डिजिटल अर्काईव्ह (2014-2019)

हे पुस्तक वाचून असा कोणाचाही गैरसमज होऊ शकतो की, हे पुस्तक केवळ राजकारणाविषयीच असावे, पण तसे नाही. इराक व इराणमधल्या समाजजीवनाकडे टिकेकर अगदी विचक्षण दृष्टीने पाहत होते. त्यामुळेच ते लिहितात की, इराणमध्ये वाहने रस्त्याच्या उजव्या बाजूने चालवली जात असली, तरीही इराकमध्ये ब्रिटिश सत्तेचा पराभव असल्याने वाहने डाव्या बाजूने चालवावीत असा नियम आहे. इराकमध्ये खजुराशिवाय इतर कोणतेही झाड दिसत नाही. तसेच बसरा शहरात कोठेही गटारे नाहीत व अगदी मोठ्या कालव्यांतसुद्धा घाणेरडे पाणी असते. लोकांच्या स्वच्छतेच्या सवयीविषयी टिकेकर लिहितात की, ‘अरब म्हणजे अगोदरच गलिच्छ व अमंगळ लोक. त्यात इकडील थंडीचे निमित्त मिळाले की, सहा-सहा महिने त्यांना स्नान मिळत नाही’. इराणमध्येही असाच प्रकार होता. तिथे तर एकाच कालव्यात एकमेकांपासून काही फूट अंतरावरच कपडे धुणे, भांडी घासणे व पाणी पिणे असे तिन्ही उद्योग बिनदिक्कतपणे चालले असायचे. 

विसाव्या शतकाच्या पूर्वार्धात मराठीत जे महत्त्वाचे लेखक आणि पत्रकार होऊन गेले, त्यात श्रीपाद रामचंद्र टिकेकर यांचा समावेश होतो. मराठी आणि इंग्रजी मिळून एकूण 37 पुस्तके नावावर असलेल्या टिकेकरांना इतिहासापासून अर्थशास्त्रापर्यंत कोणताही विषय वर्ज्य नव्हता. 1930 मध्ये गांधीजींच्या दांडीयात्रेत जे निवडक 79 जण सहभागी झाले होते, त्यांत ‘केसरी’चे विशेष प्रतिनिधी म्हणून 29 वर्षीय श्री. रा. टिकेकर गेले होते. अशा या टिकेकरांच्या ‘मुसलमानी मुलखांतली मुशाफरी’ या पुस्तकाची नवी आवृत्ती आता आली आहे. या दोनशे पानी पुस्तकाला आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या अभ्यासक मनीषा टिकेकर यांनी प्रस्तावना लिहिलेली असून संदर्भासाठी शेवट टिपा व नकाशेही जोडलेले आहेत.

मराठीमध्ये पंडिता रमाबार्इंनी इंग्लंड व अमेरिकेच्या प्रवासावर लिहिलेली पुस्तके, अनंत काणेकरांचे युरोप व रशियाच्या प्रवासावर आधारित ‘धुक्यातून लाल ताऱ्याकडे’, प्रभाकर पाध्येंचे जपानच्या प्रवासावरील ‘तोकोनामा’ अशी पुस्तके प्रसिद्ध आहेत. ही पुस्तके केवळ प्रवासवर्णने नाहीत, या पुस्तकांच्या माध्यमातून त्या-त्या प्रदेशाचा चांगला परिचय मराठी वाचकांना होतो. या पुस्तकांमधला समान धागा असा की, साधारणतः 1850 च्या नंतर मराठी समाजात वाचन-लेखन करणाऱ्या व सामाजिक भान असलेल्या माणसांपैकी ज्यांनी कामानिमित्त किंवा हौसेने परदेश प्रवास केले, त्यांच्यापैकी अनेकांनी आपले अनुभव लिहून ठेवले. श्री.रा. टिकेकरांचे पुस्तक याच परंपरेत बसू शकेल असे आहे.

‘केसरी’चे विशेष प्रतिनिधी असलेल्या टिकेकरांना त्या वेळी खरं तर अफगाणिस्तानला जायचे होते. मात्र ते शक्य न झाल्याने टिकेकर सध्याचा पाकिस्तान, इराण आणि इराक या प्रदेशांत जाऊन आले. त्यांनी आपल्या प्रवासादरम्यान ‘केसरी’साठी लिहिलेल्या वार्तापत्रांनाच 1931 मध्ये पुस्तकरूप दिले होते.

