डिजिटल अर्काईव्ह (2014-2019)

लोक ओळखत नव्हते, हे शूटिंगवाले की ऊसतोड मजूर?

मी काम केले नसून राजकुमारसरांनी माझ्याकडून करून घेतले. सेटवरचे वातावरण खूप मजेचे असायचे. सगळे हसत-खेळत राहायचे. मुळात मी ऊसउत्पादक शेतकरी असल्याने ऊसतोड़ कामगार जवळून पाहिलेले होते, ते कसे ऊस तोड़तात, ऊस गाडीत कसा भरतात, उसाचे वाढे कसे विकतात... म्हणून मी जे पाहतो, ते करताना खूप मजा आली. दुसऱ्या शेड्यूलमध्ये सिनेमाचं शूट कोल्हापूरजवळ शिरोळच्या परिसरात होतं. तेथील दत्त सहकारी साखर कारखाना, ऊसतोड कामगार यांच्यात आम्ही एवढे मिसळून गेलो होतो की- ज्या वेळेस आम्ही फडात जायचो त्या वेळेस आम्हाला कोणी ओळखत नव्हते, की हे शूटिंगवाले आहेत की खरंच ऊसतोड मजूर!

‘चिवटी’ हा माझा पहिला सिनेमा. या पहिल्या सिनेमात खूप काही शिकलो. मी मराठी सिनेमाचा खूप मोठा चाहता आहे. आमचे एक शिक्षक नेहमी म्हणायचे- एक चांगला सिनेमा पाहणे म्हणजे एक चांगली कादंबरी वाचल्यासारखे आहे. सिनेमा चांगला असावा, म्हणून मी नेहमी सिनेमा पाहतो. विशेष म्हणजे मराठी सिनेमे खूप आशयप्रधान असतात, म्हणून आवडतात. मराठी सिनेमा, नाटक यांचा तसा माझा प्रेक्षक म्हणून संबंध आहे. त्यामुळे सिनेमा पाहायचो; पण सिनेमात काम करायला मिळेल, असे कधी वाटले नाही.

मी आमच्या गावात गणपती उत्सवात नाटक करायचो. गावात स्टेज नसल्यामुळे गावच्या वेशीत फक्त पाठीमागचा पड़दा लावून नाटक करायचो. नाटकाची आवड़ असल्यामुळे नाटक- सिनेमाविषयी पेपरमध्ये वाचायचो. मराठी रंगभूमीवर 2012 मध्ये ‘शिवाजी अंडरग्राउंड इन भीमनगर मोहल्ला’ या नाटकाविषयी वाचले. त्यात जालना येथील शेतकरी कलाकार आहेत, असे समजले. मग मी औरंगाबादला हे नाटक पाहिले ते खूप आवडले. तिथून मला अभिनयाची आवड़ निर्माण झाली. या  नाटकाचे लेखक राजकुमार तांगडेसर याच्या संपर्कात आलो. ‘चिवटी’ सिनेमाचं कास्टिंग चालू होतं.

आजही तो दिवस आठवतो. दि. 28 एप्रिल, 2016 रोजी सरांचा फोन आला की, तुला सिनेमात काम करायचं आहे. मला हे सगळं स्वप्न असल्यासारखंच वाटत होतं आणि दड़पणही होतं. सरांनी आपल्याला संधी दिली आहे, आपल्याला जमेल का? पण ते म्हणायचे, ‘‘तू चांगलं करशील. चांगली संधी आहे, जीव लावून कर.’’ मी ठरवले होते, जे सर सांगतील तेवढेच करायचे.

दि.14 मे, 2016 रोजी ‘चिवटी’ सिनेमाचं चित्रीकरण सुरू झालं. त्या दिवशी शूटिंगचा शुभारंभ आणि त्याच दिवशी दिवसभर माझे सीन लागले होते. सीन दोघांत होता- माझ्यासोबत देवकी खरात होती. तिचाही पहिलाच सिनेमा. आम्ही दोघेही नवखे होतो. शुभारंभासाठी खूप लोक आले होते. पहिला सीन बीड जिल्ह्यातील जरुड या गावात डोंगरावर होता. खेड्यात शूटिंग बघायला खूप लोक येतात. मीही कॅमेरा, साउंड हे प्रथमच बघत होतो. त्यांच्यासारखाच होतो. काही लोक मला येऊन बेस्ट ऑफ लक देत होते, तसतसे मला टेंशन येत होते. मी पूर्णपणे घाबरलो होतो.

