डिजिटल अर्काईव्ह (2014-2019)

मिंगेलच्या दिशेने हात करत काहीशा घुश्श्यातच रॉयल बोलू लागला, ‘‘यांची श्रद्धा आपल्याला कितीही अंध वाटली तरी तिचा आदर राखणे हाही एक विवेकच आहे, असे मला वाटते.’’ मिंगेल यांच्या मताला सहमती दर्शवण्यासाठी तो पुढे म्हणाला, ‘‘श्रद्धेमध्ये प्रेरणा आहे, श्रद्धा हे बुद्धीचे अपत्य असू शकते आणि श्रद्धा ही सकारात्मकही असू शकते. सकारात्मक श्रद्धा जर असेल, तर आपल्याला त्या आजाराचा सामना करण्यासाठी एक शक्ती मिळते, आपली इच्छाशक्ती वाढते आणि त्यामुळे आजार बराही होऊ शकतो. मी यांच्या मताशी सहमत आहे.’’ ‘‘सकारात्मक इच्छाशक्तीने आजार बरा होऊ शकतो, याबद्दल वाद नाही; पण या सकारात्मक इच्छाशक्तीने बऱ्या झालेल्या आजाराचे श्रेय आपण कोणा बाबाला देतो, हे आपले चुकते असे मला वाटते.’’

मिंगेल डिमेलो हे जरा उशिरानेच विवेकमंचाच्या सभांना यायला लागले. विवेकमंचाच्या दुसऱ्या वर्धापनदिनी चमत्कारांचे सादरीकरणया कार्यक्रमाचे आयोजन केलं होतं आणि त्यासाठी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य सचिव शहाजी भोसले यांना बोलावण्यात आलं होतं. त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मिंगेल आलेले होते. मग ते मंचाच्या चर्चेतही सहभागी होऊ लागले. तोपर्यंत विवेकमंचाच्या बहुतांशी सदस्यांच्या विविध शंका दूर होऊन त्यांना आता धर्मव्यवस्थेतील दोष दिसू लागले होते. विशिष्ट धर्माचे पालन न करता जर विवेक शाबूत ठेवला, तर आनंदी जीवन जगता येऊ शकते, हे वेगवेगळ्या चर्चांद्वारे आता उमजले होते. धर्म जरी पाळायचा असेल तरी त्याचे अनुकरण हे कर्मकांडविरहित असू द्यावे, हेही मनाला पटायला सुरुवात झाली होती.

दुसऱ्याचा धर्म सोडून द्या, आपला धर्मही परफेक्ट नाही- या वास्तवाचीही त्यांना हळूहळू जाणीव होऊ लागली होती. या पार्श्वभूमीवर लिहिण्या-वाचण्यात काहीशा सरावलेल्या पहिलीच्या मुलाने पाचवी-सहावीच्या वर्गात आल्यावर जशी गंमत होईल, तशीच काहीशी गत मिंगेल डिमेलो यांचीही झाली. वयामुळे डोक्याला पडलेले टक्कल, उंच, धिप्पाड शरीरयष्टी; पण मनाने एकदम लहान मुलांसारखे असलेले साठीतले मिंगेल डिमेलो जेव्हा मंचात येऊन चक्क भुता-खेताच्या गोष्टी करू लागले, तेव्हा ते चेष्टेचाच विषय बनले. त्या वेळी व्हिक्टर मर्ती यांचे प्रकरण चर्चेत होते.

