डिजिटल अर्काईव्ह (2014-2019)

काही वेळानं माझ्याच गावातील गरीब, वृद्ध शेतकरी ॲलेक्सकाका हेही माझ्या दुसऱ्या बाजूला येऊन बसले. मिस्सा सुरू झाली व दान देण्याचा विधी सुरू झाला. दान गोळा करण्यासाठी स्वयंसेवक भाविकांमध्ये दानपात्र फिरवीत होते. पार्श्वभूमीला ‘तूच दिलेले अमोल जीवन तुलाच मी अर्पावे’ हे गीत गायले जात होते. प्रत्येक जण आपापल्या परीने त्यात दान टाकत होता. दानपत्र असे जाहीररीत्या भर लोकांत फिरविले गेल्यावर साहजिकच अप्रत्यक्षरित्या एक सामाजिक दबाव आपणावर येते. ‘दान’ देण्याचे एक बंधन आपणावर येते. त्यात तुमच्या आजूबाजूला बसलेले लोकही तुमच्या परिचितांपैकी असतात. त्यामुळे ते दान गुप्त राहत नाही. किंबहुना, कोण किती पैसे दानपात्रात टाकतो, यावरून त्या व्यक्तीची निंदा वा स्तुती केली गेल्याचे मी पाहिले होते. पण या वेळेला माझ्या मनाने निश्चय केला होता- काहीही झाले, तरी मी दानपात्रात काही टाकणार नाही

दुसऱ्या दिवशी सकाळी ‘‘डॅडा, आपण आज कुठे तरी बाहेर जाऊ या’’ म्हणून मुलाने हट्ट धरला. आदल्या दिवशी ‘कालवरी टेकडी’ हा संदर्भ ऐकून ‘मला टेकडीवर जायचं आहे’ असे तो बोलला होता. ते बोलणे आठवून मी मुलाला घेऊन जवळच असलेल्या पाली येथील एका टेकडीवर गेलो. सकाळची वेळ होती. गाडी पायथ्याशी ठेवून आम्ही ती छोटी टेकडी चढू लागलो. मुलगा प्रथमच टेकडीवर चढत होता. उन्हाळा असल्याने सकाळची कोवळी किरणेही काहीशी टोकदार वाटत होती. काही मिनिटांतच त्याला धाप लागली. ‘‘अजून किती लांब आहे? थकवा आलाय.’’ त्याने म्हटले. 
‘‘अजून दहा मिनिटे’’ मी म्हणालो. 
‘‘हम्मऽ’’ 
‘‘बघ, येशू ख्रिस्ताला जेव्हा तो जाडजूड क्रूस खांद्यावर दिलेला ना, तेव्हा त्याला या टेकडीपेक्षाही खूप उंच असलेली कालवरी टेकडी चढावी लागली होती.’’ 
‘‘हो?’’ 
‘‘हो. आणि तेही सोल्जरकडून चाबकाचा मार खाल्ल्यावर व खात असताना. विचार कर- किती त्रास झाला असेल त्याला?’’ 
‘‘हम्मऽ’’ असे म्हणत तो शांतपणे ती टेकडी चढला.  
काही मिनिटांतच आम्ही टेकडीच्या माथ्यावर पोहोचलो. समोर पाहिले तर, तिथे दत्ताचे मंदिर होते. मंदिराभोवती गाय, म्हैस, कुत्रा यांच्या मूर्ती ठेवलेल्या होत्या. प्राण्यांच्या त्या मूर्ती पाहून माझा प्राणिप्रेमी मुलगा खूप खूश झाला. मंदिराच्या आवारात भटकल्यावर मग आम्ही मंदिराच्या मागच्या बाजूस असलेल्या सपाट विस्तीर्ण परिसरात आलो. तिथे काळ्या दगडांत बांधलेल्या विहिरीतील थंडगार पाणी तोंडावर शिपडले आणि शहाळ्यासारखे गोड असलेले ते पाणी आम्ही प्यायलो. सगळा थकवा क्षणात गळून गेला. माती, झाडे, पाने, फुले अशी डोंगराची स्वतःची एक खास जैवविविधतेने नटलेली ओळख असते. तेथील जमिनीत सर्वत्र आम्हाला लाल-काळ्या रंगाचे एक विशिष्ट पद्धतीचे किडे दिसले. कुतूहलापोटी मी गुगलवरून त्या किड्यांची माहिती काढली व मुलासही सांगितली. 
