डिजिटल अर्काईव्ह (2014-2019)

खरंच कोणी तरी केलेल्या प्रार्थनेमुळे हे शक्य झाले असेल का? की, त्या आणीबाणीच्या प्रसंगात मी दाखविलेल्या विवेकी कृत्यामुळे हे शक्य झाले? खरंच, जेवढी चूक हा प्रसंग उद्भवण्यात माझी आहे, तेवढेच डोके शांत ठेवून विवेकाने प्रसंग हाताळण्याचे श्रेयसुद्धा माझेच आहे की! यात स्वार्थीपणा नाही. पण कधी- कधी आपण त्या वेळेस जी सदसद्‌द्विवेकबुद्धी वा इच्छाशक्ती दाखवतो आणि जसा तो क्षण हाताळतो त्याला आपण हवे तितके श्रेय देत नाही; चटकन आपण ते श्रेय आपल्या नशिबाला वा देवाला देत असतो. ‘‘सर्व प्रश्नांचे, दुःखांचे उत्तर हे तुमच्या विचारांमध्ये आहे. जर विवेकाचा वापर सातत्याने करीत राहिलात, तर तुम्ही नक्कीच सुखी व्हाल.’’ बुद्धाला किती वर्षांपूर्वी हे उमजले होते! मला जणू एक साक्षात्कार झाल्यासारखे वाटले. बुद्धाचे विचार जरी मी अगोदर ऐकलेले असले, तरी स्वतःवर बेतलेल्या या प्रसंगात ते वापरताना त्या शब्दांची खरी ताकद कळली होती.               

...मधे असेच काही महिने गेले आणि गौतम बुद्धाशी आणि बौद्ध धर्माशी पुन्हा एकदा गाठ पडली, तीही एका परकीय अपरिचित भूमीत! बाहेरच्या देशात एक सहल करावी, असा विचार मनात घोळत होता. नातलगातील नवविवाहित जोडपे थायलंडची ट्रिप करून आले होते. त्यांच्याकडून तिथे प्राण्यांचे असलेले विविध उपक्रमांविषयी ऐकले आणि मुलाला असलेल्या प्राण्यांच्या आकर्षणातून थायलंडची ट्रिप बुक केली. ज्या देशाविषयी (संस्कृती, भाषा, लोकजीवन, इतिहास) काहीही माहिती नाही, अशा देशात आपण जातोय; म्हणून आम्हालाही थोडे आकर्षण निर्माण झाले. अखेर तो दिवस उजाडला. नवीन खरेदी केलेल्या कपड्यांनी व इतर वस्तूंनी खचाखच भरलेली बॅग, कॅमेरा, आणि नव्या आठवणी साठविण्यासाठी हलकी केलेली आमची मने आणि मेमरी कार्ड घेऊन आम्ही मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टला पोहोचलो. टूर्सच्या टीमकडून मिळालेली तिकिटे, व्हिसा, खाऊची पाकिटे गोळा करून आम्ही चेक-इन केले व एअर इंडियाच्या विमानात बसलो. तब्बल पाच तासांनी आम्ही थायलंडला बँकॉक येथील एअरपोर्टवर उतरलो. जिकडे-तिकडे चिनी- जपानी-थाई लोक दिसत होते. म्हटलं तर आशियाच खंड  हा, युरोप-अमेरिकेपेक्षाही आपले हे देश शेजारी, पण तरीही त्यांच्याकडे बघून ओळखीची भावना वाटत नव्हती. आमचे सहप्रवासी सोडून इतर काहीही ओळखीचे वाटत नव्हते. पण इमिग्रेशन काऊंटरवर गेलो आणि तेथील इंग्रजी भाषेत ठळक लिहिलेली एक सूचनावजा नोट पाहिली आणि मला सुखद धक्काच बसला. 

ती नोट होती, "In our country, its criminal offense, to use, Budhha's name or image in any logo, tattoo or in any commercial advertisement.''

