डिजिटल अर्काईव्ह (2014-2019)

तेरवं : शेतकरी विधवांच्या जगण्याच्या कहाण्या

श्याम पेठकरलिखित ‘दाभोळकरचं भूत’, पारोमिता गोस्वामीच्या दारूबंदी आंदोलनावरील ‘आडवी बाटली’ ही नाटकं थिएटरअंतर्गतच बसविली गेली आहेत. इतकेच नाही तर- जे शेतकरी निराशेने ग्रासले आहेत, त्यांनादेखील इथे आणून प्रशिक्षण दिलं जातं. ‘तेरवं’साठीसुद्धा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवांना नाट्यप्रि शक्षणासाठी बोलावण्यात आलं. त्यातल्या काही महिलांना घेत ‘तेरवं’चा सराव सुरू झाला. नाटकाच्या तालमी शिबिर पद्धतीने घेतल्या जातात. कलावंत निवासी असतात. बारा एकर पसरलेल्या शेतात लेव्हल्स टाकून, जमिनीवर स्टेज आखून तालीम सुरू होते. मग या तालमींचं शेड्युल लागलं, तेव्हा त्या आल्या. घरच्यांचा विरोध झाला. ‘नाटकंबी करा लागली का आता?’ असा बोचरा सवाल करण्यात आला; पण या तालमीत त्या रमल्या- इतक्या की, विदर्भात आपल्या पितरांना जेवू घालण्याचा सण म्हणून अक्षयतृतीयेला खास महत्त्व आहे. त्यासाठीही या बायका घरी गेल्या नाहीत. 

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवांच्या प्रत्यक्ष सहभागातून तयार झालेल्या ‘तेरवं’ या दीर्घांकाचे सध्या विदर्भात प्रयोग सुरू आहेत. यात काम करणाऱ्या तरुण विधवांना भेटायला वर्ध्याला गेले. त्यांना भेटले, तेव्हा त्या प्रत्येकीच्या चेहऱ्यावर मला माझ्या गावातल्या लक्ष्मीचा चेहरा दिसत होता. शिवा गेला तेव्हा त्याला तीन अपत्ये होती आणि घरात आंधळी आई. नैराश्यामुळे शिवाने क्षणभरात आत्महत्या केली, पण साऱ्या जबाबदाऱ्या लक्ष्मीच्या गळ्यात टाकून तो मोकळा झाला...
 
‘तेरवं’मध्ये काम करणाऱ्या प्रत्येकीची हीच भावना दिसली. ‘तेरवं’ हे दीर्घांकाच्या रूपबंधात आलेलं आहे. तो रंगमंचीय आविष्कारच आहे, त्या अर्थानं त्याला नाटक म्हणता येईल; पण ती रंगमंचावर सुरू झालेली कृषी चळवळ आहे. नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी शेतकऱ्यांच्या मदतीसाठी स्थापन केलेल्या ‘नाम फाउंडेशन’चं विदर्भातलं काम श्री.श्याम पेठकर आणि श्री.हरीश इथापे बघतात. नामचे ते संस्थापक-सदस्य आहेत. 

‘नाम’च्या स्थापनेच्या आधीपासून ही मंडळी शेतकऱ्यांसाठी काम करतातच; आता नामच्या निमित्ताने त्यांचे विदर्भभर दौरे होतात. ‘नाम फाउंडेशन’च्या वतीने विदर्भातल्या आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवांना धनादेशाच्या स्वरूपात रकमांचे वाटप, शिलाई मशीन, शेळ्यांचे वाटप करण्यात येते. चहुबाजूंनी संकटांनी वेढलेल्या या महिलांकडे बघून वाटतं- कुठून येत असेल यांच्यात आपल्या पिल्लांसाठी जगण्याचं बळ? 

