डिजिटल अर्काईव्ह (2014-2019)

भारतात कराटे आणि तत्सम प्रकार शिकणाऱ्यांची (आणि शिकविणाऱ्यांची) संख्या वाढत असली तरी या विद्येचा ‘आत्मा’ हरवत चालल्याची खंत वाटते. आपल्या मुलांना कराटे क्लासेसना घालून ‘ब्लॅक बेल्ट’ मिळवणे किंवा थेट राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेऊन मेडल्स मिळविणे आणि काहीच शक्य नसल्यास पांढरे कपडे घालून मिरवणे यापलीकडे पालकांनी सर्वप्रथम याचा विचार करणे आवश्यक आहे. मध्यंतरी महाराष्ट्र राज्य सरकारने अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना राज्य अथवा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत केवळ सहभागी झाल्यास 25 गुण राखून ठेवले होते. सरकारने काढलेल्या या जी.आर.चा पालक, विद्यार्थी, शाळेतील शिक्षक आणि क्रीडा प्रशिक्षक यांनी मिळून अक्षरशः निकाल लावला होता. सर्वच क्रीडाप्रकारांमध्ये मुलं हिरीरीने सहभागी झाली. सरकारने हा निर्णय मागे घेईपर्यंत विद्यार्थ्यांनी राज्य व राष्ट्रीय पातळीवर आपली चमक(!) दाखवली होती. 

इ.स. 470 च्या कालखंडात काळी दक्षिण भारतातील कांचीपुरम ही पल्लव साम्राज्याची राजधानी होती. बोधिधर्मन यांचा जन्म मद्रासजवळील कांचीपुरम येथील एका राजघराण्यात झाला. त्यांचे मूळ नाव बोधितारा असे होते. मात्र नंतर त्यांचे गुरू प्रज्ञातारा यांनी बोधितारा हे नाव बदलून ‘बोधिधर्मन’ असे ठेवले. बोधिधर्मन यांनी सुरुवातीची बरीच वर्षे दक्षिण भारतात बौद्ध धर्माचा प्रसार केला. मात्र त्यांच्या गुरूंच्या शेवटच्या इच्छेनुसार ‘झ्हेन डान’ (चीनचे जुने नाव) येथे जाऊन महायान पंथाचा प्रसार करणे त्यांना महत्त्वाचे वाटते. असे म्हणतात की, बोधिधर्मन प्रत्यक्षात चीनमध्ये पोहोचण्यापूर्वी कांचीपुरम येथून कबुतरांच्या साह्याने त्यांच्या आगमनाचा संदेश चीनमध्ये पाठवण्यात आला होता.

इ.स. 470 ते 543 हा बोधिधर्मन यांचा कालखंड होय. त्यांच्या प्रवासमार्गाबद्दल खात्रीलायक पुरावे नसले, तरीही काही इतिहासकारांच्या म्हणण्याप्रमाणे महाबलीपुरम या बंदरातून त्यांनी प्रवासास सुरुवात केली. ‘श्रीविजय’ ही त्या काळी दक्षिण सुमात्रा राज्याची राजधानी होती. तिथून त्यांनी मलेशिया, कंबोडिया, थायलँड आणि व्हिएतनाममार्गे प्रवास केला. तीन वर्षांच्या या प्रवासानंतर इ.स. 520 मध्ये त्यांनी चीनमधील ‘कुआंग’ नावाच्या बंदरात प्रवेश केला. आज हा भाग ‘गुआंगझु’ या नावाने ओळखला जातो. आपल्या या प्रवासादरम्यान बोधिधर्मन यांनी ‘रीड’  गवतापासून बनविलेल्या नावेतून यांगत्से नदी पार केली. सुरुवातीचा काळ त्यांच्यासाठी खूप खडतर गेला. याच भागातील ‘हुॲलीन’ नावाच्या देवळात त्यांनी बौद्ध भिक्खूंना महायान (चॅन) पंथाची शिकवण देण्यास सुरुवात केली.

आज ‘हुॲलीन’ देवळात बोधिधर्मन यांची मूर्ती पाहावयास मिळते. तेथील ‘शाओलीन’ देवळाच्या मागील बाजूस असलेल्या डोंगरातील गुहेमध्ये बोधिधर्मन यांनी नऊ वर्षे ध्यानधारणा केली होती. त्यांच्या या ध्यानसाधनेवेळी शाओलीनमधील त्यांचे शिष्य त्यांच्यासाठी जेवण-पाणी घेऊन जात. त्यांच्या वास्तव्यामुळे ‘शाओलीन’ प्रसिद्ध झाले. महायान पंथाला चिनी भाषेत ‘चॅन बुद्धिझम’ असे म्हणतात, तर त्यालाच कोरिया आणि जपानमध्ये अनुक्रमे ‘सेऑन बुद्धिझम’ व ‘झेन बुद्धिझम’ अशी नावे आहेत. ‘झेन’ हा शब्द संस्कृतमधील ‘ध्यान’ या शब्दाचा जपानी भाषेतील अपभ्रंश आहे.

