डिजिटल अर्काईव्ह (2014-2019)

गुड फ्रायडे, ईस्टर व ख्रिसमस या ख्रिस्ती कॅलेंडरमधील ज्या काही प्रमुख घटना आहेत, त्यासाठी विशेष उपासना असतात. त्यामध्ये खूपच विधी असल्याने, तसेच या खास प्रसंगांना भाविकांची खूपच गर्दी अपेक्षित असल्याने या दिवशी उपासना ही चर्चच्या आवारात घेतली जाते. त्या दिवशीही गुड फ्रायडेला मिस्सा ही चर्चच्या प्रशस्त आवारात घेण्यात येत होती. स्टेजवर मिस्साच्या आराधनेची पूर्ण तयारी झाली होती. स्टेजच्या बाजूला क्वायरचे सदस्य माईकपाशी उभे राहून कोणकोणती गीते घ्यायची आहेत, याबाबत चर्चा करत होते. स्टेजच्या डाव्या बाजूला उपासनेदरम्यान जे कोणी बायबलवाचन करणार होते ते एकत्र बसलेले दिसत होते, तर आजूबाजूला स्वयंसेवकांची लगबग दिसत होती. स्टेजसमोरच भला मोठा क्रॉस जमिनीत गाडून उभारण्यात आला होता आणि त्यावर येशू ख्रिस्ताची प्रतिकृतीही टांगलेली होती, तसेच त्या क्रूसावर टांगलेल्या येशू ख्रिस्ताच्या प्रतिकृतीवर पांढरा पडदा टाकलेला होता.

चर्चमध्ये जाण्यासाठी जी विविध कारणे आहेत, त्यांपैकी एक प्रमुख कारण म्हणजे- समाजात मिसळण्याची संधी किंवा सोशलायझिंग. ‘लोक धर्माचं आचरण व्यवस्थित करत नाहीत’ ही जी तक्रार आपल्या कानी वारंवार पडते, ती अगदी खरी आहे. कारण बहुतांश लोक धर्माचरणासाठी धर्म पाळतच नाहीत मुळी; ते फक्त त्याचा सामाजिक परिमाण म्हणूनच वापर करत असतात!

चर्चमधील मिस्सामध्ये सर्वसाधारणपणे बरेच धार्मिक विधी असतात. जसे- विविध गाणी एकत्रितरीत्या गाणे, बायबल वाचन करणे, विविध हेतूंसाठी प्रार्थना म्हणणे, अर्पण, फादरांचं प्रवचन आणि शेवटी ख्रिस्त शरीरप्रसादाचे सेवन. या सर्व विधींमागे चर्चचं त्यांचं अधिकृत धोरण पुढे दामटवणारं बरंच लांबलचक धार्मिक स्पष्टीकरण असतं, पण सामान्य लोकांना त्याच्याशी एवढं काही देणं-घेणं नसतं. किंबहुना, या धार्मिक विधींबरोबर सामान्य लोकांची एक वेगळीच समांतर मिस्सा चर्चमध्ये पार पडत असते. आज कोणी छान बायबल वाचन केले... कोण विनंत्या वाचताना अडखळलं... ते अमुक गीत त्या मुलीने किती सुरेख गायलं... कुणाची पोर बरं ती... ते नेहमी डाव्या बाजूला कोपऱ्यात बसणारं आनंदी चौकोनी कुटुंब आज का बरं आलेलं नाही... ते तरुण जोडपे आज वेगवगेळे का बसलेले आहे... सकाळच्या मिस्सानंतर भेटू असं बोललेला तो मग का दिसत नाही? हे फादर किती कंटाळवाणे प्रवचन देतात... वगैरे.

