डिजिटल अर्काईव्ह (2014-2019)

एका अवलियाची पंच्याहत्तरी

अवचट त्यांच्या लेखनाशी कमालीचे एकरूप झालेले असतात, तादात्म्य पावलेले असतात. आणि त्यामुळेच या माणसाने किती विपुल लेखन केले आहे, किती विविध प्रकारचे विषय याने हाताळले आहेत, याकडेही वाचकांचे पुरेसे लक्ष जात नाही. पण आता तसे लक्ष द्यायला हवे, अवचटांच्या लेखन कारकिर्दीचा वेध विविध स्तरांवरून घेतला जायला हवा. याचे एक कारण, अवचटांनी कालच्या 26 ऑगस्टला वयाची 75 वर्षे पूर्ण केली आहेत. पण दुसरे कारण अधिक महत्त्वाचे आहे, ते म्हणजे त्यांच्या लेखन-कारकिर्दीला 50 वर्षे पूर्ण झाली आहेत.

ज्यांचे लेखन वाचल्यावर आपण अस्वस्थ तरी होतो किंवा ताजेतवाने तरी होतो, अशा मराठीतील लेखकांची यादी करायची ठरली तर त्यात ‘अनिल अवचट’ हे नाव प्राधान्याने घ्यावे लागते. हा अनुभव मागील पन्नास वर्षांतील तीन-चार पिढ्यांनी तरी घेतलेला आहे. विशेष म्हणजे अवचटांचे लेखन वाचताना, ‘या माणसाचे वय काय असावे किंवा याने हे लिहिले तेव्हा त्याचे वय काय असेल’ असा विचार वाचकांच्या मनात येत नाही. वाचकांच्या मनात विचार येतो तो केवळ, अवचटांनी ज्या विषयांवर किंवा ज्या व्यक्तींवर वा समूहांवर लिहिले असेल त्यांचाच!

याचाच अर्थ, अवचट त्यांच्या लेखनाशी कमालीचे एकरूप झालेले असतात, तादात्म्य पावलेले असतात. आणि त्यामुळेच या माणसाने किती विपुल लेखन केले आहे, किती विविध प्रकारचे विषय याने हाताळले आहेत, याकडेही वाचकांचे पुरेसे लक्ष जात नाही. पण आता तसे लक्ष द्यायला हवे, अवचटांच्या लेखन कारकिर्दीचा वेध विविध स्तरांवरून घेतला जायला हवा. याचे एक कारण, अवचटांनी कालच्या 26 ऑगस्टला वयाची 75 वर्षे पूर्ण केली आहेत. पण दुसरे कारण अधिक महत्त्वाचे आहे, ते म्हणजे त्यांच्या लेखन-कारकिर्दीला 50 वर्षे पूर्ण झाली आहेत. आणि मागील अर्धशतकात त्यांच्या प्रसिद्ध झालेल्या पुस्तकांची संख्याही जवळपास अर्धशतक म्हणावी इतकी आहे. विशेष म्हणजे त्या सर्व लेखनांमध्ये बरीच विविधता आहे आणि त्या विविधतेतही एकता आहे.

अवचटांच्या अर्धशतकी लेखन कारकिर्दीचा वेध घेताना, त्यांच्या प्रारंभबिंदूकडे अधिक लक्ष द्यावे लागेल, ती सुरुवातीची प्रक्रिया नीट समजून घ्यावी लागेल. तसे करता आले तर पुढच्या काळातील अवचट समजणे अगदी सोपे जाईल. त्यातही सर्वप्रथम हे लक्षात घेतले पाहिजे की, ‘आपण लेखक-साहित्यिक व्हावे’ असा विचार त्यांच्या मनात ना त्या वेळी आला, ना ते अद्यापही रूढ अर्थाने स्वत:ला साहित्यिक मानतात. त्यातही गंमत ही आहे की, त्यांच्यातला लेखक आधी जन्माला आला आणि त्यांच्यातला वाचक नंतर आकाराला येत गेला. मन मानेल त्यात रममाण होणे आणि कंटाळा आला की, पुढे चालू लागणे; नवे काही दिसले की, त्यात डोकावून पाहणे, ही त्यांची स्वाभाविक प्रवृत्ती राहिली आहे; हे खरे आहे. परंतु तेच पूर्ण खरे मानले तर अवचटांच्या वाटचालीचे सुलभीकरण करण्यासारखे होईल. कारण मन घेऊन जाईल तिकडे वा त्या दिशेला भ्रमंती करताना अवचटांचे पाय कुठेही भरकटत नाहीत. उलट जिथे साधेपणातील सौंदर्य आहे तिथे आणि जिथे दु:ख, दैन्य, वेदना आहेत तिथे अवचटांनी मनाने वा प्रत्यक्षात भ्रमंती केलेली आहे.

