डिजिटल अर्काईव्ह (2014-2019)

डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृति पुरस्कार

तर्कशील सोसायटी पंजाब

पंजाबमधील बर्नाला या जिल्ह्याच्या ठिकाणी तर्कशील सोसायटीचे मुख्यालय आहे. पंजाबमधील सर्व २२ जिल्ह्यांत मिळून तर्कशीलच्या ८० शाखा असून, दोन हजारांहून अधिक कार्यकर्ते त्यांच्याशी जोडलेले आहेत. हरियाणा, हिमाचल प्रदेश, राजस्थान व दिल्ली या राज्यांमध्येही तर्कशीलच्या काही शाखा कार्यरत आहेत. या सोसायटीच्या वतीने ‘तर्कशील’ व ‘तर्कबोध’ ही दोन नियतकालिके प्रकाशित होतात. पन्नासहून अधिक पुस्तके तर्कशीलने प्रकाशित केली आहेत. लेख, मुलाखती, व्याख्याने, चर्चासत्रे, परिषदा, नाटक, जादूचे प्रयोग इत्यादी माध्यमांतून विवेकी जीवनशैलीचा प्रचार-प्रसार करीत असतानाच ज्योतिषी व भोंदू बुवांचे ढोंग उघडे पाडण्याचे कामही तर्कशील सोसायटी करीत आली आहे. 

प्रश्न - पंजाबमध्ये ‘तर्कशील’च्या कार्याची सुरुवात कशी झाली?

- बात १९८४ की हैं। जब पुरे पंजाबमें खलिस्तान मूव्हमेंटने जोर पकडा था। खलिस्तान चळवळीमुळे संपूर्ण पंजाब अशांत होता. भिंद्रनवालेकडून धर्माच्या नावावर तरुणांना भडकावले जात होते. हा धर्माचा अतिरेक लोक उघड्या डोळ्यांनी पाहत होते; त्याविरोधात बोलण्याची कोणाची हिंमत होत नव्हती. कारण त्यांच्या डोक्यात धर्माचे खूळ आणि हातात बंदुका होत्या. स्वतंत्र खलिस्तानच्या मागणीसाठी तरुणांना चिथावले जात होते. अशा कडव्या धार्मिक वातावरणाचा पंजाबी जनतेला तिटकारा आला होता. धर्माच्या नावाने चालणाऱ्या या भिंद्रनवालेच्या उच्छादाला लोक कंटाळले होते. सर्वसामान्यांना हे धर्माचे हिंसक रूप मान्यच नव्हते. लोक एका नव्या पर्यायाच्या शोधात होते. त्यातच बर्नाला येथील काही बुद्धिवादी युवकांच्या हाती सुप्रसिद्ध बुद्धिवादी आणि भारतातील अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीचे पितामह डॉ.अब्राहम कोवूर यांचे ‘Begone Godmen’ हे पुस्तक पडले. त्यांनी त्याचा पंजाबी अनुवाद ‘और देवपुरुष हार गये।’ या नावाने केला. या पुस्तकाचा प्रचार पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणात झाला. या पुस्तकात लिहिल्याप्रमाणे आमच्या पंजाबमध्येही अशा प्रकारच्या अंधश्रद्धा होत्या. पंजाबी जनतेचा भूत-भानामती, अतिंद्रिय शक्तीवर मोठा विश्वास होता. याच विषयावर काम करायचे, असे आम्ही बुद्धिवादी मित्रांनी ठरविले. या पुस्तकाच्या आधारे हरदीप टपेवाल, जीवन लाल साहिना, नरेन्द्र पिंडी, तेजिंदर शहरी, सूरजीत तलवार, मेघराज मित्र, अनुराग अरोही, अजमेर पलकडा या बुद्धिवादी तरुणांनी गावोगावी जाऊन अंधश्रद्धा निर्मूलनावर भाषणे द्यायला सुरुवात केली. या वेगळ्या विचाराकडे पंजाबमधील काही पुरोगामी तरुण ओढले गेले. १६ ऑगस्ट १९८६ रोजी माझ्या भदौठ गावी संघटनेचे संविधान आणि घोषणापत्र तयार करण्यासाठी निवडक कार्यकर्त्यांची बैठक बोलवली. या बैठकीत ठरल्यानुसार बर्नाला येथे ‘तर्कशील सोसायटी पंजाब’ची अधिकृत स्थापना केली गेली. ‘तर्कशील’ याचा अर्थ ‘विवेकवादी’. पंजाबमधील आमच्या कामाच्या प्रारंभास डॉ. कोवूरांचे पुस्तक कारणीभूत ठरले.