चर्चच्या भिंतींनी प्रार्थनेपेक्षा लोकांच्या, लोकांविषयीच्या या आणि अशा विविध शंकाकुशंकाच जास्त ऐकलेल्या असतील. ‘चर्च म्हणजे देवाचे घर’ अशी व्हॅटिकनची जरी व्याख्या असली, तरी सामान्य लोक मात्र जास्तकरून देवाऐवजी समाजातील लोकांना भेटण्यासाठीच चर्चमध्ये येत असतात. दुसरे जे कारण आहे, ते म्हणजे क्वायर. चर्चमधील क्वायरचे सुमधुर संगीत एक वेगळीच आध्यात्मिक अनुभूती देत असते. हिंदू धर्मातील भजन-अभंगाप्रमाणे किंवा मुसलमानांतील सूफी-कव्वालीप्रमाणे चर्चमधील सुमधुर संगीत चर्चमध्ये परत-परत येण्याची ओढ लावते. विविध प्रसंगांना साजेशी अशी बरीच मराठी, संस्कृतमिश्रित गाणी चर्चमध्ये गायिली जातात. ‘अनंत ज्योती धारिणी, विषाद भीति वारिणी दिगंतरे विहारिणी, पवित्र कोण ही?’... असे हे येशू ख्रिस्ताच्या मरियामातेचे स्तवन गाणारे संस्कृत गीत असो वा खांद्यावर क्रूस वाहणाऱ्या येशूची अगतिकता अगदी समर्पकपणे व्यक्त करणारे- ‘कालवरीच्या वाटेवरती असले घडले नव्हते, खांद्यावरूनी मरण घेउनी जीवन चालले होते...’ हे गीत. चर्चमध्ये असे मराठमोळे संगीत भाविकांना कित्येक वर्षे रिझवीत आलेले आहे.

चर्चमध्ये येण्यासाठी तिसरे कारण म्हणजे- फादरांचे प्रवचन. अर्थात या कारणाची कधीच खात्री देता येत नाही. कधी कधी ते खूपच लांबलचक आणि कंटाळवाणे असते, तर कधी कधी ते मुग्ध करणारेही असू शकते. यात प्रवचन देणाऱ्या फादरांची प्रमुख भूमिका असते. वक्तृत्व, वाचन व विषयवैविध्यता असा त्रिवेणी संगम असणारे फादर तसे कमीच असायचे आणि जे असतील, त्यांना मग भाविक लोक डोक्यावर घ्यायचे. भाविकांशी अशा फादरांचे खूपच दृढतेचे नाते व्हायचे. वेगवेगळ्या चर्चेसमधून अशी सुंदर प्रवचने करण्यासाठी अशा फादरांना निमंत्रणे येतात. काही प्रवचने एक साहित्यिक अनुभव तर द्यायचीच, पण त्यापेक्षा जास्त म्हणजे त्यांच्या विद्वेत्तेचे असे काही दर्शन घडवायची की, त्यात श्रोते दबून जायचे. आज जर मला अविस्मरणीय अशी प्रवचने निवडण्यास सांगितली, तर मी तीन-चार प्रवचने सांगू शकेन...

ती जी प्रवचने अविस्मरणीय आहेत, ती त्यातील सुंदर वाणी किंवा रसाळ भाषाशैली यामुळे नाहीत तर त्यात जे सोपे आणि साधे विचार त्या वेळेस फादरांनी मांडलेले होते अन्‌ त्यावेळी माझ्या वैयक्तिक आयुष्यात जे काही चालले होते, त्याच्याशी ते अगदी एकरूप होणारे होते, म्हणून ती प्रवचने अजूनही माझ्या लक्षात आहेत.

यातील पहिले प्रवचन म्हणजे फादर लुकस यांचे, जवळजवळ 10 वर्षांपूर्वीचे. तेव्हा कॅरिज्मॅटिक प्रार्थना ग्रुप चालवणारे वसईतील एक सुप्रसिद्ध ब्रदर रॉबर्ट आमच्या चर्चमध्ये येणार होते. त्या वेळी कॅरिज्मॅटिक प्रार्थना वसईत जोर धरू लागली होती. या प्रार्थनेशी निगडित कोणी तरी मोठी असामी आपल्या चर्चमध्ये येत आहे, अशी हवा तेव्हा तयार झाली होती. एवढे सगळे जण म्हणत आहेत की, ते अप्रतिम प्रार्थना करतात तर जाऊन बघू या- म्हणून मी त्या प्रार्थनेस गेलो- पण त्यांनी घोर निराशा केली. मला प्रश्न पडला, लोक प्रार्थना करायला या अशा माणसापाशी कसे जातात? उंच, धिप्पाड, लांब मिशी ठेवलेला 80 च्या दशकातील हिंदी चित्रपटातील व्हिलन शोभावा असे त्यांचे व्यक्तिमत्त्व होते. नंतर लक्षात आले की- ज्यांनी त्याची स्तुती केली होती, त्या सर्व स्त्रिया होत्या. वाईट माणूस- जो चांगल्या गोष्टी करतो किंवा ‘बॅड मॅन’ या त्याच्या मॅचो इमेजचे स्त्रियांना सुप्त आकर्षण असावे का? माझी फक्त निराशाच झाली नाही, तर त्यांच्या काही वक्तव्याने मला गोंधळवूनही टाकले होते. ते प्रार्थना करताना म्हणाले होते, ‘‘आपण ख्रिश्चन आहोत; एकाच देवाला मानावे, अशी आपल्याला आज्ञा आहे. म्हणजे आपण दुसऱ्या धर्माच्या मंदिराजवळ फिरकायचेसुद्धा नाही. आपलं बायबल हेच सर्व काही आहे, त्याच्यासमोर दुसरे कुठलेच पुस्तक चांगले नाहीये. हेच वाचायचे. स्त्रियांनी आपल्या पतीची सेवा केली पाहिजे, तोच त्यांचा परमधर्म!’’ काहीसे तालिबानी, सनातनी वृत्तीचे ते प्रवचन ऐकून मी गोंधळून गेलो होतो.

