते. तुम्ही खेड्यात कोणाकडेही जाऊन प्रेमाने मदत मागा, ती नक्कीच मिळते. पुढे अर्धा-पाऊण तास जंगलातील रस्त्याने गप्पा करत आम्ही जात होतो. अनेक ठिकाणी झाडे कापल्याने जंगल कमी होत चालले आहे. लोकांच्या सतत येण्या-जाण्याने वन्य प्राणी नाहीसेच झाले आहेत. रस्त्यात मृत माणसांची थडगी दिसत होती. येथे एक वेगळी प्रथा आहे. मृत माणसाच्या थडग्याजवळ त्या माणसाची खाट ठेवली  जाते. नव्या कपड्यांनी सजवली जाते. त्याशेजारी अन्न, पेये असे ठेवले जातात. लाकडाचे पक्षी, भैसा मुखवटा, एरोप्लेन असे काही तरी एक टोकन बनवून लावले जाते.

इंद्रावतीच्या किनारी पोहोचलो, तेव्हा उन्हे डोक्यावर आली होती. उन्हाळ्यामुळे एरवी दुथडी भरून वाहणारे पाणी बरेच कमी होऊन किनारा भव्य दिसत होता. रेती इतकी स्वच्छ, सफेद आणि मऊ की, समुद्रकिनाराच वाटतो. पाणीही नितळ सुंदर. आम्ही इकडच्या बाजूला वाट पाहत गप्पा करत होतो. आम्हाला सोडवायला आलेले गावकरी सांगत होते की, येथे दररोजच मोठ्या मगरी दिसतात. आज मात्र आम्हाला काही दिसल्या नाहीत. डोंग्याने नदी ओलांडून आम्ही गेलो. 

नेलगुंडाच्या शाळेत गेल्यावर समीक्षा आमटे आम्हाला फिरून शाळा दाखवत होत्या. मुले-मुली येऊन आपलेपणाने त्यांच्याशी गप्पा करत होत्या, त्याही इंग्लिशमध्ये. नेलगुंडाच्या या शाळेत इयत्ता पाचवी असून, एकूण 117 मुले-मुली आहेत आणि समीक्षाताई प्रत्येकाला नावाने ओळखते. पोरांचे सफाईदार इंग्लिश ऐकून आणि शाळेतील विविध प्रयोग पाहून आम्ही थक्क झालो. आनंदाने शाळेत बागडणारी मुले हे वेगळेच दृश्य होते. मुंबईहून वैभवी आलेली होती, जिने दोन ते तीन वर्षे मेहनत करून ही शाळा घडवण्यात मोठे योगदान दिले होते. सर्वांसोबत पंगत करत जेवून आम्ही हेमलकसाकडे निघालो. दगडा-मातीच्या अगदी खराब रस्त्यावरून समीक्षाताई तिची इसुझू कंपनीची गाडी आरामात चालवत होती. तिचे कौशल्य पाहून आम्ही चौघेही आश्चर्यचकित झालो. मी तर तिला म्हटले, ‘‘तू तोफ आहेस!’’ 

हेमलकसाला भेट हा आम्हा चौघांसाठीही प्रेरणादायी अनुभव ठरला. डॉ.प्रकाश आमटे आणि डॉ.मंदाकिनी आमटे यांना भेटणे हे स्वप्नवत्‌ होते. निस्सीम सेवाभावाने काम करत राहणे आणि एकमेकांना साथ देणे, असे हे दाम्पत्य. आचार-विचारात इतका साधेपणा की, त्यांच्यासमोर नुसते बसूनच मन कृतज्ञतेने शांत झाले. सर्व प्रश्न-शंका त्यांच्यासमोर मिथ्या वाटल्या. दोघेही अगत्याने आम्हा चौघांची चौकशी करत होते, त्यांचे अनुभव सांगत होते. डॉ.प्रकाशकाकांनी एक आठवण सांगितली. पूर्वी छत्तीसगडमध्ये स्वास्थ्य सुविधा नव्हत्या, तेव्हा छत्तीसगडहून अगदी जगदलपूरहूनही रुग्ण दोन दिवसांचा प्रवास करत हेमलकसाला उपचारांसाठी यायचे. (अजूनही कुटरू भागातील रुग्ण इंद्रावती ओलांडून हेमलकसाला येतात.) जगदलपूरचे जिल्हाधिकारी 20- 22 वर्षांपूर्वी स्वतः डोंग्याने इंद्रावती ओलांडून हेमलकसा पाहण्यासाठी आले की, आपले बस्तरचे रुग्ण नक्की कुठे जातात? त्यांना वाटले की, इतक्या दुर्गम भागात काम     करतात म्हणजे नक्कीच मिशनरी हॉस्पिटल असेल. परंतु डॉ.प्रकाशकाका आणि मंदाकिनीताईना भेटून जिल्हाधिकारी आश्चर्यचकित झाले. त्यांच्याकडे अस्वलाचे एक आजारी पिलू होते, तेही त्यांनी इकडे पाठवून दिले. 

