डिजिटल अर्काईव्ह (2013-2020)

राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही बिजापूर जिल्ह्यातील मुले झळकली आहेत. त्यात नक्षलींनी हत्या केलेल्या कुटुंबातील अतिदुर्गम भागातील मुलांचाही समावेश आहे. मार्शल आर्ट्स प्रशिक्षक भुवन नागे उत्साहाने सांगत होते की- माझा 17-18 वर्षांचा अनुभव देऊन मी या मुलांना प्रशिक्षित करतो आणि एक-दीड वर्षात मुले स्पर्धेसाठी पूर्ण तयार होतात, राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचतात. जुदोमध्ये राष्ट्रीय स्तरावर 50 च्या वर पदके मिळाली आहेत आणि राज्यस्तरावर तर 150-200 पदके मुला-मुलींनी मिळवली आहेत. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक मिळवलेल्या निशा दानम आणि भावना भगत या बिजापूर जिल्ह्यातील दोन मुलींना डॉ.अय्याजसरांनी लगेच मदतनीस कोच म्हणून अकादमीमध्ये रु.16000 पगारावर रुजू करून घेतले एरमनार या संवेदनशील गावातील संतोष कुडियम या 14 वर्षांच्या मुलाने साऊथ आफ्रिकेमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक मिळवले.                                                 

खेळ... तारुण्याची ऊर्जा. बिजापूरमध्ये पहाटे फिरायला निघाले किंवा संध्याकाळी बाहेर पडले की, मुख्य रस्त्याला अनेक शाळकरी पोरे-पोरी विविध खेळप्रकारांचे ड्रेस कोड घालून, पायांत खेळाचे मोजे-बूट घालून, घोळक्याने उत्साहात ग्राउंडकडे निघालेले दिसतात. काही ठरावीक वेळांना तर रस्ता या पोरा-पोरींनी ओसंडून वाहत असतो. कधी मिरवणूक निघालेली दिसते. कशाची आहे म्हणून पाहिले, तर राष्ट्रीय अथवा आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक मिळवलेल्या खेळाडूंचा मस्तपैकी हार घालून कौतुक सोहळा चाललेला असतो. बहुंताशी जिल्हाधिकारी, तसेच इतर शासकीय अधिकारी अशा वेळी उत्साहाने मुलांना शाबाशकी द्यायला हजर असतात. या सर्व खेळाला पूरक वातावरणनिर्मिती देण्याचे श्रेय डॉ.अय्याज तांबोळीसरांनी बिजापूरमध्ये जिल्हा खनिजनिधीच्या माध्यमातून सुरू केलेल्या ‘स्पोर्ट्स अकादमी’ला जाते.

नवी कोणीही व्यक्ती बिजापुरात येते, तेव्हा प्रशस्त क्रीडांगणे आणि विविध खेळांचा सराव, सुसज्ज जलतरण तलाव, बॅडमिंटनचे अद्ययावत कोर्ट, जुदोचा हॉल- इतका सगळा तामझाम पाहून आश्चर्यचकित होऊन जाते. या सर्वच गोष्टींमागे पूर्वीचे जिल्हाधिकारी डॉ.अय्याजसरांची खेळांना प्रोत्साहन देण्याची दूरदृष्टी व सौंदर्यदृष्टी पाहायला मिळते.  

संध्याकाळी विविध कार्यालयांतील अधिकारी, जिल्हा रुग्णालयाचे डॉक्टर्स येथे बॅडमिंटन खेळण्यासाठी रोज हजेरी लावतात. पोलीस डिपार्टमेंटमधून असलेले आणि सध्या खेळ अकादमीच्या दोन मुख्य प्रशिक्षकांपैकी एक- भुवन नागे त्यांची आठवण सांगतात. मूळचा छत्तीसगडच्या उत्तर भागामधील कांकेरचा असणारा, तीन विषयांतच- केलेला भुवन नागे 1997 पासून विविध वयोगटांतील मुलांना, तरुणांना जुदो-कराटेचे खासगी क्लासेसद्वारे प्रशिक्षण द्यायचा.

