डिजिटल अर्काईव्ह (2014-2019)

माती जागवील त्याला मत (एका मतदाराचा जाहीरनामा)

राजकीय पक्ष व पुढारी अनेक हिकमत करीत असतात. जनतेला जनार्दन म्हणणे ही अशीच एक हिकमत आहे. काही थोडे अपवाद वगळले, तर बहुतेक पुढाऱ्यांचा यावर विश्वास नसतो. सामान्य मतदाराला झुलविण्याचा तो एक डाव असतो, आणि आपल्या देशातील मतदारही या शाब्दिक पूजेवर संतुष्ट असतो. राजकीय पक्षांचा व पुढाऱ्यांचा धूर्तपणा त्याला समजत नाही, असे नाही. पण तो बिचारा स्वत:च्या जीवनकलहात इतका गुरफटलेला असतो, की या दंभावर प्रहार करण्याइतकी त्याला फुरसत नसते. याचा परिणाम असा होतो की, राजकीय पक्षांना असे वाटू लागते की, शब्दांनी आपण या मतदाराला जिंकून टाकू. म्हणून निवडणुका आल्या की, आश्वासनांची खैरात करणारे लंबेचौडे जाहीरनामे वेगवेगळे राजकीय पक्ष प्रसिद्ध करतात. या जाहीरनाम्यांत सद्य:स्थितीचे विश्लेषण केलेले असते, ही परिस्थिती आपण सुधारून दाखवू, अशी दर्पोक्ती असते आणि ‘स्व’ला केंद्र कल्पून भविष्यकालाचे लोभसवाणे चित्र रेखाटलेले असते. हे जाहीरनामे फारसे कोणी वाचीत नाही, वाचले तरी कोणी त्याची गंभीर दखल घेत नाही. 
यदुनाथ थत्ते, (प्रस्तावनेतून) 
 

मी एक मतदार
 
समुद्राच्या आयुष्यात जशी ओहोटी 
तसे राष्ट्राच्या आयुष्यात असे क्षीण क्षण येतात 
पण ओहोटीने काही समुद्र सरत नाही 
आणि ज्याने शतकांचे पराभव पचवले आहेत 
ते राष्ट्र क्षणांच्या आघातांनी मरत नाही 
त्याच ओहोटीच्या पोटात 
भरतीची गर्जिते काळाने ऐकिली 
पुनश्च एक महाभारत 
घडत असलेले त्याने पाहिले 
या महाभारतात पांडव आहेत 
आणि कौरवही आहेत 
पण ते एकशेपाच होऊन लढू शकतात 
हे त्याला दिसले 
शत्रूंचे संपूर्ण आडाखे उधळून लावीत 
हा अजस्र विविधतांचा देश 
एक झाला 
पराभवात व मग विजयातही. 

प्राचीन भारतीय गणतंत्रावर 
हे पाश्चात्य जनतंत्राचे कलम बांधण्यात आले आहे 
मूळ शाखा जिवंत आणि जातिवंत आहे 
तिच्या नसानसांतून चिवट जीवनरस वाहतो आहे  
जेथे पंचायतीतला हुक्का पिणारा 
गरिबातला गरीब माणूस 
गावाचा कारभार पाहत आला आहे. 

शाही लोकांना गावाच्या शिवेवरच थोपवून ठेवण्यात त्याने यश मिळवले होते. हा माणूस अडाणी आहे अशी बोलवा आहे परंतु त्याच्या सामूहिक निर्णयांनी या लोकशाहीला खवळलेल्या सागरातील एखाद्या उंच, अभेद्य बेटासारखे स्थैर्य दिले आहे. आणि तिच्या प्रगतीची प्रक्रिया चीड आणण्याइतकी धीमी असली तरी तिच्या अभिजात शहाणपणावर पुन्हा एकदा काळाचे शिक्कामोर्तब होत आहे.

