डिजिटल अर्काईव्ह (2014-2019)

नाताळचा उत्साह शिगेला पोहोचलेला होता. मी त्या नर्सेसना इस्पितळातील उपस्थित लहान मुलांना भेटवस्तू वाटताना पाहिले आणि मला माझे लहानपण आठवले. मी विचार करू लागलो... लहानपणी मला मिळणाऱ्या भेटवस्तूंमुळे नाताळ आवडायचा, थोडा मोठा झाल्यावर नवे कपडे मिळतात म्हणून नाताळची मी वाट पाहायचो, तर पुढे तारुण्यात मित्रांबरोबर पाटर्या करण्याचे अधिकृत कारण म्हणून मला ‘ख्रिसमस ईव्ह’ आवडू लागला होता, आणि आता काही वर्षांपासून कुटुंबीयांसोबत काही निवांत क्षण व्यतीत करणे इथपर्यंतच आता या उत्सवाचे प्रयोजन सीमित झाले होते. मी आईला ज्या खोलीत ठेवले होते तिथे परत आलो. ऑपरेशन थिएटरमधून बेडवर आणल्याला सात-आठ तास उलटूनही आई अजूनही शुद्धीवर आलेली नव्हती. ‘काय होईल आईचं? किती वेळ लागेल ह्यातून रिकव्हर व्हायला? मुळात ती रिकव्हर होईल की नाही?’ काहीच कळत नव्हतं.  

डिसेंबर महिना म्हटला की, डोळ्यांसमोर जे चित्र उभे राहते, ते म्हणजे कडाक्याची थंडी, पहाटेचे धुके, स्वेटरशाल घालून घराबाहेर हिंडणारे लोक आणि दिवसभर रेंगाळणारा गारवा ह्याचे. डिसेंबर महिन्यात वसई एका नव्या नवरीसारखी सजते. वातावरणातील शीतल बदल, ठिकठिकाणी सुरू झालेले लग्नसराईचे कार्यक्रम आणि नाताळची लागलेली चाहूल. डिसेंबरच्या शेवटच्या 10 दिवसांत तर वसईत नाताळचा उत्साह अगदी ओसंडून वाहत असतो. घरोघरी व गावाच्या वेशीवर ठिकठिकाणी केलेली रंगेबेरंगी दिव्यांची रोषणाई वसईतील बंगल्यांचे आणि गावाचे सौंदर्य अधिकच खुलविते. शेतातील भाजीपाल्यांनी बहरलेले मळे तर या काळ्या मातीची समृद्धी अधिकच अधोरेखित करतात. कामानिमित्त देशापरदेशात असलेले वसईकर या वेळी घरी परतू लागतात आणि ओकीबोकी पडलेली गावे पुन्हा त्यांच्या माणसांनी फुलून येतात. कट्‌ट्यावर पाटर्यांचे व सहलींचे बेत रंगतात आणि घरोघरी वेगवेगळ्या जिन्नस, पक्वानांनी घरे अगदी मोहरून जातात.

मीही पुण्याहून सणाच्या या कालावधीसाठी सुट्टी घेऊन वसईस घरी परतत होतो. वर्षाची अखेर आणि त्यात नाताळच्या उत्सवाचा आनंद. शनिवार असूनही ट्रेनमध्ये तशी वर्दळ कमीच होती. वसई स्टेशन येण्यास अजून दोन तास तरी होते. संध्याकाळचे सात वाजलेत, हे पाहून मी लगेच घरी आईला फोन लावला.

 ‘‘रिपोर्ट कलेक्ट केलेत का?’’ आईच्या पोटात काही दिवसांपासून दुखत होतं आणि त्यासाठी काही मेडिकल चाचण्या करायच्या होत्या. त्याचे रिपोर्ट संध्याकाळी सहानंतर मिळणार होते.

 ‘‘हो, केले कलेक्ट. वाचायचा प्रयत्नही केला, पण काही कळत नाही. आज डॉक्टर नव्हते. त्यात उद्या रविवार. सोमवारीच दाखवावे लागतील.’’ आई फोनवरून मला सांगत होती.