राष्ट्रीय स्तरावर 2005 मध्ये पदक मिळाले, तेव्हा भुवन जगदलपूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना भेटायला गेला आणि त्यांनी त्याला पोलीस डिपार्टमेंटमध्ये भरती करून घेतले. बिजापूर जिल्ह्यात नोकरी मिळाली, तेव्हा सुरुवातीला अतिदुर्गम भागात त्याचे पोस्टिंग होते. तिथे त्याचा व्यायाम, जुदोचा हुनर पाहून पोलीस अधिकाऱ्यांनी त्याला बिजापूर शहरात बदलून घेतले. पोलीस डिपार्टमेंटमध्ये फिजिकल ट्रेनर म्हणून काम करण्यासोबतच भुवन ‘जुदो असोसिएशन’तर्फे मुलांना मोफत प्रशिक्षण द्यायचा. स्वतःच्या खर्चातून अनेक लाखांची साधनसामग्री त्याने विकत घेतली होती. कधी गरज पडलीच तर स्वखर्चाने मुलांसाठी मार्शल आर्ट्ससाठीचे ड्रेसेस शिवून घेणे, मुलांच्या आहारासाठी खर्च करणे, हेही चालूच होते.

जुदो असोसिएशनचे संरक्षक जिल्हाधिकारी असून, पोलीस अधीक्षक हे अध्यक्ष असतात. पूर्वीच्या जिल्हाधिकाऱ्यांपासून खेळासाठी काही तरी करण्याच्या योजना बनत होत्या, परंतु प्रत्यक्षात उतरल्या नव्हत्या. डॉ.अय्याजसर 2017 मध्ये जिल्हाधिकारी असताना, बिजापूर जिल्ह्यातील सात मुले जुदो स्पर्धेसाठी निवडली गेली होती. त्यानिमित्त चर्चा करायला जिल्हाधिकारी कार्यालात भुवन गेला असताना सर्व अधिकारी विचारू लागले की, त्याला कशाकशाची गरज आहे? पोलीस HC पदापर्यंत पोहोचलेल्या भुवनने मग त्याच्या समस्या मांडल्या. तसेच सर्वांत मोठा प्रश्न म्हणजे मुलांच्या निकृष्ट आहाराबद्दलचा होता. तेव्हा डॉ.अय्याजसरांनी खेळ अकादमी सुरू करण्याची योजना मांडली आणि सर्वांना ती पसंत पडून ऑगस्ट 2017 पासून ‘बिजापूर खेळ अकादमी’ सुरू झाली.

संपूर्ण छत्तीसगडमध्ये जिल्हा खनिज निधीतून सुरू करण्यात आलेली अशा प्रकारची ही एकमेव खेळ अकादमी आहे. सुरुवातीला चार-पाच खेळ निवडण्याच्या विचारापासून सुरू झालेल्या अकादमीत सध्या आठ खेळ समाविष्ट आहेत. मुख्य दोन कोच पोलीस विभागाकडून भुवन नागे (मार्शल आर्ट्स) आणि लेबर डिपार्टमेंटकडून सोपान कर्णेवार (सॉफ्ट बॉल), सोबत पाच कोच आणि नऊ मदतनीस कोच. या सर्वात चार तरुणी आहेत. खेळांमध्ये जुदो, कराटे, सॉफ्टबॉल, फुटबॉल, व्हॉलिबॉल, आर्चरी, बॅडमिंटन, ॲथलेटिक्स यांचा समावेश होतो. प्रत्येकाच्या सरावासाठी स्वतंत्र क्रीडांगणे आहेत.