मला आठवते, त्या प्रार्थनेच्या एक महिना आधी तेव्हा चर्चमध्ये असलेले फादर लुकस यांनी पुढाकार घेऊन दीपावलीनिमित्त संपूर्ण चर्चच्या परिसरात त्यांनी आरास करून परिसरातील हिंदू धर्मीयांसाठी खास मिस्सा अर्पण केली होती. परिसरातील बऱ्याच हिंदू बांधवांनी या आगळ्या-वेगळ्या मिस्सासाठी हजेरी  लावली होती. सर्वधर्म समभावाचा खूपच सुंदर असा तो आविष्कार होता. या सर्व पार्श्वभूमीवर या असामीचे हे तालिबानी विचार माझ्यासाठी नवीनच होते. प्रार्थना संपली. ब्रदर रॉबर्टही निघून गेले.

त्याच आठवड्याच्या रविवारी मी नेहमीच्या मिस्साला गेलो होतो. तसे पाहिले तर फादर लुकस हे प्रवचनाच्या बाबतीत खूपच सुमार होते. वाचन, चिंतन, पांडित्य या सर्वच पातळ्यांवर ते यथातथाच होते. त्यात त्यांची बोलण्याची पद्धतही खूपच संथ, रटाळ असायची. भाविक त्यांचे प्रवचन सुरू झाल्यावर अक्षरशः जांभया द्यायचे. कदाचित तो त्यांचा व्यक्तिदोष असेल, पण त्या रविवारी मात्र त्यांनी मला आश्चर्यचकित केले. ‘‘ब्रदर रॉबर्ट यांनी जरी बायबलमधील उदाहरणे दिली, तरी आपण हे लक्षात घेतले पाहिजे की, त्यांनी ती बायबलच्या जुन्या करारातील म्हणजे ज्यू धर्मातील दिली आहेत. मानवतेच्या दृष्टिकोनातून मित्राबरोबर त्यांच्या मंदिरात किंवा मशिदीत जाणे काही चुकीचे आहे, असे मला वाटत नाही. तसेच- काय खावे, काय प्यावे यापेक्षा तुमचे आचरण कसे आहे, हे महत्त्वाचे. बायबल वाचले नसेल तरी चालेल, पण एकमेकांवर प्रेम करा- ही येशूची शिकवण जर आपण आचरणात आणली, तर त्यातच सर्व काही आले.’’ ब्रदरांच्या अशा कर्मठ प्रवचनाने भाविक गोंधळून गेलेले होते, हे फादरांच्या बहुधा लक्षात आले होते. त्यांनी त्यांच्या भाविकांच्या मनातील गोंधळ आपल्या प्रवचनाद्वारे दूर करायचा प्रयत्न केला होता, तो खूपच स्तुत्य होता. धर्माच्या आचरणाने माणसाला मुक्त वाटले पाहिजे, त्यावर कोणतीही बंधने नकोत, या माझ्या मनातील विचारांशी मेळ घालणारे असे फादरांचे ते प्रवचन होते. ते प्रवचन अजूनही माझ्या लक्षात आहे.