प्रश्न - सुरुवातीच्या काळात या कार्याचा प्रचार-प्रसार आपण कसा केला?

- प्रथम तर्कशील विचारांच्या युवकांच्या आम्ही गावोगावी बैठका घेतल्या. डॉ.कोवूरांच्या पुस्तकावरून भाषणे देण्यास सुरुवात केली. त्यावेळी पंजाबात भुताने झपाटणे, भानामतीमुळे घराला आग लागणे, अशा घटना मोठ्या प्रमाणात घडायच्या. तेव्हा आमचे कार्यकर्ते या घटनांमागचे कारण शोधण्यासाठी गावोगावी जायचे. या घटनेमागचे सत्य शोधायचे. या घटना दैवी शक्तीमुळे न घडता कोणत्या तरी अतृप्त माणसाद्वारेच घडविल्या जातात हे सत्य लोकांसमोर आणायचे. या प्रकारच्या कामाला पंजाबच्या वर्तमानपत्रांनी चांगली प्रसिद्धी दिली. त्यामुळे आम्ही दखलपात्र झालो.

प्रश्न - सुरुवातीच्या काळात हे काम करताना आपणास धर्मांध शक्तींकडून कसा विरोध झाला?

- मी अगोदर सांगितल्याप्रमाणे आमचे हे कार्य पंजाबमध्ये खलिस्तान चळवळ सक्रिय असतानाच सुरू झाले होते. त्यामुळे साहजिकच या खलिस्तानवादी मंडळींकडून आम्हाला प्रखर विरोध सुरू झाला. ते आमच्याविषयी अपप्रचार करायचे की, ‘ये तर्कशीलवालें परमात्माकों नहीं मानते। ये अपने सीख धर्मके खिलाफ हैं।’ हे नास्तिक आहेत, यांच्या कार्यक्रमाला जाऊ नका. अभद्र काही ऐकू नका. धर्मविरोधी ऐकल्यामुळे तुम्ही नरकात जाल, अशी भीती लोकांना घालायचे. त्यांच्या या चिथावणीमुळे आमच्या कार्यक्रमाला लोक यायचे नाहीत. कारण त्यांना खलिस्तानवाल्यांच्या बंदुकीची भीती होती. तरीही आम्ही हे काम धाडसाने, चिकाटीने सुरूच ठेवले. आम्हाला आमच्या भाषणांच्या वेळी सशस्त्र पहारा ठेवायला लागायचा. आमचे परवानाधारक बंदुकधारी कार्यकर्ते आमच्या कार्यक्रमांना संरक्षण द्यायचे. आम्ही शहीद ए आझम भगतसिंगाचाच क्रांतिकारी वैचारिक वारसा पुढे चालवतोय असा विचार मांडायचो. तेव्हा लोकांना आमचे म्हणणे पटायचे.

प्रश्न - सध्या आपल्या संघटनेचे स्वरूप कसे आहे, संघटनेत कोण काम करू शकतं?