टिकेकरांच्या प्रवासाची सुरुवात झाली पेशावरपासून. अफगाणिस्तानात रशियाचा प्रभाव वाढू नये म्हणून ब्रिटिशांनी अफगाणिस्तानवर वर्चस्व कायम ठेवण्यासाठी सतत प्रयत्न केले. त्यामुळेच वायव्य सरहद्द प्रांत भारताच्या संरक्षणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचा. खैबर खिंड याच प्रदेशातील. त्यामुळे तेव्हा राजकीय आणि लष्करी दृष्टीने पेशावर अतिशय मोक्याचे ठाणे मानले जात असे. या प्रदेशाविषयी लिहिताना कोणत्याही सजग मराठी व्यक्तीला पेशव्यांच्या सेनेची अटकेपर्यंतच्या घोडदौडीची आठवण होणे अगदी साहजिक. टिकेकरही याला अपवाद नाहीत. पेशावरच्या जवळच असलेल्या अटकेला त्यांनी आवर्जून भेट दिली. मुस्लिमबहुल असलेल्या या प्रदेशात अटकेच्या किल्ल्यात एका मंदिराचा जीर्णोद्धार कसा केला गेला, याविषयी ते वाचकांना सांगतात. तसेच या प्रदेशातील हिंदू-मुस्लिम तणावाची माहितीही जाता- जाता त्यांच्या लेखनात येऊन जाते.

वायव्य सरहद्द प्रांत हा टोळीवाल्या जमातींच्या वर्चस्वाखालचा प्रदेश. या टोळ्यांना नियंत्रणात ठेवणे हे काम इतके अवघड होते की, साऱ्या जगावर राज्य करण्याची मनीषा बाळगणाऱ्या इंग्रजांना दीडशे वर्षांत या टोळीवाल्यांचा बंदोबस्त करता आला नाही. टिकेकर लिहितात, ‘इथला प्रत्येक जण अगदी राजाप्रमाणे स्वतंत्र, नव्हे निस्तंत्र आहे! या प्रदेशाची डोंगराळ भौगोलिक रचना आणि टोळीवाल्या जनतेची मनोवृत्ती याला कारणीभूत होती. त्यामुळे लष्कराचा वापर करून या प्रदेशावर शक्य आहे, त्या प्रमाणात नियंत्रण बसवणे आणि उरलेल्या प्रदेशाला साम-दाम-दंड-भेद अशा मार्गांचा वापर करून हाताबाहेर जाऊ न देणे, असे धोरण ब्रिटिशांना अवलंबावे लागले. टिकेकर अतिशय मार्मिकपणे या साऱ्याची माहिती देतात.

परतीच्या प्रवासात टिकेकर बलुचिस्तानात गेले होते. तिथेही असाच प्रकार होता. लष्करी ताकदीशिवाय हे दोन्ही प्रदेश ब्रिटिश इंडियाकडे राहू शकत नव्हते. त्यामुळेच उत्तरेला हिमालय व दक्षिणेला हिंदी महासागर यांनी सुरक्षित केलेल्या या देशाच्या लष्करी खर्चात सतत वाढ होत गेली आणि भारतीय जनतेवरील करांचा बोजाही त्या प्रमाणात वाढला, हे टिकेकर नोंदवतात.

टिकेकरांचे हे विवेचन वाचताना ते आजच्या काळाशी अगदी सहजपणे जोडून घेता येऊ शकते. बलुचिस्तान आणि वायव्य सरहद्द प्रांत 1947 नंतर पाकिस्तानात गेले. विरळ लोकसंख्या असलेल्या व खनिजसंपत्तीने समृद्ध बलुचिस्तानात स्वातंत्र्याची उर्मी इतकी प्रबळ आहे की, पाकिस्तान सरकारला दडपशाही न करता बलुचिस्तान पाकिस्तानात ठेवताच येणार नाही. तसेच वायव्य सरहद्द प्रांतावर पाकिस्तान सरकार नियंत्रण ठेवू शकत नाही. या प्रदेशाच्या संरक्षणासाठी कंदाहार आपल्या ताब्यात ठेवावे, अशा आशयाची चर्चा ब्रिटिश मुत्सद्यांमध्ये झाल्याचे उल्लेख टिकेकरांच्या लेखनात येतात.