दुसरे प्रवचन आठवते, ते म्हणजे फादर बेंजामिन यांचे. त्या वेळी माझे आणि माझ्या पत्नीचे छोट्या गोष्टीवरून भांडण झाले होते. त्यामुळे दोघांत काहीसा विसंवाद होता. रविवारी जायचंच आहे, म्हणून आम्ही मुलाला घेऊन चर्चला आलो होतो. अर्थात आम्हा दोघांतील दुभाषक म्हणून मुलाचा वापर होत होता. त्या दिवशी फादरांनी तसे सामान्यच प्रवचन दिले. पण प्रवचनाच्या शेवटी त्यांनी एक वाक्य म्हटले आणि त्या वाक्याने मात्र माझे कान टवकारले गेले. माझ्या मनाच्या त्या स्थितीस ते एक दिशा देणारे वाटले. ते वाक्य असे होते, ‘‘जर तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात असाल, तर तुम्ही त्या व्यक्तीचे ऐकणारच.’’ तसं पाहिलं तर इतरांना हे वाक्य खूपच साधं वाटेल, पण मला मात्र त्या क्षणी ते दीपस्तंभ वाटले. मी जर माझ्या पत्नीचे ऐकत नसेन, तर तिला ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे’ असे कसे बरे मी म्हणू शकतो? आमच्यातील विसंवाद वितळण्यास फादरांचे हे वाक्य कामी आले होते. त्याच मिस्सात मग फादरांचे प्रवचन झाल्यावर बाजूला बसलेल्या एकमेकांचे हात हातात घेऊन एकमेकांना ‘तुम्हास शांती असो’ असे म्हणण्याचा एक विधी आहे. त्या दिवशी माझ्या बायकोला प्रथमच औपचारिकता म्हणून नव्हे, तर तिच्या डोळ्यांत पाहून मी ‘तुम्हास शांती असो’ असे म्हणालो. धर्म जर मनापासून आचरला, तर आपल्याला खूप काही देऊन जातो- आपली ओंजळ भरून जातो. तो क्षण असाच काहीसा होता.

तिसरे आवडलेले प्रवचन सांगायचे तर, फादर सॅबी  तुस्कानो यांनी गुड फ्रायडेच्या दिवशी दिलेले. दुःख कसे आवश्यक असते, यावर त्यांनी सुंदर विवेचन केले होते. छोट्या चणीचे हे फादर बाहेरून खास आमच्या चर्चमध्ये प्रवचन देण्यासाठी आलेले होते. ‘दुःख हे माणसाला धीर आणि सहनशीलता असे दोन गुण शिकवते’ असे त्यांनी एक सुंदर वक्तव्य केले होते. तसेच वेदना माणसाचे व्यक्तिमत्त्व बनवते. फुलझाडाच्या टोकाची डहाळी कापल्यामुळे त्याला भरपूर फांद्या फुटून ते खूप चांगले बहरते, असे खूपच सूचक उदाहरण त्यांनी दिले होते. पुनरुत्थान अनुभवायचे असेल तर त्यासाठी वेदना सहन कराव्या लागतीलच; वेदनेशिवाय पुनरुत्थान नाही. सुरवंट जेव्हा कोषातून बाहेर येत असतो, तेव्हा तो जरी मरणप्राय असला तरी फुलपाखराच्या रूपाने त्याचे पुनरुत्थानच होत असते; तो संघर्षच त्याच्या पंखांमध्ये त्याला रंग भरून देतो. त्याचा त्रास कमी करण्यासाठी आपण कोष कापला, तर बाहेर आलेले फुलपाखरू जास्त वेळ जगू शकत नाही. इन्स्टंट नूडल्स, यशाचा शॉर्टकट असणारे कोचिंग क्लासेस, वेदनाशामक गोळ्या हे सर्व मरणाविना पुनरुत्थानाचे आमिष दाखवत असतात; परंतु पुनरुत्थान जर अनुभवायचे असेल तर कष्टाला, मरणाला, संघर्षाला, दुःखाला, वेदनेला सामोरे जावेच लागते. जेव्हा दुःखाकडे आपण सकारात्मक दृष्टीने बघतो, तेव्हाच आपल्याला पुनरुत्थान दिसू शकेल. दुःख कसे सकारात्मकरीत्या स्वीकारावे याविषयी खूपच मार्मिक, प्रेरणादायी असे ते प्रवचन होते. येशू ख्रिस्ताच्या क्रूसावरील मरण आणि पुनत्स्थानाचा अतिशय विवेकी अर्थ लावण्याचा प्रयत्न फादरांनी केलेला होता. चांगले विचार कधीही आणि कोणाच्याही मुखातून येऊ शकतात. ते कोणी एका विद्वानानेच उच्चारावेत असे नाही. एखादा गरीब-अशिक्षित माणूस असेल, तोही प्रसंगी त्याच्या जीवनानुभवातून सुंदर, प्रभावी विचार मांडू शकतो. जर जिज्ञासू मनाची कवाडे उघडी असतील, तर चांगले विचार कुठूनही मंद हवेच्या झुळुकीप्रमाणे येत असतात. त्याच आशेने मी त्या वर्षीच्या गुड फ्रायडेच्या उपासनेला आलो होतो...