जपानमधील जवळपास सर्वच ‘झेन’ देवळांमध्ये तथागत गौतम बुद्धांसोबत बोधिधर्मन यांची मूर्ती आहे. बोधिधर्मन यांना चीनमध्ये ‘दामो’ या नावाने ओळखतात, तर जपानमध्ये त्यांना ‘धर्मसेन’ असे नाव आहे. भारतातील महायान पंथाचे ते 28 वे प्रवर्तक होते, तर चीनमधील महायान पंथाचे ते पहिले प्रवर्तक होत. कराटे या आशिया खंडातील युद्धविद्यांचे जनक म्हणून त्यांचे नाव घेतले जाते. त्या काळात मात्र कराटे ही विद्या फारच निराळ्या स्वरूपात होती. चीनमध्ये या विद्येला ‘वेर्मनिए’ या नावाने ओळखले जाई. बोधिधर्मन यांनी लहान वयातच दक्षिण भारतातील ‘कलरीपायट्ट’ या युद्धविद्येचे धडे गिरविले असल्याने अर्थातच त्या युद्ध प्रकाराशी तिचा जवळचा संबंध होता. काही इतिहासकारांच्या मते, जंगलातील डाकू, दरोडेखोर आणि जंगलीश्वापदे यांना बौद्ध भिक्खू बळी पडू नयेत म्हणून त्यांनी ही युद्धविद्या आपल्या शिष्यांना शिकविली असावी. आत्मिक शक्ती ही आपल्या श्वासाच्या गतीवर अवलंबून असते, अशी त्यांची शिकवण होती. आज यालाच कराटेमध्ये ‘की’ असे म्हणतात. त्यांनी शिकविलेली ही विद्या म्हणजे आत्मज्ञानप्राप्तीचा एक मार्ग होता.

महायान पंथानुसार कित्येक तास ध्यानसाधनेवेळीदेखील शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत चालवा यासाठी त्यांनी आपल्या शिष्यांना युद्धविद्यांसोबतच श्वसनाच्या विविध पद्धती, प्राणायाम व योग अभ्यासाचे धडे दिले. आज कराटेमधील ‘किबादाची’ किंवा ‘हॉर्स स्टान्स’ हा प्रकार आणि ‘सांचीन’ हा काता प्रकार बोधिधर्मन यांची निर्मिती आहे. ‘किबादाची’ या आसनात  बोधिधर्मन व त्यांचे शिष्य ध्यानासाठी कित्येक तास बसत असत. त्यांच्या युद्धविद्येतील शिकवणीकडे त्या काळी जपानमधील ‘सामुराई’ योद्धेदेखील आकर्षित झाले होते. त्यांच्या मृत्यूनंतर त्यांचे शरीर चीनमधील हिनान प्रांतातील ‘शोन एर शान’ या डोंगरात दफन केले गेले. आज जपानमध्ये बोधिधर्मन यांची आठ भव्य मंदिरे आहेत. काही इतिहासकारांनी बोधिधर्मन यांना ‘आशियाई तत्त्वज्ञानाचा प्रकाश स्तंभ’ असे संबोधले आहे.

आज अस्तित्वात असलेल्या सर्वच ‘मार्शल आर्ट्स’ प्रकारचे मूळ त्यांच्या शिकवणीत आहे. त्यांनी शिकविलेली कला पुढे वर्षानुवर्षे मौखिक आणि विशेषतः प्रात्यक्षिकरीत्या जिवंत राहिली. आजही ‘शाओलीन टेंपल’ परिसरात ‘कुंग-फू’ युद्धकलेचे धडे गिरवले जातात. सध्या जगभर शिकविले जाणारे ‘कराटे’ मात्र जपानमधील ‘ओकिनावा- मार्शल आटर्‌स’ आणि चीनमधील ‘कुंग-फू’ यांचे एक अलौकिक मिश्रण आहे. त्या काळी जपानमधील ‘ओकिनावा’ बेटे ही ‘र्युकू’ राज्याचा भाग होती तर ‘नाहा’ ही ओकिनावाची राजधानी होती. कालौेघात जपानमधील शुरी, तोमारी आणि नाहा या बेटांवर ‘ओकिनावा- मार्शल आटर्‌स’ विकसित होत गेली. सन 1332 मध्ये जपान व चीनमधील व्यापारात वाढ झाली आणि याच दरम्यान दोन्ही देशांमधील युद्धविद्यांचा प्रत्यक्ष संबंध आला.