अंतिम लढ्याचे पडघम्‌
हुकूमशाही आणि लोकशाही यांतले निकराचे अंतिम युद्ध या देशाच्या सीमेवर आणि सीमेच्या आतही लढले जाणार आहे. हुकूमशाही विरुद्ध लोकशाही म्हणजे व्यक्तीच्या अहंकाराविरुद्ध समष्टीचा जीवनसत्यांचा लढा. अतृप्त, स्फोटक मनांचे झुंडतंत्र म्हणजे हुकूमशाही. तृप्त, तुष्ट मनांची विविधरंगी एकात्मता म्हणजे लोकशाही हुकूमशाहीत कारस्थाने राज्यपद्धती ठरवीत असतात आणि कारस्थानांचे नाते क्रौर्याशी असते, शौर्याशी नसते. अजून अंधारातून सूर्योदयाकडे वाटचाल करीत असलेल्या मागासलेल्या पूर्व गोलार्धातील रंगीत राष्ट्रांच्या आशा-आकांक्षांचा दीपस्तंभ या द्वीपकल्पावरच खडा राहणार आहे कारण अमेरिकेची स्वातंत्र्यदेवता लोकशाहीची रखवालदार म्हणवीत असली तरी खुद्द तेथे शाही लोकांची लोकशाहीच आहे तेथे करोडपतीच अध्यक्षपदाची निवडणूक लढवू शकतो. सामान्य माणसांचे राज्य पाहण्याचा प्रसंग आला तरी या उदयोन्मुख लोकशक्तींना भारतातच यावे लागेल आणि म्हणूनच भारतही उद्याच्या लोकशाह्यांची काशी, रो व मक्का ठरणार आहे. पण जगातल्या या सर्वांत मोठ्या लोकशाहीचे मूल्य जगातल्या प्रतिष्ठित लोकशाह्यांना आकळले नाही ज्या पारड्यात ती जाईल ते जगाला पेलणार नाही इतके जड होईल हा इतिहासाचा संकेत रुज पेंट जपणाऱ्या या पाश्चात्य बायांनी ओळखलेला नाही. 

वर्तानाच्या शिल्पकारांनो! माझ्या कर्णधारांनो!! 
पक्षापपक्षांबद्दल तुच्छतेने बोलण्याची आंबलेल्या अकर्मण्यांची व वैफल्यग्रस्त दांभिकांची एक जमात, एक पद्धत आणि एक फॅशन आहे ती मला अभिप्रेत नाही पक्षीय राजनीतेचे मानसशास्त्र आतून व बाहेरून मी अनुभवले आहे अभ्यासले आहे लोकशाहीतला नागरिक जागरूक पाहिजे कारण तोच मतांचे दाणे टाकून या पक्षांचे पोषण करीत असतो. लोकशाहीत अशा प्रयोगशील तत्त्वचिंतकांचा वर्ग वाढायला हवा असतो जे फक्त वादळ येणार म्हणून भयानक भाकिते वर्तवणार नाहीत तर वादळातून नौका सुखरूप कशी न्यावी याचा विचार-आणि आचारही देतील.  

