डिजिटल अर्काईव्ह (2014-2019)

गेल्या 25 वर्षांत या विधवा शेतकऱ्यांनी किती त्रास सोसून घरं व शेती सावरली हे शेतकऱ्यांनी (पुरुष) अद्याप ओळखलेलं नाही म्हणूनच अद्यापही आत्महत्त्यांचं सत्र चालूच आहे. ते थांबायला हवं. आत्महत्या करून या पुरुषांनी काय साधलं? उलट आपलंच घरदार दुःखाच्या खाईत होरपळण्यासाठी लोटून दिलं असंच म्हणावं लागतं. या महिलांनी आपलं कणखर कर्तृत्व दाखवून दिलंय. अशा शेतकऱ्यांच्या विधवांसाठी मराठीत गोळीबंद शब्दच सापडत नाही असं लेखिकेनं म्हटलंय, पण शब्दच नसेल तर तो सापडणार कसा? शिवाय स्त्रीसाठी म्हणून कोण कशाला शब्दरचना करील? मला तर वाटतं विधवा या शब्दाची तरी गरज आहे का? परिस्थितीशी झगडून त्यांनी पुरुषांना जे जमलं नाही ते सिद्ध करून दाखवलंय. त्यांना दाद द्यावी तितकी थोडीच!

गेल्या 25 वर्षांत या विधवा शेतकऱ्यांनी किती त्रास सोसून घरं व शेती सावरली हे शेतकऱ्यांनी (पुरुष) अद्याप ओळखलेलं नाही म्हणूनच अद्यापही आत्महत्त्यांचं सत्र चालूच आहे. ते थांबायला हवं. आत्महत्या करून या पुरुषांनी काय साधलं? उलट आपलंच घरदार दुःखाच्या खाईत होरपळण्यासाठी लोटून दिलं असंच म्हणावं लागतं. या महिलांनी आपलं कणखर कर्तृत्व दाखवून दिलंय. अशा शेतकऱ्यांच्या विधवांसाठी मराठीत गोळीबंद शब्दच सापडत नाही असं लेखिकेनं म्हटलंय, पण शब्दच नसेल तर तो सापडणार कसा? शिवाय स्त्रीसाठी म्हणून कोण कशाला शब्दरचना करील? मला तर वाटतं विधवा या शब्दाची तरी गरज आहे का? परिस्थितीशी झगडून त्यांनी पुरुषांना जे जमलं नाही ते सिद्ध करून दाखवलंय. त्यांना दाद द्यावी तितकी थोडीच!  

‘दुष्काळात तेरावा महिना’, ‘एकदशीच्या घरी शिवरात्र’ या म्हणींनाही लाज वाटेल असं निखळ वास्तव ‘कोरडी शेती... ओले डोळे’ या पुस्तकात आलेलं आहे. महाराष्ट्रात आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या विधवांच्या उद्‌ध्वस्त जीवनाची हकीगत या पुस्तकातून आपल्यासमोर प्रभावीपणे उभी राहते. शेतकऱ्यांच्या विधवांचं अस्तित्व, त्यांचे प्रश्न, त्यांच्या जगण्यातील अडचणी, त्यांचा संघर्ष, स्त्रियांसाठी कार्यरत स्वयंसेवी संस्था, शासकीय प्रयत्न इत्यादींची दखल घेणं हा या अभ्यासामागील उद्देश आहे. दीप्ती राऊत यांनी ही पाहणी केली आहे. महाराष्ट्रातल्या पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भ या भागांतल्या काही महिलांना त्यांच्या गावात भेटून त्यापैकी 17-18 जणींच्या मुलाखती घेतल्या आहेत.

