डिजिटल अर्काईव्ह (2014-2019)

प्रश्न येतो तो या दोन भिन्न संस्कृती एकमेकांना भिडतात तेव्हा काय रसायन तयार होते आणि त्यातून कशा तऱ्हेने स्फोट होऊ लागतात ते समजून घेण्याचा एक प्रयत्न सरिताच्या आत्मचरित्रातून दिसून येतो. सरिताच्या नजरेमध्ये, गेझमध्ये गरिबांसाठी काम करण्याचा मार्क्सवाद आहे, लोहियांची जातीभेद तोडण्याची उर्मी आहे आणि पुरुषसत्ता कशी काम करते ते सूक्ष्मपणे समजून घेण्यासाठी लागणारी स्त्रीवादी दृष्टीसुद्धा आहे. येथे केवळ ‘ऑनरकिलिंग’ किंवा ‘सन्मान जपण्यासाठी हत्या’ या आजकाल गाजत असलेल्या घटनांचा संदर्भ घेऊन कशी स्फोटक परिस्थिती अपरिहार्य होती असे म्हणून चालणार नाही. जातीभेदातून, उच्च नीच जातीच्या संकरातून जन्माला आलेले नाट्य इतके ढोबळ वर्णनही लागू पडत नाही. 

‘हमरस्ता नाकारतांना’ हे सरिता आवाड यांचे आत्मचरित्र हे त्याच्या मलपृष्ठावर म्हटल्याप्रमाणे ती त्या ‘काळाची’ गोष्ट आहे. आणि तो काळ उलथापालथीचा आहे. परिवर्तनाचा आहे. मीही त्याकाळाचीच घटक, पण सरितापेक्षा सात-आठ वर्षांनी मोठी. तरीही तिला भेटलेली अनेक मंडळी माझ्याही वर्तुळात आलेली होती आणि म्हणूनच हे आत्मचरित्र खूपच भावणारे आहे.

सरिताने वर्णन केलेल्या काही गोष्टी त्या काळात मीही उडतउडत ऐकल्याचे आठवतंय. पण भूतकाळात वळून बघतांना तिने ज्या परिपक्वतेने त्या घटनांचा अर्थ लावलाय, त्यावेळचे भावजीवन हाताळलंय त्याला तोड नाही. अभिनंदनाचा वर्षाव करावासा वाटतोय. तिच्या जीवनात मध्यमवर्गीय मुलीच्या जीवनात सहसा न आढळणाऱ्या नाट्यमय घटना तर आहेतच. पण ते सांगण्याची आणि त्यातून अर्थ काढण्याची, त्यांचे विश्लेषण करण्याची आणि त्यातून शिकण्यासारखे सार काढण्याची विलक्षण हातोटी सरितामध्ये आहे.

प्रसंग घडतांना ती विस्कटून गेली असणारच, पण जीवनातील अनेक विसंगती भूतकाळाकडे बघताना सुसह्य होतात आणि तो सल सतत न बाळगता नव्याने जीवन जगता येते हे ती सतत दाखवून देते. सरळ मोकळेपणी. त्यावेळी आलेल्या अडचणी, भावनांचे प्रक्षोभ प्रामाणिकपणे मांडत राहते. पण त्यात अडकून पडत नाही. पुन्हा नव्याने त्या व्यक्तीकडे पहायला तयार होते. हा तिचा स्वभावच या पुस्तकाला वजन प्राप्त करून देतो.

थोडक्यात सांगायचे झाले तर ही तिची आणि तिच्या आईची गोष्ट आहे. नवऱ्याचीही आहे, पण नवऱ्याचे व तिचे नातेसंबंधही आईच्या संदर्भातच विकसित झालेले आहेत. आईचा तिच्यावर प्रचंड प्रभाव आहे. किंबहुना तिची लेखनकलेची क्षमता, साहित्याची आवड ही आईमुळेच निर्माण झाली हे ती पुन्हा पुन्हा मान्य करते. आईने तिच्यावर संस्कार करण्यासाठी घेतलेले परिश्रम हे तिच्या व्यक्तिमत्त्वाच्या उभारीसाठी खूप काही खतपाणी घालून गेले आहेत हेही ती मान्य करते. एवढ्या सगळ्या पार्श्वभूमीनंतर तिच्या आईचे नाव ऐकायला वाचक उत्सुक असणारच.