- तर्कशील सोसायटी पंजाब ही आमची संघटना संपूर्ण विवेकवादावर उभी आहे. लोकांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रूजविणे, धार्मिक प्रथा-परंपरांची चिकित्सा करणे याबद्दल लोकांच्यात जागृती करणे, असा आमचा कार्यक्रम असतो. हा विचार मानणारा कोणीही आमचा कार्यकर्ता होऊ शकतो; परंतु हा कार्यकर्ता नशापान न करणारा असावा, जात-धर्म-गोत्र न मानणारा असावा, अशा आमच्या काही अटी आहेत. सध्या पंजाबमध्ये दहा झोनमध्ये आमची ८० युनिट्‌स कार्यरत आहेत. आमचे मुख्यालय बर्नाला येथे आहे. या युनिट्‌सद्वारे ८०० कार्यकर्ते सक्रियपणे काम करतात. २० लोकांची राज्य कमिटी आहे. पंजाबबरोबरच शेजारच्या हरियाणा, जम्मू या राज्यांत शाखा आहेत. त्याचबरोबर देशाबाहेर कॅनडा, न्युझिलंड, बर्निंगहॅम आणि इंग्लंड येथेही तर्कशीलच्या शाखा आहेत. हे सर्व काम कार्यकर्ते नि:स्पृहपणे, विनामोबदला करतात. आपला व्यवसाय, नोकरी सांभाळून उरलेला वेळ या सामाजिक कामासाठी देतात. आमच्या संघटनेत शिक्षकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मीसुद्धा निवृत्त शिक्षकच आहे. निवृत्तीनंतर पूर्णवेळ तर्कशीलचे काम करतोय.

प्रश्न - तर्कशील सोसायटीच्या विविध उपक्रमांबद्दल

थोडक्यात माहिती द्या?

- या संघटनेद्वारे विविध विभाग चालविले जातात. त्यामध्ये तर्कशील मासिक, तर्कशील प्रकाशन, मानसिक मशवरा केंद्र, तर्कशील सांस्कृतिक फ्रंट इत्यादींचा समावेश आहे.

तर्कशील मासिक - आम्ही ज्यावेळी काम सुरू केले, त्यावेळी आमच्या विचाराचा प्रसार करण्यासाठी आम्हाला मासिकाची गरज वाटली म्हणून आम्ही बर्नाला येथूनच ‘तर्कशील’ या नावाचे पंजाबी भाषेमध्ये द्वैमासिक सुरू केले. सुरुवातीला आम्ही याच्या दोन हजार प्रती काढल्या. यामध्ये आम्ही वैचारिक लेख, जादूचे प्रयोग, आम्ही सोडविलेल्या भानामतीच्या केसेस, आमच्या कार्यक्रमांचे रिपोर्ट प्रसिद्ध करत असू. सध्या या मासिकाला मोठ्या प्रमाणात पंजाबमध्ये मागणी आहे. याचा खप १५ हजार प्रती असा आहे. अंबालामधून हिंदी भाषेमध्ये आम्ही ‘तर्कशील पथ’ या नावाने द्वैमासिक काढतो. आमच्या पंजाबी मासिकातील लेख हिंदीमधून प्रसिद्ध करतो. याचा खप सध्या तीन हजार प्रती आहे.

तर्कशील प्रकाशन - तर्कशील विचारांचा प्रचार करण्यासाठी आमच्या विविध कार्यकर्त्यांनी ५० पुस्तके लिहिली आहेत. यामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन, जातीप्रथा, धर्मचिकित्सा, ज्योतिष, व्यसनमुक्ती, कथा-कवितासंग्रह इत्यादींचा समावेश आहे. आम्ही एका बोलेरो गाडीवर  सजावट करून ‘तर्कशील बुकव्हॅन’ तयार केलीय. ही गाडी शाळा-शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांपर्यंत या ग्रंथांचा प्रचार करते. या गाडीसोबत आम्ही एक ड्रायव्हर व एक कार्यकर्ता पगारी ठेवला आहे. गेल्या दोन वर्षांत जवळजवळ आम्ही १० लाखांची पुस्तक विक्री केली. आम्ही पुस्तकांच्या किमती कमी ठेवल्यात, त्यामुळे सर्वसामान्य जनतेला पुस्तक विकत घेऊन वाचता येतात.