परीक्षा संपल्यानंतर बिजापूर जिल्ह्याच्या चार विकासखंडांत सूचना पाठवली जाते की- ज्या मुलांना खेळाची आवड आहे, त्यांनी प्रवेश घेण्यास यावे. पाचवी ते बारावी या वयोगटातील जमलेल्या मुलांतून शारीरिक तपासण्यांद्वारे निवड केली जाते आणि खेळ अकादमीतर्फे मुलांची राहण्या-खाण्याची सर्व सोय केली जाते. कपडे, खेळाचे सर्व साहित्य अकादमीतर्फे पुरवले जाते. मैदानावर चाललेले खेळ दाखविल्यास, मुलांना आवडीनुसार खेळ निवडायची मुभा असते, तसेच त्यांच्या शारीरिक ठेवणीनुसारही त्यांना खेळ सुचवले जातात. वर्षाअखेरीस मुलांचे खेळप्रावीण्य तपासण्यासाठी परीक्षाही घेतली जाते.

कधी खेळ आवडला नाही, तर काही मुलेही मधेच सोडून देतात. पुन्हा नव्या मुलांची पुढील वर्षी भरती केली जाते. मुला-मुलींची वसतिगृहे वेगवेगळी आहेत. मुला-मुलींचे जवळपास समप्रमाण आहे. अतिदुर्गम भागांतील अनेक मुले खेळ अकादमीमध्ये येतात आणि विशेष कामगिरी करूनही दाखवतात. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरही बिजापूर जिल्ह्यातील मुले झळकली आहेत. त्यात नक्षलींनी हत्या केलेल्या कुटुंबातील अतिदुर्गम भागातील मुलांचाही समावेश आहे.

मार्शल आर्ट्स प्रशिक्षक भुवन नागे उत्साहाने सांगत होते की- माझा 17-18 वर्षांचा अनुभव देऊन मी या मुलांना प्रशिक्षित करतो आणि एक-दीड वर्षात मुले स्पर्धेसाठी पूर्ण तयार होतात, राष्ट्रीय स्तरापर्यंत पोहोचतात. जुदोमध्ये राष्ट्रीय स्तरावर 50 च्या वर पदके मिळाली आहेत आणि राज्यस्तरावर तर 150-200 पदके मुला-मुलींनी मिळवली आहेत. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक मिळवलेल्या निशा दानम आणि भावना भगत या बिजापूर जिल्ह्यातील दोन मुलींना डॉ.अय्याजसरांनी लगेच मदतनीस कोच म्हणून अकादमीमध्ये रु.16000  पगारावर रुजू करून घेतले.

एरमनार या संवेदनशील गावातील संतोष कुडियम या 14 वर्षांच्या मुलाने साऊथ आफ्रिकेमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक मिळवले. अशा अनेक यशस्वी कहाण्यांसोबतच असंख्य समस्याही आहेत. अनेकदा मुलांना स्पर्धेसाठी घेऊन जाण्यास पुरेसा निधी नसतो, त्यामुळे फक्त निवडक मुलांनाच न्यावे लागते. अशावेळी संवेदनशील मनाच्या भुवनला वाईट वाटते की, बाकीची मुले खेळ पाहूच शकली नाहीत, तर शिकणार कशी? अनेक स्पर्धांमध्ये निधीअभावी भागच घेता येत नाही. मुलांच्या आहाराचा तक्ता बनवण्याचे काम त्याच्याकडे आले, तेव्हा त्याने राष्ट्रीयस्तरानुसार आहार तक्ता बनवला, ज्यानुसार एका मुलाच्या आहारासाठी प्रत्येक महिन्याला 5500 खर्च येतो. परंतु निधीच्या कमतरतेमुळे फक्त 1700 रुपयेच प्रतिमहिना प्रतिखेळाडू मिळतात. परिणामस्वरूप, अपुऱ्या पोषणामुळे मुलांची तब्येत उत्तम खेळाडूसारखी बनणे अशक्यप्राय होते. यावर भुवन एक किस्सा सांगतात-