पुणे जिल्ह्यातील ओतुर या लहानशा गावातून व मध्यमवर्गीय कुटुंबातून डॉक्टर होण्यासाठी पुणे येथील बी.जे.मेडिकल कॉलेजात प्रवेश घेईपर्यंतचा म्हणजे साधारणत: वयाच्या विशीपर्यंतचा त्यांचा कालखंड अगदीच साधा-सरळ होता. पुण्यात आल्यानंतर मात्र, एका बाजूला राज्याच्या वेगवेगळ्या भागांतून डॉक्टर होण्यासाठी आलेली मुले- मुली, दुसऱ्या बाजूला पुणे शहरातील तरुणाई व विद्यार्थीसंघटना आणि तिसऱ्या बाजूला राज्यात व देशात आकार घेत असलेल्या (1970 च्या दशकातल्या) विविध चळवळीचे घोंघावणारे वारे, या त्रिकोणात तरुण अनिल अवचटांचे भावनिक व वैचारिक भरणपोषण झाले. त्यातही दोन प्रबळ धागे त्या काळात त्यांना बांधून ठेवणारे व त्याच वेळी मुक्त अवकाशात विहार करण्यास प्रवृत्त करणारे ठरले. एक म्हणजे सुनंदा ही मैत्रीण जी त्यांची जीवनसाथी झाली आणि दुसरे म्हणजे युक्रांद (युवक क्रांती दल) ही विद्यार्थी संघटना जिने त्यांना सार्वजनिक जीवनातील दालन खुले करून दिले.

कुमार सप्तर्षी यांच्या नेतृत्वाखाली 1966-67 मध्ये युक्रांदच्या चळवळीने संपूर्ण महाराष्ट्रातील तरुणाईवर गारूड केले होते. त्या प्रक्रियेत पहिल्या वा आतल्या फळीमध्ये समावेश असलेल्या अनिल अवचटांना त्याच काळात तळागाळातल्या समूहांचे दर्शन घडले. विशेषत: 1966- 67 मध्ये बिहारमधील दुष्काळाचे, स्वयंसेवकांच्या तुकडीत गेल्यावर घडलेले दर्शन त्यांना ‘डॉक्टर’ होण्यातला रस संपवणारे होते. तो अनुभव त्यांना मुळापासून हादरवून टाकणारा होता, त्यावर आधारित ‘पूर्णिया’ या छोट्या पुस्तकात त्यांनी ते अर्धेकच्चे अनुभव रेखाटले आहेत. पण तो अनुभव किती सखोल होता, हे पाहायचे असेल तर 2016 च्या साधना दिवाळी अंकात लिहिलेला ‘बिहार’ हा दीर्घ लेख वाचायला हवा. खरे तर तब्बल पन्नास वर्षांनंतर तो लेख लिहिला गेला आहे, पण त्यातील तपशिल व अनुभव घेण्याची तरलता, संवेदना टिपण्याची क्षमता थक्क करणारी आहे. जणू काही ‘हा अवचटबाबा कालपरवा बिहारला जाऊन आलाय आणि रात्रीत लेख लिहून आपल्यासमोर ठेवलाय’ असे तो लेख वाचून झाल्यावर वाटते. त्या बिहारच्या अनुभवानंतर माणसांवर शारीरिक उपचार करण्यापेक्षा, माणसांचे दु:ख, दैन्य, हालअपेष्टा शब्दबद्ध करून वाचकांच्या मनावर उपचार करणे आवश्यक आहे, अशी त्यांची धारणा झाली असावी. आणि अर्थातच, ती धारणा बळकट होण्यासाठी सुनंदातार्इंनी दिलेले पाठबळ मध्यवर्ती ठरले.

बिहारच्या अनुभवानंतर अवचटांची दिशा निश्चित होण्याला कारण ठरले ते म्हणजे साधना साप्ताहिकातील ‘वेध’ ही लेखमाला. 1968-69 मध्ये वर्षभर अवचटांनी एक-दीड पानांचे लेख साधनातून लिहिले. यदुनाथ थत्ते त्यावेळी साधनाचे संपादक होते, आणि अशा तरुणांना मुक्त अवकाश देण्यासाठी त्यांची ख्याती होती. त्या लेखमालेत अवचटांनी सभोवताली दिसणाऱ्या अनेक लहान विषयांवर लिहिले. पण जे लिहिले ते थेट लिहिले, साध्या-सरळ भाषेत लिहिले, पण ते काळजाला हात घालणारे होते. 