सत्तास्थानांपासून दूर राहूनही जे सत्तेच्या उपयोगाला दिशा देऊ शकतील समाजपुरुषाच्या नाडीचा प्रत्येक ठोका ऐकून जे त्याच्या रोगांचे यथार्थ निदान करू शकतील आणि जीवनसत्त्वांचे नवेनवे प्रवाह त्यांच्या मज्जाकेंद्रांत टोचीत राहतील अज्ञान व दारिद्र्य यांविरुद्ध लढण्याचा उद्‌घोष प्रत्येक निवडणुकीत, प्रत्येक पक्षाचा जाहीरनामा करीत आला आहे आणि आता त्याला हास्यास्पद वल्गनांचे रूप प्राप्त झाले आहे दैनंदिन वास्तवाचे चटके दिवसेंदिवस प्रखर होत आहेत आणि नुसत्या शब्दांची ही झड निकामी ठरू लागली आहे मोठे प्रश्न हाताळायची कुवत नसली म्हणजे छोट्या प्रश्नांद्वारे रणे माजवून निवडणुकीचा तवा तापवण्याची पाळी येते आणि वैफल्याची पोकळी आत असली की बाह्य आवाजीने ती झाकण्याचा प्रयत्न होतो विरोधकांच्या व्यासपीठांवरील श्रवणीय व रोांचकारी भाषणांतही उपरोध म्हणजे अभावात्म सत्य (निगेटिव्ह ट्रूथ) ते भाषण ऐकताना मला फार बरे वाटते पण उद्या तुम्हाला या जागी ठेवले तर तुम्ही दुसरे काय करणार? असा प्रश्न माझ्या भारावलेल्या मनात डोकावतो आणि मग तुची एकमेकांतली भांडणे (डावे अधिक डाव्यांशी, उजवे अधिक उजव्यांशी व सगळे एकमेकांशी) तुची ही अध:पतने हेवेदावे व क्षुद्रता यांच्या चिखलात लडबडलेले तुचेही पाय दिसतात! आणि तुम्ही व आम्ही यांतला अंधाराचा अंतर्पट अधिक दाट होतो.

‘ट्रोजन’चे लाकडी घोडे! 
‘जनसंघ’ हा भारतीय राजकारणातील एक मोठा ‘ट्रोजन हॉर्स‘ आहे! ‘स्वतंत्र’ हा दुसरा!! या लोकशाहीतल्या लाकडी घोड्यांच्या पोटांत मध्ययुगीन सरंजामदारांची व संस्कृतीच्या तथाकथित मिरासदारांची सेना दडलेली आहे! एका ‘चक्रवर्ती राजा’भोवती गोळा झालेल्या राजेरजवाड्यांचा आणि स्वत:चे कोणतेच तंत्र नसलेला हा ‘स्वतंत्र’ पक्ष आहे! हुतूरीच्या ढासळणाऱ्या बुरुजावर उभे राहून ज्यांनी मतस्वातंत्र्य नाकारले होते तेच आता आपल्या भरजरी झोळ्या पसरून स्वातंत्र्यासाठी मत मागत आहेत हा इतिहासाने केलेला उपरोध आणि काळाने घेतलेला सूड आहे! आणि संस्कृतीची घटपट पाठ असलेल्या अवतारी महंतांचा बौद्धिकांचे डोस प्यालेला तो घोडा! सांघिक कवायत व दसऱ्याचे शस्त्रपूजन यांनी आपल्याभोवती गर्दी जमवील पण त्या गर्दीला रामरामी आणि ध्वजप्रणाम या पलीकडे तो काही देऊ शकणार नाही. गतीच्या युगात ही अगतिक वाहने टिकणार नाहीत. जगन्नाथाचा महारथ त्यांना ओढता येणार नाही केसरी उपरणे व भगवा फेटा अणुयुगात फडफडणार नाही जेटच्या गतीत त्यांच्या चिंध्या होतील. पुराणातील वांग्यांचे भरीत भुकेल्या पोटांच्या कामी पडत नाही. आणि गर्दी जमवणारा सांस्कृतिक कार्यक्रमाचा डमरू फार काळ ती थोपवून ठेवू शकत नाही या कार्यक्रमांनी मनोरंजन होते जीवन-मरणाचे प्रश्न सुटत नाहीत आणि त्यांचे अश्मीभूत पुरातन आदर्श वस्तुसंग्रहालयाच्या उपयोगाचे पण जीवनाला अनुपयुक्त आहेत. ऐतिहासिक अहंकारांची गाडलेली हाडे उकरून इतिहास जागा ठेवता येत नाही. वर्तानाची आव्हाने स्वीकारल्यानंतरच नवा इतिहास घडत असतो भूक हे भारतीय वर्तानाचे खडे आव्हान आहे आणि भारताचा इतिहास त्याचे उत्तर देऊ शकत नाही!