मुलगा ते किडे न्याहाळतोय तोपर्यंत मी तिथे बाजूलाच असलेल्या एका जुन्या विस्तीर्ण वडाच्या झाडाच्या सावलीत येऊन बसलो. तिथून टेकडीच्या पश्चिमेला असलेल्या विशाल समुद्राचे दर्शन घडत होते, तर उत्तर- दक्षिणेस पसरलेली छोटी-छोटी गावे यांचे विहंगम असे दृश्य डोळ्यांना सुखावत होते. टेकडीवरील शांत परिसर, चेहऱ्याला हळूच स्पर्श करणारी वाऱ्याची मंद झुळूक, पायथ्याशी अविरत चालू असलेल्या जगरहाटीपासून काही क्षण झालेली सुटका व त्यापासून आलेला काहीसा अलिप्तपणा... स्वतःचे मन काय बोलतेय तेही ऐकू यावे, असेच ते वातावरण होते. मी एक दीर्घ श्वास घेतला व डोळे हळूच बंद केले. तोच मंदिरातून ‘अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग’ या किशोरी आमोणकरांच्या कर्णमधुर आवाजातील धुंद करणारे अभंगांचे बोल कानावर पडू लागले. तो मधुर आवाज, ते स्वर्गीय संगीत व कर्णपटलाला हळूच नादमयरीत्या स्पर्श करणारा अभंगाचा शब्द न्‌ शब्द ऐकून जणू स्वतःचे स्वतःशीच नव्याने एक नवे नाते प्रस्थापित होत होते. एक वेगळीच अनुभूती येत होती. संत सोयराबार्इंच्या या रचनेला किशोरी आमोणकरांनी संगीत देऊन जणू देवत्वपणच बहाल केलं होतं. 
नाही भेदाचें तें काम । पळोनि गेले क्रोध काम । देही असोनि विदेही । सदा समाधिस्त पाही । 
धर्मात संगीताचे खूप मोठे योगदान राहिलेले आहे. धर्मासारख्या तशा नीरस विषयात संगीतामुळेच रंग भरले गेले. किंबहुना, धार्मिक म्हणवणारे कित्येक जण हे खरे तर वेगवेगळ्या अभंगांचे, कव्वालींचे, चर्चमधील एखाद्या गीतांचे संगीतप्रेमीच जास्त असतात! 
काही वेळ तिथे थांबून आम्ही टेकडी उतरण्यास सुरुवात केली. टेकडीच्या पायथ्याशी एक कौलारू घर होते. मुलाचे तिकडे लक्ष गेले आणि मला म्हणाला, ‘‘त्या घरात येशूचीही मूर्ती आहे आणि बुद्धाचीसुद्धा. मग त्याचा धर्म कोणता?’’ घरात एक तर बुद्धाची मूर्ती असायला हवी होती किंवा येशूची. आपला देव आणि त्यांचा देव- दोन देव कसे कसू शकतात? चार वर्षांच्या लहानग्याच्या मनातही ही समाजमान्य व्याख्या विराजमान झाली होती.
 ‘‘त्याला येशू आवडतो आणि बुद्धही आवडतो- किती छान आहे हे! दोघेही चांगली माणसे होती.’’ मी म्हटले. 
आदल्या दिवशीच्या गुड फ्रायडेच्या उपासनेपेक्षा आजची खुल्या वातावरणातील विवेकी आरसा दाखवणारी व स्वतःशी संवाद साधण्यास मदत करणारी ही वेगळ्या प्रकारची उपासना खूप भावलेली होती. मंदिराच्या, चर्चच्या किंवा मशिदीच्या चार बंदिस्त भिंतींपेक्षा असा मुक्त वातावरणात धर्म बहरला, तर किती छान! डॉ.शि.स. अंतरकर यांनी किती सखोल विचार केला होता! त्यांच्या भाषणाविषयी जरी मी सुरुवातीला मंचामध्ये माहिती दिली असली, तरी त्यांना काय सांगायचे होते ते आता कुठे उमजण्यास सुरुवात झाली होती. 
दुसऱ्या दिवशी ईस्टर संडेच्या दिवशी पत्नीच्या मोबाईलवर ईस्टर सणाच्या शुभेच्छा देण्यासाठी बरेच मेसेजेस आले होते. त्यामध्ये पुनरुस्थित येशूची प्रतिमा असलेले फोटोही होते. त्यातील येशूचा एक फोटो पाहून मुलगा त्याच्या आईला म्हणाला, ‘‘मम्मा, हा कोण आहे?’’