तिची आई म्हणजे माणूसच्या प्रसिद्ध लेखिका सुमती देवस्थळी. ज्यांनी लिहिलेली जागतिक किर्तीच्या लेखकांची चरित्रे बरीच गाजली. उदा. मला आठवतंय ते टॉलस्टॉयचे चरित्र. अतिशय भारावून लिहिलेले, टॉलस्टॉयच्या जीवनातील चढ उतार आणि त्याची मानसिकता तपासत तपासत त्याच्या व्यक्तीमत्वाचा शोध घेणाऱ्या वेधक शैलीचे कौतुक त्या काळी झालेले मला आठवतंय. गंमत म्हणजे हे आत्मचरित्र जसे सरिताचे आहे, तसे हे चरित्र सुमतीबाईंचेही आहे. मला माहीत नाही की कोणी त्यांचे चरित्र लिहिले आहे का किंवा त्यांनी आत्मचरित्र लिहिले आहे का. पण सरिता मूळांचा शोध घेत घेत तिच्या आजोळी, आईच्या माहेरी पोचलेली आहे. आणि आई समजून घेण्यासाठी तिला आजीच्या व्यक्तिमत्त्वाचा शोध घ्यावासा वाटू लागला आहे. आणि तिनेच म्हटल्याप्रमाणे तिला तिच्यातील आई गवसली, आजी सापडली. भूतकाळाशी दोस्ती करतांना त्यातल्या माणसांबरोबर ती पुन्हा जगली. मला तिच्या तपशीलवार लिखाणाचे फारच कौतुक वाटते. तो काळ उभा करणे, ब्राह्मणी घरातील संस्कारांचे दुवे कसे चिवटपणे आईला घेरून होते हे समजून यायला पहिल्या दोन प्रकरणांचा चांगला उपयोग होतो.

नवरा काहीसा ब्राह्मणी संस्कारात वाढलेला पण दलित किंवा नवबुद्ध पुरुष आहे आणि तिने एका बंडखोर वृत्तीने त्याला स्वीकारले आहे. आईच्या संस्कारांच्या पार्श्वभूमीवर ती जेव्हा स्वत:ला शोधण्याची धडपड करते आणि त्यावेळच्या उलथापालथीच्या लाटांवर आरुढ होऊन नवे विचार, नवी तत्त्वे, नवी मूल्ये यांचा स्वीकार करण्यासाठी सज्ज होते तेव्हा तिला रमेश आवाड भेटतो आणि त्याच्या अनेक पैलू असणाऱ्या व्यक्तिमत्त्वाची तिला भुरळ पडते. आणि मुख्य म्हणजे स्वीकारलेले जातीमुक्त समाजाचे मूल्य प्रत्यक्ष जगून दाखविण्याची जिगरही तिच्या अंगी बाणलेली असते. तिच्याबरोबर युक्रांद आणि समाज परिवर्तनासाठी झोकून देणारी अनेक इतरही मंडळी आहेत आणि त्यामुळे रमेशचे व तिचे प्रेम, त्यांचा विवाह हा सहज स्वीकारला जाईल याची तिला खात्री असते. म्हणजे आपण काही खास क्रांतिकारक करत आहोत असेही तिला कोठे जाणवलेले नसते.

ती आईला आपला निर्णय सांगते तेव्हाही आईला तो किती वेदनादायी होईल याची तिला कल्पनाही नसते. रमेश ज्ञानप्रबोधिनीमध्ये अप्पा पेंडसे यांच्या हाताखाली तयार झालेला. आईचे भाऊ, म्हणजेच सरिताचे मामा मामी जेथे रहायचे तेथेच अप्पा पेंडसे रहात असल्यामुळे रमेश त्या ठिकाणी आलेला तिने पाहिला होता. अतिशय शुद्ध मराठी बोलणारा, अफाट वाचन असणारा, आयआयटी मुंबई येथे शिकणारा हा तरुण तिला पुन्हा एकदा युक्रांदमध्ये जायला लागल्यावर भेटला आणि प्रेमाची ठिणगी पेटली. सरिताही टाटा सामाजिक संस्थेसारख्या समाजकार्य शिकविणाऱ्या आणि पुरोगामी वातावरणाची धुरा वागविणाऱ्या संस्थेमध्ये शिकलेली होती आणि समाजकार्य करण्याचे ध्येय स्वीकारून होती. अशा वातावरणामध्ये तिलाही आपण काही विशेष करत आहोत असे वाटले नसावे.