1995 पासून आजतागायत महाराष्ट्रातील सुमारे 75000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. म्हणजेच इतकी कुटुंबं मोडून पडली. अंदाजे 75,000 स्त्रिया विधवा झाल्या. कुटुंबागणिक किमान दोन मुलं धरली तरी दीड लाख मुलांचं भावविेश उध्वस्त झालं. अनेक मुलांना महाविद्यालयीन शिक्षण सोडून आईच्या मदतीला यावं लागलं. अनेक मुलींना चालू अभ्यासक्रम सोडून दुसराच अभ्यासक्रम स्वीकारावा लागला. या विधवा स्त्रियांना समाजाचं टोचून बोलणं सहन करावं लागतं. एकटेपणाचं जीवन व सदोदित भीतीच्या सावटाखाली आला दिवस ढकलावा लागत आहे. बँकांनी व खासगी सावकारांनी कर्जाच्या परतफेडीसाठी लावलेल्या तगाद्यामुळं हाय खाऊन शेतकऱ्यांनी आपलं जीवन संपवलं; पण त्यांच्या बायकांनी नवऱ्याच्या पश्चात दुप्पट वाढलेल्या अडचणींमुळं मृत्यूला न कवटाळता, धीरानं, न डगमगता ह्या सगळ्या जीवघेण्या परिस्थितीशी टक्कर देत मुलांसह आयुष्याची वाटचाल सुरूच ठेवली. मुलांचं जीवन मार्गी लावण्यासाठी त्यांनी करता येतील तितके प्रयत्न केले. शिक्षण नाही, शेतीची फारशी माहिती नाही, शेतीच्या बाजाराच्या बाबतीत अनभिज्ञ अशा कठीण स्थितीत ही वाटचाल सोपी नव्हती.

अमुक काम करून देतो, तमुक काम करून देतो असं सांगून पैसे लुबाडणारे परिचित व नातेवाईक यांच्याशी सामना करावा लागत होता. बहुतांश विधवांना सासर व माहेराहून फारशी मदत मिळत नाही. तसेच नातेवाईक नसती आफत नको म्हणून संपर्क ठेवीत नाहीत. मात्र टीका करायला एकजात सगळे हजर असतात. त्या कुटुंबाची वाताहत पाहत बसतात. प्रत्येक वेळी आर्थिक मदतीची गरज असतेच असं नाही. थोडाफार आधार व योग्य सल्ला हवा असतो. आत्महत्या झाल्यावर दिवस कार्य उरकले की या विधवांच्या भकास व रित्या जीवनाला सुरुवात होते. मुळातच भारतीय समाजातील कोणत्याही स्तरातील स्त्री असो, तिचं स्थान सतत खालच्या पायरीवरच असतं. तिला विचार करता येतो, तिच्यात निर्णयक्षमता आहे हेच मुळी मान्य नसतं; पण याच स्त्रिया पतीच्या पश्चात गर्भगळित न होता स्वतःच्या हिमतीच्या भांडवलावर, काटकसरीनं राहून आजूबाजूच्या जगाचे टोमणे सहन करत परिस्थितीवर मात करू पाहताहेत. ‘आराम हराम है’ आणि ‘कष्टाला पर्याय नाही’ ही दोन सूत्र धरून व मुलांच्या भविष्याचा विचार करत त्यांची वाटचाल चालू आहे. मुलांचं आयुष्य मार्गी लागावं म्हणून प्राणपणानं झटताहेत.

हे सगळं किती अवघड आहे हे यातील कहाण्या वाचताना लक्षात येतं. वाचता वाचता आपलेही डोळे पाणावतात. शेतकरी आत्महत्येची बातमी आली की, शासन तात्काळ एक लाख रुपयांची मदत जाहीर करतं. पण त्यासाठी पोस्टमार्टेमद्वारा हा मृत्यू म्हणजे आत्महत्याच आहे हे सिद्ध व्हावं लागतं. शिवाय मृत व्यक्तीच्या नावावर जमीन असल्याचा पुरावा लागतो. हे सिद्ध झालं तर तातडीची मदत म्हणून एक लाख रुपयातील फक्त तीस हजार रुपये हाती पडतात. त्यावर घेणेकरी डोळा ठेवून असतातच. रितीरिवाजाप्रमाणं दशक्रिया विधीही पार पाडावा लागतोच. (लोकं नावं ठेवतात म्हणून. मृतात्म्याला शांती लाभावी म्हणून) त्यामुळं हातात काही उरतच नाही. उरलेले सत्तर हजार पाच वर्षानंतर मिळणार असतात. तोपर्यंत संसाराचा गाडा कसा ओढायचा? हा मोठाच प्रश्न असतो. ‘आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या पश्चात त्यांच्या विधवा पत्नी कशा जगताहेत, कोणत्या प्रश्नांना तोंड देताहेत हे विषय मात्र पुरुषप्रधान व्यवस्थेच्या सार्वजनिक अवकाशात बेदखलच राहिले आहेत.’

