डिजिटल अर्काईव्ह (2014-2019)

बी. जे. खताळ पाटील : 101 व्या वर्षात पदार्पण

एक काळ असा होता की, ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून त्यांचे नाव चर्चिले जात असे आणि आजही कोणी अभ्यासक महाराष्ट्राचे ‘न झालेले मुख्यमंत्री’ म्हणून जी काही नावे घेतात, त्यात यशवंतराव मोहिते व बी.जे.खताळ ही दोन नावे हमखास असतात. 

लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराची तयारी आता अंतिम टप्प्यात आहे. सर्व राजकीय पक्षांनी निर्माण केलेला धुरळा पाहून सर्वसामान्य माणसे अचंबित व संभ्रमित अवस्थेचा अनुभव घेत आहेत. पक्षनिष्ठा, विचारनिष्ठा व लोकशाहीनिष्ठा इत्यादी संकल्पना या गदारोळात धूसर झाल्या आहेत. विश्वास ठेवावा अशा व्यक्ती वा पक्षसंघटना दिसत नाहीत आणि आशादायक वा दिलासादायक परिस्थितीही दृष्टिक्षेपात नाही. अशा वेळी समाजाची चिंता वाहणाऱ्या लोकांनी कोणाकडे डोळे लावून आश्वस्त व्हायचे असा गहन प्रश्न आहे. अर्थातच याला समाधानकारक उत्तर नाही. पण अगदीच गर्भगळित होण्याचे कारण नाही, असा विश्वासाचा सूर ऐकायचा असेल तर एक व्यक्तिमत्त्व आपल्यात आजही आहे.

हा अंक छापायला गेला त्या दिवशी (26 मार्च) त्या व्यक्तीने वयाची 100 वर्षे पूर्ण केली आहेत, त्यानिमित्ताने संगमनेर येथे एका भव्य समारंभाचे आयोजन केले होते. नाव काय? बी.जे.खताळ पाटील. अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यात 26 मार्च 1919 रोजी भिकाजी जिजाबा खताळ यांचा जन्म झाला. प्राथमिक व माध्यमिक शिक्षण संगमनेर परिसरात, पदवीचे शिक्षण बडोदा नगरीत आणि कायद्याचे शिक्षण पुणे शहरात, अशी घोडदौड केलेल्या बी.जे.खताळ यांनी 1942 च्या ‘चले जाव’ आंदोलनात सहभागी होऊन सार्वजनिक जीवनाचा श्रीगणेशा केला. त्यानंतरची 75 वर्षे भारतातील सार्वजनिक जीवन त्यांच्या नजरेसमोर स्वच्छ आणि स्पष्ट आहे.

एक नामवंत वकील म्हणून दीड दशक काम करणाऱ्या खताळ पाटील यांनी 1962 ते 85 या काळात, एक अपवाद वगळता विधानसभेच्या सर्व निवडणुका संगमनेर मतदारसंघातून जिंकल्या. त्यापैकी जवळपास वीस वर्षे ते राज्यात मंत्री होते. महसुल, पाटबंधारे, कायदा व न्याय, नियोजन, अन्न व नागरी पुरवठा, कृषी इत्यादी खात्यांचे कॅबिनेट मंत्री म्हणून त्यांची कारकीर्द विशेष गाजली. आज अशा कित्येक योजना चालू आहेत, ज्यांचे निर्णय खताळ दादा यांनी मंत्री असताना घेतले आहेत किंवा त्यांच्या कल्पनेतून त्या आल्या आहेत.

