डिजिटल अर्काईव्ह (2013-2020)

चिंतन एका मनस्विनीचे : दोन तुकडे

21 व्या शतकातील लेखिकांपुढील आव्हाने
संगणकावर काम करणारा मेंदू हा ‘मानवी’ असतो. संगणकाची भाषा एकच असते. संगणकाला अभिप्रेत अशा एकात्मकतेकडे जायचे असेल तर आजच्या लेखिकांना स्वतःचे ‘स्त्री’त्व प्रथम समजून घेऊन, त्याचा स्वीकार करून मनुष्यधर्माकडे जावे लागेल. आजकाल खूप लेखिकांमध्ये ‘आम्ही स्त्री-मुक्ती वाल्या नाही’ असे ठासून सांगण्याची टूम निघालेली दिसते. परंतु जोपर्यंत तुम्हाला स्वतःच्या स्त्रीत्वाची व त्यावर होणाऱ्या अन्यायाची जाण नाही तोपर्यंत तुम्ही त्यावर उठूच शकत नाहीच. स्त्रीवाद किंवा स्त्रीमुक्ती-वाद स्वतःला स्वतःची ओळख पटवून देतो व व्यापक विचाराचा सोपान चढण्याची ती पहिली पायरी आहे. ही पायरी चढल्यावर अभिव्यक्तीची उंची कोणता कळस गाठते याचे जिवंत उदाहरण म्हणजे अमृता प्रीतम या आहेत.
 

एकविसाव्या शतकातील सर्जनशील प्रतिभेला अभिव्यक्तीच्या संदर्भात एका समाजशास्त्रीय द्वंद्वाला सामोरे जावे लागणार आहे. समाजशास्त्रानुसार व्यक्ती आयुष्यात एकाच वेळी दोन प्रकारच्या निष्ठा घेऊन जगते. पहिल्या प्रकारच्या निष्ठा जन्मदत्त असतात. जन्माने जी जात, पंथ, धर्म, भाषा व लिंग मिळते त्या सर्व घटकांशी प्रामाणिक राहण्याचा संस्कार व्यक्तीवर होत असतो. पुष्कळदा तर ह्या जन्मदत्त निष्ठांशीच (premordial loyalties) एकनिष्ठ राहण्यात व त्यांची श्रेष्ठता राखण्यातच आयुष्याची सार्थकता आहे अशी धारणा घेऊन व्यक्ती जगते. खरं पाहिले असता समाजातील सगळे वाद व संघर्ष या निष्ठांवर आधारलेले असतात. माझा धर्म श्रेष्ठ ठरवायचा तर इतर धर्मांची कनिष्ठता पटवणे आलेच. समाजातील सगळ्या संघर्षाचे मूळ असलेल्या या जन्मदत्त निष्ठा मानवधर्माकडे म्हणजे माणसाच्या समान धर्माकडे पूर्णपणे दुर्लक्ष करतात. मने तोडण्याचे व दुभंगण्याचे काम करतात. जसजसा माणूस विचाराने प्रगल्भ होत जातो तसतसा त्याला जन्मदत्त निष्ठांचा फोलपणा कळतो व मग तो डोळसपणे व विचारांती आपल्या निष्ठा ठरवतो. ज्यांना आपण स्वीकृत निष्ठा (acquired loyalties) म्हणतो.

या स्वीकृत निष्ठा प्रामुख्याने न्याय,  स्वातंत्र्य, समता असून भारतीय संविधानात उल्लेखित बंधुता या असतात. या निष्ठा अशा विचारवंतांना आयुष्याची मूल्ये प्रदान करतात. जन्मदत्त निष्ठा त्याची भूमिका ठरवतात तर स्वीकृत निष्ठा त्याची मूल्ये ठरवतात. जन्मदत्त निष्ठा संकुचित व दुराग्रही वृत्ती जोपासतात. तर स्वीकृत निष्ठा मानव धर्माची व विश्वबंधुत्वाची बीजे मनांत रोवून मनाच्या कक्षा व्यापक करतात. एकविसावे शतक जर संगणकयुग म्हणून गणले जाणार असेल तर या शतकात व्यक्त होणारी अभिव्यक्ती संकुचित वादांकडे झुकणारी असेल तर तिला नाहीशी होणे क्रमप्राप्त होते. कामात या संगणकाची मागणी ही आधुनिकतेची मागणी आहे. सारं जग हे जर एक वैश्विक खेडं  (global village) म्हणून अस्तित्वात राहणार असेल तर या जगाची मागणी वैश्विकतेकडेच झुकणारी राहील. अभिव्यक्तीदेखील याला अपवाद राहणार नाही. म्हणून 21 व्या शतकातील लेखक लेखिकांपुढे संगणकाने एक प्रश्न टाकला आहे. ‘तुम्ही लिखाण जन्मदत्त निष्ठांनी ठरविल्या गेलेल्या भूमिकांना प्राधान्य देऊन करणार की डोळसपणे व समंजसपणे स्वीकारलेल्या मूल्यांना प्राधान्य देऊन करणार?’

