डिजिटल अर्काईव्ह (2014-2019)

अविवेकी निराशावादी विचारवंतांचे उदाहरण देताना रिडले यांनी 18 व्या शतकातल्या थॉमस माल्थसचा उल्लेख केला आहे. लोकसंख्या विस्फोटामुळे जगावर भुकेकंगाल व्हायची वेळ येईल, असे भाकीत माल्थसने वर्तवले होते. माल्थसच्या मते लोकसंख्या भूमिती श्रेणीने म्हणजे 2, 4, 8, 16, 32... या पटीने वाढते तर कृषिपिकांचे उत्पादन अंकगणिती श्रेणीने म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6... या पटीने होते. नजीकच्या काळात बेसुमार वाढणाऱ्या लोकसंख्येस आवश्यक असलेला अन्नपुरवठा करण्यास पृथ्वी अपुरी पडेल असे माल्थसला वाटले होते. प्रत्यक्षात तसे काहीच झाले नाही. कारण माल्थसने भविष्यकालीन तंत्रज्ञानाचा विचार केला नाही. तंत्रज्ञानाच्या साह्याने खते, ट्रॅक्टर, कीटकनाशके, हायब्रीड बिया, ड्रिप इरिगेशन यामुळे कृषिपिकांचे उत्पादन वाढेल आणि कुटुंब-नियोजनाच्या कृत्रिम साधनांमुळे लोकसंख्यावाढ नियंत्रणंत आणली जाईल, हे थॉमस माल्थसच्या गृहीतकात नव्हते. त्यामुळे त्याचे निराशावादी भविष्य चुकले.

 

विचारवंतांनी जीवनातील सामाजिक, सांस्कृतिक, राजकीय आणि आर्थिक प्रश्नांविषयी आशादायक, आश्वासक, आश्वस्त असे विवेचन करावे, अशी सामान्य लोकांची अपेक्षा असते. प्रश्नांचा केवळ ऊहापोह न करता त्यांची उत्तरे शोधावीत, त्यावर उपाय सांगावेत आणि आपल्या प्रतिभेच्या, कल्पनाशक्तीच्या, वैचारिक साधनेच्या बळावर वर्तमानकाळातून भविष्यकाळाकडे जाताना यथायोग्य मार्गदर्शन करावे, हे वैचारिक योगदान समाजाला हवे असते. प्रत्यक्षात वैचारिक क्षेत्रात निराशावादाने, वैफल्यग्रस्तेने आणि त्यातून उद्‌भवणाऱ्या विचारवंतांच्या आक्रस्ताळेपणाने घातलेले थैमान आपल्याला दिसून येते.

विशेषतः आर्थिक आणि पर्यावरणीय क्षेत्रातील महागाई, बेरोजगारी, लोकसंख्येचा विस्फोट, दुष्काळ, पाण्याची टंचाई, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, संसाधनबळाचा तुटवडा, बँकांची थकलेली कर्जे, नद्यांचे प्रदूषण, वनसंपत्तीचा विध्वंस, ग्लोबल वॉर्मिंग, त्यामुळे वाढणारी समुद्राच्या पाण्याची पातळी यासारख्या प्रश्नांकडे विचारवंत व आर्थिक आणि पर्यावरण क्षेत्रातील तज्ज्ञ नेहमीच बहिर्गोल भिंगातून पाहत असतात. पत्रकार, वर्तमानपत्रे, सोशल मीडिया, टीव्ही यांना नकारात्मक, सनसनाटी विचार कोणत्याही सकारात्मक विचारांपेक्षा अधिक भावतात. त्यामुळे निराशावादी विचार पेरणारी पुस्तके सर्वाधिक खपाची कशी बनतील, या दृष्टीने त्यांचे मार्केटिंग केले जाते.

या पार्श्वभूमीवर मॅट रिडले यांचे The Rational Optimist हे भविष्य- काळाबद्दल विवेकनिष्ठ आशावादी भूमिका घेणारे पुस्तक वेगळे आणि उल्लेखनीय आहे. मॅट रिडले यांचा विवेकी आशावाद नेमका कोणता आहे आणि तो कोणत्या आधारावर असे विधान करतात की, आपण सर्वच आपल्या पूर्वजांपेक्षा ऐहिक बाबतीत अधिक सुखी व समाधानी आहोत. गेल्या गृहीतकांवर आधारलेला आहे, हे तपासून पाहणे गरजेचे आहे. मॅट रिडले आपल्या पुस्तकात ऐतिहासिक 50 वर्षांत झालेले दारिद्र्यनिर्मूलन हे त्यापूर्वीच्या 500 वर्षांत झालेल्या दारिद्र्यनिर्मूलनापेक्षा जास्त आहे. त्यामुळे 2100 चा मानवी समाज आजच्या मानवी समाजापेक्षा किती तरी पटीने अधिक समृद्ध, सुखी, समाधानी व निरोगी असेल, असे त्यांना वाटते. श्रीमंत माणसे दुःखी असतात, हा गोड समज रिडले यांनी खोडून काढला आहे. श्रीमंत माणसांची विशिष्ट अशी दुःखे असली तरी सर्वसाधारणपणे श्रीमंत माणसे ही सरासरी गरीब माणसांपेक्षा अधिक सुखी असतात, असे रिडले यांचे ठाम मत आहे. त्यामुळेच विकासप्रक्रियेत दारिद्र्यनिर्मूलनाकडे अधिक लक्ष केंद्रित करायला हवे, असे त्यांना वाटते.