व्हिक्टर मर्ती म्हणजे वसईतील आशीर्वादनावाच्या धार्मिक संस्थेचे संस्थापक. तसे ते शिक्षणाने सी.ए. आहेत. 30 वर्षांपूर्वी सी.ए. झालेली ही हुशार व्यक्ती अचानक कॅरिज्मॅटिक प्रार्थनेने प्रभावित झाली व या कॅरिज्मॅटिक प्रार्थनेमध्ये आली. ही प्रार्थना चर्चमध्ये जी मिस्सा साजरी होते, त्यापेक्षा काहीशी वेगळी असते. इथे येशू हा केंद्रस्थानी नसतो, तर पवित्र आत्मा ही जरा गोंधळात टाकणारी संज्ञा केंद्रस्थानी असते आणि त्या पवित्र आत्म्याला जोरजोरात हाका मारणे, टाळ्या पिटणे, चित्र- विचित्र भाषेत आवाज करणे, अशा धर्तीवरची ही प्रार्थना असते. चर्चमध्येदेखील या प्रार्थना होतात, पण त्या काहीशा मवाळ स्वरूपाच्या असतात. व्हिक्टर मर्तीने या प्रार्थनेमध्ये हळूहळू मी अमके आजार बरे करू शकतो, तमके आजार बरे करू शकतोअसे सांगण्यास सुरुवात केली. मग चर्चने पण ह्यातून आपले अंग काढून घेतले आणि या संस्थेशी आपला काहीही संबंध नसल्याचे जाहीर केले. पण तोपर्यंत हे ख्रिश्चन बाबा कोणतेही असाध्य आजार बरे करतात, म्हणून भाविकांची इथे गर्दी सुरू झाली. महाराष्ट्रातून बरेच भाविक इथे प्रार्थनेसाठी येत होते. त्यामुळे श्रद्धेच्या नावाखाली विविध वस्तू विकण्याच्या बाजारीकरणालाही इथेऊत आला होता. अशात त्यांचा एक रेकॉर्डेड व्हिडिओ व्हॉट्‌सॲपवरून अचानक व्हायरल झाला. कॅरिज्मॅटिक प्रार्थना करतानाचा तो व्हिडिओ होता. त्यामध्ये ते दावा करत होते की, मी एड्‌स- कॅन्सरसारखे आजार बरे करू शकतो. जे विज्ञानालाही अजून शक्य झालेले नाही, ते हा बाबा कसे बरे करू शकणार होता? तो व्हिडिओ एक चेष्टेचा विषय बनला.

तो एका वृत्तवाहिनीनेसूटबूट में आया भोंदू-बाबाया नावाखाली त्यांच्या न्यूज चॅनेलवरून प्रसारित केला. मग हे मर्ती प्रकरण बरेच चर्चिले जाऊ लागले. त्यानंतर अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आवाज उठवण्याचे ठरविले. त्यांनी त्यांचे जे मुंबई विभागाचे प्रतिनिधी होते. सचिन थिटे यांना ते प्रकरण हाताळण्यासाठी वसईत पाठवले. ॲड.अनुप डिसोझा यांचा अंनिसशी संबंध असल्याने ते एका रविवारी मंचाच्या सभेस त्यांना घेऊन आले. तेव्हा सचिन यांनी आपण एकंदर या प्रकरणाचा आढावा घेत असल्याची माहिती दिली आणि विवेकमंचानेही आपला याला पूर्ण पाठिंबा राहील, असे सांगितले. मग त्यांनी या प्रकरणाचा व्यवस्थित पाठपुरावा करून पोलिसांमध्ये एफआयआर दाखल केला. त्यानंतर पोलिसांची कारवाई होऊन हे आशीर्वादकेंद्र बंद पडले होते. जरी आशीर्वादकेंद्र वसईमध्ये असले, तरी तेथील लोक तिथे जास्त फिरकत नव्हते, कारण त्यांनाही त्यामध्ये रस उरला नव्हता. इथे वसईबाहेरचेच लोक जास्त यायचे. तसेच हे केंद्रही गावाबाहेर असल्याने तिकडे स्थानिकांचे जास्त लक्ष जात नव्हते. परंतु हिंदू धर्मांध शक्तींनी ख्रिश्चन केंद्र बंद पाडलेअसा काहीसा धार्मिक रंग या प्रकाराला अचानक दिला गेला. मग या भागात थोडासा तणाव निर्माण झाला होता. पुन्हा काही दिवसांनी आशीर्वादकेंद्र जेव्हा परत सुरू झाले, तेव्हा अखेर अंनिसची शरणागतीअशी बातमी वसईत पसरविण्यात आली. पण खरे कारण वेगळेच होते. पोलिसांनी व्हिक्टर मर्ती यांना सक्त ताकीद देऊन सोडले होते की- इथे केवळ प्रार्थनाच करण्यात यावी, कोणतेही दिशाभूल करणारे चमत्काराचे दावे करण्यात येऊ नयेत. तसे जर केलेत, तर अंधश्रद्धा कायद्यांतर्गत तुम्हाला पुन्हा अटक केली जाईल.