आपल्या संरक्षणासाठी अफगाणिस्तानवर वर्चस्व ठेवावे, या पाकिस्तानच्या इच्छेकडे याच संदर्भात पाहता येऊ शकते.  म्हणजे ब्रिटिश इंडियाला जे प्रश्न भेडसावत होते, तेच प्रश्न आज पाकिस्तानच्या समोरही आहेत. कदाचित ते आता आणखीच तीव्र झाले आहेत. तालिबानसारख्या दहशतवादी गटांचे वर्चस्व असलेल्या या सीमावर्ती प्रदेशात शिक्षणाचे प्रमाण आजही अतिशय कमी असून टोकाचे धर्मवेड जनतेत आढळते. दहशतवाद्यांच्या आदेशाला न जुमानता शाळेत जाणाऱ्या मलालावर याच प्रदेशात जीवघेणा हल्ला झाला होता. या प्रदेशात कसे जागोजाग बंदुका तयार करण्याचे कारखाने आढळतात आणि हे लोक कसे बंदुका चालवण्यात तरबेज आहेत, याविषयी टिकेकरांनी लिहिले आहे.

आजही या परिस्थितीत फरक पडलेला नाही. उलट, आधुनिक शस्त्रे आणि लढाईचे तंत्र अवगत केल्याने हा प्रदेश आंतरराष्ट्रीय दहशतवादाचे केंद्रबिंदू बनलेला आहे. दक्षिण आशिया, पश्चिम आशिया, हिंदी महासागर आणि मध्य आशिया यांना जोडणाऱ्या बलुचिस्तान व वायव्य सरहद्द प्रांताचे सामरिक महत्त्व इतके जास्त आहे की, या प्रदेशात काय होते याचे पडसाद आंतरराष्ट्रीय राजकारणात पडत राहणार  आहेत. सोव्हिएत रशियाने अफगाणिस्तानात 1979 मध्ये सैन्य पाठवल्यानंतर अमेरिकेचा जीव कासावीस झाला होता, त्यामागे हेच कारण होते.

टिकेकरांना अफगाणिस्तानात जायचे होते, कारण तेव्हा अफगाणिस्तानात सुधारणापर्व सुरू झाले होते. राजा अमानुल्ला व राणी सुरय्या दोघेही आधुनिकतावादी विचारप्रणालीने प्रभावित झाले होते आणि अफगाणिस्तानला आधुनिक बनवावे, या ध्यासाने 1919 ते 1929 या काळात कार्यरत होते. अतिशय मागासलेल्या समाजात सुधारणा रुजवणे कठीणच असते, मात्र तो प्रयत्न अफगाणिस्तानात केला जात होता. परंतु अफगाणिस्तान व ब्रिटिश इंडियाच्या सीमेवरील टोळीवाल्यांनी उठाव केल्याने अफगाणिस्तानात जाण्याचे मार्ग बंद झाले होते. त्यामुळे टिकेकर जाऊ शकले नाहीत. अफगाणिस्तानातून विमानमार्गाने परत आलेल्या परदेशी व्यक्तींना पेशावरमध्ये भेटण्याचा प्रयत्न टिकेकरांनी केला होता. तसेच त्यांनी अफगाणिस्तानच्या सीमेपर्यंत जाऊन त्या देशाविषयी सविस्तर माहिती काढली होती.