मॅट रिडले यांचा भविष्यकालीन विवेकवादी आशावाद ज्या गृहीतकांवर आधारीत आहे, ती गृहीतके म्हणजे- अमर्याद मानवी बुद्धिमत्ता, असीम मानवी कल्पनाशक्ती, मानवी संस्कृतीकडून होत असलेले कल्पनांचे/ विचारांचे परागीभवन (cross fertilisation of ideas), सामूहिक ज्ञानातून (collective brain) लागणारे नवनवे शोध (Innovations), तंत्रज्ञानामुळे कृषीउत्पादकतेत होणारी वाढ, शैक्षणिक व वैद्यकीय क्षेत्रातील प्रगतीमुळे जननक्षमतेत होणारी घट, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात होणारे मोठे बदल (Social innovations), हुकूमशाही राजवटीकडून लोकशाहीकडे होणारे राजकीय स्थित्यंतर, जागतिक विश्वासार्हतेत वाढ झाल्याने उत्तरोत्तर कमी झालेली युद्धखोरी, तंत्रज्ञानामुळे मानवी श्रमांची झालेली बचत आणि त्यामुळे सर्जनशील (creative) व्यक्तींना मिळालेला निवांतपणा (Leisure Time), नव्या उद्योजकांना मिळणारा Venture Capital  d Start up Funds चा पाठिंबा, बहुजनांकडून सूचना व भांडवल (Crowd sourcing and Crowd Funding) मिळण्याची संधी- एकूण भांडवल, श्रम व ज्ञान यांची जागतिक पातळीवर देश, धर्म, जात-पात हे भेद छेदून होणारी प्रचंड प्रमाणावरची देवाण-घेवाण!

भविष्यकाळात केवळ जागतिक व्यापारातच नव्हे, तर परराष्ट्रव्यवहारातही एकमेकांशी सहकार्य केल्याशिवाय तरणोपाय नाही, हा शहाणपणा राजकीय नेत्यांना हळूहळू येणार आहे. त्यामुळे प्रत्यक्ष युद्धे, शीत युद्धे तर कमी होणार आहेतच; पण देशोदेशींच्या व्यापारी सीमाही खुल्या होणार आहेत. रिडले यांच्या मते, व्यापाराचा पाया विश्वासार्हता हा आहे. देशातील जनतेत एकमेकांविषयी विश्वासार्हता 15 टक्के वाढते तेव्हा देशाचे प्रतिनागरिक प्रतिवार्षिक उत्पन्न 1 टक्का वाढते, असा संख्याशास्त्रीय अंदाज त्यांनी व्यक्त केला आहे. लेखक तंत्रज्ञानक्षेत्रातील शोधाप्रमाणेच सामाजिक क्षेत्रांतील बदलांना तेवढेच महत्त्व देतात. त्यामुळेच शिक्षण, वैद्यक, कायदा, प्रशासन या क्षेत्रांतील संस्थांची स्वायत्तता, त्यांचे सोपेसुबोध-सुटसुटीत, नागरिकांना समजतील असे कायदे, विनाविलंब निर्णयप्रक्रिया या सर्व गोष्टी विकासप्रक्रियेच्या दृष्टीने त्यांना जरुरीच्या वाटतात. अविवेकी निराशावादी विचारवंतांचे उदाहरण देताना रिडले यांनी 18 व्या शतकातल्या थॉमस माल्थसचा उल्लेख केला आहे. लोकसंख्याविस्फोटामुळे जगावर भुकेकंगाल व्हायची वेळ येईल, असे भाकीत माल्थसने वर्तवले होते.