गुड फ्रायडे, ईस्टर व ख्रिसमस या ख्रिस्ती कॅलेंडरमधील ज्या काही प्रमुख घटना आहेत, त्यासाठी विशेष उपासना असतात. त्यामध्ये खूपच विधी असल्याने, तसेच या खास प्रसंगांना भाविकांची खूपच गर्दी अपेक्षित असल्याने या दिवशी उपासना ही चर्चच्या आवारात घेतली जाते. त्या दिवशीही गुड फ्रायडेला मिस्सा ही चर्चच्या प्रशस्त आवारात घेण्यात येत होती. स्टेजवर मिस्साच्या आराधनेची पूर्ण तयारी झाली होती. स्टेजच्या बाजूला क्वायरचे सदस्य माईकपाशी उभे राहून कोणकोणती गीते घ्यायची आहेत, याबाबत चर्चा करत होते. स्टेजच्या डाव्या बाजूला उपासनेदरम्यान जे कोणी बायबलवाचन करणार होते ते एकत्र बसलेले दिसत होते, तर आजूबाजूला स्वयंसेवकांची लगबग दिसत होती. स्टेजसमोरच एक भला मोठा क्रॉस जमिनीत गाडून उभारण्यात आला होता आणि त्यावर येशू ख्रिस्ताची प्रतिकृतीही टांगलेली होती, तसेच त्या क्रूसावर टांगलेल्या येशू ख्रिस्ताच्या प्रतिकृतीवर पांढरा पडदा टाकलेला होता. वाऱ्याच्या झुळुकीबरोबर तो पांढरा पडदा वर-खाली होऊन त्यामागील येशू ख्रिस्ताच्या प्रतिकृतीचे ओझरते दर्शन घडत होते. संध्याकाळचे पाच वाजत आलेले असले, तरी उन्हाळा असल्याने सूर्य पश्चिमेला पोहोचूनही त्याची धग कमी झाली नव्हती. आपली नेहमीची तांबूस, केशरी वस्त्रे परिधान करून संध्येला भेटण्यास तो जणू आज राजी नव्हता. मी, माझा मुलगा व माझी पत्नी असे आम्ही त्या दिवशी उपासनेसाठी आलो. स्टेजसमोर बऱ्याच खुर्च्या मांडलेल्या होत्या. ऊन कमी लागेल अशा आडोशाच्या ठिकाणी आम्ही स्थानापन्न झालो.

गुड फ्रायडेची उपासना ही खूपच दीर्घ व ख्रिस्ती श्रद्धेनुसार महत्त्वाची असते. या विधीमध्ये खूप महत्त्वाचे भाग असतात. त्यापैकी बायबलवाचन हा एक भाग पूर्ण झाल्यानंतर ‘क्रूसवंदन’ या दुसऱ्या भागास सुरुवात झाली. तोपर्यंत आमच्या लहानग्याचं लक्ष स्टेजसमोरील त्या क्रूसाकडे गेले. त्यालाही वाऱ्यावर हलणाऱ्या पांढऱ्या पडद्याआड असलेल्या येशू ख्रिस्ताच्या प्रतिकृतीचे ओझरते दर्शन घडत होते. त्याने अगदी बालसुलभपणे मला विचारले, ‘‘डॅडा, येशूच्या पुढे पांढरे कापड का आहे? तो पांढऱ्या कापडामागे का लपला आहे? तो आपल्याबरोबर लपाछपी खेळतो आहे का?’’ मुलाच्या या प्रश्नावर हसावे की रडावे, हेच कळले नाही. मी त्याला म्हणालो, ‘‘तो लपाछपी खेळत नाहीये तर त्याच्या अंगावर जो पडदा टाकला आहे; त्याचे अनावरण आता फादर करतील, तो हटवतील.’’ हे ऐकल्यावर त्याचा  प्रतिप्रश्न होता, ‘‘आपण पडदा काढेपर्यंत येशूला का पाहायचे नाही?’’ त्यावर माझ्याकडे काहीही उत्तर नव्हते. लहान मुले ही जन्मतःच वाहत्या झऱ्याप्रमाणे असतात. त्यांचे मन निरभ्र, स्फटिकासारखे पांढरे शुभ्र असते. ते पूर्वग्रहदूषित नसते. कोणत्याच जातीचा, धर्माचा पगडा त्यांच्या मनावर नसतो. किती हलकी असतात ती मनाने! कोणतेच ओझे त्यांच्या मनावर नसते. आपण मुलांना असेच धर्म-जातीच्या पगड्याविना वाढू दिले, तर जग किती सुंदर होईल! मनात विचार उमटून गेला.