नवऱ्याने आत्महत्या केली की सासरची मंडळी सुनेची, त्यांच्याच नातवंडांची जबाबदारी झटकतात. कधी कधी माहेरची माणसंही जवळ करत नाहीत. समाजातल्या वाईट नजरा सतत रोखलेल्या असतात. त्या अतिशय एकट्या- एकाकी पडतात. आत्मभान त्यांच्यात पेरणं, ही आजची खरी गरज आहे. ते काम विदर्भात काही समाजसेवी संस्था करतात. ‘किसान मित्र नेटवर्क’ ही मातृसंस्था आहे. ती शेतकरी आणि शेतमजुरांसाठी काम करते. डॉ.मधुकर गुमळे यांची ‘अपेक्षा होमिओ सोसायटी’ शेतकऱ्यांच्या विधवा पत्नींसाठी काम करते. ग्रामीण भागातील विधवा, परित्यक्ता, अविवाहित अशा एकट्या महिलांसाठी काम करणारी ‘एकल’ संघटना आहे. या संस्थांना ‘नाम फाउंडेशन’च्या कामाशी जोडून घेतले. 

हरीश इथापेंनी ‘ॲग्रो थिएटर’ ही संकल्पना राबविली आहे. त्या माध्यमातून ही मंडळी दिवाळीला शेतकरी विधवा भगिनींसह पाडवा, भाऊबीज इथापेंच्या शेतावर साजरी करतात. वर्ध्याजवळ रोठा नावाचे गाव आहे. तिथे इथापेंची शेती आहे. तिथे हे ॲग्रो थिएटर सुरू केले आहे. तिथे या महिलांशी एका दिवाळीला गप्पा मारताना श्याम व हरीश या दोघांनी प्रश्न केला, ‘तुमचा नवरा आत्महत्या करण्याच्या आधी तुम्हाला भेटला असता तर तुम्ही काय बोलला असता... किंवा आता तो दोन मिनिटेच भेटला तर काय बोलाल...?’ 

त्यानंतर वेदनेचा धबधबाच वाहू लागावा इतक्या आवेगात या बायका बोलत राहिल्या. ते ‘तेरवं’ या नाटकाचे बीजारोपण होते. 

आजवर लोकांनी शेतकरी मर्दांच्या आत्महत्यांच्या करुण कहाण्याच ऐकल्या आहेत; आता या भगिनींच्या जगण्याच्या संघर्षाच्या मर्दानी कथाही त्यांच्यापर्यंत पोहोचाव्यात, या एका विचाराने अस्वस्थ झालेले हरीश इथापे आणि श्याम पेठकर यांना मग एक संकल्पना सुचली. ती हीच की, या विधवांच्या एकूण जगण्यावर बेतलेल्या नाटकात त्यांनीच का काम करू नये? म्हणून मग ज्यांना शक्य आहे, घरून परवानगी मिळते, अशा महिलांचे नाट्यप्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. महिनाभर ते चालले. थिएटर नेहमीच आत्मविश्वास देत असते. या महिलांनाही तो मिळाला. मग त्या महिलांनीच पेठकरांमागे लकडा लावला, ‘भाऊ, नाटक कधी लिहिता?’ त्यांनी हे नाटक लिहिले. 

ॲग्रो थिएटरच्या माध्यमातून ते रंगमंचावर आले आहे. चंद्रपूरला राज्य नाट्यस्पर्धेत प्रयोग सादर झाला. नाटकानंतर या महिलांना भेटायला गर्दी झाली होती. सतत उपेक्षा, शोषण, अवहेलना, आत्मवंचनाच वाट्याला आलेल्या त्या महिलांच्या चेहऱ्यावर आत्मप्रतिष्ठेची भावना पहिल्यांदा दिसली. आपल्या जगण्याच्या संघर्षाकडे किमान नाटकाच्या माध्यमातून समाजाचे लक्ष गेल्याचे समाधान त्यांना होते. हौशी असूनही अत्यंत व्यावसायिक सफाईने या महिलांनी या समूहनाट्यात कामे केली आहेत. अशा प्रकारचा हा बहुधा पहिलाच प्रयोग असावा. 

लोककला, लोकनाट्य ही कला प्राचीनतम काळापासून ग्रामीण संस्कृतीचे एक अविभाज्य अंग राहिलेली आहे. मग खेड्यांमधलं डंडार असो की, झाडीपट्टीतली नाटकं हे त्यातलेच प्रकार. हे नाट्याविष्काराचे प्रकार ग्रामीण जनतेचं- शेतकरीशेतमजुरांच्या प्रकटीकरणाचं एक सशक्त माध्यम होतं. त्यांच्या रोजमर्रा जगण्यातला तो विश्रांतीसाठीचा एक थांबा होता. पण आता मुळात ग्रामव्यवस्थाच उसवत आणि उद्‌ध्वस्त होत चालल्याने हे प्रकारही दुर्दैवाने लोप पावत चालले आहेत. गाव, ग्रामसंस्कृती आणि शेती-मातीचे सांस्कृतिक पर्यावरण बदलले आहे. गावे राजकारणाचा अड्डा होत आहेत. गावपण उजागर करण्याची गरज आहे. या सर्व विचारातून मग ॲग्रो थिएटरची संकल्पना पुढे आली. शेती-माती, गावगाडा यातूनच कथानक, कलावंत, साधनं, रंगमंच हे सारे घेऊन छोटी-मोठी नाटकं उभी करायची आणि सादर करायची- अशी ती संकल्पना. 