टिकेकर नोंदवतात की- अमानुल्लाचे सगळे सल्लागार तुर्की आहेत, अनेक अफगाण तरुण व तरुणी तुर्कस्तानला शिक्षणासाठी गेले आहेत. तसेच अफगाणिस्तानात तुर्कांचे प्राबल्य जास्त आहे. यामागचे कारण ते सांगतात की, धर्म समान असल्याने असे झाले असावे. मात्र यामागचे आणखी एक महत्त्वाचे कारण टिकेकरांच्या नजरेतून निसटलेले दिसते. तुर्कस्तानात केमाल पाशाने 1920 च्या दशकात अगदी जोराने सुधारणापर्व सुरू केले होते. भूतकाळ व मागासलेल्या परंपरा बाजूला टाकून एक आधुनिक, सेक्युलर व प्रबळ तुर्कस्तान उभा करण्याचे स्वप्न पाहणाऱ्या केमाल पाशाचा आदर्श राजा अमानुल्लासमोर असावा. तसेच तुर्कस्तानमध्ये सुधारणेचे वारे कमी-अधिक प्रमाणात एकोणिसाव्या शतकापासून वाहत होतेच. त्यामुळे आपल्या देशाला तुर्कस्तानसारखे बनवण्याचे स्वप्न अमानुल्लाने पाहिले, म्हणून अफगाणिस्तानात तुर्की सल्लागार होते. अर्थात अमानुल्लाच्या स्वतंत्र वर्तनामुळे ब्रिटिश प्रभावाला धोका पोहोचतो, म्हणून त्याला हटवले पाहिजे, हे ब्रिटिशांच्या लक्षात आले होते. त्यामुळे टिकेकर जाऊ पाहत होते तेव्हा अमानुल्लाच्या राज्यकारभाराचे शेवटचे दिवस चालू होते. अर्थात हे टिकेकरांना माहिती असण्याचे काही कारण नव्हते. पुढे 1929 मध्ये ब्रिटिशांनी अमानुल्लाला सत्तात्याग करण्यास भाग पाडले.

अफगाणिस्तानात जायचा मार्ग बंद झाला म्हणून टिकेकर कराचीला गेले व समुद्री मार्गाने इराकला रवाना झाले. इराक 1920 च्या दशकात ब्रिटिश नियंत्रणाखाली होता व साम्राज्यांतर्गत दळणवळण तुलनेने सुलभ होते. त्यामुळे कराचीहून टिकेकर इराकमधील बसऱ्याला गेले. इराक हा इराण आणि सौदी अरेबियाच्या मधे वसलेला देश. टिकेकर 1929 मध्ये लिहितात की, ‘इराकी प्रजेला मुख्य त्रास होतो तो इब्न सौदच्या वहाबी लुटारूंचा. मात्र धोका इतक्यावरच मर्यादित नाही.’ टिकेकरांच्या मते, इराकच्या एका बाजूस इराणी सिंह हातांत नंगी समशेर उगारून बसला आहे, तर दुसरीकडे तुर्कांच्या नव्या मनूचा प्रवर्तक केमाल केव्हा हल्ला करील कोण जाणे, अशा वृत्तीने इंग्रज त्याजकडे पाहत आहेत. याच बरोबरीने इराकपासून रशियासुद्धा फार लांब नसून त्याचेही या प्रदेशातील घडामोडींकडे लक्ष होते, हेही त्यांनी लिहिलेले आहेच.

नव्वद वर्षांपूर्वीची ही निरीक्षणे आहेत. याच प्रदेशात आज काय चालू आहे? तर, इराण व सौदी अरेबिया यांच्यात इराकवर सध्या वर्चस्व कोणी गाजवावे, यावरून तीव्र स्पर्धा सुरू आहे. इराकमधील सद्दाम हुसेनला हटवण्यासाठी केलेल्या लष्करी कारवाईत अमेरिकेच्या बरोबरीने ब्रिटन उत्साहाने सहभागी झाले होते; तर गेल्या काही वर्षांत जेव्हा सिरिया व इराकमध्ये इस्लामिक स्टेटचा उदय झाला, तेव्हा रशिया आणि तुर्कस्तानच्या हस्तक्षेपाला रोखणे अशक्य झाले. म्हणजे काळ बदलला, नव्या सत्ताधाऱ्यांचा उदय झाला तरीही या प्रदेशातील आंतरराष्ट्रीय राजकारण काही बदलले नाही. अर्थात हे वाचून असा कोणाचाही गैरसमज होऊ शकतो की, हे पुस्तक केवळ राजकारणाविषयीच असावे. पण तसे नाही.