गंमत म्हणजे, जेव्हा पोलीस या प्रकरणासाठी मर्ती यांना अटक करण्यासाठी गेले, तेव्हा मर्तींनी काय करावे? तर, ‘माझ्या छातीत दुखते आहे, मला हॉस्पिटलमध्ये घेऊन चलाअसे म्हणून ते हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. जी व्यक्ती एड्‌स- कॅन्सरसारखे मोठमोठे आजार मी बरा करू शकतोअसे छातीठोकपणे सांगत होती, ती स्वतः मात्र एका छोट्याशा आजाराचे निमित्त घेऊ पाहत होती! हा शुद्ध ढोंगीपणा होता. एके दिवशी विवेकमंचात याच व्हिक्टर मर्ती यांच्याविषयी आम्ही चर्चा करत होतो. ‘‘व्हिक्टर मर्ती हे माझे वर्गमित्र होते. शाळेत असल्यापासून मी त्यांना ओळखते. त्याने प्रार्थना ग्रुप सुरू केल्यावर काही दिवसांनी एक कुतूहल म्हणून मी त्या प्रार्थनासभेला गेले होते. हा काय प्रार्थना करतोय आणि एवढे लोक प्रार्थनासभेला गर्दी का करतात ते पाहू या म्हणून मी गेले. प्रार्थनासभा सुरू असताना अचानक वीज गेली आणि कालांतराने वीज आली. वीज परत आल्यावर मर्ती अचानकहालेलूया, हालेलूया, प्रेज द लॉर्ड, प्रभूचा गौरव असोअसे म्हणू लागला. मी त्याला विचारलं की, अशा छोट्या- छोट्या गोष्टीसाठी प्रभूचा गौरव? अरे, लाईट गेली म्हणजे हा काही तरी तांत्रिक बिघाड आहे आणि लाईट आली यात पण  काही तरी तांत्रिक सुधार आहे. अशा छोट्या-छोट्या गोष्टींसाठी तुम्ही देवाचे नाव का घेता?’’ सुनीलासारखी स्पष्टवक्ती स्त्री आणि तीही लहानपणापासून शाळेत असणारी वर्गमैत्रीण जर समोर असेल, तर मग कित्येक आजार बरे करण्याच्या वल्गना करणाऱ्या त्या मर्तीची काय बिशाद!