पोळ्याच्या झडत्या, नागपंचमीच्या बाऱ्या, पेरणीची गाणी, भुलाबाईची गाणी, असंख्य लोककथा असा मोठा खजिनाच आहे. त्यातून ॲग्रो थिएटर सुरू झालं. तिथे मग शेतकऱ्यांसाठी नाट्य प्रशिक्षण शिबिरे घेतली जातात. त्यातून चर्चा घडते, समुपदेशन होतं. विविध राज्यांमधून थिएटरच्या कार्यशाळेसाठी प्रशिक्षणार्थी येतात. श्याम पेठकरलिखित ‘दाभोळकरांचे भूत’, पारोमिता गोस्वामीच्या दारूबंदी आंदोलनावरील ‘आडवी बाटली’  ही नाटकं थिएटरअंतर्गतच बसविली गेली आहेत. इतकेच नाही तर- जे शेतकरी निराशेने ग्रासले आहेत, त्यांनादेखील इथे आणून प्रशिक्षण दिलं जातं. ‘तेरवं’साठीसुद्धा आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवांना नाट्य-प्रशिक्षणासाठी बोलावण्यात आलं. त्यातल्या काही महिलांना घेत ‘तेरवं’चा सराव सुरू झाला. नाटकाच्या तालमी शिबिर पद्धतीने घेतल्या जातात. कलावंत निवासी असतात. बारा एकर पसरलेल्या शेतात लेव्हल्स टाकून, जमिनीवर स्टेज आखून तालीम सुरू होते. 

मग या तालमींचं शेड्युल लागलं, तेव्हा त्या आल्या. घरच्यांचा विरोध झाला. ‘नाटकंबी करा लागली का आता?’ असा बोचरा सवाल करण्यात आला; पण या तालमीत त्या रमल्या- इतक्या की, विदर्भात आपल्या पितरांना जेवू घालण्याचा सण म्हणून अक्षयतृतीयेला खास महत्त्व आहे. त्यासाठीही या बायका घरी गेल्या नाहीत. दसरा- इतकंच काय; पण दिवाळीतही या महिला आपल्या घरी गेल्या नाहीत. ॲग्रो थिएटरच्या सदस्यांसोबत त्यांनी तिथेच दिवाळी साजरी केली. अशी दिवाळी त्यांच्यासाठी अतिशय अभिनव होती. अन्नपाण्यापेक्षाही इतके दिवस दबलेला मोकळा श्वास त्यांना इथे घेता येत होता. अशा रीतीने ‘तेरवं’ या नाटकाचा सराव सुरू झाला. 

तेरवं हे समूहनाट्य आहे. त्यात पुरुषपात्रंही महिलांनीच केली आहेत. कारण, पतीच्या आत्महत्येनंतर या महिलांनी त्यांच्या आयुष्यातही पुरुषांच्या भूमिका निभावल्या आहेत, निभवत आहेत, पुढेही निभवतच राहणार आहेत. जात्यात भरडल्या जाणाऱ्या दाण्यांसारखी या महिलांची अवस्था आहे, म्हणून जात्यावरच्या ओव्यांच्या माध्यमातून त्यांच्या व्यथा उजागर करण्यात आल्या आहेत. पूर्वीच्या काळी दळता-कांडताना ओव्यांमधूनच बायका आपल्या व्यथा-वेदनांना वाट मोकळी करून द्यायच्या. त्यातूनच त्यांचं कॅथर्सिस व्हायचं. त्या ओव्या श्याम पेठकरांसह भय्या पेठकरांनीही लिहिल्या आहेत. संगीतबद्ध ओव्यांनी या लयबद्ध नाट्याची परिणामकारकता आणखी वाढली आहे. नागपूरचे प्रसिद्ध संगीतकार वीरेंद्र लाटणकर यांनी या ओव्यांना अतिशय सुरेल चाली दिलेल्या आहेत. 