 ‘‘हा आपल्या येशूचा फोटो आहे.’’ 
‘‘नाही.’’ 
‘‘बेटा, परवा क्रूसावर ज्याला वाईट लोकांनी टांगले होते ना, तो आज बरा झालेला आहे; त्याचा हा फोटो आहे.’’ पत्नी जरी मंचात येत नसली तरी मंचातील  विचारांची माहिती मी तिला नेहमी द्यायचो. त्यामुळे पत्नीने ‘जिवंत झाला आहे’ याऐवजी ‘बरा झाला आहे’ हा केलेला शब्दप्रयोग मला आवडला.
 ‘‘नाही मम्मा, परवा तर वेगळाच येशू आपण पाहिलेला; हा तो येशू नाही.’’ 
‘‘म्हणजे?’’
 ‘‘आपण परवा जो क्रूसावर पाहिलेला, तो हा नाहीच. तो खूप मोठ्ठा होता आणि हा खूप छोटासा आहे.’’ चर्चमध्ये क्रूसावर खिळलेला येशू आणि इथे मोबाइलमध्ये दिसणारे पुनरुत्थित येशूचे फोटो वेगवेगळे होते. ते त्या मुलाच्या नजरेतून सुटले नव्हते. आम्ही काय समजायचे ते समजलो! खरंच लहान मुलांच्या नजरेतून जर आपण जगाकडे पाहिले, तर जगाचा एक वेगळाच चेहरा आपल्याला नक्कीच दिसू लागतो. ‘लहान मुलांना माझ्याकडे येऊ द्या; स्वर्गाचे राज्य हे त्यांच्यामार्फत आहे!’ येशूने किती स्पष्टपणे लहान मुलांच्या विवेकीपणाविषयी वक्तव्य केले आहे! कितीही आव आणला तरी धर्म, परंपरा, चाली-रीती, राष्ट्रवाद हे सर्व एक प्रकारचे ओझेच- लहानपणी आपल्या आई-वडिलांनी कळत-नकळत आपल्यावर लादलेले! मग आपणही आपल्या मुलांवरही तसे ओझे लादावे का? असे कुठलेच ओझे न लादता जर त्यांना वाढू दिले तर? आपल्या मुलांना जर आपण असेच विवेकी व प्रवाही निखळ झऱ्याप्रमाणे जगू दिले तर? एक पंखात वैज्ञानिक दृष्टिकोनाचे बळ आणि दुसऱ्या पंखात उच्च धार्मिक मानवतावादी मूल्ये घेऊन ती किती तरी उंच भरारी घेऊ शकतील अन्‌ नव्या जगाच्या नव्या समस्यांनाही नव्या दृष्टिकोनाने सामोरे जाण्यासही तयार असतील! 
दर वर्षी गुड फ्रायडे, ईस्टरच्या दिवशी येशू ख्रिस्ताचे क्रूसावरील दुःख प्रतीकात्मकरीत्या चर्चमध्ये साजरे केले जायचे. येशूचे शरीर क्रूसावरून उतरविणे, त्यानंतर ते फुलांनी सजवलेल्या पेटीत ठेवणे, मग त्याची मिरवणूक काढणे आणि शेवटी त्या मूर्तीचे चुंबन घेऊन घरी येणे- हे सर्व मी नित्यनियमाने करत होतो. परंतु येशू दुःखात प्रतीकात्मकरीत्या सहभागी होण्याचा हा जरी प्रयत्न असला तरी तो नाटकीपणाच होता. या दुःखाचा तमाशाच चर्चने करून ठेवला आहे, हे मात्र मला हळूहळू कळू लागले. माझ्या मनात विवेकमंचातील विचारांचे इंधन जरी बऱ्यापैकी जमलेले असले, तरी मुलाच्या निरागस विवेकवादी दृष्टीने ते इंधन पेटवण्यास ठिणगीचं काम बजावलं होतं!