राजकुमारसरांनी ओळखले, मग मला समजावून सांगितले, ‘‘समोरच्या गर्दीकडे लक्ष देऊ नकोस, तू तुझ्या डायलॉगवर लक्ष दे. तुझ्यासमोर कोणीही नाही, असे समजून काम कर.’’ साउंड रोलिंग, कॅमेरा रोलिंग, ॲक्शन... हे मी पहिल्यांदा ऐकत होतो. माझ्या आयुष्यातला पहिला सीन मी पाच टेकमध्ये दिला. त्यानंतर हळूहळू काम करत गेलो. ‘चिवटी’च्या सेटवर प्रा. दिलीप घारेसर, संभाजी तांगडेसर, यांच्यासोबत सीन करताना दड़पण यायचे. त्यांनी खूप मार्गदर्शन केले. घाबरू नको, असं राजकुमारसर म्हणायचे. जमतंय, तुला जमतंय, असे म्हणून त्यांनी माझ्याकडून काम करून घेतले.

आजपर्यंत मी खूप ऐकले होते- सेटवर ॲक्टरला नाही जमले तर डायरेक्टर खूप ओरडतात, अपमान करतात. पण ‘चिवटी’च्या सेटवर जवळपास 50-60 दिवस आम्ही होतो, सर कोणालाच ओरडले नाहीत. याउलट ज्या-ज्या वेळेस अडचण आली, त्या-त्या वेळेस तांगडेसरांनी जवळ घेऊन मनातली भीती घालवली आणि प्रोत्साहन दिले. म्हणूनच म्हणतो, मी काम केले नसून राजकुमारसरांनी माझ्याकडून करून घेतले. सेटवरचे वातावरण खूप मजेचे असायचे. सगळे हसत-खेळत राहायचे. मुळात मी ऊसउत्पादक शेतकरी असल्याने ऊसतोड कामगार जवळून पाहिलेले होते, ते कसे ऊस तोडतात, ऊस गाडीत कसा भरतात, उसाचे वाढे कसे विकतात... म्हणून मी जे पाहतो, ते करताना खूप मजा आली.

दुसऱ्या शेड्यूलमध्ये सिनेमाचं शूट कोल्हापूरजवळ शिरोळच्या परिसरात होतं. तेथील दत्त सहकारी साखर कारखाना, ऊसतोड कामगार यांच्यात आम्ही एवढे मिसळून गेलो होतो की- ज्या वेळेस आम्ही फडात जायचो त्या वेळेस आम्हाला कोणी ओळखत नव्हते, की हे शूटिंगवाले आहेत की खरंच ऊसतोड मजूर! सिनेमाचे निर्माते अजिनाथ ढाकणेसर, कैलास सानप, सगळे कलाकार आमचे कॅमेरावाले गोलतकरसर, कॉस्च्युमवाल्या गोडबोले मॅडम, लाइटवाले, आर्टवाले, अगदी आमचे स्पॉटदादा असतील- आम्ही सगळे हसून-खेळून राहिलो. एका कुटुंबासारखे राहिलो. आजही आम्ही एकमेकांच्या संपर्कात आहोत. आज सिनेमाचं नाव जरी काढलं, तरी ‘चिवटी’ सेटवरच्या आठवणी ताज्या होतात.

Tags: film Sugar factory sugarcane labourers Marathwada cinema Chiwati he shootingwale ki ustod major? Kishor Udhan lok olakhat navhte Sadhana Diwali issue 2019 weekly Sadhana चित्रपट साखर कारखाना ऊसतोडकामगार मराठवाडा सिनेमा चिवटी किशोर उढाण हे शूटिंगवाले की ऊसतोड मजूर? लोक ओळखत नव्हते साधना दिवाळी अंक 2019 साप्ताहिक साधना weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

किशोर उढाण

अभिनेता 


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके

कर्तव्य

सर्व पहा