प्रश्न येतो तो या दोन भिन्न संस्कृती एकमेकांना भिडतात तेव्हा काय रसायन तयार होते आणि त्यातून कशा तऱ्हेने स्फोट होऊ लागतात ते समजून घेण्याचा एक प्रयत्न सरिताच्या आत्मचरित्रातून दिसून येतो. सरिताच्या नजरेमध्ये, गेझमध्ये गरिबांसाठी काम करण्याचा मार्क्सवाद आहे, लोहियांची जातीभेद तोडण्याची उर्मी आहे आणि पुरुषसत्ता कशी काम करते ते सूक्ष्मपणे समजून घेण्यासाठी लागणारी स्त्रीवादी दृष्टीसुद्धा आहे. येथे केवळ ‘ऑनरकिलिंग’ किंवा ‘सन्मान जपण्यासाठी हत्या’ या आजकाल गाजत असलेल्या घटनांचा संदर्भ घेऊन कशी स्फोटक परिस्थिती अपरिहार्य होती असे म्हणून चालणार नाही. जातीभेदातून, उच्च नीच जातीच्या संकरातून जन्माला आलेले नाट्य इतके ढोबळ वर्णनही  लागू पडत नाही.

येथे सुमतीबाईंसारखी अतिशय बुद्धिमान, संवेदनाशील व्यक्तिमत्त्व असलेली आणि महाराष्ट्रात जिचा बराच गवगवा झालेला आहे, त्या काळच्या सर्व सार्वजनिक विचारवंतांनी ज्यांची वाखाणणी केलेली आहे अशा व्यक्तीमत्वाची बाई, किंवा आई आपल्या ब्राह्मणी संस्कारांनी सरिताच्या या निर्णयाला आव्हान देते आणि जन्मभर हे आव्हान टिकवून ठेवते आणि हे सरिताला कळत रहाते तिच्या मधून मधून येणाऱ्या बोचऱ्या टिप्पण्यांमधून. मधूनमधून आई म्हणून तिचे कौतुक करण्याची संवेदना जागृत होते. बाळंतपणाला ती आपणहून घेऊन येते. पण तिच्या एखाद्या वाक्यातूनसुद्धा ती बोच सरिताला सतत जाळीत रहाते. एक बुद्धिमान व्यक्तित्व असा कसा संकुचितपणा दाखविते, जन्मभर उभा दावा मांडू शकते हे सरिताला कळत नव्हते. आणि मला वाटते की आईची ही मानसिकता कशातून तयार झाली हा शोध घेण्याचा हा तिचा प्रयत्न आहे.

आई-वडिलांच्या नात्याचाही तिने उभा आडवा छेद घेतला आहे आणि त्यातूनही तिला आईच्या मनाची तडफड जाणवलेली आहे. त्या मानाने सासरी सरिताला फार त्रास सहन करावा लागला नाही असे दिसते. आपापल्या जातीचा अभिमान प्रत्येकाला असतोच आणि तो आडवा येतो हे ती जाणून होती. ‘अर्थाचा’ अभाव हाही तिच्या जीवनात बराच काळ रेंगाळला आणि त्यालाही तिने तोंड दिले. तिला रमेशकडून त्रास झाला तो टिपिकल पुरुषी स्वभावाचा. बायकोवर घेतल्या जाणाऱ्या संशयाचा. येथे पुरोगामी विचारांची बायको झेपणे खूप जणांना कठीण जाते. शिवाय त्यात ही ब्राह्मण बायको. वेगळ्या संस्कारातून आलेली हीही भावना प्रभावी असते. त्यामुळे सरिताला आलेला एकटेपणा. सतत कसली तरी परीक्षा चालू आणि त्या कसोटीला उतरले नाही तर स्फोट. अशा विलक्षण परिस्थितीतून ती जाते. आणि तरीही जिद्दीपणाने शेवटपर्यंत निभावते यातच या आत्मचरित्राचे यश साठविलेले आहे.