सन 1609 मध्ये जपानमधील सत्सुमा सामुराई यांनी जिगेन-र्यु (आजची केंजुत्सू स्टाईल) ची निर्मिती केली. ताकहारा-पेईचीन (सन 1683 ते 1760) यांना ‘ओकिनावा कराटे’ या विद्येचे जनक असे म्हणतात. त्यांनी कराटे या विद्येला एका वेगळ्या क्षितिजावर नेले. ते स्वतः एक उत्कृष्ट योद्धे होते. ‘ईजो’ (दया, मानवता, विनय आणि नम्रता), ‘फो’ (प्रगल्भता, ध्यानमग्नता व पवित्र कामासाठी स्वतःला वाहून घेणे) आणि ‘कात्सु’ (प्रगल्भ आकलन आणि तंत्रविद्या प्रकारांची सखोल जाण) हा त्यांनी शिकविलेला मार्ग खरे तर कराटेचा आत्मा आहे. ताकहारा-पेईचीन यांचे शिष्य शाकुगावा-कांगा (सन 1733 ते 1851) यांनी ‘टे’ (हात) आणि ‘टोडे’ (चिनी हात) या दोन्ही शैली विकसित केल्या. याचदरम्यान मात्सुमुरा यांनी ‘जिगेन-र्यू’ (तलवार युद्धविद्या) शैली प्रमाणबद्ध केली, तसेच ‘शुरी-टे’ (आजची शुरीन-र्यु) या शैलीची रचना केली. त्यांनी स्वतः तोमारी येथील तीन राजांसाठी विशेष अंगरक्षक म्हणून काम केले होते.

सन 1900 पर्यंत ‘ओकिनावामार्शल आर्ट्‌स’च्या फक्त तीन शैली अस्तित्वात होत्या. त्यांना अनुक्रमे शुरी-टे, नाहा- टे आणि तोमारी-टे या नावांनी ओळखले जाई. अंको इटोसु (1831 ते 1951) यांना ‘आधुनिक कराटे’चे जनक म्हणतात. ते मात्सुमुरा यांचे शिष्य होत. आज शिकवली जात असलेली ‘कराटे’ त्यांनी प्रमाणित केली. कराटेमधील काही प्रकार लहान वयात शिकता  यावेत, यासाठी त्यांनी पिनान किंवा हियान शैली रचनाबद्ध केली. त्यांचेच शिष्य केन्वा माबुनी (शितो-र्यु शैलीचे जनक), चोसिन चीबना (शोरीन-र्यु शैलीचे जनक) आणि गिचीन फुनाकोशी (शोतोकॉन शैलीचे जनक) हे होत. 1930 च्या दशकात चोजून मियागी, मोतोबु चोई आणि हिरोनोरी ओहत्सुका यांनी अनुक्रमे गोजु-र्यु, मोतोबो-र्यु आणि वाडो-र्यु या शैली विकसित केल्या. आज जगभरात ‘कराटे’च्या वर उल्लेखलेली विविध शैली शिकविल्या जातात.

खरं तर सन 1935 पर्यंत ‘कराटे’ हा शब्द प्रचलित नव्हता. त्याऐवजी तोडे (चिनी हात) असा शब्द असे. सन 1935 मध्ये काही राजकीय कारणास्तव ‘ओकिनावा मास्टर्स’नी ‘कराटे’ (नि:शस्त्र हात) असा शब्द सुचविला. सन 1950 मध्ये जगातील पहिल्या कराटे स्पर्धा जपानमध्ये पार पडल्या. सन 1963 मध्ये जपान कराटे फेडरेशनची स्थापना झाली. नंतर मात्र कराटे व इतर मार्शल आर्ट्‌सचा जगभर बराच प्रचार-प्रसार झालेला दिसून येतो. सन 1960-70 च्या काळात कराटेबरोबरच इतर प्राचीन आशियाई युद्धविद्यांनी जगाचे लक्ष वेधून घेतले.