मी मुलाला सावरून बसलो. क्रूसवंदनेला सुरुवात झाली होती. हा विधी म्हणजे गुड फ्रायडेच्या दिवशी ज्या क्रूसावर येशू ख्रिस्ताने आपले रक्त सांडले होते, त्या प्रतीकात्मक क्रूसाला वंदन करून येशूच्या दुःखाचे स्मरण करणे ही भावना त्यामागे आहे. त्या अनुषंगाने फादरांनी आणखी एक छोटासा क्रॉस घेऊन प्रतीकात्मकरीत्या त्याचे अनावरण केले आणि त्याच वेळी स्वयंसेवकांनी मोठ्या क्रूसावरील पडदा बाजूला केला. माझ्या मुलाला प्राण्यांची आवड आहे. प्राण्यांची जर छोटी प्रतिकृती दिसली- म्हणजे मोठ्या कुत्र्याचा बाजूला जर छोटे कुत्रे दिसले, तर ते कुत्र्याचे पिल्लू आहे किंवा सिंह दिसला आणि जर त्याच्या बाजूला छोटीशी प्रतिकृती दिसली तर ते सिंहाचे पिल्लू आहे- तर हे त्याला कळते. का कुणास ठाऊक, पण त्याला असेच काही तरी दिसले आणि त्याने प्रश्न उपस्थित केला, ‘‘फादरांच्या हातात जो छोटा क्रॉस आहे, त्यावर पिल्लू येशू आहे का?’’ तो इतका मोठ्याने बोलला की, आजूबाजूला जे भाविक बसले होते, त्यांनाही हसू आवरले नाही.

पण लहानग्या मुलाने एक अंतर्मुख करणारा प्रश्न विचारला होता. ‘मूर्तिपूजा करू नका’ हे ख्रिश्चन धर्माचे एक मूलभूत तत्त्व आहे आणि  चर्च स्वतः ते खरंच पाळत आहे का, ही शंका मनात आली. क्रूसाचे अनावरण फादरांच्या हस्ते झाल्यानंतर क्रूसाला वंदन करायचे होते. गुड फ्रायडेच्या मिस्सासाठी भाविकांची बरीच गर्दी असल्या कारणाने आणि पुन्हा ती उपासना चर्चच्या आवारात होत असल्याकारणाने छोट्या-छोट्या क्रॉसच्या प्रतिकृती जागो-जागी प्रतीकात्मकरीत्या स्वयंसेवकांमार्फत ठेवल्या जातात आणि त्या-त्या भागातले लोक रांगेने येऊन शिस्तबद्धरीत्या क्रॉसचे चुंबन घेऊन आपल्या जागी जातात.

