डिजिटल अर्काईव्ह (2014-2019)

जॉर्ज व नीतिश यांच्या वर्तनातील सुसंगती

जॉर्ज यांना सत्तेचा मोह नव्हता, पण सत्तेच्या माध्यमातून जे करता येते त्या तुलनेत बाहेर राहून फार करता येत नाही, हा त्यांचा पूर्वानुभव होता. शिवाय, त्यांना रालोआचे निमंत्रक केले गेले व त्यांनी बनवलेला किमान समान कार्यक्रम भाजपने मान्य केला. जॉर्ज यांचे राजकारण व त्यांच्या भूमिका उलगडून दाखवणारे लेखन वा मुलाखती फारशा उपलब्ध नाहीत. परंतु अमिताव घोष यांच्या Countdown या पुस्तकात फर्नांडिसांच्या मुलाखतीतून जी त्रोटक उत्तरे आलीत त्यातून ते स्पष्ट सांगतात की, ‘सर्व पुरोगामी पक्षांचे दरवाजे मी ठोठावत होतो, लालूंना आवरा म्हणत होतो. पण कोणीही माझ्या मदतीला आले नाही, मग शेवटचा पर्याय म्हणून मी भाजपसोबत गेलो.’

सार्वजनिक जीवनात दीर्घकाळ वावरलेल्या आणि अनेक चढउतारांचा सामना करत प्रभावशाली राहिलेल्या व्यक्तींच्या विचारांचा व कार्याचा अन्योन्य संबंध लावता येणे अवघड असते आणि त्यांच्या व्यक्तित्वाचा गाभा व आवाका पकडता येणे कठीण असते. जॉर्ज फर्नांडिस यांच्या बाबतीत तर हे काम जास्तच गुंतागुंतीचे आहे. कारण या माणसाचा पिंड मूलत: क्रांतिकारकाचा होता. शिवाय, तत्त्व आणि व्यवहार असा पेच जेव्हा जेव्हा उभा राहिला, तेव्हा तेव्हा त्यांनी व्यवहाराच्या बाजूने कौल दिला, गाडा पुढे सरकला पाहिजे या धारणेतून त्यांची ही भूमिका राहिली. त्यांच्याविषयी अनेकांनी अनेक प्रकारे लिहिले आहे, त्यात त्यांच्या कौतुकाचे मुद्दे सर्वसाधारण सहमती होईल असे आहेत.

मात्र त्यांच्यावरील टीकेचा मुख्य मुद्दा असा आहे की, त्यांनी भाजपशी संबंध ठेवले ही सर्वांत मोठी चूक केली. ‘त्यांनी ही चूक केली’ यावर ज्यांची सहमती आहे, त्यापैकी फार कोणी त्याची कारणमीमांसा करण्याचा प्रयत्न केलेला नाही. इथे तसा प्रयत्न करणे आवश्यक वाटते.

29 जानेवारीला जॉर्ज फर्नाडिस यांचे निधन झाले तेव्हा ते 88 वर्षांचे होते. शेवटची आठ-दहा वर्षे ते अल्झायमरच्या विकाराने त्रस्त असल्याने, या जगात असून नसल्यासारखेच होते. मात्र वयाच्या 37 व्या वर्षी ‘जायंट किलर’ची भूमिका बजावून लोकसभेत प्रवेश मिळवल्यानंतरची 40 वर्षे ते भारतीय राजकारणातील वादळी व्यक्तिमत्त्व होते. त्यांनी नऊ निवडणुका जिंकून संसदेत (लोकसभा व राज्यसभा) आपले स्थान कायम राखले होते. दरम्यानच्या काळात तीन वेगवेगळ्या आघाडी सरकारांमध्ये त्यांची मंत्रिपदाची कारकीर्द गाजली. 1977 मध्ये जनता पार्टीच्या मोरारजी देसाई मंत्रिमंडळात ते उद्योगमंत्री होते, तो कालखंड दोन वर्षांचा होता. 1989 मध्ये जनता दलाच्या व्ही.पी.सिंग मंत्रिमंडळात 11 महिने ते रेल्वेमंत्री होते. 1998 नंतरची साडेपाच वर्षे ते राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या अटलबिहारी वाजपेयी मंत्रिमंडळात संरक्षणमंत्री होते.