सरिताने सुरुवात आजी पासून केली आहे कारण तिला आईचा प्रतिष्ठेचा आग्रह कसा सुरू झाला आणि शेवटपर्यंत एवढा घट्ट कसा राहिला हे समजून घेण्याची इच्छा आहे. कारण तिच्या मते तिच्या आणि आईच्या नात्यात जो तीव्र अंतराय निर्माण झाला त्यामध्ये ही प्रतिष्ठेची भावना आड आली. त्यामुळेच शेवटपर्यंत दलित मुलाशी लग्न केल्याबद्दल तिला सरिताला क्षमा करावीसे वाटले नाही. म्हणूनच परांडेवाड्यातील परांडे आजीचा, आईच्या आईचा जीवन प्रवास तिने पहिल्या प्रकरणात समजून घेतला. आणि तिला समजून आलं की तिच्या आईमध्ये तिची आजी होती, तिचा अतिशय मोठा प्रभाव होता आणि तसाच प्रभाव तिच्यावर टाकण्याचा तिच्या आईचा प्रयत्न होता. आणि काही प्रमाणात तो झालाही होता.

ती सरिताच्या बाबतीत खूप पझेसिव्ह होती कारण तिला सुसंकृत करण्यासाठी तिने तिच्यावर खूप परिश्रम केले होते. लहानपणापासून अनेक गोष्टी पाठ करून घेतल्या होत्या. पुस्तके वाचून घेतली होती. तिच्यात तिची आईही उतरली होती. स्वतंत्र होण्याची वृत्ती, जग पहाण्याची, प्रसिद्धी मिळविण्याची, प्रतिष्ठा मिरविण्याची तिच्या आईची जिद्द तिने स्वत:च्या प्रयत्नाने पूर्ण केली. ती जिद्द वेगळ्या तऱ्हेने सरितामध्येही दिसून येते. परांडे आजीचे लग्न १३ वर्षांची असतांना ४२ वर्षांच्या तिजवराशी झालं. पाच मुले झाली. नवऱ्याच्या निवृत्तीनंतर हट्टाने त्या पुण्याला रहायला आल्या आणि मोठा बंगला बांधण्याचे स्वप्न पूर्ण केले. घरात स्वयंपाकाला बाई, केरवारे करायला बाई अशा तोऱ्यात राहायल्या. जवळपासच्या जरा सुस्थितीतील ब्राह्मण बायकांबरोबर मैत्री करणे अशा प्रतिष्ठेच्या सर्व गोष्टी त्यांनी परवडत नसतांनाही आवर्जून केल्या. मुलांना शिकविणे हे त्यांचे खास ध्येय होते. सुमतीबाई म्हणजेच सरिताची आई ही शेवटची मुलगी नवऱ्याच्या निवृत्तीच्या काळात झाली, म्हणून जरा तिच्यावर राग पण तिने शिक्षणात प्रगती केली म्हटल्यावर तिचा अभिमान वाटू लागला.

सरिता वर्णन करते की, सदाशिव पेठेतील ब्राह्मण कुटंबातील वातावरणाचा तपशिल मी मुद्दामहून देते आहे. शुद्ध भाषेची लख्ख अस्मिता, सांस्कृतिक अभिमान, डिप्लोमॅटिक अबोला पांघरून मधाळ बोलणे, नात्या-गोत्यात रंगून गेलेले कुटुंब असं जातीय वैशिष्ट्यपूर्ण वातावरण मला लाभलं. आणि पुढे दलित मुलाशी लग्न केल्यावर तेथील कुटुंबाच्या वर्णनातून हा विरोधाभास प्रकर्षाने जाणवावा अशी सरिताची अपेक्षा आहे. अशा सांस्कृतिक वातावरणात वाढलेल्या आईच्या नशिबी मात्र अगदीच सामान्य दर्जाचा सामान्य कुवतीचा नवरा येतो आणि त्यातून तिची घुसमट सुरू होते.