सुनीला पुढे म्हणाली, ‘‘नंतरही जेव्हा तो वेगवेगळ्या रोग्यांना बरे करण्याचे दावे करायचा, तेव्हा मी त्याला म्हणायचे की- कोणी माणूस जर मरणपंथाला लागलेला असेल, जर त्याचा अचानक अपघात झालेला असेल; तर तू काय करशील? त्याला हॉस्पिटलला घेऊन जाशील, की त्याच्यासाठी प्रार्थना करत बसशील? गुड Samaritan मानणारा आपला ख्रिश्चन धर्म आहे. आपण सेवा केली पाहिजे, प्रार्थना करून तिथे काही होणार नाही. मी बरेच वाद त्याच्याशी घातलेले आहेत.’’ सभेत पतपेढीचे अध्यक्ष शिरीष आल्मेडा हेदेखील उपस्थित होते. ते खूपच कमी वेळेला सभेला यायचे. पण जेव्हा वेळ काढून ते यायचे, तेव्हा जे मत ते मांडायचे, ते खूप वेगळे व विचारांना चालना देणारे असायचे. किंबहुना, त्यांच्या दोन्ही मुली सोनल व फ्लोरी वेगळ्या व स्वतंत्र विचार करणाऱ्या का आहेत, हे त्यांच्या वडिलांकडे बघून जाणवायचं. ते सहभागी होईपर्यंत आम्ही मंचामधील सदस्य हा सर्व बुवाबाजीचा प्रकार आहेया सुरातच बोलत होतो, ‘आपण याला आळा घातला पाहिजे.व्हिक्टर मर्तींचे आशीर्वादकेंद्र बंद पडलेच पाहिजे, अशा प्रकारची चर्चा होत होती.

पण शिरीष आल्मेडा म्हणाले, ‘‘वैद्यकीय क्षेत्राने बरीच प्रगती केलेली आहे आणि बऱ्याच आजारांवर आज उपचार-औषधे उपलब्ध आहेत. दुर्दैवाने ही जी उपचारपद्धती आहे, ती गोरगरिबांना परवडणारी नाही. आज आपण जर व्हिक्टर मर्ती यांचे आशीर्वादकेंद्र पाहिले, तर तिथे सर्व गरीब व खालच्या वर्गातील किंवा कष्टकरी वर्गातील लोक आहेत. हे लोक एवढ्या लांबून इथे का येतात, तर त्यांनी कोणाकडून तरी ऐकलेले आहे की, ‘कोणी तरी आहेत, जे आजार बरा करतात.अशा गरिबांना वैद्यकीय उपचार परवडणारे नाहीत. त्यामुळे असं जर सुखासुखी बरं होणार असू, आपल्या वेदनेत काही फरक पडणार असेल; तर ते का नाही प्रयत्न करणार?’’ त्यांचा मुद्दा दुर्दैवाने रास्त होता. हे बुवाबाजीचे प्रकार जर टाळायचे असतील तर मेडिकल रिफॉर्म्स्‌ झाले पाहिजेत. वैद्यकीय क्षेत्रात जी प्रगती होत आहे, जे काही उपचार-औषधे उपलब्ध असतील, ती गरिबातल्या गरिबांनाही मिळणे गरजेचे आहे. मग अशा चमत्काराच्या ठिकाणी गर्दी होणार नाही आणि जादूचीही निकड भासणार नाही. औषध कंपन्यांनी त्यांच्या प्रयोगशाळेत तयार केलेलं औषध संशोधनाचा खर्च वसूल झाल्यावर गरीब देशांतही स्वस्त दरात उपलब्ध करून दिलं पाहिजे. धर्म आणि विज्ञान यांनी वैद्यकीय क्षेत्रात तरी एकत्र येणं गरजेचे आहे’, हे शि.स. अंतरकर यांच्या व्याख्यानातील वक्तव्य आठवले. विनोबा भावेंनी म्हटल्याप्रमाणे- मग सूर्योदय होण्यास वेळ लागणार नाही. शिरीष हा मुद्दा मांडत असतानाच मिंगेल डिमेलो यांचे आमच्या सभेत आगमन झाले. चर्चेचा विषय त्यांच्या थोडा लक्षात आला आणि त्यांनी तात्काळ बोलायला सुरुवात केली, ‘‘प्रार्थनेने आजार बरे होतात, त्यासाठी तुमची श्रद्धा असावी लागते. मी स्वतः याचा अनुभव घेतलेला आहे.’’ मंचाची चर्चा वेगळ्याच दिशेने चालू असताना हा कोण आहे जो असे विधान करतो आहे,’ म्हणून सर्व जण मिंगेलकडे पाहू लागले.

