डिजिटल अर्काईव्ह (2014-2019)

‘प्रश्नचिन्ह’वाला मतीन भोसले

सुमारे सहा तास चाललेल्या या जातपंचायतीत अनेक साक्षीदार तपासण्यात आले. अखेरीस जातपंचायतीने पारसंता पवारला पारधित्व बहाल करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दिला. त्यासाठी तिला 21 हजार रुपयांचा दंड सुनावण्यात आला. या 21 हजार रुपयांतून हल्या, बकरे, दारू आणि सर्वांना जेवण देण्यात येईल. त्यानंतर पारसंता पवारला सन्मानपूर्वक तिच्या नवऱ्याच्या हवाली केले जाईल. तोपर्यंत ती पारधी बेड्यावर शेजारच्या पालावर राहू शकते.

आता सभागृहात पहिल्या रांगेत बसलेल्या वसंतराव भेगडे यांना विनंती करतो, त्यांनी तीन-चार मिनिटांसाठी विचारपीठावर यावे. मतीन भोसले या युवा कार्यकर्त्याला त्याने केलेल्या संघर्षात्मक कामासाठी कार्यकर्ता पुरस्कार प्रदान केला जाणार आहे. त्याला पुरस्कार का दिला जाणार आहे, हे तर मी सांगणार आहेच, पण त्याआधी एका महत्त्वपूर्ण घटनेविषयी तीन मिनिटांत सांगणार आहे.

ती घटना आहे 28 जानेवारी 2010 रोजीची. म्हणजे आज त्या घटनेला बरोबर नऊ वर्षे पूर्ण झाली आहेत. ती घटना आहे अमरावती जिल्ह्यातील मंगरूळ चव्हाळा या गावातील. त्या गावातील प्राथमिक शाळेच्या आवारात एक बोअरवेल होता. तिथे पाणी भरण्यासाठी पारधी समाजातील काही महिला आल्या होत्या. त्यावेळी त्या शाळेवर आलेल्या गटशिक्षणाधिकाऱ्याने (राम हळदे) त्या महिलांना पाणी भरण्यास मज्जाव केला. त्या महिलांमध्ये एक अधिक स्वाभिमानी व निर्भय महिला होती. तिचे नाव पारसंता पवार. तो विरोध न जुमानता ती पाणी भरण्यास पुढे सरसावली. राम हळदे यांनी तिला आधी शिवीगाळ केली, मग मारहाण केली आणि शेवटी तिला खाली पाडून लाथा-बुक्क्यांनी तुडवले.

पुढे काय झाले? त्या गावातील नव्याने शिकू लागलेल्या काही तरुणांनी जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला. ‘दखल घेऊ’ असे उत्तर त्यांना मिळाले, पण झाले काहीच नाही. राम हळदेला काहीही शिक्षा झाली नाही. तो उजळ माथ्याने गावात फिरत राहिला. ‘माझे कोणीही काहीही वाकडे करू शकत नाही’, असे सांगत राहिला. दुसऱ्या बाजूला काय झाले? पारसंता पवारची घटना पारध्यांच्या पालावरून इकडेतिकडे पसरत गेली. बातमी जातपंचायतीपर्यंत गेली. जातपंचायतीने पारसंता पवार हिला बहिष्कृत केले! का? तर तिला परपुरुषाचा स्पर्श झाला म्हणून!

मग पारसंता तिच्या पालापासून काही अंतरावरील पिंपळाच्या झाडाखाली राहू लागली, तिथेच झोपू लागली. ‘तिच्याशी कोणी बोलायचे नाही, तिला स्पर्श करायचा नाही, तिला कसलीही मदत करायची नाही,’ असा जातपंचायतीचा हुकूम होता. येणारे-जाणारे तिला भाकरीतुकडा फेकत राहिले. तिचा नवरा धिरून पवार उघड्या डोळ्यांनी हे सर्व पाहत होता. पण काही करू शकत नव्हता. तिचा पाच वर्षांचा मुलगा इतरांची नजर चुकवून एकदा आईकडे गेला, तर त्यालाही बहिष्कृत केले गेले. असे 19 दिवस गेले.