वरील तिन्ही आघाड्या काँग्रेसविरोधी होत्या, एवढेच नाही तर ‘काँग्रेस नको’ म्हणूनच आकाराला आलेल्या होत्या. म्हणजे आधीचे काँग्रेस सरकार प्रचंड बदनाम झाल्यानंतर आणि जनतेचा काँग्रेसवरील रोष कमालीचा वाढल्यानंतर जन्माला आलेल्या त्या आघाड्या होत्या. अनुक्रमे इंदिरा गांधी, राजीव गांधी व नरसिंहराव यांच्या भ्रष्ट राजवटीनंतरच्या त्या आघाड्या होत्या. त्यांपैकी जनता पार्टीमध्ये जे अनेकविध पक्ष विसर्जित झाले होते, त्यात आजचा भाजप म्हणजे तेव्हाचा जनसंघ होता. जनता दलाचे सरकार चालले ते डावे पक्ष (कम्युनिस्ट) आणि उजवा पक्ष (भाजप) या दोहोंनी बाहेरून दिलेल्या पाठिंब्यावर. आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीमध्ये त्यावेळचा देशातील सर्वांत मोठा पक्ष (लोकसंख्येतील बळानुसार) भाजप होता.

याचाच अर्थ फर्नांडिस हे केवळ शेवटची आठ-नऊ वर्षे भाजपबरोबर होते असा नसून, त्यांच्या सार्वजनिक जीवनातील 40 वर्षांपैकी बराच काळ ते भाजपच्या कमी-अधिक सहवासात होतेच. तरीही शेवटच्या दशकात ते भाजपसोबत राहून, भाजपचे समर्थन कसे करत राहिले, असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. परंतु त्यात विशेष आश्चर्य वाटावे असे काही नाही. ‘काँग्रेसविरोध’ हा फर्नांडिस यांच्या राजकारणाचा मूलाधार होता आणि दुसऱ्या बाजूला तिसरी आघाडी म्हणून जे काही अस्तित्वात होते, त्यात एकसंधता अजिबात नव्हती. ज्या बिहारच्या आधारावर फर्नांडिस राष्ट्रीय राजकारण करीत होते, तिथे लालूप्रसादांना आवरता येईल अशी परिस्थिती नव्हती. त्यामुळे फर्नांडिस यांच्यासमोर दोनच पर्याय होते. एक- काँग्रेसप्रमाणेच भाजपही नको अशी भूमिका घ्यायची आणि अंतर्गत लाथाळ्या चालू ठेवत निष्प्रभ व्हायचे. आणि दुसरा- आपल्या पक्षाचे वा गटाचे अस्तित्व टिकवायचे असेल तर काही अंतर ठेवून भाजपसोबत राहायचे.

जॉर्ज यांनी दुसरा पर्याय निवडणे साहजिक होते. जॉर्ज यांना सत्तेचा मोह नव्हता, पण सत्तेच्या माध्यमातून जे करता येते त्या तुलनेत बाहेर राहून फार करता येत नाही, हा त्यांचा पूर्वानुभव होता. शिवाय, त्यांना रालोआचे निमंत्रक केले गेले व त्यांनी बनवलेला किमान समान कार्यक्रम भाजपने मान्य केला. जॉर्ज यांचे राजकारण व त्यांच्या भूमिका उलगडून दाखवणारे लेखन वा मुलाखती फारशा उपलब्ध नाहीत. परंतु अमिताव घोष यांच्या Countdown या पुस्तकात फर्नांडिसांच्या मुलाखतीतून जी त्रोटक उत्तरे आलीत त्यातून ते स्पष्ट सांगतात की, ‘सर्व पुरोगामी पक्षांचे दरवाजे मी ठोठावत होतो, लालूंना आवरा म्हणत होतो. पण कोणीही माझ्या मदतीला आले नाही, मग शेवटचा पर्याय म्हणून मी भाजपसोबत गेलो.’ ते म्हणणे आत्मसमर्थनार्थ दिलेले उत्तर असू शकते. पण लालूप्रसादांची बिहारमधील राजवट सलग 15 वर्षे चालली, तिचे वर्णन तेव्हा सर्व माध्यमांनी ‘जंगलराज’ या शब्दांत केले होते, हे लक्षात घेतले तर फर्नांडिस यांनी दिलेले कारण पूर्णत: चूक होते असे म्हणता येत नाही.