‘वेध’मधला पहिलाच लेख छोटे वादळ उठवणारा ठरला. त्यावेळी पुणे शहरात बालगंधर्व रंगमंदिराची उभारणी होत होती आणि ‘स्वच्छ पुणे की सुंदर पुणे?’ असा वाद आकाराला येत होता. तेव्हा पु.ल.देशपांडे यांनी एका भाषणात/लेखात ‘सुंदर पुणे’ची बाजू मांडली होती. त्यावर टीका करणारा तरुण अनिल अवचटांचा ‘वेध’मधील तो लेख होता. गंमत म्हणजे त्यावेळी पु.ल.देशपांडे यांनी त्या लेखाचे नुसतेच कौतुक केले असे नाही, तर स्वच्छ पुणेसाठी काम करू इच्छिणाऱ्या अवचटांना मोठी देणगी देऊ केली. (त्यानंतर काही वर्षांनी मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र अनिल अवचट व सुनंदा अवचट यांनी सुरू केले.)

वेधमधील त्या 35 लेखांचे पुस्तक पुढे प्रकाशित झाले, त्याला विजय तेंडुलकर यांनी प्रस्तावना लिहिली. त्या पुस्तकाची अर्पणपत्रिका आहे ‘भरपूर लिहिण्याची संधी देणाऱ्या साधना साप्ताहिकाला’ आणि पुस्तकाच्या मनोगतात अवचट म्हणतात, ‘आयुष्यभर पुरतील इतके विषय मला या लेखमालेने दिले.’ खरे आहे ते!

‘वेध’नंतरची तीन वर्षे (1969 ते 72) या काळात अनिल अवचट यांनी साधनात विपुल लेखन केले. कार्यकारी संपादक म्हणून काम केले. अनेक विशेषांक प्रसिद्ध केले. दुष्काळावरील विशेषांक असो वा दास्यमुक्ती विशेषांक. त्यातही सर्वांवर कळस ठरलेला अंक म्हणजे 15 ऑगस्ट 1972 चा विशेषांक. ‘भारतीय स्वातंत्र्याला        25 वर्षे झाल्यानंतरही भारतात दलितांची अवस्था काय आहे’ या प्रश्नाचा वेध घेणारा तो विशेषांक होता. दलित समाजातील तरुणाईचे अनुभवकथन असणारा तो अंक कोणाही संवेदनशील वाचकाची झोप उडवणारा होता. पण त्या अंकातील राजे ढाले यांच्या ‘काळा स्वातंत्र्यदिन’ या लेखामुळे गदारोळ उडाला आणि परिणाम म्हणून त्या अंकातील आशय-विषयावर चर्चा न होता, त्या वादाला भलतेच वळण लागले. (त्या संपूर्ण प्रकरणावर नेमका दृष्टिक्षेप टाकणारा साधनाचा 3 ऑगस्ट 2019 चा अंक वाचकांनी जरूर पाहावा.)

ते वादळ लवकरच शांत झाले, पण त्यानंतर थोड्याच काळात अनिल अवचट साधना वर्तुळाच्या केंद्रस्थानावरून परिघाबाहेर गेले. नंतर काही काळ ‘मनोहर’ या खास तरुणाईसाठी व तरुणाईकडून चालवल्या जाणाऱ्या साप्ताहिकासाठी त्यांनी काम केले. दरम्यानच्या काळात एकेक प्रश्न किंवा समस्या हातात घेऊन, दीर्घकाळ पाठपुरावा करून, अनेक लहानथोरांच्या भेटीगाठी घेऊन, बरीच पायपीट करून/प्रवास करून दीर्घ लेख लिहायला त्यांनी सुरुवात केली. असे लेख महाराष्ट्रातील प्रमुख नियतकालिकांच्या विशेषांकामधून किंवा दिवाळी अंकांमधून प्रसिद्ध व्हायला लागले आणि मग त्यांनी कोणत्याही एका नियतकालिकाशी बांधून न घेता, स्वतंत्रपणे लेखन चालू ठेवले.