जगभरात कराटेशी साधर्म्य असलेले जवळपास वीसेक प्रकार आहेत आणि त्यातही बरेच पोटप्रकार (स्टाइल्स) असल्याचे समजते. त्यात जपानमधील ज्युडो, कोबुडो आणि अकिडो, थाईलंडमधील मुयी- थाई, कोरियामधील चोई-क्वान्डो व टेंगसुडो तर चीनमधील वुशू, कुंग-फू आणि ताय-ची या प्रकारांचा समावेश होतो. ब्रूस ली, जॅकी चॅन, टोनी जा, डोनाई येन, स्कॉट ॲडकिन्ससारख्या युद्धविद्यांत पारंगत असलेल्या अनेक कलाकारांनी जागतिक फिल्म इंडस्ट्रीच्या रुपेरी पडद्यावर विशेष जागा मिळवली आणि या कलेकडे बघण्याचा जगाचा दृष्टिकोन हळूहळू बदलू लागला. बॉलिवूडमध्ये मात्र अक्षयकुमार, विद्युत जामवाल आणि टायगर श्रॉफ यांसारखे कलाकार सोडले तर ‘स्टंटमॅन’ म्हणून काम करणाऱ्यांव्यतिरिक्त क्वचितच कुणा ‘हीरो’ने प्रत्यक्ष युद्धविद्येचे धडे गिरविले असतील.

भारतात एकीकडे कराटे आणि तत्सम प्रकार शिकणाऱ्यांची (आणि शिकविणाऱ्यांची) संख्या वाढत असली तरी या विद्येचा ‘आत्मा’ हरवत चालल्याची खंत वाटते. आपल्या मुलांना कराटे क्लासेसना घालून ‘ब्लॅक बेल्ट’ मिळवणे किंवा थेट राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय स्पर्धेत सहभाग घेऊन मेडल्स मिळविणे आणि काहीच शक्य नसल्यास पांढरे कपडे घालून मिरवणे यापलीकडे पालकांनी सर्वप्रथम याचा विचार करणे आवश्यक आहे. मध्यंतरी महाराष्ट्र राज्य सरकारने अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना राज्य अथवा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत केवळ सहभागी झाल्यास 25 गुण राखून ठेवले होते. सरकारने काढलेल्या या जी.आर.चा पालक, विद्यार्थी, शाळेतील शिक्षक आणि क्रीडा प्रशिक्षक यांनी मिळून अक्षरशः निकाल लावला होता. सर्वच क्रीडाप्रकारांमध्ये मुलं हिरीरीने (केवळ सहभाग प्रमाणपत्र मिळविण्यासाठी आणि कित्येक तर कागदावरच) सहभागी झाली. सरकारने हा निर्णय मागे घेईपर्यंत विद्यार्थ्यांनी राज्य व राष्ट्रीय पातळीवर आपली चमक(!) दाखवली होती.

दक्षिण भारतातील ‘कलरीपायट्‌’पासून उत्क्रांत होत गेलेली ही विद्या आज चीनमधील घराघरांत दिसून येते. आश्चर्य वाटेल की, नेपाळ आणि चीनमधील काही प्राथमिक शाळांनी स्पोर्ट्‌स टीचर ‘ब्लॅक बेल्ट’ असावा, असा नियमच केलाय. प्रत्येक माणसाला स्वसंरक्षण (मारामारी नव्हे!) आलेच पाहिजे आणि त्याची सुरुवात शालेय जीवनात करणे हा या देशांतील एक स्तुत्य उपक्रम म्हणावा लागेल. आज आधुनिक शस्त्र व युद्धसामग्रीपुढे हा ‘नि:शस्त्र लढा’ कदाचित कमी ठरेलही, मात्र शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुदृढ राखण्यासोबतच काही सामाजिक प्रश्नांनादेखील भिडण्याची त्याची ताकद वादातीत राहील.

खरे तर ‘कराटे’ ही कला नसून ती एक विद्या आहे. तो फक्त खेळ नसून एक जीवनपद्धती आहे; एक तत्त्वज्ञान आहे. इ.स. 500 च्या दरम्यान बोधिधर्मन यांच्या शिकवणीतून उदयास आलेला हाच ‘नि:शस्त्र लढा’ विेशशांतीचा एक मार्गच म्हणावा लागेल. भारतातील या अतिप्राचीन विद्येचा ऐतिहासिक वानोळा घेत असताना केरळमधील कलरीपायट्टी विद्येचे धडे देणाऱ्या 76 वर्षांच्या मीनाक्षीअम्माची आठवण झाल्याखेरीज राहत नाही. आजही त्या हा वसा पुढच्या पिढीकडे देण्याचे कार्य अविरतपणे करत आहेत. त्यांच्या या महान कार्याला मन:पूर्वक वंदन करून इथेच थांबतो.

Tags: बोधीधर्मन सामुराई मिलिंद पाटील कुंग-फू Milind Patil Samurai Kung Fu Karate bhodhidharman weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

मिलिंद पाटील,  सिंधुदुर्ग, महाराष्ट्र


प्रतिक्रिया द्या