 त्यामुळेच असेल कदाचित- चर्चमधील अशीच आर्थिक बाबींशी निगडित एक घटना माझ्या डोळ्यांत खुपली आणि ती मी फादरांच्या निदर्शनास आणून दिली. त्याचं झालं असं... आमचं चर्च हे मरियामातेला वाहिलेले आहे. दि.8 सप्टेंबर हा मरियामातेचा वाढदिवस मानला जातो आणि त्याच्या 9 दिवस आधीपासून मरियामातेची चर्चमध्ये रोज प्रार्थना चालते. त्याला ‘नोव्हेना’ असेही म्हणतात. आमच्या परिसरात मरियामातेला वाहिलेले हे एकमेव चर्च असल्याकारणाने हे नऊ दिवस आजूबाजूच्या बऱ्याच गावांतूनही लोक येथे येत असतात. बरीच गर्दी जमते. अशा बाहेरून येणाऱ्या पाहुण्यांची सोय करण्यासाठी वेगवेगळ्या समित्या स्थापन केल्या जातात. जसे- वाहतूक समिती, पार्किंग समिती, वर्गणी गोळा करण्यासाठी समिती- त्याचबरोबर स्वयंसेवक समिती, चर्चचं क्वायर बघणारी समिती अशा वेगवेगळ्या समित्या असतात. तसेच 8 सप्टेंबर रोजी मरियाच्या वाढदिवशी चर्चच्या वार्षिक अंकाचेही प्रकाशन केले जाते. त्यामुळे त्या अंकाचे संपादन करण्यासाठी संपादक समिती व जाहिरात गोळा करण्यासाठी जाहिरात समिती अशाही समित्या या काळात कार्यरत असतात. 
त्या वर्षी, शेवटच्या म्हणजे सणाच्या दिवशी फादरांनी चर्चमधून असे जाहीर केले की, ‘या वेळेस सर्व समित्यांनी चांगले काम केलेले आहे, त्यामुळे आपण कोणाचेही वैयक्तिक आभार मानणार नाही; कारण त्यात काही जणांचे आभार मानले जातात, तर काही जण राहून जातात. आपण कार्य केले आहे, त्याचा आनंद आपल्याला मिळालेला आहे.’ ते मलाही पटले. असे असूनसुद्धा फादरांनी आठवड्याभरातच ज्या लोकांनी चर्चला देणग्या दिल्या होत्या, त्याची हिशोब करणारी जी व्यक्ती होती तिचे मात्र खास आभार मानले. ते आभार शनिवारी मानले गेले. रविवारची मिस्सा सगळ्यांनाच अटेंड करणे जमतेच, असे नाही. त्यामुळे शनिवारी संध्याकाळीही चर्चमध्ये एक मिस्सा होते. योगायोगाने मी त्या शनिवारी मिस्साला गेलो होतो. मी चर्चमधून ही   घोषणा ऐकली आणि मला खूप वाईट वाटले. कारण ज्या फादरांनी सांगितले होते की- आपण कोणाचेच आभार मानणार नाही, फक्त समित्यांची नावे घेणार आहोत; असे असूनसुद्धा एका व्यक्तीला- जी पैशाचा हिशोब ठेवते, आर्थिक बाजू सांभाळते त्याला- फादरांनी विशेष वागणूक द्यावी, हे मला काही केल्या पटले नव्हते. जो पार्किंग समितीमध्ये आहे तो रस्त्यावर तीन तास उभा राहून ट्रॅफिक जॅम होणार नाही, याची काळजी घेतो. त्याचेही श्रम किती मोठे आहेत! संपादकीय मंडळाचे वैचारिक श्रम किती आहेत, त्याला काहीच महत्त्व नाही. आणि महत्त्व कोणाला, तर जो पैशाचा हिशोब ठेवतो त्याला! मी त्या रात्रीच फादरांना फोन करून सांगितले, ‘‘मला हे पटलेले नाही आणि एक कार्यकर्ता म्हणून- एक सक्रिय कार्यकर्ता म्हणून मला हा अपमान वाटतो आहे. तुम्हाला योगायोगाने ती चूक सुधारण्याची संधी मिळाली आहे. शनिवार असल्याने मिस्साला जास्त गर्दी नव्हती, उद्या रविवारची मिस्सा आहे, तेव्हा त्यात तुम्ही या नावाचाही कृपया उल्लेख करू नका. सर्वांना समान दर्जाच दिला पाहिजे.’’ काहीशा नाराजीनेच का होईना, पण फादरांनी त्याला होकार दर्शवला आणि त्या व्यक्तीचा उल्लेख दुसऱ्या दिवशी सकाळच्या मिस्सामध्ये त्यांनी टाळला. 
चर्चमधील एखादी बाब जर आपल्याला खटकत असेल आणि ती जर आपण योग्य व्यक्तीच्या निदर्शनास आणून द्यायचे प्रयत्न केले, तर आपण ती गोष्ट दुरुस्त करू शकतो, हे जाणवले. धर्ममंदिरे आणि भाविकांच्या देणग्यांमुळे आलेली आर्थिक ताकद यांचे नाते किती गहिरे असते याची प्रचिती मला वरील प्रसंगामुळे आली. 