माल्थसच्या मते लोकसंख्या भूमिती श्रेणीने म्हणजे 2, 4, 8, 16, 32... या पटीने वाढते तर कृषिपिकांचे उत्पादन अंकगणिती श्रेणीने म्हणजे 1, 2, 3, 4, 5, 6... या पटीने होते. त्यामुळे नजीकच्या काळात बेसुमार वाढणाऱ्या लोकसंख्येस आवश्यक असलेला अन्नाचा पुरवठा करण्यास पृथ्वी अपुरी पडेल आणि लोक भुकेने तडफडून मरतील, असे माल्थसला वाटले होते. प्रत्यक्षात तसे काहीच झाले नाही. कारण माल्थसने भविष्यकालीन तंत्रज्ञानाचा विचार केला नाही. तंत्रज्ञानाच्या साह्याने खते, ट्रॅक्टर, कीटकनाशके, हायब्रीड बिया, ड्रिप इरिगेशन, कालव्यांचे नियोजन यामुळे कृषिपिकांचे उत्पादन वाढेल आणि कुटुंब-नियोजनाच्या कृत्रिम साधनांमुळे लोकसंख्यावाढ नियंत्रणंत आणली  जाईल, हे थॉमस माल्थसच्या गृहीतकात नव्हते. त्यामुळे त्याचे निराशावादी भविष्य चुकले.

मॅट रिडले यांना पुढील काही वर्षांत कृषी उत्पादनात भरीव वाढ होईल याची खात्री आहे. जीएम (Geneticaly Modified) पिकांना पर्यावरणवाद्यांकडून होणारा विरोध त्यांना मूर्खपणाचा वाटतो. त्यांच्या मते, निसर्गात लाखो वर्षांपासून अनेक पिकांवर जेनेटिकली बदल होत आहेत. जंगली गवतापासून कृषिपीक बनलेला गहू हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. जीएम पिकांबरोबरच हायब्रीड बिया, ड्रिप इरिगेशन, डबल फार्मिंग, मल्टिस्टोरिड फार्मिंग, गृह उद्योजकांना कृषिक्षेत्रात मिळू शकणारी करसवलत, आहारात बदल करून मेंढ्याचे मांस व गोमांस याऐवजी पोर्क, चिकन व मासे याकडे वळणे (कारण त्यामुळे जनावरांच्या खाद्याची तीन पटीने बचत होते) या गोष्टींमुळे जगाच्या भुकेची समस्या येत्या काही वर्षांत आटोक्यात येईल.

जागतिक लोकसंख्या 2075 पर्यंत 720 कोटी झाली तरी तिला आवश्यक तेवढे धान्य व कृषिपिके आपली भूमी देऊ शकेल. जगातले 50 टक्के लोक 2025 पर्यंत शहरात राहायला येतील. शहरीकरण, स्त्रियांना मिळणारे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण आणि त्यांना मिळणारी रोजगाराची संधी यामुळे त्यांची जननक्षमता कमी होईल. आज अर्ध्या-अधिक जगाची जननक्षमता 2.1 म्हणजे Replacement level एवढी झाली आहे. आफ्रिका खंडाची वाढती लोकसंख्या हा जटिल प्रश्न आहे. पण पुढील 50 वर्षांत या खंडातले औद्योगिकीकरण, शहरीकरण, रस्त्यांचे जाळे, शैक्षणिक आणि वैद्यकीय सुविधा, स्त्रियांचे रोजगारांतले वाढते प्रमाण यामुळे आशिया खंडाचा लोकसंख्याविस्फोट आटोक्यात येईल.

अविवेकी निराशावादांचा ग्लोबल वॉर्मिंगचा दावाही अवास्तव आहे, असे रिडले यांचे म्हणणे आहे. निराशावादी कशा चुका करतात त्याची उदाहरणे लेखकाने दिली आहेत. ब्रावन या 19 व्या शतकातल्या विचारवंताला स्वयंचलित गाड्यांचा शोध लागेल याची कल्पनाही नव्हती. त्यामुळे 1950 मध्ये लंडन शहरात रस्त्यावर घोड्यांची 10 फूट लीद असेल, असे भविष्य त्याने वर्तवले होते. 1943 मध्ये थॉमस वॉटसन याला वाटले होते की, जगाला फक्त 5 संगणकांची गरज आहे.  1977 मध्ये केन वॉल्सन यांनी असे विधान केले की, होम कॉम्प्युटरची कोणालाही गरज भासणार नाही. हे सर्व भविष्यमान अर्थात सर्वशक्तिमान काळाने खोटे ठरवले. कारण हे भविष्यमान मानवी बुद्धीचे अवमूल्यन करणारे होते. ज्ञान, विज्ञान आणि तंत्रज्ञानाला परिसीमित करणारे होते. भविष्यकाळ हे भूतकाळाचेच प्रतिबिंब असेल, असे मानणारे होते!