मग धिरून पवारने जातपंचायत बोलावली. जातपंचायतीने तिच्यावरचा बहिष्कार उठवण्याचा निर्णय घेतला. त्या घटनेवर आधारित लेख चंद्रपूरच्या अशोक पवार या युवा लेखकाने साधना साप्ताहिकाकडे पाठवला. दि. 3 एप्रिल 2010 च्या साधना अंकात तो प्रसिद्ध झाला. लेखाचे शीर्षक होते- ‘पारसंता पवारला अखेर ‘पारधित्व’ बहाल...’ त्या लेखाचा इंट्रो असा होता- ‘‘सुमारे सहा तास चाललेल्या या जातपंचायतीत अनेक साक्षीदार तपासण्यात आले. अखेरीस जातपंचायतीने पारसंता पवारला पारधित्व बहाल करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दिला. त्यासाठी तिला 21 हजार रुपयांचा दंड सुनावण्यात आला. या 21 हजार रुपयांतून हल्या, बकरे, दारू आणि सर्वांना जेवण देण्यात येईल. त्यानंतर पारसंता पवारला  सन्मानपूर्वक तिच्या नवऱ्याच्या हवाली केले जाईल. तोपर्यंत ती पारधी बेड्यावर शेजारच्या पालावर राहू शकते. दंड मान्य केल्यावर पारसंता पवारच्या हस्ते जातपंचायतीचे सदस्य पाणी पिले व तिचा इटाळ दूर झाल्याचे त्यांनी मान्य केले.

पारसंताला 19 दिवस निराश्रीताचे जिणे जगावे लागले. धिरून पवार याने जवळच्या गायी, बैल, शेळ्या विकून 10 हजार रुपये जातपंचायतीच्या हवाली केले. उरलेले 11 हजार रुपये येत्या सात-आठ दिवसांत तो जमा करेल, नंतर भोजनाचा कार्यक्रम त्या 21 हजार रुपयांतून होईल.’’ हा लेख वाचून पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथील एका निवृत्त शिक्षकाचे पत्र साधनाकडे आले. त्यात लिहिले होते, ‘‘पारसंता पवारला झालेला दंड हा पुरोगामी चळवळीला झालेला दंड आहे, असे मी मानतो. आणि मी स्वत:ला पुरोगामी म्हणवतो, त्यामुळे या दंडाची संपूर्ण रक्कम मी माझ्या तुटपुंज्या शिलकीतून देत आहे. कृपया, ही रक्कम पारसंता व धिरून पवार यांच्याकडे पाठवण्यात यावी.’’

तेव्हा साधनाचे संपादक होते डॉ.नरेंद्र दाभोलकर. त्यांनी ती दंडाची रक्कम पत्रकार परिषदेत जाहीरपणे देण्याचे ठरवले. त्यासाठी साधनाच्या कार्यकारी संपादकाला नागपूरला पाठवले. 2 जुलै 2010 रोजी, नागपूर येथील पत्रकार भवनात झालेल्या पत्रकार परिषदेत, सुरेश द्वादशीवार यांच्या हस्ते ती दंडाची रक्कम पारसंता पवारला देण्यात आली. तेव्हा द्वादशीवार म्हणाले, ‘‘पारसंतावर झालेल्या अन्यायाच्या बातम्या तर विदर्भातील सर्वच वृत्तपत्रांतून आल्या होत्या. पण ‘तिला झालेला दंड हा पुरोगामी चळवळीला झालेला दंड असून, तो आपण स्वत: भरला पाहिजे’ ही भावना मात्र साधना साप्ताहिकाच्या पुणे जिल्ह्यातील एका वाचकाच्या मनात आली आणि त्याप्रमाणे त्याने प्रत्यक्ष कृती केली, याची नोंद आपण सर्वांनीच घेण्याची गरज आहे.’’