दर दिवशी चर्चमध्ये येणारे भाविक प्रत्येक मिस्साच्या वेळी दानपात्रामध्ये दान देत असतात. यातील काही भाग बिशप हाऊसमध्ये जातो, तर बाकी रक्कम चर्चमध्ये शिल्लक राहते. या निधीतून प्रामुख्याने चर्चच्या इमारतीचा मेंटेनन्स खर्च (मुख्यत्वेकरून लाईट बिल, महापालिका टॅक्स, पूजा- अर्चेचे सामान, वगैरे) व धर्मगुरूंच्या राहणीमानाचा खर्च भागविला जातो. तसेच चर्चमध्ये जेव्हा मोठी कामे- जशी रंगरंगोटी, डागडुजी वा नवे बांधकाम- करायची असतील तेव्हा भाविकांना देणग्या देण्यासाठी आवाहन केले जाते आणि परत देणग्यारूपाने पैशांचा ओघ चर्चकडे वाहू लागतो. हे ठळक खर्च वगळल्यानंतर राहिलेली शिल्लक रक्कम चर्चमध्ये तशीच पडून राहते. या उरलेल्या निधीतून गरिबांना मदत करून येशूच्या सेवाभावी कृत्याचे चर्चकडून दर्शन घडविले जाते, असेही नाही. गरिबांसाठी लोकांकडून परत देणग्या घेऊन मदत केली जाते. किंबहुना, मदत सामान्य जनता ‘करते’, चर्च फक्त ते गरिबांपर्यंत ‘पोहोचविण्याचे’ काम करते. मग असा प्रश्न पडू शकतो की, जर अडी-अडचणीच्या वेळी लोकांच्या देणग्यांना तोटा नसेल, तर मग राहिलेली शिल्लक चर्चमध्येच साठवून ठेवण्याचे प्रयोजन काय? त्या कॉर्पसचे नियोजन कसे केले जाते, याविषयी काहीच माहिती मिळत नाही. 
दर वर्षी मी समाज विकास मंडळाच्या वार्षिक सभेला हजर राहत होतो. एका वर्षी मंडळाच्या लायब्ररीचा वार्षिक जमा-खर्च चर्चिला जात होता आणि एका सदस्याने लायब्ररीतील वृत्तपत्राच्या रद्दीमधून जमा झालेले 315 रुपये जमा-खर्च अहवालात लिहिले नव्हते, म्हणून जोरजोरात आवाज उठवला होता. लिपिकाच्या चुकीमुळे ते पैसे ‘जमा’मध्ये दाखवायचे राहून गेले होते. त्यावरून झालेला बराच गदारोळ मी अनुभवला होता. लायब्ररीच्या कार्यकारिणी सदस्यांना तसेच खजिनदाराला त्या चुकीबद्दल माफी मागावी लागली होती. एका बाजूला मंडळात उच्च दर्जाची पारदर्शकता हवी, यासंबंधी लोक आग्रही होते आणि दुसऱ्या बाजूला चर्चमध्ये हेच लोक मात्र चर्चमधील लाखो-करोडो रुपयांचा- त्यांनीच दिलेल्या देणग्यांचा काहीच जमा-खर्च/अहवाल कसा मागत नाही, याचे मला राहून-राहून आश्चर्य वाटू लागले. ही विसंगती मला खुपू लागली. 
माझ्या कुटुंबात याविषयी एक दिवशी चर्चा करताना माझी आई म्हणाली, ‘‘देवाला दिलेल्या पैशांचा हिशेब मागू नये.’’ देव, देवाचे घर आणि त्या घरातील पारदर्शी आर्थिक व्यवहार- या सगळ्यांची अशी सरमिसळ बहुतांश लोक करतात. माझ्या आईने जणू प्रातिनिधिकपणाने समाजाच्या मतांचा लसाविच व्यक्त केला होता! पण आर्थिक बाबतीत चर्चमध्ये प्रसंगी कठीण प्रश्न विचारले गेले पाहिजेत. लोकांनी हे लक्षात घेतले पाहिजे की, जर चर्चचे आर्थिक नियोजन पारदर्शी असले, तर या आर्थिक ताकदीचा किती तरी सकारत्मकपणे आपण वापर करू शकू. तेव्हा मी एक निर्णय घेतला की, जिथे गरज नाही तिथे यापुढे अनावश्यक आर्थिक मदत द्यायची नाही. जिथे   देणग्यांचा पाऊस पडतो, अशा हजार पेटलेल्या मेणबत्त्यांत, मेणबत्ती लावण्याऐवजी कुठे तरी दुर्लक्षित काळोखात मेणबत्ती लावली, तर तिचा प्रकाश अनुभवणे सुंदर असेल. तसा विचार करून, दानपत्रात पैसे न टाकून चर्चमधील या आर्थिक अंधाराबाबतचा माझा वैयक्तिक निषेध नोंदविण्याचे मी ठरविले. 