काही विदूषक, काही जिवाणू!
कोणत्या राष्ट्रवादी, पुरोगामी पक्षांनी स्वराज्यानंतर जन्मलेली ही पिढी पकडण्याचा योजनाबद्ध प्रयत्न केला आहे? धर्मनिष्ठा व राष्ट्रनिष्ठा यांतले संतुलन तिला कोण शिकवणार आहे? केनेडीच्या कॅथॉलिकांची निष्ठा काही इटाली व रोमध्ये नाही मुसलमानांनी खुशाल हजला जावे आणि पश्चिमेकडे तोंड करून नमाज पढावा पण त्यांच्या निष्ठेचे तोंड भलतीकडे वळवलेले असण्याची गरज नाही हे या मुलाला कोण सांगणार आहे? ते सांगण्याची कोणती यंत्रणा आपल्याजवळ आहे? त्यांच्या मदरशातून अजून त्याच पोथ्या आहेत आणि त्यांच्या बालकमंदिरात अजून पाकिस्तानातल्या बालकमंदिरांची पुस्तके चालतात! त्यांच्यावर संस्कार करण्यासाठी ‘चिल्ड्रन्स ट्रस्ट’ने किती पुस्तके काढलीत? का ती या देशातली नाहीत? अल्पसंख्यांतले हे बहुसंख्य कल्पना करवणार नाही एवढ्या मध्ययुगीन अंधारात आणि दारिद्र्याच्या कुबट कोंदाटीत खितपत पडलेले आहेत त्यांच्या हालअपेष्टांचे सर्वेक्षण कुणी केले आहे? त्यांच्या सर्व सामाजिक प्रेरणा अल्पसंख्यत्वाच्या गंडाने (मायनॉरिटी कॉम्प्लेक्स) विकृत झालेल्या आम्ही ठेवल्या आहेत म्हणून पिझो व मिझोसारखे त्यांचेही मन परदेशवासी आहे मुस्लिम जनतेत आर्थिक कार्यक्रम घेऊन जाणे हा तिच्या प्रतिगामित्वावरील खरा उपाय आहे आणि पुरोगामी शक्तींपुढे हे केवढे काम आहे! 