संगणकयुगाला मूल्ये अभिप्रेत राहतील त्यामुळे मूल्याधिष्ठित लिखाण हीच संगणकयुगाची मागणी राहील. संगणकाने ज्ञानाचा व माहितीचा प्रचंड स्फोट घडवून ज्ञानाची गंगा मानवाच्या दारी आणली आहे. आज हे ज्ञान दाराचा उंबरठा ओलांडून दिवाणखान्यांत पोहचलेले आहे. प्रचंड ज्ञानभांडाराची उपलब्धी आज लहान-मोठ्यांपासून सर्व स्त्री-पुरुषांना झालेली आहे. संगणकाने साऱ्या विश्वाचीच कवाडे आपल्याला उघडून दिली व वैश्विकतेचे भान स्वीकारण्याचे आवाहन केलेले आहे. ज्ञानाच्या या झगझगत्या प्रकाशाकडे पाहण्याचे धाडस आपण करणार की डोळ्यावरच्या भूमिकांची झापडे कायम ठेवून त्या अंधारात राहणार, अभिव्यक्ती करणार हा पेच आजच्या लेखक-लेखिकांना पडायला हवा.

ज्ञानाची उपलब्धी वैश्विक पातळीवर पोहचली मात्र या ज्ञानाने निर्माण होणारी विश्वबंधुत्वाची जाणीव पण निर्माण झाली नाही असेच आजचे चित्र दिसत आहे. किंबहुना आजच्या मराठी साहित्यात तरी या वैश्विक भानाचे प्रतिबिंब उमटलेले दिसत नाही. त्यामुळे विचारांची कक्षा वाढली पण अभिव्यक्ती मर्यादितच राहिली. मानवाच्या जगण्याची पद्धती व राहणीमान वैश्विक पातळीशी साधर्म्य साधणारे बनले पण वैचारिक पातळी व तिची अभिव्यक्ती जन्मदत्त निष्ठांनी व भूमिकांनी जखडलेलीच राहिली. त्यामुळे आजचे वाङ्‌मयीन लिखाण प्रामुख्याने आत्मकेंद्री व आत्मग्रस्त ठरते. आत्मकथांची व चरित्रांची सतत वाढणारी संख्या हे याच प्रवृत्तीचे कारण असू शकेल.

संगणक युगाची मागणी ही आत्मनिष्ठेला विसरून ‘हे विश्वची माझे घर’ या सार्वत्रिक मनोवृत्तीची मागणी आहे. दुर्दैवाने आमच्या साहित्यिकांची भूमिका अशी Think globally but write and ewpress locally अशी आहे. अस्मितांचे प्रश्न यांचेच फलित. वाङ्‌मयात प्रादेशिक वाङ्‌मय, स्त्रीवादी वाङ्‌मय, जनसाहित्य, दलित वाङ्‌मय इत्यादी अनेक वाङ्‌मय प्रकार उदयाला आले. एकविसावे शतक Think globally and write / ewpress globally हा नारा घेऊन येत आहे. या नव्या मागणीची दखल घेऊन आलेली अभिव्यक्तीच सकस व कालानुरुप निरंतन व अमर ठरते. पुरुषलिखित साहित्यदेखील या आक्षेपाला उत्तर देण्यास समर्थ नाही. पुरुष लिखित साहित्याची ही तऱ्हा तर स्त्रीलिखित साहित्याला तर गेल्या दशकात आत्मकेंद्राची जाणीव झालेली दिसते. 1975 नंतरच्या काळात ‘आत्मभान’ व त्यानुसार अभिव्यक्ती याचा हळूहळू शिरकाव आपल्याला स्त्रीलिखित साहित्य प्रकारांत जाणवायला लागतो. त्यामुळेच 1980 पूर्वीचे स्त्रीलिखित वाङ्‌मय अनेक समीक्षकांच्या चिंतनाचा व चिंतेचा विषय ठरले. अनेकांच्या मते हे लिखाण हुंदके, अश्रु व उसासे यांचे जाहीर प्रगटन होते. काहींना ही अभिव्यक्ती मध्यमवर्गीय सुशिक्षित स्त्रियांची गोंडस व मृदु भाषेतील बेगडी अभिव्यक्ती वाटली तर इतरांनी या काळातील स्त्री अभिव्यक्तीवर मर्यादित सर्जनशील संवेदन क्षेत्र, तोकडी बहिर्मुख दृष्टी व कृत्रिमतेची बजबजपुरी इ. आक्षेप घेतले.

संगणकयुग खऱ्या अर्थाने 1980 नंतर सुरू झाले असे मानले तर या युगातल्या स्त्री अभिव्यक्तीने अणुयुगातल्या स्त्री अभिव्यक्तीवर घेतल्या गेलेल्या वर निर्दिष्ट आक्षेपांना उत्तर देण्याचा चांगला प्रयत्न केला आहे. उदाहरणादाखल समाजाने भ्रष्ट ठरविलेली आजची कुमारी माता व तिचे मन अतिशय धाडसाने व रोखठोकपणे शब्दांकित करतांना कवयित्री ज्योत्स्ना चांदगुडे माता या कवितेत म्हणतात,

हे जीवा,

तुझ्या पित्याचे पाय दुर्बल असतील

तरी मातेची कूस समर्थ आहे.  