नेहमीप्रमाणे मी चर्चमध्ये आलो. योगायोगाने माझा मित्र मॅक्लीन- जो नुकताच परदेशातून सुट्टीवर आला होता- त्याला मी चर्चमध्ये पहिले. त्याला खुणेनेच ‘हाय’ करून त्याच्या शेजारीच मी जाऊन बसलो. काही वेळानं माझ्याच गावातील गरीब, वृद्ध शेतकरी ॲलेक्सकाका हेही माझ्या दुसऱ्या बाजूला येऊन बसले. मिस्सा सुरू झाली व दान देण्याचा विधी सुरू झाला. दान गोळा करण्यासाठी स्वयंसेवक भाविकांमध्ये दानपात्र फिरवीत होते. पार्श्वभूमीला ‘तूच दिलेले अमोल जीवन तुलाच मी अर्पावे’ हे गीत गायले जात होते. प्रत्येक जण आपापल्या परीने त्यात दान टाकत होता. दानपत्र असे जाहीररीत्या भर लोकांत फिरविले गेल्यावर साहजिकच अप्रत्यक्ष सामाजिक दबाव आपणावर येते. ‘दान’ देण्याचे एक बंधन आपणावर येते. त्यात तुमच्या आजूबाजूला बसलेले लोकही तुमच्या परिचितांपैकी असतात. त्यामुळे ते दान गुप्त राहत नाही. किंबहुना, कोण किती पैसे दानपात्रात टाकतो, यावरून त्या व्यक्तीची निंदा वा स्तुती केली गेल्याचे मी पाहिले होते. पण या वेळेला माझ्या मनाने निश्चय केला होता- काहीही झाले, तरी मी दानपात्रात काही टाकणार नाही.
 दानपात्र ॲलेक्सकाकांकडे पोहोचले होते. थरथरत्या हातांनी काही रुपयांची नाणी त्यांनी त्या पात्रात टाकली अन्‌ माझ्या हातात ते दानपात्र सुपूर्त केले. माझ्या दुसऱ्या बाजूने बसलेला माझा मित्र मॅक्लीन हातात 500 रुपयांची नोट घेऊन माझ्याकडे पाहत होता. ‘मॅक्लीन काय समजायचे ते समजो’ असे मनातल्या मनात म्हणून मी दीर्घ श्वास घेतला, काहीही न टाकता दानपात्र त्याच्या हातात दिले. त्याच्या चेहऱ्यावरील माझ्यासाठीचे तिरस्कारयुक्त भाव माझ्या नजरेतून सुटले नाहीत. एक निर्णायक क्षण होता तो. इतक्या वर्षांची ती माझी सवय होती, ती चटकन्‌ बदलणे खूप कठीण जात होते. माझा माझ्याशीच जणू संघर्ष होत होता. दर वेळेस सढळ हाताने दान देण्याची सवय असणारा मी काहीसा उदास झालो खरा, पण क्षणभरच! ‘तू गुप्तपणे दान-धर्म कर. उजव्या हाताने दिलेले दान डाव्या हातालासुद्धा कळू नये’ हे बायबलमधील शब्द माझ्या मदतीस धावून आले. काही आठवड्यांनी त्याच चर्चमध्ये परिसरातील एका महिलेच्या दुर्धर आजारात तिला मदत करण्यासाठी आवाहन करण्यात आले आणि मग मात्र मी माझ्या हाताला आवर घातला नाही!! 


हेही वाचा: आठवणीतील गुड फ्रायडे (पूर्वार्ध)

Tags: Daniel Mascarenhas vivekmanch good Friday विवेकमंच गुड फ्रायडे डॅनिअल फ्रान्सिस मस्करणीस weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके

कर्तव्य

सर्व पहा