 विचार केला- आपला भारतीय बुद्ध कोठे पोहोचलाय! आणि केवढा येथे त्याला मान! केवढे हे निस्सीम प्रामाणिक प्रेम! आपलं प्रेम म्हणजे काव्यात कोंडलेलं, डायलॉगमध्ये डांबलेलं किंवा चटकन भावना दुखावलं जाणारं! पण बुद्धाचं बाजारीकरण काही प्रमाणात रोखणारं असं प्रामाणिक, व्यवस्थित कायद्याच्या चौकटीत बसवलेलं ‘no-nonsense’ कृतिशील प्रेम पाहून खूप छान वाटलं. इस्रायलने नाकारलेला येशू जगात मान्यता पावला आणि भारतात ‘जय भीम’वाल्यांचा म्हणून काहीसा दुर्लक्ष झालेला बुद्ध जपान/चीन/थायलंड (जिथे भले-भले अमेरिका, युरोपसारखे देशसुद्धा घुसखोरी करू शकले नाहीत) येथे मान्यता पावला. ‘संदेष्ट्याला त्याच्या गावात मान मिळत नाही’ हे बायबलवचन तेव्हा आठवले. 

थायलंडमध्ये ठिकठिकाणी बुद्धाची उभारलेली विविध भव्य मंदिरे, ‘बुद्धम शरणं गच्छामि’चे ओळखीचे सूर आळविणारे अनोळखी थाई भिक्खू पाहून बुद्धाविषयी अधिकच आत्मीयता वाटू लागली होती. मात्र हळूहळू भिक्षुकांचेही धर्माशी विसंगत वागणे याविषयी बऱ्याच चर्चा ऐकण्यास मिळाल्या. एका बौद्ध स्तुपामध्ये जे खरे म्हणजे अहिंसेचे द्योतक असायला हवे, अशा ठिकाणी शेकडो वाघांच्या बछड्यांची क्रूररीत्या छळ करून हत्या केली गेली होती. क्रूरतेची परिसीमाच होती ती! हा प्रसंग ऐकला आणि अहिंसेच्या घरातील हिंसेच्या या विरोधाभासापुढे मग त्या 90 कॅरेट सोन्याच्या बौद्ध मूर्तीचे वैभव नजरेत काळवंडून गेले. ‘गौतम बौद्ध’ या विवेकी पुरुषाचे अहिंसेचे विचार पायदळी तोडून बौद्ध धर्मीयांनी फक्त ‘भगवान बुद्धा’च्या भव्य मूर्ती उभारून त्याच्या पुढे पूजा करण्यातच धन्यता मानली होती! एकंदरीत हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन या धर्मांप्रमाणेच या धर्माचीही नीतिमूल्ये पायदळी तुडविली गेली होती. थायलंडची सहल ही माझ्यासाठी अनपेक्षितरीत्या बौद्ध धर्माची आजची वास्तव बाजू दाखवणारी ठरली होती. पण लवकरच ‘शांतचित्त राहून तुमचा विवेक सतत जागृत ठेवा’ या बुद्धाच्या वचनाचा मला येथेच लवकर प्रत्यय येणार होता, याची माझ्या मनात पुसटशीदेखील कल्पना नव्हती. 