निर्भय मनानं या जगात प्रवेश कर

इथे तुझं स्वागतच आहे.

ही माता कदाचित फसवली गेली असेल पण आपल्या दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर येणाऱ्या जीवाला कुठलाही दोष न देता त्याचं पालनपोषण करण्याची जबाबदारी स्वीकारून समाजाला एक प्रकारे आव्हानच देत आहे. दुःखाला जात नसते व सुखाला पंथ नसतो. हे कुमारी मातेचं मन चीनपासून अमेरिकेपर्यंतच्या कुठल्याही युवतीचं असू शकतं. ही छोटीशी कविता येणाऱ्या स्त्री अभिव्यक्तीच्या सडेतोडपणाची व विश्वव्यापक मनाची नांदीच ठरू शकेल.

संगणकयुग अशा आधुनिक व व्यापक विचार करणाऱ्या मनाची वाट पाहील. हे मन द्वेष, राग, पूर्वग्रह, स्पर्धा यापासून मुक्त राहील व आपल्या जाणिवेचा विचार व अभिव्यक्ती निखळ मानवधर्माच्या आधारे करेल. संगणकयुगातील असे आधुनिक स्त्रीमन सर्व व्यापक व सर्वसमावेशक विचारांची बैठक लाभलेले राहील व तेच तिच्या जाणिवेचे, नेणिवेचे व अभिव्यक्तीचे अधिष्ठान राहील. असे मन अनेक संस्कृतींचा साकल्याने विचार करणारे असेल. वाङ्‌मयीन ऊर्जेचा भूगोलच यातून बदलण्याचा संभव राहील. अनेक संस्कृतींशी, चालीरीतींशी व धर्माशी फार जवळचा संबंध व देवाणघेवाण प्रस्थापित होण्याचे हे युग असल्यामुळे या व्यामिश्र संस्कृतींचे संस्कार मनावर होतील व त्याचे प्रतिबिंब वाङ्‌मयात उमटणार हे नक्की. पुरुषांपेक्षा स्त्रियांच्या वाङ्‌मयात ते जास्त ठळकपणे उमटलेले दिसतात. उदा. गौरी देशपांडे, सानिया यांच्या -लिखाणाला संस्कृतीची कुंपणे नाहीत. त्यांची कथाबीजे अस्सल मनोव्यापाराच्या छटांशी संबंधित आहेत व मानवी मनाचे निखळ दर्शन या लिखाणातून समोर येते. संगणकयुगात एखादी लेखिका अशीही राहील की तिच्या अभिव्यक्तीचा कॅनव्हास पूर्ण जगच राहील. या जागतिक कॅनव्हासवर जाण्याची मानसिकता ही स्त्री लेखिकांमध्येच जास्त प्रमाणात तयार होण्याची शक्यता आहे. स्त्रीचा स्वभाव हा मुळात जुळवून घेण्याचा व समजून घेण्याचा. (adapatability) भारतात तर स्त्री मानसिकता हिने फार लवकर आधुनिक रूप धारण केल्याची उदाहरणे आहेत. ती काही प्रमाणात न होण्याची कारणेदेखील पुरुष बंधने हीच आहेत. सारांशाने यापुढील काळात अभिव्यक्तीचा प्रवास हा आत्मकेंद्री साहित्याकडून वैश्विक मानसिकतेकडे जाण्याचा राहील. त्याची शुभलक्षणे अरुंधति रॉय व झुंपा लाहिरी यांच्या वाङ्‌मयाला मिळालेल्या जगमान्यतेतच दिसून येतात. पण अशी जगमान्यता प्राप्त होण्यासाठी काही गोष्टी ठळकपणे स्त्री लेखिकांना टाळाव्या लागणार आहेत. धर्म, पंथ, रूढी, जात व वंश यासारख्या ज्या जन्मजात निष्ठांनी आपल्या अभिव्यक्तीला जखडून ठेवले आहे. ती बंधने नुसती सैलच करावी लागणार नाहीत तर विवेकानुसार त्यांना बाजूला सारावे लागणार आहे. ही गोष्ट थोडी कठीण वाटते.

