डिजिटल अर्काईव्ह (2014-2019)

ग्रेटाच्या त्या आंदोलनाचे लोण पाश्चात्त्य देशांत विशेषत: (समृद्धीतून निर्माण झालेल्या) संकटात सापडलेल्या देशांत घेतली जाऊ लागली. मग अनेक देशांतील शालेय मुले पुढे येऊ लागली. सोशल मीडियाच्या माध्यमांतून जोडली जाऊ लागली, आपापल्या ठिकाणी छोटी पण लक्षवेधी आंदोलने करू लागली. त्याचा परिणाम असा झाला की, ग्रेटाला पर्यावरण व वातावरणीय बदलांच्या संदर्भात विचार व चर्चा करण्यासाठी आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये बोलावणे येऊ लागले.

या अंकाची मुखपृष्ठकथा म्हणून पर्यावरण हा विषय जुळून आला आहे. ‘महाराष्ट्राच्या पाणीप्रश्नावरील तोडगा’ या लेखातील कल्पना किती व्यवहार्य आहे आणि प्रत्यक्षात ती आणण्यासाठी राजकीय इच्छाशक्ती कोण दाखवणार हा चर्चेचा/वादाचा विषय होऊ शकतो. परंतु असा आऊट ऑफ बॉक्स विचार करण्याची गरज आहे, हे मात्र निश्चित! त्याचप्रमाणे ‘वाळूसंवर्धनाचा लढा’ लेखात आलेल्या कहाणीप्रमाणे किती गावांतून तशी जागृती होऊ शकते व प्रत्यक्ष कार्यवाही होऊ शकते हाही चर्चेचा विषय आहे. परंतु या प्रकारच्या कामाला पाठबळ मिळायला हवे हे तर निश्चित. त्यामुळेच, या दोन्ही लेखांना जोडून ग्रेटा थुनबर्ग या 16 वर्षांच्या मुलीकडे लक्ष वेधावेसे वाटते. 

गेल्या वर्षीच्या बालकुमार साधना दिवाळी अंकाचा प्रारंभ ग्रेटाच्याच गोष्टीने केला होता. स्वीडनमध्ये इयत्ता दहावीत शिकणाऱ्या या मुलीने ऑगस्ट 2018 मध्ये स्वीडनच्या संसदेच्या आवारात सलग तीन आठवडे आंदोलन केले होते. संसदेचे अधिवेशन चालू असतानाच्या काळात ही मुलगी शाळेच्या वेळेत, शाळेत न जाता संसदभवनाच्या भिंतीला पाठ लावून अभ्यास करत राहिली. त्या काळात तिने आपली भूमिका पत्रकांद्वारे मांडली आणि मुलाखतींमधूनही. त्या आंदोलनाची दाखल स्वीडनच्या संसदेने घेतली नाही, पण इंग्रजीतील गार्डियन व अन्य प्रमुख वृत्तपत्रांनी मात्र घेतली होती. 

त्यानंतर ग्रेटाच्या त्या आंदोलनाचे लोण पाश्चात्त्य देशांत विशेषत: (समृद्धीतून निर्माण झालेल्या) संकटात सापडलेल्या देशांत घेतली जाऊ लागली. मग अनेक देशांतील शालेय मुले पुढे येऊ लागली. सोशल मीडियाच्या माध्यमांतून जोडली जाऊ लागली, आपापल्या ठिकाणी छोटी पण लक्षवेधी आंदोलने करू लागली. त्याचा परिणाम असा झाला की, ग्रेटाला पर्यावरण व वातावरणीय बदलांच्या संदर्भात विचार व चर्चा करण्यासाठी आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये बोलावणे येऊ लागले. डिसेंबर 2018 मध्ये पोलंड येथे झालेल्या ‘युनायटेड नेशन्स क्लायमेट चेंज’ परिषदेमध्ये तिला बोलावण्यात आले होते. त्यानंतर जानेवारी 2019 मध्ये दाओस (स्वित्झर्लंड) येथे झालेल्या ‘वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम’मध्येही तिला भाषणासाठी आमंत्रित केले गेले. गेल्या आठवड्यात तिचे नोबेल पुरस्कारासाठी नामांकन झाले आहे. 

हे इतके सर्व वेगाने घडत आहे, पण हा काही चमत्कार नाही किंवा लहानांचे वेड्यांनी केलेले कौतुकही नाही. वयाच्या आठव्या वर्षांपासून ग्रेटाला ‘क्लायमेंट चेंज’ या समस्येने झपाटलेले आहे. त्यानंतरची आठ वर्षे वादळापूर्वीची शांतता असा तिचा वावर व अभ्यास राहिला आहे. ऑगस्ट 2018 मधील तिच्या त्या आंदोलनाने जी हालचाल झाली आणि मागील सात-आठ महिन्यांत तिची ज्या पद्धतीने दखल घेतली जात आहे, ते पाहता ग्रेटा नावाचे मानवी वादळ येऊ घातले आहे (अटलांटिक महासागरात ग्रेटा नावाचे नैसर्गिक वादळ घोंघावत असते) अशी चिन्हे दिसत आहेत. आता ग्रेटाला जो प्रतिसाद मिळतो आहे तो तिच्या परिपक्व व ठाम वर्तनामुळे तर आहेच, पण मुख्य कारण म्हणजे संपूर्ण जगाला कवेत घेणाऱ्या समस्येला (‘पर्यावरणीय ऱ्हासा’ला) तिने हात घातला आहे.
 
शांततेचा नोबेल पुरस्कार देताना आधीच्या वर्षभरात ज्या व्यक्तीने जागतिक स्तरावर वादळ निर्माण करून मोठ्या समस्येला हात घातला आहे किंवा बदलांना दिशा दिली आहे, त्याचा विचार प्रामुख्याने केला जातो. आता ग्रेटाला नोबेल मिळेल किंवा मिळणारही नाही, पण पुढील काही वर्षे, कदाचित काही दशके हे ग्रेटा वादळ घोंघावत राहील अशी शक्यता आहे.                                                                                                  
 

Tags: sampadakiy editorial environment greta Thunberg संपादकीय पर्यावरण शांततेचा नोबेल पुरस्कार ग्रेटा थुनबर्ग weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके

कर्तव्य

सर्व पहा