डिजिटल अर्काईव्ह (2014-2019)

महाराष्ट्रातील निवडणूक प्रचार : चार वैशिष्ट्ये

प्रत्येक निवडणुकीच्या काळात तिकीट न मिळालेल्यांनी बंडखोरी करणे आणि अपक्ष म्हणून निवडणुकीला उभे राहणे हा प्रकार पूर्वीपासून प्रचलित आहे, परंतु या वर्षी त्यात महत्त्वपूर्ण बदल पहायला मिळाला. बंडखोरांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्यापेक्षा अन्य पक्षात जाणे पसंत केले.

देशातील सार्वत्रिक लोकसभा निवडणुका सात टप्प्यांत होणार आहेत आणि 23 मे रोजी मतमोजणी होणार आहे. पण महाराष्ट्रातील निवडणुका चार टप्प्यांत झाल्या आहेत आणि हा अंक छापायला गेला त्या दिवशी (29 एप्रिल) मतदानाचा चौथा टप्पाही पार पडला. म्हणजे पुढील तीन आठवडे देशातील प्रचाराची रणधुमाळी चालू असेल, पण महाराष्ट्रात शांतता असेल. प्रत्येकच निवडणुकीची अशी काही वैशिष्ट्ये असतात, तशी ती या निवडणुकीचीही सांगता येतील. 

पहिले वैशिष्ट्य म्हणजे, या निवडणुकीच्या काळात राज्यात मोठ्या जाहीर सभा फारच कमी झाल्या. कोणत्याही पक्षाकडे स्टार प्रचारक नाहीत, असे यावेळी तीव्रतेने जाणवले. काँग्रेस पक्षाकडे अशोकराव आणि पृथ्वीराज, भाजपकडे नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस आहेत, राष्ट्रवादी काँग्रेसकडे शरदराव पवार आहेत आणि शिवसेनेकडे उद्धव ठाकरे. परंतु यापैकी कोणाच्याही सभा पूर्वीप्रमाणे टोलेजंग झालेल्या नाहीत. जनतेने सभांना गर्दी न करण्याचे मुख्य कारण ‘सोशल मीडिया’वरून होणारा प्रचार असे सांगितले जाते ते खरेच आहे. पण सर्वच नेत्यांच्या भाषणांतील आशय अतिपरिचयाचा होणे आणि मोठ्या नेत्यांच्या भोवतीचे वलय फिकट होणे, ही दोन कारणेही महत्त्वाची आहेत. 

दुसरे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक निवडणुकीच्या काळात तिकीट न मिळालेल्यांनी बंडखोरी करणे आणि अपक्ष म्हणून निवडणुकीला उभे राहणे हा प्रकार पूर्वीपासून प्रचलित आहे, परंतु या वर्षी त्यात महत्त्वपूर्ण बदल पहायला मिळाला. बंडखोरांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवण्यापेक्षा अन्य पक्षात जाणे पसंत केले आणि मुख्य म्हणजे सर्वच प्रमुख पक्षांनीही आपले दरवाजे अशा बंडखोरांना खुले ठेवले. यातून पक्षनिष्ठा व पक्षांतर याभोवती असलेले कवच तकलादू झाल्याचे दिसले. 

तिसरे वैशिष्ट्य म्हणजे प्रकाश आंबेडकर यांनी ‘वंचित बहुजन आघाडी’ बांधण्याचा प्रयत्न करून पुरोगाम्यांच्या आशा पल्लवीत केल्या होत्या, पण नंतर आकांडतांडव करून आणि उलट-सुलट भूमिका घेऊन त्यांनी आपली विश्वासार्हता बरीच कमी केली. 

कदाचित या निवडणुकीचे सर्वांत महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणून राज ठाकरे यांनी निवडणूक न लढवता घेतलेल्या जोरदार प्रचारसभा. या वर्षी मनसे लोकसभा निवडणूक लढवणार नाही अशी घोषणा राज ठाकरे यांनी केली, तेव्हा आणखी एक हास्यास्पद भूमिका ते वठवणार अशी चर्चा सुरू झाली. पण नंतर अनपेक्षित कलाटणी मिळाली. मोदी-शहा यांना पराभूत करा अशी मांडणी करून त्यांनी प्रचारसभा घेतल्या. इतका प्रतिसाद मिळेल असे त्यांना सुरुवातीला अनपेक्षित नसावे.

किंबहुना प्रतिसाद वाढतोय म्हणून त्यांनी सभांची संख्या वाढवली असावी. त्यांनी केलेल्या या प्रचाराचा फायदा त्यांच्या पक्षाला किती होईल, काँग्रेस-राष्ट्रवादी यांना किती होईल आणि त्यांची ही भूमिका व प्रचार कोणाच्या सांगण्यावरून झाला की, त्यांच्या स्वत:च्या रणनीतीचा भाग होता, हे यथावकाश स्पष्ट होत जाईल. मात्र अशा प्रकारची भूमिका घेऊन काम करायला वाव आहे, हे या निमित्ताने स्पष्ट झाले. आणि राज ठाकरे यांची स्वीकारार्हता बऱ्यापैकी वाढली.          
 

Tags: loksabha election 2019 editorial लोकसभा निवडणूक २०१९ संपादकीय weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके

कर्तव्य

सर्व पहा