अखिल भारतीय स्तरावरील नेत्यांना आज जात, धर्म, पंथ यांच्या बेड्या तोडता आलेल्या नाहीत. पण अखिल भारतीय पातळीवरच्या प्रतिभावंत स्त्रियांनी ही बंधने फारशी पाळली नाहीत. इंदिरा गांधी, किरण बेदी, मेधा पाटकर, गीता मुखर्जी इत्यादी अनेक स्त्रियांनी साकल्याने विचार केलेला दिसतो. स्त्रियांच्या अभिव्यक्तीने भविष्यात ही उंची गाठायला हवी. हिलरी क्लिंटन किंवा लेडी डायनाच्या दुःखाची मानसिकता एका सामान्य स्त्रीच्या व्यथेसारखीच आहे. जोडीदाराने केलेला विश्वासघात व त्याचे दुःख हे आपल्यापैकी कुणीही एक लेखिका तेवढ्याच समर्थपणे प्रगट करू शकेल. कारण स्त्रीजातीची सुख-दुःखे एकच व सारखी आहेत. मराठीतल्या अनेक लेखिका या मनोव्यथेला सामोऱ्या गेल्या असतील. त्यांनी ही व्यथा आपल्या वाङ्‌मयात प्रगटही केली असेल पण ती जगमान्य का झाली नाही? ती अभिव्यक्ती केवळ मराठी जगाच्या सीमेपुरतीच का सीमित राहिली? या प्रश्नांची उत्तरे शोधताना आमच्या स्त्री-लेखिकांना त्यांच्या लिखाणाच्या पद्धतीत व शैलीत बदल करावा लागेल. त्यासाठी अभिव्यक्तीचे नवे संकेत व साधने यांचा शोध घ्यावा लागेल. संपूर्ण स्त्रीजातीला समजू शकेल अशा प्रतिमांचा व रूपकांचा शोध घ्यावा लागेल. जगभर घडणाऱ्या घडामोडींची दखल घ्यावी लागेल.

अभिव्यक्तीला मग प्रादेशिकतेची व संस्कृतिची बंधने चालणार नाहीत. भाषेच्या मर्यादा व अडसर दूर करायला संगणक मदतीला आहेच. मराठी लेखिकांचे लिखाण इतर भाषांत रूपांतरित करताना ही अडचण सतत जाणवते. कुंकू, सौभाग्य, मंगळसूत्र, बांगड्या, पांढरं कपाळ, बोहले, उंबरठा ही प्रतीकं कशी भाषांतरित होणार व समजणार? अशा सर्व व्यापक जाणिवेचा शोध घेताना संगणकाची मोलाची मदत होईल कारण संगणक स्त्री-पुरुष, लहान-मोठा हादेखील भेद मानत नाही. संगणकावर काम करणारा मेंदू हा ‘मानवी’ असतो. संगणकाची भाषा एकच असते. संगणकाला अभिप्रेत अशा एकात्मकतेकडे जायचे असेल तर आजच्या लेखिकांना स्वतःचे ‘स्त्री’त्व प्रथम समजून घेऊन, त्याचा स्वीकार करून मनुष्यधर्माकडे जावे लागेल.

आजकाल खूप लेखिकांमध्ये ‘आम्ही स्त्री- मुक्ती वाल्या नाही’ असे ठासून सांगण्याची टूम निघालेली दिसते. परंतु जोपर्यंत तुम्हाला स्वतःच्या स्त्रीत्वाची व त्यावर होणाऱ्या अन्यायाची जाण नाही तोपर्यंत तुम्ही त्यावर उठूच शकत नाहीच. स्त्रीवाद किंवा स्त्रीमुक्ती-वाद स्वतःला स्वतःची ओळख पटवून देतो व व्यापक विचाराचा सोपान चढण्याची ती पहिली पायरी आहे. ही पायरी चढल्यावर अभिव्यक्तीची उंची कोणता कळस गाठते याचे जिवंत उदाहरण म्हणजे अमृता प्रीतम या आहेत. अमृताजींनी स्वतःचा स्त्री म्हणून कधीच विचार केला नाही व इतरांनाही करू दिला नाही. पण स्त्रीच्या ज्या म्हणून नैसर्गिक प्रवृत्ती आहेत. (मातृत्व, हळुवारपणा, संवेदनशीलता) त्याही नाकारल्या नाहीत. स्वतः दिसायला अतिशय देखण्या व सुस्वरूप पण स्वतःच्या सुंदर देहात त्या अडकून पडल्या नाहीत. रूपापलीकडे जाऊन जगल्या. विवाहोत्तर संबंध असूनही त्यांच्यावर स्वैराचाराचा आरोप झाला नाही. त्यांच्या नातेसंबंधाच्या रेषा जरी अस्पष्ट व धूसर असल्या तरी या सर्व संबंधाच्या मुळाशी स्वतःशी असणारा प्रामाणिकपणा हाच महत्त्वाचा मानला. त्यांचे जगणे ‘बाईपणाच्या पिंजऱ्यात’ अडकून पडलेले नाही. त्यांच्या जगण्यात सहजता व नैसर्गिकता आहे व तीच त्यांच्या साहित्यात व अभिव्यक्तीत उतरली आहे. त्यांचे लिखाण प्रत्येक स्त्रीला ‘तू फक्त स्त्री नाहीस, माणूस आहेस’ या वास्तवतेची जाणीव करून देते. अमृता प्रीतमची उंची गाठणे प्रत्येक लेखिकेला कदाचित जमणार नाही. पण त्यांच्यापासून वाङ्‌मयीन प्रेरणा घेणे हे तर आपल्या हातात आहे.