नंतरची  कहाणी तिच्या आईची आहे. तिचा निष्कर्ष असा दिसतो की आई जी पुढे शिकली, कॉलेजात गेली, विद्यार्थ्यांमध्ये लोकप्रिय झाली ती या पार्श्वभूमीवर. नवऱ्याने तिला आर्थिक स्थैर्यही फार दिले नाही आणि सामाजिक प्रतिष्ठाही दिली नाही. ती स्वयंभू निघाली. पुढे तिला अपघात होऊन तिची तब्येत कमकुवत झाली आणि घरात बसावे लागले. त्यातून तिच्या सर्जनशीलतेला अनुकूल परिस्थिती निर्माण झाली आणि प्रतिभेला बहर आला. महाराष्ट्रातील एक आघाडीची चरित्रकार म्हणून तिने नाव कमावले. पण जन्मभर तिने नवऱ्याकडे काहीशा तुच्छतेने पाहिले. आणि त्याच वेळी मुलांकडे आणि विशेषत: मुलीकडून खूप अपेक्षा ठेवल्या. त्यांच्यावर तिची स्वामित्वाची भावना तयार झाली. दलित मुलाशी लग्न या बातमीनेच तिच्या अपेक्षांचा चक्काचूर झाला. त्यातही रमेशने आय. आयटी.चे शिक्षण पूर्ण केले नाही, किंवा त्याला अपयश आले तेही तिला खूपच अपमानास्पद वाटले. याउलट सरिताच्या वडिलांची प्रतिक्रिया होती. सरिताचे वडिलांविषयीचे प्रकरणही छान झाले आहे. तिने कधीही त्यांना दूषणे दिली नाहीत. त्यांचे प्रेमही तिने समजून घेतले. ते कोणत्याच बाबतीत आततायी नव्हते.

पुढील प्रवास लग्नानंतरचा आहे, पण त्याबरोबर करिअर संबंधीही आहे. मला कौतुक वाटते ते प्रत्येक ठिकाणच्या नोकरीमध्ये आलेले अनुभव तिने अतिशय समतोलपणे पण चिकित्सकपणे नमूद केले आहेत. तिची डायरी ठेवण्याची संवय यासाठी फार उपयोगी पडली असावी. किती तरी तपशिलात जाऊन, नावे घेऊन ती बरीच काही निरीक्षणे नमूद करते आणि तरी ते कंटाळवाणे वाचन होत नाही. कारण त्यामध्ये तिची दृष्टी, तिची मूल्ये, तिचे लॉजिक सतत दिसून येते. मला कुतूहल होते ते याबद्दल की टाटा सामाजिक संस्थेमधून एम.ए. केलेली इतकी हुशार मुलगी, साहित्याची जाण असलेली, अनेक विचारवंताशी ओळख असलेली, आणि स्वत:च्या जोरावर मुंबईहून पुण्यासारख्या सांस्कृतिक ठिकाणी आपले नशिब अजमावयाला आलेली ही मुलगी पुढे बँकेच्या परीक्षा देऊन नोकरी करत आपले नीरस आणि काही प्रमाणात संघर्षमय जीवन जगण्यासाठी कशी तयार झाली?

लग्न होऊन संसार थाटल्यावर आर्थिक जबाबदाऱ्या पेलण्यासाठी नवऱ्यानेही शेवटी परिवर्तनाच्या लढ्यातील भूमिका सोडून बँकेच्या परीक्षा देण्याचा मार्ग पत्करला आणि त्याच्यातील पुरोगामी पुरुष मागे पडला. सततच्या बदल्या, त्या त्या ठिकाणी आणि एकटे राहाणे याचाही त्यामध्ये महत्त्वाचा भाग आहे. शिवाय कुटुंबातील इतरही सभासदांचा आर्थिक भार त्याच्यावर होता. सरिता म्हणते तसे त्याला कुटुंबाचा, जातीचा आधारही वाटायचा. ती त्याची अस्मिताही होती. त्यांच्या दृष्टीने त्याची हीही नोकरी महत्त्वाची, अधिकाराची, मानाची होती. त्यांच्या आजूबाजूला एवढी शिकलेली मंडळीही नव्हती. शिवाय रमेशला सरिताच्या माहेरहून कधीही सन्मान मिळाला नाही, त्याचीही बोच त्याला होती. तिच्या प्रेमाची प्रचिती पाहण्यासाठी त्याने तिला अट घातली होती की, लग्न न करता तू माझ्याकडे राहायला आलीस तरच मी पुढे तुझ्याशी लग्न करीन. दलित मुलासाठी ब्राह्मण मुलगी काय करू शकते, याची कसोटी घेण्याचा तो प्रकार होता.