थायलंडमधील बँकॉक हे शॉपिंगसाठी खूपच प्रसिद्ध आहे. त्यामुळे टूर गाईडनी शेवटच्या दिवशी तीन तास केवळ शॉपिंगसाठी राखून ठेवले होते. बँकॉक येथील इंद्रा स्क्वेअर म्हणजे शॉपिंगची मक्काच. लांबी व रुंदी किलोमीटर्समध्ये भरेल एवढा अवाढव्य विस्ताराचा हा मॉल आहे आणि या अवाढव्य स्वरूपाच्या चौकोनामध्ये रोज व कॉलम्समध्ये छोटे-छोटे अगणित चौकोन बसवावेत तशी विविध वस्तूंची दुकाने थाटली आहेत. जी-जी वस्तू विकत घ्यायची असेल ती-ती तुम्हाला तिथे मिळून जाईल. दुकानेही बरीच असल्यामुळे दरही खूपच स्वस्त होते. आम्ही या प्रचंड शॉपिंग पॅरडाईजमध्ये फिरत होतो व शॉपिंग करत होतो. तब्बल दोन तास मनसोक्त फिरून व शॉपिंग करून फूड मॉलच्या एरियामध्ये आलो. संध्याकाळचे पाच वाजत आले होते आणि निघण्यास अजूनही अर्धा ते एक तास शिल्लक होता. आम्ही आमचे सामान घेऊन आमचे टूर गाईड व इतर टुरिस्ट ज्या सामाईक ठिकाणी जमले होते, तिथे आलो. जवळील पिशव्या आम्ही खाली ठेवल्या, तोच माझी बायको माझ्याकडे पाहत जोरात म्हणाली, ‘‘अहो, तुमची पाठीवरील बॅगपॅक कोठे आहे?’’ मी पाहिले तर बॅगपॅक माझ्या पाठीवर नव्हती. हातामधील इतर शॉपिंगच्या पिशव्यांतही ती कुठे दिसत नव्हती. मी घाबरलो, कारण त्यात आम्हा तिघांचे पासपोर्ट होते. खूपच आणीबाणीचा प्रसंग होता तो. माझी बायको तर तिथेच रडू लागली. परदेशात पासपोर्ट- तेही परत येण्याच्या शेवटच्या दिवशी गहाळ होणे म्हणजे, काय हाल होतात याची कल्पनाच न केलेली बरी. 

मी दीर्घ श्वास घेतला. प्रथम मनाची समजूत घातली की, आत्तापर्यंतची ट्रिप खूपच छान झालेली आहे, फक्त पासपोर्टच गहाळ झालेला आहे. आपण सर्व जण तर सुखरूप आहोत. फार-फार तर इकडच्या इंडियन ॲम्बेसीत जावे लागेल, इतकेच ना? आणखी काही  दिवस इथे थांबावे लागेल कदाचित... असे बोलून मी पहिली माझी व माझ्या बायकोची समजूत घातली. मनातील पॅनिक भावना तत्काळ गायब झाली. मन शांत झाले. आता बॅग कोठे राहिली असेल याचा मी विचार करू लागलो. बॅग तर मी खांद्याला लावली होती, मग कुठे बरे मी ती काढली असेल? जिथे कपडे ट्राय करायचे असतात, अशाच ठिकाणी ही पाठीवरील बॅग काढण्याचा प्रसंग उद्‌भवू शकतो. आम्ही एका मुस्लिम इराण्याच्या दुकानात गेलो होतो. कपड्याचे दुकान होते ते. ते दुकान इराण्याचे होते, हे माझ्या पक्के लक्षात राहिले होते. कारण इथे टूरवर आल्यापासून आमच्या थाई टूर गाईडने आम्हाला सक्त चेतावनी दिली होती की, येथील इराण्यापासून सावध राहा. ते तुम्हाला भारतीय वाटतील, पण हे सामाईक चेहरेपट्टीचा फायदा उठवतात व भारतीय पर्यटकांना लुबाडतात. त्यामुळेच असेल कदाचित- त्या दुकानदाराचा व त्याच्या बुरख्यात असलेल्या पत्नीचा चेहरा माझ्या लक्षात राहिला होता. किंबहुना, त्या दुकानदाराकडे मी तीन टी-शर्ट ट्राय केले होते, पण एकही पसंत न आल्याने आम्ही तसेच पुढे गेलो होतो. दुकानातून बाहेर निघताना त्या दुकानदाराचे ते सूचकपणे हसणे मला खटकले होते. 