सभेतील कॅथरिन व पीटर या भावा-बहिणीच्या जोडीने ‘‘श्रद्धा म्हणजे काय, हे तुम्ही सांगाल का? व्याख्या सांगू शकाल का तुम्ही?’’ असा प्रश्न विचारला. सॅबेस्टियन अंकल यांनीही काहीसे एक्साईट होत, ‘‘हम्म..हो..हो.. श-श- श्रद्धा म्हणजे काय, ते जरा आम्हाला सांगा.’’ म्हणत त्यांच्या सुरात सूर मिसळून म्हटले. त्यावर मिंगेलने उत्तर दिले, ‘‘श्रद्धा म्हणजे विश्वास. जर पवित्र आत्म्यावर तुमचा विेशास असेल, त्यांनी जर तुम्हाला स्पर्श केला असेल; तर या जगात अशक्य असे काहीच नाही. जो काही असाध्य असा रोग असेल, तो बरा होऊ शकतो, मी पाहिलेले आहे-’’ अनुप डिसोझांनी त्यांच्या या विधानाला विरोध करत रागाने म्हटले, ‘‘अशी कोणती व्यक्ती तुमच्या पाहण्यात आली आहे का? तुम्ही कोणत्या माहितीच्या आधारे हे वक्तव्य करत आहात? केवळ ऐकलेले आहे म्हणून या गोष्टीचे समर्थन होऊ शकत नाही. ती व्यक्ती कोण? त्याचे प्रार्थनेआधीचे मेडिकल रिपोर्ट आहेत का? प्रार्थनेला सुरुवात केल्यानंतरचे मेडिकल रिपोर्ट आहेत का? तुमच्याकडे या गोष्टीचे काही पुरावे आहेत का?’’ मिंगेल डिमेलो कितीही टोकाचे बोलत असले तरी ते नवोदित सदस्य होते. तेव्हा सरांनी सूत्रे आपल्या हातात घेतली.

‘‘आपण कितीही सांगितले तरी श्रद्धा म्हणजे  काय, तर आपण जे न अनुभवता मानतो ती. श्रद्धा आपण पडताळू शकतो का? तर, नाही. आता हे जे तुम्ही सांगताय की श्रद्धेने काही आजार बरे होऊ शकतात, तर यालाप्लासिबो इफेक्टम्हणतात. वैद्यकीय क्षेत्रात असा प्रयोग करण्यात आला होता की, एक विशिष्ट आजार असणाऱ्यांचे दोन गट बनवण्यात आले होते आणि त्या प्रत्येक गटामध्ये अशा व्यक्ती होत्या की, त्यांना एकच आजार होता, आजाराची लक्षणे एकसारखीच होती. एका गटाला वैद्यकीय गटाने संशोधन केलेले औषध देण्यात आले, तर दुसऱ्या गटाला एक नकली गोळी देण्यात आली ज्याच्यामध्ये काहीही नव्हते, फक्त सामान्य पावडर होती. त्यांना सांगितले गेले की, हे औषध आहे. दोन्ही गटांतील लोकांना सांगितले गेले की, जगातील उत्तम औषध तुम्हाला देण्यात आले आहे आणि तुम्ही या आजारातून बरे व्हाल. काही दिवसांनी जेव्हा पुन्हा चाचणी करण्यात आली, तेव्हा पहिल्या गटामधील- ज्या गटात वैद्यकीय संशोधनातून निष्पन्न झालेले औषध देण्यात आले होते त्यापैकी- 90 ते 95 टक्के लोक बरे झाले. आणि दुसऱ्या गटात 5 टक्के जण बरे झाले. आता 5 टक्के लोक फसवे औषध मिळूनही कसे बरे झाले? तर, ‘मला चांगले औषध मिळालेले आहे, मी बरा होणारचया त्यांच्या इच्छाशक्तीमुळे वा प्लासिबो इफेक्टमुळे.