‘तेरवं’चं वैशिष्ट्य हेच की, यात केवळ आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या विधवांच्या व्यथांचं, दुःखाचं प्रदर्शन नाही; तर त्यातून बाहेर पडण्याची, आपल्या बलबुत्यावर उभं राहण्याची, आपल्यातली अंगभूत शक्ती समाजाला दाखवून देण्याची एक ठिणगी आहे. म्हणूनच या नाटकाच्या कथानकात तेराव्याचं एक मंडळ स्थापन करण्यात आलं आहे. जसं मंगळागौरीला, काजळतीजेला महिला एकमेकींकडे जात गाणी म्हणतात; तसंच हे विधवांचं तेराव्याचं मंडळ एखाद्या शेतकऱ्याने आत्महत्या केल्यानंतर त्याच्या तेरवीला जाऊन त्याच्या पत्नीमध्ये आत्मभान फुंकतात. त्या नवविधवेला एकटीनं आयुष्याचा झगडा देण्यासाठी बळ यावं म्हणून मग बाकी बायका त्यांच्या वाट्याला आलेल्या शोषणाच्या कथा सांगतात. भाषा अर्थातच स्थानिक बोलभाषा- वऱ्हाडी आहे. 

‘तेरवं’मध्ये काम करणाऱ्या सगळ्याच महिलांची मी भेट घेतली. त्यांच्याबद्दल जाणून घेतलं. यवतमाळ जिल्ह्यातली कळंब तालुक्यातली वैशाली येडे नामक तरुणी आताशी कुठे 25 वर्षांची आहे. तिचं लग्न झालं तेव्हा तिला जेमतेम एकोणिसावं लागलं होतं. सासरी खूप मोठा खटला. सख्खे-चुलत मिळून एक दीर-भाचरे, जावा-सासवा वेगळ्या. साऱ्या खटल्यात तसाही तिला सासुरवास होताच. वैशालीच्या नवऱ्याच्या नावाने तीनचार एकर शेती होती. दोघं शेती करायचे आणि आपली गुजराण करायचे. पण वैशालीच्या नवऱ्याने कर्जाला कंटाळून आत्महत्या केली. तेव्हा तिला पाच वर्षांचा मुलगा होता आणि दुसऱ्या बाळंतपणासाठी ती माहेरी गेली होती. महिनाभराची मुलगी कुशीत असताना नवऱ्याच्या आत्महत्येची बातमी आली. 

नवऱ्याच्या आत्महत्येनंतर तिच्या हाल-अपेष्टांमध्ये आणखी भर पडली. सासरच्यांकडून आणखी छळ सुरू झाला. तिचा कोणी वालीच नसल्याने घरात तिला मोलकरणीसारखं वागवलं जाऊ लागलं. तिचं बाहेर जाणं बंद करून टाकलं. तिने साधं तयार झालेलं, नीट राहिलेलं सासरच्यांना सहन होत नव्हतं. चेहऱ्याला साधी फेस पावडर लावली तरी सासू दूषणं द्यायची. ‘आता कोनाले आपलं थोबाड दाखवायचं आहे तुले?’, अशा भाषेत तिची संभावना केली जायची. बाहेरच्यांच्याच कशाला, घरातल्यांच्याही वाईट नजरांचा सामना तिला करावा लागला. वैशाली हे सारं निमूटपणे सहन करीत होती तोपर्यंत सारं ठीक होतं; पण तिने जसा प्रतिकार करायला सुरुवात केली, तेव्हा तिने घरातून निघून जावं, अशी वातावरणनिर्मिती केली गेली. तिला घरातून निघून जायला भाग पाडलं गेलं. अखेर एक दिवस तिने आपल्या मुलाला घेत सासरचा उंबरठा ओलांडला तो कायमचाच. त्यानंतर ती वर्ध्याच्या एकल महिला संघटनेत सामील झाली. शिलाई मशीन चालवून आणि मजुरी करून ती गुजराण करते आहे... 