आता असा प्रश्न कोणी विचारू शकतील की, ‘लालू राहिले तरी चालतील, पण धर्मांध भाजपची साथसंगत नको’ अशी तत्त्वनिष्ठ भूमिका फर्नांडिस यांनी का घेतली नाही, पण मुळात हे लक्षात घ्यायला हवे की, ‘कसल्याही परिस्थितीत धर्मांध शक्ती नकोत’ अशी भूमिका जॉर्ज यांची होती का? ‘ॲन्टीकाँग्रेस’ भूमिकेबाबत ते जेवढे आग्रही होते तेवढे ते ॲन्टीबीजेपी कधीही नव्हते. त्यामुळे त्यांना स्वत:ला आपल्या भूमिकांमध्ये विसंगती दिसली नाही. त्यांच्याकडून जास्तीच्या अपेक्षा बाळगणारांना ती दिसली. असाच प्रकार त्यांच्या अन्य काही भूमिकांबाबतही दाखवता येईल. उदाहरणार्थ अणुशक्ती.

इंदिरा गांधी पंतप्रधान असताना 1974 मध्ये पोखरण येथे केलेल्या अणुचाचण्यांना फर्नांडिस यांनी विरोध केला होता, नंतर पंचवीस वर्षे त्यांची ती भूमिका तशीच होती आणि तरीही ते संरक्षणमंत्री असताना 1998 मध्ये पोखरणला ज्या अणुचाचण्या झाल्या, त्यांचे त्यांनी जोरदार समर्थन केले. त्यासंदर्भातही त्यांचे म्हणणे हेच होते की, ‘जगातील पाच बडी राष्ट्रे अणुशक्ती बाळगणार आणि आम्ही नाही’ हे चालणार नाही. अणुशक्ती नको असेल तर जगभरात कोणाकडेच नसावी, अशी ती भूमिका होती, ‘इतर राष्ट्रे अणुशक्ती बाळगोत अथवा न बाळगोत, आम्हाला मात्र ती नको’ अशी तत्त्वनिष्ठ किंवा आदर्शवादी भूमिका फर्नांडिस यांची नव्हती.

अशाच प्रकारची भूमिका त्यांनी सोनिया गांधी यांच्या विदेशी असण्याच्या संदर्भातही घेतली. या देशाला सोनिया गांधी पंतप्रधान म्हणून नकोत, अशी भूमिका त्यांनी 1998 मध्येच घेतली आणि ‘त्यावेळी सोनिया गांधी यांना मुलायमसिंग यादव यांनी पाठिंबा दिला नाही, त्यासाठी मीच मुख्य भूमिका बजावली’ अशी कबुलीही त्यांनी तेव्हाच दिली होती. अशीच भूमिका त्यांनी उद्योग क्षेत्रातही घेतली होती. विदेशी कंपन्यांना भारताबाहेर घालवणे याबाबत त्यांची ख्याती सर्वपरिचित आहे. परंतु विदेशी गुंतवणूक, व्यापार व बाजारपेठा या देशावर आदळणारच असतील तर, आपण त्याप्रमाणे लवचिकता स्वीकारली पाहिजे, हेही त्यांना मान्यच होते. एकंदरीत काय तर फर्नांडिस यांच्या विसंगती इतरांना दिसतात, प्रामुख्याने त्यांच्याकडून जास्त अपेक्षा बाळगणाऱ्या त्यांच्या चाहत्यांना दिसतात. फर्नांडिसांना मात्र त्यात आंतरिक सुसंगतीच दिसत होती. त्यांनी आत्मचरित्र लिहिले असते तर ती सुसंगती त्यांनी दाखवली असती आणि ‘माझ्याकडून अवास्तव/भलत्याच अपेक्षा का बाळगता?’ असा सवालही कदाचित आपल्या चाहत्यांना व टिकाकारांना विचारला असता. त्यांची ही अंतर्गत सुसंगती कशी असेल, याचा अंदाज बांधायचा असेल तर त्यांचे शिष्योत्तम नीतिशकुमार यांच्या वर्तनाकडे व भूमिकांकडे लक्ष वळवावे लागेल.