या विधानातून लेखिकेनं आपल्या समाजाच्या वर्मावर नेमकं बोट ठेवलं आहे. काही स्त्रियांच्या प्रत्यक्ष उदाहरणांतून ही विदारक परिस्थिती समजून घेता येईल. औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यातील अनिता डुकरे वय फक्त 28; पण काळजी व कष्टांमुळे त्यांचं खरं वय कळत नव्हतं. नवऱ्यानं दोन-चार ठिकाणाहून कर्ज घेतलेलं. ऐनवेळी कपाशीचा भाव कोसळला. नवीन घर बांधायला घेतलं होतं, पण ते पूर्ण होण्याआधीच हाय खाऊन पतीनं जीवन संपुष्टात आणलं. जमीन पतीच्या नावावर होती पण शेतातली विहीर सामायिक होती. त्या विहिरीतून पाणी शेतापर्यंत आणण्यासाठी टॉर्च घेऊन रात्ररात्र शेतात काढावी लागते. दोन लेकरं व वृद्ध सासू-सासरे यांचा सांभाळ करत त्या दिवस हिंमतीनं काढत आहेत.

उस्मानाबादच्या तांदुळवाडीतल्या सुमन उंदरे. शिक्षण नववीपर्यंत. वय वर्ष चाळीस. कोरडवाहू शेती तीन एकर. त्यांना दोन मुली व तीन मुलगे. सुमनतार्इंचं घर हे मराठवाड्यातील कोरडवाहू अल्पभूधारक शेतकऱ्याचं भळभळतं उदाहरण. पतीच्या हयातीतच दोन मुलींची लग्नं झालेली. (एकीचं सोळाव्या वर्षी तर दुसरीचं चौदाव्या वर्षी). त्या मुलींच्या लग्नाच्या खर्चासाठी काढलेलं कर्ज फेडून होत नव्हतं. नवऱ्यानं आत्महत्या केली तेव्हा पहिली मुलगी बाळंतपणासाठी माहेरी आलेली होती. दुसरीचं दोन महिन्यापूर्वीच झालं होतं. सततचे कष्ट, मानसिक स्वास्थ्याचा अभाव यामुळं त्यांना मानदुखी, डोकेदुखी, रक्तदाब वगैरे विकारांशीही सामना करावा लागतोय. त्यासाठी उपचार करायला वेळही नाही आणि पैसाही नाही. त्यांची दोन मुलं भारतीय जैन संघटनेच्या पुण्याच्या हॉस्टेलवर राहतात. सुटीत अन्य मुलांप्रमाणं आईनं आपल्याला घरी न्यावं असं त्यांना वाटतं पण तेवढंही त्या करू शकत नाहीत. मुलांसाठी त्यांचा जीव तिळतिळ तुटतो. पण काय करणार?

यवतमाळच्या इंदिरा उकेंची स्थितीही जवळपास अशीच. वयाची पन्नाशी ओलांडलेली. कर्ज फेडत, रोजानं मजुरी करत जीवन जगताहेत. एका सामाजिक संस्थेनं त्यांना पिठाची गिरणी दिली आहे. त्या दिवसा मजुरी करतात व रात्री चक्की चालवतात. मेहकरच्या वनमाला शिंदे यांच्या घरात पती व मुलगा अशा दोघांनीही आत्महत्या केल्या. मात्र अशा परिस्थितीत आपलं दुःख कुरवाळत न वसता त्या एकल संघटनेच्या माध्यमातून इतरांनाही उभारी देण्याचा प्रयत्न करत आहेत.