यवतमाळच्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची उद्‌घाटक म्हणून तिला बोलावण्यात आलं. नयनतारा सहगलबार्इंना ऐनवेळी नाकारून झालेली लाज झाकण्यासाठी वैशालीचा आधार घेण्यात आला. ‘तिथे नेऊन आपलं काय करणार ही माणसं?’ हा प्रश्न तिला पडला होता. तिला त्या थाटाच्या समारंभात नेसायला नीट साडी आहे की नाही, याचेही भान कुणी ठेवले नाही. मराठीचे प्रश्न सोडविण्यासाठी संमेलनाध्यक्षांना एक लाखाचा धनादेश देण्याची पद्धत आहे. मात्र कुडाच्या घरात राहणाऱ्या वैशालीला तिचं घर उभं करण्यासाठी काही मदत करावी, असेही कुणालाच वाटले नाही. ‘एकटी बाई ही पुरुषांसाठी धन असते,’ हे महत्त्वाचं वाक्य ती बोलली... ‘तेरवं’चं हे यश आहे. 

मंदा अलोणेचीही व्यथा यापेक्षा निराळी नाही. ती आर्वी तालुक्यातल्या सोरहाता गावात राहते. तिच्याही नवऱ्याजवळ तीन एकर शेती होती. सततच्या नापिकीने, बिनभरवशाच्या पावसाने नवरा कर्जबाजारी झाला. कंटाळून अखेर त्याने 2019 मध्ये आत्महत्या केली. मंदाच्याही पोटी दोन मुलं. तीदेखील अशीच सासरहून हाकलली गेलेली. ती घराबाहेर पडली. ‘नाम फाउंडेशन’ने तिला शिलाई मशीन घेऊन दिली. आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी तीदेखील संघर्ष करीत आहे. तळेगाव ठाकूरच्या माधुरी चिटुलेचीही हीच कहाणी. नवऱ्याने नापिकीला कंटाळून आत्महत्या केली. सासरची मंडळी शेतीवरचा अधिकार देत नाहीत. तीही सासरहून बाहेर घालवली गेली. कविता ढोबळे ही वर्ध्याच्या एकल महिला संघटनेचं काम बघते. वर्धा जिल्ह्यातील विरुळच्या कविताची स्थितीदेखील याहून वेगळी नाही. तिनेही एक दिवस सासर सोडून मुलांना घेऊन माहेर गाठलं. 

‘एकल संघटने’चं काम बघता-बघता तीच आता इतर महिलांचं समुपदेशन करू लागली आहे. एका विधवेशी तर सासरची मंडळी बोलतच नाहीत,  ना तिला कोणाशी बोलू देत. बाहेर कुठले कामही करू देत नाहीत. सासर सधन आहे, मात्र हिच्या वाट्याला आश्रित भिकारणीचं आयुष्य. घरच्याच- म्हणजे नवऱ्याच्या नावे असलेल्या शेतीत तिला फुकटात मजूर म्हणून राबविलं जातं. तिने घरून निघून जावं म्हणजे घर आणि शेतीवरचा तिचा हक्क जाईल, म्हणून छळ केला जातो. तिच्याशी कुणीच बोलत नाही. बोलणं अनावर झालं की, शेतात जाऊन ती झाडाशी बोलते. आपलं मन मोकळं करते. 

‘तेरवं’मध्ये काम करणाऱ्या तेजस्विनीची (नाव बदललेय) चित्तरकथा तर अतिशय हृदयद्रावक आहे. ती नववीत असताना तिच्या वडिलांनी तिचं लग्न लावून द्यायचं ठरवलं. तिने विरोध केला. ‘पुढे शिकायचं आहे’ म्हणाली. वडील ऐकेनात. तरीही ती बधली नाही. पुढे शिकण्याच्या निर्णयावर ठाम राहिली. तेव्हा संतापाच्या भरात अश्विनीच्या वडिलांनी तिच्या पोटात लाथ घातली. तिच्या किडनीला मार लागला, ज्याच्या वेदना तिला आजही भोगाव्या लागत आहेत. पण त्याच दिवशी तिने शिक्षणासाठी घर सोडलं ते कायमचं. पुढे शिक्षण घ्यायचंच, या तीव्र इच्छेपोटी ती घरातून निघून गेली, ती आजतागायत घरी परतलेली नाही. अश्विनीने बराच संघर्ष केला. एकटी राहिली. आज ती वर्ध्याच्या ‘हिंदी विश्व विद्यापीठा’त फिल्म डायरेक्शनचा अभ्यासक्रम करते. संगणकात तिने कौशल्य मिळवलं आहे. 