याच प्रवासात त्यांना एस.एम.जोशी ते बाबा आढाव इथपर्यंतचे सामाजिक कार्यकर्ते-नेते आणि नरहर कुरुंदकर ते हमीद दलवाई इथपर्यंतचे प्रतिभावंत खुणावत राहिले. त्यामुळे 1975 नंतरच्या दोनेक दशकात अवचटांनी हाताळलेले विषय/प्रश्न पाहिले तर थक्क व्हावे लागते. सर्व प्रकारचे उपेक्षित/शोषित घटक त्यांच्या लेखनाचे विषय बनले. त्यातून पुढे आकाराला आलेली पुस्तके पाहिली तरी अचंबा वाटतो. उदा. गर्द, संभ्रम, धार्मिक, माणसं, कार्यरत, धागे उभे आडवे इत्यादी. यातच ‘रिपोर्टिंगचे दिवस’ आणि ‘मुक्तांगणची गोष्ट’ यांचा विचार केला तर या अवचटबाबाचा अवकाश केवढा मोठा होता, याची प्रचिती येते. हे सर्व लेखन प्रखर सामाजिक भान देते, अस्वस्थतेची जाणीव देते; पण फ्रस्ट्रेशन देत नाही, निराशेची पेरणी करत नाही.

दुसऱ्या बाजूला अवचटांची काही पुस्तके अशी आहेत जी मन प्रफुल्लित करतात, जीवनातील सौंदर्याचा-लालित्याचा आस्वाद घ्यायला शिकवतात. जीवनातील आनंद शोधायला मदत करतात. त्यात ‘मोर’मधील ललित लेख असतील किंवा अन्य पुस्तकांमधील व्यक्तिचित्रे असतील. ‘छंदांविषयी’ हे पुस्तक तर छंद या कल्पनेला गंभीर परिमाण बहाल करते. अगदी अलीकडच्या काळात त्यांची ‘वनात जनात’ आणि ‘सृष्टीत गोष्टीत’ ही दोन पुस्तके बालसाहित्य म्हणून नावाजली गेलीत. पण मुळात ती त्यांनी त्या हेतूने लिहिली नव्हती. व्यक्त होताना जो काही आकार घेऊन उतरेल ते लेखन त्यांनी केले. निसर्ग आणि माणूस, प्राणिसृष्टी आणि वनस्पतीसृष्टी यांना कवेत घेणारे, त्या सर्वांशी हितगुज करणारे ते लेखन असल्याने बालकुमार साहित्य म्हणून ते ओळखले गेले.

गेल्या एक-दीड दशकात, अवचटांचे लेखन अधिक सरल-तरल होत राहिले. त्यांच्या लेखणीत व भाषणांतूनही अगदी साध्या व निसर्गाच्या जवळ जाणाऱ्या जीवनाचा पुरस्कार अधिक आग्रहाने होऊ लागला. सभोवतालच्या राजकीय-सामाजिक घटना- घडामोडींबाबत त्यांना फारसा रस वाटेनासा झाला. मग ते ओरिगामी ते बासरी इत्यादी प्रकारच्या छंदांमध्ये अधिक रममाण होताना दिसू लागले. पूर्वीच्या आयुष्यातील व्यक्ती-घटना-प्रसंग यांवरच प्रामुख्याने लिहू लागले. वस्तुत: हे अगदीच स्वाभाविक आहे. एक संवेदनशील माणूस समाजातील तळागाळाच्या प्रवाहात दोन-तीन दशके मध्यभागी राहून पोहला असेल तर नंतरच्या काळात त्याने जरा उसंत घेणे, काठावर उभे राहून सभोवताल न्याहाळणे, काठाकाठाने पोहणे अगदीच साहजिक ठरते. त्यामुळे त्या वर्तनाला इतरांनी नावे ठेवणे किंवा जास्तीच्या अपेक्षा करणे हे त्या माणसावर अन्याय करण्यासारखे आहे. अवचटांचे मूल्यमापन करताना तसा अन्याय कोणी कळत-नकळत करत असेल तर त्याला केवळ कृतघ्नपणा असेच म्हणावे लागेल.

साधना साप्ताहिकाच्या सात दशकांच्या वाटचालीत पाचेक वर्षांचाच एक झंझावाती कालखंड अवचटांच्या नावाने ओळखला जाईल. त्यासाठी त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करून, त्यांच्या पुढील आरोग्यसंपन्न जीवनासाठी आम्ही शुभेच्छा देतो! 

Tags: संपादकीय अनिल अवचट Editorial Anil Awchat weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या