‘‘हम्म... मला जरा फोटो काढून व्हाट्‌सॲपवर सेंड करतेस का?’’ मेडिकल टर्म्स इंटरनेटवर पाहून आपल्या परीने काही रिपोर्ट कळतोय का ते पाहू, असा विचार करून मी विचारले. पाचच मिनिटांत आईचा त्या रिपोर्टच्या इमेजेसचा व्हाट्‌सॲप मेसेज आला. रिपोर्ट खूपच वर्णनात्मक असल्याने काही कळत नव्हते. नेहमीसारख्या रेफरन्स रेंजेसही त्यात नव्हत्या. एकेक मेडिकल टर्म्स इंटरनेटवर सर्च करत असताना रिपोर्टमध्ये बऱ्याच वेळेला उल्लेख केलेला ‘कार्सेनोमा’ हा अनोळखी शब्द मी गुगलवर टाकला आणि गुगलने दिलेल्या सर्च रिझल्ट्‌सने पोटात धस्स झालं. सगळ्या रिझल्ट्‌समध्ये ‘कॅन्सर’ हा शब्द ठळकपणे दिसत होता.

मी आवंढा गिळला. माझा घसा अचानक कोरडा पडल्याचे जाणवले. बॉटलमधील पाणीही संपले होते. हात-पाय थंड पडले, डोके जड झाले. उरात एक अनामिक भीती दाटून आली होती. कसाबसा प्रवास करत मी घरी पोहोचलो. ‘‘काही कळलं का इंटरनेटवरून?’’ माझ्या खांद्याची बॅग घेत आईने विचारले. तिच्याही मनात संशयाने घर केले होते. ‘‘नाही. आता सोमवारी डॉक्टरांनाच दाखवू.’’ मी खोटे अवसान आणत खोटेच म्हटले. ...

वडिलांबरोबर बोलून पुढची चक्रे मग मी वेगाने फिरवली. सोमवारी आईला तडक मुंबईला घेऊन गेलो. तेथील एका इस्पितळात एका डॉक्टरांना दाखवले. त्यांनीही रिपोर्ट पाहून आईच्या पोटात दुखत असण्याचे कारण पोटात असलेली गाठ हे आहे, असे सांगितले व ती गाठ कॅन्सरची आहे, ह्यावरही त्यांनी शिक्कामोर्तब केले. ती गाठ काढण्यासाठी ताबडतोब ऑपेरेशन करणे भाग होते. नाताळ तीन दिवसांवर येऊन ठेपला होता.

‘‘तुम्हाला ऑपरेशनसाठी नाताळ सण उरकून इस्पितळात भरती व्हायचं असेल तरी चालेल...’’ अशा केसेसची सवय असल्याने त्या डॉक्टरांच्या असिस्टन्ट डॉक्टरने सहजपणे आम्हाला विचारले. ‘‘नाही डॉक्टर, आम्हाला ताबडतोब भरती व्हायचंय.’’ असे म्हणत आम्ही दुसऱ्याच दिवशी आईला इस्पितळात भरती केले. नाताळच्या आदल्या दिवशी आईचे ऑपरेशन पार पडले. ऑपरेशन झाल्यानंतरची पहिली रात्र असल्याने मी हॉस्पिटलमध्ये वसतीसाठी थांबलो. नाताळनिमित्त हॉस्पिटलमध्ये बरीच रोषणाई केलेली दिसत होती. हॉस्पिटलच्या प्रत्येक मजल्यावरील व्हरांड्यात नर्सेसनी ख्रिसमस ट्री डेकोरेट केलेला होता. त्याच्या पुढ्यात बाळयेशूच्या जन्माचा देखावाही मांडलेला होता.

मी नाताळाच्या सणाच्या पूर्वसंध्येला प्रथमच ‘इस्पितळ’ अशा अगदी अनपेक्षित ठिकाणी होतो. तोच काही नर्सेस व इस्पितळातील कर्मचारी वर्ग कॅरेल सिंगिंग करत आपापल्या परीने तेथील चिंताग्रस्त रुग्णांना व त्यांच्या नातेवाइकांना चीअरअप करत प्रत्येक वॉर्डमधून फिरत असल्याचे मी पाहिले. नाताळचा उत्साह शिगेला पोहोचलेला होता. मी त्या नर्सेसना इस्पितळातील उपस्थित लहान मुलांना भेटवस्तू वाटताना पाहिले आणि मला माझे लहानपण आठवले. मी विचार करू लागलो...