अकोला जिल्ह्यातील कट्यार गावच्या ज्योती देशमुख.  त्यांच्या घरात 2001, 2004 व 2007 यावर्षी अनुक्रमे सासरा, दीर व नवरा तिघांनी आत्महत्या केल्या. घरची एकोणतीस एकर जमीन. माहेरी लाडात वाढलेल्या ज्योतीतार्इंनी कधी शेतात पाऊल ठेवलं नव्हतं. नवऱ्यांच्या पश्चात त्यांचे भाऊ शेतात राबणारे भूमिहीन मजूर रामसिंगबाबा ढाल होऊन उभे राहिले. गेली दहा वर्षं त्यांनी निर्धारानं शेत जगवलं आणि कुटुंब तारलं. त्यांची जमीन हडप करण्यासाठी नातलगांनी जंगजंग पछाडले पण त्या सगळ्यांना पुरून उरल्या. गहाण पडलेली बैलगाडी सोडवून आणली. त्या मोबाईलवरून सर्व खरेदी-विक्रीची कामं करतात म्हणून त्यांचा मोबाईल पळवण्याचाही लोकांनी प्रयत्न केला. त्यांच्या घरावरची कौलं पळवली. जितका सर्व त्रास देणं शक्य आहे तितका त्रास गावातल्या लोकांनी दिला. मात्र आज ज्योतीतार्इंना प्रगतीशील शेतकरी म्हणून मान्यता मिळाली आहे. त्याचं गमक त्या सांगतात, पुरुषांकडे 10 रुपये असतात तेव्हा ते 50 खर्च करतात. माझ्याकडे 50 रुपये असतात तेव्हा मी फक्त 10 रुपये खर्च करते. गेल्या वर्षी त्यांनी ट्रॅक्टरसाठी अनुदान मागितलं. त्यासाठी खेटे घातले पण सगळं निष्फळ ठरलं. शेवटी कर्ज काढून ट्रॅक्टर घेतला व आता कृषिअधिकारी मागे लागले आहेत तुम्हाला ट्रॅक्टर मंजूर झालाय म्हणून. हे म्हणजे वरातीमागून घोडं! आज नवं तंत्रज्ञान ज्योतीतार्इंच्या माध्यमातून गावात येते. त्या आपल्या शेतावर त्याचा प्रयोग करतात व नंतर गावातील लोक त्याचा वापर करतात. दिल्या दिवसाला उसनवारी फेडीत राहिल्या. दिल्या शब्दाला माल विकत गेल्या. त्यामुळं त्यांच्या शब्दाला किंमत प्राप्त झाली.

नाशिकच्या मालेगाव तालुक्यातल्या दुधे गावच्या अरुणा अहिरे. चार एकर शेती. नवऱ्यानं 2013 साली एक लाख चाळीस हजाराचं अल्पमुदत कर्ज व एक लाख नव्व्यण्णव हजाराचं मध्यममुदत कर्ज घेतलं होतं, पण 2015 साली एका रात्रीत गारपीट झाली आणि द्राक्षाची बाग उध्वस्त झाली. ते सारं बघून पतीनं आत्महत्या केली. तेव्हापासून त्या मजुरी करून पोट भरू लागल्या. माजी मंत्री विनायकदादा पाटील अशा महिलांच्या कार्यक्रमाला गेले असताना दुखणं एक आणि औषध भलतंच असा मदतीचा कार्यक्रम पाहून आत्महत्या हा शेतीचा प्रश्न आहे, त्यामुळं त्याचं उत्तर शेतीतच शोधलं पाहिजे असं त्यांना जाणवलं. त्यातूनच ‘बायफ मित्र’ चा संजीवन प्रकल्प सुरू झाला. नाशिक जिल्ह्यातील बऱ्याच आत्महत्याग्रस्त कुटुंबांना त्यातून शेतीसाठी तांत्रिक व भौतिक मदत केली जाते. त्याचा फायदा अशा काही महिलांना झाला. ही मदत पैशाच्या स्वरूपात नव्हे तर रोपं, मजुरी, खतं, मशागत आणि सल्ला या माध्यमातून दिली जाते.

चांदवडच्या रेडगावमधील लंकाबाई काळेंच्या कुटुंबालाही ‘बायफ मित्र’च्या या उपक्रमाचा लाभ झाला. त्यांनी शेवगा लावण्याचा सल्ला स्वीकारला आणि आणि शेवग्याचं उत्पन्न मिळू लागल्यानं त्यांचा उत्साह वाढला.

निफाडच्या ताराबाई पडोळ यांची द्राक्षाची बाग पुन्हा उभी राहिली. तज्ज्ञांचा सल्ला तंतोतंत पाळून चिकाटी व जिद्द यांच्या जोरावर त्यांनी द्राक्षाचं उत्पन्न 20 क्विंटलवरून 155 क्विंटलपर्यंत नेलं. तळवड्याच्या सुनीता साळवेंच्या शेतात बोअर आहे, पाणी साठवण्यासाठी टाकी नव्हती ती एका उद्योजकाच्या मदतीने संस्थेनं मिळवून दिली.

मालेगावच्या संगीता पवारांनाही बोअर व पाईपलाईनसाठी मदत मिळाली. ‘नाम’ या संस्थेकडून मिळालेल्या मदतीतून त्यांनी शेतात मोटर बसवली व शासकीय मदतीतून शेततळं बांधलं. नवरा असताना त्या फक्त बाजरीचं पीक घेत असत. आता पाण्याची सोय झाल्याने कांदा, गहू आणि हरभरा पिकवतात.