प्रार्थना गटातही असेच काहीसे घडते. प्रथमतः लोक जमतात, प्रार्थना करतात. त्यापैकी एकाचे काही तरी दुखायचे थांबते किंवा कमी होते तो 10 नव्या लोकांना ती गोष्ट सांगतो. ते दहा जण मग प्रार्थनेला येतात व या दहा जणांतील प्रत्येक जण तो एखादा चमत्कारआणखी दहा जणांना सांगतो. मग पुढच्या वेळेला या दहाचे शंभर होतात. असेच मल्टिप्लाय होत-होत शंभरचे हजार आणि मग त्याचे एक लाख होतात. असे करत-करत हे चक्र पुढे चालू राहते.’’

मिंगेल डिमेलो मंचात पहिल्यांदाच आले होते. पूर्ण विवेकमंच एका बाजूला आणि मिंगेल डिमेलो दुसऱ्या बाजूला, अशी परीस्थिती निर्माण झालेली होती. ते एक हास्यास्पद विषय झाले होते. नेमक्या त्याच सभेस रॉयलही उपस्थित होता. मिंगेल यांची मंचात होत असलेली थट्टा त्याला खटकली. मिंगेलच्या दिशेने हात करत काहीशा घुश्श्यातच रॉयल बोलू लागला, ‘‘यांची श्रद्धा आपल्याला कितीही अंध वाटली तरी तिचा आदर राखणे हाही एक विवेकच आहे, असे मला वाटते.’’ मिंगेल यांच्या मताला सहमती दर्शवण्यासाठी तो पुढे म्हणाला, ‘‘श्रद्धेमध्ये प्रेरणा आहे, श्रद्धा हे बुद्धीचे अपत्य असू शकते आणि श्रद्धा ही सकारात्मकही असू शकते. सकारात्मक श्रद्धा जर असेल, तर आपल्याला त्या आजाराचा सामना करण्यासाठी एक शक्ती मिळते, आपली इच्छाशक्ती वाढते आणि त्यामुळे आजार बराही होऊ शकतो. मी यांच्या मताशी सहमत आहे.’’

‘‘सकारात्मक इच्छाशक्तीने आजार बरा होऊ शकतो, याबद्दल वाद नाही; पण या सकारात्मक इच्छाशक्तीने बऱ्या झालेल्या आजाराचे श्रेय आपण कोणा बाबाला देतो, हे आपले चुकते असे मला वाटते.’’ सोनल नेहमीप्रमाणे सभेच्या टिपण वहीत लिहीत असताना रॉयलला म्हणाली, ‘‘एकाच प्रकारचा दृष्टिकोन समाजात असावा, हा आग्रह आपण का धरायला पाहिजे, हे काही मला कळत नाही. जगाकडे पाहण्याचे एका वेळी किती तरी वेगवेगळे दृष्टिकोन या जगात असले पाहिजेत. हे जग बहुविध आहे. विविधता हा जगाचा स्थायिभाव आहे. त्यामुळे या जगात असंख्य वेगवेगळ्या आचार-विचारांची माणसे असणारच, हे सत्य समजून घेणे गरजेचे आहे...’’ ‘रॉयलने त्याची भूमिका स्पष्ट केली होती. विवेकाचा दृष्टिकोन इतरांवर लादणेहे त्याला अविवेकी वाटत होते. धर्म हा आपल्या जीवनातील अविभाज्य भाग असल्याने राजकारण, समाजकारण, संस्कृती असो वा इतर कोणतीही समस्या. सर्वांच्या मुळाशी धर्मच असल्याने, मंचातील चर्चा वेगवेगळ्या मुद्यांवरून सुरू होत बहुतांश वेळेला धर्माभोवतीच फिरत असे.