एक मुलगा खूप मेहनत करत होता; त्यामुळे त्याचे सिक्स पॅक दिसू लागले. परंतु आहार अपुरा होता. त्याचा फोटो काढून भुवन यांनी व्हॉट्‌सअपवर टाकला की, आहाराअभावी मुलांची कशी स्थिती होते. परंतु लोकांनी अभिनंदन म्हणून मेसेज पाठवले. भुवन यांची कळकळ कोणाला समजलीच नाही. भुवन काही मुलांना स्वखर्चाने प्रोलिन पावडर, सत्तू पावडर पुरवतात. होलसेलमध्ये चणे विकत घेऊन पोरांना सरावादरम्यान खाऊ घालतात. मुलांच्या घरून खेळाला फारसा पाठिंबा नसतो.

खेळाडूंचे पासपोर्ट बनवणे हे दिव्य, प्रशिक्षक स्वतःच अधिकाऱ्यांच्या सहकार्याने पार पाडतात. अनेकदा चांगली खेळणारी मुलेही मधेच अकादमी सोडून गावी परतात, त्याचे प्रशिक्षकांना वाईट वाटते. यात मुलींचे प्रमाण जास्त आहे. कधी असेही होते की, राष्ट्रीय स्तरावर पदक मिळालेल्या मुलीला पुढच्या वर्षी तिचे कुटुंब काही कारणास्तव स्पर्धेला पाठवत नाही.

SAI (Sports Authority Of India) या संघटनेतर्फे पूर्ण भारतभर निवड होते. भुवन यांनी मुंबईमध्ये बिजापूर जिल्ह्यातील काही मुले पाठवली. त्यातील 6 मुलांची निवड झाली आणि 3 जणांना भरती करून घेतले गेले. अजूनही एक मुलगा तिथेच राहिला आहे. उरलेल्यांचा परत यायचा खर्च भुवन यांनीच केला.

अजूनही अविवाहित असलेल्या भुवन यांचे मार्शल आर्ट्‌स हेच  सर्वस्व आहे. दुसऱ्या जिल्ह्यातूनही मुले त्यांच्याकडे प्रशिक्षण घ्यायला येतात. त्यांना आणखी एका गोष्टीचे वाईट वाटते की, अकादमी बारावीपर्यंत आहे. त्याच्यानंतर अनेक खेळाडू मुले गावी निघून जातात. त्यामुळे मागील काही वर्षे त्या खेळाडूंवर घेतलेली मेहनत पुढे कामी येत नाही. खेळाडू सिनिअर गटात पदक मिळवतो, तेव्हा त्या पदाची किंमत जास्त असते, त्यामुळे नोकरीही मिळते; परंतु नेमक्या त्याच वयात मुले अकादमीतून बाहेर पडतात आणि मदतीच्या अभावी खेळ सोडून देतात. अशा मुलांसाठी काही तरी करण्याची भुवन यांची तळमळ आहे. भविष्यात अशा मुलांसाठी खासगी क्लबद्वारे प्रशिक्षण देता आले, तर सिनिअर वयोगटातही आंतरराष्ट्रीय स्तरावर पदक मिळवण्याची जिद्द ते बाळगून आहेत.

दुसरे मुख्य प्रशिक्षक सोपान कर्णेवार हे रायपूरचे असून, शाळेत असल्यापासून सॉफ्टबॉल खेळायचे. B.P.Ed. केल्यानंतर 2007 ते 2010 मध्ये पुण्याला सिम्बॉयोसिसला हॉटेल मॅनेजमेंट करत असताना, ते डेक्कन जिमखानाकडूनही खेळले. त्यांना 2013 मध्ये सॉफ्टबॉलमध्ये छत्तीसगड राज्यस्तरावर उत्कृष्ट खेळाडूचा सन्मान मिळाला. राष्ट्रीय स्तरावर 2015 मध्ये सुवर्णपदक मिळवल्यावर श्रमविभागामध्ये लेबर इन्स्पेक्टर पदावर नियुक्ती झाली. कुटुंबासोबत 2015 मध्ये बिजापुरात आल्यावर सुरुवातीला त्यांना कुठे येऊन पडलो, असे वाटले. खासगीमध्ये ते शाळेतील मुलांना व्हॉलिबॉलचे प्रशिक्षण देत असत, परंतु 2017 मध्ये खेळ अकादमी सुरू झाल्यावर मात्र त्यांना हुरूप आला. आत्तापर्यंत 45 खेळाडू सॉफ्टबॉलमध्ये राष्ट्रीय स्तरावर गेले असून, त्यांनी पदकही मिळवले आहे. राज्यस्तरावर तर 150 पर्यंत पदके मिळाली आहेत.