वटवाघळे
बिचारा मार्क्स! या वाटेवर आपल्यालाही उलथेपालथे होऊन लोंबकळत राहावे लागेल हे तेव्हा त्याच्या ध्यानात आले नाही. त्याचे परवाचे तत्त्वज्ञान हे कालचे व्यवहारज्ञान आणि आजचे अज्ञान ठरले आहे! आपल्या जाहीरनाम्यात मोठ्या आत्मविश्वासाने त्याने उद्‌घोषिले होतेवुइ र्  शॅल हॅव ॲन असोसिएशन इन वुईच द फ्री डेव्हलपमेंट ऑफ इच इज द कंडिशन ऑफ फ्री डेव्हलपमेंट ऑफ ऑल! - आपण असा समूह निर्माण करू या ज्यात प्रत्येकाचा स्वायत्त विकास ही सर्वांच्या स्वतंत्र विकासाची शर्त असेल! मार्क्सची भरारी सरळ, पण दर्शन उलटे होते, इतिहासाने त्याच्याही प्रेषितत्वाला चकवले. त्याचे साध्य आणि साधन यांची उलटापालट झाली आणि याच्या प्रेषितत्वाचे वटवाघूळ कारखान्याच्या वाटेने जाणाऱ्या विजेच्या तारांवर थिजून लोंबकळू लागले! सामाजिक न्यायाचा तो मसीहा सामूहिक अन्यायाचा पैगंबर ठरला! त्याच्या अनुयायांनी त्याचे प्रेषितत्व खरे ठरवून  त्याची सर्व भाकिते टरफलासहित चावून फस्त केली. साम्यवाद, आजच्या जगाच्या समस्या सोडवू शकत नाही समस्या सोडवण्याऐवजी तो समस्या निर्माण करतो! गरीब राष्ट्रांना हवे असते भाकरीचे तंत्र त्याऐवजी क्रांतीचे तंत्र तो निर्यात करतो! आणि सिद्धान्तांची अफू पाजून नग्न स्वार्थांची सुंदोपसुंदी तो सुरू करतो. समाज बदलण्यासाठी काळपुरुषाची ती एक शस्त्रक्रिया ठरण्याऐवजी बदलत्या समाजाचे ते एक दुखणे ठरले आहे! तथापि जीवनाचा सुसंवाद सर्व वादांना कवेत घेऊन पुढे चालला आहे. झाकलेली लाल मूठ उघडी पडत आहे आणि समृद्धीच्या खजिन्याची चावी त्या रक्तलांछित मुठीत बंद असल्याचा भरवसा वाटणारे निराश होत चालले आहेत. भांडवलशाहीचे वस्त्रहरण करण्याच्या जिद्दीने ही मूठ आवळलेल्या देशांना भांडवलशाही देशांच्या गव्हावर जगावे लागत आहे आणि माओचे महान उड्डाण ही लाल सरड्याची कुंपणापर्यंतची धाव ठरली आहे! अस्वलाने केलेल्या गुदगुल्यांचा आनंद अखेर जीव घेणारा ठरतो आणि ड्रॅगनच्या शाबासकीची थाप ही अखेर ‘थाप’च ठरते हे अजाण, पोरसवदा राष्ट्रांना कळू लागले आहे. वैफल्याने वेढलेले माथे विद्वेषाने भडकते महत्त्वाकांक्षेने ताणलेले मज्जातंतू निराशांनी तुटतात आणि माणूस वेडाच्या सीमेवरून वाटचाल करू लागतो. या वेड्यापीराला कोणाचेही सोयरसुतक व कशाचेही लागेबंधे नसतात. त्याचा क्रोध व त्याची भीती वाटेल ते घडवून आणू शकतात. कोणत्याही क्षणी तो स्फोटाची कळ दाबू शकतो. हा चवताळलेला हिंस्त्र शेवटी मरतो पण मरता मरता तो इतरांना मारीत सुटतो! माओच्या मनाचा हा रोग ओळखला पाहिजे आणि लेनिनच्या भाकिताप्रमाणे मास्को-पेकिंग-कलकत्तामार्गे न्यूयॉर्कपर्यंत जाणाऱ्या क्रांतीला कलकत्त्यापर्यंत आणून पोचवण्याच्या प्रयत्नात असलेल्या भारतीय साम्यवाद्यांची वेळीच दखल घेतली पाहिजेत्य ांना वाळीत टाकणे हा या रोगावरील उपचार नव्हे आणि आता ते एखाद्या कुत्र्यासारखे लाचार व कमजोरही राहिलेले नाहीत की ज्याला ‘पिसाळलेला व बेईान’ अशी नावे ठेवून गोळी घालता येईल! कुठल्याही शक्तीची उपेक्षा घातक असते. लहानशा गोष्टीसाठीही सर्वस्व पणाला लावणे हे कम्युनिस्टांचे वैशिष्ट्य आहे तळहातावर शिर घेऊन निघण्याचे साहस हे त्यांचे सामर्थ्य आहे. एकदम बाजी लावून, आणि ठाण मांडून बसण्याची जिद्द त्यांच्याजवळ आहे. पण ते आपल्या अघोरी तंत्रमंत्रांचे गुलाम झालेले आहेत! त्यांना या गुलामीतून वर येण्याची संधी या महान राष्ट्राने उपलब्ध करून दिली पाहिजे  आज त्यांना घाई आहे राम्याच्या घरातले घेऊन सोम्या व गोम्याच्या घरांत टाकण्याची, एकाचे नेसते काढून, तिघांचा नागवेणा झाकण्याची. पण कोठे तरी एका कोपऱ्यात त्यांना कळून येऊ द्या- की या वाटणीने अखेर तिघेही उपाशी आणि सर्वच नग्न राहणार आहेत! 