या ठिकाणी गांधीजींना अभिप्रेत असलेल्या मातृत्वाच्या कल्पनेचा विचार येतो. गांधींच्या मते मातृत्वाची ही संकल्पना जीवशास्त्रीय नसून मूलतः एक सांस्कृतिक व भावनिक संकल्पना आहे. मातृत्व पुरुषनिरपेक्ष व पत्निनिरपेक्ष आहे. ही सांस्कृतिक आशयाने भरलेली कल्पना स्त्रीला beyond biology ची पातळी गाठण्यास मदत करते. गांधी किंवा बेटि फ्रिडान यांना अभिप्रेत असे स्त्रीमन विश्वात्मक पातळी गाठू शकेल व अशा मनाची अभिव्यक्ती ही मानवी मनाची, सुखदुः खाची व भावनांची सच्ची अभिव्यक्ती राहील.

एकविसाव्या युगातील स्त्रीलेखिकांच्या अभिव्यक्तीला आतापर्यंत स्त्रीजातीवर झालेल्या अन्यायाची रडगाणी गाऊन चालणार नाही. तिला यापुढे स्वतःच्या कर्तृत्वाचीच व यशाची गाणी गावी लागणार. विसाव्या शतकाच्या नैराश्यपूर्ण व वैफल्यग्रस्त मनस्थितीतून पूर्णपणे बाहेर पडल्याशिवाय ही अभिव्यक्ती सर्वमान्य होणार नाही व त्यासाठी आमच्या लेखिकांना आमच्याच इतिहासाने घडवलेली उत्तुंग व्यक्तिमत्त्वे आदर्श म्हणून स्वीकारावी लागणार. अबोध वयापासून तो संतत्व मिळण्याच्या वयाच्या एकोणिसाव्या वर्षांपर्यंत ज्ञानेश्वरांना समाजाच्या कुचेष्टा, अपमान व निंदाच सहन कराव्या लागल्या. पण जुना, जाचक व कष्टप्रद भूतकाळ विसरून त्यांनी ‘पसायदान’ लिहून विश्वकल्याणाची गाणी लिहिली. गांधीजी बलाढ्य अशा इंग्रजांच्या हालअपेष्टा सहन करून सतत स्वातंत्र्याचे गाणे गात राहिले. नेल्सन मंडेला 27 वर्षे दक्षिण आफ्रिकेत गोऱ्या सरकारच्या तुरुंगवासात राहिले पण अध्यक्ष झाल्यावर उपाध्यक्ष म्हणून ज्याने तुरुंगवास ठोठावला, त्या कट्टर शत्रूचीच निवड केली.

सगळ्याच लेखिकांना मनाची एवढी उत्तुंग उंची गाठणे कदाचित जमणार नाही. पण लहानशी मुक्ताई तर आपले प्रेरणास्थान ठरू शकेल? ज्ञानेश्वरांच्या गुरुस्थानी जरी निवृत्तिनाथ होते तरी आयुष्यातल्या उद्विग क्षणी दिलासा देणारी शक्ती मुक्ताईच होती. सगळ्या प्रकारच्या अभावातून जाताना तिने ज्ञानेश्वरांना अवघे विश्व झालिया वन्हि। संतमुखे व्हावे पाणी व तुम्ही तरोनी विश्व तारा। ताटी उघडा ज्ञानेश्वरा असा बहुमोल उपदेश केला. एकविसाव्या शतकातली स्त्री अभिव्यक्ती स्वतःलाच तारणारे लिखाण करणार नाही तर अवघ्या विचाराला मार्ग दाखवण्याचे आव्हान स्वीकारेल असा आशावाद नव्या शतकाच्या उंबरठ्यावर व्यक्त करणे चुकीचे कसे ठरेल?

एक आगळी-वेगळी सीता

जगाचा इतिहास हा संस्कृती-संघर्षाचा आहे. या संघर्षात कधी धर्माचा, कधी वंशाचा, कधी वर्णाचा, तर कधी आर्थिक प्रभुत्वाचा आधार घेतला गेला.  खांडवदाहाचा अत्याचार केल्याशिवाय अर्जुनाला यश मिळाले नाही. काही शतकांपूर्वी ब्रिटिशांनी रेड इंडियन्स लोकांचा वंशच्छेद करून अमेरिका काबीज केली. ऑस्ट्रेलियातही तोच प्रकार घडला. अमेरिकेला ॲटम बॉम्बचा वापर केल्याशिवाय विजयी होता आले नाही. या विजयात जे जेते असतात त्यांना त्यांच्या अत्याचाराबाबत जनाची व मनाची लाज वाटत असते. ही लाज लपविण्यासाठी मग अत्याचारांना गोंडस रूप व नावे दिली जातात व जेत्यांच्या संस्कृतीचे कधी दैवीकरण तर कधी उदात्तीकरण केले जाते. रामायणाची कथा देखील याच तत्त्वज्ञानाचे एक मूर्त स्वरूप आहे काय?