लहानपणी मला मिळणाऱ्या भेटवस्तूंमुळे नाताळ आवडायचा, थोडा मोठा झाल्यावर नवे कपडे मिळतात म्हणून नाताळची मी वाट पाहायचो, तर पुढे तारुण्यात मित्रांबरोबर पार्ट्या करण्याचे अधिकृत कारण म्हणून मला ‘ख्रिसमस ईव्ह’ आवडू लागला होता, आणि आता काही वर्षांपासून कुटुंबीयांसोबत काही निवांत क्षण व्यतीत करणे इथपर्यंतच आता या उत्सवाचे प्रयोजन सीमित झाले होते.

सणाच्या मागे जरी एखादे धार्मिक निमित्त असले, तरी तो उत्सव साजरा करण्यामागची आपली कारणे मात्र वेगळीच असतात. मी आईला ज्या खोलीत ठेवले होते तिथे परत आलो. ऑपरेशन थिएटरमधून बेडवर आणल्याला सात-आठ तास उलटूनही आई अजूनही शुद्धीवर आलेली नव्हती. ‘काय होईल आईचं? किती वेळ लागेल ह्यातून रिकव्हर व्हायला? मुळात ती रिकव्हर होईल की नाही?’ काहीच  कळत नव्हतं. कॅन्सर म्हणजे अंधारातील वाट. त्या वाटेवरून चाचपडत चालणे इतकेच काय ते आपल्या हातात असते. तो प्रवास किती वेळ चालेल, किती खडतर असेल याचा आपण काहीच अंदाज बांधू शकत नाही. विचार करून करून डोके जड झाले होते. संपूर्ण दिवसाचा थकवा, ऑपरेशनपूर्वीची धावपळ, सर्जरी पूर्ण होईपर्यंत 6-7 तास बाहेर येरझाऱ्या घालून शरीर गलितगात्र झालेले होते... पेंगुळलं होतं. त्राण संपलेले होते. गुंगीत असूनही आईच्या चेहऱ्यावरील थकवा जाणवत होता. काळवंडलेला निस्तेज चेहरा, नाका-तोंडातील नळ्या, निपचित पांढऱ्या चादरी खाली पहुडलेलं बेशुद्ध अवस्थेतील शरीर... बाजूला विविध औषधांच्या दाटीवाटीने भरलेले ते बाजूचं टेबल आणि निळ्या रंगाच्या झीरो बल्बचा त्या दहा बाय दहाच्या खोलीत पडलेला अंधुक प्रकाश...

मी आईच्या बेडशेजारीच असलेल्या खुर्चीत बसत विचार करत होतो. ‘आता कुठे संध्याकाळचे सात वाजले होते. उद्याची सकाळ कधी होईल?’ त्याहीपेक्षा या दुःखाची पहाट कधी होईल? एक दीर्घ श्वास घेत मी डोळे मिटले. ‘‘डेव्हिड...’’ मला कोण हाक मारतोय म्हणून मी डोळे परत उघडले अन्‌ आजूबाजूला पाहिले. खोलीत तर कुणीच तिऱ्हाईत दिसत नव्हते, फक्त हळूहळू फिरणाऱ्या फॅनचाच काय तो घरघर असा आवाज येत होता. आई अजूनही गाढ झोपेत होती. मी परत डोळे मिटले.

‘‘अरे डेव्हिड...’’ परत आवाज सुरू झाला.

 ‘‘तुला भीती वाटतेय, कारण कॅन्सर म्हणजे मृत्यू- असे समीकरण तुझ्या डोक्यात बसलेले आहे.’’ डिसोझा सरांचा आवाज होता तो. मला खूपच थकवा वाटत होता. मी डोळे तसेच बंद ठेवले.

 ‘‘एक्झॅक्टली! थोडक्यात, कॅन्सरबाबत असलेल्या अज्ञानामुळे. सध्या कॅन्सरच्या औषधोपचारांमध्ये बरेच आमूलाग्र बदल होत आहेत.’’ ॲड.अनुपही त्यांच्याकडील माहिती शेअर करत होते.