पंख तुटके प्रकाश-पक्षी 
दिवाभीते व वटवाघळे ही रात्रीची प्रजा आहे अंधारातून अंधाराकडे जाणारे त्यांचे मार्ग असतात. आणि त्यांचे मार्गक्रमण नव्या पहाटेला पाठमोरे असते पण उगवत्या सूर्याचे उत्कंठ स्वागत करणारे काही प्रकाशपूजक पक्षी असतात सूर्याचे दर्शन आधी त्यांना होते नव्याने फाकणाऱ्या प्रेरणांचा स्पर्श आधी त्यांच्या पंखांना होतो आणि त्यांच्याच स्पंदनांनी जीवनाला प्रत्येक नवी जाग येत असते. पण प्रकाशाच्या या राजदूतांनाही अहंकाराची बाधा आणि यादवीचा शाप असतो जेव्हा प्रकाशाचा वेध घेण्याच्या घाईत ते एकमेकांशी भांडू लागतात एकमेकांचे पंख छाटून टाकतात तेव्हा सूर्याचा चेहरा काळवंडतो जीवन गोंधळून थबकते आणि दिवाभीते आपल्या ढोल्यांतून डोळे मिचकावू लागतात! समाजवाद हा जीवनाचा नूतन प्रकाश होता तो प्रथम पाहणाऱ्या युगाच्या राजदूतांनो, तुम्ही जीवनाची अपेक्षा पूर्ण केली नाही उदयोन्मुख समाजवादाचा संदेश तुम्ही प्रथम ऐकला व ऐकवला पण समाजवाद तुम्हाला जगता आला नाही आणि समाज करून जगण्यासाठी हवे असलेले गुण तुम्हांला अंगी बाणवता आले नाहीत त्यामुळे प्रजा एकीकडे, समाजवादी दुसरीकडे आणि पक्ष तिसरीकडे अशी तुची स्थिती झाली आहे! तुच्याजवळ तपस्या आहे मानवतेची ऊब आहे उन्मुक्त मन आहे बुद्धीची झेप आहे खालच्या व मधल्या थरांतून वर आलेले तुचे नेतृत्व आहे त्याला व्यापक समज आहे सत्तारूढांच्या नेतृत्वाला तुल्यबळ आणि त्यांच्या गुरूस्थानी शोभणारे प्रतिभेचे महामेरू तुच्याजवळ आहेत. तथापि आपल्या उंचीची अंधारी तुच्याही डोळ्यांवर आली आणि इतरांवरील राग परस्परांवर काढण्याची गल्लत तिच्यामुळे झाली! 

म्हातारा फिनिक्स 
या महावृक्षाची पाळेुळे स्वातंत्र्ययुद्धाच्या परंपरेने जनमनात दूरवर, खोलवर पोचली आहेत पण स्वार्थाच्या दलदलीत ही मुळे कुजत चालली आहेत अकर्मण्यतेची कीड बुंधा पोखरीत आहे बांडगुळांनी त्याच्या जीवनरसाचे शोषण चालवले आहे वारसा-हक्काचा कलकलाट त्यांच्या अंगाखांद्यावर बसून चालला आहे. आणि ज्यांनी आजवर त्याची फळे खाल्ली तेच आता त्यांच्या फांद्या छाटायला निघाले आहेत! कधी काळी या महासंघटनेचे हात बळकट करणारेच तिच्या प्रगतीचे पाय घट्ट धरून ठेवीत आहेत  परिस्थिती कशीबशी काबूत ठेवण्यापुरते आणि ढकलगाडा चालू ठेवण्यापुरते तिचे कर्तृत्व दिसते मते मिळवणारी यंत्रणा तिच्याजवळ आहे पण रखडणाऱ्या परिस्थितीला अणु-युगातील गती देणारी ताकदवान इंजिने तिच्याजवळ नाहीत. विशाल मानवी समुहांचा उत्साह आणि सर्जनशक्ती निश्चित दिशांनी गतिमान करणारे दुसऱ्या व तिसऱ्या पातळीचे नेतृत्व तिने तयार केलेले नाही. त्यामुळे क्रांतिकारी परिवर्तनाऐवजी दबून केलेल्या गौण सुधारणांवर तिला समाधान मानून घ्यावे लागते. जेथे कठोर निर्णय अनिवार्य तेथेही तिला तडजोड स्वीकारावी लागत आहे आणि आपल्याच गोटांतल्या लढाया निस्तरण्यात तिची ताकद आणि वेळ खर्च होत असतो. 
 