मागील 24   वर्षांमधील 21 वर्षे नीतिशकुमार भाजपसोबत आहेत. 1994 ते 2013 अशी 19 वर्षे त्यांना भाजपसोबत सुरक्षित अंतर ठेवून राहण्यात काहीच अडचण आली नाही. त्यांनी 2013 मध्ये ‘मोदी नकोत’ अशी तत्त्वनिष्ठ भूमिका घेतली असे दिसले. पण तेव्हा भाजपसोबतची युती तोडली तर स्वबळावर बिहारची सत्ता चालवता येईल अशी विधानसभेतील स्थिती होती आणि बिहारमधील मुस्लिम मतदारांचे गणित हा व्यवहार्यतेचा मुद्दा होता. त्यानंतर 2014 च्या लोकसभा निवडणुकीत त्यांच्या पक्षाला जेमतेम दोन जागा मिळाल्या तेव्हा पराभवाची नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी राजीनामा दिला. तेव्हाही ती तत्त्वनिष्ठ भूमिका दिसली, पण पक्षांतर्गत नाराजी शमवणे व दलित मतदारांना खेचण्यासाठी ती खेळी होती. मात्र जीतनराम मांझी यांना मुख्यमंत्री केल्यावर परिस्थिती बिघडत चालली, तेव्हा त्यांनी ‘तत्त्व तत्त्व’ न म्हणता जीतनराम यांना हटवले आणि स्वत: त्या जागेवर आले.

त्यानंतर 2015 मध्ये बिहार विधानसभा निवडणुकीत त्यांनी लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाशी युती केली, ती वस्तुत: स्वत:च्या तत्त्वाशी केलेली खूप मोठी तडजोड होती. कारण ज्या लालूप्रसादांचे 15 वर्षांचे जंगलराज हटवून ते सत्तेवर आले होते, त्याच लालूबरोबर त्यांना युती करावी लागली होती. याचे कारण भाजप व राष्ट्रीय जनता दल हे दोन्हीही नकोत अशी तत्त्वनिष्ठ भूमिका त्यांना परवडणारी नव्हती. धर्मांध/फॅसिस्ट नरेंद्र मोदींचा भाजप आणि गुंडागर्दी व भ्रष्टाचारात आकंठ बुडालेला लालूप्रसादांचा राष्ट्रीय जनता दल, असे दोन पर्याय बिहारमध्ये जनतेला उपलब्ध होते. त्या दोहोंना पूर्ण टाळून नीतिशकुमारांना बिहारी जनता साथ देईल अशी स्थिती नव्हती. म्हणून नीतिशकुमारांनी अलीकडे झालेल्या व शक्तिशाली असलेल्या शत्रूसोबत (भाजप) जाण्याऐवजी, खूप पूर्वी झालेल्या व कमजोर असलेल्या शत्रूसोबत (राजद) जाण्याचा पर्याय निवडला होता.