‘‘देवापेक्षा विज्ञानावर जास्त विश्वास ठेवणे गरजचे आहे,’’ सुनीलाही या चर्चेत सूर मिळवत म्हणाली.

‘‘ॲक्च्युली, आता ना यात एवढे रिसर्च झाले आहे की, मेजॉरिटी केसेसमध्ये पेशंट कॅन्सरने मरण्यापेक्षा तो शेवटपर्यंत बरोबर घेऊन जगू शकतो- आपल्या डायबिटिससारखं!’’ फ्लोरीच्या या बोलण्याने माझ्या चेहऱ्यावर आशेची एक लकेर उमटली. काहीसा आधार आला मला तिच्या बोलण्याने.

‘‘शेवटी मृत्यू कोणाला चुकला आहे का? हार्ट ॲटॅक, अपघात ह्याने धडधाकट तरुण काही सेकंदांत मृत्युमुखी पडतो. वेगवेगळ्या नैसर्गिक आपत्तींत काही क्षणांत होत्याचं नव्हतं होतं.’’ दीपेश नेहमीच्या शांत आवाजात उद्गारला.

‘‘...आणि जरी कॅन्सरने मृत्यू जवळ आला आहे असे जाणवले, तरी आपल्या कुटुंबीयांसह वा नातेवाइक- हितचिंतकांसह राहिलेले क्षण आनंदाने व्यतीत करून  कृतार्थपणे मृत्यूला कवटाळणे कधीही चांगले!’’ राम देशमुख दीपेशचे वाक्य पूर्ण करत म्हणाले.

मंचातील सदस्य असे एकेक करीत आपले मत, आपली सहानभूती दर्शवीत होते. मी शांतपणे सगळ्यांचे बोलणे ऐकत होतो. हळूहळू सर्वांचे आवाज अचानक कमी-कमी होत गेले आणि सगळ्यांचे चेहरेही हळूहळू धूसर होऊ लागले. एक निरव शांतता खोलीत पसरली. मी वर पाहिले. खोलीतील निळ्या रंगाच्या झीरो बल्बचा अंधुक प्रकाश अचानक नाहीसा होऊन आता तिथे पांढऱ्या आकाशकंदिलाचा तितकाच पांढरा शुभ्र प्रकाश पसरला होता. ग्लुकोजची बाटली ज्या स्टॅन्डला टांगलेली होती तो स्टॅन्ड आणि त्यावरील नळीही लाल व निळ्या रंगाच्या छोट्या-छोट्या प्रकाशमाळेने सजलेला दिसत होता. अंगात सर्जनचा सफेद एप्रन व डोक्यावर सांताक्लॉजची लाल रंगाची टोपी घातलेले डॉक्टर आईच्या बाजूला उभे होते व तिला काही तरी भेटवस्तू देत होते. त्याच वेळी खोलीच्या चारही भिंतींचंही समाज विकास मंडळातील पुस्तकाच्या उंच-उंच कपाटात रूपांतर होताना दिसत होतं...

‘‘अरे डेव्हिड... घसा सुकलाय... थोडे पाणी देतोस का?’’ आईच्या हाकेने मी चटकन भानावर आलो. सकाळची सूर्यकिरणे खिडकीतून आत डोकावत होती. घड्याळात पाहतो तर, सकाळचे साडेसात वाजले होते. काल रात्री खुर्चीत बसल्या-बसल्या माझा डोळा कधी लागला, हेच मला कळले नव्हते. मी तिथेच झोपी गेलेलो होतो.

‘‘हो, देतो- देतो...’’ थर्मासमधील गरम पाणी ग्लासमध्ये घेऊन मी तो ग्लास आईला दिला.

‘‘आता कसं वाटतंय ग?’’ मी विचारले. आई शुद्धीवर आली, हे पाहून माझ्या जीवात जीव आला. ‘‘अजून थोडं अशक्त वाटतंय. जरा खिडकीचा पडदा सरकावतोस का?’’ असे म्हणत आईने परत डोळे मिटले.