परदेशात कपडे बदलण्यासाठी वेगळी रूम नसते, त्यामुळेच असेल कदाचित- टी-शर्ट घालून बघत असताना नक्कीच त्या ठिकाणी मी बॅग खांद्यावरून काढून खाली ठेवली असणार आणि बायकोशी बोलण्याच्या नादात ती बॅग तिथेच विसरलो असणार. म्हणजे, आता ते इराण्याचे दुकान शोधणे हे मुख्य काम होते. ते दुकान कोठे शोधणार? जवळजवळ दोन तास आम्ही या अवाढव्य मॉलमध्ये हिंडत होतो. त्यामुळे मॉलच्या कोणत्या बाजूस व कोणत्या मजल्यावर ते दुकान असेल, हे शोधणे कठीण होते. त्यातून मी त्या दुकानातून ते टी-शर्टही विकत घेतले नव्हते, त्यामुळे त्या दुकानाच्या रिसीटवरून दुकानाचे नाव शोधणेही शक्य नव्हते. इकडून तिकडे या अवाढव्य मॉलमध्ये फिरण्यात काहीही अर्थ नव्हता. बायकोला घेऊन मी प्रथम ग्राऊंड फ्लोअरला आलो. बघतो तर काय- बरेच दुकानदार त्यांच्या दुकानाची शटर्स बंद करत होते. संध्याकाळी इथले दुकानदार पाच वाजताच दुकाने बंद करतात. दुष्काळात तेराव्या महिन्याहूनही वाईट परीस्थिती निर्माण झाली होती. परत एकदा दीर्घ श्वास  घेतला. बायकोला म्हटले, ‘‘या मॉलमधील प्रत्येक दुकान जर पालथे घालायचे  असेल, तर आपण या उजव्या हाताच्या कोपऱ्यावरून सुरुवात करू या. सगळे धावत फिरू. एकदा हा फ्लोअर झाला की, असे सर्व फ्लोअर्स त्या इराण्याचे दुकान सापडेपर्यंत आपल्याला पालथे घालायला लागतील. या पद्धतीने अर्ध्या तासात आपण सर्व दुकाने पालथी घालू शकू.’’ असे बोलून आम्ही फ्लोअर्स पालथे घालायला सुरुवात केली.
 
पहिली, दुसरी, तिसरी अशा सर्व ओळी आम्ही फिरत होतो. कॉलम्सची तर गणतीच नव्हती. असे करत-करत आम्ही तो ग्राऊंड फ्लोअर पूर्ण संपविला. दहा मिनिटे गेली, पण ते दुकान काही सापडले नाही. परत एस्कलेटरमधून आम्ही पहिल्या मजल्यावर आलो. इथेही टोकाच्या उजव्या कोपऱ्यापासून सुरुवात करून आम्ही सर्व ओळी पालथ्या घालत होतो. बरेच दुकानदार त्यांची शटर्स खाली घेऊन त्यांची दुकाने बंद करत होते. आमची धडधड वाढली होती. पण काय होईल ते होईल, असं मनात धरून आम्ही आमचे काम चालू ठेवले. अचानक एक दुकान ओळखीचे वाटले. त्याच्या बाहेर विविध टी-शर्ट्‌स टांगलेले होते. खात्री करण्यासाठी आत गेलो तर तोच उंच, डोळ्यांत काजळ घातलेला, सूचक हास्य असलेला इराणी माणूस तिथे ग्राहकांशी वार्तालाप करत होता. मी सुटकेचा निश्वास टाकला. कमीत कमी ते दुकान तरी सापडले होते. अजूनही ती बॅग त्या दुकानदाराकडे असेल का, की ग्राहकांनी ती लंपास केली असेल? किंवा हा दुकानदारच कबूल झाला नाही तर? 