काही महिन्यांपूर्वी गंगालूर या अतिसंवेदनशील गावातील अरुणा आणि सुनीता या 14 वर्षे वयोगटाच्या दोन मुली आंतरराष्ट्रीय स्तरावर फिलिपाइन्समध्ये खेळल्या. सोपान हसून सांगतात की, या मुली तिथून आल्यापासून 2-3 महिने सतत विविध स्पर्धांमध्येच व्यग्र आहेत. आता शेवटी त्यांना परीक्षेचा अभ्यास करायला परत आणले. प्रशिक्षक सोपान हेही आहाराची मुख्य समस्या मांडतात की, खेळाडूच्या गरजेनुसार पुरेसा आहार मिळू शकत नाहीये. तसेच डॉ.अय्याजसरांच्या बदलीनंतर कदाचित निधी आणखी कमी होईल. सुट्ट्यांमध्ये मुले-मुली घरी गेली की दोनतीन महिने परतत नाहीत, त्यामुळे सरावात खंड पडतो.

आर्चरीसाठी मुख्य प्रशिक्षक दुर्गेश प्रतापसिंग हे जांझगीर येथील असून National Institute Of Sports तर्फे आलेले आहेत. त्यांचा मदतनीस प्रशिक्षक ललितकुमार तेलाम हा आदिवासी तरुण बिजापूरच्या तुमनार या लहानशा गावातील आहे. ललितकुमारने कुठल्याही मार्गदर्शनाशिवाय स्वतःच दोन-तीन वर्षे सराव केला आणि राज्यस्तरापर्यंत दोन वेळा पोहोचला होता. त्याचे कौशल्य व गोंडी भाषेचे ज्ञान याआधारे त्याला निवडण्यात आल्याचे तो सांगतो. पूर्वी तो MSF या स्वास्थ्यविषयक सामाजिक संस्थेमध्ये काम करत होता. परंतु ही स्पोर्ट्‌स अकादमी नव्याने सुरू होताच, खेळाच्या ध्यासाने त्याने ती नोकरी सोडून येथे फॉर्म भरला.

आर्चरीमध्ये आत्तापर्यंत बिजापूरच्या मुला-मुलींनी राज्यस्तरावर 10 वेळा सहभाग घेतला असून, 5 वेळा पदके मिळवली आहेत. सातवीमध्ये शिकणारी राणी माडवी ही आवापल्ली या अतिसंवेदनशील गावातील मुलगी देशपातळीवर पोहोचली आहे. ललितकुमार सांगत होता की, बऱ्याचदा शासनाकडून निधी मिळेपर्यंत स्पर्धेची तारीख येऊन ठेपते. अशा वेळी स्वतःच्याच खर्चाने मुलांना स्पर्धेसाठी न्यावे लागते. कधी चांगल्या गुणवत्तेचे साहित्य मिळत नाही, अपुरा आहार हीसुद्धा समस्या आहे. राणी आणि लक्ष्मी या दोन जुळ्या बहिणी माझ्यासमोरच बाण सपासप सोडून लक्ष्य वेधत होत्या. ‘दीदी-दीदी’ म्हणत मुली मला कौतुकाने सर्व सांगत होत्या की- कसे उभे राहायचे, तीर-कमान कसे पकडायचे, निशाणा कसा साधायचा.