सरिता म्हणते की, मी माझे आयुष्य पणाला लावले होते. म्हणूनच पुढे रमेशचे व तिचे नाते नासल्यासारखे झालेले पाहून वाईट वाटते. साहित्याच्या आवडीने आणि परिवर्तनासाठी चाललेल्या संघर्षातील जोडीदार म्हणून एकमेकांना वरलेले हे दांपत्य जीवनाच्या वास्तवातील समस्यांना भिडतांना रोमान्स संपून एका नीरस, ओढग्रस्त सामान्य कुटुंबामध्ये परिवर्तित झाले आणि त्यामुळे तर सरिताची आई आणि ती यामधील अंतर अधिकच वाढले. अशा वेळी सरिताला आपली मदत लागेल, मानसिकरीत्या तरी, हे आईच्या लक्षातच येत नाही. याउलट आईचा तिच्याबाबतीतील अपेक्षाभंग ती पुन्हा पुन्हा दाखवून देत असे. त्याची अनेक उदाहरणे सरिता देते.

यातील काही शब्दप्रयोगांचे दाखले देणे आवश्यक आहे असे वाटते. त्या सरिताला पत्रही पाठवीत असत. तो काळच पत्रांचा होता. डायरी लिहिण्याचा होता. लग्नाचा निर्णय घेताना सरिताने एकदा स्प्ष्टीकरण दिले होते की, ‘माझे अस्तित्व स्वयंभू असावे असे मला वाटते.’ तो स्वयंभू शब्द त्यांना खूप लागला होता. सरिता वर्णन करते की त्या ‘घायाळ’ झाल्या होत्या. तिला पत्रे पाठविण्याची पुन:पुन्हा विनंती करत होत्या. रमेशशी लग्न करण्याच्या अट्टाहासाबद्दल त्या पुन्हा पुन्हा विनंती करतात की, मी काय करू म्हणजे तू या वासनांच्या आवेगी वादळातून वाचशील? त्या असेही म्हणतात, तुझ्या मनात गैरवासना आली. कदाचित आपल्या दोघींमधले संबंध फार उत्तम  होते, म्हणूनच ते दृष्टावले अशीही हळहळही त्या व्यक्त करतात.

तिच्या पहिल्या गर्भारपणाच्या वेळी सरिता शेवटी आईकडे गेली, पण तेव्हाही आईचा रमेशबद्दलचा आकस संपलेला नव्हता. Why don't you ask him तो appear for UPSC exam? he can prove his intelligence there if at all he has got any. अशा तऱ्हेने तिरकस बोलून रमेशबद्दल असलेली कमीपणाची भावना ती पुन:पुन्हा प्रगट करत असे. आणि तरीदेखील सरिता पुन:पुन्हा आईच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करत असे, तिने किती दिलंय, तिने सांगितलेल्या पुस्तकांच्यामुळे माझे आयुष्य किती तऱ्हेने समृद्ध झालंय हे ती पुन:पुन्हा सांगत असते आणि तिला प्रश्न पडतो की, माझं रमेशशी लग्न झालंय ही वास्तवता सोडून तिला माझ्याशी संवादच करता येत नव्हता हे कसं? ती दोघींमधील नाते समजून घेताना म्हणते, ‘तू काळाच्या पडद्याआड गेलेल्या माणसांमध्ये रमलीस, त्यांना समजून घेतलंस. मी जिवंत माणसांमध्ये रमले, जिवंत माणसांना समजून घेता घेता स्वत: घडत गेले. हे कळलं का तुला?’