इराक व इराणमधल्या समाजजीवनाकडे टिकेकर अगदी विचक्षण दृष्टीने पाहत होते. त्यामुळेच ते लिहितात की, इराणमध्ये वाहने रस्त्याच्या उजव्या बाजूने चालवली जात असली, तरीही इराकमध्ये ब्रिटिश सत्तेचा पराभव असल्याने वाहने डाव्या बाजूने चालवावीत असा नियम आहे. इराकमध्ये खजुराशिवाय इतर कोणतेही झाड दिसत नाही. तसेच बसरा शहरात कोठेही गटारे नाहीत व अगदी मोठ्या कालव्यांतसुद्धा घाणेरडे पाणी असते. लोकांच्या स्वच्छतेच्या सवयीविषयी टिकेकर लिहितात  की, ‘अरब म्हणजे अगोदरच गलिच्छ व अमंगळ लोक. त्यांत इकडील थंडीचे निमित्त मिळाले की, सहा-सहा महिने त्यांना स्नान मिळत नाही’. इराणमध्येही असाच प्रकार होता. तिथे तर एकाच कालव्यात एकमेकांपासून काही फूट अंतरावरच कपडे धुणे, भांडी घासणे व पाणी पिणे असे तिन्ही उद्योग बिनदिक्कतपणे होत असायचे.

कितीही प्रवास झाला तरीही मातृभूमीचा संदर्भबिंदू टिकेकरांच्या मनात सदैव जागा असतो. त्यामुळे तैग्रिस आणि युफ्रेटिस या इराकमधल्या नद्या पाहून ते लिहितात की, ‘नदीचे पात्र हिंदूंना पवित्र वाटते आणि नुसते नाव घेतले तरी पुरे, अनेक धार्मिक संस्कारांचा आणि पौराणिक कथांचा संदर्भ ज्ञानचक्षूंपुढे उभा राहतो. तसा काहीसा प्रकार हिंदुस्तानबाहेरील नद्यांचा नाही. तेव्हा त्यांच्याकडे तासच्या तास पाहत राहिले तरी मनावर काय परिणाम घडणार?’ देशाटन केल्यामुळे ‘स्वदेशप्रीति आणि आपलेपणाला येणारी भरती’ हे फायदे होतात, असेही त्यांना वाटते. इराणमध्ये एक हिंदू देवालय व त्यावर शुद्ध संस्कृतमध्ये लिहिलेले श्लोक पाहूनही टिकेकर आनंदित झाले होते. अर्थात आपल्या मातृभूमीच्या संदर्भात लिहितानाचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे भारताचे स्वातंत्र्य आणि त्याविषयीची चर्चा.

इराक व इराण या दोन्ही देशांमध्ये टिकेकर ज्या-ज्या उच्चपदस्थ व्यक्तींना भेटले, त्या सर्वांशी बोलताना हा विषय निघाला. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यास इतर देशांच्या स्वातंत्र्याचा मार्ग मोकळा होईल, ही भावनाही अनेकांनी टिकेकरांना बोलून दाखवली. इराण व इराकमध्ये तेव्हा तेलाचा शोध लागून त्याच्या शुद्धीकरणाचे कारखाने सुरू झाले होते. त्याला आवर्जून भेट देऊन टिकेकरांनी तेलशुद्धीकरण प्रक्रियेविषयी अतिशय सविस्तरपणे लिहिले आहे. कदाचित तेलाच्या शुद्धीकरणाविषयीचा मजकूर मराठीत पहिल्यांदाच लिहिला गेला असावा. टिकेकर लिहितात की, ‘खाणीतून आलेले घट्ट तेल उष्ण केले म्हणजे त्यातून काही वायू बाहेर निघतात. त्यांचा उपयोग पेट्रोल करण्याकडे विशेष होतो. ते वायू थंड केले की, बेन्झिन नावाचे एक महत्त्वाचे द्रव्य तयार होते. नुसते उष्ण केल्याने शुद्ध घासलेट मिळणे कठीण असते. त्यासाठी त्या घासलेटवर पुष्कळ संस्कार करावे लागतात. एक प्रकारच्या विशिष्ट वाळूतून ते गाळून काढले म्हणजे अगदी स्वच्छ होऊन त्यातील साचलेली घाण निघून जाते. पेट्रोलसुद्धा अनेक औषधींच्या साह्याने धुवावे लागते व नंतरच ते विक्रीसाठी योग्य होते.’