मनोरोग मशवरा केंद्र - जेव्हा गावामध्ये जाऊन भुताने झपाटणे, भानामतीने आगी लागणे अशा केसेस हाताळायचो, सोडवायचो तेव्हा आमच्या असे लक्षात यायचे की, हे लोक सौम्य मानसिक आजाराने पीडित आहेत, त्यांना मानसिक आधाराची गरज आहे; पण त्यावेळी पंजाबमध्ये मानसोपचारतज्ज्ञांची कमतरता होती, म्हणून हे लोक तांत्रिकांकडे जायचे, त्यातून तांत्रिक त्यांची आर्थिक लुबाडणूक करायचे. या सर्वांवर उपाय म्हणून आम्हीच ‘मानसिक आरोग्य आधार केंद्र’ सुरू केले. आमचे पहिले केंद्र भटिंडाजवळ बरगाडी येथे कृष्ण बरगाडी यांनी त्यांचे घरीच सुरू केले. हे केंद्र अल्पावधीतच लोकप्रिय झाले. मानसिक रुग्णावर आमचे कार्यकर्ते समुपदेशन करायचे. गंभीर मानसिक आजार झाला असल्यास मोठ्या डॉक्टरांच्याकडे जाण्याचा सल्ला द्यायचे. रुग्णांना तर्कशील विचारांची पुस्तके वाचायला द्यायचो. हे सर्व काम विनामोबदला केले जायचे. या कामासाठी कृष्ण बरगाडी यांनी स्वत:ची जमीन उपलब्ध करून दिली. या जमिनीवर आम्ही कार्यकर्त्यांनी पैसे गोळा करून आधारकेंद्राची इमारत बांधली. अशी आधारकेंद्रे सध्या जालंधर, अमृतसर, भटिंडा, मुक्तसर, कुरूक्षेत्र या ठिकाणी सुरू आहेत. आजपर्यंत हजारो रुग्णांनी आमच्या मानसिक आधार केंद्रात मोफत उपचार घेतले असतील.

तर्कशील मेला - पंजाबमध्ये ‘धार्मिक मेला’ची (उत्सवांची) जुनी परंपरा आहे. याच धर्तीवर आम्ही आमचा ‘तर्कशील मेला’ सुरू केलाय. याचे स्वरूप असे असते- एखाद्या ग्रामीण भागात जाऊन आमचे कार्यकर्ते मंडप घालतात. त्यामध्ये लोकांना एकत्र करून पंजाबी नृत्य, पुरोगामी पंजाबी नाटके, लोकगीताच्या चालीवर बुद्धिवादी गाणी सादर केली जातात. त्याचबरोबर लोकांना जादूचे प्रयोग दाखविले जातात. आमचे काही कार्यकर्ते विविध विषयांवर व्याख्याने देतात, या ठिकाणीच पुस्तके विक्री करतात, दिवसभर हा तर्कशील मेला चालतो. हजारो लोक यामध्ये सामील होतात. अशा पद्धतीने दरवर्षी शेकडो तर्कशील मेले पंजाबमध्ये आमचे कार्यकर्ते आयोजित करतात.