मॅट रिडले यांनी मानवी समाजाच्या एका विचित्र विरोधाभासाकडे आपले लक्ष वेधले आहे. त्यांचे म्हणणे असे की, व्यक्तिशः आपण सर्वच आपल्या भविष्याबद्दल आशावादी असतो, पण सामाजिक संदर्भांत आपण निराशावादी असतो. People are personally optimistic but socialy pessimistic about future. याचमुळे ग्लोबल वॉर्मिंगबद्दल केलेल्या भविष्याबद्दल ते साशंक आहेत. ग्लोबल वॉर्मिंगला आळा घालण्यासाठी विकासाला, औद्योगिकीकरणाला, शहरीकरणाला विरोध करणे त्यांना चुकीचे वाटते. त्यामुळे गरिबांचा दारिद्र्यरेषेवरून वर यायचा, मध्यमवर्गीयांचा श्रीमंत व्हायचा हक्क आपण हिरावून घेतो, असे त्यांना वाटते. ग्लोबल वॉर्मिंगवर मानवाची सामूहिक बुद्धिमत्ता यथावकाश तोडगा काढेल, अशी त्यांना खात्री वाटते. ग्लोबल वॉर्मिंगची भीती अनाठायी आहे असे नव्हे. ‘द इकॉनॉमिस्ट’च्या ताज्या अंकात ग्लोबल वॉर्मिंगमुळे जागतिक तापमानात औद्योगिक समाजपूर्व तापमानापेक्षा 3 अंश से. वाढ होईल आणि वाळवंटसदृश प्रदेशात असलेल्या मक्केला हजयात्रा करणे मुसलमानांना अशक्य होईल, अशी भीती व्यक्त केली आहे.

पण ग्लोबल वॉर्मिंग हे मानवी उपक्रमांमुळे होते की अन्य कारणांमुळे, यावर तज्ज्ञांमध्ये मतभेद आहेत. काही तज्ज्ञांचे म्हणणे असे आहे की, पृथ्वीवर राहणाऱ्या मानवाचा आणि त्याच्या जीवनाचा एकूण हवामानावर होणारा परिणाम नगण्य आहे. ग्लोबल वॉर्मिंग होतच असेल तर ते अन्य कारणांनी होत आहे. त्यामुळे मानवी जीवनात बदल करून फारसा फायदा होणार नाही. मॅट रिडले यांनी या गोष्टींवर आपले मतप्रदर्शन केले नाही. त्यांना ग्लोबल वॉर्मिंगवर बायो-फ्युएल हा उपाय चुकीचा वाटतो. कारण बायो-फ्युएल पिकवण्यात अन्य कृषिपिके पिकवणारी जमीन वाया जाते, असे त्यांचे म्हणणे आहे. त्यापेक्षा अणुवीज केंद्रे, सोलर पॉवर, हायब्रीड वा इलेक्ट्रिक वाहने हे उपाय त्यांना सोईस्कर वाटतात.

माहितीचे महाजाल उपलब्ध झाल्यामुळे आपल्याला कल्पनांचे Crowd Sourcing करता येते. यामध्ये  Each is giving according to his ability to each according to his need असा सगळा मामला असतो आणि यात कसलीच ऐहिक अपेक्षा नसते. हे सगळे निरपेक्ष, निष्काम असते. टेस्लाचे संचालक ॲलन मस्क यांना पेटंटची कल्पना आता कालबाह्य वाटू लागली आहे. Intellectual Property ही स्वत:ची न मानता सामाजिक व्हावी, यासाठी आपल्याला लागलेला नवा शोध कोणताही मोबदला न घेता वा पेटंट न घेता ज्ञानाच्या महाजालात समर्पण करून इतरांना वापरू देणे त्यांना महत्त्वाचे वाटते.

क्राऊड सोर्सिंगकडून म्हणजे बहुजनांकडून मिळणाऱ्या नव्या कल्पना, पेटंटची कालबाह्यता, सामूहिक ज्ञानाची (Collective Brain) संकल्पना, ज्ञानी उद्योजकाला पेन्शन फंड्‌स, व्हेन्चर फंड्‌स, क्राऊड फंडिंग याकडून मिळणारे भांडवल यामुळे उत्तर भांडवलशाहीतला (Post Capitalist) आणि उत्तर बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या काळातला (Post Multi national Corporates) असा नवसमाजवादी (Neo Socialist) समाज आता जागतिक स्तरावर अवतरतो आहे. त्याचे ऊर्ध्वबाहूर्विरोम्येष्य (दोन्ही हात उंच उभारून) स्वागतच केले पाहिजे.

Tags: पुस्तक मॅट रिडले दत्ता दामोदर नायक Matt Ridley Book Rational Optimist Datta Damodar Nayak weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

दत्ता दामोदर नायक,  गोवा
kdnaik@cdhomes.com


प्रतिक्रिया द्या