वस्तुत: नीतिशकुमारांसाठी ती तत्त्वाला दिलेली तिलांजली होती. पण भाजपचे टिकाकार असलेले नीतिशकुमारांचे चाहते तेव्हा असे मानत राहिले की, त्यात तत्त्वनिष्ठा आहे. एवढेच नाही तर भाजपला दूर ठेवण्यासाठी नीतिशकुमार लालूप्रसादांबरोबर आलेत असाही गैरसमज भल्याभल्यांनी करून घेतला. वस्तुत: नीतिशकुमारांसाठी हे दोन्ही पक्ष त्यावेळी (मायावतींच्या भाषेत) नागनाथ व सापनाथ होते आणि नीतिशबाबूंना स्वत:चा बचाव करायचा होता, बिहारमध्ये अस्तित्व राखायचे होते. गंमत म्हणजे नीतिशकुमार हे पंतप्रधानपदाचे प्रबळ दावेदार किंवा उमेदवार ठरू शकतात, अशी भाकिते व स्वप्नेही तेव्हा इतरांकडून पाहिली जाऊ लागली होती. पण ज्या नीतिशकुमारांना 25 वर्षांच्या काळानंतरही बिहारची अर्धी सत्ताच तेवढी मिळवता येते आणि बारा-पंधरा खासदार लोकसभेवर निवडून आणता येतील इतकीच क्षमता आहे, त्या नीतिशकुमारांना कोण कशाला पंतप्रधान होऊ देईल? तो दावा तरी किती प्रबळ असेल? आणि अखेर 2015 च्या विधानसभा निवडणुकीत राजदपेक्षा कमी जागा मिळाल्यावर लहान-मोठे अपमान पचवत नीतिशकुमार यांनी तरुण लालूपुत्राला उपमुख्यमंत्री करून घेत मुख्यमंत्रीपदाचा गाडा चालवला तोही जेमतेम दीड वर्ष.

दरम्यान काँग्रस व अन्य पक्ष राष्ट्रपतीपदाचा उमेदवार ठरवण्यावरून जो घोळ घालत बसले, त्यातच नीतिशकुमारांना (शितावरून भाताची) परीक्षा करता आली आणि रोजची कटकट व दूरवरून पाहणाऱ्या चाहत्यांची खोटी स्वप्ने (पंतप्रधानपद) यातून सुटका करून घ्यावीशी वाटली. आणि मग मोदींबरोबर जाणे परवडले, पण लालू नकोत अशी त्यांची मन:स्थिती झाली. त्यानंतर त्यांचा भाजपसोबतचा सुखी संसार पूर्वीप्रमाणे चालू आहे. याचाच अर्थ भाजपचे विरोधक व नीतिशकुमारांचे चाहते असलेले लोक एक प्रकारचा भ्रम जोपासत होते/ आहेत. मागील पाव शतकात नीतिशकुमार यांच्यासाठी भाजप जवळचा राहिला आहे, लालूप्रसाद वा काँग्रेस नव्हे!

मग प्रश्न उलटाच निर्माण होतो की, भाजपसोबत इतका प्रदीर्घ काळ साथसंगत करणारे नीतिशकुमार भाजपला कडवा विरोध करणाऱ्यांना का आवडतात? याचे उत्तर नीतिशकुमार यांनी भाजपसोबत राहूनही राखलेल्या अंतरामध्ये दडलेले आहे. एका अर्थाने नीतिशकुमारांचे हे मोठेच यश आहे. असाच प्रकार जॉर्ज फर्नांडिस यांच्याबाबतही आहे. भाजपची साथसंगत वगळता उर्वरित जॉर्ज जवळपास सर्वमान्य आहेत. फरक इतकाच आहे की, जॉर्ज यांनी शेवटच्या काळात भाजपच्या धर्मांध वर्तनाचे समर्थन केले, नीतिशकुमारांनी तसे दिसणार नाही याची काळजी घेतली.                    

Tags: obituary article mrutyulekh nitishkumar george fernandes मृत्युपर लेख editorial अल्झायमर संपादकीय नितीश कुमार जॉर्ज फर्नांडीस weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके

कर्तव्य

सर्व पहा