तर्कशील सांस्कृतिक फ्रंट - पंजाबमध्ये कोणताही सार्वजनिक समारंभ पारंपरिक नृत्ये, लोकगीताशिवाय पूर्ण होऊ शकत नाही. तो आमच्या संस्कृतीचा भाग आहे. त्याचाच धागा पकडून आम्ही आमच्या प्रबोधन कार्यक्रमात सांस्कृतिक बाबींचा अंतर्भाव केला. पंजाबमधील प्रसिद्ध लोकनाटककार गुरशरणसिंग यांनी डॉ.अब्राहम कोवूर यांच्या पुस्तकावर ‘और देवपुरुष हार गये।’ हे परखड नाटक लिहिले. या नाटकाचे शेकडो प्रयोग आम्ही पंजाबमध्ये केले. या नाटकाची भाषा, संवाद अत्यंत सोपे असल्यामुळे पंजाबी जनतेने या नाटकाला भरपूर प्रेम दिले. त्यांच्या आमच्या कार्यकर्त्यांना नाटकाचे प्रशिक्षण घेतले. त्यामुळेच तर्कशील सांस्कृतिक फ्रंट सक्रिय आहे.

तर्कशील भवन - संघटनेच्या कामाचा व्याप वाढल्यामुळे आम्हाला एका सुसज्ज कार्यालयाची गरज भासू लागली. एका उदार दात्याने आम्हास बर्नाला येथे प्लॉट दिला. या प्लॉटवर आम्ही ‘तर्कशील भवन’ उभे करतोय. यामध्ये एक मोठे सभागृह, सुसज्ज ग्रंथालय, आमच्या विविध विभागांची कार्यालये एकत्र असतील.

प्रश्न - आपल्या कार्यामुळे समाजात काय बदल झालाय?

- हम मानते हैं की, ‘समाज बदलाव की शुरुवात खुदसें होतीं है।’ त्यामुळे आमचे कार्यकर्ते स्वत:च्या जीवनाचा विचार विवेकवादी पद्धतीने करतात. लग्न कमी खर्चाची, गुरूद्वारामध्ये माथा न टेकता करतात. वैयक्तिक जीवनात कोणत्याही प्रकारची नशा करत नाहीत. आमच्या कार्यकर्त्याकडे समाज बघत असतो. या बदलातून समाजाला परिवर्तनाची प्रेरणा मिळते. आज तर्कशील विचारांची हजारो कुटुंबे पंजाबमध्ये तयार झाली आहेत. भगतसिंगांचा पुसत चाललेला क्रांतिकारी पुरोगामी विचार आम्ही पुन्हा उमलवत आहोत. हीच खरी समाज बदलाची नांदी आहे. भगतसिंग असे म्हणायचे की, ‘धार्मिक अंधविश्वास एवं कट्टरता हमारी प्रगती के मार्गमें बडी बाधा है।’ ही बाधा दूर करण्यात आम्ही यशस्वी होत आहोत. आमच्या कार्यामुळे पूर्वीसारख्या अघोरी घटना, भूत- भानामती, तंत्र-मंत्रांनी रोग बरे करणारे बाबा बऱ्याच प्रमाणात कमी झालेत.

प्रश्न - दैवीशक्तीने चमत्कार सिद्ध करणाऱ्यास आपले पाच लाख रुपयांचे जाहीर आव्हान आहे ना, त्याविषयी सांगा?

- डॉ.अब्राहम कोवूर यांनी जसे रुपये एक लाखाचे बुवा-बाबांना आव्हान ठेवले होते, तसेच आम्ही पाच लाखांचे आव्हान ठेवले आहे. जगात चमत्कार होत नाहीत; परंतु काही लोक चमत्कार करण्याचा दावा करून लोकांना फसवतात. बुवा-बाबा-तांत्रिक, ज्योतिषी यांनी आमच्या आव्हानातील २३ गोष्टींपैकी कोणतीही एक गोष्ट सिद्ध करून दाखवावी. त्यासाठी त्यांना आमच्याकडे एक हजार रुपयांची अनामत रक्कम जमा करावी लागते. मगच आम्ही अधिकृतपणे आव्हान प्रक्रिया पार पाडतो.

प्रश्न - हे आपले आव्हान आजपर्यंत कोणी स्वीकारले आहे का?