एक काळ असा होता की, ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून त्यांचे नाव चर्चिले जात असे आणि आजही कोणी अभ्यासक महाराष्ट्राचे ‘न झालेले मुख्यमंत्री’ म्हणून जी काही नावे घेतात, त्यात यशवंतराव मोहिते व बी.जे.खताळ ही दोन नावे हमखास असतात. कम्युनिस्टांची तत्त्वनिष्ठा आणि काँग्रेसची देशनिष्ठा यांचा अनोखा संगम खताळदादांच्या व्यक्तिमत्त्वात पहायला मिळतो. 1952 मध्ये न्यायाधीशपदावर रूजू होण्यासाठी निघालेला हा 33 वर्षांचा तरुण वकील, यशवंतराव चव्हाणांचा निरोप आला म्हणून त्याच दिवशी न्यायाधीशपदाचा राजीनामा देऊन विधानसभेसाठी उमेदवारी अर्ज भरायला गेला होता. परंतु त्या निवडणुकीत पराभव वाट्याला आला म्हणून पुन्हा वकिलीकडे वळला होता.

त्यानंतर 1957 मध्ये काँग्रेसकडून पुन्हा उमेदवारी अर्ज भरण्याचा आदेश आला, तेव्हा या वकिलाने विनम्र नकार दिला होता. त्याचे कारण काय तर, तेव्हा संयुक्त महाराष्ट्राची चळवळ जोरात चालली होती, त्या निवडणुकीत तोच प्रचाराचा प्रमुख मुद्दा असणार होता, आणि काँग्रेसची संयुक्त महाराष्ट्राच्या विरोधातील भूमिका मान्य नाही अशी खताळदादांची स्थिती होती. म्हणून   त्यांनी निवडणूक लढवण्यास नकार दिला होता. मात्र ‘पक्षातून बाहेर पडणार नाही, विरोधकांशी हातमिळवणी करणार नाही, उलट काँग्रेस पक्ष संगमनेरसाठी जो उमेदवार देईल त्याचा मी प्रचार करीन’ असे त्यांनी पक्षाला कळवले होते.

सन 1962 ची विधानसभा निवडणूक मात्र त्यांनी लढवली, जिंकली आणि त्याचवेळी यशवंतरावांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्री होण्यासाठी त्यांना आमंत्रण मिळाले. तेव्हा ते मंत्री व्हायला तयार नव्हते; कारण काय तर राज्यमंत्र्याला 500 रुपये वेतन मिळत होते, मुलांच्या कॉन्व्हेन्ट शिक्षणाचा व घरखर्च 700 रुपये येत होता आणि मंत्रिपदावर असताना वकिली करता येणार नव्हती. परंतु पक्षाचा आग्रह म्हणून ते मंत्री झाले आणि आणीबाणी- नंतरच्या निवडणुकीत झालेला पराभव सोडला तर दोन दशके आमदार व मंत्री म्हणून कार्यरत राहिले.

आणि 1980 च्या विधानसभा निवडणुकीच्या वेळीच त्यांनी जाहीर केले होते की, ‘ही माझी अखेरची निवडणूक असेल, वयाच्या 65 व्या वर्षी मी निवडणुकीच्या राजकारणातून निवृत्त होणार.’ केलेल्या प्रतिज्ञेला ते जागले आणि त्यानंतरच्या 35 वर्षांत त्यांनी कोणतीही निवडणूक लढवलेली नाही. त्यांची सहा मुले उच्चशिक्षित झाली आणि विविध क्षेत्रांत कार्यरत राहिली, त्यापैकी कोणीही वडिलांच्या नावाचा वापर तर केला नाहीच, पण वडिलांना अभिप्रेत असलेली तत्त्वनिष्ठा जपत आपापल्या ठिकाणी सचोटीने काम केले.

