डिजिटल अर्काईव्ह (2014-2019)

माजी पंतप्रधानांकडून विद्यमानाचे परीक्षण

अर्थातच, नरेंद्र मोदींचे विरोधक व त्यांचे समर्थक यांनी आतापर्यंत जे काही मूल्यमापन केले आहे, त्या दिशेत निवडणुकीनंतरही विशेष फरक पडणार नाही. मात्र विद्यमान पंतप्रधानांचे माजी पंतप्रधानांकडून कशाप्रकारे मूल्यमापन केले जाईल, याला विशेष महत्त्व असणार आहे. त्यातही मनमोहनसिंग यांना मोदींच्या आधीची सलग दहा वर्षे पंतप्रधान म्हणून काम करण्याची संधी मिळाली, त्यामुळे त्यांनी केलेल्या मूल्यमापनाला जास्तीचे महत्त्व राहणार आहे.

2014 च्या लोकसभा निवडणुकीत पूर्ण बहुमत मिळवून सत्तेवर आलेल्या नरेंद्र मोदी सरकारला आता पाच वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यांना आणखी एकदा कौल मिळून सत्ता स्थापण्याची संधी मिळणार की, विरोधी पक्षनेतेपद स्वीकारावे लागणार याचा निर्णय पुढील आठवड्यात लागणार आहे. त्यामुळे त्यांच्या पाच वर्षांच्या कारकिर्दीचे मूल्यमापन करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, निवडणूक निकालानंतर ती प्रक्रिया अधिक गतिमान होईल. 

अर्थातच, नरेंद्र मोदींचे विरोधक व त्यांचे समर्थक यांनी आतापर्यंत जे काही मूल्यमापन केले आहे, त्या दिशेत निवडणुकीनंतरही विशेष फरक पडणार नाही. मात्र विद्यमान पंतप्रधानांचे माजी पंतप्रधानांकडून कशाप्रकारे मूल्यमापन केले जाईल, याला विशेष महत्त्व असणार आहे. त्यातही मनमोहनसिंग यांना मोदींच्या आधीची सलग दहा वर्षे पंतप्रधान म्हणून काम करण्याची संधी मिळाली, त्यामुळे त्यांनी केलेल्या मूल्यमापनाला जास्तीचे महत्त्व राहणार आहे. शिवाय, आज 86 वर्षांचे असलेले मनमोहनसिंग शारीरिक व मानसिक दृष्टीने तंदुरुस्त आहेत, आणि मुख्य म्हणजे मागील पाच वर्षे ते केंद्र सरकारचा कारभार व देशाची वाटचाल याचे बारकाईने निरीक्षण करीत आले आहेत. 

मनमोहनसिंग हे अर्थतज्ज्ञ होते, त्यांचे व्यक्तिमत्त्व सौम्य होते, परंतु त्यांना प्रशासनाचा आणि सत्तेच्या आतील वर्तुळात काम करण्याचा अनुभव जवळपास चार दशकांचा होता. 1991 नंतरची 25 वर्षे तर ते सक्रिय राजकारणातही होते. त्यामुळे ‘केवळ अर्थतज्ज्ञ व सोनिया गांधींनी नियुक्त केलेला माणूस’ अशी त्यांची संभावना करणे पोरकटपणाचे ठरते. मनमोहनसिंग यांनी मोदींच्या कारकिर्दीतील पूर्वार्धावर कठोर टीका केल्याचे दिसले नव्हते. कारण विद्यमान पंतप्रधानांचा आणि त्या पदाचा आब राखला पाहिजे, अशी ती भूमिका होती. मात्र 8 नोव्हेंबर 2016 रोजी पंतप्रधान मोदींनी डिमॉनिटायझेशनचा निर्णय जाहीर केल्यानंतर, लोकसभेत केलेल्या सहा मिनिटांच्या भाषणात मनमोहनसिंग यांनी जोरदार तोफ डागली. त्या निर्णयाचे वर्णन ‘संघटित लूट’ आणि ‘स्वातंत्र्योत्तर काळातील सर्वांत मोठा घोटाळा’ असे केले. त्यानंतरच्या अडीच वर्षांतही त्यांनी वेळप्रसंगी मोदींच्या कारभारावर टीका केली आहे. मात्र गेल्या आठवड्यात मनमोहनसिंग यांनी ‘पीटीआय’ला दिलेली मुलाखत मोदी सरकारचे परीक्षण म्हणता येईल अशी आहे. 

‘स्वातंत्र्योत्तर काळातील सर्वांत मोठा घोटाळा’ या आपल्या वर्णनाचा त्यांनी या मुलाखतीत पुनरुच्चार केला आहे. मोदी सरकारने आर्थिक आघाडीवर केलेले दावे कसे फोल आहेत, हे संदर्भांसह सांगितले आहे. परराष्ट्र धोरण, भारत-पाकिस्तान संबंध, लष्करी ताकद व अणुसामर्थ्य या चारही आघाड्यांवर मोदी सरकारकडून जो डांगोरा पिटला जातोय तो खोटा आहे, हे सप्रमाण दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. एवढेच नव्हे तर मोदींनी आपल्या वर्तनातून पंतप्रधानपदाची शान घालवली आहे, असे नि:संदिग्धपणे म्हटले आहे. मनमोहन यांच्या त्या संपूर्ण मुलाखतीचा अनुवाद साधनाच्या पुढील अंकात प्रसिद्ध होईल. 

मात्र सभ्य व सुसंस्कृत अर्थतज्ज्ञ असलेल्या माजी पंतप्रधानांनी विद्यमान पंतप्रधानांचे केलेले जे परीक्षण आहे, त्याचा निष्कर्ष असा आहे की, ‘नीतीमूल्ये व विधीनिषेध न बाळगणाऱ्या व्यापारी वृत्तीचे पंतप्रधान आपल्याला लाभले आहेत.’ त्यामुळे पंतप्रधानपदाचे झाले तेवढे अवमूल्यन पुरे, की आणखी अवमूल्यन होणे बाकी आहे, हे समजण्यासाठी 23 मे पर्यंत प्रतिक्षा करणे आले.                         
 

Tags: नरेंद्र मोदी मनमोहनसिंग Manmohan Singh Narendra Modi prime minister weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके

कर्तव्य

सर्व पहा