रमेशचा पुरुषीपणा तिने कसा स्वीकारला याचेही वर्णन ती लॉजिकली करते. आपल्या घरातील वडिलांचं स्थान दुबळं आहे, ही आपली कमतरता आहे, असं माझ्या मनावर ठसलं होतं. मग स्वाभविकपणं मी अशा पुरुषाची निवड केली, जो ‘पुरुषी’ होता. त्याचा अरेरावीकडे झुकणारा आत्मविश्वास, एक घाव चार-पाच तुकडे करण्याची आक्रमकता याचं मला आकर्षण वाटलं. ती पुढे जाऊन असेही म्हणते की, रमेशला तू आणि सर्वांनी जो विरोध केला, त्यातून आपल्या समाजातील जातीय विषमता मला ढळढळीत जाणवली. रमेशमुळे मला सुरक्षित घराबाहेरचे जे दर्शन घडले, त्याने मी बदलले. समतेचा आग्रह माझ्यात स्वाभाविक बिंबला.

पुढे ती आईला असेही म्हणते, ‘घटस्फोट न घेता विसंवादी लग्न तू नाखुशीने निभावलंस, कारण तुला माहेरची इभ्रत सांभाळायची होती. तुझं दु:ख, तडफड, यामुळे मी अस्वस्थ व्हायची त्याचबरोबर तुझ्या जातीय अस्मितेची चीड यायला लागली. तो काळ माझ्यासाठी आवेगी वादळाचा होता, पण तो तू म्हणालीस तसं वासनांच्या आवेगी वादळाचा नव्हता. तो मूल्यांचा होता. जीवन दृष्टीचा होता आणि त्या उत्पातातून मी एका विसंगतीला जन्म दिला. वैचारिक निष्ठा समतेच्या बाजूची, पुरुषप्रधानतेच्या विरोधातील; पण भावनिक ओढ मात्र वर्चस्व गाजविणाऱ्या पुरुषाची. हे खरं आणि तेही खरंच. माझे वैवाहिक आयुष्य म्हणजे याच संघर्षाचा वास्तव परिणाम होता.’ मला स्वत:ला सरिताचा हा कबुलीजबाव महत्त्वाचा वाटतो.

रमेशची भावनिक गुंतवणूक का आणि कशी झाली असावी याचा शोध घेताना तिने एका नेमक्या प्रश्नावर बोट ठेवले आहे. ती म्हणते की, ‘त्याच्या दृष्टीने त्याच्या हुशारीला समाजमान्यता मिळणे अतिशय महत्त्वाचे होते. या लग्नात कालांतराने माझ्या माहेरचा विरोध मावळेल आणि ब्राह्मण समाजात त्याच्या हुशारीला मान्यता मिळेल अशी आशा त्याला वाटत असावी. माझ्या माहेरहून पैशाची अपेक्षा त्याला कधीच नव्हती. पण आपुलकीचं वागणं, समाजमान्यता याची अपेक्षा होती. प्रत्यक्षात मात्र प्रेमानं वागण्याचं मानसिक औदार्य त्याच्या अनुभवाला आलं नाही.’

पुन:पुन्हा सरिताचे कौतुक करावेसे वाटते की, किती समंजसपणे, किती प्रगल्भपणे तिने ‘हमरस्ता सोडतानाचा’ हा अनुभव समजून घेतला आहे.

हमरस्ता नाकारतांना 
सरिता आवाड 
राजहंस प्रकाशन, पुणे  
पृष्ठे 287,
किंमत : 350 रुपये  
फोन : 020-24473459

Tags: चरित्र. पुरोगामी आंतरजातीय विवाह मध्यमवर्ग सदाशिव पेठ रमेश आवाड अप्पा पेंडसे आई सुमती देवस्थळी आत्मचरित्र सरिता आवाड हमरस्ता नाकारतांना छाया दातार एका जिद्दीची गोष्ट नवे पुस्तक Intercast marriage Sadashiv peth Ramesh Awad Sumati Devsthali autobiography Sarita Awad Hamrasta Nakartana Chhaya Datar Eka Jiddichi Gosht Nave Pustak weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

छाया दातार,  मुंबई, महाराष्ट्र
chhaya.datar1944@gmail.com

सामाजिक कार्यकर्त्या 


प्रतिक्रिया द्या