- हो, सुरुवातीच्या काळात तीन लोकांनी एक हजार रुपये अनामत रक्कम भरून हे आव्हान स्वीकारले. पण तिघांचीही त्यात हार झाली. १९८६ मध्ये संगरूर जिल्ह्यातील एका तांत्रिक बाबाने आपल्या समोर बसलेल्या व्यक्तीला मंत्रशक्तीने ठार मारू शकतो असा दावा केला. या बाबाला आमचे कार्यकर्ते दलजीत महला यांनी जाहीर आव्हान दिले. त्या बाबाच्या गावीच आव्हानप्रक्रिया पार पाडायची ठरली. मंत्रशक्तीने मरू शकतो हा चमत्कार पाहण्यासाठी पंचक्रोशीतील गावकऱ्यांनी गर्दी केली. त्याच्या भक्तांना असा विश्वास होता की, आपल्या बाबाच्या अंगात अघोरी शक्ती आहे. आव्हानाच्या दिवशी तो बाबा स्टेजवर आलाच नाही, तो गाव सोडून पळून गेला. त्यामुळे चिडलेल्या गर्दीने त्याच्या घरावर हल्ला केला.

- भठिंडा जिल्ह्यातील धिंगड या गावातील एका स्वयंघोषित महिला तांत्रिकाने दैवीशक्तीने बंद कुलूप चावीशिवाय खोलण्याचे आव्हान दिले. आव्हानाच्या दिवशी तिने दोन तास मंत्र पुटपुटायचे नाटक केले; पण कुलूप काही केल्या उघडेना. तिने यासाठी अजून काही वेळ मागितला; पण पंचांनी नकार दिला आणि तिची हार घोषित केली. तिने दिलेली अनामत रक्कम आम्ही त्या गावच्या विकासासाठी पंचायतीकडे सुपूर्द केली.

- बर्नाला जिल्ह्यातील एका बाबाने तर एक मजेशीर चमत्कार दाखविण्याचे आव्हान दिले. गर्दीमध्ये फिरणाऱ्या कोणत्याही व्यक्तीच्या पगडीच्या गाठी तो मंत्रशक्तीने आपोआप खोलू शकतो.  त्याचे हे आव्हान आम्ही स्वीकारून त्याच्या गावी गेलो. चमत्कार सिद्ध करण्यासाठी तो स्टेजवर भरपूर दारू पिऊन आला. काही मंत्र पुटपुटायला लागला; पण पगडीच्या गाठी काही सुटेनात. माझी मंत्रशक्ती तर्कशील कार्यकर्त्यांमुळे कमी झालीय, असे म्हणून त्याने स्टेजवरून धूम ठोकली.

प्रश्न - नव्या पिढीत तर्कशील विचार

रूजविण्यासाठी आपण काय करता?

- विद्यार्थ्यांमध्ये तर्कशील विचार पोचविण्यासाठी आम्ही जाणीवपूर्वक काही गोष्टी करतो. आमची ‘तर्कशील बुक व्हॅन’ ही शाळाशाळांमध्ये जाऊन मुलांपर्यंत वैज्ञानिक बालसाहित्य पोचवत असते. आमच्या संघटनेमध्ये शिक्षकांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे ते आम्हाला सहजसाध्य होते. गेल्या दोन वर्षांपासून आम्ही मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविण्यासाठी ‘शहीद भगतसिंग चेतना परीक्षा’ घेत आहोत. २०१७ मध्ये पाच हजार विद्यार्थ्यांनी यात भाग घेतला होता. यावर्षी २०१८ ला ‘शहीद उधमसिंग व ज्येष्ठ शास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग चेतना परीक्षा’ घेतली. त्यास तब्बल १० हजार विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्यात आमच्या कार्यकर्त्यांना यश आले. या परीक्षाद्वारे हे विद्यार्थी वैचारिक साहित्य वाचतात. त्या साहित्याची त्यांच्या घरात चर्चा होते आणि आपला विचार घराघरांपर्यंत पोचला जातो.