‘‘हो-’’ असे म्हणत मी पडदा बाजूला केला.

सूर्याच्या कोवळ्या किरणांनी ती छोटी खोली प्रकाशमान झाली. कडकडीत थंडीमुळे तो उबदारपणा हवाहवासा वाटणारा होता. मलाही एक नवा हुरूप आल्याचे जाणवले. विवेकमंच चक्क स्वप्नात माझ्या मदतीला आला होता. मंचाची चर्चा आता नेणिवेच्या पातळीवर झिरपली होती. मोबाईल इंटरनेटवरून कॅन्सर या आजाराविषयी जितकी माहिती गोळा करता येईल तितकी मी गोळा करत होतो. कॅन्सर, त्याच्या विविध स्टेजेस, केमोथेरपी, जेनेटिक्स... जी माहिती हाती लागेल ती मी वाचत होतो. प्रचलित गैरसमज, आधुनिक तंत्रज्ञान ह्याविषयी ज्ञानात बरीच भर पडत होती. कॅन्सरच्या आजारात पूर्ण भिस्त डॉक्टरांवर ठेवण्याऐवजी आपणही त्या-त्या विशिष्ट स्थितीतील आजारावर काय लेटेस्ट संशोधन झाले आहे, त्याची माहिती आपल्या परीने इंटरनेटवरून काढून डॉक्टरांबरोबर चर्चा करू शकतो, इतक्या वेगाने या विविध आजारांत आज संशोधन होत आहे. 

इंटरनेट म्हणजे आपण विचारही करू शकत नाही एवढा मोठा मानवजातीचा शोध आहे. ज्ञानाची भांडारे त्याने सर्वांना कोणताही शैक्षणिक, भौगोलिक भेदभाव न करता खुली केलेली आहेत. कॅन्सरच्या लढाईत किती तरी लहान बालके, तरुण माता, युवक-युवती धारातीर्थी पडले आहेत. त्याचबरोबर किती तरी शास्त्रज्ञ, activist यांनी यासंबंधी आपापल्या परीने योगदान दिलेले आहे. हे सर्व वाचून एक वेगळाच आत्मविश्वास माझ्यात आला.

दहाएक दिवसांनी आईला डिस्चार्ज मिळाला. आम्ही तिला घरी आणले. आईच्या प्रकृतीत हळूहळू सुधार होऊ लागला. तिलाही मग मी तिच्या आजाराची कल्पना दिली. तिनेही या आजाराचा स्वीकार केला. नंतर तर तिने केमोच्या सगळ्या सायकल्सही पूर्ण केल्या आणि गेल्या दोन वर्षांपासून तिच्या प्रकृतीत खूप सुधार आहे.

काही वर्षांपूर्वी माझ्या आजीचंदेखील कॅन्सरचं निदान झालं होतं. जेव्हा ते मला कळलं होते, तेव्हा मी खूप हादरलो होतो. ‘तिला देवाने बरे करावे’ म्हणून मी तेव्हा बरेच उपास-तपास केले होते. बऱ्याच चर्चेसमध्ये मी प्रार्थना वाहिलेल्या होत्या. पुढील सहा महिन्यांतच ‘बय’ अनंताच्या प्रवासाला निघून गेली होती. या वेळेला मात्र इतका बाका प्रसंग माझ्या आईवर ओढवूनही मला उपासतापास, प्रार्थना ह्यापैकी काहीही करावेसे वाटले नाही. जो काही प्रसंग उद्‌भवला आहे, त्याविषयी कोणताही पूर्वग्रहदूषितपणा न बाळगता, पूर्ण तटस्थपणे माहिती गोळा करून त्या प्रसंगाला शक्य तितक्या हिमतीने तोंड देणे हाच त्या प्रसंगावर मात मिळविण्याचा खरा तोडगा आहे हे मला थायलंडच्या ट्रिपनंतर पुन्हा एकदा जाणवले. विचारांबरोबर माझ्या कृतीतही मंचाचा विचार हळूहळू भिनायला सुरुवात झाली होती.

Tags: chrismas डॅनिअल फ्रान्सिस मस्करणीस मंच विवेकमंच Daniel Mascarenhas weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके

कर्तव्य

सर्व पहा