या विधीला 1500-2000 माणसे असतात, परंतु क्रॉसच्या अनेक प्रतिकृती ठेवल्या असल्या कारणाने हा विधी 5-10 मिनिटांत आटोपतो. क्रूस आणि त्यावरील खिळलेल्या येशूची इमेज- एक प्रतीकात्मक प्रतिकृती आहे, असे समजूनच क्रूसाला वंदन केले जात होते. परंतु या वेळेला काही वेगळेच झाले होते. या वेळेस बिशपांनी फादरांना आदेश दिला होता की- एकच क्रूस ठेवा, खूप प्रतिकृती नकोत. सर्व धर्मप्रांतीय धर्मगुरू बिशपच्या आदेशात असतात. काही बिशप हे चर्चच्या भूमिकेशी एकरूप झालेले कट्टर समर्थक असतात, तर काही प्रोग्रेसिव्ह विचारांचेही असतात. बिशपांचा आदेश आला की, मग फादर सर्व पॅरिशमध्ये त्या आदेशाची अंमलबजावणी करतातच. चर्चमध्ये विविध देणग्या लोकांकडून येत असतात. अशा देणग्या देणाऱ्यांची नावे चर्चमधून वाचली जात. एक प्रकारची प्रसिद्धी मिळविण्याचा हा सोपा मार्ग बनला होता. तेव्हा एक बिशपांनी देणग्या देणाऱ्यांची नावे चर्चमधून वाचण्यास बंदी घातली आणि लोकांतून काहीसा विरोध होऊनही एक स्तुत्य पाऊल उचललं. याच बिशपांनी नन्स किंवा धर्मभगिनी या धर्मगुरूच्या पदाच्या नाहीत म्हणून त्यांनी चर्चमध्ये ख्रिस्तप्रसाद वाटू नये, असा अतिशय प्रतिगामी- 50 वर्षे मागे नेणारा निर्णय घेतला. सर्व चर्चमधूनही त्यासंबंधी घोषणा झाली होती. हा निर्णय खूप चुकीचा होता. काही ज्येष्ठ फादरांकडून मग ‘हा निर्णय धर्मभगिनींवर अन्याय तर करणारा आहेच, पण स्त्री-पुरुष असा भेदभाव करणारासुद्धा आहे’ असे बिशपांना समजावण्यात आल्यावर मग तो निर्णय मागच्या दरवाजातून मागे घेण्यात आला. त्यामुळे ‘क्रूसवंदनेसाठी एकच क्रूस ठेवला जाईल, खूपशा प्रतिकृती नकोत’ या बिशपांच्या आदेशाचे पालन वसईतील सर्व 40-50 चर्चेसमध्ये काटेकोरपणे करण्यात आले.

यामुळे झाले काय की, जे 1500-2000 भाविक जमले होते, त्यांना सगळ्यांना एकाच क्रूसाला वंदन करणे भाग होते. त्यामुळे भली मोठी रांग लागली होती आणि जो विधी एरवी 10 मिनिटांत आटोपतो, त्याला तब्बल एका तासाहूनही जास्त वेळ लागला. जी मुले क्वायरची गीते गात होती, ती पण अक्षरशः थकलेली दिसत होती. एक तास अखंड गायन केल्याने तेही काकुळतीला आलेले होते. वेळेचा   हा अपव्यय बघून खूप वाईट वाटले.

आपण तर त्या क्रूसाला मूर्ती मानत नाही, ती तर एक प्रतिकृती आहे. आपण कितीही प्रतिकृती ठेवू शकतो. पण ज्या अर्थी तुम्ही एकच क्रूस ठेवला आहे, त्या अर्थी तुम्ही त्या क्रूसाला येशूचे प्रतिरूप मानत आहात आणि हे ख्रिश्चन श्रद्धेशी अगदी विसंगत आहे.

ख्रिश्चनांमध्ये मूर्तिपूजेला बिलकुल स्थान नाही. चर्चमध्ये आज मला अगदी विसंगत अशी बाजू दिसत होती. आम्ही तासभर थांबून त्या क्रूसाचे चुंबन घेऊन बसलो. नंतर माझ्या लक्षात आले की, जर त्यांना क्रूसाची एकच प्रतिकृती ठेवायची होती, तर सगळे जण आपल्या जागेवर उभे राहून एकत्रितरीत्या वंदन करू शकले असते. देव सगळीकडे आहे आणि समोर मोठा क्रूस आहेच; त्याचे अनावरण करून, त्याच्याकडे पाहून, दोन मिनिटे शांत राहून, जागेवरच उभे राहून, प्रतीकात्मकरीत्या खूपच सुंदर वंदन झाले असते. पण त्यानंतर खरी गोम लक्षात आली. ते तसे करू शकले असते, पण मग कशीन कशी गोळा करायची?