 त्यावेळी पारसंता पवारने एकच वाक्य उच्चारले, ‘आता मला एकटे वाटत नाही, माझ्यात हिंमत आली आहे.’ पारसंता पवार, धिरून पवार व त्यांचा छोटा मुलगा या तिघांना अमरावती येथून नागपूरला घेऊन येणारा आणि पारसंतावरील अन्यायाचे प्रकरण बाहेर काढणारा मंगरूळ चव्हाळा या गावातलाच एक तरुण प्राथमिक शिक्षक होता, त्याचे नाव मतीन भोसले आणि पुणे जिल्ह्यातील तळेगाव दाभाडे येथील निवृत्त  शिक्षक- ज्याने ती दंडाची रक्कम साधनाकडे पाठवली होती, त्याचे नाव वसंतराव भेगडे.

वसंतराव भेगडे आणि मतीन भोसले या दोघांची भेट कधीही झालेली नाही. दोघांचा संवादही कधी झालेला नाही. दोघेही एकमेकांना ओळखत नाहीत. आज प्रथमच या विचारपीठावर दोघेही एकत्र आले आहेत. मी विनंती करतो, वसंतराव भेगडे यांना- त्यांनी मतीन भोसले या युवा कार्यकर्त्याला महाराष्ट्र फाउंडेशनचा संघर्षात्मक कामासाठीच कार्यकर्ता पुरस्कार प्रदान करावा... मतीन भोसलेच्या आयुष्यातील ही घटना 2010 ची आहे. त्यानंतरच्या दोन-तीन वर्षांत त्याच्या आयुष्यात बरेच काय काय घडले आणि 2013 मध्ये त्याने सरकारी नोकरीचा राजीनामा देऊन पारधी समाजातील मुलांसाठी आश्रमशाळा काढली. साधनाच्या आताच्या पुरस्कार विशेषांकात मतीनची सविस्तर मुलाखत आहे, तिचे शीर्षक आहे- ‘ये आझादी झूठी है, देश के पारधी भूखे है.’ या मुलाखतीचा इंट्रो असा आहे- ‘‘22 सप्टेंबर 2013 रोजी रिकामं गोडाऊन ताब्यात घेतलं. त्यात शाळा सुरू केली. कोणी म्हणालं, शाळेला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं नाव द्या. कोणी म्हणालं, महात्मा फुले यांचं नाव द्या. कोणी म्हणालं, भोसलेचं नाव द्या; तो आपलाच आहे. मी म्हटलं ‘अजिबात नाही’. भीक मागता- मागता अनेक प्रश्न आले. मुलांना शिकवण्यासाठी शिक्षक कसे आणायचे? निवारा कसा उभा करायचा? अन्नधान्य शिजवण्यासाठी भांडी कशी आणायची? पांघरायला बिस्तरे कसे जमा करायचे? असे अनेक प्रश्न माझ्या नजरेसमोर होते. मग शाळेचं नावसुद्धा ‘प्रश्नचिन्ह’ का ठेवू नये? सर्व जण ‘ठीक आहे’ म्हणाले. शाळा सुरू केली तेव्हा शनिवार, रविवार भीक मागून मुलांचं पालनपोषण केलं.’’

(27 जानेवारी 2019 रोजी, पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिरात झालेल्या महाराष्ट्र फाउंडेशन पुरस्कार वितरण समारंभात, मतीन भोसले यांना पुरस्कार देताना हे केलेले निवेदन आहे. हे निवेदन चालू असताना आणि मतीनला पुरस्कार देताना सभागृहातील वातावरण भारावून गेले होते, लोक टाळ्या वाजवत होते, उभे राहून अभिवादन करीत होते.)

Tags: सामाजिक काम महाराष्ट्र फौंडेशन पुरस्कार मतीन भोसले पारसंता पवार संपादकीय social work Maharashtra foundation award matin bhosale parsanta pawar Editorial weeklysadhana Sadhanasaptahik Sadhana विकलीसाधना साधना साधनासाप्ताहिक


प्रतिक्रिया द्या