गप्पांमध्ये कळाले की, डॉ. आमटे दाम्पत्य बिजापूरच्या सांड्रा भागात रुग्ण पाहण्यासाठी आले होते. तेव्हा आम्ही त्यांना वनभैसाबद्दल तत्काळ विचारले, तेव्हा डॉ. मंदातार्इंनी सांगितले की, त्या भागात सहा वनभैसे असल्याची माहिती आहे. त्यातील एक-दोन मादी व बाकी नर आहेत. वन विभागापेक्षाही खात्रीशीर माहिती देणारी ही पहिलीच व्यक्ती होती. अनिकेतदादा आजारी असल्याने समीक्षा त्यांची काळजी घेण्यात व्यग्र होती, तरीही वेळ काढून ती आम्हाला भेटत होती. डॉ. दिगंतदादा आणि डॉ.अनघा यांचीही भेट झाली. संध्याकाळी प्रकाशकाका आणि मंदाताई नातवंडांसोबत सायकलीने नदीकडे निघाले. आम्ही चौघेही गप्पा करत संगमाकडे निघालो. गेल्या काही दिवसांपासून मी अनेक प्रश्नांनी अस्वस्थ झाले होते. निराशेने मन घेरून गेले होते. पण आजच्या हेमलकसा भेटीने अनेक प्रश्न आपसूकच शांत झाले होते. (असेच आणखी एक प्रेमाचे ठिकाण गवसले होते, ते म्हणजे ‘आनंदवन’. काही दिवसांपूर्वी मी खास वेळ काढून, डॉ.विकास आमटे आणि डॉ.भारती आमटेंना भेटायला आनंदवनात गेले होते. माझे साधनातील लेख वाचून डॉ.भारतीतार्इं वेळोवेळी फोन करून मला प्रोत्साहन देत असतात. त्यांना प्रत्यक्ष भेटणे हा सुंदर अनुभव होता. डॉ. विकास आमटे आजारी असूनही त्यांनी दोन-तीन तास आमच्याशी दिलखुलास गप्पा केल्या होत्या. डॉ.भारतीतार्इंनी मला प्रेमाने जवळ बसवून आईसारखे लाड केले होते. असे निस्सीम-निर्भेळ प्रेम लाभणे, हा मी आयुष्यातील सर्वोच्च ठेवा मानते. अशी माणसे आपल्या साऱ्या अपुरेपणावर मायेचे पांघरूण घालतात आणि सारी अस्वस्थता शब्दांविना शांत होते.) 

आज हेमलकसातून परत येताना आम्ही चौघेही विचारात मग्न होतो. चौघेही भिन्न क्षेत्रांचे, तरीही प्रत्येकाला या भेटीत काही ना काही मौल्यवान गवसले होते. परतताना आम्ही बेदरेच्या अलीकडल्या किनाऱ्यावर पोहोचलो. येथे पाण्याची पातळी कमी असल्याने आम्ही चालतच इंद्रावती ओलांडली. एकूण तीन ते चार वेळा इंद्रावतीचा प्रवाह आम्हाला ओलांडावा लागला. एका ठिकाणी मांडीपर्यंत पाणी आल्याने कपडे भिजून गेले. बेदरेला पोहोचून आम्ही पोर्टाकेबिनमध्ये लावलेली कार काढली आणि कुटरूकडे निघालो. जेवण्यासाठी पंचशील आश्रमाकडे आपसूकच पाय वळले. मधुकररावांनी अगत्याने स्वागत केले. धीरजने मुलींना ग्रुपफोटो काढण्याचे प्रॉमिस केले होते. त्याचे ते काम चालू होते. काही मुलींनी उत्साहात हार्मोनियम, तबला आणून वाजवून दाखवला. सर्वांत बडबडी असणाऱ्या संध्याने गिटारवरती सारेगमाचे सूर म्हणून दाखवले. जगदलपूरचा मित्र जीतसिंह आर्य हा पर्यटनव्यवसायात आहे. मधुकररावांची अनेक दिवसांची इच्छा आहे की, मुलींची कुठे तरी दूर सहल घेऊन जावी. ती जबाबदारी जीतने घेण्याचे मान्य केले. मुलींनी गोड आवाजात गायलेली गोंडी गाणी ऐकून आमचा सामाजिक विषयांवर डॉक्युमेंटरी बनवणारा मित्र अन्झार नबी भारावून गेला. 

पुढच्या वेळी येऊन आपण छानपैकी गाणी शूट करू, असा त्याने मुलींसोबत प्लॅन बनवला. जिल्हाधिकारी डॉ.अय्याजसरांची बदली झाल्यापासून बिजापूरमध्ये नाराजीचा सूर पसरला आहे; परंतु असे मित्र भेटले की, माझ्याही स्वप्नांना नवे बळ मिळते. हजारो ख्वाहिशें ऐसी, के हर ख्वाहिश पे दम निकले बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले।

(मागील वर्षभर, महिन्यातून दोनदा याप्रमाणे प्रसिद्ध होत असलेली लेखमाला आता संपली आहे. एका डॉक्टर तरुणीने छत्तीसगढच्या आदिवासीबहुल प्रदेशात काम करताना आलेले अनुभव असे या लेखमालेचे स्वरूप होते. त्या भागातील जनतेच्या शारीरिक आरोग्याची स्थिती असा प्रारंभ झालेली लेखमाला क्रमाक्रमाने मानसिक, सामाजिक व सांस्कृतिक आरोग्यालाही भिडत गेली. त्यामुळे ती विशेष वाचकप्रिय ठरली. अशा या लेखमालेचे डॉक्युमेंटेशन होणे आवश्यक आहे, म्हणून जून महिन्यात ही लेखमाला पुस्तकरूपाने येत आहे.)
 

Tags: बिजापूर डायरी डॉ. ऐश्वर्या रेवडकर Ayeshwarya Revadkar Bijapur diary weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

डॉ. ऐश्वर्या रेवडकर,  बिजापूर (छत्तीसगड)
zerogravity8686@gmail.com


प्रतिक्रिया द्या