हिंगोलीच्या टाकळगावच्या पूजा पाडे गरोदर असतानाच नवऱ्यानं आत्महत्या केली. कर्जाचा डोंगर डोक्यावर असूनही माहेरची गरिबी म्हणून सासरच्यांनी माहेरी पाठवलं नाही. त्यांचा चांगला सांभाळ केला. पूजानं पेन्शनसाठी अर्ज केला पण वय कमी म्हणून तो मंजूर झाला नाही, अशा एक ना अनेक अडचणींचा सामना करत काहींनी अपूर्ण राहिलेलं शिक्षण पूर्ण करण्यासाठी कंबर कसली पण तेही सहजासहजी साध्य झालं नाही. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या औरंगाबाद विभागातर्फे ‘उमेद’ या उपक्रमाच्या माध्यमातून या त्रस्त महिलांना मदत करण्याचं काम सुरू आहे. पहिला टप्पा थेट मदतीचा होता. आता मात्र पिठाची गिरणी, शेवयांचं यंत्र, शिलाई मशीन यासारखी उपजीविकेसाठी पूरक साधनं व त्यांचं प्रशिक्षण दिलं जातं. जोडधंदा म्हणून त्याचा उपयोग होतो. दुसऱ्या टप्प्यात त्यांच्या मुलांच्या शिक्षणाची आणि आरोग्याच्या सुविधांची व्यवस्था करण्यात आली आहे.

विदर्भातील दीनदयाळ बहुउद्देशीय प्रसारक मंडळही आत्महत्यापीडित कुटुंबांच्या पुनर्वसनासाठी प्रयत्नशील आहे.  औरंगाबादमध्ये साईग्राम या संस्थेच्या वतीनं आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांसाठी निवासी शाळा सुरू करण्यात आली आहे. या शाळेत आजपर्यंत 1500 मुलांच्या शिक्षणाची सोय करण्यात आली आहे. सोबतच्या हॉस्टेलमध्ये आणि भोजनकक्षात 10-15 महिलांनाही रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. सावित्रीबाई फुले सामाजिक संस्थेनं बांधलेल्या एकल महिला संघटनेमुळं अनेकींना आपले सरकारी कार्यालतील प्रश्न सोडवण्यास मदत झाली. एकमेकींच्या सोबतीने गेल्यावर त्यांना बोलण्याची हिंमत येते, भीड चेपते व त्या ताठ मानेनं उभं राहायला शिकल्या असं या संस्थेचे संचालक नरेंद्र पवार सांगतात. उस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सर्व विभागांच्या विशेष पथकानं गेल्या सहा वर्षांत जिल्ह्यात झालेल्या 548 आत्महत्याग्रस्त कुटुंबांना सध्याच्या शासनाच्या तीस योजनांद्वारे कशी उभारी देता येईल, यासाठी ‘उभारी’ अहवाल तयार केला व त्यानुसार गेल्या सहा महिन्यात त्या योजनांच्या माध्यमातून त्याची पूर्तता करण्यास सुरुवात केली. असा प्रयोग अन्य जिल्ह्यातील कुटुंबांसाठी अंमलात आणल्यास तो निराधार विधवांना उपयुक्त ठरू शकतो.

स्वयंसेवी संघटनांचा आधार महिलांसाठी खूपच ओशासक ठरत आहे. मुंबईच्या टाटा सामाजिक संस्थेनं केलेल्या अभ्यासातही चाळीस टक्के कुटुंबांनी या संस्थांची मदत झाल्याचं सांगितलं. राजकीय नेत्यांची मदत फक्त 14 टक्के कुटुंबांना झाली होती. समाजाने केलेल्या मदतीचा सहभाग फक्त चार टक्के असल्याची नोंद केली आहे. आतापर्यंत या विषयावर अनेक शासकीय व अन्य संस्थांनी अभ्यास करून अहवाल शिफारशींसह शासनाकडे पाठवले आहेत. 2006 साली ‘टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स’ या संस्थेनं तयार केलेला ‘Widow's

Woes: Tales of Survivors’ या अहवालात म्हटलं आहे, ‘...या प्रश्नाचा सर्वाधिक सामना जिला करायला लागतो आणि या संकटाला मोठ्या धैर्याने जी सामोरी जाते त्या महिलेची, तिच्या प्रश्नांची आणि त्यासाठीच्या उपाययोजनांची दखल फारच कमी घेतली आहे.’