या अशा तेलप्रकल्पासाठी व इराकच्या प्रशासनासाठी लागणारे मनुष्यबळ भारतातून आणले होते. गंमत अशी की, आजही पश्चिम आशियातील देशांमध्ये कामानिमित्त राहणाऱ्या भारतीय नागरिकांची संख्या साठ लाखांहून अधिक आहे. म्हणजे हाही घटक आजच्या काळाशी जोडून घेता येईल. इराकहून टिकेकर गेले इराणला. इराणमध्ये तेव्हा राजेशाही शासन होते. इराणसारख्या मोठ्या देशामध्ये रेल्वेचे अतिशय कमी प्रमाण पाहून टिकेकरांना धक्काच बसला. तसेच ते आधी इराणच्या उत्तर दिशेला जाऊन मग दक्षिणेला असलेली राजधानी तेहरानकडे गेले. त्यामुळे अफगाण सीमेवरचा खडतर डोंगराळ प्रदेश, कराचीचा समुद्र, इराकमधील वाळवंट आणि इराणमधील बर्फाळ व मैदानी प्रदेश असा वैविध्यपूर्ण मुलुख टिकेकरांनी कव्हर केला. इतक्या वैविध्याचा प्रवास करण्यासाठी जहाज, छोट्या बोटी, मोटारी, रेल्वे अशी सर्व साधने त्यांनी वापरली. ज्या व्यक्तीला मराठ्यांची अटकेपर्यंतची दौड माहिती असते, त्याला इराणचा नादिरशहा आणि त्याच्या भारतावरील स्वाऱ्याही माहिती असतात. त्यामुळे त्यांच्या लेखनात नादिरशहाचे संदर्भ येत राहतात.

इराणच्या राजधानीतील एक राजवाडा आणि तेथील वस्तुसंग्रहालयांत भारतातून लुटून नेलेल्या वस्तू त्यांच्या नजरेतून सुटत नाहीत. भारतातून नेलेले रत्नजडित ‘मयूर’ सिंहासन त्यांना पाहायला मिळाले होते. त्याविषयीचे त्यांचे विवेचन मुळापासूनच वाचण्यासारखे आहे. तसेच इराणमध्येच त्यांनी रशियन नागरिक पहिल्यांदा पाहिले.  सोव्हिएत रशिया व कम्युनिझम यांच्याविषयी पाश्चात्त्य जगाला 1920 च्या दशकात भीती वाटत होती. रशियन नागरिक व कम्युनिझमविषयी अतिशय विखारी भाषेत प्रचार केला जात असे. त्यामुळेच जेव्हा त्यांनी रशियन नागरिक पाहिले, तेव्हा ते लिहितात की, ‘रशियन म्हणजे काही तरी निराळ्या प्रकारची माणसे असावीत. वाघोबाला भिऊन जशी लहान मुले दूर पळतात किंवा अस्वलाला पाहून कुतूहलमिश्रित भीती त्यांना वाटते तशाच प्रकारचे मन इंग्रजी वर्तमानपत्रांतील बातम्या वाचून बनते. पण प्रत्यक्ष अनुभवाने ते सर्व ग्रह दूर झाले. अगदी  माणसासारखा माणूस.’

परदेशी व्यक्तींच्या सहवासात राहिलेल्या किंवा परदेशात राहिलेल्या कोणत्याही भारतीय व्यक्तीला पडतो तो प्रश्न इराणमध्ये टिकेकरांनाही पडला : ‘फार्सी भाषेत उष्टे, खरकटे आणि किळस या तीन शब्दांना प्रतिशब्द आहेत किंवा नाहीत?’ रस्त्यावर विक्रीस ठेवलेले खाद्य पदार्थ बिनदिक्कतपणे हाताळणे, दोन्ही हाताने खाणे, दहा- बारा माणसांनी एकाच ताटात खाणे व एकाच पेल्याने पाणी पिणे- असे प्रकार पाहून हा प्रश्न पडतोच. अशा अनेक गमती-जमती पुस्तकात आहेत. टिकेकर अगदी साक्षेपी नजरेने आजूबाजूचे सारे काही टिपतात आणि त्यातले महत्त्वाचे व वैशिष्ट्यपूर्ण तपशील वाचकांपर्यंत पोहोचवतात.