मी धाडस करून त्या दुकानदाराला विचारले, ‘‘आम्ही दोन तासांपूर्वी इथे खरेदीला आलो होतो. मी माझी बॅग बहुतेक इथे विसरलो आहे. ती बॅग इथे आहे का?’’ 
त्या इराण्याने माझ्याकडे पाहिले व त्याच सूचक वाटणाऱ्या हास्याने तो मला म्हणाला, ‘‘ओह येस, इट इज देअर. माय वाईफ फाऊंड इट.’’ 
हुश्श्श्श्श्श! मी व माझ्या बायकोने सुटकेचा मोठा निश्वास टाकला. मी तर त्याच्या पायाच पडलो. ‘‘ओह, थँक यू व्हेरी मच सर. आय कान्ट टेल यू हाऊ मच ग्रेटफुल वी आर. इट हॅज ऑल पासपोर्टस ऑफ अस.’’ 
‘‘नो प्रॉब्लेम, हिअर इट इज!’’ असे म्हणत त्या इराणी गृहस्थाने ती बॅग माझ्याकडे सुपूर्द केली. 
मी त्याला माझ्या पाकिटातील उरले सुरले 2000 थाई बाथ देऊ केले, तर ते त्याने तसेच हास्य करून नाकारले. खूप मोठा अनर्थ टळला होता. एव्हाना सहा वाजत आले होते. आमचे इतर टूर मेंबर्स फक्त आमचीच वाट पाहत फूड मॉलमध्ये सामाईक एरियात थांबले होते. आमच्या चेहऱ्यावरील बुद्धाचे भाव पाहताच सर्वांनी आनंदाने जोरदार टाळ्या वाजविल्या. 
‘‘बघा, आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करत होतो. आमची प्रार्थना देवाने ऐकली, देव पावला!’’ आमच्याच ग्रुपमधील एक वरिष्ठ जोडपे आम्हाला म्हणाले. मी स्मितहास्य करून त्यांना धन्यवाद दिले आणि बसमध्ये बसून आम्ही एअरपोर्टच्या दिशेने निघालो. 

खरंच कोणी तरी केलेल्या प्रार्थनेमुळे हे शक्य झाले असेल का? की, त्या आणीबाणीच्या प्रसंगात मी दाखविलेल्या विवेकी कृत्यामुळे हे शक्य झाले? खरंच, जेवढी चूक हा प्रसंग उद्भवण्यात माझी आहे, तेवढेच डोके शांत ठेवून विवेकाने प्रसंग हाताळण्याचे श्रेयसुद्धा माझेच आहे की! यात स्वार्थीपणा नाही. पण कधी-कधी आपण त्या वेळेस जी सदसद्‌द्विवेकबुद्धी वा इच्छाशक्ती दाखवतो आणि जसा तो क्षण हाताळतो त्याला आपण हवे तितके श्रेय देत नाही; चटकन आपण ते श्रेय आपल्या नशिबाला वा देवाला देत असतो. ‘‘सर्व प्रश्नांचे, दुःखांचे उत्तर हे तुमच्या विचारांमध्ये आहे. जर विवेकाचा वापर सातत्याने करीत राहिलात, तर तुम्ही नक्कीच सुखी व्हाल.’’ बुद्धाला किती वर्षांपूर्वी हे उमजले होते! मला जणू एक साक्षात्कार झाल्यासारखे वाटले. 

बुद्धाचे विचार जरी मी अगोदर ऐकलेले असले, तरी स्वतःवर बेतलेल्या या प्रसंगात ते वापरताना त्या शब्दांची खरी ताकद कळली होती. आमची बस आता परतीच्या प्रवासासाठी निघालेली होती. दिवसभराच्या थकव्याने बरेच सहकारी पर्यटक बसमध्ये पेंगुळले होते. ‘आता आपण घरी जाणार’ म्हणून पत्नी आणि मुलामध्ये गप्पा रंगल्या होत्या. मनावरील मोठा ताण दूर झाल्याने मलाही खूप हलके-हलके वाटत होते. बस आता एअरपोर्टच्या एरियात आलेली होती. मी समोर पाहत होतो. टुरिस्ट बसमधील ड्रायव्हरच्या पुढे लटकवलेली लाफिंग बुद्धाची छोटी मूर्ती जणू माझ्याकडेच बघून स्मितहास्य करत होती.

वाचा: या लेखाचा पूर्वार्ध

Tags: buddha Daniel Mascarenhas डॅनिअल मस्करणीस Manch weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके

कर्तव्य

सर्व पहा