रॉयलला फक्त धर्माविषयी- आणि तेही ख्रिश्चन धर्माविषयी- चर्चा करत राहणे पसंत नव्हते. विवेक फक्त धर्मातच लागतो का?’ या एका मुद्यांवरून त्याने सभेस येणे अचानक बंद केले. मला वाटते, याला आणखी एक कारण असावे. विवेकमंचाच्या सभेस येणे ज्यांना प्रत्येक रविवारी शक्य नव्हते आणि असे विवेकी विचार आवडणाऱ्या लोकांना या उपक्रमात सहभागी होता यावे यासाठी आम्ही एक व्हॉट्‌सॲप ग्रुप सुरू केला आणि यावर बरेच सदस्य मेंबर म्हणून नोंदविले होते. दर रविवारी होणाऱ्या मंचाच्या सभेचा वृतांत इथे शेअर केला जात असे. त्याचबरोबर कोणत्याही विषयावरील एखादा वेगळा लेख या ग्रुपवर इतर सदस्य शेअर करीत असत आणि या माहितीच्या आदानप्रदानाम ध्ये कधी कधी काही नास्तिक, निधर्मी असे  इंटरनेटवर प्रकाशित झालेले लेख टाकले जायचे, त्यावर व्हॉट्‌सॲपवरील ग्रुपमध्ये ऊहापोह चालायचा. यामुळेच असेल कदाचित- त्याने येथे धर्माविषयी खूपच नकारात्मकता आहेया कारणास्तव पहिल्यांदा व्हॉट्‌सॲप ग्रुप सोडला व नंतर मंचामध्ये येणे बंद केले.

आमच्या मैत्रीत यामुळे काही कटुता आली नाही; पण इतिहास, संस्कृती या विषयात आवड असणाऱ्या रॉयलचे विचार आता मंचात ऐकायला मिळणार नव्हते. मंचाच्या निमित्ताने जे भेटणे व्हायचे, तेही आता थांबले याचे मात्र मला वाईट वाटले. पण मिंगेल यांचे मात्र मंचात येणे थांबले नाही. त्यांच्या एकंदरीत विक्षिप्त व्यक्तिमत्त्वामुळे मंचालाही ते हळूहळू आवडू लागले होते. मंचातील लोकही मग नवे आहेतअसा विचार करत मिंगेल यांना संयमाने स्वीकारत होते. परंतु कधी कधी भूत, अंगात येणे, सापांनी सूड उगवण्यासाठी डंख मारण्याचे प्रकार हे सर्व खरे आहे असे सांगत ते खूप ठाम राहायचे आणि मी भूत पाहिलेले आहे, मला अंगातील भुते काढता येतातअसे काहीही बरळायचे. एकदा अशाच एका चर्चेदरम्यान सुनीला यांनी त्यांना विचारले, ‘‘तुम्ही भूत कधी काढणार आहे ते सांगा, त्या दिवशी आम्ही येऊ. तुम्ही जर आम्हाला भूत दाखवणार असाल, तर रात्री 12 वाजतादेखील तुम्ही ज्या ठिकाणी बोलवाल तिथे यायची आमची तयारी आहे.’’ असे म्हटल्यावर मग मिंगेल भडकले आणि म्हणाले, ‘‘तुला तिथे यायची गरज नाही, मी भूत तुझ्या अंगातच घालून दाखवतो बघ तर!’’ त्यालाही ती पठ्ठी डगमगली नाही आणि म्हणाली, ‘‘चालेल. घालून दाखव तू भूत, मला बघायचेच आहे- अंगात येतं म्हणजे काय, ते एकदाचं अनुभवता येईल.’’

‘‘भूत मेलेल्या जिवांचं होतं, असं जर आपण मानलं तर मग कावळा, चिमणी, कुत्रे, मांजरी यांचीही भुते असायला पाहिजेत ना?’’ तात्यांनी असे म्हणताच हसू आवरणे मग खूपच कठीण व्हायचे. असे खूपसे वाद रंगायला लागले. मग डिसोझासर यांना मधे पडून सर्वांना आवरावे लागायचे.

