डिजिटल अर्काईव्ह (2014-2019)

ब्रिटिश कालखंडात महाराष्ट्रातील एक साधा पोस्ट खात्यातील कर्मचारी आपल्या पत्नीला शिकवण्यासाठी, डॉक्टर बनविण्यासाठी अमेरिकेला पाठवण्यासाठी ज्या कसरती करतो, ते प्रकरण कोणीही अचंबित व्हावे, थरारून जावे असे आहे आणि एका महामानवाची जीवनसाथी म्हणून आयुष्य निभावताना, जवळपास अर्धशतक चाललेल्या रणसंग्रामाची साक्षीदार म्हणून वावरताना कस्तुरबांना काय कसरती कराव्या लागल्या असतील, याची कल्पना करतानाही मती गुंग होऊ शकते

या वर्षीच्या आंतरराष्ट्रीय महिलादिनाचे घोषवाक्य होते 'बॅलन्स फॉर बेटर'. रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांचे सव्वाशे वर्षांपूर्वी विशेष लक्षवेधी ठरलेले विधान होते, ‘बाय किपिंग अवर विमेन अवे फ्रॉम एज्युकेशन वि हॅव लॉस्ट अवर हाफ ऑफ एनर्जी.’ वरील दोन वाक्यांतील बॅलन्स आणि एनर्जी हे दोन शब्द काळजीपूर्वक घ्यायला हवेत. तोल आणि ऊर्जा.
 
येत्या 31 मार्चला आनंदीबाई जोशी यांची 154 वी जयंती येत आहे, तर 11 एप्रिलला कस्तुरबा गांधी यांची 150 वी जयंती आहे. आनंदीबाईंना 1865 ते 1887 असे केवळ 22 वर्षांचे आयुष्य लाभले, तर कस्तुरबा यांना 1869 ते 1944 असे 75 वर्षांचे. आनंदीबाई भारतातील पहिली महिला डॉक्टर तर कस्तुरबा जवळपास निरक्षर. आनंदीबाई यांच्या जीवनसंघर्षाची कहाणी सांगणारा मराठी चित्रपट ‘आनंदी गोपाळ’ गेल्या महिन्यात प्रदर्शित झाला आहे आणि चांगला चालला आहे. महात्मा गांधी यांचे 150 वे जयंतीवर्ष सध्या चालू आहे आणि त्यानिमित्ताने अनेक कार्यक्रम व उपक्रमांची रेलचेल होत आहे. 

ब्रिटिश कालखंडात महाराष्ट्रातील एक साधा पोस्ट खात्यातील कर्मचारी आपल्या पत्नीला शिकवण्यासाठी, डॉक्टर बनविण्यासाठी अमेरिकेला पाठवण्यासाठी ज्या कसरती करतो, ते प्रकरण कोणीही अचंबित व्हावे, थरारून जावे असे आहे आणि एका महामानवाची जीवनसाथी म्हणून आयुष्य निभावताना, जवळपास अर्धशतक चाललेल्या रणसंग्रामाची साक्षीदार म्हणून वावरताना कस्तुरबांना काय कसरती कराव्या लागल्या असतील, याची कल्पना करतानाही मती गुंग होऊ शकते. त्यामुळे या दोघींच्या कार्यकर्तृत्वाचा वेध घेण्याचा प्रयत्न करणारे साधनाचे दोन अंक किंवा दोन विशेष विभाग एप्रिल महिन्यात प्रसिद्ध होतील. 

महाराष्ट्राच्या आणि भारताच्याही संदर्भात आज ज्या अर्थाने आधुनिक हा शब्द वापरला जातो, त्याची सुरुवात एकोणिसाव्या शतकाच्या प्रारंभी झाली. कारण नव्या पद्धतीने विचार करायला लावणारे पश्चिमेचे वारे तेव्हा वाहू लागले. ते वारे आणि तो कालखंड नीट समजून घेतला आणि त्यानंतरच्या शतकभरात या देशाने जी मजल मारली ती लक्षात घेता आली तर, आजच्या वर्तमानाचे, त्याच्या स्थितीगतीचे आकलन तुलनेने अधिक चांगले होऊ शकेल. मुख्य म्हणजे पुढील वाटचालीसाठी ते दिशादर्शकही वाटू शकेल. 

एक सार्वकालिक सत्य मात्र स्पष्ट होते ते हेच की, कोणत्याही घटकांच्या उन्नतीसाठी कमी वेळात, कमी श्रमात, कमी खर्चात जास्तीत जास्त परिणाम देणारा शिक्षण हाच सर्वोत्तम मार्ग आहे. त्यामुळे प्रत्येक समाजघटकासाठी हा मार्ग खुला करत जाणे, प्रशस्त करत जाणे हेच समाजधुरीणांचे आद्य कर्तव्य ठरते. या अंकातील रामचंद्र गुहा यांचा लेख, बुकर टी वॉशिंग्टन यांचे प्रकरण व अन्य लेखातूनही हेच अधोरेखित होते.         

Tags: कस्तुरबा गांधी आनंदी गोपाळ संपादकीय Kasturba Gandhi anandi gopal sampadakiy editorial weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या