प्रश्न - धर्म आणि शिक्षण याबाबत आपली काय भूमिका आहे?

- कार्ल मार्क्सने म्हटल्याप्रमाणे ‘धर्म ही एक अफूची गोळी आहे.’ आमचाही हाच विचार आहे. धर्म हा राज्यसत्तेला जोडला तर राज्यसत्तेचे आयुष्य कमी होते. आजच्या शिक्षणप्रणालीकडून मुलांमध्ये चिकित्सक दृष्टी आणि धर्मनिरपेक्षता निर्माण व्हावी, अशी अपेक्षा आहे; परंतु काही स्वार्थी राजकारणी मंडळी आपल्या मताच्या फायद्यासाठी या शिक्षणक्षेत्रावर धर्माचा प्रभाव आणू पाहत आहेत. हे नव्या पिढीसाठी अत्यंत धोकादायक आहे. याविरोधात देशभरातून संघटितपणे आवाज उठवला गेला पाहिजे. आमचं असं म्हणणं आहे की, धर्म आणि शिक्षण या दोन गोष्टी वेगळ्या ठेवल्या पाहिजेत.

प्रश्न - आपले कार्यकर्ते स्वत:च्या नावापुढे आडनाव का लावत नाहीत?

- आमचं असं म्हणणं आहे की, भारतात आडनाव हे स्वत:ची जात, गोत्र प्रदर्शित करण्याचे प्रतीक आहे. पंजाबमध्ये आपले गोत्र नावापुढे लावतात. आम्ही तर तर्कशीलचे कार्यकर्ते, गोत्र, जात-पात न मानणारे आहोत. सिंग हे नाव एका विशिष्ट धर्माचे प्रतिनिधित्व करते, म्हणून ते आम्ही आमच्या नावापुढे लावत नाही. तर आमच्या स्वत:च्या गावाचे नाव आमच्या नावापुढे लावतो जसे की, माझे नाव राजेन्द्र भदौठ आहे. ‘भदौठ’ हे माझे गाव आहे. आडनाव न लावण्याने आम्ही जात-पात मानत नाही, असा संदेश जनतेला देत असतो.

प्रश्न - डॉ.नरेंद्र दाभोलकरांच्या खुनानंतर आपण पंजाबमध्ये मोठे आंदोलन केले होते, असं ऐकलंय, त्याविषयी सांगा.

- सन २००० मध्ये डॉ.दाभोलकरांनी आम्हाला महाराष्ट्र अंनिसचे काम पाहण्यासाठी इचलकरंजीला बोलविले होते. त्यावेळी आमचे त्यावेळचे अध्यक्ष भुरासिंग, रामसुवर्ण लख्खेवाली इत्यादी कार्यकर्ते अंनिसच्या परिषदेसाठी आले होते. अंनिसची भव्य परिषद पाहून आम्ही भारावून गेलो होतो. परिषदेनंतर झालेल्या अंनिसच्या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीलाही आम्ही उपस्थित होतो. ‘अंनिस’ विविध विभागांद्वारे जे काम करते, तसेच संघटना बांधणीचे काम करते, ते आम्ही परत पंजाबला जाऊन सुरू करण्याचे ठरविले. त्यामुळे आम्ही अंनिसप्रमाणेच तर्कशील सोसायटीचे विविध विभाग पाडले. त्याची जबाबदारी त्या-त्या विभागाच्या प्रमुखाकडे दिली. खरं तर यामुळे आमच्या कामात सुसूत्रता आली. याचे श्रेय डॉ.दाभोलकरांच्याकडेच जाते. २० ऑगस्ट २०१३ रोजी डॉ.दाभोलकरांचा खून झाल्यानंतर तर्कशील सोसायटीच्या वतीने जालंधर येथे तीन हजार लोकांचा भव्य मोर्चा काढला. असा मोर्चा जालंधरमध्ये गेल्या २० वर्षांत झाला नव्हता. त्यानंतर आम्ही दाभोलकरांचा फोटो असणारे कॅलेंडर प्रसिद्ध केले. याच्या १० हजार प्रती पंजाबच्या गावागावांत पोचविल्या. तर्कशील मासिकाचा ‘दाभोलकर विशेषांक’ प्रसिद्ध केला. दाभोलकरांच्या स्मरणार्थ दरवर्षी आम्ही २० ऑगस्टला ‘मॅगझिन डे’ साजरा करतो. या दिवशी आमचे कार्यकर्ते घरोघरी जाऊन तर्कशील मासिकाचा प्रचार करतात, विक्री करतात. गेल्या वर्षी २० ऑगस्टला आम्ही १० हजार मासिकांची विक्री केली. दाभोलकरजींना आम्ही ‘तर्कशील लहर कें नायक’ मानतो.