रेतीचे बांध
विनोबांच्या माणसांचा थकवाही कमालीच्या बाहेर आहे ज्यांना पायताणांची फिकीर नाही आणि सुपारीच्या खांडाचे व्यसन नाही असे हे हजारो हजार परिव्राजक देशभर खेडोपाडी जागवीत फिरत आहेत हे चित्र किती वेधक आणि प्रेरक असावे! तथापि ही प्रेरणा आपला प्रभाव व वेध हरवून बसली आहे भूदानमूलक अहिंसक क्रांतीचा अग्रदूत बिहारच्या भूीत ग्रामदान तुफानाचे नेतृत्व करण्यासाठी स्वत: हजर असताना पाटणा पेटवले जाते आणि गावागावात शिरलेला दुष्काळ चुकतो तो जॉन्सनच्या गव्हाने व स्पेशल मालगाड्यांनीच गेली पंधरा वर्षे वातावरण तयार होतच आहे तथापि त्याने भारतीय मनाची पोकळी वाढवण्याचेच काम केले आहे नुसते वातावरण तयार करून भागत नाही वातावरणावर मात करणारे मन तयार करणे हे खरे काम आहे निर्मितीच्या कोवळ्या उन्हात या कुडकुडणाऱ्या मनाला ऊब देण्याचे कार्यक्रम हे आंदोलन देऊ शकले नाही त्याने माणसाच्या मनोवृत्तीबद्दल काही सरधोपट बाळबोध गृहिते मांडली आणि त्यावर प्रमेयांची एक सुटसुटीत उतरंड उभारून प्रवचनांच्या माऱ्यांनी आणि कागदी प्रतिज्ञालेखांनी जग सुधारण्याची आशा बाळगली संतांना संतांचेच मन समजते काय? आणि आत्मतुष्टीची नशा त्यांच्याही मन:स्वास्थ्यासाठी हवी असते काय? 

माती जागवील त्याला मत 
या पोकळीतही मला उदंड आशा वाटते. या भूीत प्रचंड शक्तीचा झोपलेला सागर मी पाहतो. तिच्याजवळ तिच्या आदिम परंपरेचा सारा वारसा कायम असूनही नव्याचे स्वागत करायला ती उत्सुक आहे. तिची उद्यमशीलता मेलेली नाही हे पाकशी झालेल्या युद्धात दिसून आलेले आहे. शेकडो मुलकी ट्रक-चालकांनी मृत्यूच्या जबड्यातून सैन्यसामग्री वाहण्याचे काम अहोरात्र केले. आणि कारागिरांनी या वाहनांच्या विनामूल्य दुरुस्तीसाठी आपली वर्कशॉप्स स्वयंस्फूर्तीने सरहद्दीलगत थाटली. गृहिणींनी रणांगणावर सैनिकांपर्यंत जेवण पोचते केले. कोणता इतिहास हे विसरू शकणार आहे?  