पुस्तकाच्या शेवटच्या भागात लेखिकेनं म्हटलं आहे, ‘या महिलांचे प्रश्न त्यांचे व्यक्तिगत प्रश्न नाहीत... हा मूलभूत सामाजिक प्रश्न आहे. विस्कटलेल्या ग्रामीण अर्थकारणाचा प्रश्न आहे. दुर्लक्षित आणि फसलेल्या कृषिधोरणाचा प्रश्न आहे. बाई म्हणून कनिष्ठ लेखण्याच्या पुरातन पुरुषप्रधान मानसिकतेचा प्रश्न आहे... सामूहिक संवेदनेतून त्याची उत्तरं शोधणं आणि धोरणात्मक बदलातून त्यावर फुंकर घालणं हे फक्त या महिलांच्याच नव्हे तर संपूर्ण समाजहिताच्या दृष्टीनं अगत्याचं आहे’ ही बाब अगदी खरी आहे. लेखिकेनं शासकीय स्तरावर, कुटुंब स्तरावर, गावपातळीवर व सामाजिक स्तरावर असा शिफारशी सुचवल्या आहेत. त्या उत्तमच आहेत. त्याकडे शासनाचं व प्रशासनाचं लक्ष वेधलं जावं हीच इच्छा आहे. शेतकऱ्यांनी आपल्या कर्जाबाबत, घरच्या एकूण आर्थिक परिस्थितीबाबत पत्नीशी संवाद साधणं अत्यावश्यक आहे. बहुतेक स्त्रियांना कर्ज किती, कोणाकडून घेतलं याबाबत काहीच माहिती नसल्याचं लेखिकेला आढळून आलं. त्यातून नुकसान तर नाहीच पण फायदाच होऊ शकेल. दुसरं म्हणजे स्त्रिया अधिक सजग होतील. ‘जानकार बनो, सतर्क रहो’ हा इशाराही सर्वच स्त्रियांसाठी आवश्यक आहे.

ऑक्टोबर 2015 ते जानेवारी 2016 या चारच महिन्यात महाराष्ट्रातील 203 महिला शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. ही धोक्याची घंटा आहे. गेल्या 25 वर्षांत या विधवा शेतकऱ्यांनी किती त्रास सोसून घरं व शेती सावरली हे शेतकऱ्यांनी (पुरुष) अद्याप ओळखलेलं नाही म्हणूनच अद्यापही आत्महत्त्यांचं सत्र चालूच आहे. ते थांबायला हवं. आत्महत्या करून या पुरुषांनी काय साधलं? उलट आपलंच घरदार दुःखाच्या खाईत होरपळण्यासाठी लोटून दिलं असंच म्हणावं लागतं. या महिलांनी आपलं कणखर कर्तृत्व दाखवून दिलंय. अशा शेतकऱ्यांच्या विधवांसाठी मराठीत गोळीबंद शब्दच सापडत नाही असं लेखिकेनं म्हटलंय, पण शब्दच नसेल तर तो सापडणार कसा? शिवाय स्त्रीसाठी म्हणून कोण कशाला शब्दरचना करील? मला तर वाटतं विधवा या शब्दाची तरी गरज आहे का? परिस्थितीशी झगडून त्यांनी पुरुषांना जे जमलं नाही ते सिद्ध करून दाखवलंय. त्यांना दाद द्यावी तितकी थोडीच!

कोरडी शेतं... ओले डोळे
लेखिका : दिप्ती राऊत
रोहन प्रकाशन, पुणे
पृष्ठे : 122,
किंमत : 160 रुपये

Tags: टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स सामाजिक संस्था अकोला यवतमाळ नाशिक औरंगाबाद उस्मानाबाद कर्ज सरकार आत्महत्या शेतकरी दिप्ती राऊत कोरडी शेतं... ओले डोळे वासंती फडके पुस्तकपरिचय Widow's Woes TISS Akola Yavatmal Nashik Aurangabad Usamanabad Loan Government Suicides Farmer Dipti Raut Ole Dole Kordi Shet Vasanti Phadake Pustak Parichay weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

वासंती फडके,  मुंबई, महाराष्ट्र
phadkevasanti4236@yahoo.co.in


प्रतिक्रिया द्या