''Hate the sin, not the sinner.'' दाभोलकरांनी अंगात येणे, भानामती अशी खूप प्रकरणे त्या-त्या ठिकाणी जाऊन ती कशी खोटी आहेत हे सप्रमाण सिद्ध केलेले आहे.’’ तेव्हा मिंगेल काहीसे रागाने बोलले, ‘‘धर्म, धर्माचे प्रबोधन व अंधश्रद्धा या तिन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत आणि वेगळ्या तऱ्हेने याकडे पाहायला हवे; दाभोळकरांनी मात्र या तिन्ही गोष्टी एकत्र केल्या.’’ ‘‘भूत, राक्षस या संकल्पना आपण प्रतीकात्मक रीतीने समजून घेतल्या पाहिजेत. अंगात भूत येणे किंवा मनात राक्षस असणे याकडे आपण प्रतीकात्मकरीत्या पाहिले पाहिजे. प्रत्यक्षात या गोष्टी आता राहिलेल्या नाहीत.’’ नॉर्मनने त्याचे संयमित मत नोंदवले. परंतु मिंगेलला काही ते पटलेले नाही, असे त्याच्या चेहऱ्यावरून तरी वाटत होते. असे असले तरी मिंगेल सभेत वेळोवेळी येत राहिले, कारण त्यांनाही या विविध विषयांवरच्या चर्चा आवडू लागल्या होत्या. त्यांची बोलण्याची शैलीही काहीशी वेगळी होती. त्यांना एक छोटासा मुद्दा सांगावयाचा असायचा, पण त्याआधी ते खूपच ड्रामा निर्माण करायचे. त्यासाठी ते 10-15 मिनिटे घ्यायचे. सभेचा वेळ मर्यादित असल्याने बऱ्याचदा त्यांना तुम्हाला जो मूळ मुद्दा सांगायचा आहे, तो सांगाअशी आठवण करून द्यावी लागायची. पण ते अगदी गप्पांच्या सुरात बोलायला लागायचे. मग त्यांना मधेच तोडायला लागायचे, तर कधी कधी चर्चा चालू असताना ते ती भलत्याच दिशेने घेऊन जायचे.

बुद्धाच्या विचाराविषयी संपूर्ण मंच बोलण्यात रंगलेला असताना, ‘बौद्धाचा सहावा अवतार मी पाहिलायअसं काहीबाही म्हणायचे आणि मग मंचात हास्यस्फोट व्हायचा. ते काही वाईट नव्हते. त्यांच्या मनाचे जे कंडिशनिंग होते, तो पगडा खूपच मोठा होता आणि या सर्व पगड्याचे ते बळी होते, हे त्यांनाच कळत नव्हते. ते धर्माचे गुलाम होते, पण त्यांना त्या गुलामगिरीची जाणीव होत नव्हती. ते देवमाणूसआहेत किंवा नाही याचा जरी मला अनुभव आलेला नसला, तरी ते देवभोळेहोते, हे मात्र नक्की! स्वभावाने ते खूपच चांगले होते. विवेकमंचाने जे-जे काही कार्यक्रम आयोजित केले, त्या सर्व कार्यक्रमांना ते हजर राहात आणि प्रत्येक कार्यक्रमाला ते त्यांच्या बागेतील वेगळीच, परदेशी जातीची लाल भडक फुले आणायचे. आम्ही व्याख्यानासाठी जे काही पाहुणे बोलवायचो, त्यांना देण्यासाठी ती फुलं ते घेऊन यायचे. पण तेव्हा माझ्या मनातही नव्हते की, हेच मिंगेल डिमेलो पुढे मोठ्या वादाच्या केंद्रस्थानी असणार आहेत...!

Tags: manch डॅनिअल फ्रान्सिस मस्करणीस daniel mascarenhas weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके

कर्तव्य

सर्व पहा