या प्रश्नाचा ऐतिहासिक दृष्टिकोनातून अभ्यास करणारे व रामायणाचा एक नवा आयाम जगासमोर मांडण्याचे धाडस करणारे फारच थोडे विद्वान व अभ्यासक आहेत. त्यासाठी बुद्धिप्रामाण्यवादाची कास धरावी लागते व समाजाचा रोष पत्करावा लागतो. पुराणातील पंचकन्या म्हणून गौरविल्या गेलेल्या कन्यांपैकी एक कन्या सीता. तिचे वर्णन सुशील, सच्छील, विनयशील व पतीच्या पावलावर पाऊल टाकून चालणारी एक पतिव्रता असे केले जाते. ही सीता समाजातील अन्यायग्रस्त व दुर्बल घटकांच्या मागे उभी राहून प्रत्यक्ष रामाला विरोध करण्याचे धाडस करते ही कल्पनाच विलक्षण आहे. पण अशी सीता आपल्याला भेटते तेलुगु पंडित व लेखक श्री.नार्ला वेंकटेश्वरराव यांच्या ‘सीता जोस्यम्‌’ (सीतेचे भाकित) या नाटकात. कै.नार्ला वेंकटेश्वरराव हे तेलुगुतील एक व्यासंगी, निर्भीड पत्रकार व संपादक म्हणून ओळखले जातात. पहिल्या प्रेस कौन्सिलचे सदस्य असलेले नार्ला जवळजवळ एक तप राज्यसभेचे सभासद होते. सखोल संशोधन व अभ्यासानंतर बुद्धीला जे पटेल तेच आपल्या लेखणीद्वारे मांडणे, हा त्यांचा बाणा रामायणाच्या सर्व ग्रंथांचा अभ्यास केल्यानंतर, त्यांच्या तर्काने व बुद्धीने त्यांना ज्या निष्कर्षाप्रत आणून पोहचवते ते मांडण्यासाठी त्यांनी ‘जाबाली’ व ‘सीता जोस्यम्‌’ ही खळबळजनक नाटके लिहिलीत. यातील ‘सीता जोस्यम्‌’ला साहित्य अकादमीने एक उत्कृष्ट ग्रंथ म्हणून पुरस्कृतही केले आहे.

भारताच्या दक्षिण भागातील अरण्यांमध्ये वस्ती करून असलेल्या आदिवासी लोकांना हुसकावून लावून ही अरण्ये जाळून शेतीयोग्य करण्याचा आर्यांचा फार मोठा प्रयत्न सांगणारी रामायण ही कथा आहे, असे नार्ला प्रतिपादन करतात. नाटकाला जोडलेल्या प्रदीर्घ पीठिकेमध्ये आपली भूमिका व निष्कर्ष रामायणातीलच दाखले देऊन ते स्पष्ट करतात. यातील आर्य म्हणजे अगस्ती, भरद्वाज, अत्री, सुतीक्ष्ण इत्यादी दंडकारण्यात वास्तव्य करणारे ऋषीमुनी, ज्यांना आहारोत्पादन कृषी व्यवसायाद्वारा करायचे होते. आदिवासी म्हणजे या अरण्यात पूर्वीपासून निवास करत असलेल्या राक्षस, दैत्य, निषाद, द्रविड, किरात, भिल्ल या जमाती. या सर्व जमाती अरण्यातील पशू, पक्षी, कंद, फळे, मुळे इत्यादी आहार संकलन करून जगणाऱ्या. यज्ञयागाच्या नावाखाली या ऋषींना दंडकारण्य जाळून त्यावर शेत्या करायच्या होत्या, पशुधन वाढवायचे होते व शेतीला आवश्यक असलेले मजूर शिष्यांच्या रूपाने गोळा करायचे होते. त्यात त्यांना सगळ्यात मोठा अडथळा या जमातींचा (की राक्षसांचा?) होता. त्यांनी वनवासी रामाला या राक्षसांचा संहार करण्याला प्रवृत्त केले व ‘प्राण जाये पर वचन न जाये’ वृत्तीचा राम या कारस्थानाला बळी पडला.

प्रसिद्ध इतिहासकार रोमिला थापर पण म्हणतात, ‘‘गंगेच्या खोऱ्यात अन्नधान्य पिकवणारे लोक व विंध्याद्रिच्या परिसरात राहून अन्नधान्य जमा करणारे लोक यांच्यातील संघर्ष म्हणजे रामायणकथा.’’ ‘सीता जोस्यम्‌’ची नायिका सीता ही 16 ते 17 वर्षांची तरुणी असूनही अत्यंत प्रगल्भ बुद्धीची, परिस्थितीचे पूर्ण आकलन असणारी व अचूक निर्णयक्षमता लाभलेली स्त्री आहे. रामाला आपल्या कुळाच्या श्रेष्ठत्वाचा फार मोठा अहंकार असून त्यापायी तो आपल्यावर फार मोठी संकटे ओढवून घेतो ही धास्ती तिच्या मनात सदैव दडलेली असते. राक्षसांचा निःपात करायला गेलेला राम लवकर परत न आल्यामुळे नाटकाच्या सुरुवातीलाच ती व लक्ष्मण चिंतित आहेत. पहिल्या प्रवेशात तिचे व लक्ष्मणाचे, रामाच्या श्रेष्ठत्वाबाबतचे संवाद अतिशय खटकेबाज आहेत. दीर-भावजयांमधले नाते खेळकर, थट्टेखोर व हसरे आहे. परंतु लक्ष्मण सदैव रामाच्या मोठेपणाच्या ओझ्याखाली दबलेला, गांगरलेला व त्यामुळे सीतेला निरुत्तर करण्याची क्षमता नसलेला वाटतो. तर सीता तर्कपटू, विचारशील व उपहासखोर बोलण्याने समोरच्याला त्याची जागा दाखवून देणारी तडफदार स्त्री वाटते.