गेली 35 वर्षे खताळ-पाटील संगमनेर येथील जुन्या वाड्यात त्यांच्या डॉक्टर मुलाकडे वास्तव्याला आहेत, सर्व मुलांकडे अधूनमधून जातात. त्यांच्याकडे कोणीही नोकर नाही, त्यांच्या सेवेला वाहन नाही. स्वातंत्र्यसैनिक म्हणून ते मानधन घेत नाहीत. माजी आमदार म्हणून जी काही पेन्शन मिळते तेवढाच एकमेव आर्थिक स्रोत त्यांच्याकडे आहे. त्यांना मिळालेल्या सर्व पुरस्कारांच्या रकमा त्यांनी त्या-त्या वेळीच विविध संस्थांना देणगी म्हणून वाटप केल्या आहेत. वाचन, लेखन, चिंतन, प्रवास, निवडक भेटीगाठी असा त्यांचा दिनक्रम असतो. नियमित व्यायाम व माफक आहार, कोणतेही व्यसन नाही, कुटुंबाकडून पूर्ण आदर व काळजी यामुळे वयाची 100 वर्षे पूर्ण झाल्यावरही ते तंदुरुस्त आहेत. त्यांची स्मृती पूर्णत: शाबूत आहे, सभोवतालच्या अस्वस्थ परिस्थितीतही ते विचलित होत नाहीत. ‘अशी परिस्थिती येत असते आणि जातही असते’, याबाबत ते नि:शंक आहेत.

मूळचे वकील असल्याने शब्द, वाक्य यांचा काटेकोर वापर आणि तर्कशुद्ध युक्तिवाद ही त्यांची खासियत आजही कायम आहे. दोन दशके महत्त्वाच्या खात्यांच्या मंत्रिपदावर राहिल्याने व अनेक वेळा गोपनीयतेची शपथ घेतलेली असल्याने, आजही ते गतकाळाबाबत बोलताना त्या शपथेचे भान ठेवतात. गप्पांच्या ओघात शाब्दिक तोल जाण्याची शक्यता त्यांच्याबाबत संभवत नाही. जुने सहकारी वा त्यावेळचे दिग्गज नेते यांच्या संदर्भातील आठवणी सांगताना ते स्पष्टपणे बोलतात, परंतु कोणाचाही अनादर होणार नाही याची काळजी आपोआप घेतात. चूक-बरोबर काय याचा निवाडा करण्याचा आग्रह त्यांना केला जातो तेव्हा, त्या-त्या वेळच्या परिस्थितीकडे ते लक्ष वेधतात.

वयाच्या 85 व्या वर्षानंतर त्यांनी लेखनाला प्रारंभ केला आणि अनुभव, आठवणी व चिंतन अशा स्वरूपाच्या लेखनाची त्यांची पाच-सहा पुस्तके आतापर्यंत आली आहेत. गेल्याच आठवड्यात ‘माझे शिक्षक’ हे त्यांचे पुस्तक साधना प्रकाशनाकडून आले आहे. त्यांनी वयाची 99 वर्षे पूर्ण झाल्यानंतर लिहिलेले हे पुस्तक आहे. भारतातील ज्ञात असे हे पहिले उदाहरण आहे (खुशवंतसिंग यांनी वयाच्या 98 व्या वर्षी पुस्तक लिहिले होते.) या पुस्तकात त्यांनी ज्यांच्यापासून अनौपचारिक शिक्षणाचे धडे घेतले अशा 20 व्यक्तींविषयी लिहिले आहे.

आणि आता 100 वर्षे पूर्ण करीत असताना त्यांनी आणखी एक पुस्तक लिहायला घेतले आहे, ते लेखन साधना साप्ताहिकातून वा प्रकाशनाकडून छापायला आवडेल का, असे त्यांनी नम्रपणे विचारले आहे. ते पुस्तक त्यांच्याकडून उत्तम प्रकारे लिहून होवो आणि साधनाच्या सर्व वाचकांना वाचायला मिळो यासाठी त्यांना शुभेच्छा!                  

Tags: वाढदिवस खताळ पाटील संपादकीय Birthday Khatal Patil Editorial weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या


अर्काईव्ह

सर्व पहा

लोकप्रिय लेख

सर्व पहा

जाहिरात

साधना प्रकाशनाची पुस्तके

कर्तव्य

सर्व पहा