कशीन म्हणजे दानपात्र, दानपेटी. दान, पैसा कसा गोळा करायचा? गुड फ्रायडेच्या दिवशी जे मुख्य दानपत्र मिस्सादरम्यान फिरवले जाते, ते सर्व दान इस्रायल येथील पवित्र भूमीच्या संवर्धनासाठी पाठविले जाते. तसा व्हॅटिकनचा नियमच आहे. गुड फ्रायडे म्हणजे येशूच्या मृत्यूचा दिवस. या दिवशी चर्चमध्ये जास्तीत जास्त उपस्थिती असते आणि हे सर्व लोक त्या दिवशी भावुक असतात. या भावुकपणाचा फायदा उठवणे आलेच. मग क्रूसवंदनेच्या वेळी आणखी एक दानपात्र ठेवण्याची शक्कल लढवली गेली. यात जमा झालेले हे दान वसईतील चर्चपाशीच राहते. म्हणजे अधिकृत कशीनद्वारे व्हॅटिकनचा नियमही पाळला जातो आणि स्थानिक चर्चचेही उत्पन्न चालू राहते. अशी ही सोईस्कर शक्कल येथील चर्चने लढवलेली दिसत होती. भाविकांच्या भावनेचा चर्चच्या आर्थिक लाभासाठी घेतला गेलेला गैरफायदाच तो! फक्त एका क्रूसाला वंदन करताना एकीकडे क्वायर लोक थकलेले दिसत होते. भाविक लोक कंटाळलेले होते. स्वयंसेवकांची पैशांच्या भरलेल्या थैल्या घेऊन जाताना तारांबळ उडालेली दिसत होती. दानपात्र, पैशाची पेटी एक भरली तर दुसरी आणून ठेव, दुसरी भरली की तिसरी आणून ठेव- मला हा श्रद्धेचा बाजार स्पष्टपणे प्रथमच दिसू लागला.

कदाचित एरवी मला ते दिसलेही नसते, पण विवेकमंचात ॲड. अनुप ‘आर्थिक फायदा आणि श्रद्धा’ या दोघांच्या संबंधांबाबत नेहमी सांगायचे व त्यावर बरीच चर्चा व्हायची. चर्च, मंदिरे श्रद्धेचा दुरुपयोग आर्थिक वापरासाठी कसा करून घेतात, ते खूपच विकृत चित्र आज मला प्रत्यक्षरीत्या अनुभवण्यास मिळत होते आणि ते माझ्या डोळ्यांना खूपच खुपलेले होते. क्रूसावर खिळलेल्या येशू ख्रिस्ताचे हे बाजारीकरण बघून मला स्वत:चीच त्या दिवशी खूप लाज वाटली. क्वायरचे गीत आणि क्रूसवंदनाही चालूच होती. माझ्या मुलाने षटकार मारावा तसा आणखी एक प्रश्न मला विचारला, ‘‘येशू ख्रिस्त तर आज मेलेला आहे, मग आपण हे गाणं का म्हणत आहोत?’’ गाणं म्हणणं हे आनंदाशी निगडित आहे, मग आपण या दु:खाचा हा आनंदोत्सव का साजरा करत आहोत? मी कधी तसा विचारच केला नव्हता. दु:खाची गाणी नसतात असे नाही, दु:खाची गाणी असतात; पण हे सर्व तबला, ही संगीत सजावट, काळ्या रंगाचा ड्रेस कोड पाळून उपासनेला आलेले लोक... मला हे सर्व खूपच नाटकी वाटू लागले होते.

खरे पाहिले तर येशूला क्रूसावर ज्या दिवशी खिळवले, तो गुड फ्रायडेचा दिवस, किती वेगळ्या तऱ्हेने आपण साजरा करू शकतो. आपण ज्या काही चुका केलेल्या आहेत, त्याविषयी शांतचित्ताने चर्चमध्ये का असेना आत्मपरीक्षण करून वा वृद्ध, अनाथ, अपंग यांच्यासमवेत तो दिवस घालवून किंवा काही तरी सेवाकार्य करून आपण स्वतःच्या दुःखाचेही किती सुंदररीत्या निराकरण करू शकतो. मुलाच्या या प्रश्नाने माझ्या मनाला खूपच वेगवेगळे धुमारे फुटले होते. आम्ही त्या दिवशी घरी आलो. मी काहीसा अस्वस्थच होतो. गुड फ्रायडेची जी मिस्सा मला अपेक्षित होती, त्यापेक्षा आज काही वेगळेच घडले होते.

हेही वाचा: आठवणीतील गुड फ्रायडे (उत्तरार्ध)

Tags: विवेकमंच गुड फ्रायडे डॅनिअल फ्रान्सिस मस्करणीस फादर manch yeshu good friday daniel mascarenhas weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या