रामाला यज्ञरक्षणासाठी निमंत्रण देण्यासाठी आलेल्या ऋषींना ती ताड्‌ताड बोलते. ती म्हणते, ‘‘होमकुंडे आपण पेटवीत आहात ती कशासाठी? ही अरण्ये जाळून टाकायसाठीच ना? ती जाळलेली भूमी समपातळीत आणून तीवर नांगर फिरवण्यासाठीच ना? त्यामुळे आपणास धान्य मिळेल. आपल्या कणग्या भरतील. आपले संसार बहरतील. पण मग इथल्या लोकांचे काय? हे लोक फळे वेचून, कंदमुळे खाऊन त्यावर जीविका चालवितात ना? जी अरण्ये आपल्याला नष्ट करावयाची त्यावर ते अवलंबून नाहीत काय? पक्षी पकडून, प्राणी मारून जीविका चालविणे ही त्यांची संस्कृती नाही काय? ह्या अरण्याचाच आपण नाश करतो तो त्यांच्या जीवनाचा सर्वनाश नाही का?’’ यावर ऋषी म्हणतात की, या आदिवासींनीदेखील होमकुंडे पेटवावीत व आमच्या नागरजीवन पद्धतीचा स्वीकार करावा. त्यावर ती ताडकन त्यांना विचारते, ‘‘आपल्यासारख्याच मानवबंधूंची, प्राण्यांची करावी तशी शिकार करायची व त्यांची निवासस्थाने बळकावयाची, ही तुमची नागरिकता का?’’

पहिल्या प्रवेशाच्या शेवटी ती त्या ऋषींना जवळपास हाकलूनच लावते. दुसऱ्या अंकात सुरुवातीलादेखील राम परत आलेला नाही. त्याने निदान सीतेला तसा निरोप तरी पाठवायला पाहिजे होता. या लक्ष्मणाच्या वक्तव्यावर ती वैतागून म्हणते, ‘‘ते वनवासींचा संहार करण्याच्या कार्यात पूर्णपणे गुंतलेले. अशा माणसाला बायकोची, भावाची आठवण असते म्हणता? ते आपल्या शौर्याचा पुरेसा प्रकाश दाखवतील. रघुवंशाच्या प्रतिष्ठेचे पुरेसे संरक्षण करतील. ऋषींनी गाईलेले स्तुतीपाठ पोट भरेतो ऐकतील. मग सावकाश घरी येतील.’’ रामाला वनवासातदेखील आपली पर्वा नाही ही तिची व्यथा आहे. त्यामुळे घरी आलेल्या रामाला क्षणाचीही उसंत न देणाऱ्या ऋषींसोबत ती रामाचा रोष पत्करून वाद घालते.

रामाने दक्षिणेकडे जनस्थानांतच वास्तव्य करावे, असे प्रत्येक ऋषीने का सुचविले, या तिच्या प्रश्नाचे रामाजवळ उत्तर नाही. संन्याशाप्रमाणे वास्तव्य करावे, असे प्रत्येक ऋषीने का सुचविले, या तिच्या प्रश्नाचे रामाजवळ उत्तर नाही. संन्याशाप्रमाणे विरक्त जीवन जगणारे ऋषीमुनी निरनिराळी शस्त्रे (धनुष्ये व अस्त्रे) का बाळगतात? याही प्रश्नाचे सबळ उत्तर राम देऊ शकत नाही. हे लोक रामाला धनुर्विद्येचा वापर वारंवार करायला का भाग पाडतात, हेही रामाला समजत नाही. तो फक्त दिलेला शब्द पाळणे एवढेच जाणतो. ती त्याला विनवते, ‘‘माझे म्हणणे ऐका. शस्त्रांना नेहमी रक्ताची तहान असते. नरबळीची अभिलाषा असते. कारुण्यमूर्ती पुरुषही शस्त्र हाती येताच क्रूर होतात. शांतीप्रिय लोकही युद्धोन्मत्त होतात. तुमच्या हातात सतत शस्त्रे असतात. तीच तुम्हाला हिंसक प्रेरणा देतात. माझ्या बोलण्याची क्षमा करून निदान आता तरी शस्त्रे टाकून द्या.’’ ती रामाला वारंवार विनवते की, त्या वनचरांना त्यांच्या पद्धतीने आयुष्य जगू द्यावे. ऋषींच्या स्वार्थाकरता रामाने त्यांचा नाहक वध करू नये. परंतु राम त्यावर म्हणतो, ‘‘वेळ पडली तर मी तुझा त्याग करीन. लक्ष्मणाचा त्याग करीन. माझ्या प्राणांचाही त्याग करीन. पण या ऋषींना दिलेल्या वचनाचा भंग मात्र करणार नाही. त्याने आपल्या कुलकीर्तीला डाग लागेल.’’