एकीकडे हजला जाणाऱ्या यात्रेकरूंच्या बरोबर प्रवास करणारे, एका इराणी डॉक्टरने जेवणाचे आमंत्रण दिले म्हणून जेवायला जाणारे वं तरीही शाकाहारी जेवण घेणारे टिकेकर तितक्याच सहजपणे इराणच्या राजाच्या नववर्ष समारंभाला परदेशी वकिलांबरोबर उभे राहतात आणि राजधानीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी वादग्रस्त विषयांवर बोलतात. ते अवघडलेले आहेत असे कुठेही वाटत नाही. पुन्हा हे सारे ते अगदी सहजपणे, वाचनीय भाषेत आपल्या वाचकांपर्यंत पोहोचवतात. इराण-इराकसारख्या परकीय समाजांविषयी, तिथल्या चालीरीती-हवामानाविषयी लिहिताना ते महाराष्ट्राशी त्याची तुलना सतत करतात व संधी मिळेल तिथे ब्रिटिशांवर टीका करत राहतात.

टिकेकर गेले होते तो दोन महायुद्धांच्या दरम्यानचा काळ होता. जागतिक आर्थिक मंदीचे मळभ तेव्हा दाटून यायला सुरुवात झाली होती. स्थानिकांना नोकऱ्या द्यायला हव्यात आणि परकीयांना देशाबाहेर काढायला हवे, ही भावना जोर धरू लागली होती. तसेच याच काळात वसाहतवादाविरुद्ध हवा तापायला सुरुवात झाली होती. याची चुणूक ही वार्तापत्रे वाचताना मिळते. या काळात विमानवाहतूक सुरू झाली होती आणि जग जवळ यायला सुरुवात झाली होती. त्याची निरीक्षणे टिकेकरांच्या लेखनात डोकावतात. इराकविषयी लिहिताना ते नोंदवतात की, ‘खाद्य पेयांच्या पदार्थांचा या प्रांतात दुष्काळच आहे, म्हणून काय गमतीचा संगम होतो पहा. स्वित्झर्लंडमधील गोठलेले दूध, फ्रान्समधील साखर, हिंदुस्तानातील चहा, जपानातून आलेली उपकरणी आणि पदार्थ सेवन करणारे अरबस्तानातील रहिवासी. भाजीपाल्यांचीही अडचण असल्याने हॉलंडमधील सोललेले मटार येथे अगदी ताजे अशी मिळतात आणि रोजच्या जेवणातही लिव्हरपूलच्या मिठाशिवाय चालत नाही.’

टिकेकरांची निरीक्षणदृष्टी किती सूक्ष्म आणि मार्मिक असावी, याचे असे अनेक दाखले पुस्तकभर विखुरलेले आहेत. या प्रदेशाविषयी लिहिलेले हे पहिलेच मराठी पुस्तक असावे. त्यामुळे या पुस्तकाचे महत्त्व आणखीच जास्त आहे. इतके सुंदर पुस्तक दीर्घ काळ आउट ऑफ प्रिंट होते. या पुस्तकात जर श्री.रा. टिकेकरांचा फोटो, चरित्रपट आणि लेखनाची सूची देता आली असती, तर पुस्तकाचे सौंदर्य आणखी वाढले असते. तसेच या निमित्ताने टिकेकरांची इतर पुस्तके पुन्हा प्रकाशित व्हायला हरकत नसावी. आंतरराष्ट्रीय राजकारणाविषयी, आपल्या शेजारी राष्ट्रांविषयी व पश्चिम आशियाविषयी कुतूहल असलेल्या कोणालाही हे पुस्तक वाचायला आवडेल. 

मुसलमानी मुलखांतली मुशाफरी
प्रथमावृत्ती : 1931 
लेखक (मुशाफर) : श्रीपाद रामचंद्र टिकेकर 
संपादक : मनीषा टिकेकर 
पृष्ठे : 204, किंमत: रु. 200 
प्रकाशक : इंकिंग इनोव्हेशन्स      

Tags: संकल्प गुर्जर Sankalp Gurjar Inking Innovations Manisha Tikekar Shripad ramchandra Tikekar Musalmani Mulukhantali Mushafiri इंकिंग इनोव्हेशन्स मनीषा टिकेकर श्रीपाद रामचंद्र टिकेकर मुसलमानी मुलखांतली मुशाफरी weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

संकल्प गुर्जर
Sankalp.gurjar@gmail.com


प्रतिक्रिया द्या