एका तरुण विधवेचं मनोगत ऐकून तर मन सुन्न झालं. ‘आम्ही विधवा ना! नाही तरी आमच्यावर समाज आक्षेपच घेतो. सख्ख्या भावासोबत दिसलो तरी संशयाने पाहतात. प्रत्येक पुरुषाला आम्ही संधी वाटतो. सरळसोट वागलं तरीही आमच्या चारित्र्यावर संशय घेतात. माझ्या मुलाच्या शिक्षणासाठी मी वेश्याव्यवसायही करायला तयार होईन, पण मुलाला शिकवीन.’ या मुलींची वये अगदी पंचविशी-तिशीच्या आसपास आहेत. अशा कोवळ्या वयात त्यांच्या वाट्याला वैधव्य आलं अन्‌ शोषण, छळ आला- तो साराच अंगावर काटा आणणारा आहे. 

‘तेरवं’मधल्या या साऱ्याच मुलींच्या भूमिका बघून अवाक्‌ व्हायला होतं. त्यांच्यात निर्माण झालेल्या आत्मविश्वासाला, आत्मबळाला सलाम करावासा वाटतो. हा सारा बदल हरीशसरांमुळे झाल्याची प्रांजळ कबुली त्या साऱ्याच जणी देतात. 

आधीच म्हटल्याप्रमाणे तेरवं हा या महिलांच्या हक्कासाठीचा रंगमंचीय लढा आहे. सुरुवातीला त्याचीही अवहेलना झाली. आता मात्र हा रंगमंचीय लढा बऱ्यापैकी यशस्वी होतो आहे. दि.4 मार्चला या नाटकाचा प्रयोग मुंबई विद्यापीठाच्या ॲकॅडमी ऑफ थिएटर आर्ट्च्या वसंत महोत्सवात होत आहे. दि.8 मार्चला औरंगाबादला प्रयोग आहे. विविध ठिकाणांहून बोलावणी येऊ लागली आहेत. या नाटकाचे प्रयोग राज्यभर अन्‌ राज्याच्या बाहेर दिल्लीपर्यंत करण्याचा हरीश इथापे, श्याम पेठकर यांचा मानस आहे, तो पूर्ण व्हावा; कारण या महिलांच्या जगण्याचा संघर्ष त्यांच्या आयुष्याचे निर्णय करणाऱ्या सुरक्षित, शहरी समाजापर्यंत पोहोचलाच पाहिजे!

तेरवंची श्रेयनामावली- 
निर्मिती : अध्ययन भारती, वर्धा 
लेखक - श्याम पेठकर 
दिग्दर्शक - हरीश इथापे 
संगीत - वीरेंद्र लाटणकर 
सहभागी कलावंत- या नाटकात वर्धा, यवतमाळ, अमरावती या भागातील पाच विधवा आणि त्याच परिवारातील दोन मुलींचा समावेश आहे, तर या संस्थेतील सहा जणींनी सहायक भूमिका साकारल्या आहेत. कविता ढोबळे, वैशाली येडे, मंदा अलोणे, संहिता इथापे, अवंती लाटणकर, प्रतीक्षा गुडधे, श्वेता क्षीरसागर, उर्वशी डेकाटे, गोरल पोहाणे, शिवानी सरदार, माला काळे, सविता जडाय, अश्विनी नेहारे अशा एकूण तेरा जणींनी काम केलं आहे.  
 

Tags: drama terav farmer's suicide shetkari atmahatya agro theatre harish ithape shyam pethkar bhagyashree pethkar नाटक शेतकरी विधवा शेतकरी आत्महत्या ॲग्रो थिएटर हरीश इथापे श्याम पेठकर भाग्यश्री पेठकर तेरवं weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

भाग्यश्री पेठकर
pethkar.bhagyashree3@gmail.com

लोकसत्ता’, ‘नवराष्ट्र मराठी दैनिक’, दैनिक तरुण भारत या वृत्तपत्रांत उपसंपादक म्हणून काम केले आहे. ‘काया’ हा कवितासंग्रह प्रसिद्ध


प्रतिक्रिया द्या