आणि जो विशीपंचविशीचा जवान युद्धात अहमहमिकेने मरायला तयार आहे तो काम करायला तयार नाही हे पटत नाही. जवानांना उत्स्फूर्त करणारे नेतृत्व लाभले आणि त्यांना रणगाड्यांच्या लोंढ्याशी टक्कर घेण्याची ताकद आली. तसे किसानांना उत्स्फूर्त करणारे कृतिशील नेतृत्व मिळाले तर तेही या देशात ठाण मांडून बसलेल्या दुर्भिक्ष्याला यशस्वी टक्कर देऊन सीमेपल्याड हाकलतील! या भूमित कटूता व विद्वेष कायम टिकत नाही. वंशच्छेदाचे वा धर्मच्छेदाचे पाप या भूीच्या रक्तात नाही. जनमनात दडलेली शुभेच्छा व सुजनता आहे. ह्या सर्व ताकदींना वर उचलून रस्ता दाखवायचा आहे. तो दिसला तर वाटचाल करणारे पाय आपोआप पुढे सरसावतील आणि भेडसावणारे हे दिवस नाहीसे होतील जणू कधी नव्हतेच! भारतीय पक्षनेतृत्व ही ऐतिहासिक कामगिरी बजावू शकेल असा माझा विश्वास आहे. भारताच्या लोकशक्तीचे हे सर्व उचंबळणारे प्रवाह आहेत आणि प्रवाह हा नेहमीच पुरोगामी असतो. पुरोगामीत्वाचा गुणधर्म हा वर चिकटवलेल्या, लाल-पिवळ्या लेबलांवर अवलंबून नाही प्रत्येक पक्षातल्या व्यक्तिघटकांबरोबर त्याचे मनही बदलत आहे हे लेबलांचे राजकारणही या निवडणुकीत टरकावले जाणार आहे प्रत्येक लढाऊ पक्षाला एक राखीव सेना लागते जनसंघाचा संघ, काँग्रेस व समाजवाद्यांची सेवादले विभिन्न पक्षांच्या मजूर व युवक संघटना या सर्व राखीव सेनाच आहेत! तथापि आतापर्यंत प्रत्येकाचा जोर या रिक्रुटांची मने व मते बदलण्यावर होता हातांकडे कुणाचेही लक्ष नव्हते! मतपेटीशी प्रियाराधन करण्याऱ्यांनी मातीवर धुंद प्रे कधी केलेच नाही! त्यांना राष्ट्रीय पातळीवर तशी संधीच मिळालेली नाही कारण राजकीय परिस्थिती इतकी परिपक्व नव्हती जेते विजयाच्या नशेत आणि पराजित प्रतिक्रियांनी पछाडलेले होते!

या प्रतिक्रियांच्या कोलाहलातून भारताचे राजकीय मन आता कोठे अंतर्मुख होत आहे. ही निवडणूक त्यांना आणखी अंतर्मुख व्हायला लावणार आहे. बहुपक्षीय लोकशाहीचा एक अभिनव प्रयोग निसर्गक्रमाने उत्पन्न होऊन देशात चाललेला आहे. तो कायदेंडळातून कर्मभूीपर्यंत उतरवण्याची तयारी आता करावी लागणार आहे. सीमांच्या संरक्षणासाठी जर सर्वपक्षीय समान कार्यक्रम असू शकतो तर भुकेशी लढण्यासाठी एक समांतर कार्यक्रम का असू नये? सर्व उपलब्ध शस्त्रास्त्रांनिशी या सामान्य शत्रूविरुद्ध एक सर्वपक्षीय मोर्चा कसा उभारता येईल? या प्रश्नाचे उत्तर पुढल्या पाच वर्षांना द्यावे लागणार आहे. 

(1967 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी बाबा आमटे यांनी लिहिलेले ‘माती जागवील त्याला मत’ हे पुस्तक साधना प्रकाशनाने प्रसिद्ध केले होते. त्या पुस्तकातील काही मार्मिक तुकडे 2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाचायला हवेत... - संपादक)

Tags: माती जागवील त्याला मत बाबा आमटे Mati jagvil tyala mat Baba Amte weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

बाबा आमटे

 (डिसेंबर २६ , इ.स. १९१४ - फेब्रुवारी ९ , इ.स. २००८)  समाजसेवक. कुष्ठरोग्यांच्या शुश्रूषेसाठी त्यांनी चंद्रपूर , महाराष्ट्र येथे आनंदवन ही संस्था सुरु केली. . वन्य जीवन संरक्षण, नर्मदा बचाओ आंदोलन अशा इतर सामाजिक चळवळींमध्येही त्यांनी सक्रिय सहभाग घेतला.


प्रतिक्रिया द्या