प्रश्न - डॉ.दाभोलकर यांच्या नावाचा पुरस्कार आपल्याला मिळतोय याप्रसंगी आपली काय भावना आहे?

- महाराष्ट्रात डॉ.दाभोलकरांनी संघटित पद्धतीने अंधश्रद्धा निर्मूलन समितीद्वारे जे प्रचंड काम उभे केले आहे, याच कामाची प्रेरणा घेऊन आम्ही पंजाबमध्ये आम्हाला शक्य होईल तेवढे हे काम करतोय. पंजाबमध्ये आता या कामाला तसा विरोध होत नाही. परंतु या कामाला सुधारणावादी महाराष्ट्रामध्ये विरोध होतोय, याचे आम्हाला सखेद आश्चर्य वाटते. हा विरोध खुनापर्यंत जाईल याची आम्ही स्वप्नातही कल्पना केली नव्हती; पण धर्मांधांनी हे काम केले. डॉ.दाभोलकरांच्या खुनानंतर आमचे या कामातील पितामह गेले, अशी आमची भावना झाली. आमच्या कामाची पावती म्हणून आमच्या ‘पितामह’च्या नावाचा पुरस्कार आमच्या संघटनेला मिळतोय, याचा आम्हाला मनस्वी आनंद होत आहे; पण यातून आम्हाला एक दडपण पण आलंय, पुढील काळात दाभोलकरांच्यासारखं आपण काम करू शकू का, याचं. सध्या जे देशात धर्माच्या नावानं लोकांना चिथावण्याचं काम सुरू आहे, लोकांमध्ये फूट पाडण्याचं काम सुरू आहे, अशा काळात आम्हास हा पुरस्कार मिळतोय, याचंही भान आम्हास आहे. शेवटी एवढंच सांगतो, या पुरस्कारामुळे आम्हाला अजून जोमाने काम करण्याची प्रेरणा मिळालीय. ‘दाभोलकरजी का अधुरा काम हम पुरा करेंगे। ये विश्वास हम आपको देते है।’

(संवादक : राहुल थोरात)

मुलाखत सहाय्य :

रामसुवर्ण लख्खेवाली (सहसंपादक, तर्कशील पंजाबी)

गुरमीत अंबाला (सहसंपादक, तर्कशीलपथ हिंदी)

Tags: interview andhshradhha nirmulan rajindar badhouth tarkshil society Punjab barnala dr. narendra dabholkar smruti purskar Maharashtra foundation awards 2018 Maharashtra foundation purskar 2018 मुलाखत अंधश्रद्धा निर्मूलन राजिंदर बधौठ तर्कशील सोसायटी पंजाब बर्नाला डॉ नरेंद्र दाभोळकर स्मृति पुरस्कार महाराष्ट्र फ़ौंडेशन पुरस्कार २०१८ weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक

राजिंदर भदौठ,  बर्नाला, पंजाब

अध्यक्ष, तर्कशील सोसायटी पंजाब


प्रतिक्रिया द्या