एकदा सॉफ्टबॉल खेळणाऱ्या मुलींशी गप्पा मारताना मी सहज विचारले की, तुम्ही हा खेळ का खेळता? दोन लहान मुलींनी निरागसपणे उत्तर दिले की- ‘आम्हाला पुढे नोकरी मिळायला मदत होईल म्हणून.’ दोघींचे वडील वारले होते. एकीचे ताडीच्या झाडावरून खाली पडून, तर दुसरीचे अपघातमध्ये जागेवरच गेले. एकीचा भाऊ दारू पिऊन नुसता घरी पडून असतो. आईच मग मोलमजुरी करून कुटुंब पोसते.

रायपूरच्या शहरी मुलांपेक्षा बिजापूर जिल्ह्यातील मुलांमध्ये काय वेगळे वाटते, यावर त्यांनी हसत सांगितले की, येथील मुले-मुली 40 फेऱ्या मारल्या तरी दमत नाहीत. शहरी मुले मात्र तीन-चार फेऱ्यांतच दमून जातात. एक प्रश्न म्हणजे, येथील मुले बोलतच नाहीत; नुसते सहन करतात. खुलून काहीच बोलत नाहीत, समस्या सांगत नाहीत. त्यांना मोकळे वाटावे म्हणून सोपान त्यांच्या सॉफ्टबॉलच्या ग्रुपला (एकूण 60 सीट्‌स) महिन्यातून एकदा स्वतःच्या घरी जेवायला बोलावतात. कोंबडी आणून सर्व जण मिळून स्वयंपाक करतात. मुलांचे आवडीचे खाणेही होते आणि एकत्र गप्पा झाल्याने मुलेही रमतात. तसेच महिन्याच्या अखेरीस केक आणला जातो आणि त्या महिन्यात ज्यांचे वाढदिवस असतील, त्या सर्वांचा वाढदिवस एकत्र साजरा केला जातो.

‘बारावीनंतर पुढे काय?’ या प्रश्नावर सोपान यांनी त्यांच्या विचारानुसार उपाय शोधला होता. रायपूरच्या सरकारी महाविद्यालयात स्पोर्ट्‌स कोट्यातून या मुला-मुलींना भरती करून घेतले जाईल आणि त्यांचा खर्च काही अधिकारी उचलतील, असे त्यांचे प्लॅनिंग चालू आहे. एक डॉक्टर म्हणून माझा स्वाभाविक प्रश्न होता की, मासिक पाळीमध्ये मुली कशा खेळतात? यावरही सोपान यांनी पद्धत सुरू केली होती की, ज्या मुलीला त्रास होत असेल, तिने येऊन रजेसाठी अर्ज द्यायचा. मग तिला रोजच्या सरावातून सुट्टी दिली जाते. सुरुवातीला मुली सांगायच्या नाहीत; पण मग आम्ही मुलींना सूट द्यायला लागलो, तेव्हा त्या हळूहळू सांगू लागल्या. अशा आमच्या गप्पा रंगल्या असतानाच संध्याकाळ झाली होती. समोर सर्व खेळाडू रांगेत उभे होते. त्यात एक छोटुकली केक घेऊन आली. सर्वांनी मिळून तिला शुभेच्छा दिल्या, पाठीवर 15 धपके दिले. अकादमीतील अनेक मुला-मुलींचे डोक्यावरचे छत्रही हरवलेले आहे. अशांसाठी खेळ अकादमी त्यांचे कुटुंबही बनते आणि भविष्यात नोकरी मिळण्याची आशाही जागवते.

Tags: बिजापूर स्पोर्ट्स अकादमी ऐश्वर्या रेवडकर बिजापूर डायरी Bijapur Sports Academy Ayeshwarya Revadkar Bijapur Diary weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके

कर्तव्य

सर्व पहा