यावर स्वाभिमान, कोप व हतबलता या तीनही भावनांच्या संमिश्र स्वरात ती भाकीत करते, ‘‘तुमच्या कुलकीर्तीसाठी तुम्ही एक ना एक दिवस या घोर अरण्यात निराधार असलेल्या तुमच्या पत्नीचा बळी देणार आहात.’’

इथेच नाटक संपते. आपला पती करत असलेले कार्य नैतिकतेला धरून नाही, मानवतेला धरून नाही. त्यामुळे मानवतेला, स्वतःला व आपल्या कुटुंबाला धोका आहे, ही स्पष्ट जाणीव व दूरदृष्टी सीतेला लाभली आहे. आम्हाला आमच्या पद्धतीप्रमाणे जगू द्या, अशी विनवणी करणाऱ्या अरण्यवासी जमातींबद्दल तिच्या मनात कणव आहे. पण ती हतबल आहे. केवळ ऋषींना शब्द दिला म्हणून निष्पाप आदिवासींची निर्दय हत्या करण्यापासून आपल्या नवऱ्याला परावृत्त करण्यात अयशस्वी ठरलेल्या एका तरुण पत्नीची ही कहाणी आहे.

या छोटेखानी नाटकाला नार्लांनी जोडलेली प्रदीर्घ प्रस्तावना मात्र चिंतन करायला लावणारी आहे. नाटक लिहिताना कुठेही कल्पनेचा आधार न घेता संस्कृत रामायणातून त्यांनी सगळे साक्षीपुरावे सादर केले आहेत. आपल्या मुद्‌द्यांना बळकटी आणण्यासाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विद्वानांची साक्ष घेतली आहे. या नाट्यलेखनामागची त्यांची भूमिका विशद करताना ते म्हणतात, ‘‘लोकांमधली विचारशक्ती व जिज्ञासा जागृत व्हावी व जुन्या विषयांकडे नव्या परिमाणांतून बघण्याची  वृत्ती निर्माण व्हावी ही माझी इच्छा. ‘वेदवाक्यम्‌ प्रमाणम्‌’ ही वृत्ती जाऊन पुनश्च असंख्य प्रश्नोपनिषदे निर्माण व्हायला हवीत.’’

नाटकाच्या लेखनातून नार्लांना शोधायचे आहे ते अशा प्रकारचे नवचैतन्य, प्रगती व मानसिक परिवर्तन. प्रस्तावनेच्या उपसंहारात ते लिहितात, ‘‘रामायण- महाभारत असो, की अठरा पुराणे असोत, त्यांचा मुख्य उद्देश वर्णव्यवस्थेचे रक्षण करणे, सरंजामशाही समाजाला सुस्थिर करणे हा होता. त्यामुळे वर्तमान पद्धतीने त्यांचा प्रसार चालू राहिल्यास ‘नवसमाजनिर्माण, नूतनधर्म संस्थापना’ या निव्वळ घोषणाच राहणे संभवनीय आहे. जवळ-जवळ पंधराव्या शतकापासून आपल्या मानसिक विकासाला, सामाजिक प्रगतीला, रामायण- महाभारत यांचा प्रभाव हा तीव्र असा प्रतिबंधक अडथळा होऊन राहिला आहे. हा प्रतिबंध आताही रद्द झाला नाही  तर, आपण आधुनिक युगात प्रवेश करू शकणार नाही. प्रगती व अभ्युदय यांच्या मार्गावर पुढे सरकणार नाही.’’

हे अतिशय परखड ‘नार्ला सोस्यम्‌’ खरे की खोटे ते काळच ठरवेल. रामाचा दैवत म्हणून विचार करण्यापेक्षा परिस्थितीने बांधला गेलेला एक सामान्य माणूस म्हणून विचार केला गेला पाहिजे, असे त्यांना आवर्जून वाटते. नार्ला वेंकटेश्वररावांची ही सीता कुणाला आवडो न आवडो, पण ती उभी करणाऱ्या आपल्या लेखणीच्या मागे नार्लांनी जो प्रचंड व्यासंग उभा केला आहे तो मात्र प्रत्येकाला मानावाच लागेल, त्या व्यासंगाला व व्यासंगी वृत्तीला त्रिवार सलाम!

 (‘चिंतन एका मनस्विनीचे’ या पुस्तकातून साभार.)      

Tags: jaya dwadashiwar narla vyakateshwar book literature chintan eka manswiniche जया द्वादशीवार नार्ला वेंकटेश्वर पुस्तक साहित्य चिंतन एका मनस्विनीचे weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके

कर्तव्य

सर्व पहा